दै. पुण्य नागरी, उरूस, 13 डिसेंबर 2015
शेतकऱ्याचे दु:ख नेमकं जाणून त्याला वाचा फोडणारा नेता म्हणजे शरद जोशी. शेतीच्या हिशोबाचे चुकलेले गणित शरद जोशी यांनीच पहिल्यांदा उलगडून दाखवले. आपले दु:ख जाणले म्हणून अडाणी शेतकऱ्यांनी या नेत्याला आपल्या काळजात जागा करून दिली. शेतकरी म्हणजे बटाट्याचे पोते. तो संघटीत होणं शक्य नाही असं मार्क्सनं म्हटलं होतं. पण शरद जोशी यांनी ही किमया करून दाखवली. इंद्रजीत भालेराव यांनी शरद जोशी यांच्यावर लिहीलेल्या कवितेत असं म्हटलं आहे
लोंढा गढूळ पाण्याचा
तुवा बांध बांधलास
तडा तडकला त्याचा
तुवा सांध सांधलासे
रानभर पांगलेले
पाणी गोळा झाले कसे?
चुकलेल्या हिशोबाचे
आणे सोळा झाले कसे?
12 डिसेंबर ला या योद्धा शेतकऱ्याने वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
शरद जोशी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1935 रोजी झाला. सातारा हे त्यांचे गाव. त्यांचे वडिल अनंतराव जोशी पोस्टात नोकरीला होते. खात्याच्या परिक्षा देत सिनियर सुपरिन्टेण्डण्टच्या पदावरून निवृत्त झाले. त्यांची आई सौ. इंदिराबाई पंढरपुरच्या बडवे घराण्यातली. वडिलांच्या बदल्यांमुळे शालेय शिक्षणासाठी बेळगाव, नाशिक करत त्यांनी मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालयातून एस.एस.सी. ची परिक्षा 1951 मध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पदवी व पदव्यूतत्तर अभ्यासक्रम त्यांनी मुंबईच्या सिडनेहॅम महाविद्यालयातून पूर्ण केला. पुढे लोकसेवा आयोगाची परिक्षा देऊन इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये रूजू झाले.
1968 ला सित्झर्लंडची राजधानी बर्न येथे जागतिक पोस्टल युनियनमध्ये संख्याशास्त्र विभागात ते दाखल झाले. त्यांचा हुद्दा होता चीफ, इन्फर्मेशन सर्व्हिस, इंटरनॅशनल ब्युरो. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असताना हाती येत चाललेल्या तिसऱ्या देशातील आकडेवारींनी शरद जोशी अस्वस्थ होत गेले. तिसऱ्या देशातील दारिद्र्याचा प्रश्न कोरडवाहू शेतीत अडकला असल्याची त्यांची स्पष्ट धारणा झाली. या विषयावर अभ्यास करण्यासाठी भारतात परतायचे त्यांनी निश्चित केले. 19%6 मध्ये ते पत्नी लिला, दोन मुली श्रेया व गौरी यांच्या सोबत भारतात परतले.
पुणे जिल्ह्यात चाकण जवळ अंबेठाण या गावी 28 एकर कोरडवाहू शेती त्यांनी खरेदी करून आपल्या अभ्यासाला सुरवात केली. आपल्या अनुभवांतून आणि अभ्यासातून त्यांची खात्री पटत गेली की शेती कायमची तोट्यात रहावी अशीच धोरणे शासनाकडून आखली जातात. शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून निघू नये इतके कमी भाव जाणीवपूर्वकच दिले जातात. शेतकरी आपला माल बाजारात घेऊन जातो तेंव्हा वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, मार्केट कमिटीचा चार्ज, मुख्यमंत्री फंडाला दिलेले पैसे इतका खर्च वजा केला तर परत शेतकऱ्यालाच खिशातून पैसे द्यायची वेळ येते. हे जे उलटी पट्टी’चे गणित आहे ते शरद जोशींच्या लक्षात आले. शेतमालाच्या अपुऱ्या किमती हेच शेतकऱ्याच्या दारिद्य्राचे मूळ आहे. आणि शेतकऱ्याचे दारिद्य्र हेच देशाचे दारिद्य्र आहे. या मांडणीतूनच पुढे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव मिळालाच पाहिजे’ हा एक कलमी कार्यक्रम पुढे आला.
