Sunday, December 6, 2015

सुरेगाव कापुस आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मरण !





(सुरेगाव आंदोलनातील हुतात्मे निवृत्ती कर्‍हाळे, परसरामजी  कऱ्हाळे, ज्ञानदेव टोंपे  यांचे पुतळे)

उरूस, पुण्यनगरी, 6 डिसेंबर 2015


भारतावर परकियांचे राज्य होते तेंव्हा त्यांच्या विरूद्ध लढून शहिद झालेल्यांना हुतात्मा संबोधले जाते. पण आपल्याच सरकारविरूद्ध आंदोलन करावे लागले, त्यात आपल्याच सरकारने गोळीबार केला, आपलेच भाऊबंद शहीद झाले तर त्यांना काय संबोधायचे?

परक्यांशी लढताना येणारं
पवित्र मरण 
आमच्या वाट्याला येणार नाही
आपल्याच लोकांनी केलेल्या वारांनी
ते बाटल्या शिवाय राहणार नाही
पण आई 
तूझं काळीज मात्र भगतसिंगाच्या आईचं असू दे !

आजच्या तरूणांची ही व्यथा आहे. 

10 डिसेंबर 1986 रोजी कापूस प्रश्नी परभणी-हिंगोली रस्त्यावरील सुरेगाव इथे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर महाराष्ट्र पोलिसांनी गोळीबार केला. त्यात ज्ञानेश्वर टोणपे, निवृत्ती कर्‍हाळे व परसरामजी कर्‍हाळे हे तीन शेतकरी शहीद झाले. हा असंतोष का उठला होता? अचानक झालं का हे सगळं?   

फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात बरोबर 29 वर्षांपूर्वी कापूस प्रश्नावर शेतकर्‍यांचा भडका उठला. गेल्या वर्षी मिळाले होते तितकेही दर देण्यास महाराष्ट्र सरकार तयार झाले नाही. शंकरराव चव्हाण तेंव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षात असलेल्या शरद पवार यांनी आपला समाजवादी कॉंग्रेसपक्ष  नुकताच पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये विलीन केला होता. ही घटना याच कापसाच्या परिसरात औरंगाबादेत घडली. ज्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नाची नाडी कळते असे मानले जाते त्यांनाही शेतकर्‍यांच्या या असंतोषाचा सुगावा लागला नव्हता. 

महात्मा गांधींच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबरला अकोल्यात शेतकरी संघटनेने कापूस परिषद घेतली. नोव्हेंबर मध्ये चांदवड येथे प्रचंड मोठे महिला अधिवेशन पार पडले. 23 नोव्हेंबरला अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, हिंगोली या कापसाच्या पट्ट्यात दिवसभराचे चक्काजाम आंदोलन शेतकर्‍यांनी केले. लाखो शेतकरी त्यात सहभागी झाले. कापसाच्या प्रश्नावर शेतकर्‍यांचा प्रचंड असंतोष उफाळून येत होता. 7 डिसेंबर पासून बेमुदत रस्ता रोको करण्याचे शेतकर्‍यांनी ठरविले. म्हणजे 2 ऑक्टोबर पासून 7 डिसेंबर अशी तब्बल दोन महिन्याची मुदत सरकारला मिळाली होती. या काळात शेतकर्‍यांच्या मागण्या संदर्भात सरकाने काय पाऊल उचलले?

सरकारने एकच तातडीने गोष्ट केली. ती म्हणजे शेतकर्‍यांची जे नेते होते, या भागातील कार्यकर्ते होते त्यांची धरपकड करून त्यांना तुरूंगात टाकले. तेंव्हा शेतकरी संघटनेचे परभणी जिल्ह्याचे प्रमुख असलेले ऍड. अनंत उमरीकर यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे की, ‘मी पोलिसांना सांगत होतो. तूमचा निर्णय चुकीचा आहे. सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबून टाकलंत तर रस्त्यावर जमा होणार्‍या हजारो लाखो कार्यकर्त्यांवर नियंत्रण कोण ठेवणार? त्यांना मार्गदर्शन कोण करणार?  पण पोलिसांनी काहीही ऐकलं नाही. आम्हा सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना जिंतूर रोडच्या मुख्य तुरूंगात परभणी येथे अटक करण्यात आली.’

7 डिसेंबर पासून आंदोलनास सुरवात झाली. शेकडो शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरणं पसंद केलं. शेतकर्‍यांना पकडून तुरूंगात टाकण्याची मोहिम सरकारने चालविली. पण तुरूंग भरून गेला. आता इतक्या लोकांना ठेवायचं कुठे? 9 डिसेंबरला पकडून आणलेल्या शेकडो शेतकर्‍यांना मैदानावर उघड्यावर डांबून ठेवण्यात आलं. जेवणाची सोय करणं शक्यच नव्हतं. खाण्याची पाकिटं दिली. शेवटी या सगळ्या शेतकर्‍यांना बाया बापड्यांना मध्यरात्री अचानक सोडून देण्यात आलं. इतक्या रात्री जायचं कुठं? आम्हाला निदान रात्रभर तरी काही आडोसा द्या रहायला. आम्ही सकाळी निघून जातो असं गरीब बाया बापड्या म्हणत असताना या गोरगरीब जनतेवर पोलिसांनी अमानुष लाठीमार सुरू केला. किती आश्चर्य पहा. पकडून आणलं सरकारनंच. त्यांची सोय लावता येत नाही हे पाहून त्यांना हाकलून लावलं परत सरकारनंच. शिवाय त्यांच्यावर लाठीहल्ला केला सरकारनंच. पोलिसांच्या लाठीहल्ल्याने जायबंदी झालेले हे बहादूर शेतकरी भाऊ बहिणी बिलकूल न घाबरता आपआपल्या गावी कसेबसे परतले आणि त्यांनी इतरांना आंदोलन अजूनच तीव्र करण्याची प्रेरणा दिली. 

आता तर परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली. 10 डिसेंबरला सुरेगाव पाटीला मुख्य रस्त्यावर  साधारण सकाळी 9 च्या सुमारास शेतकरी गोळा व्हायला सुरवात झाली होती. आजूबाजूच्या गावांतून फार मोठ्या प्रमाणात शेतकरी गोळा होत आहेत ही खबर पोलिसांना लागली. त्यांनी आंदोलन आवरतं घ्या म्हणून जमा झालेल्या शेतकर्‍यांशी हुज्जत घालायला सुरवात केली. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अंजली पातूरकर व शेतकरी कार्यकर्ते दत्तराव नाईक यांच्या पत्नी लीलाताई या शेतकरी मायबहिणींसमोर भाषण करत होत्या. पोलिसांनी जमावर अंदाधुंद लाठीहल्ला सुरू केला. जमाव प्रक्ष्ाुब्ध झाला. लोकांची संख्या वाढत चालली हे पाहून गोळीबार सुरू केला. याच गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. गोळीबाराचे समर्थन करावे म्हणून दोन बस पोलिसांनीच जाळून टाकल्या. बाजूला दत्तराव नाईक यांची पिठाची गिरणीही जाळली. 

पुढे चौकशीत सरकाने असे सांगितले की जमाव हिंस्र झाला होता. त्यांनी 12 बोअरच्या बंदूकीतून पोलिसांवर गोळीबार केला. जाळपोळ केली. पोलिसांवर दगडफेक केली. म्हणून आम्हाला गोळीबार करावा लागला. शिवाय दोन पोलिसही या लोकांनी मारून टाकले. 

सरकारचे पितळ चौकशी अहवालात पुर्ण उघडे पडले. आजूबाजूला सगळा काळ्या मातीचा प्रदेश. तिथे फेकायला दगडं कुठून मिळणार? ज्यांची गिरणी जाळली ते दत्तराव नाईक स्वत: आंदोलनात आधीच तुरूंगात जावून बसलेले. त्यांची पत्नी धीरपणे भाषण करते आहे. त्यांची गिरणी जमाव जाळणार कसा? लोकांनी गोळीबार केला तर त्या बंदूका कुठे गेल्या? जे पोलिस मेले असा दावा सरकाने केला होता ते दोन पोलिस गावकर्‍यांनी आपल्या घरात दडवून ठेवले होते. कारण पोलिसच लोकांच्या प्रचंड संतापाला घाबरून गेले होते. हे दोन पोलिस जर बाहेर दिसले असते तर त्यांना लोकांनी ठेचून मारले असते अशी त्यांनाच भिती होती.

इतकेच काय पण हुतात्मा परसरामजी कर्‍हाळे यांचा मुलगा पाणीपुरवठा विभागात नौकरी करत होता. त्याच्या अंगावर खाकी कपडे होते. कामावरून परतत  असताना त्याला वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली. तो वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास गेला असता पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. त्याच्या अंगातील कपड्यांमुळे जमाव त्याच्यावरही धावून जाईल अशी भिती खुद्द पोलिसांनाच वाटत होती. 

सरकारने पोलिसांना हताशी धरून केलेले हे पाप त्यांच्या इतके अंगाशी आले की पुढे 6 दिवस या परिसरात एकाही पोलिसाची सरकारी प्रतिनिधीची फिरायची हिंम्मत होईना. लोक प्रचंड चिडलेले. सगळी वाहतूक रस्त्यावर झाडं टाकून ठप्प करून ठाकलेली. तुरूंगात असलेल्या सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना बाहेर सोडणं शासनाला भाग पडलं. पत्रकारांना सोबत घेवून हे कार्यकर्ते या परिसरात लोकांना भेटी देत फिरले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी स्वत: येवून हुतात्म्यांच्या घरी जावून सांत्वन केलं. परत आंदोलन झालं तर आम्ही स्वत: आणि आमची पोरंही रस्त्यावर येवूत असं जेंव्हा या हुतात्म्यांच्या वीर पत्नींनी सांगितलं तेंव्हा तर उपस्थितीतांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते.  

आज बरोबर 29 वर्षांनीहि शेतकऱ्याची भयानक परिस्थिती आहे. या हुतात्म्यांची स्मारकं लोकांनी वर्गणी गोळा करून उभारली आहेत. दरवर्षी या हुुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 10 डिसेंबरला लोक जमा होतात. कापूस आंदोलनातील या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन !
        
