दै. पुण्यनगरी, उरूस, बुधवार 28 मे 2014
आपल्याकडे कुणीही भेटले आणि थोडाफार जिव्हाळा त्याच्याबाबत वाटला की आपला स्वाभाविक प्रश्न असतो, ‘‘तूमचे गाव कुठले?’’त्याचे उत्तर मिळाल्यावर पुढचा प्रश्न समोर येतो, ‘‘गावाकडं कोण असतं?’’ भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षात शहरीकरणाचा वेग फार मोठा राहिला आहे. शहरातील लोकसंख्या आता जवळपास 50 टक्के इतकी झाली आहे. पण अजूनही का कुणास ठाऊक बहुतांश मराठी माणसांचं मन (भारतीय देखील) गावातच अडकून पडलेलं असतं. गावाकडं कोण या प्रश्नाचं उत्तर मिळतं, ‘‘आई वडिल असतात.’’
गावाकडे आईवडिल असतात असं म्हटलं की समोर येणारं चित्र साधरणत: असं असतं. पक्की सडक सोडून गाव थोडासा आतमध्ये असतो. ही कच्ची सडक पुढे दुसर्या छोट्या गावाकडं गेलेली असते. फाट्यावर थोडीफार दुकानं, टपरीवजा हॉटेल. मोडक्या अवस्थेत बस स्टॉपचं पत्री शेड. जून्या खराब आणि आता सिमेंटच्या पक्क्या रस्त्यानं आत गेलं की एकमेकांना खेटून असलेली बसकी घरं लागतात. रस्त्याच्या बांधकामानं घरं खाली गेलेली असतात.
सर्वसाधारण घरं साधी दगडा-मातीची ढासळलेल्या अवस्थेत दिसतात. दरवाजा जरा बर्या अवस्थेत असतो. त्यातून आत गेलो की खाटेवर पडलेले वडिल आणि स्वयंपाकघराच्या उंबर्याशी बसून काहीतरी निवडीत टिपत बसलेली म्हातारी आई. जनावरांचा गोठा ओस पडलेला. तिथली मातीची जमिन पूर्ण उखडलेली. बाकी घराच्या काही भागात जूजबी थोडंफार दूरूस्तीकाम करून घेतलेलं असतं. आईवडिल थकलेले असतात. वाड्यात जळमटं झालेली असतात. आर्थिक परिस्थिती खराब असेल तर घर म्हणजे वाडा नसून नुसतं पत्र्याचं छोटं शेड असतं. बाकी वरवरची सुबत्ता सोडता आई वडिल मात्र कुठल्याही गावाकडच्या घरातले थकलेले, उदास डोळ्यांचे, पोरंबाळं आता फिरकत नाही ही खंत बाळगणारे असतात. त्यात फारसा फरक नाही.
बरेच आईवडिल गावाकडं अडकून पडतात ते केवळ मुलांच्या संसारात अडगळ नको म्हणून नाही. तर गावाकडचं घर आणि शेतीचा तुकडा, गावगाड्यातले रीतरिवाज परंपरा त्यांना बांधून ठेवत असतात. आपल्या देहाची माती गावच्या मातीत मिळावी असली काहीतरी समजूत मनाशी घट्ट बाळगून ते गावपांढरीशी चिटकून असतात.