16 फेब्रुवारी 1980 रोजी सगळ्यात पहिल्यांदा चाकण परिसरात कांद्यासाठी आंदोलन झाले आणि या चळवळीची सुरवात झाली. कांद्याचा चिघळलेला प्रश्न, देशाच्या कांद्यांच्या एकूण बाजारपेठेत चाकणचे स्थान आणि आंदोलनाच्या दृष्टीने मुंबई आग्रा रोडची चाकणची जागा या सगळ्यांचा विचार करून योजनापूर्वक कांद्यासाठी रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले.
या आंदोलनाचा संदेश सगळ्या भारतभर गेला. यानंतर शरद जोशींनी लगेच हाती घेतलं ते निपाणी (कर्नाटक) चे तंबाखू आंदोलन. त्यानंतर नाशिकचे उसाचे आंदोलन आणि मग विदर्भातील कापसाचे आंदोलन. ही सगळी आंदोलने शांततापूर्ण अहिंसक मार्गाने करण्यात आली होती. तरीही शासनाने शस्त्र वापरून आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतकऱ्याचे नाहक बळी गेले. अगदी सुरवातीपासूनच शरद जोशी यांनी शेतकरी समाज हा मुलत: स्वतंत्रतावादी आहे’ हे ओळखून संपूर्ण शेतकरी आंदोलनही त्या विचाराभोवतीच उभे केले.
शेतकऱ्याला त्याच्या मालाच्या उत्पादन खर्चा इतका भाव दिला जात नाही कारण कारखान्यांसाठी कच्चा माल स्वस्त हवा असे सरकारचे धोरणच आहे हे त्यांनी मांडायला सुरवात केली. तेंव्हा कुणाचाच यावर विश्वास बसत नव्हता. सरकार आपल्याच शेतकऱ्याचे दुष्मन कसे असणार? शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण ही शेतकरी संघटनेची घोषणा प्रचंड लोकप्रिय बनली.
शरद जोशी यांच्या लक्षात असे आले की एका पीकापुरता शेतीचा प्रश्न मर्यादीत नाही. पीक कुठलंही असो शेतमालाचे शोषण ठरलेलेच आहे. तेंव्हा एका एका पिकांपुरते आंदोलन मर्यादीत न ठेवता त्याची व्याप्ती मोठी करत समग्र शेतीप्रश्नालाच भिडण्याची रणनीती त्यांनी आखली. कांदा, तंबाखू, उस, कापूस अशी सुरवातीच्या काळातील आंदोलनं यशस्वी झाल्यावर परभणीच्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात समग्र शेती प्रश्नासाठी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव मिळालाच पाहिजे’ ही एककलमी मागणी पुढे आली.
शेतकऱ्यामध्ये कोरडवाहू, बागायती असा भेद किंवा प्रदेशाप्रमाणे केला जाणारा भेद किंवा पिकांप्रमाणे केला जाणारा भेद हे सगळं विसरायला लावून सर्व शेतकऱ्यांना एका झेंड्याखाली आणण्याचे महत्त्वाचे काम शरद जोशींनी केले. भावनिक प्रश्नांवर अस्मितेच्या मुद्द्यांवर आंदोलन उभारणं सोपे असते पण शरद जोशींनी शुद्ध आर्थिक पायावर चळवळीची उभारणी केली जे विशेष.
सटाणा येथे जानेवारी 1982 मध्ये संघटनेचे पहिले अधिवेशन भरले. त्यानंतर परभणी, मग धुळे, अशी अधिवेशनं भरत गेली (शेतकरी संघटनेची आता पर्यंत 12 अधिवेशने झाली आहेत). सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरले ते 1986 मध्ये चांदवड येथे भरलेले शेतकरी महिला आघाडीचे अधिवेशन. या आधिवेशनात उपस्थित राहिलेल्या लाखो शेतकरी आयाबहिणींची दखल अगदी जागतिक पातळीवर घेण्यात आली. शरद जोशींनी महिलांच्या प्रश्नांची अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करून जागतिक महिला चळवळीला वेगळा आयाम दिला. पुरूषांच्या जागा स्त्रियांनी मिळवायच्या अशीच फक्त मांडणी स्त्रीवादी चळवळीने केली होती. पण सरकारवर अवलंबून न राहता शेतकरी चळवळीच्या मूळ ध्येयधोरणानूसार स्वतंत्रतावादी वृत्तीनं महिल प्रश्नाची सोडवणूक करता येईल असे शरद जोशींनी मांडले.