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575


Sunday, November 29, 2015

75 वर्षांची तरूण नर्तिका हेलन

उरूस, पुण्यनगरी, 29 नोव्हेंबर 2015

हिंदी चित्रपट सृष्टीत तीन व्यक्तीमत्व कायम तरूण म्हणून ओळखली जातात. एक सुरैय्या. जिनं कधीच चरित्र भूमिका केल्या नाहीत. नायिका म्हणून काळ संपला की निवृत्त झाली. तिचं वृद्धावस्थेतील एकही छायाचित्र उपलब्ध नाही. दुसरा देव आनंद. त्यानं उशिरापर्यंत चित्रपटांत कामं केली. तो म्हातारा झाला तरी तरूणांचीच कामं करायचा. लोक आणि तोही स्वत:ला शेवटपर्यंत (वय वर्षे केवळ 88) तरूणच समजत राहिला. तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेलन जेरॅक रिचर्डसन उर्फ हेलन. 21 नोव्हेंबर 1938 ही हेलनची जन्मतारिख. म्हणजे तीची पंच्याहत्तरी उलटून गेली. आणि आजही तीची प्रतिमा नायकाला/खलनायकाला घायाळ करणारी तरूण कमनीय बांध्याची मादक नृत्यांगना अशीच आहे.

पडद्यावरील आपल्या प्रतिमेच्या अगदी उलट तीची हृदयद्रावक कौटूंबिक कहाणी आहे. ब्रह्मदेशात (आजचे म्यानमार) अँग्लो इंडियन वडिल व ब्रह्मदेशी आई यांच्या पोटी जन्मलेल्या हेलनला लहान वयात अतिशय वाईट परिस्थीतीला तोंड द्यावे लागले. दुसर्‍या महायुद्धात तिचे वडिल मारले गेले. जपानने म्यानमारवर ताबा मिळवला तेंव्हा हे कुटूंब ब्रिटीश सैन्याच्या सहाय्याने आसामला पळून आले. सोबतच्या कित्येक नातेवाईक आप्तस्वकियांचा या काळात मृत्यू झाला. खुद्द हेलनची आई या वेळी गरोदर होती. तिचाही गर्भपात झाला. आसाममधून हे कुटूंब कामाच्या शोधात मुंबईला पोचले. आई नर्स म्हणून काम करायची. त्या उत्पन्नात घर चालवणे मुश्किल होते. मग शेवटी हेलनने काम शोधायला सुरवात केली. तेंव्हाची गाजलेली आयटम गर्ल कक़्कु (बरसात, आवारा, मि.अँड मिसेस 55, चलती का नाम गाडी मधील तिची गाणी खुप गाजली) जी की स्वत: अँग्लो इंडियनच होती तिने हेलनची अडचण जाणली. तिच्या अंगातील लवचिकता ओळखली आणि तिला आपल्या सोबत चित्रपटात कामं मिळवून द्यायला सुरवात केली. 

‘यहुदी’ (1958) चित्रटात या दोघींचे एक सुंदर गाणे आहे. शंकर जयकिशनचे संगीत असलेले ‘बेचैन दिल खोयी सी नजर’ हे गोड गाणे लता आणि गीता यांच्या आवाजात आहे. या गाण्यावर कक्कु आणि हेलनचे सुंदर नृत्य आहे. कुठेही अश्‍लिल हातवारे नाहीत, भारतीय शैलीत शोभतील असे कपडे असे हे गाणे तेंव्हा बर्‍यापैकी गाजले. हे गाणे म्हणजे आयटम गर्लचा चार्ज कक्कु कडून हेलन कडे आला याचे प्रतिकच आहे. कारण पुढे कक्कुची कारकीर्द खरेच उताराला लागली.

हेलन खरी गाजली ती हावरा ब्रीज (1958) मधील ओ.पी.नय्यरच्या गाण्याने. गीता दत्तच्या आवाजातील ‘मेरा नाम चिंन चुन चु’ या हीट गाण्याने हेलनचे नशिबच पालटले. अक्षरश: पुढची 20 वर्षे तिने आपल्या या प्रतिमेवर हिंदी चित्रपट सृष्टीत राज्य केलं. 1983 ला निवृत्ती जाहिर करेपर्यंत तिची हीच प्रतिमा होती. 
हेलन आणि जॉनी वॉकर यांच्या शिवाय त्या काळात हिंदी चित्रपट हीटच होत नाहीत अशी एक गंमतीदार समजूत होती. आणि खरंच बर्‍याच हिट चित्रपटात हे दोघं आहेतच. दिल अपना और प्रीत पराई (1960) हा मीना कुमारी राजकुमार यांचा गाजलेला चित्रपट. यात आशा भोसलेच्या आवाजात ‘इतनी बडी मेहफील और इक दिल किसको दू’ म्हणत हेलन सुंदर नाचली आहे. दिलीप कुमार वैजयंतीमाला यांच्या गाजलेल्या ‘गंगा जमुना’ (1961) मध्ये तिने ‘तोरा मन बडा पापी सांवरीया’ म्हणत छानसा मुजरा सादर केला आहे. संगीतकार कोणीही असो हेलनसाठी एक वेगळे गाणे तो द्यायचाच. चायना टाउन (1962) हा शम्मी कपुर-शकिलाचा  ‘बार बार देखो’ गाण्यासाठी गाजलेला सिनेमा. यातही हेलनचे गाणे ‘यम्मा यम्मा यम्मा, तू परवाना मै शम्मा’ आहेच. 
तिच्या गाजलेल्या गाण्याची यादी जरी बघितली की लक्षात येते नायक नायिका संगीतकार या सगळ्या सोबत हेलन हेही एक स्वतंत्र प्रकरण आहे. ‘ऊई मां ऊई मां ये क्या हो गया- पारसमणी (1963)’, ‘ओ हसिना जुल्फोवाली जाने जहा- तिसरी मंझिल (1966)’, ‘आ जाने जा -इंतेकाम (1969)’, ‘पिया तू अब तो आ जा-कारवां (1971)’, ‘आओ ना गले लग जावो ना-मेरे जीवनसाथी (1972)’, ‘मेहबुबा मेहबुबा- शोले (1975)’, ‘मुंगडा मुंगडा-इन्कार (1978)’, ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना-डॉन (1978)’1958 ते 1978 अशा 20 वर्षात सतत तिचे चित्रपट येत होते. त्यातील गाणी गाजत होती.

हेलन एक चांगली अभिनेत्री होती हे मात्र काहीसं दूर्लक्षिलं गेलं. डोळा चकणा झाला म्हणून ललिता पवार ला कायम खलनायिकी भूमिका कराव्या लागल्या, निरूपमा रॉयला आईच्या भूमिका कराव्या लागल्या, जॉनी वॉकरला विनोदी भूमिका कराव्या लागल्या तसेच हेलनचे झाले. खरं तर आपली नृत्याची ताकद तिनं वेगळ्या पद्धतीनंही दाखवून दिली आहे. पंजाबी असो, मुजरा असो की शास्त्रीय हे नृत्यं ती चांगले करू शकायची. पण तिची प्रतिमा झाली ती कॅबरे डान्सर म्हणूनच. 

1961 मध्ये जॉय मुखर्जी सोबत नायिका म्हणून तिचा ‘हम हिंदूस्थानी’ नावाचा चित्रपट आला होता. ‘रात बिखरी हुई’ हे मुकेशच्या आवाजातील वेगळे छान गाणे यात आहे. या गाण्यात गंमत म्हणजे नायक जॉय मुखर्जीच कमी कपड्यांत (टॉपलेस) आणि हेलन मात्र संपूर्ण कपड्यात आहे. यातीलच दुसरे गाणे आशा रफीच्या आवाजात ‘नीली नीली घटा’ हेलन जॉय मुखर्जीवर आहे. उषा खन्नाचे संगीत असलेल्या या चित्रपटांतील ‘छोडो कल की बाते’ हे सुनील दत्तवरचे गाणे तर आजही लोकप्रिय आहे. याच वर्षी ‘संपूर्ण रामायण’ नावाच्या चित्रपटात शुर्पणखाची भूमिका हेलने केली होती. या चित्रपटात एक अतिशय गोड गाणे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘बार बार बगिया मे कोयल ना बोले’ या भरत व्यासांच्या शब्दांवर शुद्ध शास्त्रीय नृत्य करून हेलनने सर्वांनाच चकित केले आहे. तिच्या या गुणाचा वापर पुढे केला गेला नाही. 

1964 मध्ये वो कौन थी मध्ये मदन मोहनने ‘छोडकर तेरे प्यार का दामन’ हे लता-महेंद्र कपुरच्या आवाजातील गाणे दिले आहे. हे गाणे हेलन व मनोजकुमारवर आहे. यात ती केवळ एक आयटम गर्ल म्हणून आलेली नाही.
1964 मध्ये ‘चा चा चा’ नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटाची हेलन नायिका होती. हैदराबादच्या इक्बाल कुरेशी याने या चित्रपटाला संगीत दिलं होतं. हैदराबादमुळे असेल कदाचित त्याला मक्दुम मोईनोद्दीन या तिथल्या शायरच्या प्रसिद्ध कवितेचा मोह पडला. त्याने आवर्जून या चित्रपटात मक्दूमची ‘एक चमेली की मंडुवे तले, दो बदन प्यार की आग मे जल गये’ही कविता घेतली.  सलिम अनारकलीच्या वेशात चंद्रशेखर व हेलनवर हे गाणे चित्रीत झाले आहे. 

नाचाव्यतिरिक्त आपल्यातल्या अभिनेत्रीची फार दखल घेतली गेली नाही याची खंत तिने कधीच जाणवू दिल नाही. महेश भटच्या ‘लहू के दो रंग’(1979) चित्रपटात तिने केलेल्या कामाची दखल घेत तिला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. 

