Tuesday, July 15, 2014

अतिक्रमण पाडले । नशीब उजाडले ॥

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 15 जुलै 2014 


कुठलेही अतिक्रमण पाडले की समोर येणारे दृश्य ठराविक प्रकारचे असते. वीटा, दगड, मातीचा ढिग, पत्रे अस्ताव्यस्त पडलेले, लोखंडी चौकटी मोडून पडलेल्या, काही किरकोळ सामान इतस्तत: पसरलेलं. ज्याची ही टपरी असते तो माणूस केविलवाण्या चेहर्‍याने बायका पोरांसह त्या कचर्‍यात काही कामाची वस्तू राहून गेली का ते शोध घेत असतो. त्याची सगळ्यांनाच कीव येत असते. मोठ्या संख्येने बघे भोवती जमलेले. हातावर पोट असणार्‍यांबद्दल सगळ्यांनाच सहानुभूती असते. अशाच एका अतिक्रमणाची ही गोष्ट.

शहराच्या गजबजलेल्या भागात रस्त्याला लागून रिकामी असलेली एक जागा. रिकामी जागा म्हणजे अतिक्रमणाला सुवर्णसंधी. गल्लीतल्या दादाने तिथे लगेच रस्त्याला लागून एक छोटे हॉटेलच रात्रीतून बांधून काढले. त्याला लागून पाच टपर्‍या उभारून घेतल्या. ज्याची जागा होती तो मालक दूरवरच्या दुसर्‍या शहरात राहणारा. त्याने लगेच येवून आक्षेप घेतला. पण अतिक्रमण त्याच्या जागेत नसून त्याची जागा व मुख्य रस्ता यांच्यामध्ये होते. परिणामी त्याची कोणी दखल घेतली नाही. दादाने आजूबाजूच्या टपर्‍या कष्टकर्‍यांना भाड्याने देवून टाकल्या. एका टपरीत कटिंगवाला दळवी होता. जवळपास दुसरा न्हावी नव्हता. त्यामुळे दळवीची गरज सगळ्यांनाच होती. दुसर्‍या टपरीत शांताबाई पोळी भाजी केंद्र चालवायची. विधवा शांताबाई शाळकरी दोन पोरांच्या आधाराने गावाकडून पोटभरण्यासाठी शहरात आली. तिसर्‍या टपरीत दिपकने मोबाईल दुरूस्ती व रिचार्जचे दुकान टाकले. दिपकची परिस्थिती सामान्य. शिक्षण घेत घेत कमाई करणे त्याला भागच होते. मोबाईलची दुरूस्ती येणारा समीर नावाचा दोस्त हाताशी पकडून दिपकने जम बसवला. सरळ स्वभावाच्या व चारित्र्याच्या दिपककडे मुलांसोबतच मुलींचीपण गर्दी जमायला लागली. चहावाला गोरटेला सुरेश चहाची टपरी थाटून बसला होता. अर्धवट शिक्षण झालेल्या सुरेशवर कष्टाचे संस्कार झालेले होते. त्यानं आजूबाजूच्या दुकानदारांना चहा नेवून देण्याची सोय केली. बसल्याजागी चहा मिळण्याची सोय लोकांना फार भावली. शेवटची  टपरी पंक्चरवाल्या हमीदची होती. हमीदचा चुलतभाउ गफूर गावाकडून आला आणि त्यानं आपल्या हाताच्या कौशल्याने पंक्चरच्या टपरीचे रूपांतर छोट्या गॅरेजमध्ये केले. 

ज्या हॉटेलच्या आधाराने ही टपर्‍यांची रांग उभी राहिली त्या गल्लीतल्या दादाला स्वत:ला फार काही जमत नव्हते. एक चांगला स्वयंपाकी त्याने मिळवला आणि आपले हॉटेल त्यालाच चालवायला दिले आणि स्वत: दादागिरी करायला मोकळा झाला. स्वयंपाक्याच्या हातच्या मटनाला चांगली चव होती. त्यानं हाताशी भाकरी करणार्‍या सखुबाईला ठेवलं. त्यांचंही बरं चाललं होतं. अतिक्रमणवाले जेंव्हा जेंव्हा यायचे तेंव्हा तेंव्हा गल्लीतला दादा आपलं राजकीय वजन वापरून त्यांना परत पाठवायचा. 

महापालिकेत दादाची वट होती तोपर्यंत कोणाच्या केसाला धक्का पोचला नाही. मग रस्ता रूंदीकरणाची मोठीच मोहिम निघाली. त्यात अतिक्रमण पाडण्याचा धडाका सुरू झाला. न्यायालयानेही पालिकेला खडसावून जाब विचारला. मग अतिक्रमण पाडण्याची मोहिम कठोरपणे हाती घेणे पालिकेला भाग पडले. दादाच्या विरोधातील गट एव्हाना पालिकेत सत्तारूढ झाला होता. बघता बघता एके दिवशी सगळ्या टपर्‍या उद्ध्वस्त झाल्या. आपले काहीच चालत नाही हे पाहून गल्लीतला दादा गायबच झाला. त्याच्या राजकीय क्षेत्रातील एका दुरच्या नातेवाईकाने त्याला दूसर्‍या राज्यातच नेले आणि तिकडे दादागिरीचे नविन काम दिले. चहावाला सुरेश, कटिंगवाला दळवी, मोबाईलवाला दिपक, पोळीवाली शांताबाई, गॅरेजवाला हमीद व गफूर हे सगळे पोटपाण्याच्या धास्तीने हैराण झाले. काय करावे कोणाला सुचेना. 

