हिंदी चित्रपटांतील गाण्यांनी रसिकांच्या मनावर फार मोठं गारूड करून ठेवलं आहे. 80 च्या दशकातील काही गाणी आठवा. ‘घुंगरू की तर्हा बजता ही रहा हू मै’, ‘गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल’, ‘जब दीप जले आना’, ‘दिल मे तूझे बिठा के’, ‘फकिरा चल चला चल’, ‘तोता मैना की कहानी’, ‘अखियों की झरोंकेसे’ अशा कितीतरी गाण्यांनी आपले कान आजही तृप्त होतात. आपल्या आयुष्यात रंग भरणार्या या गाण्यांचा संगीतकार स्वत: मात्र ही दुनिया आपल्या डोळ्यांनी पाहू शकला नाही असे सांगितले तर आपला विश्वास बसत नाही. पण हे खरं आहे. नुकतेच निधन पावलेले थोर संगीतकार रविंद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी आहेत.
28 फेब्रुवारी 1944 ला अलिगढ येथे जन्मलेले रविंद्र जैन यांचे नुकतेच नागपुर येथे निधन झाले. (9 ऑक्टोबर 2015) आपल्या 71 वर्षाच्या आयुष्यात अतिशय मोजक्या पण मधुर गीतांनी रसिकांच्या मनात कायम घर करणार्या या संगीतकाराने आपल्या अंधत्वावर मात करून रसिकांच्या आयुष्यात सुरांचा प्रकाश पसरला, संगीताचे सप्तरंगी इंद्रधनुष्य निर्माण केले.
1950 ते 1970 या काळात सी. रामचंद्र, शंकर जयकिशन, नौशाद, एस.डी.बर्मन, ओ.पी.नय्यर यांचा फार मोठा प्रभाव हिंदी चित्रपट संगीतावर होता. 1970 नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर.डी.बर्मन, कल्याणजी आनंदजी यांचा जमाना सुरू झाला. काही संगीतकार अतिशय मोजकी गाणी देवून लोकप्रिय झाले त्यात हेमंतकुमार, सलिल चौधरी, जयदेव, खय्याम, रवी, मदनमोहन, रोशन ही नावे प्रमुख होती. रविंद्र जैन अशाच संगीतकारांमध्ये मोडतात. त्यांना मोजकेच चित्रपट मिळाले पण त्यांतील गाणी मात्र अतिशय लोकप्रिय झाली. रसिकांचे अलोट प्रेम त्यांना मिळाले.
अमिताभ जेंव्हा हाणामारीवाला नायक म्हणून समोर आला नव्हता त्या काळात त्याचा ‘सौदागर’ नावाचा एक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनच्यावतीने 1973 मध्ये प्रदर्शित झाला. रविंद्र जैन यांचा हा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट. नुतन, अमिताभ, पद्मा खन्ना यांच्या भूमिका यात होत्या. नुतनवर चित्रित झालेले लताचे गोड गाणे ‘तेरा मेरा साथ रहे’ आणि पद्मा खन्नावरचे आशाचे ‘सजना है मुझे सजना के लिये’ हे लाडीक गाणे याच चित्रपटातील. खांद्यावर बांबुच्या कावडीला ताडीचे मटके बांधून विकायला निघालेला अमिताभ किशोर कुमारच्या आवाजात, ‘हर हसिन चिज का मै तलबगार हू’ हे मस्तीभरे गाणे गात निघाला आहे. रविंद्र जैन यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बहुतांशी गाणी त्यांनीच लिहीली आहेत.
लगेच आलेला दुसरा चित्रपट म्हणजे शशी कपुरचा ‘चोर मचाये शोर’. यातील ‘घुंगरू की तर्हा बजता ही रहा हू मै’ हे गाणं त्यावेळी फार गाजलं होतं. पण याच चित्रपटातील ‘ले जायेंगे ले जायेंगे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या आशा भोसले व किशोर कुमारच्या गाण्यानं बीनाका गीतमालात 8 व्या तर ‘एक डाल पर तोता बोले एक डाल पर मैना’ या गाण्यानं 19 व्या क्रमांकावर स्थान मिळवलं होतं. आजही लग्नप्रसंगी बँडवाल्यांना ले जायेंगे ची आठवण होते.