वैयक्तिक आयुष्यात उठलेली वादळं तिनं पडद्यावर येवू दिली नाहीत. चित्रपट दिग्दर्शक पी.एन.आरोरा सोबत ती बराच काळ राहिली. नंतर  प्रसिद्ध लेखक सलिम जावेद जोडीतील सलिम खान यांच्या सोबत 1981 मध्ये वयाच्या 44 व्यावर्षी लग्न केले. सलमान खानची सावत्र आई बनलेल्या हेलनने अर्पिता नावाची एक मुलगी दत्तक घेतली. या दत्तक मुलीचे नुकतेच मोठ्या थाटात लग्न झाले. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटांत तिने सलमानच्या आईची भूमिका मोठ्या रूबाबात सादर केली.  

तसं तर तिनं 1983 पासूनच चित्रपट संन्यास घेतला. शांतपणे सलिम खान सोबत आपलं आयुष्य व्यतित करण्यास सुरवात केली. आपल्या गत आयुष्याबद्दल कुठलाही कडवटपणा तिनं कधी व्यक्त केला नाही. हे तिचं मोठेपणच म्हणावे लागेल. 1964 मध्ये ‘गुमनाम’ चित्रपटात लताच्या आवाजात शंकर जयकिशनच्या गाण्यावर हेलन नाचली आहे. हसरत जयपुरीचे बोल तिनं स्वत:च्या आयुष्याबाबत स्वत:ला समजावून सांगितले असतील. 

इस दुनिया मे जिना है तो सुन लो मेरी बात
गम छोड के मनावो रंगरेली

पंच्च्याहत्तरीला ‘अमृत महोत्सव’ म्हणतात. कुसुमाग्रजांनी गमतीनं असं म्हटलं आहे, ‘पंच्च्याहत्तर वर्षांची सुट देवूनही जी माणसं मृत होत नाहीत त्यांची गणती अ‘मृता’त करण्याशिवाय काय गत्यंतर आहे...’ हेलनला तिची पंच्च्याहत्तरी होवून गेल्यावर उशीरा का होईना या शुभेच्छा !   
      

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575


      

Sunday, November 22, 2015

शेत जमिनीची बाजारपेठ खुली करा!!


उरूस, पुण्यनगरी, 22 नोव्हेंबर 2015

शेतजमीनीचा औद्योगिककारणांसाठी वापर करायचा तर सरकारची परवानगी घ्यावी लागायची. ही अट काढून टाकण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.  शेतकरी या निर्णयावर खुष आहे. शेतकर्‍याची जमिन कुणालाही हवी असेल तर त्यात अडचण काय? असा एक प्रश्‍न शहरातील लोकांना पडतो. त्यांना मुळात हा विषय कसा गुंतागुंतीचा आहे हेच माहित नसते. आपला एखादा प्लॉट आहे. तो चांगला भाव आला की विकून टाकायचा किंवा बापजाद्याचे जूने भले मोठे घर आहे. ते एखाद्या बिल्डरला विकून आपण त्यात एखादा फ्लॅट मिळवायचा इतकीच त्यांची विचार करण्याची क्षमता. सरकारी नौकरी करताना जास्तीचा मिळालेला पैसा कुठे ठेवायचा? तर त्याचे प्लॉट घ्या शेती घ्या असे सगळे सोपे आहे असाच समज कित्येकांचा आहे. 

प्रत्यक्षात शेत जमिन विकत घेणे आणि विकणे यात सरकार नावाचा भलामोठा अडथळा आहे. घटनेत जमिन कायद्यांच्या संदर्भात दुरूस्ती करण्यात आली. घटनेचे 9 वे परिशिष्ट असे सांगते की कुठलीही शेतजमिन ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला राहिल. त्याला काय मोबदला मिळेल हे पूर्णपणे सरकारवर अवलंबून आहे. त्यावर न्यायालयात दाद मागता येणार नाही. पुढे 1964 मध्ये त्यात छोटीशी दूरूस्ती करून हा मोबदला बाजारभावाप्रमाणे असेल अशी दुरूस्ती करण्यात आली. बाजारभाव म्हणजे काय हे प्रत्यक्ष न सांगता अतिशय गोलमाल अशी ही दुरूस्ती होती.

एका माणसाकडे किती जमिन असावी असा कायदा करण्यात आला. हा करताना संपत्तीबाबत समानता असावी असे धोरण होते. मग साधा प्रश्न आहे ज्या वेळी 18 एकर बागायती किंवा 54 एकर जिरायती जमिनीची अट घालण्यात आली त्याच वेळी मुंबईत एका एका घराची किंमतही त्यापेक्षा जास्त होती. त्यावर हा सिलींगचा कायदा का नाही बसवला? समजा एका माणसाकडे 18 एकर पेक्षा जास्त बागायती जमिन असेल तर तो श्रीमंत, शोषण करणारा, जमिनदार असे असेल तर याच किमतीचा ज्याचा प्लॉट आहे, घर आहे तो गरीब कसा? शासनाने अशी अट का नाही घातली की 1 कोटी रूपये पुढे ज्याच्या घराची किंमत असेल त्या घराचा काही भाग सरकार ताब्यात घेईल? 

मुंबईत 80 च्या दशकात एक अतिशय लोकप्रिय घोषणा कामगार चळवळीत होती. ‘श्रमेल त्याची गिरणी आणि कसेल त्याची धरणी’ पुढे गिरणी कामगारांचा संप झाला. दत्ता सामंत त्यांचे नेते. ते 1984 च्या लोकसभेत इंदिरा गांधींच्या हत्येची सहानुभतीची लाट असतानाही कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवाराच्या विरूद्ध निवडून आले खासदार झाले. त्यांच्या संपांनी गिरण्याच बंद पडल्या. हळू हळू सगळे कामगार देशोधडीला लागले. गिरणी बंद पडली. मालकांनी टाळेबंदी जाहिर केली. पुढे या सगळ्या सोन्याच्या भाव असलेल्या जमिनी विकून मालक मालामाल झाले. मग दत्ता सामंत यांनी कामगारांचे हित पाहिले की गिरणी मालकांचे? या घोषणेतील दुसरा भाग होता ‘कसेल त्याची धरणी’. शहरातील जमिन म्हणजे सोन्याची खाण. तर गावाकडची शेत जमिन म्हणजे निव्वळ कचरा. कारण त्यात जो कसतो तो वरती येतच नाही. 

ज्यांना जमिन नाही त्यांना जमिन मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन झाले. गायरानाच्या पडिक मोकळ्या जमिनी दलितांना वाटण्यात आल्या. गांधीवादी विनोबा भावेंनी भूदानासाठी मोठी यात्रा काढली. आज काय परिस्थिती आहे? ज्यांच्यापाशी जमिनी आहेत ते सगळे दारिद्य्रात खितपत पडले आहे. या उलट ज्यांनी जमिनींचा नाद सोडून दिला. शहरात आले. उत्पन्नाचे दुसरे साधन मिळवले ते सगळे श्रीमंत झाले. जमिनीतून येणारे उत्पन्न हे कायम तोट्यातच राहिले आहे. आश्चर्य म्हणजे ज्या दलितांना गावात जमिनी मिळाल्या ते गावातच अडकून पडले गरीबच राहिले. आणि ज्या दलितांना गावात जमिनी मिळाल्या नाहीत ते शहरात स्थलांतरीत झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.  

नेहरूंच्या समाजवादी विचारांनी जमिनदार म्हणजे शोषण करणारा अशी मांडणी करून जमिनी ताब्यात घेतल्या. या जमिनी शेतीशिवाय इतर गोष्टींसाठी वापरात आल्या की मात्र त्यांना सोन्याचे भाव यायला लागले. शेती तोट्यात पण शेतीची जमिन एन.ए. म्हणजे नॉन ऍग्रीकल्चर अकृषी केली की तीला भाव येणार हे काय गौडबंगाल आहे?

औरंगाबाद शहराला लागून दिल्ली मुंबई औद्योगिक पट्टा (डि.एम.आय.सी.) विकसित करण्याचे ठरले. हा अधिकृत निर्णय व्हायच्या आधीच या भागातील कित्येक जमिनी मोठ मोठ्या राजकारण्यांनी, उद्योगपतींनी, धनदांडग्यानी विकत घेतल्या. शासनाचा अधिकृत निर्णय झाला आणि या जमिनींना कैकपट भाव आला. ज्यांनी या जमिनी घेतल्या त्यातल्या कुणालाही उद्योग उभा करण्यात रस नव्हता. लाखात भाव असलेली जमिन करोडोत गेली. ती विकून केवळ काही दिवसांत करोडो रूपये कमाविण्याचा हा एक योजनाबद्ध शासकीय कट ठरला. 

ज्या प्रमाणे शहरात किंवा इतरत्र जमिनी खरेदी विक्री व्यवहार होतात त्याप्रमाणे शेतजमिनीचे व्यवहार का होवू शकत नाहीत? शेतकर्‍यांना जमिन म्हणजे काळी आई, आपल्या आईला तो कसे विकणार? आणि ही जमिन त्याच्याकडून गेली तर त्याने काय करायचे? असले गारूड डावी समाजवादी मंडळी उभी करते. असं बोलणार्‍या कित्येकांचे आईबाप वृद्धाश्रमात खितपत पडलेले असतात आणि यांना शेतकर्‍याच्या काळी आईची चिंता !

महाराष्ट्र हा पुढारलेला आहे. महाराष्ट्रात शहरीकरण बर्‍यापैकी झालेले आहे. तोट्यात जाणारा शेती व्यवसाय सोडून बहुतांश शेतकरी दुसरा कुठलाही उद्योग व्यवसाय करायला तयार आहेत. पश्चिम बंगाल मध्ये सिंगूर येथील शेतजमिन ताब्यात घेण्यावरून जी दंगल उसळली तशी महाराष्ट्रात होवू शकत नाही. कारण त्या राज्यात शेतीशिवाय काय करावे हा जनतेसमोर प्रश्न आहे. महाराष्ट्रात तसे नाही. इथे आक्षेप आहे तो शेतकर्‍याची जमिन त्याच्याकडून बेभाव काढून घेतली जाते. ती इतरांकडे आली की तीची किंमत कैक पटीने वाढून त्याचा फायदा इतरांनाच मिळतो. यात राजकारणी आणि नोकरशहा यांचे साटेलोटे आहे. शेतकरी अशी मागणी करतो आहे की आम्ही आमची जमिन आम्हाला हवी त्याला पटेल त्या भावाने विकू. सरकारने त्यात पडायचे काही कारण नाही. 