समोर परतानी सेठचे सायकलच्या एजन्सीचे मोठे दुकान होते. त्यांच्या पोराची गॅरेजवाल्या गफूरशी दोस्ती. त्याने गफूरला त्याचे हवा भरायचे मशिन आपल्या दुकानात लावायला परवानगी दिली. आपल्या ओट्यावर त्याला जागा दिली. हमीद व गफूरची सोय लागली. पोळीवाल्या शांताबाई मागच्या गल्लीतल्या चौधरी आजी आजोबांकडे स्वयंपाकाला  जायच्या. मुलं बाळं परदेशात असल्यामुळे चौधरी आजीआजोबा एकटेच रहायचे. चौधरी आजींनी आपल्या घरातील अडगळीची खोली रिकामी करून शांताबाईंना दिली. शिवाय त्यांना रहायलाही जागा दिली. शांताबाईंची आता दूरवरच्या रहायच्या जागी जायची रोजची कटकट वाचली. शिवाय पोरांना शाळाही सोयीची झाली. 

मोबाईलवाल्या दिपकला समोरच्या शटरवाल्याने ऑफर दिली. त्याचे दुकान बंदच पडले होते. त्याचे भांडवल गुंतवायची तयारी होती. दिपकने समीरसोबत नविन जागेत दूकान अजून मोठे केले. कटिंगवाल्या दळवीने आतल्या गल्लीत एक शटर मिळवले. आधीची जागा फारच छोटी असल्यामुळे काही करणे शक्य नसायचे. पण आता नविन जागा मोठी आणि चांगली मिळाली. चांगलं उपयुक्त फर्निचर त्यानं करून घेतलं. जागेचे कादगपत्रं असल्याने बँकेने कर्जही दिलं. सुरेशला आजूबाजूच्या दुकानदारांनी पैसे दिले. एक छोटी लोखंडी टपरी करून ती नाल्यावर आत उभी करायला सर्वांनी त्याला मदत केली. अतिक्रमण पाडले आणि ह्या सर्वांचे नशिबाच उजाडले आसे म्हणायची पाळी आली. सर्वांच्या विकासाचे वैध मार्ग खुले झाले.

अतिक्रमण उठविल्यानंतर दोनच महिन्यात पाचही कष्टकर्‍यांना गल्लीने आपल्यात सामावून घेतले. अतिक्रमणाच्या जागेमुळे दुकानदारांना कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. धंदा वाढवायला भांडवल मिळायचे नाही कारण बँका कर्ज द्यायच्या नाहीत. अतिक्रमण कधी पाडले जाईल याची एक टांगती तलवार कायम डोक्यावर असायची. आपण काहीतरी गैर करतो आहोत ही अपराधी भावना मनाला भोकं पाडायची. 

शहरं मोठी झाली तसे त्यांना लागणारे मनुष्यबळ कोठून आणायचे हा प्रश्न निर्माण झाला. गावाकडची माणसे झुंडीझुंडीने शहरात यायला लागली. त्यांना रहायला व्यवसाय करायला जागा नाही. मग काय करायचे? मग ही गरज ओळखून मोकळ्या जागांवर अतिक्रमणं व्हायला लागली. पोटासाठी केलेली अतिक्रमणं आणि हव्यासापोटी सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरून गुंडांनी राजकीय आशिर्वादाने केलेली अतिक्रमणे यात जमिनअस्मानाचा फरक आहे. कॅम्पाकोला आणि नाल्याकाठच्या टपर्‍या यात कायदेशीरदृष्ट्या फरक काहीच नाही. पण नैतिकदृष्ट्या मात्र प्रचंड फरक आहे. ज्याच्याकडे नैतिक बळ असते तो माणूस धैर्याने कुठल्याही परिस्थितीला तोंड देत उभा राहतो. ज्या टपर्‍या हटवल्या गेल्या ते पाचही कष्टकरी कुठेही पळून गेले नाहीत. ते तिथेच उभे ठाकले. पैसे कमावून शिक्षण करणारा दिपक, पोरांना पोसणारी विधवा शांताबाई, कष्टकरी सुरेश, हाती कसब असलेला दळवी, गॅरेजवाला हमीद-गफूर यांचा हेतू जवळपासच्या लोकांना चांगला कळत होता. त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागितली. आणि त्यांना तशी मदत समाजानेही केली. 

आपण सगळे मिळून एक मोठे ढोंग करतो. कॅम्पाकोलासारखी मोठ मोठी अतिक्रमणे जी आपणच करतो/ आपला मुक पाठिंबा असतो/ त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात आपलाच हात असतो. त्यांच्या विरोधात आपण फारसे बोलत नाही. न्यायालयात जावून वर्षानुवर्षे ही अतिक्रमणे वाचविण्याची धडपड सगळेच करत राहतात. आणि शेवटी एखादे  अतिक्रमण पाडावेच लागले की मानवतेबाबत मोठी बोंब होते. पण तेच रस्त्यांच्याकडेचे छोटेसे टपर्‍यांचे अतिक्रमण मात्र तासा दोन तासात जमिनदोस्त केले जाते. शिवाय पाहणारेही ‘‘कायद्याचा धाक असलाच पाहिजे’’ असा टेंभा मिरवतात. पण या टपर्‍या कष्टकर्‍यांच्या असतात ज्यांची आपल्यालाच गरज असते. 

ज्याची निती स्पष्ट । तो उपसे कष्ट । 
बाकी सारे भ्रष्ट । बहु ढोंगी ॥
लाटतो फायदा । तो ओकी गरळ । 
चालतो सरळ । कष्टकरी ॥

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment