Friday, February 13, 2015

शरद जोशी यांची ग्रंथसंपदा



मा. शरद जोशी यांनी 1980 ते 2010 या काळात केलेले सर्व लिखाण एकूण पंधरा पुस्तकांमध्ये समाविष्ट केलेले आहे. सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध झालेली त्यांची पुस्तके ‘शेतकरी प्रकाशनाने’ सिद्ध केली होती. ती सर्व पुस्तके तसेच काही पुस्तिकाही नव्या स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 

1. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती

शेतकरी संघटनेच्या परिवारात ज्या पुस्तकाला ‘शेतकर्‍यांची गीता’ म्हणून आजही समजल्या जातं ते पुस्तक म्हणजे ‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’. मूळात हे पुस्तक म्हणजे अंबाजोगाई (जि.बीड) येथील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात शरद जोशी यांनी केलेल्या भाषणांचे संकलन आहे. सटाणा (जि. नाशिक) येथे शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन संपन्न झाल्यावर लगेचच अंबाजोगाई येथील मोरेवाडीचे श्रीरंगनाना मोरे यांनी एका शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराच्या सर्व कॅसेटस् प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे व प्रा. सुरेश घाटे (अलिबाग) यांनी उतरवून काढल्या.  या सगळ्या लेखांचे संकलन म्हणजे हे पुस्तक.
शेतकर्‍यांचं आंदोलन 1980 साली उभं राहिलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
शेतकरी आंदोलनाने आपले उद्दीष्ट सुरवातीलाच स्पष्टपणे सांगितले आहे. ‘केवळ शेतकर्‍यांचा फायदा करून देणे हे या आंदोलनाचे उद्दीष्ट नसून सर्व देशातील गरिबी हटवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.’ अशी स्वच्छ मांडणी शरद जोशींनी सुरवातीपासून केली आहे.
शेतकरी आंदोलनाची मुख्य उभारणी ही शेतमालाच्या भावाबाबत पहिल्यांदाच शास्त्रशुद्ध भूमिका घेत झाली. भूईमूग, कांदा, ऊस, तंबाखू, दूध, ज्वारी अशा विविध शेतमालाच्या उत्पादन खर्चाचे आकडे देत प्रत्यक्ष मिळणार्‍या भावाची तूलना या पुस्तकाच पहिल्यांदाच करण्यात आली. उत्पादन खर्च भरून निघत नाही याचं विवेचन करत असतांना ‘तूट असेल तर लूट आणि मुबलकता असेल तर लिलाव’ हे धोरणही मांडण्यात आलं आहे. 
इंडिया आणि भारत ही संकल्पना म्हणजे शहर विरूद्ध खेडं असं नसून ‘आर्थिकदृष्ट्या या देशाचे असे दोन भाग पडले आहेत की ज्याच्यामधील एक भाग हा दुसर्‍या भागाच्या शोषणावरच जगतो आहे आणि सतत जास्तीत जास्त शोषण करीत चालला आहे आणि दुसर्‍या भागाचं मात्र शोषण होतच आहे. शोषक म्हणजे इंडिया आणि शोषित म्हणजे भारत’. 
शेतकरी संघटनेनं ‘शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव’ या एक कलमी मागणीवर आपलं सगळं आंदोलन उभारलं आहे. ही सगळी मांडणी शरद जोशींनी सविस्तर उलगडून दाखवली आहे. तसेच आंदोलनाचे तंत्रही समजावून सांगितले आहे. 
वर्धा येथे संपन्न झालेल्या शिबीराच्या भाषणाचे संकलन ‘भारतीय शेतीची पराधिनता’ या नावाने करून ती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. या पुस्तकाला परिशिष्ट म्हणून ही पुस्तिकाही जोडली आहे. विविध मुद्दे घेऊन त्यावर चर्चा केली आहे. पुढे जी प्रमुख मागणी शेतकरी संघटनेने केली ती मुक्त बाजारपेठेची मागणी या पुस्तकात स्पष्टपणे नोंदवली आहे.

2. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश


विविध साप्ताहिके, नियतकालिके यांत प्रकाशित झालेले शरद जोशींचे मराठी व इंग्रजी लेख शोधून त्याचे पुस्तक प्रा. अरविंद वामन कुलकर्णी व सुरेशचंद्र म्हात्रे यांनी सिद्ध केले. पूर्वी दोन भागात असलेले हे पुस्तक आता एकत्रित स्वरूपात उपलब्ध आहे.
‘शेतकरी संघटनेचा विचार आणि एकसूत्री कार्यक्रम ही एक संपूर्ण विचारपद्धती आहे. एका वर्गाच्या प्रासंगिक स्वार्थाचे हे तत्त्वज्ञान नाही. 
समाज एकत्र बांधल्या जातो तो वस्तू आणि सेवांच्या परस्पर देवघेवीने. या देवघेवीच्या शर्ती इतर कोणत्याही घटकांपेक्षा समाजातील संबंध ठरवितात. 
प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यानंतर पहिला आर्थिक स्वरूपाचा व्यवसाय निर्माण झाला तो शेती. उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा हा एकमेव व्यवसाय आहे. वाहतूक, व्यापार, साठवणूक, कारखानदारी या क्षेत्रांत देवघेवीच्या मूल्याची वृद्धी होऊ शकते. पण उपभोग्य वस्तूंचा गुणाकार फक्त शेतीतच होऊ शकतो.’
या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच शरद जोशी यांनी शेतीसंबंधी आपली भूमिका आणि दृष्टिकोन सैद्धांतिक पातळीवर इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे. या विचारांमध्येच त्यांच्या सगळ्या मांडणीचे सूत्र सापडते. 
या पुस्तकांत शरद जोशी यांनी शेतकरी संघटक या पाक्षिकांत वेळोवेळी लिहिलेले लेख प्रामुख्याने समाविष्ट आहेत. 
‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये शेतकरी संघटनेच्या संबंधाने सलग तीन दिवस अग्रलेख लिहिले गेले. (9,10,11 ऑक्टोबर 1985) या अग्रलेखांना उत्तर देत शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्रच शरद जोशींनी मांडले आहे. 26 वर्षानंतर शरद जोशींची मांडणी किती दूरगामी होते हे यावरून स्पष्ट होते. 

3. चांदवडची शिदोरी: स्त्रियांचा प्रश्न


चांदवड (जि.नाशिक) येथे 10 नोव्हेंबर 1986 रोजी महिलांचे ऐतिहासिक अधिवेशन संपन्न झाले. आजपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने ग्रामीण महिला कुठेही जमलेल्या नाहीत. ग्रामीण स्त्रियांच्या प्रश्नाबाबत आणि एकूणच स्त्रीप्रश्नाच्या संदर्भात अतिशय वेगळी अशी मांडणी या निमित्ताने केल्या गेली. ‘चांदवडची शिदोरी’ या नावाने एक छोटी पुस्तिका त्या वेळी काही महिला कार्यकर्त्यांच्या सहाय्याने शरद जोशींनी स्वत: सिद्ध केली होती. त्यानंतर या प्रश्नावर त्यांनी विविध प्रसंगी लिहिलेले लेख एकत्र करून 160 पानांचे हे पुस्तक शरद जोशींच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात 2 ऑक्टोबर 2010 रोजी रावेरी जि. यवतमाळ येथे प्रसिद्ध झाले.
चांदवडचे महिला अधिवेशन, अमरावती येथील महिला अधिवेशन, बेजिंग परिषद या निमित्ताने लिहिलेले लेख तसेच महाराष्ट्र शासनाचे महिला धोरण, महिला आरक्षण व वारसाहक्कासंबंधी भूमिका या संदर्भातील लेखही यात समाविष्ट आहेत.
‘मुक्ताईने केले ज्ञानेशा शहाणे’ या नितांत सुंदर लेखात एकूणच महिला चळवळीचा आढावा घेताना शेवटी शरद जोशी लिहीतात, ‘20 वर्षांमध्ये कितीतरी प्रसंग घडले. वेगवेगळ्या वेळी स्त्रियांचे प्रश्न निर्माण झाले की मी सर्वसाधारण अडाणी, अशिक्षित स्त्रियांच्या बैठका बोलविल्या, त्यांच्या पुढे माझे प्रश्न -होतील तितक्या सोप्या शब्दांत- मांडले आणि मांडल्यावर, त्यांच्याकडून प्रतिक्रियांची अपेक्षा केली. सुरुवातीला त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळविणे हेच काम कठीण होते. त्याकरिता बरीच मशागत करावी लागली. पण ती एकदा केल्यानंतर भरभरून पीक आहे. या माझ्या शेतकरी बहिणींनी मला जे भरभरून ज्ञान दिले त्याची तुलना फक्त मुक्ताईने ज्ञानेशांना केलेल्या ज्ञानसंबोधनाशीच होऊ शकते.’

4. शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख 


शिवाजी महाराजांच्या राजवटीचे विश्लेषण शेतकर्‍यांच्या दृष्टिकोनातून करण्याचा अतिशय मोलाचा प्रयत्न या पुस्तकात शरद जोशींनी केला आहे. इतिहासात बळीराजा नंतर फक्त शिवाजी महाराजच असे राजे होते ज्यांना शेतकर्‍याचा राजा म्हणता येईल. 
पुरंदराच्या तहाचे जे विश्लेषण यात आले आहे ते विलक्षण बोलके आहे. ‘12 जून 1665 रोजी शिवाजी महाराजांनी शरणागती पत्करली. अहंकार, प्रतिष्ठा ही गौण ठरली व रयतेची सुरक्षितता ही श्रेष्ठ ठरली. रणभूमीतील परिस्थिती पाहता शरणागतीची आवश्यकता नव्हती. 12 जून ही तारीखही महत्त्वाची आहे. हे आगोठीचे दिसवस. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पुढे शेतीच्या पेरणीचे दिवस येतात. धुमश्‍चक्री थांबली नाही आणि शेतकर्‍यांची सबंध शेती जर तशीच पडून राहिली तर थोरल्या दुष्काळाप्रमाणे (स.1628-30) रयतेची अन्नानदशा होईल ही भीती आ वासून उभी राहिली असणार. नंतरच्या पुरंदरच्या तहानंतर त्या परिसरात शेतकरी आपल्या कामास लागले व शांतता निर्माण झाली.’
पुरंदच्या तहाचे असे विश्लेषण आत्तापर्यंत कोणीच केले नव्हते.
शिवाजी महाराजांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत अतिशय स्वच्छ दृष्टि होती. ती तशी आजच्या राज्यकर्त्यांनाही नाही असे स्पष्टपणे शरद जोशींनी प्रतिपादले आहे. 
या पुस्तकात शेतकर्‍याचा आसूड शतकाचा मुजरा ह्या पुस्तिकेचाही समावेश केला आहे. महात्मा फुल्यांच्या या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परभणी येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या दुसर्‍या अधिवेशनात ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. 
या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत शरद जोशी म्हणतात, ‘शेतकर्‍याचा असूड’ व त्यात मांडलेली शेतकर्‍यांच्या शोषणाची कहाणी हा फुले-मताचा पाया आहे. विश्वाच्या उपपत्तीपासून उत्पादक समाजाचे हिंसाचाराने झालेले शोषण हे जोतीबांच्या विचाराचे मध्यवर्ती सूत्र आहे. आजच्या डाव्या विचारवंतांनाही आकलन न झालेले शेतकरी समाजाचे स्पष्ट चित्रण जोतिबांनी अगदी विदारकपणे मांडले. हे सत्य त्यांना प्रत्यक्ष टोचले म्हणून जाणवले.
ज्योतिबांच्या मांडणीतील मर्यादाही शरद जोशींनी स्पष्ट केल्या आहेत. ‘..जोतिबांना शेतकर्‍यांच्या शेाषणातील सनातनता जाणवली होती; पण समजली नव्हती. या शोषणाचे ‘भटशाही’ हे तत्कालीन स्वरूप अपिरहार्य भाग म्हणून होते. हा शोषक कधी दरवडेखोराच्या रूपांत येतो, कधी जमीनदार सावकाराच्या, कधी भटाभिक्ष्ाुकाच्या, कधी राजा महाराजांच्या, कधी इंग्रजांच्या, कधी स्वकीय राज्यकर्त्यांच्या, हे त्या काळात त्यांना उमगले नाही. 
शेतकर्‍यांचा शोषक भट पुढे आपल्यात शूद्रच काय अतिशूद्रही सामील करून घेईल, शिक्षणाचा प्रचार करील; पण शेतकर्‍यांचे शोषण सोडणार नाही. कारण शेतीच्या शोषणाखेरीज त्याला सोईस्कर असा भांडवलनिर्मितीचा मार्गच नाही. हे जोतीबांना समजले नाही.’
‘शेतकरी कामगार पक्ष : एक अवलोकन’ ही पुस्तिकाही या ग्रंथात समाविष्ट आहे. 1987 साली ही पुस्तिका शरद जोशींनी लिहिली होती. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न शेकापने सर्वांत आधी उठवला होता. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव मिळावा ही मागणी शेकापने अनेक वर्षांपूर्वी केली होती. त्यासाठी जागोजाग चळवळी केल्या होत्या, आंदालने केली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेचा विचार समजून घेतला. इतर कार्यकर्त्यांना हा विषय कळावा यासाठी त्यांनी यावर लिखाण करण्याचा आग्रह शरद जोशींकडे धरला. यातून ही पुस्तिका तयार झाली. 
गावांतील कुणबी शेतकर्‍यांपेक्षा शहरातील नोकरदार मुले आणि त्यांचे हितसंबंधी हेच त्यांना अधिक जवळचे वाटत होते. शतकर्‍यांना कामगारांच्या चळवळीला जुंपून घेणे हाच त्यांचा खरा उद्देश होता.
पण शेतीमालाच्या भावाच्या महत्त्वाची जाण शेतकरी कामगार पक्षाच्या गावागावांतील हजारो कार्यकर्त्यांना फार चांगली होती. त्यांच्या आग्रहाखातर शेतीमालाच्या भावाचा प्रश्न कसाबसा सामावून घेण्यात आला. शेतीमालाचे भाव हे शेतकरी कामगार पक्षाचे कृत्रिमरित्या चिकटविलेे मातीचे कुल्लेच होते. असा सडेतोड आणि स्पष्ट निष्कर्षही शरद जोशींनी नोंदविला आहे. 
‘शोषकांना पोषक: जातीयवादाचा भस्मासूर’ ही पुस्तिका 1990 मध्ये प्रकाशित झाली होती. भारतीय जनता पक्षाने देशपातळीवर बाबरी मशिद आयोध्या जन्मभूमी प्रश्नावर एक जे उन्मादक वातावरण निर्माण केले होते त्याला ठामपणे विरोध शेतकरी संघटनेने केला. त्यामागची भूमिका ही ‘जातीयवादी चळवळी नेहमीच अर्थवादी चळवळींना धोका निर्माण करतात. ही सगळी व्यवस्था पोशिद्यांना घातक ठरते.’ असं शरद जोशी मांडत हाते. 1947 मध्ये जातीयवादाच्या वावटळीत देशाची फाळणी झाली. परत तेच वातावरण हिंदूत्ववादी संघटना निर्माण करीत आहेत.
पंजाबमध्ये खालिस्तानचा चिघळलेला प्रश्न, त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधींची झालेली हत्या व नंतर आलेल्या लोकसभा निवडणूका. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेला केलेले आवाहन, नांदेडच्या पोटनिवडणुकीत भारीपचे नेते मा. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ केलेले भाषण या सर्व लेखांतून शरद जोशींनी जातीयवादी चळवळींना निर्माण केलेला धोका स्पष्टपणे मांडला आहे. 

5. स्वातंत्र्य का नासले?


भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली तेंव्हा शासकीय पातळीवर स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशपातळीवर प्रश्नांचे चिंतन करण्यासाठी 11 लेख शरद जोशींनी लिहिले. त्याचेच हे पुस्तक. या पुस्तिकेत स्वराज्य आंदोलनातील वेगवेगळ्या प्रवाहासंबंधी एक नवीन उपपत्ती आणि मांडणी करण्यात आली आहे. कॉंग्रेस ही मूळची शहरी, पाश्चिमात्य विचारसरणी आणि जीवनशैली यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्यांची आघाडी. गांधीजींनी तिलाच अध्यात्म आणि सर्वोदय यांचा मुलामा दिला आणि सत्याग्रहाचे हत्यार दिले.
स्वातंत्र्योत्तर परिस्थितीचे विश्लेषण करताना शरद जोशींनी ‘‘स्वातंत्र्य मिळाले आणि सारी सत्ता पाश्चिमात्य प्रभावाखालील सवर्णांकडे गेली. त्यांनी ‘भटशाही’ समाजवाद तयार केला. 40 वर्षे समाजवादाचा उद्घोष झाला. नंतर, समाजवादापेक्षा खुल्या व्यवस्थेतून उच्चवर्णीयांचे भले अधिक होण्याची संभावना दिसू लागली तेंव्हा अप्रतिहत व्यवस्थेचा पुरस्कार सुरू झाला. पण, उच्चवर्णीयांत उद्योजकत्वाची धडाडी दाखविण्याची कुवत नाही हे स्पष्ट झाले. स्पर्धेसाठी समतल मैदान असण्याची भाषा सुरु झाली. नोकरशहा, कामगार, गुंड आणि पुढारी एकत्र झाले आणि पुन्हा एकदा सरकारशाहीच्याच मार्गाने जाण्याचा कार्यक्रम बनत आहे.’’
कारखानदारी, रेल्वे, सुरक्षाव्यवस्था यातील धोरणे देशाच्या प्रगतीला कशी मारक राहिली याचे सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे. स्वातंत्र्याचा झेंडा फडकण्याआधीच लुटला गेला. स्वातंत्र्याचा आणि फाळणीचा माऊंटबॅटन यांनी केलेला प्रस्ताव कॉंग्रेसने स्वीकारला त्यामागे इंग्रजांपासून लवकरात लवकर स्वतंत्र व्हावे या भावनेपेक्षा हिंदुस्थानातील बहुजन समाजाची सत्ता देशात येऊ नये, प्रस्थापित श्रेष्ठींचेच राज्य पुन्हा स्थापन व्हावे ही बुद्धी अधिक प्रबळ होती. थोडक्यात, जोतिबा फुल्यांच्या शब्दात ‘एकमय लोक’ या अर्थाने राष्ट्र’ उभे राहिले नसताना इंग्रज निघून गेले; त्यामुळे पुन्हा एकदा थोड्याफार फरकाने ‘पेशवाई’ची स्थापना होण्याची तयारी झाली.

6. खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने


खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन मोठ्या प्रमाणावर शेतकरी संघटनेने केले. 1991 साली तर असे चित्र होते की शेतकरी संघटना वगळता कोणीच डंकेल प्रस्तावाचे समर्थन करण्यास तयार नव्हते. खुली व्यवस्था, उदारीकरण, जागतिकीकरण, डंकेल प्रस्ताव, जागतिक व्यापार याबाबत अतिशय सुत्रबद्ध सोप्या भाषेत जवळपास 17 लेख शरद जोशींनी शेतकरी संघटक या पाक्षिकात लिहिले होते. 1991 ते 2000 या जवळपास दहा वर्षांंत हे लेख लिहिले गेले आहेत. 
या सगळ्या मांडणीला आधार म्हणून ‘स्वतंत्रतेची मूल्ये’ या नावाने लिहिलेले चार लेख याच पुस्तकाला परिशिष्ट म्हणून जोडले आहेत. ‘जगाचे कप्पे कप्पे करणार्‍या क्ष्ाुद्र भिंती कोसळलेल्या असतील म्हणजे विचार, सेवा आणि वस्तू यांची देवघेव निर्वेधपणे होणे ही स्वतंत्रतेची महत्त्वाची अट आहे.’ इतक्या सोप्या भाषेत स्वतंत्रतेचे तत्त्वज्ञान शरद जोशींनी मांडले आहे. खुलीकरणाला अजूनही विरोध करणार्‍या डाव्या विचारवंतांनी हे चारच लेख मनात कुठलाही पूर्वग्रह न ठेवता वाचावेत. 
अगदी दार्शनिकांच्या पातळीवर जाऊन स्वातंत्रेतेची व्याख्या मांडताना, ‘दार्शनिकांनी ब्रह्मतत्त्वाचे वर्णन करताना ‘हे नाही हे नाही’ म्हणजे ‘नेति नेति’ एवढीच व्याख्या दिली. स्वतंत्रतेची व्याख्या अशीच ‘नेति नेति’ आहे. आजचे हे बंधन नको, ही बेडी नको. उद्याची नवी बंधनेही आम्ही झुगारू. कोणतेही मत कोणताही महात्मा, कोणतेही पुस्तक त्रिकालाबाधित वंद्य आणि पूज्य असूच शकत नाही. जन्माच्या अपघाताने मिळालेला कोणताही गुणावगुण दंभ मिरवण्याच्या लायक नसतो. ही स्वातंत्र्याच्या उपासकाची प्रवृत्ती आहे. स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवणे, संकुचितपणाचा वाढता संकोच करणे एवढीच स्वतंत्रतेची व्याख्या देता येईल.’ असा तात्त्विक पायाही आपल्या विचारांना शरद जोशींनी देऊन ठेवला आहे. 
   

7. अंगारमळा


शरद जोशींची भाषा मुळातच शैलीदार, ओघवती आणि सोपी आहे. त्यांनी आत्मचरित्रात्मक असे मोजकेच लेख लिहिले आहेत. आठवड्याचा ग्यानबा साप्ताहिकात त्यांनी दोन लेख ‘अंगारमळा’, ‘माझी ब्राह्मण्याची गाथा’1988 मध्ये लिहिले होते. ते अतिशय गाजले. त्यांनी असेच लिखाण करावे अशी अपेक्षा होती पण तसे घडले नाही. या आत्मचरित्रात्मक लेखांसोबतच त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे आणि इतर काही लेख अशा 15 लेखांचा हा संग्रह.
अंगारमळा या पहिल्याच लेखात सुरवातीच्या दाहक अनुभवांबाबत लिहितांना ‘झोपी जातांना चिंतांची तोटी बंद करून झोपी जायचं ही माझी फार जुनी कला आहे. झोप लागतांना सगळ्या चिंतांचा आणि तणावांचा काही त्रास झाला नाही. रात्री अडीचतीन वाजता मात्र झोप खाड्कन खुले. पुढे झोपणेच अशक्य होई. कपाळाला हात लावून मी स्वत:लाच विचारी, ‘मी पाहतो आहे ते खरं की स्वप्न?’ आसपास शांपणे झोपलेल्या लीला, श्रेया, गौरीकडे पाहून पोटात गलबलून यायचं. यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा मला काय अधिकार होता? त्याग म्हणजे रूपयापैशांचा नसतो. त्याग अशा अनेक दाहक क्षणांनी गुंफलेला असतो.
शेतकरी आंदोलनात काम करतांना जातीची अडचण शरद जोशींनी जाणवत राहिली. ‘माझ्या ब्राह्मण्याची गाथा’ सारख्या लेखात ‘चोखामेळ्याला मंदिरात प्रवेश करायला ब्राह्मणांनी बंदी केली. शेतकरी कामाच्या मंदिरात प्रवेश करायला नवे ब्राह्मण नव्या चोखामेळ्याला अडथळा आणताहेत. अशी ही ‘नाथाच्या घरची उलटी खूण’ आहे.’ असं त्यांनी नोंदवले आहे. 
‘इति एकाध्याय’हा आईवरचा अतिशय अप्रतिम लेख आहे. स्वत:च्या दुखण्यावरच्या लेखात आपल्य कुटूंबियांच्या आधी शेतकरी संघटनेचे बिल्लेवाले पोंचलेले पाहून ‘हे तुझे खरे कुटूंब. आम्ही रक्ताचे नात्याचे; पण आम्हीसुद्धा इतक्या त्वरेने धावून आलो नाही.’ हे आपल्या भावाचे वाक्य लिहून खरंतर स्वत:च्याच भावना व्यक्त केल्या आहेत. 
आपले अतिशय जवळचे सहकारी शंकरराव वाघ यांच्यावर छोटासा पण फार सुंदर लेख यात आहे. तशी भावनाप्रधानता शरद जोशी लिहिताना टाळतात. म्हणूनच क्वचित कधी त्यांच्या लिखाणात ओलावा येतो तो जास्तच परिणामकारक वाटतो. ‘..सध्या संघटनेचे काही निकडीचे काम लवकर निघायची शक्यता नाही हे हेरून शंकरराव गेलेले दिसतात. त्यांची ओळख झाली ते पूर्वजन्मीचा ऋणानुबंध असल्यासारखी. पुढच्या कोणत्या तयारीसाठी शंकराव निघून गेले, कळायला आज काहीच साधन नाही.’ शंकररावांवरच्या लेखाचा हा शेवट त्यामूळेच फार हृद्य वाटतो. बुलढाण्याचे शेवाळे गुरूजी असो, बाबुलाल परदेशी असोत, कामगार नेते दत्ता सामंत असो यांची व्यक्तिचित्रे रेखाटताना चळवळीचाही एक इतिहास शरद जोशी मांडत जातात. बाबुलाल परदेशीवरचा लेख तर सर्वात उत्तम. 
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेले पत्र त्यावेळी फारच गाजले. आज पन्नाशित असलेल्या बर्‍याच कार्यकर्त्या मित्रांच्या तेंव्हाच्या हॉस्टेलच्या खोलीत या पत्राची छापित प्रत पोस्टर्स सारखी लावलेली असायची. ‘सीतेच्या शोधात गेलेल्या हनुमानासारखी तूझी स्थिती आहे. रावणाच्या वैभवाला भूलून त्याच्या पदरी चाकरी स्वीकारणार का भूमिकन्या सीतेला सोडवण्यासाठी प्राण पणाला लावणार’ हा त्यांनी शेतकर्‍याच्या पोरांला केलेला सवाल आजही या कार्यकर्त्यांच्या मनात सलत असतो. 
‘शेतकरी आंदोलन आणि साहित्यिक’ हा लेख तसेच ‘मी साहित्यीक नाही’ हा लेख म्हणजे साहित्य संमेलनातील भाषणे आहेत. या लेखांना साहित्यीक नियतकालिकांनी मोठी प्रसिद्धी दिली होती. आजही साहित्य आणि चळवळ याबाबत वाङ्मयीन पातळीवर या लेखांची चर्चा होत राहते.
‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’ या अंतर्नाद मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाने मोठीच खळबळ माजवली होती. आपल्या विचाराची एकूणच दिशा स्पष्ट करतांना तसेच त्याला वैयक्तिक अनुभवांची जोड देत, शेतकरी चळवळीतील मोठा अनुभव पट मांडत शरद जोशींनी सामाजिक कार्याची अतिशय परखड अशी केलेली चिकित्सा असे या लेखाचे स्वरूप आहे. 

8. जग बदलणारी पुस्तके


‘दैनिक देशोन्नती’मध्ये एक अतिशय सुंदर आणि वेगळ्या विषयावरचे सदर शरद जोशींनी चालवले होते. ‘जग बदलणारी पुस्तके’ असे त्या सदराचे नाव होते. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बौद्धिक पातळी उंचावण्यासाठी, त्यांना चांगले वैचारिक खाद्य मिळावे म्हणून प्रशिक्षिण शिबीरांचे आयोजन करण्यात यायचे. अशा कार्यकर्त्यांना अवांतर वाचनासाठी द्यायचा मजकूर म्हणून ही लेखमाला लिहिल्याचे शरद जोशींनी सांगितले आहे. 
थॉमस पेन्स, ऍडम स्मिथ, थोरो, डार्विन यांच्या सैद्धांतिक जडजंबाळ पुस्तकांच्या सोबतच रॉबिन्सन क्रूसो किंवा जॉर्ज ऑरवेलचे ‘ऍनिमल फार्म’ या मनोरंजनात्मक पुस्तकांचाही समावेश यात केलेला आहे.
फायद्याच्या प्रेरणेने चालणारी बाजारपेठेची व्यवस्था टिकूच शकणार नाही या मार्क्सच्या मांडणीला विरोध करणार्‍या मायझेसच्या ‘समाजवादी नियोजनाचे आर्थिक गणित’ या पुस्तकावरही लेख यात समाविष्ट आहे. माझसेने सांगितले होते की अर्थव्यवस्थेत सामूहिक नियेाजन ही कल्पनाच भोंगळ आणि चुकीची आहे, समाजवादी नियोजनाच्या व्यवस्थेतील निर्णय हमखास चुकीचे असतात, अशा चुकीच्या निर्णयांवर आधारलेली व्यवस्था फार काळ टिकणे अशक्य आहे. शेतकरी संघटनेच्या सर्व अर्थशास्त्राची भूमिका प्रामुख्याने हीच असल्याचे या अनुषंगाने शरद जोशींनी नोंदवले आहे. 
दहा वर्षांपूर्वी लिहिलेल्या या लेखमालेत आजच्या काळात ‘द सेल्फिशी जीन’ व ‘द गॉड जीन’ या पुस्तकांचा समावेश मी केला असता असं प्रस्तावनेत लिहून शरद जोशींनी लिहून आपल्या विचारांची दिशा स्पष्ट केली आहे.

9. अन्वयार्थ भाग 1 व भाग 2


शरद जोशी यांनी प्रामुख्याने पाक्षिक शेतकरी संघटकसाठी लिखाण केले. त्याशिवाय दै. लोकमतमध्ये इ.स. 1992 ते 1994  आणि इ.स. 2000 ते 2001 या काळांत ‘अन्वयार्थ’ या सदरामध्ये लिखाण केले. हे लेख त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार लिहिल्या गेलेले आहेत. हे स्फूट लेख आहेत, तरीही सगळ्यांमध्ये सूत्र म्हणून शेतकरी संघटनेचा मध्यवर्ती विचार आहे. किंबहुना शरद जोशींच्या विचारांचाच जो धागा आहे तो स्वतंत्रतावादी विचारांचा आलेला आहे. ‘स्त्री चळवळीची पीछेहाट’सारखा लेख असो, की पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताशी छेडलेल्या छुप्या युद्धाचा विषय असो, घटनेतील नववे परिशिष्ट असो, की चीनमधील एकेकाळी सर्वगुणसंपन्न असलेला आणि मग काळाच्या ओघात खलनायक ठरलेला माओ असो... या सगळ्यांवरती अतिशय ओघवत्या शैलीत आणि मोजक्या शब्दांत शरद जोशींनी लिहिले आहे.  सदराची शब्दमर्यादा असल्यामुळेही हे सर्व लेख छोटेखानी आहेत.
‘मालकाला विकणारे नोकरदार’ किंवा ‘नोकरदारांची मगरमिठी’ अशा लेखांतून अवाढव्य वाढलेल्या नोकरशाहीचा नेमक्या शब्दांत त्यांनी उपहास केला आहे. ‘काळ्या आईला सोनेरी प्रणाम’सारख्या लेखात शेती सोडणार्‍या शेतकर्‍यांची मानसिकता फार व्यवस्थित आणि योग्य शब्दांत आली आहे. ‘इंडिया आणि भारत’ ही द्वंद्व रेषा सगळ्या धोरणांमधून कशी स्पष्ट दिसते हेपण विविध लेखांमध्ये आलेले आहे.
एखादा विचारवंत प्रत्यक्ष चळवळीत भाग घेतो आणि मग त्याचं सगळं पांडित्य त्या अनुभवातून अजूनच लखाखून निघतं. विविध विषयांवरची त्याची मतं त्याच्यामुळेच महत्त्वाची ठरतात. त्यातच जर त्याला चांगली शैली लावली असेल, तर विचारायलाच नको. हाच अनुभव शरद जोशींची ही दोन पुस्तके वाचताना येतो.


10. माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो


शेतकरी आंदोलनात जाहीर सभांमधून एक फार चांगलं संबोधन शरद जोशी वापरतात आणि ते म्हणजे ‘माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो’ त्यांच्या विविध भाषणांचा संग्रह जेव्हा प्रसिद्ध झाला, त्याला स्वाभाविकच हे सुंदर नाव देण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथील 1981 मध्ये केलेल्या भाषणापासून 2009 मध्ये परभणी येथे केलेल्या भाषणापर्यंत 29 भाषणांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक! 28 वर्षांमधील वैचारिक मांडणी अतिशय स्पष्टपणे यात आलेली आहे. सर्वसामान्य अडाणी शेतकर्‍याला मायमाऊल्यांना शेतीचे अर्थशास्त्र, आंदोलनाचे तंत्र, शेतीचे भवितव्य हे विषय समजावून सांगण्याचे मोठे कौशल्य शरद जोशींना लाभले. त्याचा प्रत्यय ही भाषणं वाचताना येतो. कुठलाही आवेश न बाळगता संथ लयीत आपला मुद्दा समोरच्याला पटवून देण्याची शैली हे वाचतानाही जाणवत राहते. ज्यांनी कधी शरद जोशींची भाषणे ऐकली असतील त्यांना हे पुस्तक वाचतानाही त्या अनुभवाचा पुनर्प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मांडणीत एक विशिष्ट सातत्य शरद जोशींनी राखले आहे. त्यांच्यावर टीका करणार्‍यांनी ही भाषणं वाचली तरी त्यांना सहज त्याचा प्रत्यय येईल.  ‘‘शेतकर्‍यांचा प्रश्न अगदी सोपा आहे. आम्हाला सरकारचे फुकटाचे दवाखाने नको, फुकटाच्या शाळा नको, घरावर सोन्याची कौले घालून देतो म्हणाल तरी नकोत, फक्त आमच्या शेतीमालाला रास्त भाव द्या...’’ ही भाषा इ.स. 1981 ची आहे. ज्या भाषेने अडाणी शेतकर्‍याला शहाणे केले ती इ.स. 2009 मध्येसुद्धा तशीच आहे. त्याच सोपेपणाने नवीन आव्हाने सामान्य शेतकर्‍यांना समजावून सांगत आहेत.

11. बळीचे राज्य येणार आहे


‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकातील मांडणी 1988 च्या आधीची आहे. त्यानंतर शेती आणि शेतकरी आंदोलनांबद्दल जवळपास पन्नासएक लेख शरद जोशींनी लिहिले. हे सर्व पाक्षिक शेतकरी संघटकमधून प्रसिद्धही झाले. इतकंच नाही. शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात ‘साप्ताहीक वारकरी’मध्ये ‘शेतकर्‍यांची संघटना : अडचणी व मार्ग’ ही लेखमालाही त्यांनी लिहिली होती. त्यातच शेतकरी समाज हा मूलत: स्वतंत्रतावादी आहे. हे त्यांनी स्पष्ट नोंदवले होते. 1991 नंतर शेतकरी संघटनेवर डंकेल प्रस्तावाचे समर्थन केल्यामुळे जी टीका झाली, त्यांनी हा दाखला बघायला हवा. हे सर्व लिखाण ‘बळीचे राज्य येणार आहे’ या पुस्तकात समाविष्ट केलेले आहे. खेड्यापाड्यांतील मायमाऊल्या ‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असं म्हणत राहतात. हीच घोषणा शेतकरी संघटनेत ‘इडा-पिडा टळणार आहे, बळीचे राज्य येणार आहे’ म्हणून फार लोकप्रिय झालेली आहे. त्या अनुषंगानेच पुस्तकाचे नाव ‘बळीचे राज्य येणार आहे’ असे ठेवण्यात आले आहे. पुस्तकाची विभागणी चिंतन, आंदोलन, सहकार आणि कर्जबळी अशा चार विभागांत करण्यात आली आहे. शेतकरी चळवळीच्या एकजुटीचा निकडीचा काळ असा शेवटचा लेख म्हणजे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते श्रीरंगनाना मोरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त केलेले भाषण आहे. ‘‘कुटुंबप्रमुख म्हणून मी माझी चूक मानतो आणि तुमची माफी मागतो आणि परत या अशी हाक देतो. शेतकर्‍यांच्या दृष्टीने पुढचे दिवस अत्यंत कठीण आहेत. शेतकर्‍यांमध्ये ही फूट पाडण्याची वेळ नाही.’’ 2008 साली काढलेले हे उद्गार आज जेव्हा शेतकरी संघटनांच्या एकीची गोष्ट मांडली जाते त्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायला हवे.
कापूस, दूध, साखर आणि पतसंस्था यांचा सहकाराने केलेला बट्ट्याबोळ अगदी सुरुवातीपासून शरद जोशींच्या टीकेचा विषय ठरला आहे. साखर उद्योग निर्बंधमुक्त करा ही मागणी फार आधीपासून शेतकरी चळवळीने लावून धरली आहे. सहकारामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले जे आता सगळ्यांनीच एकापरीने मान्य केले आहे. सर्व लेखांच्या खाली तारखा दिलेल्या आहेत. स्वाभाविकच ही मांडणी त्या त्या काळातली आहे जी आजही सुसंगत आहे, हे सहजपणे समजून येते.

12. अर्थ तो सांगतो पुन्हा


मुक्त अर्थव्यवस्थेच्या संदर्भात केलेल लिखाण ‘खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने’ या पुस्तकात समाविष्ट झाले होते. त्या सोबतच जवळपास प्रत्येक अर्थसंकल्पावर 1990 पासून शरद जोशी लेख लिहीत आले आहेत. या सर्व लेखांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाची सुरुवातच मुळात जनता राजवटीच्या काळात झाली होती. कॉंग्रेसला विरोध हा शिक्का शरद जोशींवर मारण्यात आला. तो चुकीचा असून शासकीय धोरणाला विरोध ही मूळ भूमिका होती. या पुस्तकातील लेखांतही मधु दंडवते असोत, यशवंत सिन्हा असोत यांच्या अर्थसंकल्पांवरही मनमोहन सिंग यांच्याइतकीच टीका शरद जोशी करतात. जवळपास सर्व अर्थसंकल्प शेतकरी विरोधीच आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी त्यात फारसे काही नाही. नोकरशाही नेहमीच आपले हीत साधत आली आहे ही टीका फार स्पष्टपणे शरद जोशींनी केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) पहिल्या काळात लोककल्याणकारी योजना आखण्यात आल्या, ज्यामुळे फार मोठा तोटा झाला. सर्वसमावेशक विकासाच्या अर्थशास्त्राच्या मर्यादाच उघड झाल्याचं शरद जोशींनी नोंदवलेलं आहे. महागाई वाढीचा सरकारच्या धोरणाशी सरळसरळ संबंध असल्याचा आरोपही त्यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अंदाजपत्रकावर केला आहे. वित्तीय तूट मर्यादेच्या बाहेर गेली असून रिझर्व्ह बँकेच्या आणि भारत सरकारच्या कुठल्याही उपाययोजनांना महागाईचा वाढता दर बिलकुल दाद देत नाहीत हेही त्यांनी स्पष्टपणे नोंदवले आहे.
स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक क्षेत्राला प्रथम प्राधान्य, अवजड उद्योगांना अग्रक्रम आणि कमी खर्चाची अर्थव्यवस्था (लो कॉस्ट इकॉनॉमी) यावर भर देणार्‍या समाजवादी दु:साहसाच्या वाटेवर देशाला ढकलले नसते, भारताला आर्थिक झेप घेण्याचा अनुभव कितीतरी आधी घेता आला असता, अशी ठाम मांडणी शरद जोशींनी या पुस्तकातून केली आहे.


13. पोशिंद्यांची लोकशाही


शरद जोशींवर व्यक्तिश: आणि शेतकरी संघटनेवर सगळ्यांत जास्त टीका त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे करण्यात आली. खरे तर, सटाणा येथील पहिल्या अधिवेशनात अतिशय स्पष्टपणे राजकीय ठराव पारित करण्यात आला होता. निवडणुका लढवण्यापासून विविध पक्षांना पाठींबा देण्यापर्यंत, निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यापासून ते स्वतंत्र आघाडी तयार करण्यापर्यंत सर्व पर्याय शेतकरी संघटनेने खुल ठेवले होते; पण हे समजून न घेता टीका करण्यात आली. शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका शरद जोशींनी वेळोवेळी स्पष्ट केली होती. फक्त राजकीय पक्ष म्हणूनच नव्हे, तर देशाची राजकीय परिस्थिती यावरही त्यांनी विवेचन केलेले आहे. 1990 पासूनचे त्यांचे हे विवेचन या पुस्तकात 39 लेखांमधून मांडले गेले आहे. 1994 मध्ये स्थापन केलेल्या स्वतंत्र भारत पक्षाचा सहा भागांतील जाहीरनामाही या पुस्तकात समाविष्ट आहे.  इ.स. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे विश्‍लेषणही त्यांनी केले होते. संपुआने चालवलेला भाई-भाई वाद देशाला विनाशाकडे नेईल, असा इशारा शरद जोशींनी दिला आहे. गेल्या अडीच वर्षांत गोंधळात सापडलेले मनमोहन सिंग यांचे नेतृत्व बघता शरद जोशींनी केलेले भाष्य किती दूरदृष्टीचे आहे हे लक्षात येते.
शेतकरी संघटनेने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पाठिंबा दिलेला होता. ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली; पण हा पाठिंबा भाजपच्या धार्मिक आणि जातीय दृष्टीकोनाला नसून त्यांनी स्वीकारलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाला होता. वाजपेयी सरकारच्या शेवटच्या काळात दिसलेला दोन आकडी विकासदर पाहता हा पाठिंबा किती योग्य होता याची प्रचिती आज येते. अर्थमंत्री म्हणून मुक्त अर्थव्यवस्था भारतात आणण्याचं श्रेय घेणारे आणि राबवणारे मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून नेमकी उलटी भूमिका घेतात हे मोठं अनाकलनीय आहे, ज्यामुळे देश परत गर्तेत अडकत चालला आहे. शरद जोशींच्या राजकीय विश्‍लेषणातून हे स्पष्टपणे जाणवतं, त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका ही धरसोडीची नसून एका विशिष्ट धोरणाचा पाठपुरावा करणारी होती, हे त्यांचे 20 वर्षांतले लिखाण एकत्र वाचून लक्षात येते.

14. ‘भारता’साठी


‘इंडिया’ आणि ‘भारत’ ही मांडणी मोठ्या प्रभावीपणाने शरद जोशी यांनी अगदी 1981 सालीच केली होती. आता सगळे सर्रास हा शब्दप्रयोग करू लागले आहेत. आंदोलन आणि राजकीय भूमिका वगळता इतर सामाजिक प्रश्नांबाबत मग तो राखीव जागांचा प्रश्न असो, किल्लारीचा भूकंप असो, स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव असो, की विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत - अशा कितीतरी प्रश्नांवर सडेतोडपणे आपले मुद्दे शरद जोशी यांनी मांडले आहेत. सरकारी नोकर्‍या कमी होत आहेत. त्यामुळे राखीव जागांना फारसा अर्थ उरत नाही; पण हे समजून न घेता. राखीव जागांचे समर्थन करणारे आक्रस्ताळी भाषा बोलत राहतात. जाती-जमातींचा प्रश्न खर्‍या अर्थाने सुटावा ही इच्छा सवर्णांना तर नाहीच; पण वेगवेगळ्या जातीच्या पुढार्‍यांनाही नाही. मुळातली इंडियाची लुटालुटीची व्यवस्था कायम ठेवून त्या व्यवस्थेची जी काही शितं आहेत. त्यातील जास्तीत जास्त आपल्या हाती कशी पडतील, असा सगळेजण प्रयत्न करत आहेत. अशी वेगळी मांडणी राखीव जागांच्या प्रश्नावर शरद जोशींनी केली आहे. आणि हे स्पष्टपणे लिहिण्याचं धाडसही मंडल आयोगाच्या काळात 1990 सालीच केले आहे.
तेलंगणा, उत्तर प्रदेशचे विभाजन, वेगळा विदर्भ या विषयांवर मोठी चर्चा सध्या चालू आहे. तीव्र आंदोलनं होत आहेत. विदर्भाच्या प्रश्नावरती शरद जोशींनी फार आधीच आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना छोट्या राज्यांची कल्पना उचलून धरली होती. ‘बळीराज्य मराठवाडा’ या लेखात या छोट्या राज्यांचं शासन कसं असावं, याच्या कल्पनाही त्यांनी मांडून ठेवल्या होत्या. आज या प्रश्नावर डोकी फोडून घेणार्‍यांनी हे सगळं वाचायला हवं.
मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर ‘मुंबईकर, मुंग्या आणि मधमाश्या’ असा एक सुंदर लेख त्यांनी लिहिला. मुस्लिमांना इशारा देताना- सर्व अल्पसंख्याक समाजाची ऐतिहासिक ख्याती आहे की, त्यांना लोकशाहीच्या तंत्राने चालता येत नाही. याउलट हिंदुस्थानात मात्र मुसलमान राष्ट्राध्यक्ष, शीख पंतप्रधान आणि ख्रिश्चन कॉंग्रेस अध्यक्षा अशी सहिष्णुता उघडपणे नांदते. अल्पसंख्याकांचा कडवेपणा आणि बहुसंख्य समाजाची सहिष्णुता हे एकमेकांत सहज मिसळणारे नाहीत. याला उत्तर काय? याला उत्तर एकच आहे- स्वातंत्र्य आणि स्वतंत्र विचार ही एकमेव गुरुकिल्ली आहे. मुस्लिम समाजाला अशा पद्धतीने कोणीही संबोधले नाही. मुस्लिमांबाबत आणि त्यांच्या उद्योजकतेबाबत लिहिताना- ‘... एका तर्‍हेने उद्योजकतेला लागणारे गुण मुस्लिम समाजाने आपल्या अंगी बाणवले आहेत. या गुणांचा उपयाग नव्या येणार्‍या खुल्या व्यवस्थेमध्ये त्यांना आर्थिक, सामाजिक, राजकीय उन्नती करून देण्याकरिता करता येईल; पण त्याच गुणांचा उपयोग रुढीनिष्ठ समाजांना मजबुती देत देत आणि सगळ्या जगाविरुद्ध भांडण करत करत केला तर सगळ्या जगभर पसरलेल्या मुसलमानांचे आणि आजही अनेक शोषित समाजांना ज्याचे आकर्षण वाटते, त्या इस्लामचे भविष्य काही फारसे उज्ज्वल राहणार नाही.’

आपले विचार स्पष्टपणे ओघवत्या शैलीत सोप्या पद्धतीने मांडणे हे शरद जोशींचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष शेतकरी आंदोलन असो, अर्थशास्त्र असो, राखीव जागांचा प्रश्न असो, की जग बदलणार्‍या पुस्तकांविषयी केलेले विश्‍लेषण असो, सामान्य वाचकांना आपल्या बरोबर ते सहज घेऊन जातात. ‘अंगारमळा’मध्ये त्यांच्या लेखणीचे लालित्य उत्कटतेने प्रत्ययाला येते. स्वतंत्रतेची मांडणी करणारे त्यांचे लिखाण हा अभ्यासाचा विषय ठरावा. प्रत्यक्ष चळवळीत राहून एवढ्या मोठ्या प्रमाणात वैचारिक लिखाण करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. आपल्याकडे विचारवंतांनी प्रत्यक्ष चळवळींमध्ये सहभाग नोंदवला नाही, विचारवंत आणि चळवळीचा नेता असा दुर्मिळ योग शरद जोशींच्या या लिखाणातून पाहायला मिळतो. आपला विचार तर ते स्पष्टपणे आणि कुठेही तडजोड न करता अगदी आधीपासून मांडतच आहेत; पण त्याचसोबत अशिक्षित अशा प्रचंड मोठ्या शेतकरी समुदायाचे प्रबोधनही ते करत आहेत. त्यांची जाहीर सभांतील भाषणं असोत, की कार्यकारिणी बैठकांतील भाषणं असोत, छोटे लेख असोत, की समाजसेवेसारख्या विषयाची केलेली सविस्तर मांडणी असो सगळ्यांमधून विचारवंत, संघर्षशील जननायकाची प्रतिमा सामान्य वाचकाच्या मनात ठसते.

Thursday, February 12, 2015

समग्र शरद जोशी प्रकल्पाच्या निमित्ताने



शरद जोशींच्या वयाला 3 सप्टेंबर 2011 रोजी 76 वर्षे पूर्ण होऊन 77 वे वर्ष सुरू झाले आहे. त्यांच्या या 76 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आठवतो आहे तो त्यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा आणि त्या निमित्ताने माझ्या प्रकाशनाने हाती घेतलेला व पूर्णत्वास नेलेला समग्र शरद जोशी प्रकल्प.

शरद जोशी त्यांचा वाढदिवस साजरा करीत नाहीत. त्या निमित्त एखादा कार्यक्रम ठेवला तर त्याला नकारच देतात हे माहित होते. त्यांची पुस्तकं मी हळू हळू प्रकाशित करीत होतो. त्यांना पंच्च्याहत्तरावे वर्ष लागते आहे हे लक्षात आल्यावर काय कार्यक्रम आखावा हे माझ्या डोक्यात घोळत होते. प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे सरांनी यावर चांगला मार्ग सांगितला. तिथीप्रमाणे त्यांचा जन्म ऋषीपंचमीचा आहे. ही तारीख 2009 मध्ये होती 24 ऑगस्ट. औरंगाबादला शेतकरी संघटनेच्या कार्यकारीणीच्या निमित्ताने ते येणारच होते. तेंव्हा 24 ला त्यांच्या एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन ठेवले तर त्याला शरद जोशी नकार देणार नाहीत. मग मी तसा घाट घातला. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित करण्याची तयारी केली.

शरद जोशींचे ‘स्वातंत्र्य का नासले?’ हे पुस्तक मी 1998 मध्येच प्रकाशित करून माझ्या प्रकाशनाला सुरवात केली होती. पण तेंव्हा मी पूर्णवेळ प्रकाशक म्हणून काम करत नव्हतो. त्यांची याच नावाची लेखमाला पाक्षिक शेतकरी संघटक मध्ये छापून आली तेंव्हा मला नितांत आवडली होती. इतकंच काय माझ्यावर तिचा आजही विलक्षण वैचारिक प्रभाव आहे. याचं पुस्तक करा असा लकडा मी म्हात्रे सरांच्या मागे लावला. म्हात्रे सर मोठे वस्ताद! त्यांनी ‘‘आता तुमच्या सारख्या तरूणांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे.’’ म्हणत माझे दात माझ्याच घशात घातले. मला आनंद तर वाटलाच पण ‘‘शरद जोशी परवानगी देतील का?’’ असं मी भीत भीत म्हात्रे सरांनाच विचारलं. सरांनीही परत उलट मलाच ‘‘त्यांनी परवानगी दिली. तू छापतोस का?’’ म्हणत मला परत टोलावलं. आणि अमरावती येथे साजर्‍या झालेल्या जनसंसदेच्या भव्य कार्यक्रमात ते पुस्तक मी माझ्या प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध केलं. सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन यांने त्यासाठी अतिशय सुंदर मृखपृष्ठ करून दिलं होतं.

शेतकरी संघटक मधून प्रसिद्ध झालेले मुक्त अर्थव्यवस्थेविषयक लेख मला अतिशय आवडले होेते. त्याचंही एक चांगलं पुस्तक होऊ शकेल असं मला वाटलं. एव्हाना मी ‘जनशक्ती वाचक चळवळ’ नावानं पुस्तकांचा व्यवसाय पूर्णवेळ सुरू केला होता. मग प्रकाशनालाही तेच नाव ठेवायचं ठरवलं.‘‘खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने’’ या नावाने हे पुस्तक नोव्हेंबर 2003 प्रसिद्ध केलं. सोबत शेतकरी संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रे असलेलं माझ्या वडिलांचं (ऍड. अनंत उमरीकर) यांचं ‘वेडेपीर’ हे  पुस्तकही प्रकाशित केलं.

शेतकरी संघटनेचा कार्यक्रम असला की आम्ही पुस्तकांचे गठ्ठे घेऊन विक्रीला बसायचो. सोबत संघटनेचे बिल्ले, संघटनेत लोकप्रिय असलेले कवी इंद्रजीत भालेराव यांचे कवितासंग्रह,  तसेच शेतकरी प्रकाशनाची जुनी पुस्तकंही असायची. शरद जोशींचं सगळंच वाङ्मय प्रकाशित करावं असं मला मनापासून वाटायला लागलं. कार्यकर्ते कार्यक्रमाची वेळी ही भावना वेळोवेळी व्यक्त करायचे. शरद जोशींनी आत्मचरित्रात्मक काही लेख साप्ताहिक ग्यानबा मध्ये लिहीले होते. आपल्या आईचं, बाबुलाल परदेशीचं, शंकरराव वाघांचं अशी काही व्यक्तिचित्रं फार उत्तम लिहीली होती. विद्यार्थ्यांना लिहीलेलं पत्रही ललित साहित्याचा एक उत्तम नमुनाच. हा सगळा मजकूर एकत्र करून त्याचं एक पुस्तक करावं असं ठरवलं. प्रा. इंद्रजित भालेराव यांनी तर या पुस्तकासाठी मागे लकडाच लावला. ‘अंगारमळा’ या नावानं हे पुस्तक त्यांच्या वाढदिवशी 3 सप्टेंबर 2008 ला मी प्रसिद्ध केलं. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ वाङ्मय निर्मितीचा प्रथम पुरस्कारही मिळाला.

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जे पुस्तक सगळ्यात लोकप्रिय होतं ते शरद जोशींचं ‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’. त्या पुस्तकाचे पुनर्मुद्रणही अंगारमळा नंतर लगेच नोव्हेंबर 2008 मध्ये औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या 11 व्या अधिवेशनात केलं. आत्तापर्यंत त्यांची चार पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. या पार्श्वभूमीवर पंच्याहत्तरीचा सोहळा घेण्याचं ठरलं. आता त्यांचं जुनं पुस्तक ‘प्रचलित अर्थव्यवस्थेेवर नवा प्रकाश’ (पूर्वी दोन भागात असलेलं) आणि ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी’ यांची तयारी आम्ही केली. शेतकर्‍याचा आसुड शतकाचा मुजरा, शेतकरी कामगार पक्ष एक अवलोकन आणि जातीयवादाचा भस्मासुर या तीन छोट्या पुस्तिका ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी’ मध्येच समाविष्ट केल्या. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्या हस्ते शरद जोशींचा सत्कार केला. इंद्रजित भालेराव यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. अतिशय मनोज्ञ असं भाषण शरद जोशींनी या प्रसंगी केलं.

शरद जोशींची एकूण सहा पुस्तकं आतापर्यंत झाली होती. त्यांचं यापूर्वी ग्रंथरूपात प्रकाशित झालेलं सर्व लिखाण आता पुनर्मृमुद्रित झालं. पण शिल्लक लिखाणाचं काय? त्याची वर्गवारी कशी करायची? त्याचं स्वरूप कसं ठेवायचं हाच यक्ष प्रश्‍न होता. औरंगाबादच्या याच कार्यक्रमात महिला आघाडिच्या नेत्या सौ. शैलजा देशपांडे यांनी एक बाड माझ्या हाती दिलं. शरद जोशी यांनी दै. देशोन्नती मध्ये ‘जग बदलणारी पुस्तके’ या नावानं लेखमाला लिहीली होती. त्याचे मुळ लेख असलेलं ते बाड शैलाताईंनी बर्‍याच वर्षांपासून जपून ठेवलं होतं. याचं पुस्तक करा असा त्यांचा प्रेमळ आग्रह. मला ते लेख फारच आवडले. मी आधी ते वाचलेलेच नव्हते. अधाशीसारखं ते बाड मी वाचून काढलं. याच दरम्यान सातारा भुषण पुरस्कार शरद जोशींना जाहिर झाला. त्या कार्यक्रमात 9 जानेवारी 2010 ला हे पुस्तक प्रकाशित होईल असं नियोजन मी केलं. त्याचवेळी इंद्रजित भालेराव यांचे शरद जोशींवरचे आणि त्यांच्या पुस्तकावरचे लेख एकत्र करून ‘मळ्यातील अंगार’ या नावानं पुस्तकही प्रकाशित करण्याचं ठरवलं. विजय कुवळेवकरांच्या हस्ते ही दोन्ही पुस्तके सातार्‍याला त्या कार्यक्रमात प्रकाशित झाली.

दै. लोकमतमध्ये ‘अन्वयार्थ’ या नावानं शरद जोशींनी लेखमाला चालविली होती. 1992-94 तसेच इ.स. 2000-01 या काळातील हे लेख प्रसिद्ध झाले होते. त्याचं पुस्तक आधी करा असं स्वत: जोशींनीच सुचवलं. मी त्या दृष्टिनं काम चालू केलं होतं. मध्यंतरीच्या काळात आपल्या खासदारकीच्या निधीतून त्यांनी परभणीच्या गणेश वाचनालय या संस्थेस 10 लाख रूपये दिले होते. त्या निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचं काम पूर्ण होत आलं होतं. त्याच्या उद्घाटनासाठी शरद जोशींनी यावं असा संस्थाचालकांना वाटत होतं. पण शरद जोशी परभणीच्या कार्यकर्त्यांवर काही कारणानं नाराज होते. ते काही परभणीला यायला तयार नव्हते. माझ्या वडिलांनी मला पुस्तक प्रकाशनाचं निमित्त करून त्यांना बोलावू असं सुचवलं. ‘अंगारमळा’ पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला त्या समारंभासाठी शरद जोशी जाणार नव्हते. मी तो पुरस्कार, रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह सगळं त्यांना द्यायला अंबेठाणला गेलो. त्यांचा मुड चांगला बघून हळूच परभणीला यायचं पिल्लू सोडून दिलं. ‘अन्वयार्थ’ चं प्रकाशन असेल तर येतो अशी त्यांनी अट घातली. मी हो म्हणून तारिखही ठरवून टाकली. मला परत औरंगाबादला आल्यावर लक्षात आलं की मजकूर फारच मोठा झालेला आहे. इतका मजकूर एका पुस्तकात मावणं शक्य नाही. तेंव्हा दोन खंड करावे लागतील. पण आता माघार घेणं शक्य नाही. मग अन्वयार्थ-1 आणि अन्वयार्थ-2 अशी दोन पुस्तकं (382 व 320 पृष्ठांची) तयार झाली.

या सगळ्यातून शरद जोशींचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्याच्या हालचाली शेतकरी संघटना, त्यांचे हितचिंतक सगळ्याकडून सुरू झाल्या. त्याला बघता बघता गती आली. 6 जुनला औरंगाबाद येथे साहित्य मेळावा, 2 ऑक्टोबरला रावेरीला महिला मेळावा आणि 10 नोव्हेंबरला शेगाव येथे शेतकरी महामेळावा असा कार्यक्रमाचा तपशिलही अंतिम ठरला.  ही बैठक परभणीला गणेश वाचनालयाच्या त्याच सभागृहात संपन्न झाली. त्या बैठकीनंतर माझ्या मात्र पोटात गोळा उठला. कारण मला याच कालावधीत उरलेलं लिखाण प्रकाशित करावयाचं होतं. आणि लेखांची फाईल तर अवाढव्य झाली ेाती. 1990 पर्यंतचं त्यांचं लिखाण सुरेशचंद्र म्हात्रे यांनी ग्रंथबद्ध केलं होतं. त्याचं पुनर्मुद्रण ‘शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती’, ‘प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश’ आणि ‘शेतकर्‍यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख’ या तीन पुस्तकातून आम्ही पूर्ण केलं होतं.

लेखांची अवाढव्य कात्रणं लावता लावता त्यांच्या भाषणांचा एक विभाग वेगळा होऊ शकतो असं लक्षात आलं. खुल्या अधिवेशनातील, विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीतील, सभांमधील ही भाषणं होती. मग त्यांना एकत्रित केलं. पुस्तकाला नावही ‘माझ्या शेतकरी भावांना मायबहिणींनो’ असं समर्पक दिलं. कारण हेच संबोधन शरद जोशी नेहमी वापरतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चांदवडच्या ऐतिहासिक अधिवेशनातील भाषण करतानाचा शरद जोशींचा फोटो जशाच तसा वापरला. आणि अक्षरंही कवीमित्र दासू वैद्य याच्या हस्ताक्षरात करून घेतली. या पुस्तका सोबतच विजय परूळकरांचे शरद जोशींवरचे गाजलेलं पुस्तक ‘योद्धा शेतकरी’ची आवृत्तीही प्रकाशित केली.

शरद जोशींनी शेतकरी आंदोलनविषयक जे लिखाण केलं होतं त्याचं संकलन ‘बळीचे राज्य येणार आहे’ या नावानं केलं. भारत आणि इंडिया ही मांडणी शरद जोशींनी पहिल्यांदा केली आणि रूजवली. शेतकरी आंदोलन विषयक लिखाणाशिवाय जे लिखाण होतं त्याचं संकलन ‘‘भारता’साठी’ याच नावानं कर असं महापारेषणमधील माझा अभियंता मित्र शशांक जेवळीकर याने सुचवलं.अर्थ संकल्पावर दरवर्षी एक लेख ते जरूर लिहायचे. त्या संकलनास ‘अर्थ तो सांगतो पुन्हा’ हे नाव दिलं. मिलिंद बोकिल यांनी विनोबा भावेंच्या पुस्तकाला ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ हे नाव दिलं होतं. त्यावरून मला हे नाव सुचलं. राजकीय लेखांचं संकलन करताना त्याला काय नाव द्यावं हे कळत नव्हतं. त्यांच्या लेखात ‘पोशिंद्यांची लोकशाही’ हा शब्द सापडला. आणि तेच नाव मला योग्य वाटलं.

चांदवडचं महिला अधिवेशन ही एक प्रचंडच मोठी ऐतिहासिक घटना. त्यावेळी ‘चांदवडची शिदोरी’ नावानं एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. त्याचं लिखाण इतर महिला कार्यकर्त्यांच्या मदतीनं शरद जोशींनीच केलं होतं. त्या नंतरचे या प्रश्नावरचे लेख एकत्र करून त्याच नावानं हे पुस्तक रावेरीच्या महिला मेळाव्यात सिद्ध केलं.

10 नोव्हेंबरला शेगाव येथे शरद जोशींच्या अमृत महोत्सवानिमित्त शेतकरी महामेळावा आयोजिला होता. शरद जोशी येतात का नाही ही शंका सगळ्यांनाच होती. पण ते हजर राहिले. त्यांनी सत्कार स्वीकारला नाही. पण वयोवृद्ध शेतकर्‍याच्या हस्ते मानपत्र स्विकारले. तरूण कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रकल्पातील शेवटची दोन पुस्तके ‘पोशिंद्यांची लोकशाही’ व ‘भारता’साठी प्रकाशित करण्यात आली. लाखो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत ही पुस्तके प्रकाशित झाली. मी स्वत: मंचावर कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत होतो. आपण योजिलेला प्रकल्प पुर्ण झालेला पाहताना मला भरून आलं. बोलणंच सुचेना. वाटलं आपल्याला माईक सोडून बाजूला व्हावं लागतं की काय. पण काहीसं कठोरपणे स्वत:ला आवरलं. आणि कार्यक्रम पुढे चालू केला.

माझ्यावर शेतकरी संघटनेच्या आंदोलन, सभांपेक्षा, शरद जोशींच्या भाषणांपेक्षा त्यांच्या लिखाणानं विलक्षण प्रभाव पाडला आहे. माझ्या वयाच्या 14 व्या वर्षी माझ्या घरात ‘शेतकरी संघटक’ हे पाक्षिक यायला लागले. तेंव्हापासून मी शरद जोशींच्या लिखाणाने पागल झालो. प्रत्यक्षात त्यांचं भाषण दहा वर्षांनी मी ऐकलं. दहा वर्षांनी प्रत्यक्ष सभांना जायला लागलो.

राष्ट्रिय कृषी निती नावानं एक छोटी पुस्तिका शरद जोशींनी लिहीली होती. व्हि.पी.सिंहांच्या काळातील कृषि समितीचा तो अहवाल होतो. त्यानंतर वाजपेयी सरकारच्या काळातील कृषि कार्यदलाचाही एक अहवाल आहे. या दोन्हीचं पुस्तक मराठीत करणं शिल्लक आहे.

शेतकरी संघटना : आठवणी, आस्था, अपेक्षा आणि आक्षेप नावाचं एक पुस्तक सध्या मी संपादित करतो आहे. शरद जोशींवर-शेतकरी संघटनेवर विविध मान्यवरांनी, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं लिखाण या निमित्तानं संपादित करून ते पुस्तक रूपानं आणण्याची योजना आहे. सदा डुंबरे व राजू परूळेकर यांनी घेतलेल्या शरद जोशींच्या मुलाखतींचाही यात समावेश आहे. चतुरंग प्रतिष्ठानने शरद जोशींना जीवनगौरव पुरस्कार जाहिर केला आहे. त्या सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा मानस आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द.ना.धनागरे, विजय कुवळेकर, मिलिंद मुरूगकर, दत्तप्रसाद दाभोळकर, सतिष कामत, भानू काळे, विद्युत भागवत, हेरंब कुलकर्णी, कथाकार आसाराम लोमटे या मान्यवरांचे लेख यात आहेत. चंद्रकांत वानखेडे, तुकाराम निरगुडे, अमर हबीब, राजीव बसर्गेकर, रमेश चिल्ले, बाबुलाल परदेशी या कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या आठवणी यात घेतल्या आहेत.

शरद जोशींच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचं समग्र साहित्य अभ्यासकांसाठी उपलब्ध असतांना एकच अपेक्षा आहे की या साहित्याचा किमान अभ्यास न करता कुणी या चळवळीवर टीका करू नये.



Wednesday, January 14, 2015

अभंग वाचकनिशी : हिंदी गाण्यांची सुमार निवड



अभंग पुस्तकालयाच्या वतीने गेल्यावर्षीपासून ‘वाचकनिशी’ असा अभिनव उपक्रम राबविला जातो. यावर्षी ही वाचकनिशी चित्रपट या विषयाला वाहिलेली आहे. यात 104 राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय चित्रपट आणि 52 हिंदीचित्रपट गीते यांची माहिती दिली आहे. 104 चित्रपटांची निवड, त्यांच्यावर टिपणे लिहीणे ही जबाबदारी गणेश मतकरी यांनी उचलली आहे. त्यांचा अधिकार मोठाच आहे. नुकत्याच आलेल्या मौज दिवाळी अंकात त्यांनी भारतीय सिनेमावर एक चांगला परिसंवाद घेवून महत्त्वाचे लिखाण केले व इतरांकडून करवून घेतले आहे. मला स्वत:ला आंतरराष्ट्रीय चित्रपटाबद्दल फारसे ज्ञान नाही शिवाय बहुतांश चित्रपट पहाण्यातही आले नाहीत परिणामी त्याबद्दल कुठलीच टिपणी मी करू शकत नाही.

पण या वाचकनिशीतील 52 गाण्यांबाबत मात्र तिव्र असमाधान जाणवले. हिंदी चित्रपट गीतांचे साधारणत: चार टप्पे पडतात. पार्श्वगायना विकास होण्यापूर्वीचा 1949 पर्यंतचा पहिला टप्पा. 1949 ते 1965 हा हिंदी गाण्यांचे सुवर्णयुग असलेला दुसरा टप्पा. 1966 ते 1987 पर्यंतचा तिसरा टप्पा यातील गाणी सुमार आहेत. 1988 च्या कयामत से कयामत पासून 2003 पर्यंतचा चौथा टप्पा. पाचवा टप्पा ज्याची जडण घडण अजून चालू आहे. यावरचे आक्षेप असे 

1. या वाचकनिशीत पहिल्या टप्प्यातील दोनच गाणी निवडली आहेत. सैगलचे गाणे असणे अपरिहार्यच आहे आणि ते आहेही. पण सोबतच गायक अभिनेत्री म्हणून गाजलेल्या नुरजहा व सुरैय्या यांचे किमान एक एक तरी गाणे हवे होते. त्याऐवजी केवळ एकाच चित्रपटामूळे गाजलेल्या जेमतेम एकाच गाण्याची धनी असलेल्या उमादेवी (टूनटून) यांचे ‘अफसाना लिख रही हू’ हे गाणे घेतले आहे. त्याचे औचित्य काय?

2. दुसर्‍या टप्प्यातील  गाणी 32 आहेत आणि ते बरोबरही आहे कारण हाच संगीताचा सुवर्णकाळ होय. पण पार्श्वगायिका म्हणून पहिल्यांदा जिला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली त्या शमशाद बेगमचे एकही गाणे न घेण्याचे काय कारण? तूलनेने अतिशय थोडी गाणी गायलेल्या मुबारक बेगम यांचे हमारी याद आयेगी हे गाणे घेतले आहे. याच काळात सुमन कल्याणपूर, महेंद्र कपुर यांची छोटी पण महत्त्वाची कामगिरी आहे. त्यांचे एकही गाणे कसे नाही?

3. तिसर्‍या टप्प्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि लोकप्रिय संगीतकार म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल. हिंदी चित्रपट सृष्टीत सगळ्यात जास्त काळ टिकलेली, सगळ्यात जास्त चित्रपटांना संगीतबद्ध केलेली अशी ही जोडी. त्यांचे एकही गाणे यात नसू नये याला काय म्हणायचे. याच काळात शैलेंद्रसिंग, येसूदास यांनी आपली छोटी कारकीर्द गाजवली. अतिशय थोड्या चित्रपटात गायन केलेल्या गझल गायक जगजित सिंग यांचे गाणे घेतले पण वरील दोघांची गाणी का नाही घेतला आली? 

4. 1988 ते 2007 इतक्या मोठ्या काळात हिंदी चित्रपट संगीतात मोठे परिवर्तन झाले. 1998 मध्ये कयामत से कयामत मधून आनंद मिलींद, आशिकी मधून नदीम श्रवण आणि रोझा मधून ए.आर. रेहमान यांनी हिंदी गाण्यांचा बाज पूर्णपणे बदलून टाकला. परत एकदा माधुर्य हा हिंदी गाण्यांचा स्थायी भाव बनला. याची काहीसुद्धा खबर संपादकांना नाही का? या काळातील एकही गाणे घेण्याचे सुचले नाही. मग या काळातील अलका याज्ञिक, साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, उदीत नारायण, कुमार सानू, सोनू निगम, अभिजीत अशा गायकांबद्दल बोलायचे काही कामच ठेवले नाही.

5. कोहीनूर, कागज के फुल या चित्रपटांतील दोन दोन गाणी निवडली आहेत पण कित्येक चांगले महत्त्वाचे चित्रपट यातून सुटले आहे. लताचे योगदान मोठेच आहे म्हणून तिची 17 गाणी समजू शकतो पण गीताची मात्र दोन गाणी निवडली आहेत. आशा भोसलेची चारच गाणी आहेत. रफीची 13 आणि 70 नंतर महत्त्वाचा आवाज असलेल्या किशोरची मात्र 6 च गाणी. हे काय गौडबंगाल आहे? नौशाद, सचिनदेव बर्मन, शंकर-जयकिशन यांची सहा सहा गाणी निवडताना सी.रामचंद्र आणि ओ.पी.नय्यर यांची दोन दोनच गाणी निवडून का अन्याय केला?
गाण्याची निवड करण्यात मर्यादा पडतात हे खरे आहे. पण सर्वसमावेशक करण्याचा निदान प्रयत्न केला असता तर हेतू शुद्ध आहे हे तरी सिद्ध झाले असते. अनेक अवीट गोडीची द्वंद्वगीते आसताना यात केवळ ७च  निवडली आहेत. ही निवड निव्वळ सुमार पद्धतीने आणि कुठलाही विचार न करता सरधोपटपणे केली आहे. यात कुठलेही सुत्र नाही. काळाप्रमाणे क्रम लावलेला नाही. संगीताचा विकास किंवा अधोगती असा काही विचार झाला नाही. गीतकारांची प्रतिभा विचारात घेतलेली नाही.

अनकही चित्रपटांतील भिमसेन जोशी यांनी गायलेली तुलसीदासांची रचना घेतली आहे. पण चित्रपटाचे व संगीतकाराचे नाव चुक पडले आहे. गाण्यावरील लेखात उल्लेख बरोबर आहे. ही कदाचित तांत्रिक चुक असावी. संपादकीयात चित्रपटांबद्दल लिहीले आहे पण गाण्याबद्दल गाण्याच्या निवडीबद्दल काहीच लिहीले नाही. लोकप्रिय चित्रपटांचा यात समावेश नाही असे म्हणताना मोगल-ए-आझम चे नाव आहे. आणि प्रत्यक्षात मोगल ए आझम ची माहिती आतमध्ये आहे. अशा काही बेफिकीरीमुळे झालेल्या चुकाही यात आहेत.
   
गायक आणि संगीतकार यांच्यावर आता बर्‍यापैकी अभ्यास करून कित्येक जणांनी मांडणी केली आहे. मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजीमध्ये हे सगळे सविस्तरपणे आले आहे. असे असताना एक सुमार निवड लोकांच्या माथी मारून काय मिळवले? मागच्या वर्षी याच वाचकनिशीवर टिका केली तेंव्हा पुढच्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून काढूत असे आश्वासन संपादक-प्रकाशकांनी दिले होते. या वर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रटांच्या आघाडीवर दर्जा सांभाळत असताना हिंदी गाण्यांच्या बाबतीत इतका कमअस्सलपणा का दाखविला गेला हे कळत नाही. मराठवाड्यात अशी सुमार दर्जाची कामे होतात आणि परत आम्ही मराठवाडा मागे म्हणून रडगाणे गात बसतो. अनुशेष शिल्लक राहिला म्हणून बोंब मारतो. बुद्धीचा प्रतिभेचा हा जो अनुशेष आपण निर्माण करतो तो भरून काढायचा कधी?


अभंग वाचकनिशी 2015
गाणे                                             कवी गायक           संगीतकार चित्रपट इ.स.

1. बाबूल मोरा नैहर छूटो ही जाय-    वाजीद अली सैगल रायचंद बोराल स्ट्रीट सिंगर     38
2. जिंदगी भर नही भूलेंगे              साहिर रफी रोशन                            बरसात की रात   57
3. ये जिंदगी उसी की है                  राजेंद्रकृष्ण लता सी रामचंद्र                      अनारकली      53
4. बिछडे सभी बारी बारी                 कैफी आजमी रफी एसडी बर्मन                    कागज के फुल      59
5. वक्त ने किया क्या हसी सितम कैफी आजमी गीता एसडी बर्मन कागज के फुल      59
6. जाने वो कैसे लोग थे जिनके साहिर हेमंत एसडी बर्मन प्यासा      57
7. प्यार किया तो डरना क्या शकिल लता नौशाद मुगल-ए-आझम 60
8. दो सितारों का जमी पर शकिल लता/रफी          नौशाद कोहीनूर   60
9. मधुबन मे राशिका नाचे रे            शकिल रफी नौशाद कोहीनूर    60
10.ए मालिक तेरे बंदे हम भरत व्यास लता वसंत देसाई दो आंखे बारा हात 57
11. अभी ना जावो छोडकर साहिर अशा/रफी        जयदेव हम दोनो 61
12. आपकी नजरो ने समझा             राजा मे.अली लता मदनमोहन अनपढ 62
13. ए मेरे दिल की और चल              शैलेंद्र                       तलत शंकर जयकिशन  दाग         52
14. अजीब दास्तां है ये                    शैलेंद्र                        लता शंकर जयकिशन दिल अपना और.60
15. रात भी है कुछ                          साहिर                        लता जयदेव मुझे जीने दो 63
16. जो वादा किया वो                       साहिर                       लता/रफी रोशन ताजमहल 63  
17. कई बार यूं भी देखा                     योगेश                       मुकेश सलील चौधरी रजनीगंधा 74

18. दिल चीज क्या है                       शहरयार                    आशा खय्याम उमराव जान 81
19. शाम ए गम की कसम                  मजरूह                    तलत खय्याम फूटपाथ 53
20. लागा चुनरी मे दाग                     साहिर                      मन्ना रोशन दिल ही तो है 63
21. वो शाम कुछ अजीब थी                गुलजार                     किशोर हेमंत कुमार  खामोशी 69
22. कर चले हम फिदा                       कैफी                        रफी                  मदनमोहन हकिकत 64
23. तेरे बिना जिंदगीसे कोई                गुलजार                   लता/किशोर आरडी बर्मन आंधी 75
24. मेरा कुछ सामान                          गुलजार आशा आरडी बर्मन इजाजत 87
25. मेरे मेहबूब तुझे मेरी शकिल रफी                 नौशाद मेरे मेहबूब 63
26. एक बगल मे चांद होगा पियूष मिश्रा पियूष मिश्रा स्नेहा खानविलकर  ग्यॅग्ज ऑफ वासेपूर  12
27. आवोगे जब तूम ओ                      इर्शाद कामिल राशीद खा        संदेश शांडिल्य जब वी मेट 07
28. चलते चलते मुझे कोई कैफी                         लता                 गुलाम मोहम्मद  पाकिजा 71
29. चोदहवी का चांद हो शकिल रफी                 रवी चौदहवी का चांद 60
30. उडे जब जब जुल्फे तेरी साहिर आशा/रफी ओ.पी. नय्यर नया दौर 57
31. चाहे कोई मुझे जंगली कहे शैलेंद्र रफी                   शंकर जयकिशन  जंगली         61
32. अफसाना लिख रही हू                   शकिल                        उमादेवी             नौशाद                                 दर्द        47
33. कभी तनहाई मे                            केदार शर्मा                  मुबारक बेगम    स्नेहल भाटकर                    हमारी याद आयेगी  61
34. कांटो से खींच के ये आंचल             शैलेंद्र                           लता                 एसडी बर्मन                        गाईड   65
35. दिल आज शायर                           नीरज                           किशोर             एसडी बर्मन                        गॅम्बलर  71
36. दोस्त दोस्त ना रहा                       शैलेंद्र                            मुकेश               
शंकर जयकिशन                   संगम 64
37. कभी कभी मेरे दिल मे                   साहिर                           मुकेश             खय्याम                               कभी कभी 76
38. रसिक बलमा                                हसरत                           लता                 
शंकर जयकिशन                   चोरी चोरी 56
39. दुनिया बनाने वाले                        हसरत                           मुकेश              
शंकर जयकिशन                    तिसरी कसम 66
40. ओ सजना बरखा बहार                  शैलेंद्र                             लता               सलील चौधरी                       परख 60
41. लग जा गले                                  राजा मे.अली                  लता               मदनमोहन                          वह कौन थी 64
42. कही दूर जब दिन ढल जाये            योगेश                            मुकेश            सलील चौधरी                        आनंद 78
43 ए दिल है मुश्किल है                       मजरूह                          रफी/गीता       ओ.पी.                                   सीआयडी 56
44. रूप तेरा मस्ताना                          आनंद बक्षी                     किशोर           एसडी बर्मन                            आराधना 69
45. कोई ये कैसे बताए                        कैफी                               जगजीत         जगजीत                                 अर्थ 83
46. रघुवीर तुमको मेरी लाज              तुलसीदास                       भीमसेन          जयदेव                                   अनकही 78
47. यू हसरतों के दाग                         राजेंद्रकृष्ण                      लता               मदनमोहन                            अदालत 58
48. जीवन से भरी तेरी आंखे                इंदिवर                           किशोर            कल्याणजी आनंदजी               सफर 70
49. खै के पान बनारसवाला                 अंजान                            किशोर             
कल्याणजी आनंदजी               डॉन 78
50. दर्द दिलों के कम हो जाते              समीर अंजान                  मो.इरफान      हिमेश रे.                                 द एक्सोपोज 14
51. तू गंगा की मौज मै                       शकिल                            लता/रफी        नौशाद                                    बैजू बावरा 52
52. धीरे से आजा रे अखियन मे           राजेंद्रकृष्ण                     लता               सी रामचंद्र                              अलबेला 51
       


०००००

मागील वर्षी जी वाचाकनिशी प्रकाशित झाली होती तिच्यावरवचे  माझे आक्षेप इथे देतो आहे. म्हणजे सातत्याने कशी सुमार कामे चालतात याचा अंदाज यावा....

वाचकनिशीच्या संपादनातील संपादकाच्या डुलक्या

मराठी वाचकांना समृद्ध करण्यासाठी  अभंग पुस्तकालय नांदेड यांनी ‘अभंग वाचकनिशी 2014’ या नावाने एक दैनंदिनी प्रसिद्ध केली आहे. त्याची जाहिरात करण्यात पैसा कशाला घाला म्हणून प्रकाशकांनी क्लृप्ती लढवित महत्त्वाच्या दैनिकांत त्यावर लेख छापून आणले आहेत. त्यांच्यावर स्वत:चेच पुस्तक कसे काय निवडले असा आरोप करताच आपल्या संपादन कौशल्याचे समर्थन त्यांनी केले. असे असेल तर त्यांनी खालील प्रश्नांची उत्तरे त्यांच्या वाचकांना द्यावीत.
जी.ए.कुलकर्णी यांची दोन पुस्तके काजळमाया व पिंगळावेळ त्यांनी शिफारस म्हणून दिलेली आहेत. यापेक्षा जी.ए.च्या निवडक कथांचे पुस्तक डोहकाळीमा, (संपा. म.द.हातकणंगलेकर) त्यांनी का नाही दिलं? पु.ल.देशपांडे यांची दोन पुस्तके ‘व्यक्ति आणि वल्ली’ व ‘जावे त्यांच्या देशा’ निवडली आहेत. मग ‘पु.ल.एक साठवण’ संपा. जयवंत दळवी हे पुस्तक निवडता आले नसते का?  तसेच श्री.दा.पानवलकर यांचे एका नृत्याचा जन्म, इंदिरा संत यांचे गर्भ रेशिम, बोरकरांची समग्र कविता, नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता, ना.धो.महानोर यांच्या रानातल्या कविता या सर्व पुस्तकांपेक्षा या लेखकांच्या निवडक साहित्याची जी पुस्तके मान्यवरांच्या विस्तृत प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाली आहेत. ती देणं सं.भा.जो. यांनी का टाळले?
बरं दुसरीकडे रसयात्रा-कुसुमाग्रज, सुहृदगाथा-पु.शि.रेगे, सर्वोत्तम रविंद्र पिंगे, राजेंद्र बनहट्टी यांच्या निवडक दीर्घकथा, निवडक ठणठणपाळ ही निवडक साहित्याची पुस्तके त्यांनी निवडली आहेत.
बरीच पुस्तके निवडायची राहून गेली असं म्हणणारे सं.भा.जो. यांच्याकडून स्वत:चे पुस्तक मात्र ‘राहून गेले’ असं करत नाहीत. जी पुस्तके निवडली नाहीत किंवा जी निवडली त्यांचे निकष काय हा तर कायमच विवाद्य विषय असतो. आणि त्यावर वाद हे होतीलच. पण जे काम समोर आले आहे त्यातील हे जे दोष संपादनाचे आहेत त्याची पावती कुणाच्या नावे फाडायची?
या 104 पुस्तकांमध्ये सर्वच फक्त आठच पुस्तके पुण्या-मुुंबई बाहेरची आहेत.  नागिण -चारूता सागर, तणकट- राजन गवस (साकेत औरंगाबाद), रंग माझा वेगळा-सुरेश भट (साहित्य प्रसाद केंद्र नागपुर), ऑर्फियस-दिलीप चित्रे, भर चौकातील अरण्यरूदन- रंगनाथ पठारे, चाळेगत-प्रविण बांदेकर (शब्दालय श्रीरामपुर), बहिणाबाईंची गाणी-बहिणाबाई चौधरी (सुचित्रा प्रकाशन जळगांव). पुण्या-मुंबई खेरीच उर्वरीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर हैदराबाद सारख्या ठिकाणी जे काही प्रकाशनाचे काम चालते ते इतके दुय्यम आहे की त्याची दखलही घेवू नये?  


 
 

Thursday, December 18, 2014

खासगी वाहनांचा ‘डिसीज’ झालेले ‘मर्सिडिज’चे शहर


लोकसत्ता वर्धापनदिन पुरवणी शुक्रवार १२ डिसेंबर २०१४ 

एका झोपडपट्टीतील चिंचोळा रस्ता. जवळचा कमी गर्दीचा मार्ग म्हणून त्या रस्त्याने निघालो तर रस्त्यात जेवण समारंभ चाललेला. सार्वजनिक गणपती महोत्सवाचा तो भंडारा होता. त्यासाठी सगळा रस्ता अडवला गेलेला. त्रासून मनात म्हणालो साला या लोकांना अक्कलच नाही. सगळा रस्ताच अडवतात. काही दिवसांनी एका उच्चभ्रू वस्तीतून जात होतो. रस्ता बर्‍यापैकी मोठा. पण दोन्ही बाजूंना लोकांनी मोठमोठ्या चारचाकी गाड्या पार्क करून ठेवलेल्या. एक अलिशान कार आली आणि सगळी रहदारीच थांबली. कोणी गाडी मागे घ्यावी? आणि कशी घ्यावी? दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी शेवटी तो रस्ता मोकळा करून घ्यावा लागला. झोपडपट्टीतील लोकांनी रस्ता अडवला त्यासाठी सार्वजनिक कारणतरी होते. तेवढे संपले की मग रस्ता परत मोकळा तरी होतो. पण हे उच्चशिक्षीत, जास्त पैसे कमावणारे भल्यामोठ्या गाड्या घेवून आपल्याच घरासमोरचा रस्ता कायम अडवून ठेवणार याला काय म्हणायचे? जास्त पैसा कमावताना सार्वजनिक प्रश्नांबाबतची अक्कल कमावायची विसरतात की काय माणसे?

दिडशे मर्सिडिज या शहरात एकाचवेळी खरेदी झाल्या म्हणून मोठी बातमी झाली. सगळीकडे चर्चा झाली. पण कांही दिवसांतच यातील फोलपणा लक्षात आला. कारण या गाड्या रस्त्यांवर दिसेनात. आपल्या आपल्या गॅरेजमध्ये बंद झाल्या. मालकांनी दुसर्‍या लहान गाड्या बाहेर काढल्या. कारण या गाड्या चालवाव्यात असे रस्तेच आमच्याकडे नाहीत. धरण बांधावे आणि कालवा मात्र बांधल्या जावू नये. मग धरणातील पाण्याचे जे व्हावे ते या मर्सिडिजचे झाले. मर्सिडिजच नाही तर सगळ्या मोठ्या चारचाकी गाड्यांचे हेच हाल आहेत. जानेवारी 2012 मध्ये मोठ्या धाडसाने पुरूषोत्तम भापकर यांनी गुलमंडीवरील अतिक्रमणांवर हातोडा घातला. भर गुलमंडीवरील रस्ता रूंद झाला. पण हा आनंद काही काळच टिकला. रस्त्याचे रूंदीकरण झाले, रस्त्याचे काम पूर्ण झाले की लगेच या रस्त्याला दुचाकी वाहनांचा असा काही फास पडला की आता परत हा रस्ता जूना होता तितकाच वाहतुकीसाठी शिल्लक आहे.

एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आणि दुसरीकडे याच काळात दुचाकी/चारचाकी वाहनांचा पूर औरंगाबाद शहरात येत गेला. 1987 ला औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळी विद्यापीठ-चिकलठाणा, रेल्वेस्टेशन-सिडको-हडको-बसस्टँड-रेल्वेस्टेशन, जवाहर कॉलनी-औरंगपूरा-बेगमपुरा, शाहगंज-औरंगपुरा-रेल्वेस्टेशन अशी लांबलांबची अंतरे बसने पार करणे सहज शक्य होते. विशेषत: म्हातारी माणसे, लहान मुले यांना ही मोठी वाहने सोयीची आणि सुरक्षीत होती. माझ्या आजीची मोठी बहिण अक्का मावशी नावाची सत्तरीपर्यंत मोठ्या आत्मविश्वासाने हातात एक छोटी कापडाची पिशवी घेवून बसने शहरभर फिरायची. तिला बसचे वेळापत्रकही पाठ होते. आज सत्तरीची कुठली म्हातारी या शहरात एकट्याने आत्मविश्वासाने फिरू शकते?

औरंगाबाद शहराची मुख्य वाहतुकवाहिनी म्हणजे जालना रोड. त्यावर अफाट वाहतूक वाढली म्हणून त्याला समांतर रस्ता वेदांत हॉटेल-पीरबाजार-दर्गा-सुतगिरणी चौक असा आणि दुसरा समांतर रस्ता वरद गणेश-सावरकर चौक-सिल्लेखाना-मोंढा-कैलासनगर स्मशान-एमजीएम असा प्रस्तावित आहे. पण आजही यांची कामं पूर्ण झाली नाहीत. शिवाय जालना रोडवर तीन पुलांचे काम एकाचवेळी चालू आहे.

शहरातील ऍटोरिक्शा ही एकेकाळी भरवश्याची वाहन व्यवस्था होती. त्यांची संख्या जवळपास पंचेवीस हजार आहे. यातील जवळपास सतरा हजार ऍटो नियमित स्वरूपाचे ज्यांनी लायसन काढले आहे, ज्यांच्या रिक्क्षांना मीटर आहे अशा आहेत. पण मोठ्या रस्त्यांवर धावणार्‍या सहा आसनी कित्येक रिक्क्षा या अवैध आहेत. त्यांना मीटर नाहीत. प्रवाशांची सुरक्षा हा तर विषयच विचारात घेतला जात नाही. दुसरा काही पर्याय नसल्यामुळे या धावत्या छळपिंजर्‍यांतून सामान्य लोक प्रवास करतात.

रस्त्यांच्या प्रश्नांवर काम करताना ऍटोरिक्क्षांना खराब रस्त्यांचा जास्त त्रास होतो म्हणून त्यांच्या संघटनांशी संपर्क केला. तेंव्हा लक्षात आले की अवैध रिक्क्षांच्या प्रश्नांवर सगळ्यात संताप या नियमाने चालणार्‍या रिक्क्षाचालकांमध्ये आहे. कारण त्यांना याचा जास्त त्रास होतो. त्यांनी वारंवार प्रशासनाला वाहतुकीच्या शिस्तीबद्दल जाणीव करून दिली. नियमांचा आग्रह धरला पण पोलिस यंत्रणाच यावर उदासीनता दाखवते असा आरोप या रिक्क्षचालकांनी केला.
अजून एक समस्या आपण निर्माण करून ठेवली आहे. ज्या ज्या सार्वजनिक खुल्या जागा शाळांसाठी उपलब्ध होत्या त्या त्या जागी धार्मिक किंवा इतर अतिक्रमण करून जागा व्यापून टाकल्या. आता शाळांसाठी मध्यवस्तीत जागाच उपलब्ध नाहीत. परिणामी रोज सकाळी शहरांतून बाहेर जाणार्‍या आणि दुपारी बाहेरून शहरांत येणार्‍या पिवळ्या बसेसची  एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. या मोठ्या बस जेंव्हा छोट्या रस्त्यांवरून जातात तेंव्हा पूर्णच रस्ता व्यापला जातो. परिणामी दुसर्‍या वाहनांना जायला जागाच उरत नाही. 

भर वस्तीतील जी मंगल कार्यालय आहेत त्यांच्याकडे वाहनतळ नाहीत. परिणामी वाहने सर्रास रस्त्यावर उभी राहतात. छोटे रस्ते अडण्यासाठी तितके कारण पुरे होते. लग्नाची वरात असेल तर मग काही विचारूच नका. मंगल कार्यालये सोडाच पण मोठ मोठी दुकानं, मॉल, दवाखाने यांच्याकडेही वाहनांची व्यवस्था नाही.

आज संपूर्ण शहरभर रस्त्यांची पुलांची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. रस्ता रूंदीकरण केला पण विजेचे खांब रस्त्याच्या मध्यभागी तसेच आहेत. आज सगळ्यांत पहिल्यांदा स्थानिक आणीबाणी घोषित करून महानगरपालिका बरखास्त केली पाहिजे. बाकी आर्थिक शिस्त वगैरे लावता येईल तो वेगळा विषय. पण वाहतुकीच्या बाबतीत म्हणावे तर मुख्य रस्त्यांची कामे तातडीने हाती घेवून पूर्णत्वास नेली पाहिजेत. रेल्वेस्टेशन, वाळूज, सिडको बस स्टँड, टिव्ही सेंटर, बस स्टँड, शहागंज, औरंगपुरा, जवाहर कॉलनी, शिवाजी नगर, देवळाई रोड, सातारा, पैठण रोड, बेगमपुरा, विद्यापीठ, चिकलठाणा अशी महत्त्वाची जास्त गर्दीची ठिकाणं शोधून यांच्यादरम्यान बस वाहतूक कार्यक्षमतेने कुशलतेने चालविली गेली पाहिजे. दौलताबाद, रेल्वे स्टेशन, पीर बाजार, मुकूंदवाडी, चिकलठाणा अशी लोकल रेल्वे सुरू केली पाहिजे. जे रेल्वेचे रूळ आहेत त्यांना समांतर ही दुसरी लाईन टाकल्या गेली पाहिजे. 

सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरक्षित नियमित झाली तर खासगी वाहनांचा वापर कमी होतो हे जगभर वारंवार सिद्ध झाले आहे. कितीही तोटा झाला तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जपलीच पाहिजे कारण खासगी वाहनांचा जो खर्च होतो तो कधीही जास्तच आसतो. 

ज्यांच्याकडे पैसे जास्त होते त्यांनी मोठ्या गाड्या घेवून आणि ज्यांच्याकडे कमी होते त्यांनी दोनचाकी गाड्या घेवून वाहतुकीची कोंडी करण्यात हातभार लावला. शहराची लोकसंख्या तिप्पट वाढली, वाहनांची संख्या पाचपट वाढली आणि रस्ते मात्र जराही वाढत नाहीत.

दिडशे मर्सिडिजच्या रत्नांचा हार घालणारे हे महानगर म्हणजे खरूज झालेले अंग झाकून त्यावर झगझगीत कपडे घालून एखाद्या बाईने गळ्यात मात्र हिर्‍यांचा हार घालावा तसे दिसते आहे.   
  

श्रीकांत अनंत उमरीकर

Monday, December 8, 2014

कशासाठी शेतकरी मुख्यमंत्र्याच्या दारी ?


लोकमत मंथन पुरवणी रविवार 7 डिसेंबर 2014

सत्ता ही शेतकर्‍याच्या विरोधातच असावी असा काहीतरी दुर्दैवी योग सध्या भारतात आणि महाराष्ट्रात जुळून आलेला दिसतो आहे. ‘शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण’ अशी घोषणा देत 35 वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेची सुरवात झाली. तेंव्हा खरे तर जनता पक्षाची राजवट होती. व्यापारमंत्री मोहन धारिया ज्या पुण्याचे त्याच पुण्याजवळ चाकणला शेतकर्‍यांच्या कांदा आंदोलनाला सुरवात झाली. पुढच्या काळात कॉंग्रेसचे सरकार फार काळ सत्तेवर असल्यामुळे शेतकरी संघटनेचे आंदोलन म्हणजे कॉंग्रेसविरोधी आंदोलन असा आरोप केला गेला. प्रत्यक्षात दिल्लीतील सत्तेच्या घावूक ठेकेदारांनी पंतप्रधान कोणीही असो शेतकरी विरोधीनितीच राबविली हे आता सिद्ध झाले आहे.

मोदी सरकार सत्तेत येवून सहा महिने उलटून गेले. महाराष्ट्रातील सरकारलाही महिना उलटून गेला. जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती यांनी पोळलेल्या शेतकर्‍याला दिलासा देण्याचे धोरण काही दिसेना. म्हणून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ही चर्चा समाधानकारक न ठरल्याने 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या नागपुर येथील घरासमोर ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला. पोलिसांनी सदर आंदोलनाला परवानगी नाकारली. सविनय कायदेभंग करून हे आंदोलन झाले. पोलिसांनी निदर्शकांना अटक केली. 

आजही शेतकर्‍यांना आंदोलन का करावे लागते? नेमक्या काय मागण्या शेतकरी संघटनेच्या आहेत? 
गेली 35 वर्षे सतत शेतकरी संघटना शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लढते आहे. भीक नको हवे घामाचे दाम ही तर संघटनेची मूळ घोषणाच आहे. उत्पादन खर्चावर आधारीत शेतीमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे हा एक कलमी कार्यक्रम संघटनेने दिला. याच्या नेमके उलट काय वाटेल ते होवो पण भाव मिळू देणार नाही असे सरकारी धोरण राहिले. बाकी सगळ्या भीकमाग्या धोरणांचा सरकारने पुरस्कार केला. खतांना अनुदान देतो, वीजबीलात सुट देतो, फुकट वीज देतो, पीकविम्याचे संरक्षण देतो, आयकर माफ करतोे, अधूनमधून अर्धवट का होईना कर्जमाफी देतो. पण शेतमालाला भाव मात्र देत नाही. 

आज शेतकरी जी मागणी करतो आहे ती अशी. 
1. शेतीमालाच्या व्यापारावरील सर्व बंधने तात्काळ उठविली पाहिजेत.
2. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकर्‍याला मिळाले पाहिजे. उदा. आधुनिक जनुकीय बियाणे (जी.एम.) वापरायला मिळाले पाहिजे. 
3. बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे सर्व शेतमालाची बाजारपेठच सडून गेली आहे. इतर कुठल्याही क्षेत्रात अशी शासकीय व्यवस्था नसताना केवळ शेतमालाच्या बाबतच का उभारण्यात आली? इतकेच नाही तर शेतकर्‍याने स्वत:चा माल स्वत:च पाठीवर वाहून गोदामात नेऊन टाकला तरी हमाल मापाडी संघटनांच्या दबावाखाली हमाली कापून घेण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली. विशिष्ट मंडईतच माल विकण्याची सक्ती शेतकर्‍यांना करण्यात आली. ही व्यवस्था अजूनही आधुनिक तंत्रज्ञानापासून कोसो मैल दूर आहे. मालाचे योग्य मोजमाप, साठवणुकीसाठी चांगली गोदामे शीतगृहे, मालाची वर्गवारी करण्याची यंत्रणा असे काही काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी केले नाही. 

एका राज्यातून दुसर्‍या राज्यात शेतमाल विक्रीवर बंधने लादली गेली. महाराष्ट्रात कापूस एकाधिकार योजना होती. त्या काळी शेजारच्या आंध्रप्रदेशात जर कापसाचे भाव जास्त राहिले तर इथला कापूस बाहेर जायचा आणि इथले भाव वाढले तर बाहेरचा कापूस महाराष्ट्रात यायचा. हा सगळा उद्योग पोलिसांना हप्ता देवूनच करावा लागायचा. परिणामी काळाबाजार बोकाळला. आंध्रप्रदेशातील तांदूळ महाराष्ट्रात असाच गैरमार्गाने यायचा. हे सगळे टाळण्यासाठी देशांतर्गत शेतमालाची बाजारपेठ खुली असावी. या बाजारपेठेत शासकीय हस्तक्षेत किमान असावा. खुली स्पर्धा राहिली तर त्याचा फायदा शेतकर्‍यांना तसेच सामान्य ग्राहकालाही मिळेल.

दुसरा मुद्दा शेतकरी संघटनेने मांडला होता तो म्हणजे तंत्रज्ञान स्वातंत्र्याचा. नुकतीच ज्यावर मोठी चर्चा आणि वादंग होत आहेत तो विषय म्हणजे बी.टी.वांगे. जगभरात गेली 15 वर्षे बी.टी. बियाणे वापरले जात आहे. आपल्या शेजारच्या बांग्लादेशात बी.टी.वांगे गेली तीन वर्षे पिकत आहेत. चोरट्या मार्गाने ते भारतात प्रवेशलेही आहे. मग असं असताना नेमके काय कारण आहे की या बियाण्याला भारतात अधिकृतरित्या परवानगी मिळत नाही? बी.टी. कापसाबाबत असाच अपप्रचार दहा वर्षांपूर्वी करण्यात आला. 2003 मध्ये शेवटी या बियाण्याला परवानगी मिळाली. आज भारत कापसाच्या बाबतीत जगभरात एक क्रमांकाचा निर्यातदार देश बनला ते केवळ बी.टी. कापसाच्या बियाण्यामुळे. मग असे असताना या बियाण्याला एकेकाळी का विरोध केला गेला? नेमके कुणाचे हितसंबंध यात अडकले होते? पुरोगामी चळवळीतील असलेले शेतकर्‍याच्या पोटी जन्मलेले उत्तर प्रदेशातील अजीत सिंग या काळात कृषी मंत्री होते. त्यांनी पैसे घेतल्या शिवाय या बियाण्याला परवानगीच दिली नाही असा आरोप त्या काळात केल्या गेला. 

शेतकर्‍याला तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य हवे आहे. यातील शास्त्रीय भाग जो काही असेल तो शास्त्राज्ञांनी तपासून त्यावर अहवाल द्यावा. शेतकरी तो मानायला तयार आहेत. ज्यांना विज्ञान कळत नाही त्या जी.एम.विरोधी चळवळ करणार्‍यांचा अडाणीपणा शेतकर्‍यांच्या हिताआड येतो आहे.

बाजारपेठेचे स्वातंत्र्य मागताना देशांतर्गत बाजारपेठ खुली असावी ही तर मागणी आहेच पण आंतराष्ट्रीय बाजारपेठही शेतमालासाठी खुली असावी अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेची राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगला दर मिळत असताना भारतात निर्यातबंदी लादल्या गेली. कारण काय तर कापडउद्योगाला कापूस स्वस्त उपलब्ध असला पाहिजे. तामिळनाडूचे मुरासोली मारन तेंव्हा वस्त्रउद्योग मंत्री होते. त्यांच्या स्वत:चा मोठा कापडउद्योग आहे. निर्यातबंदीमुळे कापसाचे भाव कोसळले. परिणामी शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. 

शेतकरी सध्या आंदोलन करतो आहे ते संपूर्ण कर्जमुक्ती साठी. कारण बाजारात तेजी असताना शासनाने शेतकर्‍याला भाव मिळू दिला नाही. परिणामी तो त्याचे कर्ज फेडू शकला नाही. शेतकर्‍याचे कर्ज हे सरकारचे पाप आहे. त्यामुळे कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका शेतकरी संघटनेची आहे. 
बाजार जर खुला झाला तर स्वत:चे हित साधाण्यास शेतकरी सक्षम आहे. कितीही प्रयत्न केले तरी कष्टकरी शेतकर्‍याची जागा घ्यायला शेतात राबायला कोणीच मिळत नाही हे सत्य आहे. जागतिकीकरणाच्या काळात शेतकर्‍यांना भिती घातल्या गेली होती की या शेतकर्‍याचे काही खरे नाही. पण कापसाच्या एका मोठ्या उदाहरणावरून शेतकर्‍यांनी हे सिद्ध केले आहे की त्यांच्या हाती आधुनिक तंत्रज्ञान लाभले, बाजाराचे स्वातंत्र्य लाभले की ते काय चमत्कार करू शकतात. 

तेंव्हा मुख्यमंत्र्याच्या दारासमोर ठिय्या देवून बसलेले शेतकरी एकच मागची मनाचा हिय्या करून करत आहे की आमच्या प्रगतीच्या मार्गातील तूम्ही धोंड अहात. तूम्ही आमच्या छातीवरून उठा. 
   
श्रीकांत अनंत उमरीकर 

Tuesday, December 2, 2014

जी.एम.बियाणे : कशासाठी विरोधाचे तुणतुणे !


                         उरूस, मंगळवार 2 डिसेंबर 2014 

उत्तर रामायणातील गोष्ट आहे. एक धोबी आपल्या बायकोला घराबाहेर काढताना म्हणतो, ‘परक्या पुरूषाच्या सहवासात तू राहिली आहेस. माझ्या घरातून चालती हो. परक्या पुरूषासोबत राहूनही बायकोला घरात ठेवायला मी काही राजा राम नाही.’ हे बोलणे रामाचे सैनिक ऐकतात आणि रामाला जाऊन सांगतात. लोकांमधील या अफवेचा विचार करून राम सीतेचा त्याग करतो. पुढील भाग सगळ्यांना माहित आहे.

खरं तर कुठलीही चौकशी न करता, सत्य काय आहे हे न तपासता विरोध करणे ही आपली एकप्रकारे विकृतीच आहे. सीता रावणाने पळवली यात सीतेचा काय दोष? रावणाने तिच्या चारित्र्याला धक्का लावला नाही तरी तिच्यावर संशय घायला लोक तयार. सध्या सीतेसारखीच आवस्था जी.एम.तंत्रज्ञानाची झाली आहे. जी.एम. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे. खरे तर हे तंत्रज्ञान आहे. बियाणे ओळखले जाते ते बी.टी. या लोकप्रिय नावाने. 

हे बीटी बियाणे काय आहे? हे तयार करण्याचे तंत्रज्ञान काय? त्यामागचे विज्ञान काय? याचा काहीही विचार न करता अजूनही रामायणातील धोब्याच्या मानसिकतेत वावरणारे लोक या सगळ्याला विरोध करत आहे. ऑक्टोबर महिन्यात राहूरी कृषी विद्यापीठात या प्रश्नावर विरोध आणि समर्थन अशी दोन्ही बाजूंनी एकाचवेळी निदर्शने झाली. शेतकरी संघटनेने या तंत्रज्ञानाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या पीकांच्या चाचण्या शास्त्रज्ञांनी कराव्यात. त्यातून जे काही सत्य बाहेर येईल त्याप्रमाणे शासनाने भूमिका घ्यावी. ही पीके मानवी आरोग्यास धोकादायक असतील तर त्यावर बंदी घालावी आणि तसे नसेल तर त्यांचा खुला वापर करण्यास शेतकर्‍यांना परवानगी द्यावी. अशी हि स्वच्छ भूमिका शेतकर्‍यांची आहे. गंमत म्हणजे विरोध करणार्‍या डाव्या समाजवादी पर्यावरणवादी झोळणेवाल्यांनी विरोधाचे कुठलेही शास्त्रीय कारण दिले नाही. इतकेच नाही तर या पिकांच्या चाचण्यांवरही दहा वर्षे बंदी घालावी अशी अशास्त्रीय मागणी केली आहे. हे बरे झाले की सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यावर या बियाण्यांच्या चाचण्यांना कुठलाही अडथळा नाही असे केंद्र शासनाने स्पष्ट केले. 

खरं तर हा प्रश्न कुठल्याही चळवळीच्या आखत्यारीतील नाही. हा पूर्णपणे शास्त्रीय विषय आहे. शास्त्रज्ञांनी त्यावर अभ्यास करून अहवाल द्यावा. आणि त्या अनुषंगाने या विषयावर शासनाने निर्णय घ्यावा. यात ज्यांचा अभ्यास नाही अशा लोकांचा संबंध येतोच कुठे?

हा विरोध कधी सुरू झाला? बीटी बियाणे वांग्यात येणार म्हटल्यावर वादावादिला सुरवात झाली. ज्यांचा शेतीशी संबंध नाही किंवा ज्यांनी कधी शेती समजूनही घेतली नाही ते डावे-समाजवादी-पर्यावरणवादी यांनी असे मांडायला सुरवात केली की कापसात बीटी आले त्यालाही आमचा विरोध होता.  पण वांगे म्हणजे अन्नपदार्थ. त्यात बीटी आले तर आम्ही खपवून घेणार नाही. एका शेतकर्‍याला मी हे विचारल्यावर तो हसायला लागला. म्हणाला,
‘‘साहेब कापसाचा आणि अन्नाचा संबंध नाही असं तूम्हाला म्हणायचं आहे का? ’’
मी आपले अज्ञानापोटी "हो" म्हणालो.
तो म्हणाला, ‘‘साहेब, कापसाची जी सरकी असते त्याचे तेल निघते. ते तेल खाद्यपदार्थात वापरले जाते. सरकीची जी पेंड निघते ती पेंड जनावरे खातात. त्या जनावरांचे दूध तूम्ही पिता. मग कापसाचा आणि खाद्यपदार्थाचा संबंध नाही हे कसे?’’

शेतकर्‍याने केलेली मांडणी बीनतोड होती. दहा वर्षांपूर्वी शेतकर्‍यांनी मोठा लढा देवून बी.टी.कापसाचे बियाणे आपल्या शेतात पेरले. गेली दहा वर्षे त्याचे फायदे समोर दिसत आहेत. एकेकाळी कापसाची आयात करणारा हा भारत देश केवळ बीटी कापसामुळे जगातील एक नंबरचा निर्यातदार देश या वर्षी सिद्ध झाला. एकरी जेमतेम पन्नास किलोपर्यंत आलेला कापसाचा उतारा आता हजार किलोपर्यंत गेला आहे. महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या शेतात पहिल्यांदा 2003 साली बीटी कापूस लावला ते अकोला जिल्ह्यातील अकोटचे शेतकरी विजय इंगळे यांनी बीटीमुळे प्रत्यक्ष काय फायदा झाला, उत्पन्न किती वाढले हे  आकडेवारीने सिद्ध करून दाखवले आहे.

या विषयावर सामान्य माणसांचा उडालेला गोंधळ नाहीसा करावा म्हणून साखर डायरीचे संपादक, शेतकरी  चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अजीत नरदे यांनी जयसिंगपूर येथे ‘जी.एम.अभ्यास शिबीरा’चे आयोजन केले होते. त्यात इंगळे यांनी आपले अनुभव मांडले. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी विद्यापीठातील अभ्यासक शास्त्रज्ञ, पत्रकार, लेखक, शेतकरी, चळवळीतील कार्यकर्ते अशा 45 जणांनी यात सहभाग नोंदवला होता. शास्त्रज्ञांनी या विषयाची शास्त्रीय बाजू उलगडून दाखवली. जी बाब शास्त्रज्ञांना किंवा कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही लक्षात आली नव्हती त्यांची माहिती शेतकर्‍यांनी दिली. उदा. बीटी कापसाच्या शेतात कापसाबरोबर जी तूर घेतली जाते तीच्या उत्पन्नात झालेली वाढ. याचा कुणी विचारच केला नव्हता. 

जी.एम. पीकांच्या विरोधांत भूमिका घेणार्‍यांच्या हे लक्षातच येत नाही की गेली दहा वर्षे भारतात जो कापूस होतो आहे त्यातील 95 टक्के कापूस हा बीटीचाच आहे. या वाणाच्या सरकीचे तेल आपण खाल्ले, या सरकीची पेंड खाणार्‍या जनावरांचे दूध आपल्या पोटात गेले. अजूनही याचे काही दुष्परिणाम झाले आहे असे दिसत नाही. आणि तरी विरोध केला जातो आहे. साधे दुधाचे दहि करायचे म्हटले तरी ती प्रक्रिया जी.एम. तंत्रज्ञानाशी निगडीत आहे. जर तूमचा जीएमला विरोध असेल तर दह्याला विरोध करणार काय? असा प्रश्न समोर ठेवून कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सर्वांना निरूत्तर केले.

गेली 17 वर्षे अमेरिकेत जीएम खाद्यपदार्थ वापरले जात आहेत. ज्या बीटी वांग्यावरून गदारोळ उठला आहे ते वांगे आपल्या शेजारच्या बांग्लादेशातील शेतकर्‍यांची दोन वर्षांपासून वापरायला सुरवात केली आहे. आपल्या रेशन धान्याचा काळाबाजार होतो आणि हे धान्य बांग्लादेशात जाते. आता उलट हे बीटी वांगे बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणात भारतात छुपेपणाने येत आहेत कारण त्या वांग्यावर कीड पडत नाही. उत्पादन जास्त होते.  

सामान्य पटकेवाल्या अडाणी समजल्या जाणार्‍या शेतकर्‍यांनी बीटी कापसाला इतका भरभरून प्रतिसाद का दिला? गुजरातमधील शेतकर्‍यांनी बंदी मोडून हे बियाणे आपल्या शेतात का पेरले? त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे साध्या कापसावर पडणारी बोंडअळी. ही बोंडअळी अतोनात नुकसान करणारी सिद्ध झाल्यावर शेतकर्‍यांनी त्यावर औषधींचा मारा करायला सुरवात केली. एन्डोसल्फान हे औषध बोंडअळीसाठी कित्येक वेळा फवारले. पण ही बोंडअळी जाईना. शेतकर्‍यांत असं म्हटलं जाते, ‘‘एन्डोसल्फान कितीही फवारा बोंडअळी जातच नाही. एकवेळ हेच एन्डोसल्फान पिवून शेतकरी मरतो पण बोंडअळी काही मरत नाही.’’ अशा बिकट परिस्थितीत शेतकर्‍यांच्या हाती बीटी कापसाचे बियाणे आले. त्यावर बोंडअळी बसत नाही. शिवाय उत्पादन कैकपट वाढते हे समजल्यावर त्याने बीटी कापसाचे वाण अटापिटा करून मिळवले व शेतात लावले. गेल्या दहा वर्षातील वाढीव उत्पादनाने आणि शेतकर्‍याच्या नफ्यात वाढ झाल्याने हे आता सिद्धच झाले आहे.  

सध्या जागतिक बाजारात शेतमालाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागतो आहे. स्वाभाविकच त्याचा परिणाम भारतीय शेतीवरही होतो आहे. शेतकरी संघटनेने अशी शास्त्रीय भूमिका घेतली होती की जेंव्हा जागतिक बाजारात तेजी येते त्यावेळी तूम्ही शेतकर्‍याचे हातपाय बांधून ठेवता. त्यावेळी त्याचा फायदा भारतीय शेतकर्‍याला मिळू देत नाहीत.  निर्यातबंदी करून भाव पाडतात. तेंव्हा आता जर मंदी असेल तर शेतकर्‍याचा तोटा भरून काढण्याची जबाबदारी सरकारची आहे. जर सरकारला हे नको वाटत असेल तर मग आधीपासून शेतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण ठरवा. आम्ही आमचा फायदा तोटा काय होईल ते सांभाळून घेवू. 

आज महाराष्ट्रात असे चित्र आहे की शेतकरी मुक्त बाजारपेठ आधुनिक तंत्रज्ञानाची मागणी करतो आहे. कुठलाही भीकमागा कार्यक्रम स्वीकारायला तो तयार नाही. आर्थिक आघाडीवर कंगाल झालेले सरकार शेतकर्‍यांच्या विकासाच्या वाटेवर आडवे उभे आहे. या हस्तक्षेपाच्या धोरणाला धक्का दिल्याशिवाय शेतकरी राहणार नाहीत असेच सध्याचे चित्र आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575