रविंद्र जैन यांचे खरे सुर जूळले ते राजश्री प्रॉडक्शन सोबत. दोस्ती, पिया का घर, जीवनमृत्यू, उपहार सारख्या राजश्रीच्या चित्रपटांना हिट संगीत देणाऱ्या लक्ष्मीकांत प्यारेलाल नंतर राजश्री च्या चित्रपटातून संगीत देणे सोपे नव्हते. शिवाय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली. अश्या वेळी नविन चेहरे, नविन गायक व रविंद्र जैन यांचे संगीत असा 1974 ते 1980 चा काळ राजश्री च्या चित्रपटांनी मोठा सुरीला बनवला. ‘गीत गाता चल’ मधुन सचिन-सारिका सारखे नविन कोवळे चेहरे राजश्रीने पुढे आणले. जसपाल सिंग या नव्या गायकाच्या तोंडी असलेल्या ‘गीता गाता चल ओ साथी गुनगुनाता चल’ या गाण्याने तुफान हवा केली. बीनाका गीतमालातही त्या वर्षी हे गाणं चौथ्या क्रमांकावर होतं. आरती मुखर्जीच्या आवाजातील अतिशय गोड गाणं ‘श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम’ हे गाणंही असंच लोकप्रिय होत बीनाकाच्या 8 व्या स्थानावर आलं.
या नंतर आलेला चित्रपट म्हणजे ‘चितचोर’. येसुदास हा नवा आवाज हिंदी चित्रपटांत रविंद्र जैन यांनी आणला. या नविन आवाजाचं फार मोठं स्वागत रसिकांनी केलं. येसुदासचे ‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’ हे अमोल पालेकरच्या तोंडी असलेलं गाणं तेंव्हाच काय आजही लोकप्रिय आहे. या वर्षीच्या बीनाकात आरडी बर्मनच्या खालोखाल पाच गाणी एकट्या रविंद्र जैन यांची होती. ‘चितचोर’ मध्ये येसुदासच्या आवाजात हेमलता या नव्या गायिकेनंही सूर मिसळला. त्या दोघांचे सुंदर गाणे ‘तू जो मेरे सूर मे सूर मिला दे’ याच चित्रपटात आहे.
पुढच्या शशि कपुर शबाना आजमी यांच्या ‘फकिरा’ चित्रपटाला त्यांनी दिलेलं संगीतही रसिकांनी डोक्यावर घेतलं. लताच्या आवाजातील ‘दिल मे तुझे बिठाकर’, महेंद्र कपुर व हेमलताच्या आवाजातील ‘फकिरा चल चला चल’, लता किशोरचे द्वंद गीत ‘तोता मैना की कहानी तो पुरानी पुरानी हो गयी’ ही गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
या नंतरच्या ‘काळात अखियोंकी झरोंकेसे’, ‘दुल्हन वोही जो पिया मन भाये’, ‘सुनयना’, ‘गोपालकृष्ण’ 'नादिया के पार' 'मान अभिमान' 'बाबुल' सारख्या चित्रपटांतून त्यांची गोड गाणी येत राहिली.
लता, मुकेश, रफी, आशा, किशोर, मन्ना डे यांचे आवाज रविंद्र जैन यांनी वापरले पण सोबतच येसुदास, (गोरी तेरा गांव बडा प्यारा, सुनयना सुनयना, जब दीप जले आना, ओ गोरिया रे) जसपाल सिंग (गीत गाता चल, कौन दिशा मे, होली है), हेमलता (अखियों की झरोंकेसे, ले तो आये हो हमे, बेपर्वा बेदर्दी पगला दिवाना) आरती मुखर्जी (श्याम तेरी बन्सी) शैलेंद्र सिंग (हॅपी न्यु इयर टू यू) महेंद्र कपुर (फकिरा चल चला चल) यांनाही मोठी संधी त्यांनी दिली.
अमिताभचे मारधाड चित्रपट सुरू झाले आणि सगळी हिंदीचित्रपट सृष्टी मधुर गाण्यांपासून दूर गेली. चित्रपटांत गाणी होती पण त्यांच्यातले माधुर्य संपून ‘मेहबुबा मेहबुबा’ (शोले- आवाज आरडी बर्मन) चा धिंगाणा सुरू झाला. या काळात सचिन (गीत गाता चल, अखियोंकी झरोंकेसे, नादिया के पार), अमोल पालेकर (चितचोर), परिक्षीत सहानी (तपस्या), प्रेमकिशन (दुल्हन वही जो पिया मन भाये) नासिरउद्दीन शहा (सुनयना) मिथून (ख्वाब) शशी कपुर (फकिरा) जितेंद्र (आतिश) राज किरण (मान अभिमान) प्रशांत नंदा (नैय्या) तपस पौल (अबोध) आणि याच चित्रपटांमधून नायिका म्हणून सारीका, जरीना बहाब, रामेश्वरी, रंजिता, नीतू सिंग, राखी, साधना सिंह, शबाना आझमी यांच्या तोंडी रविंद्र जैन यांची गोड गाणी असायची. माधुरी दिक्षित चा पहिला चित्रपट अबोध हा राजश्रीचा होता. त्यालाही संगीत रविंद्र जैन यांचेच होते. माधुरीसाठी हेमलताचा आवाज रविंद्र जैन यांनी वापरला होता.
कठिण काळात हिंदी चित्रपट गीतांचा गोडवा जपायचं काम रविंद्र जैन यांनी केलं. पण हा सगळा बहर 1980 नंतर मात्र ओसरला.
कठिण काळात हिंदी चित्रपट गीतांचा गोडवा जपायचं काम रविंद्र जैन यांनी केलं. पण हा सगळा बहर 1980 नंतर मात्र ओसरला.
रविंद्र जैन यांनी गाणी अतिशय चांगली दिली पण त्यांना मुख्य प्रवाहातले चित्रपट मात्र मिळाले नाही. ही खंत त्यांना कदाचित जाणवत असावी. पण आपल्या उतारवयात राज कपुर सारख्यांना रविंद्र जैन यांच्या प्रतिभेची कदर करावी वाटली. 1986 मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट राज कपुर यांनी रविंद्र जैन यांना दिला. आणि रविंद्र जैन यांनी त्याचे सोने केले. ‘राम तेरी गंगा मैलीची’ सर्वच गाणी गाजली. आत्तापर्यंत हुलकावणी देणारं फिल्म फेअर अवॉर्डही त्यांना या चित्रपटासाठी मिळालं. लता सोबत सुरेश वाडकर सारख्या तेंव्हाच्या नव्या गायकाला मुख्य गायकाची संधी देण्यास रविंद्र जैन चुकले नाहीत.
जैन यांच्या गुणाची कदर करत राज कपुर प्रॉडक्शनचा पुढचा चित्रपटही ‘हीना’ही त्यांना मिळाला. 1991 मध्ये या चित्रपटांतील मधुर गाण्यांनी भरपुर लोकप्रियता मिळवली.
रविंद्र जैन यांना भारत सरकारने पद्मश्री देवून गौरविले. उत्तर आयुष्यात आपल्या गुणांची कदर झाली याचे त्यांना समाधान वाटले असणार.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने दुरदर्शनवर अफाट लोकप्रियता मिळवली. त्याचे संगीत रविंद्र जैनच यांचे होते. तुलसी रामायणातील अतिशय सुंदर दोहे निवडून त्याचा योग्य उपयोग रविंद्र जैन यांनी केला. दादा दादी की कहानी, श्रीकृष्ण, अलिफ लैला, हेमामालिनी यांची मालिका नुपूर अशा कितीतरी दूरदर्शन मालिकांना त्यांनी संगीत दिले.
आपल्या पहिल्याच सौदागर चित्रपटात मन्ना डेच्या आवाजात एक आर्त गाणं त्यांनी दिलं आहे. ‘दूर है किनारा, गहरी नदी की धारा, ओ माझी खेते जावो रे’ या गाण्यातील एका ओळीत ते लिहीतात ‘आंधी कभी तुफा कभी, कभी मझधार, जीत है उसीकी जिसने मानी नही हार’ हे स्वत: त्यांनाच लागू पडतं. आपल्या अंधपणावर त्यांनी विजय मिळवला. त्यांचा आवाज लोकगायकांसारखा किनरा चढा अतिशय सुरेल होता. अशा या गुणी प्रतिभावंत संगीतकाराला विनम्र श्रद्धांजली.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575