उद्याचा मराठवाडा, रविवार 16 सप्टेंबर 2018
बी. रघुनाथ हे मराठवाड्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातले महत्त्वाचे लेखक. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली 16 वर्षे परभणीत ‘बी. रघुनाथ महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. औरंगाबादला गेली 29 वर्षे ‘नाथ संध्या’चे आयोजन करण्यात येते. बी. रघुनाथांच्या नावे एका लेखकाला पुरस्कारही देण्यात येतो.
एरव्ही सतत शासनाने काही तरी करा म्हणून सगळे आग्रह धरत असतात. पण मराठवाड्यात लेखक, रसिक साहित्यप्रेमी, सार्वजनिक ग्रंथालये, उद्योगपती एकत्र येतात आणि लेखकाच्या स्मृतीत उत्सव साजरा करतात ही या निमित्ताने समोर येणारी बाब फार महत्त्वाची आहे. म्हणूनच हा उत्सव टिकून आहे. त्यात औपचारिकता नसून उत्स्फुर्तता आहे.
औरंगाबादला बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनी ‘नाथ संध्या’ कार्यक्रमात रेखा बैजल यांच्या ‘प्रलयंकार’ कादंबरीला बी. रघुनाथ पुरस्कार मिलींद बोकील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात ‘साहित्याची लोकनीती’ या विषयावर बोकीलांनी व्याख्यान दिले. सरकार आणि साहित्यीक या विषयावर त्यांनी आपले परखड विचार रसिकांसमोर मांडले. सरकार कडून काहीच न घेता उलट सरकारलाच आपण दिलं पाहिजे. सरकार कडून उपकृत होणारे लेखक सरकार विरोधी भूमिका कसे घेवू शकतील? उलट रसिकांच्या आधारानेच वाङ्मय चळवळ उभी रहायला हवी. साहित्य मंचावर राजकारणी नकोतच. बोकीलांचे विचार बर्याच बोटचेप्या लेखकांना परवडणारे पचणारे नाहीत.
गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलने अक्षरश: राजकारण्यांची बटीक बनली आहेत. अशा वातावरणात बोकीलांचे परखड बोल अंधारात चमकणार्या दिव्यांसारखेच वाटले. कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की आमदार खासदार मंत्री माजी मंत्री किमान नगरसेवक नगराध्यक्ष महापौर यांचे कृपाछत्र असल्याशिवाय पार पडतच नाही. ही फार वाईट स्थिती आहे.
लेखकाच्या बाजूला बसलो तर राजकारण्यांना अंगाराचा भास झाला पाहिजे अशी अपेक्षा बोकीलांनी व्यक्त केली. पण नेमकी याच्या उलट परिस्थिती आहे.
नुकतेच बडोदा साहित्य संमेलनाचे उदाहरण समोर आहे. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी मुख्यमंत्र्यासमोर अनुदानासाठी अक्षरश: गयावया करत होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख बोलायला उभे राहिल तोपर्यंत रात्रीचे 9 वाजून गेले होते. दुपारी 4 पासून रसिक येवून बसलेले. अध्यक्षांचे भाषण सुरू झाले तोपर्यंत सर्व मान्यवर पाहूणे निघून गेले होते. समोरचा मंडपही जवळपास रिकामा झाला होता. ही परिस्थिती का आली? कुणी ओढवून घेतली?
औरंगाबादच्या कार्यक्रमात चंद्रकांत काळे आणि संचाने ‘आज या देशात’ नावाने विविध भारतीय भाषांमधील सामाजीक कवितांचा अप्रतिम असा कार्यक्रम सादर केला. असे कार्यक्रम लेखकांच्या स्मृती सोहळ्यात का नाही साजरे केले जात?
औरंगाबाद नंतर परभणीला 9 ते 12 सप्टेंबर असा चार दिवस ‘बी. रघुनाथ महोत्सव’ आयोजीत केला होता. या चारही दिवसात एकही आमदार खासदार मंत्री नगरसेवक कुणाही राजकीय व्यक्तीला मंचावर आमंत्रित केल्या गेले नाही. कुणाही राजकीय नेत्याच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत वगैरे केल्या गेले नाही. उपस्थित रसिक, लेखक यांनाच बोलावून त्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. ही प्रथा अतिशय चांगली आहे. पाहुण्यांचे स्वागत पुस्तक देवून करण्यात आले. हा पण एक स्तुत्य उपक्रम आहे. याचाही आता सर्वत्र विचार झाला पाहिजे. साहित्यीक उपक्रमांत महागडे पुष्पगुच्छ, महागडे स्मृतीचिन्ह देण्यांची काय गरज आहे? ठाण्याच्या साहित्य संमेलनात तर स्मृतीचिन्हांवर लेखकांच्या प्रवासखर्च मानधनापेक्षा जास्त पैसे 2010 मध्ये खर्च झाले होते. तेंव्हा हे सगळे टाळले गेले पाहिजे.
ग.दि.माडगुळकरांची जन्मशताब्दि आहे याचे औचित्य राखत त्यांच्या दुर्लक्षीत राहिलेल्या ‘गीत गोपाल’ चे सादरीकरण बी. रघुनाथ महोत्सवात परभणीला करण्यात आले. ‘गीत रामायण’ सारखेच ‘गीत गोपाल’ गदिमांनी लिहीले. सी. रामचंद्र सारख्या प्रतिभावंत संगीतकाराने त्याला सुंदर गोड चाली दिल्या. बकुल पंडित, प्रमिला दातार, राणी वर्मा यांनी ही गाणी गायली आहेत. स्वत: सी. रामचंद्र यांनीही काही गीतं गायली आहेत. पण हे फारसे कानावर पडत नाही. औरंगाबादचे गायक पं. विश्वनाथ दाशरथे यांनी यातील 12 गाणी निवडुन ती बसवली. एकूण 35 कविता गदिमांनी गीत गोपाल मध्ये लिहील्या आहेत. त्या पैकी ज्यांची गाणी झाली नाहीत अशा दहा निवडक कवितांचे भावनोत्कट अभिवाचन आकाशवाणीचे निवृत्त निवेदक रंगकर्मी लक्ष्मीकांत धोंड यांनी केले.
हे जे प्रयोग या निमित्ताने केले जातात यांची दखल साहित्य क्षेत्राने घेतली पाहिजे. लेखकांच्या स्मृतीत सोहळे होत आहेत. ज्या मोठ्या लेखकांची जन्मशताब्दि आहे त्यांच्या उत्कृष्ठ साहित्य कृतींना उजाळा दिला जातो आहे. हे महत्त्वाचे आहे.
नवनाथ गोरे या तरूण लेखकाला यावर्षीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाला. त्याच्या ज्या कादंबरीला हा पुरस्कार जाहिर झाला त्या ‘फेसाटी’ वर फारशी चर्चाच झाली नाही. उलट नवनाथ गोरेचे घर, त्याचे कुटूंबिय, त्याची परिस्थिती यावरच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अवास्तव भर दिला. याबाबत खंत बी. रघुनाथ महोत्सवात प्रा. डॉ. पी.विठ्ठल यांनी व्यक्त केली. त्यांची खंत खरीच आहे. ज्या पुस्तकासाठी पुरस्कार आहे त्याची सविस्तर चर्चा होणे साहित्य व्यवहारासाठी आवश्यक आहे. असे असताना आपण केवळ उथळपणे याकडे पाहतो हे चूक आहे.
अभिनेत्री मीनाकुमारी यांच्यावर डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी ‘अजीब दास्तां है ये’ हा दृक श्राव्य कार्यक्रम साजरा केला. त्यात मीनाकुमारी यांनी लिहीलेल्या कवितांचा आवर्जून उल्लेख केला. शिवाय त्यांच्या आवाजातील त्यांच्या गझलेचे एक ध्वनीमुद्रणही ऐकवले. लेखकाच्या स्मृतीत हा सोहळा असल्या कारणाने मीनाकुमारीचा कवयित्री म्हणून हा संदर्भ जास्त महत्वाचा.
हिंगोलीचे डॉ. प्रेमेंद्र बोथरा यांनी ‘पक्ष्यांचे सहजीवन’ या विषयावर अप्रतिम असे दृक श्राव्य व्याख्यान दिले. त्यांच्या संग्रही असलेले पक्ष्यांचे सुंदर छायाचित्रे शिवाय काही व्हिडिओ पाहताना प्रेक्षक चकित झाले. विशेषत: हजारोंच्या संख्येने असलेल्या पळसमैनांचे आभाळातील समुह नृत्य तर थक्क करणारे होते. मारूती चितमपल्ली सारख्या लेखकांने जंगलातले हे विश्व फार समर्थपणे मराठी साहित्यात आणले. आपल्या आयुष्यातील पशुपक्षांचा प्रचंड असा अनुभव शब्दांत बांधून ठेवला. डॉ. बोथरा सारखे लोक जेंव्हा चितमपल्लींच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात काम करतात हे पाहून समाधान वाटते. आता त्यांच्यासारख्यांनी चितमपल्लींसारखे हे अनुभव शब्दबद्ध करायला पाहिजेत.
परभणीचे गणेश वाचनालय गेली 16 वर्षे हा उपक्रम घेत आहे. 117 वर्षे जून्या असलेल्या या वाचनालयाचा आदर्श इतर जिल्हा अ वर्ग ग्रंथालयांनी आवर्जून घ्यायला हवा. महाराष्ट्रात नाशिकला सावाना, अकोल्यात बाबुजी देशमुख वाचनालय अशा काही संस्था असे उपक्रम सातत्याने चालवतात. प्रत्येक जिल्ह्यात हे व्हायला हवे. जिल्हा अ वर्ग वाचनालय आणि तालुका अ वर्ग वाचनालय यांनी अशा पद्धतीनं साहित्यीक उपक्रम छोट्या मोठ्या प्रमाणात चालवले तर साहित्य चळवळीला उर्जित अवस्था प्राप्त होईल. ही सगळी चळवळ दुदैवाने सरकार अनुदान केंद्री होवून बसली आहे.
बी. रघुनाथ महोत्सव झाला की लगेच गणपती उत्सव सुरू झाला आहे. थोड्या दिवसात नवरात्र उत्सव सुरू होतो आहे. या उत्सवांवर प्रचंड पैसा महाराष्ट्रात खर्च होताना दिसतो. मग साहित्यीक उपक्रमांसाठी याच्या किमान दहा टक्के तरी निधी का नाही उभा केल्या जात?
सर्वसामान्य रसिक साधे चित्रपटाला जायचे म्हटले तर 100 रूपयांचे किमान तिकीट आता तालुका पातळीवरील गावात काढतो आहे. मग हाच रसिक साहित्यीक कार्यक्रमांसाठी देणगी का नाही देवू शकत? काय म्हणून या क्षेत्राने कायम सरकारकडे आशाळभूतपणे अनुदानासाठी हात पसरत रहायचे? अगदी खेड्यात सुद्धा हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह लोकवर्गणीतून साजरे होतातच ना.
बी. रघुनाथ महोत्सवाने एक आदर्श मराठवाड्यातील साहित्यीक संस्था, रसिक, लेखक यांच्यासमोर उभा करून ठेवला आहे. गावोगावी या धरतीवर साहित्यीक उपक्रम साजरे झाले पाहिजेत.
(लेखात वापरलेले रेखाचित्र प्रसिद्ध लेखक चित्रकार ल मं कडू यांचे आहे.. औरंगाबाद ला त्यांना बी रघुनाथ पुरस्कार "खारीच्या वाटा" कादंबरी साठी प्रदान करण्यात आला त्या कार्यक्रमात त्यांनी हे चित्र भेट दिले .. )
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575