काही जण असं सांगतात की सरकारी कामासाठी मोठ्या प्रमाणात जमिन हवी असते तेंव्हा काय करणार? हा युक्तिवाद अतिशय फसवा आहे. सरकारने आत्तापर्यंत बेभाव ताब्यात घेतलेली कित्येक एकर जमिन न वापरता तशीच पडून आहे. सरकारी आकडेवारीनुसार एकूण ताब्यात घेतलेल्या जमिनीपैकी फक्त 1/3 वापरली गेली आहे. 2/3 जमिन तशीच पडून आहे. मग शासनाकडे ही जी जमिन पडीक आहे तीचा वापर शासन करणार कधी? आणि जर तो करायचा नसेल तर ज्याची ती जमिन आहे त्याच्या ती परत ताब्यात का दिली जात नाही?

शेतीशिवाय बरीच जमिन पडिक स्वरूपात आहे. तीचा कुठलाही उपयोग होत नाही. अशी जमिन जी सरकारच्याच ताब्यात असते. तिचा वापर अकृषी कामासाठी का केला जात नाही? आणि जर शेतजमीनच खरेदी करायची असेल तर शेतकर्‍याला खुल्या बाजारातील किंमत देवून का खरेदी केली जात नाही? 

शेतीचे तर शोषण स्वातंत्र्यानंतर सतत केले गेले. आणि शेत जमिन जी की शेतकर्‍याचे एका अर्थाने फिक्स डिपॉझिट आहे ते मोडायचे तर त्याचेही फायदे मिळू दिले जात नाहीत. हा काय दुष्टावा आहे? स्टॅलिनने शेतकर्‍यांवर रणगाडे घालून दोन कोटी शेतकरी मारले होते. त्यापेक्षा हे नेहरूवादी धोरण महाभयानक आहे. यांनी प्रत्यक्षात तसे न करता धोरणाचा रणगाडा घातला आणि गेल्या पंधरा वर्षात लाखोनी शेतकर्‍यांना आत्महत्या करायला भाग पाडले. 

शेतजमिनीची बाजारपेठ खुली करा ही मागणी आता शेतकरी करत आहे. आमची जमिन कुणाला विकायची आणि काय भावाने विकायची ते आम्ही ठरवू. शासनाला लोकहितासाठी जमिन हवी असेल तर आधी स्वत:च्या ताब्यात असलेली जमिन वापरा. आणि जर शेतकर्‍यांची जमिन हवी असेल तर बाजारभाव दिला जावा. निवडणुकीच्या कामासाठी कर्मचार्‍यांचा वापर सरकार करते तेंव्हा त्यांना भत्ता कुठल्या हिशोबाने देता? तेंव्हा म्हणता का की हे सरकारी काम आहे तूम्हाला अतिशय कमी भत्ता मिळेल. सरकारी बांधकाम करताना गुत्तेदारांना म्हणता का की हे सरकारी काम आहे कमी दर मिळेल?  

तेंव्हा शेत जमिनीच्या व्यवहारात शासनाने पडू नये. तूम्हाला शेतकर्‍याचे काही भले करता येत नसेल तर किमान त्याच्या मार्गातली धोंड तरी होवू नका !   

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Monday, November 16, 2015

केदारनाथच्या कुशीत निर्वाण षट्काच्या छायेत

सामना दिवाळी २०१५ 

केद्रारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या यात्रेला उत्तर भारतात छोटा चारधाम असं म्हणतात. कुटूंबातील आम्ही 6 जोडपी हिमालयात या यात्रेसाठी गेलो होतो जून महिन्यात 2011 गेलो होतो. केदारनाथ हे सगळ्यात अवघड ठिकाण. गौरीकुंड या तळाच्या गावापासून 14 कि.मी. अंतर पायी चालत जावं लागतं. घोडे किंवा डोलीची सोय आहे. तसंच वातावरण चांगलं असेल तर हेलिकॉप्टरचाही आजकाल वापर होतो आहे. मी मात्र डोंगरातला हा अवघड प्रवास पायी केला. सकाळी सातलाच गौरीकुंडपासून चालायला सुरूवात केली. रस्ता मोठा अवघड. सारखा दम लागत होता. पण जरा आजूबाजूला नरज टाकली की सगळ्या श्रमाचा विसर पडायचा. हिरवेगार सुंदर डोंगर, त्यावर उतरलेले ढग, खळाळत वाहणारी मंदाकिनी नदी.  

दिवसभर पायपीट केल्यावर दुपारी 4 ला मी केदारनाथला पोंचलो तेंव्हा अगदी थकून गेलो होतो. इंचभरसुद्धा चालणं शक्य वाटत नव्हतं. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर नजरेच्या टप्प्यात आला होता. वातावरण तसं ढगाळच होतं. पाऊस थोडासा पडून गेला होता. ढग थोडे विरळ होत चालले होते. आणि अचानक सूर्यासमोरचे ढग विरून गेले. सूर्याचे किरण समोरच्या हिमालयाच्या शिखरांवर चमकायला लागले. त्या दृश्यानं मी आवाक्च झालो. त्या शिखराला मेरू पर्वत म्हणतात. ते शिखर म्हणजेच महादेव समजण्यात येतं. शंकराचार्यांना याच ठिकाणी शिवाचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी त्यांनी निर्वाणषटकम् लिहीलं आणि योग समाधी घेतली. हिरवेगार सुंदर डोंगर, त्यांची बर्फाळ शिखरं, त्यावर चमकणारं उन, निळंभोर आभाळ. मी तसाच रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिलो. त्या शिखराला पाहूनच हात जोडले. मला नंतर मंदिरात गेल्यावर समजलं की मंदिरातील महादेवाची पिंड म्हणजे या पर्वत शिखराचीच प्रतिकृती आहे. मंदिरात अर्थात माझ्यासारख्याचा जीव घुसमटतो. बाहेरच महादेवानं मला दर्शन दिलं. आणि एक वेगळीच भावना मनात दाटून आली. वाटलं आपलं आयुष्य संपून गेलंय. 

हळू हळू सूर्याची किरणं लालसर गुलाबी होत गेली. पर्वताचं ते शिखर पश्चिमेला बाह्यगोल झालेलं आहे. त्या लालसर प्रकाशात किरणांनी एक चंद्रकोरच शिखरावर निर्माण केली आहे असं वाटत होतं. रावणानं शिवताण्डव स्तोत्र लिहीलं आहे. त्याच्या दुसर्‍या कडव्यात ‘किशारचंद्रशेखरे रति: प्रतिक्षणं मम’ अशी ओळ आहे. शंकराच्या मस्तकावर जी चंद्रकोर आहे तीचं वर्णन किशोरचंद्रशेखरे असं केलेलं आहे. लहान नाही आणि पूर्ण चंद्रही नाही नेमकी युवाअवस्थेतील चंद्रकोर म्हणजे ‘किशोर’ चंद्रकोर. इतका नेमका शब्द मला मराठीतही सापडला नाही. मला दिसलेल्या दृश्यात सूर्याच्या किरणांमूळे अशीच आकृती त्या डोंगरावर निर्माण झाली होती. तो नेमका फोटो माझ्या मोठ्या भावानं फारच सुंदर घेतला आहे.  

रात्री शेजारती साठी आपण मंदिरात जाऊ असं कवितानं माझ्या पत्नीनं सुचवलं. थकल्यामुळं इतर कोणीच यायला तयार नव्हतं. आम्ही दोघंच मंदिरात गेलो.  तर दरवाजा बंद. तिथल्या सुरक्षा रक्षकानं बाजूच्या दरवाजानं जायला सांगितलं. खरं तर त्यानं आम्हाला तसं का सांगितलं ते मला कळालं नाही. तिथे जाऊन पाहतो तर मंदिरात तिन पूजार्‍यांशिवाय कुणीच नाही. त्यांची परवानगी काढून आम्ही दोघं त्या रिकाम्या मंदिरात बसून राहिलो. ते त्यांचं साफसफाईचं काम करत होते. मंदिरात पाचही पांडव, द्रौपदी, कुंती आणि श्रीकृष्ण यांच्याही मूर्ती आहेत. हे मंदिर पांडवांनी बांधलं अशी अख्यायिका आहे. आपल्या हातून घडलेल्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी काय करावं याची त्यांनी व्यासांपाशी पृच्छा केली. तेंव्हा व्यासांनी त्यांना शिवाची आराधना करण्यास सांगितलं. शिवानं त्यांना दर्शन दिलं. त्याची पिंड तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही. तेंव्हा हा पर्वत म्हणजेच मी आहे असं शिवानं सांगितलं. आणि ती पिंड म्हणजेच त्या मेरू पर्वताची प्रतिकृती म्हणून राहिली. अहिल्याबाई होळकरांनी त्यावर सुंदर असं चांदीचं छत्र लावलं आहा.

रात्रीही योगायोगानं आभाळ निरभ्र होतं. चंद्राचा सुंदर प्रकाश पडला होता. खळाळत वाहणार्‍या मंदाकिनी नदीच्या काठावर मी बसून राहिलो. चांदण्यात तेच शिखर पाहताना अगदी वेगळं आणि काहीतरी अद्भूत पाहतो आहोत असं वाटत होतं. हे जे काही आहे ते खरं नाही. चित्रच काढलेलं आहे. आणि आपण त्याच्या समोर बसलेलो आहोत. ते सगळं वातावरण खरं तर भितीदायक वाटायला हवं होतं. कारण सगळीकडेच सन्नाटा पसरलेला. नदीचा आवाज सोडला तर कसलाच आवाज नाही. पण तो पर्वत मला आश्वासक वाटत होता. शंकराचार्यांना काय वाटलं असावं याचा थोडाफार अंदाज येत होता.