पण शेत नाही, गावात जूनं घर नाही असा कुणी शहरातील मोठं घर सोडून गावाकडं निवृत्तीनंतर घर बांधून राहिल का? धनंजय चिंचोलीकर या आमच्या लेखक मित्राच्या आईवडिलांनी हा समज खोटा ठरवला. कन्नड सिल्लोड रस्त्यावरील चिंचोली लिंबाजी हे त्यांचे मुळ गाव. धनंजयच्या शिक्षक असलेल्या आईवडिलांनी (लक्ष्मीकांतराव व सुमन चिंचोलीकर) निवृत्तीनंतर गावाकडं उचं जोतं घेवून, मोठ्या उंचीचं छोटं तीन खोल्यांचं टूमदार घर बांधलं. परसात कडीपत्ता, लिंब, मोगरा अशी छोटीशी बाग धनंजयच्या आईनं मोठ्या हौसेनं पोसली आहे. स्वत: धार्मिक कर्मकांडांना महत्त्व न देणार्या या जोडप्यानं स्वखर्चानं दत्ताचं एक मंदिर विठ्ठल मंदिराच्या परिसरात उभारलं. औरंगाबाद शहरात स्थायिक असलेल्या दोन मुलं दोन मुलींचा आग्रह न जुमानता गावाकडं राहण्याचा निर्णय घेतला आणि गेली 20 वर्षे तो अमलात आणून दाखवला आहे. मुलाबाळांच्या संसारातून बाजूला होण्याची "वानप्रस्थ" आश्रमाची परंपरा आपल्याकडे आहे. आधुनिक काळातील वानप्रस्थाचे उदाहरणच चिंचोलीकर काका-काकूंनि समोर ठेवले आहे.
त्यांच्या घरात देवीची एक मोठी मुर्ती पाहण्यात आली. कापडांत झाकून ठेवलेली होती. चौकशी केल्यावर लक्षात आलं की सार्वजनिक नवरात्र महोत्सवातील ही मूर्ती आहे. म्हणजे या उपक्रमांतही यांचा सहभाग मोलाचा असणार. शिवाय स्वाध्यायाचे वर्ग त्यांच्याकडे चालतात.
गावानेही या जोडप्याला मोठा आदर दिला आहे. दसर्याच्या पूजेचा मान त्यांना दिला जातो. घराबाहेर पडले कि कुणीही त्यांना बस स्थानका पर्यंत सोडते. सगळ्या उपक्रमात त्यांचा सल्ला घेतला जातो. त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो.
गावचे ग्रामदैवत असलेल्या देवीचे विसर्जन त्यांच्या दारासमोरच्या आडात केले जाते. तो आड त्यांची चांगला व्यवस्थित बांधून घेतला आहे. त्यावर लोखंडाची जाळी बसवून कुणी पडू नये याचीही काळजी घेतलेली आहे. अंगणातील सामाजिक धार्मिक असो की परसातील बाग असो या जोडप्यानं कलात्मक दृष्टिकोन जपत आपलं आयुष्य समृद्ध केलं आहे.
वाडवडिलांची शेतवाडी घरदार काहीच नसताना या जोडप्याला गावाकडं का रहावं वाटत असेल? स्वतंत्र पेन्शन असल्याने कुणावर अवलंबून राहण्याचीही गरज नाही. ही कुठली ओढ असेल? काकांच्या बोलण्यातून सतत साधेपणा आणि माणसांबद्दलचा जिव्हाळा वहात असतो. काकू तर फारशा बोलतच नाहीत. त्या केवळ नजरेनंच बोलतात असं लक्षात आलं.
गावकर्यांना अडीअडणींना हे जोडपं मदत करत राहतं. खरं तर आपल्या पुढच्या पिढीतील किंवा त्याही पुढच्या पिढीतील कुणीच गावाकडं परतणार नाही हे माहित आहे. गावातली कुठलीच सत्ता त्यांच्यापाशी नाही. आपण काही फार मोठी समाजसेवा करत आहोत असा आव बोलण्यात वा कृतीत नाही. गावाला एकत्र बांधून ठेवायचं म्हणून धार्मिक उपक्रम आवश्यक असतात इतक्या साध्या विचारसरणीतून त्यांनी नवरात्र महोत्सव असो, दत्त मंदिर असो, स्वाध्याय असो की गावदेवीची जत्रा असो यांचे महत्त्व ओळखले. ज्या काळात पुरोगामी विचारवंत कुठल्याही जत्रा उत्सवांकडे हेटाळणीने पहायचे. आजही पाहतात. त्या काळात एक निवृत्त शिक्षक आपल्या बायकोला घेवून गावाकडं येतो आणि या सगळ्यात रस घेतो हे विलक्षण आहे. या उपक्रमांमुळे गावातील व्यसनांचे प्रमाण कमी होते हे त्यांचे निरिक्षण मोठं मार्मिक आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्यावरील पुस्तकात विनया खडपेकर यांनी अहिल्याबाईंनी मंदिरं, नदिवरील घाट यांच्या उभारणीतून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याचे धोरण कस आखले याचे मोठे मार्मिक विश्लेषण केले आहे. युद्धामुळे प्रचंड नुकसान होते शिवाय आपण बाई असल्यामुळे आपल्याला मर्यादा आहेत. त्यापेक्षा आपण धार्मिक बाबींचा चांगला उपयोग समाजासाठी करून घेवूत हे ध्यानात ठेवून त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने धार्मिक स्थळांचा विकास केला. चिंचोलीकर काकांना हे सारं स्पष्टपणे कदाचित माहितही नसेल. पण त्यांनी एक छोटं प्रात्यक्षिक आपल्या गावात करून दाखवलं आहे. सामाजिक काम करताना किंवा धार्मिक कामांतही सहभाग नोंदवताना माणसं अतिशय कदरलेली असतात. वैताग दाखवत राहतात. उगाच हे सारं गळ्यात पडलं असा भाव त्यांच्या मनात असतो. पण चिचांलीकर काकांच्या आणि काकुंच्या वागण्या बोलण्यात हे काहीच दिसत नाही. अगदी सहजपणे ऐंशी वर्षाच्या वयातही ते या उपक्रमांमधून वावरत असतात.
ज्या काळात प्रवास करणे मोठं जिकीरीचं काम होतं. त्या 1960 ते 80 च्या काळात या जोडप्याने जवळपास संपूर्ण भारत पालथा घातला आहे. हे मला समजलं आणि मोठं आश्चर्यच वाटलं. मिळेल त्या साधनांनी काका काकूंनी भारतभर मिळून प्रवास केला. स्वत:ची गाण्याची नाट्य संगीताची आवड जोपासली. आजही त्यांची नातवंडं आजीआजोबांची आठवण आली की गाडीत तबला पेटी घेवून गावाकडं जातात. आजीआजोबांना जमेल तसं गाणं ऐकवतात. स्वत: आनंद घेतात, त्यांना आनंद देतात. आयुष्याच्या निरस चित्रात कलेचा रंग भरून घेतात/देतात.
धनंजयच्या सासुबाईंचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. निर्णय घेणं सोपं असतं पण राबविणं महाकठीण. जमलेल्या लोकांना वाटले घरची म्हातारी माणसं अशा निर्णयाला परवानगी देतील का? पण धनंजयच्या आई-वडिलांनी पारंपरिक मतं बाजूला ठेवून सुनेच्या निर्णयाला पाठिंबा देवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
हिंदू धर्मात उदारमतवादी विचारांची एक फार मोठी अशी परंपरा शतकानुशतके राहिलेली आहे. या परंपरेचे नेतृत्व मोठ मोठ्या संत महात्म्यांनी केलं हे खरं आहे. पण ही परंपरा बळकट करण्याचे महत्त्वाचे काम चिंचोलीकर काका- काकुंसारख्यांनी गावपातळीवर केलं आहे. इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या एका कवितेत वर्णन केले होते
मी पाहतो तुझा गाव
आणि तू येतोस माझ्या गावाला
उगाच नावाला कौतुक करतो आपण
एकमेकांच्या आईबापाचे घरादाराचे
चौकटीवर बहिणींनी काढलेल्या
मोडक्या तोडक्या मोराचे
भाऊ भावजयांनी रोपलेल्या शेताचे
आणि गावकर्यांनी केलेल्या स्वागताचे
सगळ्यांची मेटे मोडलेली दिसत असताना.
याच्या नेमके उलट धनंजयच्या गावाकडे गेले की मेटे न मोडलेले म्हातारे पण ताठ कण्याचे आईवडील दिसतात. आपल्या जवळच्या मित्राचे ते आईवडिल आहे या समाधानापेक्षा असा विचार करणारी माणसं आपल्या जवळ आहे हे समाधान वाटत राहते.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575