दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 19 ऑगस्ट 2014
संपुर्णसिंग कालरा यांचा जन्म 18 ऑगस्ट 1936 रोजी झेलम जिल्ह्यातील दिना या गावी झाला. हे गाव पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे. फाळणीनंतर हे कुटूंब भारतात स्थलांतरित झाले. अशी माहिती दिली तर तूम्हाला फारसा काहीच बोध होणार नाही. कोणातरी स्थलांतरित शीख कुटूंबातील माणसाची ही माहिती आहे असं तूम्ही समजाल. पण हेच फक्त ‘गुलजार’ एवढं लिहीलं तर तूम्हाला बाकी फारसं काहीच सांगायची गरजच पडणार नाही. ‘गुलजार’ या नावाची मोहिनीच तेवढी जबरदस्त आहे. चित्रपटांची श्रेयनामावली वाचताना संगीत-अमूक ढमूक, गायक- अमूक ढमूक असं वाचता वाचता गीत-गुलजार असं पडद्यावर दिसायचं. मला लहानपणी खुप वेळा असं वाटायचं की गीत आणि गुलजार हे दोन्ही शब्द जोडूनच येतात म्हणजे ते एकच आहेत की काय. त्यामुळे ‘गुलजार’ ला नुसतं गुलजार न समजता मी नेहमीच 'गीत गुलजारच' समजत आलो. लहानपणी झालेली ही चुक नसून खरेच अशी परिस्थिती आहे हे आता मोठेपणी कळत आहे.
बरोबर पन्नास वर्षांपूर्वी बंदिनी चित्रपटात गुलजार नी पहिलं गाणं लिहिले. सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ते गोड गाणं होतं ‘मोरा गोरा अंग लई ले । मोहे श्याम रंग दई दे ॥ याच गाण्यातील शेवटच्या कडव्यात गुलजार यांनी जे लिहून ठेवलं आहे ते आजही हिंदी रसिकांना जसंच्या तसं लागू पडतं. गुलजार ने लिहीलं होतं
कुछ खो दिया है पाईके
कुछ पा लिया गवाईके
कहा ले चला है मनवा
मोहे बावरी बनाईके ॥
ही जी ‘बावरी बनाईके’ अवस्था आहे ती हिंदी गाणी ऐकणार्या रसिकांची गुलजारने करून ठेवली आहे. त्यामुळे गुलजारचेच शब्द घेवून गुलजारला म्हणावेसे वाटते
कहा ले चले हो गुलजार
हमे बावरा बनाईके ॥
खरं तर चित्रपट गीतांमुळे अफाट प्रसिद्धी लाभलेल्या गुलजार यांना आपल्या या यशाचे अतोनात समाधान वाटायला हवे होते. अगदी या पहिल्या गाण्यापासून ते अगदी अलिकडच्या ‘बीडी जलाइले’ पर्यंत लोकप्रियतेचा, व्यावसायिकतेचा गुलजारचा आलेख चढताच राहिला आहे. हिंदी चित्रपटांमधे दर्जेदार प्रतिभावंत गीतकारांची एक मोठी परंपरा आहे. साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र, शकिल बदायुनी, हसरत जयपूरी, राजा मेहंदी अली खान, राजेंद्र कृष्ण, कैफी आझमी. या परंपरेतील शेवटची दोन नावं म्हणजे गुलजार आणि जावेद. त्यानंतर इतके प्रतिभावंत आणि प्रभावशाली गीतकार झाले नाहीत. चित्रपट क्षेत्रात सर्वोच्च समजाला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आत्तापर्यंत 61 जणांना देण्यात आला. त्यात गीतकार असलेले केवळ तीनच आहेत. मजरूह सुलतानपुरी -1993, प्रदीप ('ए मेरे वतन के लोगो' लिहीणारे) 1997 आणि गुलजार-२०१३ .
एवढ्या पुरस्कारानेही गुलजार मधला कवी मात्र अस्वस्थच राहिला. पहिला पुरस्कार पटकावणार्या मजरूह ने दस्तक चित्रपटात अतोनात सुंदर गजल लिहून कलाकाराची वेदना मांडली आहे. मदन मोहन यांची ही रचना लता मंगेशकरने गायली आहे.
हम है मता ऐ कुचा ओ बाजार की तरहा
उठती है हर निगाह खरीददार की तरहा |
गल्लीबोळातील दुकानात मांडून ठेवलेल्या वस्तूंसारखे आम्ही आहोत. कारण प्रत्येक नजर ग्राहक असल्यासारखी आमच्यावर रोखलेली आहे. असं व्यावसायिकतेचं दु:ख मजरूहने मांडलं होतं. गुलजार यांनाही हीच बाब अस्वस्थ करत राहते.