महिला प्रश्नावर लक्ष्मीमुक्तीचा शरद जोशींनी राबविलेला कार्यक्रम क्रांतीकारी ठरला. आपल्या पत्नीच्या नावाने आपल्या संपत्तीचा एक वाटा करून द्यायचा हा कार्यक्रम म्हणजे लक्ष्मीमुक्ती. या उपक्रमात विदर्भ मराठवाड्यातील हजारो शेतकर्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने जमिनी करून दिल्या.
फक्त महाराष्ट्रातील शेतीपुरता विचार त्यांनी कधीच केला नाही. दिल्लीच्या बोटक्लब मैदानावर 1989 मध्ये एक प्रचंड शेतकरी मेळावा देशभरच्या शेतकरी संघटनांनी भरवून दाखवला. पण उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांचे जाट नेते महेंद्रसिंग टिकैत यांनी माथेफिरूपणे शरद जोशींना मंचावर धक्काबुक्की केली आणि हा मेळावा उधळला गेला. शरद जोशींना हृदयविकाराचा मोठा झटका आला व त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करावे लागले. यावेळेपर्यंत देशभरच्या शेतकऱ्यांमध्ये शरद जोशींच्या विचारांचा संदेश स्वच्छपणे पोंचला होता.
महाराष्ट्राबाहेर गुजरात, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील शेतकर्यांसाठी काम करणार्या विविध संंघटनांची एक समन्वय समिती देश पातळीवर त्यांनी स्थापन केली. या द्वारे शरद जोशींचे नेतृत्व तोपर्यंत देशपातळीवर स्थिरावले होते.
व्हि.पी.सिंग पंतप्रधान असतांना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय शरद जोशींनी लावून धरला. तत्त्वश: शेतकऱ्यावरील कर्ज हे सरकारचे पाप आहे. त्याच्या मालाला कमी किंमत मिळत असल्याने सरकारच शेतकऱ्याचे देणे लागते ही बाब अर्थशास्त्रीय भाषेत शरद जोशींनी मांडून दाखवली. त्यामुळे कर्जमाफी न म्हणता कर्जमुक्ती म्हणा असा त्यांचा आग्रह होता. मार्च 1990 मध्ये व्हि.पी. सिंग पंतप्रधान असताना शरद जोशींच्या अध्यक्षतेखाली स्थायी कृषी सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल राष्ट्रीय कृषिनीती या नावाने शरद जोशी यांनी सादर केला. त्यातील तरतुदी बघितल्यास त्यांच्या दूरदृष्टीची आजही जाणीव होते. पुढे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कृषी कार्यबलाच्या अध्यक्षपदावरही शरद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. तो अहवाल शासनाला सदर झाला.
1990 च्या विधानसभा निवडणुका जनता दलाच्या चिन्हावर शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी लढवल्या होत्या. त्यापैकी पाच जण विधानसभेवर आमदार म्हणून निवडूनही आले. याच पाच सहकार्यांसह आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यार 1994 मध्ये शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना केली. स्वत: शरद जोशी यांनी 1995 मध्ये हिंगणघाट (वर्धा), बिलोली (नांदेड) या दोन मतदारसंघातून विधानसभेची तर 1996 मध्ये नांदेड मतदारसंघातून लोकसभेची निवडणुक लढवली. पण त्यांना अपयश स्वीकारावे लागले.
1990 मध्ये डंकेल प्रस्तावाला जोरदार समर्थन देण्याची त्यांची भूमिका डाव्या/समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना पटली नाही. शेतकर्याचं भलं खुल्या व्यवस्थेत आहे असं आग्रही प्रतिपादन शरद जोशी मांडत गेले. कुठलाच पक्ष खुलेपणाने जागतिकीकरणाचा स्वीकार करण्यास तयार नसण्याच्या काळात शरद जोशींनी केलेले समर्थन हे दूरदृष्टीचेच होते हे आज जास्त पटत आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात कृषी कार्यबलाचे अध्यक्ष म्हणून शरद जोशींना केंद्रिय मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता. या काळात स्वतंत्र भारत पक्ष सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होता.2004-2010 या काळात शरद जोशी राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत होते. अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलतांना त्यांनी मांडलेली मते लक्षणीय म्हणून कामकाजात नोंदल्या गेली आहेत.
शरद जोशींनी खुल्या आर्थिक धोरणाबाबत मांडलेला विचार हा फक्त शेतकऱ्यापुरता मर्यादित न राहता सर्व भारतीयांच्या हिताचा विचार ठरला. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचे स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य यांची आग्रही मागणी त्यांनी केली. पण हे करत असताना बाजरपेठेत ग्राहक हा राजा असतो तेंव्हा ग्राहकाचे हीत साधल्या जाणे महत्त्वाचे असं सांगायला ते कचरले नाहीत. जर भारतीय ग्राहकाला परदेशातून अन्नधान्य स्वस्त मिळत असेल तर ते खरेदी करणं त्याचा हक्क आहे. आमच्या शेतकऱ्याचा महागडा माल ग्राहकाच्या गळ्यात आम्ही मारणार नाही हा विचार शरद जोशींनी मांडला तेंव्हा भले भले अवाक झाले. शरद जोशींनी कृत्रिम रित्या परदेशातून महागडा शेतमाल (डाळ, कच्ची साखर, तांदूळ, गहू) सुट देवून स्वस्त विकण्याला कडाडून विरोध केला. भारत हा शेतीप्रधान देश आहे. तेंव्हा भारताला शेतमालाच्या निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकिय चलन मिळू शकते यावर आपल्या अर्थतज्ज्ञांचा विश्वासच बसत नव्हता. बी.टी. कॉटनच्या वापरानंतर दहा वर्षात भारत जगातील एक नंबरचा निर्यातदार देश बनला. यातूनच शरद जोशींच्या द्रष्टेपणाचा पुरावा मिळतो.
खुल्या व्यवस्थेचा स्विकार केल्यानंतर ही व्यवस्था शेती क्षेत्रात मात्र पूर्णपणे येऊ दिली गेली नाही याबद्दल शरद जोशींनी आणि शेतकरी संघटनेने सातत्याने आवाज उठवला. आंदोलनं केली.संपूर्णपणे आर्थिक पायावर उभे राहिलेले आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेले स्वतंत्र भारतातील हे एकमेव आंदोलन. भीक नको हवे घामाचे दाम’ या घोषणेतच सर्व काही आले.
इंडिया विरूद्ध भारत ही त्यांची मांडणी अतिशय गाजली. पोराला पॉकेटमनी म्हणून सहज 100 रू. दिला जातो तो इंडिया आणि चार आणे हरवले तर अंधारात कितीतरी वेळ सापडत बसतो तो भारत अशी त्यांची व्याख्या होती. ढोबळमानाने शहरी भागाने ग्रामीण भागाला सापत्न वागणूक दिली. इंडियाने भारताचे शोषण केले. अशी शरद जोशींची मांडणी होती.
शेतकरी संघटनेच्या विचारांच्या प्रसारासाठी शेतकरी संघटक’ या पाक्षिकाची सुरूवात 6 एप्रिल 1983 रोजी करण्यात आली. शरद जोशी यांनी त्यांचे जवळपास सर्वच लिखाण या पाक्षिकातून केले आहे.
10 नोव्हेंबर 2010 रोजी शेगांव येथे शरद जोशी यांच्या वयाला पंच्चाहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कुठलेली स्वागत, हार तुरे ते स्वीकारत नाहीत म्हणून ज्येष्ठ वयोवृद्ध शेतकऱ्याच्या हस्ते त्यांना एक मानपत्र देऊन त्यांचा गौरव सामान्य शेतकऱ्यांनी केला. या मेळाव्याला लाखो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून या शेतकरी नेत्यापोटी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या विचारांची मांडणी पंधरा पुस्तकांमधून अतिशय सोप्या भाषेत शरद जोशींनी करून ठेवली आहे. सामान्य शेतकऱ्यांना हा विचार कळावा या जाणीवेनेच त्यांची भाषा साधी सोपी अर्थवाही राहिली आहे.
असे हे वादळ वयाच्या 81 व्या वर्षी शांत झाले. लाखो शेतकऱ्यांना आपल्या घरातील कुणी वडिलधारे माणूस गेल्याच्या भावनेने आज पोरकेपण आले आहे. या शेतकरी नेत्याला विनम्र श्रद्धांजली !!
( शरद जोशी लिखीत पुस्तके : 1. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती 2. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, 3. शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख 4. चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न 5. स्वातंत्र्य का नासले 6. खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने ७ . अंगारमळा 8. जग बदलणारी पुस्तके 9. अन्वयार्थ-भाग 1, 10. अन्वयार्थ-भाग 2, 11. माझ्या शेतकरी भावांनो माय बहिणींनो 12. अर्थ तो सांगतो पुन्हा 13. बळीचे राज्य येणार आहे 14. पोशिद्यांची लोकशाही 15. भारता’साठी. इंग्रजी पुस्तके 1. Down to earth 2.Answering before god)
-श्रीकांत अनंत उमरीकर 9422878575