Tuesday, July 29, 2014

महायुद्धाची शंभरी आणि बंद पडणारे मॉल

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 29 जुलै 2014 


कोणाला असे वाटू शकेल की महायुद्ध आणि मॉल यांचा काय संबंध. तसा तो वरवर पाहता काहीच नाही. पण खोलवर विचार केला तर यांच्यातील समान धागा लक्षात येतो. पहिले जागतिक महायुद्ध 28 जूलै 1914 ला सुरू झाले. या घटनेला आता बरोबर शंभर वर्ष पूर्ण झाली. आपल्याकडे एखाद्या गोष्टीचे आयुष्य संपले की त्याची शंभरी भरली असे म्हणण्याची पद्धत आहे. शिशूपालाचे शंभर अपराध झाले आणि श्रीकृष्णाने त्याचा वध केला.  त्याप्रमाणेच महायुद्धाची शंभरी भरली याचा अर्थ आता महायुद्ध होणे नाही. 

आपल्याकडे ‘एकदा पाकिस्तानला चांगला धडा शिकवलाच पाहिजे.’ असे मानणारे फार लोक आहेत. चांगला धडा शिकवला पाहिजे म्हणजे त्यांच्यावर युद्ध करून त्यांचे प्रचंड लोक मारले पाहिजेत. अशी समज जगभरात बर्‍याच लोकांची आपसात होती. पहिले महायुद्ध झाल्यावर अतिशय अपमानास्पद अटी जर्मनीवर लादल्या गेल्या. याचा परिणाम इतकाच झाला की हिटलरचा उदय झाला. प्रचंड संहारक असे दुसरे महायुद्ध घडले. जपानवर केलेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर सगळ्या जगालाच हादरा बसला. दुसर्‍या महायुद्धानंतर हाती जे सत्य आले ते फारच विचित्र होते. ते पचवणे सगळ्यांनाच अवघड होवून बसले.महायुद्धानंतर लक्षात आले हे की जो हारला त्याचे तर नुकसान झालेच पण जे विजयी झाले त्यांचेही आर्थिक कंबरडे मोडले. सगळ्या राष्ट्रांना एकच गोष्ट कळून चुकली आणि ती म्हणजे ‘महायुद्ध परवडत नाही’. हे कटू सत्य जगाने पचविले. आणि तातडीने पहिले काम काय केले तर तीन जागतिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय अमेरिकेतील ब्रेटन वुड्स या शहरात घेतला गेला. 1. जागतिक नाणेनिधी (IMF) 2. जागतिक बँक (WB) 3. आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद (ITO)

व्यापार परिषदेची निर्मिती करण्यासाठी काहीसा वेळ लागला. पुढे 1947 साली गॅट (GATT)- जागतिक व्यापार कराराची सुरवात झाली. यावर 23 देशांनी सह्या केल्या. भारत यावर सह्या करणार्‍या या पहिल्या 23 देशात सामील आहे. या गॅट करारावर चर्चा, वितंड वाद, मतभेद असे होत होत याला अंतिम स्वरूप येण्यास जवळपास पन्नास वर्षे लागली. आणि जागतिक व्यापार संघटना (WTO) जानेवारी 1995 ला स्थापन झाली. आश्चर्य म्हणजे दुसर्‍या महायुद्धानंतर आजतागायत महायुद्ध झाले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या काळात जगभरात विविध देशांचा एकमेकांशी सुरू झालेला आणि वाढत गेलेला व्यापार. 

दुसर्‍या महायुद्धानंतर झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी व्यापार वाढला पाहिजे यावर सगळ्यांचेच एकमत झाले. व्यापार कसा झाला पाहिजे त्याच्या अटी काय असाव्यात हे वाद होत राहिले. अजूनही ते मिटले नाहीत. अजूनही व्यापारविषयक मोठमोठे तंटे होत आहेत. अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावरून भारताने जागतिक व्यापाराच्या अटींमध्ये कोलदांडा नुकताच घातला आहे. पण कुठल्याही परिस्थितीत व्यापार वाढलाच पाहिजे म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत महायुद्ध झाले नाही पाहिजे यावर जगाचे एकमत आहे. याचाच परिणाम म्हणजे 1945 नंतर जगभर छोटी-मोठी युद्धे होत राहिली, परिस्थिती तणावाची राहिली, रशिया व अमेरिकेतील शीतयुद्ध जगावर परिणाम करून गेले. पण महायुद्ध मात्र झाले नाही.

व्यापाराने महायुद्धाची शक्यता पुसून टाकली. याच व्यापाराने अजून एक शक्यता पुसून टाकली. भांडवलशाही इतर सामान्य लोकांचे शोषण करील अशी संकल्पना डावे विचारवंत जगभर मांडत होते. मार्क्सच्या काळापासून या विचारसरणीने जगातील विचारवंतांच्या मेंदूंवर मोठी मोहिनी घातली होती. भांडवलदार ग्राहकाचे शोषण करतो पण जर ग्राहक गरीबच राहिला तर त्याचे शोषण करायचे कसे? हे काही मार्क्सने सांगितले नाही. व्यापाराच्या नविन युगात ग्राहक हाच राजा आहे हे काही डाव्या विचारसरणीच्या धुरीणांनी लक्षात घेतले नाही. हे त्यांनी लक्षात घेतले नाही कारण त्यांना तसे समजणे सोयीचे नव्हते. पण आश्चर्य म्हणजे भांडवलशाहीतील स्पर्धा नाकारणार्‍यांनीही हे लक्षात घेतले नाही. 

भांडवलशाही किंवा नविन व्यापार धोरण हे पैसेवाल्यांना सोयीस्कर असेल, हवा तितका पैसा ओतला की झाले असे समजणार्‍यांचेही वांधे या ग्राहकराजाने करून ठेवले. अमेरिकेतील गृहकर्ज घोटाळ्याने मोठा फटका अमेरिकेलाही बसला. मोठ मोठ्या संस्था रसातळाला गेल्या. 

औरंगाबाद शहरात नुकताच एक मोठा मॉल बंद पडला. बंद पडलेला हा पाचवा मोठा मॉल. उरलेला शेवटचा मॉल कधीही बंद पडावा अशाच स्थितीत आहे. मोठ मोठे मॉल आल्यावर छोट्या दुकानदारांचे कसे म्हणून गळे काढले गेले होते. छोटे दुकानदान बुडणारच असे गृहीत धरले होते. प्रत्यक्षात मोठे मॉलच बंद पडायला लागले. गरीबांच्या नावाने गळा काढणार्‍यांना समजेना आता गळा कुणाच्या नावाने काढायचा. हे असे का घडले? कारण आधुनिक काळात बाजार हा ग्राहकाच्या मर्जीवर चालतो. तो कुणा एकट्या दुकट्या भांडवलशहाच्या पैशाच्या मस्तीवर चालत नाही. दिल्लीत बसून निर्णय घेणार्‍या चार दोन डोक्यांप्रमाणे चालत नाही. 

भारतीय आठवडी बाजार तर मोठी अजब गोष्ट आहे. भारतात दहा बारा गावांमध्ये मिळून एक मोठा आठवडी बाजार भरतो. भारतातील पाच लाख खेड्यांचा विचार केला तर किमान पन्नास हजार आठवडी बाजार आहेत. या बाजारात आपल्या शेतातील काही एक जिन्नस शेतकरी विकायला घेवून येतो. त्याच्या मोबदल्यात आपल्या गरजेच्या वस्तू तो खरेदी करतो. म्हणजे जरी व्यवहार पैशात होत असला तरी प्रत्यक्षात मात्र वस्तू बदल्यात वस्तू नेली असेच चित्र असते. मग हा जो बाजार आहे त्याचे मुल्यमापन तूम्ही करणार कसे? ते ठराविक डाव्या किंवा त्याला विरोध करणार्‍या नकली भांडवलशाही (क्रोनी कॅपिटॅलिझम) पद्धतीने कसे होऊ शकेल?

आधुनिक काळात बाजार हा हळू हळू मुक्त होतो आहे. आणि तो आता बंदिस्त होण्याची शक्यता नाही. काही दिवसांत चीनमध्ये आर्थिक उलथापालथ झाली तर नवल नाही. पहिल्या महायुद्धानंतर खुमखुमी आली आणि दुसरे महायुद्ध जगाने अनुभवले. त्याचप्रमाणे पैशाच्या जोरावर बाजाराला नामोहरण करण्याचे प्रयत्न नविन काळात झाले. अमेरिकेतील गृहकर्ज घोटाळा आणि चीनने जगाच्या बाजारात तयार मालाची दडपादडपी करून केलेली दादागिरी हाही अनुभव जगाने घेतला.

औरंगाबाद शहरात जो मॉल बंद पडला त्याच्याच परिसरात दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार मात्र अजूनही जोमात आहे. दर आठवड्याला तो वाढतच आहे. भारताचा विचार केला तर आठवडी बाजार ही आम्ही उभी केलेली एक मोठी सोयीची लवचिक अशी व्यवस्था आहे. भारतातील पन्नास हजार आठवडी बाजारांची गावे पक्क्या रस्त्यांनी एकमेकांना जोडली, बाजाराच्या जागेवर किमान ओटे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आणि बाजार संपल्यावर गावी परतण्यासाठी वाहनांची चांगली व्यवस्था झाली तरी खुप काही होण्याची शक्यता आहे. 

इडली दोश्याचे तयार पीठ, चटणी विकणार्‍या एका दाक्षिणात्य फाटक्या माणसाला औरंगाबाद शहरातील एका मॉलने आपल्या जागेत येवून बसण्याची परवानगी नाकारली. त्याने किमान ओट्यावर बसू द्या म्हणून विनंती केली. कालांतराने तो मॉल तर बंद पडला. पण आजही तो इडलीवाला मात्र ओट्यावर आहे. आता तर तो कोपराच त्या इडलीवाल्याच्या नावाने ओळखला जातो. तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवले होते 'महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती ॥' छोट्या बाजाराची लव्हाळे किंबहूना ग्राहक राजाच्या गरजा आणि खिसा ओळखणार्‍या बाजाराची लव्हाळी नविन काळात अजून तकाकी धरतील अशीच शक्यता दिसत आहे. युद्धखोरांची मस्ती जशी जिरवली तशीच पैशांच्या जोरावर बाजार काबीज करू पाहणार्‍यांचीही मस्तीही ग्राहक जिरवायला लागले आहेत.     
      
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

7 comments:

  1. चांगला झालाय. ड्यू क्रेडिड देऊन माझ्या फेसबुक wall वर शेअर करीत आहे.
    -शरदमणी मराठे

    ReplyDelete
  2. Very good article. Liked ur mature approach. Smita Bhagwat.

    ReplyDelete
  3. खूपच छान आणि सणसणीत लेख आहे. वास्तवाला तसेच सत्याला धरून लिहिल्यामुळे लेख खूप भावला. श्री राम !!

    ReplyDelete