‘जय हो’ गाण्यासाठी जागतिक चित्रपट क्षेत्रातील सर्वात मोठा, प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार गुलजार यांना मिळाला. त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गुलजार यांना निमंत्रित केल्या गेले. त्यासाठी ज्या अटी संयोजकांनी घातल्या होत्या त्या वाचून गुलजार अचंबित झाले. त्या प्रसंगी विशिष्ट प्रकारचे कपडे घालणे (टाय, कोट, बुट) अनिवार्य होते. गुलजारमधला कवी अस्वस्थ झाला. त्यांनी कधीच हे कपडे घातले नव्हते. त्यांनी नम्रपणे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासच नकार दिला. हा पुरस्कार वितरण सोहळा चालू असताना गुलजार आपल्या घरीच दिवाणखान्यात गालिबच्या पुतळ्यापाशी बसून राहिले. याचं कारण म्हणजे व्यावसायिक गीतकार म्हणून प्रसिद्धी पैसा लोकप्रियता मिळाली तरी गुलजार खरे कवी आहे. आपण जे लिहीतो आहोत ते केवळ रसिकांसाठी. त्यानं दाद दिली, दखल घेतली तर ती खरी पावती. तो खरा पुरस्कार. आपल्या एका कवितेत गुलजार यांनी ही भावना फार सोप्या शब्दांत आणि फार परिणामकारकरित्या लिहून ठेवली आहे.
उम्मीद भी है
घबराहट भी है
कि अब लोग क्या कहेगे
और
इससे बडा डर यह है
कही ऐसा ना हो
कि लोग कुछ भी न कहे
गुलजार यांच्या चित्रपट गीतांवर भरपूर लिहील्या गेलं आहे. त्याची दखलही घेतल्या गेली आहे. पटकथा लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी गौरविल्या गेली आहेत. पण कवी म्हणून त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. याचे दु:ख खुद्द गुलजार यांनाही असावे. त्यांचा अगदी अलिकडे प्रकाशित झालेला कविता संग्रह ‘पन्द्रह पाच पचहत्तर’ याची साक्ष आहे. हा संग्रहाचे हस्तलिखीत त्यांनी हिंदीचे प्रसिद्ध कवी समिक्षक अशोक वाजपेयी यांना दाखवले. त्यांनी आक्षेप घेतल्या त्या कविता वगळल्या. अशोक वाजपेयींनी याला छोटीशी प्रस्तावना लिहीली तेंव्हाच हा लोकप्रिय, जागतिक पुरस्कार प्राप्त कवी काहीसा समाधान पावला.
अशोक वाजपेयींनी गुलजार यांच्या कवितेबाबत लिहीलं आहे, ‘गुलजार के यहां बहुत ज्यादा कहने की उतावली नही है । उनका आग्रह उतना ही कहने पर है जितना जरूरी हो, जो सटीक बैठे । गुलजार की कविता, एक बार फिर, हमे यह भरोसा दिलाती है कि आज की दुनिया और समय में कविता हमारे साथ है और अपनी दुनिया की कई सुंदरताऐ, उलझने और बिडम्बनाऐं कविता के सहारे बेहतर समझ सकते है ।’
अशोक वाजपयेंनी या ओळी 2010 मध्ये लिहील्या आहेत. पण काय आश्चर्य या संग्रहात नसलेली आधीची एक गुलजार यांची कविता नेमकी शेवटच्या ओळींशी मिळती जुळती आहे.
कन्धे झुक जाते है जब बोझ से इस लंबे सफर के
हॉंप जाता हूं मैं जब चढते हुऐ तेज चढाने
सांसे रह जाती है जब सीने मे एक गुच्छा-सा हो कर
और लगता है
कि दम टूट ही जायेगा यही पर
एक नन्हीसी मेरी नज्म मेरे सामने आ कर
मुझसे कहती है मेरा हाथ पकड कर
मेरे शायर
ला, मेरे कन्धों पर दख दे
मैं तेरा बोझ उठा लूं ।
गुलजारच्या छोट्याशा ‘नज्म’ने केवळ त्यांचे ओझं उचललं आहे असं नसून समस्त रसिकांचे ओझं आपल्या डोक्यावर उचलून धरलं आहे म्हणून तर हे रूक्ष जगणं सुसह्य आहे. वाढदिवसाच्या गुलजार यांना लाख लाख शुभेच्छा ।
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575