दुसर्‍या दिवशी सकाळीही आभाळ निरभ्र राहिलं. आता पर्वताच्या दुसर्‍या बाजूनं सूर्याची कोवळी किरणं पडलेली होती. मंदिराच्या उजव्या बाजूला मोकळ्या मैदानात मी जावून बसलो. सुंदर हिरवळ, तिच्यावर पिवळी जांभळी रानफूलं डोलत असलेली, पाण्याचे नितळ असे प्रवाह खळाळत जाणारे, समोर हिरवागार डोंगर, त्याच्यामागचं मेरूपर्वताचं शुभ्र शिखर. हे सगळं वातावरण संमोहीत करणारं होतं. मी ध्यान लावून बसलो आणि निर्वाण षटकाचे पठण केले. त्या वातावरणातून उठावेच वाटत नव्हते. बरोबरचे सगळे मंदिरात अभिषेक करत होते आणि मी बाहेर त्या पर्वताच्या समोर बसून निर्वाण षटकाचे पठण करत होतो मोकळ्या हवेत. याच जागेवर बसून शंकराचार्यांनी निर्वाणषटक हे शेवटचे स्तोत्र लिहीलं आणि योग समाधी घेतली. त्यांचं समाधी मंदिरही इथे बांधलेलं आहे.ही योगसमाधी 2013 मध्ये आलेल्या महाप्रलयात वाहून गेली. शंकराचार्यांनी केदारनाथला योग समाधी घेतली असे काही जण मानतात तर काही जण याच ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात त्यांनी देह सोडून दिला असंही समजतात. पण शंकराचार्यांचा शेवट केदारनाथला झाला यावर सर्वांचे एकमत आहे.

केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला दूरवर डोंगराच्या उतरणीवर एक छोटासा चौथरा होता. त्यावर महादेवाची एक पिंड स्थापन केलेली होती. ही जागा म्हणजे शंकराचार्यांनी योगसमाधी घेतली ती जागा असे सांगण्यात येते. आता तो चौथरा बुडून गेला. शिवाय मंदिराला लागून उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावरच शंकराचार्यांच्या नावानं एक मंदिर उभारलेलं होतं. त्यात त्यांची छोटी मूर्ती स्थापन केलेली होती. आता तेही सगळं बुडून गेलं. नष्ट झालं.

हा विषय इथेच संपला असता. आम्ही तिथून निघून उत्तरकाशी इथे आलो. त्या ठिकाणी अनंत महाराज आठवले यांनी समाधी घेतली ती जागा आहे. त्यांनी निर्वाण षटकाचा अर्थ विषद केला ते पुस्तक माझ्या वाचनात मागच्यावर्षी आलं होतं. गोरठा (ता. उमरी जि. नांदेड) इथे दासगणु महाराजांचा अनंत महाराजांनी स्थापन केलेला आश्रम आहे.  तिथल्या उत्सवासाठी माझी आई नेहमी जाते. तिने अनंत महाराजांचा गुरूमंत्र घेतलेला आहे. 2010 च्या एप्रिलमध्ये मी मुद्दाम त्या आश्रमात गेलो होतो. तेथून निर्वाणषटकाचे छोटं पुस्तक आणलं होतं. 

उत्तरकाशीच्या आश्रमात आम्ही दोन दिवस राहिलो. गंगेच्या अगदी काठावर (तिला तिथे भागिरथी म्हणतात) तो आश्रम आहे. अनंत महाराज आठवले यांनी सन्यास घेतल्यावर वरदानंद भारती हे नाव धारण केलं. बारा वर्षे ते उत्तरकाशीला होते. त्यांनी तिथेच योगसन्यास घेतला. त्या जागेवर दुसर्‍या दिवशी सकाळी गंगेत स्नान करून मी निर्वाण षटकाचे पठण केलं. ही जागा मोठी प्रसन्न आहे. 

वेरूळ महोत्सवात पं. जसराज यांचं गाणं होतं (इ.स.1991). मी माझ्या दोन मित्रांसोबत (शशांक जेवळीकर आणि गणेश चाकुरकर) या महोत्सवात गेलो होतो. जसराजजींनी आपल्या गाण्याची सांगता निर्वाण षटकाने केली. त्यांचा आवाज असा काही विलक्षण लागला होता. की गाणं संपल्यावर लोकांना टाळ्या वाजवायचंही सुचेना. सगळे आपापल्या जागेवर शांतपणे उभे राहिले. 

चित्रा वैद्य या चित्रकर्तीचं एक चित्र श्याम देशपांडेकडच्या पुस्तकात मला पहायला मिळालं. महादेवाची पिंड आणि त्यावरती चंद्रकोर असं ते चित्र होतं. त्याचं नावंच ‘अल्टीमेट ट्रुथ’ असं दिलं होतं. शिवाय त्याखाली रविंद्रनाथ टागोरांची एक ओळही छापली होती. ‘ Facts are many but the truth is one.

गेली जवळपास 20 वर्षे निर्वाणषटकाने माझा पिच्छा पुरवला. मी रूढ अर्थानं अध्यात्मिक नाही. रोजची पुजा अर्चा असं काही करत नाही. पण या निर्वाणषटकाने एक वेगळीच अनुभूती मला दिली. त्याचं वर्णन नेहमीच्या भौतिक पातळीवरच्या जगण्याच्या चौकटीत नाही करता येत. 

मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मन बुद्धी, अहंकार, चित्त यातील काहीही मी नाही; तसेच कान, जीभ, नाक, डोळे मी नाही; आकाश भूमी, तेज अथवा वायुही मी नाही (चित् म्हणजे ज्ञान) ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, मी शिव आहे 

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पश्चकोश: ।
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
प्राणसंज्ञक वायू, अथवा प्राण अपान इत्यादी पाच वायू मी नाही; रस, रक्त इत्यादी सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) अथवा अन्नमयादी पाच कोष मी नाही ; वाणी, हात, पाय व इतर कर्मेंद्रिये मी नव्हे

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला कुणाबद्दल द्वेष नाही व आसक्ती नाही; लोभ व मोह मला नाही. गर्व मला कशाचाच नाही व कुणाबद्दल मत्सर नाही; धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थापैकी मला काही नको

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मंत्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा: ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दु:ख नाही, मंत्र, तीर्थ, वेद व यज्ञ यांच्याशी मला कर्तव्य नाही; मी भोजन-व्यापार नाही, भोज्य पदार्थ नाही व त्याचा उपभोग घेणाराही नाही

न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बन्धुर्न मित्रं गुरूर्नैव शिष्यश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला मृत्यू नाही व मृत्यूची शंका व भिती नाही, जातिविषयक भेदभाव मला नाही; मला वडील आई नाही किंबहूना जन्मच नाही, कोणी नात्यागोत्याचे मित्र, गुरू वा शिष्य मला कोणी नाही.

अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि ।
सदा मे समत्त्वं न मुक्तिर्न बन्धश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मी निर्विकल्प म्हणजे संकल्प, विकल्प, संशय यांनी रहित आहे, मी आकाररहित आहे, कारण सर्व ठिकाणी व सर्व इंद्रिये यांना मी व्यापून राहिलो आहे, मला कशाची आसक्ती नाही व म्हणून मुक्तिही नाही.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ४३१ ००१. 

सुरात न्हालेली दिवाळी !


ऊरूस, पुण्यनगरी, 15 नोव्हेंबर 2015

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे हे आपण पारंपारिक दृष्ट्या मानतो आणि तशी ती साजरीही करतो. दिवाळीत नवे कपडे, फटाके, फराळ यांचीही भरमार असते. अगदी ग्रामीण भागातही फटाक्यांची दुकानं लागतात. फुलांची आरास केली जाते. पण गेली काही वर्षे दिवाळीत आवर्जून संगीताचे कार्यक्रम साजरे होताना दिसत आहेत. म्हणजे आजकाल दिव्यांसोबत फुलांसोबत सुरांचीही आरास दिवाळीत केली जाते आहे. 

दिवाळीत धनत्रयोदशीला ‘सुर धन त्रयोदशी’ म्हणून साजरी करणे किंवा पाडव्याच्या दिवशी ‘दिवाळी पाडवा संगीत पहाट’ म्हणून साजरी करणे असं घडताना दिसत आहे. मोठ्या शहरांमध्ये दिवाळीत पहाटे गाण्याचा कार्यक्रम होतो हे उर्वरीत महाराष्ट्राला फक्त ऐकून माहित होते. तेंव्हा वर्तमानपत्रांतून कधीतरी त्याच्या बातम्या यायच्या. आणि तामाम ग्रामीण जनता ते वाचून आपली गाण्याची तहान भागवायची. गेल्या दहा वर्षांपासून पुण्या मुुंबईतलं हे लोण औरंगाबाद, जालना करत उदगीरसारख्या तालूक्याच्या सीमावर्ती भागातही जावून पोचले आहे. यातील दखल घेण्याजोगी बाब म्हणजे सामान्य रसिकांचा फार मोठा प्रतिसाद याला जागजागी लाभतो आहे. 

एकीकडे मराठी नाटक कसं जगवायचं म्हणून सगळे आंबट तोंड करून चर्चा करत आहेत. मराठी भाषेचे काय होणार यावर चर्चा केल्या शिवाय मराठीच्या प्राध्यापकांचा दिवसच मावळत नाही. शासन नाट्य स्पर्धा घेतं आहे, साहित्य संमेलनाचे ओझेही परत शासनाच्याच डोक्यावर आहे. आणि दुसरीकडे मराठी गाणी, त्यातही परत नाट्य संगीत नाटकाच्या मंचावरून निसटून गाण्याच्या बैठकीत अलगद जावून बसलं आहे. शासनाच्या कुठल्याही पाठिंब्याशिवाय, आर्थिक मदतीशिवाय सामन्य रसिकांनी हे आपल्या बळावर तोलून धरलं आहे हे विशेष. 

एखाद्या साहित्यीक कार्यक्रमाला लोक जमवायचे तर कोण यातायात करावी लागते. इतकं करूनही आलेला वक्ता काही फार चांगला बोलेल असं नाही. ज्या पुस्तकावर चर्चा असेल ते लोकांनी वाचलेले असेल किंवा भविष्यात वाचतील याचीही खात्री नाही. जुन्या काळात आपण कसं नाटक करायचो याच्या चर्चा साठी पार केलेले मोठ्या उत्साहात करताना दिसतात. पण प्रत्यक्षात सामान्य रसिकांसमोर नाटक मात्र सादर होत नाही. 

या पार्श्वभूमीवर दिवाळीत सादर होणार्‍या गाण्यांच्या कार्यक्रमांकडे बघितलं पाहिजे. लोकं उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत आहेत. पैसे जमा करत आहेत. ज्या सभागृहात कार्यक्रम सादर होणार आहे त्याची अवस्था बहुतांश ठिकाणी अतिशय बेकार आहे. मग त्या दिवसापूरती साफसफाई केली जाते. वीज लोडशेडिंग मुळे अचानक जाणे किंवा पैसे न भरल्यामुळे सभागृहाचा विद्यूत पुरवठाच खंडित केला जाणे याचा दाहक अनुभव असल्याने वीजेची स्वतंत्र सोय केली जाते. ही सगळी धडपड गाण्याचा आनंद मिळावा म्हणून लोकं करतात. याची गांभिर्याने दखल घेतली पाहिजे. 

1983 नंतर भारतभर रंगीत दूरदर्शन सर्वत्र दिसू लागला. 1994 नंतर विविध वाहिन्यांची सुरवात झाली. दहा वर्षांनी म्हणजे 2004 पासून मराठीतही विविध वाहिन्या सुरू झाल्या. या सगळ्याचे एक अजीर्ण 2015 मध्ये व्हायला सुरवात झाली. हे माध्यम अतिशय रूक्ष आहे. त्यातून फारसं कलात्मक काही मिळतं आहे असं दिसेना. लोकांना या शिवाय काहीतरी वेगळं हवं आहे. सुरवातीला प्रायोजकाचा दबाव नव्हता तेंव्हा दूरदर्शन मालिका अतिशय दर्जेदार असायच्या. आजही त्यांच्या आठवणी लोक काढतात. रामायण, महाभारत यांना आपल्या परंपरेत एक मोठं स्थान आहे म्हणून त्यावरच्या मालिका गाजल्या असं म्हणता येईल. पण ‘हमलोग’, ‘नुक्कड’, ‘सर्कस’, ‘सत्यजीत राय प्रेझेंटस्’, ‘मालीगुडी डेज’, ‘अमरावती की कथाए’ अशा मालिका आजही लोकांच्या आठवणीत आहेत त्याचं कारण काय? तर त्यांचे सादरीकरण करताना कलात्मक पातळीवर कस लागला होता. याच्या उलट आजच्या चकचकीत गुळगुळीत प्रायोजीत मालिका लोकांच्या लक्षातही रहात नाहीत.

मग यांना वैतागलेले जे काही लोक आहेत ते याच मालिकेतील कलाकार काम करत असलेल्या नाटकांना गर्दी करतात. गाण्याचे जे प्रेमी आहेत ते गाण्याच्या कार्यक्रमांना गर्दी करतात. साहित्याच्या प्रेमींना कवितांचे अभिनव पद्धतीनं साजरे होणारे कार्यक्रम आवडू लागतात. इतकंच काय आजकाल गावोगावी व्याख्यानांनाही मोठी गर्दी होत असलेली आढळत आहे. म्हणजे मंचावरून सादर होणारं नाटक, व्याख्यान, गाणं, कविता, एकपात्री, अभिवाचन त्यातील जिवंतपणा मुळे लोकांना आपल्याकडे आकर्षित करू लागलं आहे.

दिवाळीत किंवा खरं म्हणजे एरव्हीही सादर होणार्‍या गाण्याच्या कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व प्रकारची गाणी लोकांना आवडतात. जुनी हिंदी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीते, लावणी, नाट्यगीत, अभंग सारं सारं एका मैफलीत  ऐकायची लोकांची तयारी असते. 

एकदा गर्दी गोळा होत आहे म्हटलं की प्रयोजक पैसा द्यायला फारशी खळखळ करत नाही. एका गंभीर मुद्याची चर्चा झाली पाहिजे. एरव्ही मोठ मोठ्या जाहिराती देणारे उद्योग अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रायोजकत्व देतात कारण त्यांना प्रतिसाद लगेच समोर दिसतो आहे. एरव्ही वर्तमानपत्रे किंवा टिव्हीवरच्या जाहिरातींचे दर प्रचंड वाढले आहेत. शिवाय त्यांचा प्रतिसाद नेमका काय आणि किती आहे हे कळतच नाही. यापेक्षा कितीतरी कमी पैशात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होतो.

दिवाळीत आता सर्वत्र साजरा होणार्‍या गाण्याच्या कार्यक्रमांनी दोन व्यवस्थांच्या सांस्कृतिक हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. एक शासन. आणि दुसरे म्हणजे माध्यमांवर प्रचंड जाहिराती देवून खर्च करणारे मोठे उद्योग समुह. लोकांनी शासनाला बाजूला ठेवून उद्योगांकडून प्रयोजकत्व मिळवून किंवा स्वत: वर्गणी गोळा करून आपला आपला नविन मार्ग चोखाळला आहे. आणि ही बाब अतिशय आशादायी आहे. 

महाराष्ट्रात सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हायचे असेल तर सादरीकरणाच्या ज्या कला आहेत त्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून झाले पाहिजे. या दिवाळीत प्रदर्शित झालेला ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट याचे एक वेगळेच उदाहरण आहे. मंचावर सादर झालेले एक जुने नाटक आज परत चित्रपटाच्या रूपाने सादर होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळतो. या चित्रपटांतील गायक कलाकारांनी ज्या ज्या ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम सादर केले त्याला लोकांनी तुडूंब गर्दी केली आहे. इतकंच नाही तर विविध ठिकाणच्या गाण्याच्या कार्यक्रमांत सादर झालेली कट्यार ची गाणी लोकांनी उचलून   धरली. त्यांच्या फर्माईशी केल्या. यातून एक बाब सिद्ध होते की लोक आता स्वत:चे सांस्कृतिक धोरण ठरवू पहात आहेत.

टिव्ही सारखी माध्यमे मंचावरून सादर होणार्‍या कलेसाठी घातक नसून त्यांचा आधार घेवून गाणं नाटक अभिवाचन अश्या उपक्रमांना बळ मिळू शकतं हे समोर येतं आहे. संगीत नाटक त्यातील नाट्य व वाङ्मयीन गुणवत्ता ढासळल्याने सामान्य रसिकांनी नाकारले. पण नाट्यसंगीताला मात्र आजही मराठी रसिकांच्या मनात विशेष जागा आहे.

दिवाळीतील गाण्यांच्या कार्यक्रमांमुळे अजून एक चांगली बाब घडून येताना दिसत आहे. मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम जसे सादर झाले तसेच स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांनाही कमी जास्त प्रमाणात रसिकांनी प्रतिसाद दिला आहे. सादरीकरणाच्या कला या सादरच झाल्या पाहिजेत. मोठा गायक आहे, त्याला मोठा पुरस्कार मिळाला आहे, त्याचं मोठं नाव आहे पण तो सध्या फारसं गातच नाही. किंवा त्याचं गाणं लोकांना ऐकायलाच भेटत नाही तर नाही चालणार. गायक हा गाण्यातूनच सिद्ध झाला पाहिजे. या सगळ्या कार्यक्रमांत हे एक चांगलं घडत आहे की लोकांना काहीतरी कानावर पडतं आहे. तासंन्तास टिव्हीला चिकटून बसलेली निबुद्ध करमणुक अपरिहार्यता म्हणून स्वीकारणारी मराठी रसिकता घराबाहेर पडून मंचावरून सादर होणार्‍या जिवंत कलेला दाद देवू पहात आहे हे कौतूक करण्यासारखं आहे.

आता जागजागीच्या कलाप्रेमींनी सजग राहून आपल्या आपल्या भागातील सांस्कृतिक चळवळ टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे. बाहेरचे कलाकार, बाहेरचा पैसा, बाहेरची प्रेरणा फार काळ पुरत नाही. आतूनच उर्मी असली पाहिजे. दिवाळीतल्या गाण्यानं इतका जरी दिवा आपल्या काळजात तेवत ठेवला तरी खुप झाले.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, November 8, 2015

मराठी रंगभूमी दिन ! नाट्यगृह मात्र दीन ...!!

उरूस, पुण्यनगरी, 8 नोव्हेंबर 2015

नुकताच महाराष्ट्रात ‘मराठी रंगभूमी दिन’ साजरा झाला. बरोब्बर 172 वर्षांपूर्वी 5 नोव्हेंबर 1843 ला विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा खेळ सांगलीत पटवर्धनांच्या राजवाड्यात साजरा झाला. मराठी नाटकाचा हा सादर झालेला पहिलाच प्रयोग. त्यामुळे 5 नोव्हेंबर हा दिवस ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. एका ज्येष्ठ नटाला ‘विष्णुदास भावे सुवर्ण पदक’ देवून त्याचा सन्मान केला जातो. ज्येष्ठ नट विक्रम गोखले यांना या वर्षी हे पदक अभिनेत्री फैय्याज यांच्या हस्ते सांगलीत बहाल करण्यात आले. 

महाराष्ट्रात ठिक ठिकाणी विविध कार्यक्रम सादर झाले. मराठी माणूस नाट्यवेडा आहे असं म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे आपण सगळे आपल्या नाट्यवेडाचे प्रदर्शन केले. एकदिवसाचे वेड ओसरले की आपण भानावर येतो. आणि भानावर येवून पाहिले की काय परिस्थिती दिसते? मुंबई पुणे ठाणेचा अपवाद वगळला तर उर्वरीत महाराष्ट्रात नाट्य चळवळ जवळपास थंडावली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाट्य स्पर्धा घेतल्या जातात. त्यासाठी महाराष्ट्रातून एकूण 350 संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत. म्हणजे इतके नाटकं होतीलच याची खात्री नाही. पण पूर्वी 200 पर्यंत अर्ज यायचे  त्यामानाने हा आकडे उत्साह वाढविणारा आहे. एकूण 19 केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. शासनाचे आर्थिक पाठबळ आहे म्हणून निदान एवढी तरी हालचाल दिसते आहे. विद्यापीठाच्या पातळीवर युवक महोत्सवांत एकांकिका सादर केल्या जातात. 20-20 च्या जमान्यात कसोटीला उतरती कळा लागावी तशी पूर्ण दोन किंवा तीन अंकी नाटकांना उतरती कळा लागली आहे.
 
सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातील नाट्यगृहांची स्थिती काय आहे ते पाहिले पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे परिसर वगळला तर उर्वरीत महाराष्ट्रात चांगली नाट्यगृह आहेत का? छोटी गावं आपण तात्पुरती बाजूला ठेवू. ज्या शहरांमध्ये महानगर पालिका आहे म्हणजे तेथील लोकसंख्या किमान पाच लाखांपेक्षा जास्त आहे. मग इथे एखाद्या चांगल्या नाट्यकृतीसाठी हजारभर प्रेक्षक सहज मिळायला पाहिजे. त्यांच्यासाठी बसायला चांगले नाट्यगृह हवे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगांव विदर्भात अकोला, अमरावती, नागपुर, चंद्रपुर तर मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूर येथे महानगरपालिका आहेत. पश्चिम महाराष्ट्रात नगर, सांगली, कोल्हापुर, सोलापुर ही मोठी शहरं महानगरपालिकांची आहेत. म्हणजे पुण्या मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात किमान पंधरा ठिकाणी लोकसंख्येचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात रसिक उपलब्ध आहेत. मग यांच्यासाठी नाट्यगृह आहेत का? आणि जी आहेत त्यांची अवस्था काय आहे? 

एक तर चांगली नाट्यगृह नाहीत. जी आहेत त्यांची अवस्था बेकार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतांश नाट्यगृह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात आहेत. सगळ्याच महानगर पालिकांची आर्थिक स्थिती खराब असल्याने वेगळे काही सांगायची गरज नाही. यातील काही ठिकाणी नाट्यगृह खासगी ठेकेदारांना चालवायला दिली आहेत. त्यातही परत देखभाल व्यवस्थीत केली जात नाही म्हणून काही दिवसांत नाट्यगृहाची अवस्था खराब होते. व ठेकेदार ते चालविणे सोडून देतो. 

म्हणजे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था ते चालवू शकत नाहीत. दुसरीकडे पूर्णपणे व्यवसायिक पातळीवर कोणी चालविले तर किती उत्पन्न मिळेल याची हमी नसते. उत्पन्नासाठी तो कुठल्याही कार्यक्रमांना जागा देतो. मग नाट्यगृहाची अवस्था खराब होत जाते. याचा एकत्रित परिणाम आपण आज पाहतो आहोत. 

यासाठी काय करावं लागेल? नुसती टिका करणं सोपं आहे. मराठी माणसांचे नाट्यवेड लेख लिहीण्यापुरतं बरं असतं पण प्रत्यक्षात या वेडासाठी तो किती किंमत मोजायला तयार आहे? 

खरं तर मराठी माणसांने ग्रामीण भागात तमाशासारखी  कला आपल्या स्वत:च्या हिमतीवर पैशावर जोपासली. कुठलीही साधनं नसताना गावोगावी तमाशा आजही सादर होतो. जत्रेमध्ये तमाशाचे खेळ होतात. त्यासाठी कुठलेही नाट्यगृह नसते. कुठलीही रंगमंच व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था सोयीची नसते. तरी ही सगळी माणसे आपले कलेचे वेड जीवापाड जपतात. मग तूलनेने संपन्नता असलेले शहरी लोक नाट्यगृहातील मराठी नाटक जपायला का कमी पडतात? जागोजागच्या नाट्य संस्था, कला संस्था, सांस्कृतिक चळवळीतले लोक पुढे येवून नाट्यगृह व्यवस्थापनाची जबाबदारी अंगावर का नाही घेत? 
प्रत्येकवेळी शासनावर भार टाकून आपण गप्प बसायचे ही कुठली प्रवृत्ती? आज सगळ्या महानगरात वेगवेगळे महोत्सव भरत असतात. त्यांना मोठ्या संख्येने प्रायोजक मिळतात. उद्योगांना आपल्या नफ्यातील 2 टक्के रक्कम सामाजिक सांस्कृतिक कामासाठी खर्च करण्याची सक्ती शासनाने केली आहे. (सी.एस.आर. स्कीम) तेंव्हा या 2 टक्क्यांमधील काही रक्कम नाट्यक्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना मिळवता येवू शकते. याच्या आधारावर या संस्था नाट्यगृहांची जबाबदारी अंगावर घेवू शकतात. आणि या सगळ्यातून जी नाट्यगृह सध्या खराब झाली आहेत त्यांची दुरूस्ती देखभाल करता येवू शकते. किंवा खरं तर नाट्य संस्था किंवा सांस्कृतिक संस्थांना ही नाट्यगृह चालवायला देवून शासन दरवर्षी काही रक्कम दुरूस्तीसाठी म्हणून मंजूर करू शकते. 

ज्या महान नाटककार विल्यम शेक्सपिअरचे जगभरात नाव घेतले जाते तो एक नाट्यगृह चालवित होता हे विसरता कामा नये. नाट्यक्षेत्रातील मंडळींना असे वाटते की आपण फक्त नाटक करावे, बाकी गोष्टी आपल्यासाठी इतरांनी केल्या पाहिजेत. पण हे नेहमीच होत नाही. आपल्या क्षेत्रातील सर्वच गोष्टींची जबाबदारी आपणांस घ्यावी लागते. दूसर्‍यावर सगळं झटकून मोकळं होता येत नाही. आपल्या बाळासाठी कळाही आपल्यालाच सोसाव्या लागतात.  

राज्य नाट्य स्पर्धे मध्ये नाटकं सादर होतात. मग पुढे त्यांचे काय होते? हे सगळे कलाकार वर्षभर काय करतात? अंबाजोगाईच्या कलाकारांनी आपल्या नाटकाचा एक प्रयोग आपल्याच गावात सादर करून पैसे उभे केले होते. परभणीच्या नटांनी आपली नाटकं आपल्या परिसरात सादर करून पैसे मिळवले होते. अशी महाराष्ट्रात कितीतरी कलाकार मंडळी असतील जे आजही धडपड करून आपल्या भागातील नाट्य चळवळ पुढे नेण्यास तयार आहेत. मग त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी इतर रसिकांची कार्यकर्त्यांची संस्थांची नाही का? 

आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई-ठाणे-पुणे परिसर वगळता महानगर पालिका असलेली पंधरा शहरे आणि इतर नाट्यप्रेमी दहा तरी छोटी शहरे अशा पंचेवीस ठीकाणच्या नाट्यसंस्थाना एकत्रित करून महाराष्ट्रभर नाट्यगृह व्यवस्थापनासाठी एक यंत्रणा  निर्माण करता येवू शकते. त्यासाठी मराठी नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा. दरवर्षी नाटय संमेलन होते. या संमेलनासोबतच राज्य नाट्य स्पर्धेत पहिला दुसरा तिसरा क्रमांक आलेली नाटके महाराष्ट्रात किमान पन्नास ठिकाणी झाली पाहिजेत यासाठी आग्रह धरला पाहिजे.  

नाटक ही सादरीकरणाची कला आहे. त्यासाठी नुसती भाषणं करणं उपयोगाचे नाही. खेळाडू हा मैदानातच चमकला पाहिजे तसं नट हा रंगमंचावरच तळपला पाहिजे. त्यासाठी रंगमंच चांगला असला पाहिजे. नाट्यगृह चांगली असली पाहिजेत. आज सर्वत्र नाट्यगृहांची अवस्था ‘दीन’ होवून बसली असताना कुठल्या बळावर आपण मराठी रंगभूमी ‘दिन’ साजरा करतो आहोत?

आज मोठे कलाकार मालिकांमध्ये पूर्णपणे गुंंतले आहेत. त्यांना रंगभूमीसाठी वेळ नाही. कारण त्यांना तिकडे नाव आणि पैसा जास्त मिळत आहे. त्यांचा नाद सोडून देवू. स्थानिक कलाकारांना हाताशी घेवून त्या त्या ठिकाणची रंगभूमी चळवळ जिवंत ठेवू या. नाहीतरी जगभर रंगभूमी ही स्थानिक कलाकारांनीच जिवंत ठेवली आहे. आपण जर स्वत:ला नाट्यवेडे म्हणत असू तर आपण त्यासाठी किंमत मोजली पाहिजे. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Monday, November 2, 2015

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुरूंगात गेलेला मराठी लेखक !


उरूस, पुण्यनगरी, 1 नोव्हेंबर 2015

सध्या ‘पुरस्कार वापसी’ चा धमाकेदार शो भारतभर चालू आहे. मराठीतही काही लेखकांनी राज्य शासनाकडुन आपणहून अर्ज करून मिळवलेले पुरस्कार वापस करण्याचे ‘नाटक’ चांगले वठवले आहे. गंमत अशी की ज्या घटनेचा उल्लेख सगळे करत आहेत त्या दाभोळकरांची हत्या होवून दोन वर्षे उलटून गेली. तेंव्हा कोणीही पुरस्कार परत केले नाहीत. पानसरेंची हत्या झाली. तेंव्हाही काही घडले नाही. कर्नाटकात कलबुर्गी यांची हत्या झाली. त्याच्या निषेधार्थ कानडी लेखकांनी पुरस्कार वापसी सुरू केली. तेंव्हाही मराठी लेखकांनी काही केलं नाही. दादरी येथे अखलाख यांची गोमांस घरात असल्याच्या संशयावरून माथेफिरू समुहाने हत्या केली आणि अचानक मराठी लेखकांची ट्यूब पेटली. लगेच सर्व पुरोगामी जाणीवा तीव्र झाल्या. आणि पुरस्कार वापसीचे प्रयोग सुरू झाले. साहित्य अकादमी या केंद्रिय संस्थेचे पुरस्कार वापस करून केंद्र शासनाचा निषेध करण्याचे धोरण इतर भाषिक लेखकांनी अवलंबिले. पण यातही मराठी लेखक चतुर. एकाही मराठी लेखकाने आपल्याला मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार अजूनपर्यंत वापस केला नाही. फक्त राज्य शासनाचे पुरस्कार वापस केले. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली, देशात असहिष्णू वातावरण निर्माण झाले, म्हणून हा निषेध असे या लेखकांकडून सांगण्यात येतं. यांची कृती कौतुकास्पदच आहे पण हेतू संशयास्पद आहे. काही जणांनी आणिबाणीच्या काळात लेखन स्वातंत्र्यावर कशी गदा आली होती आणि त्यावेळी लेखक कसे बाणेदारपणे वागले होते याचे उदाहरण दिले. साधा प्रश्न आहे की आणिबाणीत नेमके काय घडले? मराठी लेखक तेंव्हा कसे वागले? 

केरळ मधुन एक पत्रकार आणिबाणीबद्दल कोणी काय लिहून ठेवलंय? लेखका तेंव्हा काय करत होते याचा शोध घेत महाराष्ट्रात आला. समिक्षक लेखक डॉ. चंद्रकांत पाटील यांना भेटला तेंव्हा त्यांनी सांगितलं की तूला फक्त एकाच माणसाकडून माहिती मिळेल आणि तो म्हणजे विनय हर्डिकर. याचे साधे कारण म्हणजे आणिबाणीत अविष्कार स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास पत्करणारा लेखक म्हणजे विनय हर्डिकर. या अनुभवावरचे त्यांचे ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे.  आजच्या लेखकांच्या हेतुबद्दल शंका येण्याचे एक कारण म्हणजे यातील काही तर विनय हर्डीकर यांच्याच वयाचे आहेत. मग हे आजचे ‘पुरस्कार वापसी’कार तेंव्हा काय करत होते? 

ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, दुर्गाबाई भागवत इतकी बोटावर मोजता येईल अशी नावे सोडली तर तेंव्हाही मराठीतील तमाम लेखक मंडळी मुकाट बसून होती. इतकेच नाही तर नंतरही आणिबाणी बाबत त्यांनी चकार शब्द काढला नाही. सत्याग्रह करून विनय हर्डीकर तुरूंगात गेले. सुटून बाहेर आल्यावर मराठी लेखकांच्या भेटी घ्यायला लागले.  श्री.ना.पेंडसे यांनी तर आणिबाणीला पाठिंबाच जाहिर करून टाकला. आणिबाणीमुळे लोकांमध्ये शिस्त आल्याचं पेडश्यांनी सांगितल्यावर विनय हर्डिकरांनी त्यांना विचारलं, ‘भितीपोटी आलेली शिस्त टिकेल का?’ पेंडश्यांना उत्तर देता येईना. आणिबाणीमुळे लोकल वेळेवर यायला लागल्या. सकाळी कामावर गेलेला माझा भाऊ संध्याकाळी सुरक्षित परत येतो आहे याचे समाधान त्यांनी व्यक्त केल्यावर हर्डिकरांनी विचारलं मग लाखभर लोक तुरूंगात सरकारने डांबले ते सुरक्षित कधी बाहेर येतील याची तुम्हाला काळजी नाही का वाटत? यावर परत पेंडशे निरूत्तर.

रा.भा.पाटणकरांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी तो परत करावा म्हणून त्यांच्यावर दबाव वाढत चालला होता. आणि पाटणकर मात्र पुरस्कार परत करायला तयार नव्हते. ‘सौंदर्यमिमांसा’ सारख्या अ-राजकीय विषयावरच्या पुस्तकाला पुरस्कार मिळालेला. तो परत का करायचा? आणि परत केला नाही तर मी लेखन स्वातंत्र्याच्या विरूद्ध कसा? आता पाटणकरांच्या या विधानाला काय म्हणावे? 
विंदा करंदीकरांच्या घरी हर्डीकर गेले तेंव्हा ते कसे घरगुती गोष्टीच सांगत बसले. चुकूनही सामाजिक विषयाकडे कसे येईनात. कराडच्या साहित्य संमेलन प्रसंगी खांडेकर, पु.ल.देशपांडे, रणजित देसाई यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करावे म्हणून दुर्गाबाईंचा कसा दबाव होता आणि यशवंतरावांनी गोड बोलून सगळ्यांना कसे खिशात घातले असे धम्माल प्रसंग हर्डीकरांनी आपल्या पुस्तकात लिहीले आहेत. आणिबाणीत पु.ल.देशपांडे शांत बसून होते. तूम्ही निषेध का केला नाही अस ं विचारलं तेंव्हा पु.ल.म्हणाले, ‘बोलून काय फायदा? काही छापून येतच नव्हतं.’ म्हणजे पु.ल. सारख्यांना त्याही परिस्थितीत प्रसिद्धी महत्त्वाची वाटली. पुढे आणिबाणी उठल्यावर मात्र त्यांनी कॉंग्रेस विरोधी प्रचार करण्यात धन्यता मानली. ‘माझ्या आयुष्यातला अत्यंत अपमानास्पद काळ’ असा उल्लेख पु.ल. करत. हर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे की जर कोणी स्वाभीमान कसोटीला लावलाच नाही तर अपमान होईलच कशाला? ‘विशाखा’ सारखा कवितासंग्रह लिहीणारे, गांधींचा स्पर्श झाला तो हात मी दोन दिवस तसाच धरून बसलो असं सांगणारे कुसूमाग्रज शांत. विनोबासारख्यांनी तर आणीबाणीला ‘अनुशासनपर्व’ म्हटलं. पुढं त्यांना ‘भारतरत्न’ चे बक्षिस इंदिरा गांधींकडून मिळाले ! 

दुर्गाबाई भागवत यांच्या आणिबाणी काळातील भाषणं व लेखांचे छोटे पुस्तक ‘मुक्ता’ 1977 मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने सिद्ध केले आहे. त्यात दुर्गाबाईंनी विजय तेंडूलकरांबाबत लिहीले आहे. विजय तेंडुलकर सामाजिक प्रश्नांबाबत भूमिका घेणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. आणिबाणीत दुर्गाबाई भागवत यांनी ज्या पद्धतीनं विचारांचा झंझावात उभा केला त्यावर जाहिरातबाजीचा आरोप तेंडुलकरांनी केला. दुर्गाबाईंनी सडेतोड उत्तर देताना सांगितलं की स्वत:च्या नाटकावर बंदी आली की विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणारे, मित्रांकडून पत्रके काढून मिरवणारे तेंडुलकर सार्वत्रिक बंदी आली की मूग गिळून चुप का?

याच पुस्तकात दुर्गाबाईंनी लेखनावर आलेली बंधनं धिक्करताना म्हटलं आहे, ‘लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात. आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला आरंभ होतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी विचार-मुक्त विचार-हे मानले पाहिजेत.’
विनय हर्डीकर यांनी मुळ विषयाला हात घातला आहे. ‘साहित्यीकांचा शासनावर वचक राहिला नाही. शासनानं स्वातंत्र्य द्यावं, पारितोषिकं द्यावीत, शिष्यवृत्त्या द्याव्यात, परदेशी जाण्यची संधी उपलब्ध करून द्यावी. परिणामी साहित्यिकांवर-बुद्धिजीवींवर शासनाची एक प्रकारची नैतिक सत्ताच निर्माण झाली.’ आता अशी सत्ता शासनाची लेखकांवर निर्माण झाल्यावर ते शासनाचा निषेध काय म्हणून करणार? आज पुरस्कार वापस करणार्‍यांच्या हेतूवर शंका येते ती अशा पार्श्वभूमीवर.

हर्डीकर स्वच्छपणे शासनाचा साहित्यातील हस्तक्षेप नाकारतात. हर्डीकर, दुर्गाबाई, अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते ही कोणीही माणसे शासनाची अंकित नव्हती. त्यामुळे यांनी जी काही भूमिका घेतली त्याचा आजही आदर केला जातो. त्याचा वचक शासनावर आजही आहे. आणि नेमकं उलट आजचे जे ‘पुरस्कार वापस’कर्ते आहेत त्यांना त्यांच्या घराशेजारचा पानवालाही लेखक म्हणून ओळखत नाही. 

लेखक आजही मुलभूत भूमिका घ्यायला कचरतात म्हणून त्यांचा विरोध किरटा कुठलाही परिणाम न करणारा ठरतो. हेमिंग्वेच्या ‘फेअरवेल टू आर्म्स’ ही हेमिंग्वेची युद्धात निर्वासित झालेल्यांच्यावर लिहीलेली कादंबरी. या लेखनावरच्या चित्रपटातील एक प्रसंग हर्डीकरांनी लिहीला आहे. अर्धमेली गुंगीत असलेली एक बाई घोडागाडीतून जात आहे. तिच्या मांडीवर मुल आहे. एका खड्ड्यातून गाडी जात असताना ते मुल निसटतं आणि खाली पडतं. एक क्षण तिच्या चेहर्‍यावर वेदना उमटते आणि परत चेहरा निर्विकार होतो. तिला ते मुल उचलून घ्यावं वाटत नाही. युद्धामुळे बधिरता येते असं दिग्दर्शकाला दाखवायचं होतं. हर्डीकर आरोप करतात की आपल्या लेखकांनी काही न अनुभवताच आपलं आपत्य असलेलं आविष्कार स्वातंत्र्याचं मुलभूत हक्काचं मांडीवरचं मूल खाली पडू दिलं. 

कबीराचा फार सुंदर दोहा आहे. 

शोला शोला रटते रटते लब पर आंच न आये
एक चिंगारी लब पर रख दो लब फॉरन जल जाये

नुसतं बोलून काही उपयोग नाही प्रत्यक्ष कृती केली पाहिजे.  आणीबाणीतील अनुभवांवरच्या विनय हर्डीकर यांच्या ‘जनांचा प्रवाहो चालला’ यापुस्तकाला शासनाने पुरस्कार नाकारला. लोकांनी वर्गणी गोळा करून या पुस्तकाला गौरविले. अशी भूमिका आज कोण घेणार आहे? 

शासनविरोधी कृती करणारा प्रत्यक्ष तुरूंगात जाणारा, नंतरही सातत्याने आपली भूमिका मांडणारा, चळवळीत उतरणारा, त्यासाठी वैयक्तीक आयुष्यात मोठी किंमत मोजणारा विनय हर्डीकर सारखा लेखक आपल्या मराठीत आहे याचे कौतुक करावे का अशी उदाहरणं दूर्मिळ आहेत याचं दू:ख करावं? 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575