Showing posts with label shetkari sanghatak. Show all posts
Showing posts with label shetkari sanghatak. Show all posts

Sunday, February 12, 2012

साखरेची नियंत्रणमुक्ती : पापाची कबुली


-----------------------------------------
६ फेब्रुवारी २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-----------------------------------------


ज्येष्ठ मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांना एका मुलाखतीत प्रश्र्न विचारला होता, ‘वाचनसंस्कृतीसाठी काय करायला हवे?’ तेव्हा नेमाडे उत्तरले होते, ‘काही नाही, सरळ वाचनच करायला हवे!’ नेमाडे यांच्या या साध्या उत्तरात एक मोठी खोच आहे. आज जे काही संम्मेलनं आणि तत्सम कार्यक्रमांच्या रूपाने चालू आहे. त्यातून वाचनसंस्कृतीला काहीच फायदा होत नाही. ही खंत नेमाड्यांना व्यक्त करायची होती. शेतीप्रश्र्नांच्याबाबतीतसुद्धा काहीसा असाच प्रकार आहे. बत्तीस वर्षांपूर्वी शेतीसाठी काय करायला पाहिजे, या प्रश्र्नाला शरद जोशी यांनी दिलेलं उत्तर ‘काहीच नाही, शेतमालाला भाव मिळू दिला पाहिजे. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यावरून हेच लक्षात येतं, की गेली कैक वर्षे उसाला भाव भेटू नये म्हणूनच हा सगळा उपद्व्याप चालू होता. आज शेवटी परिस्थिती पूर्णपणे हाताच्या बाहेर गेल्यावर शहाजोगपणे शासन साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या गप्पा करीत आहे. तिकडे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया अनुदानात कपात केल्याशिवाय पर्याय नाही, अशी विधानं करीत आहेत. कृषिमंत्री शरद पवार अन्नसुरक्षा विधेयकाचे कायद्यात रुपांतर करताना अस्वस्थ आहेत, यासाठी लागणारी प्रचंड सबसिडी आणायची कुठून, त्याहीपेक्षा शेतकरी असल्यामुळे त्यांना पडलेला मूलभूत प्रश्र्न फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे मुळात अन्नधान्य उपलब्ध होण्याची काय खात्री. या सगळ्याचा विचार केल्यावर आता असं लक्षात येतं आहे, 30-32 वर्षांपासून शरद जोशी आणि शेतकरी संघटना ज्या मुद्‌द्यासाठी प्राण पणाला लावून लढत आहेत, त्याच मुद्‌द्यापाशी सगळे येऊन थांबले आहेत. कृषी उद्योगाला कुठलीही भीक नको होती. मुळात ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ अशी सरळ साधी वाटणारी; पण अतीशय गंभीर अर्थ असलेली घोषणा शेतकरी चळवळ देत होती. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता जागतिक पातळीवरती प्रचंड मोठ्या उलथापालथी चालू आहेत. व्यापारविषयक धोरणं विविध दिशेने जाताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढत चालला आहे. भारतापुरतं जे काही शोषण करायचं होतं, जे काही ढोंग करायचं होतं. ते सगळं संपुष्टात आलं आहे. मनात इच्छा असूनही प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसणं सरकारला आता शक्य उरलेलं नाही. केवळ मूठभरांचे पगार व्हावेत म्हणून करोडोंना वेठीस धरण्याचे दिवस आता पूर्णपणे संपले आहेत.
दि. 1 फेब्रुवारीच्या दि टाइम्स ऑफ इंडिया मध्ये अजित निनान यांचे एक अप्रतिम व्यंगचित्र आले आहे. ‘शासकीय फौजफाटा घेऊन एक मंत्री उघड्या वाघड्या, हाडाचा सापळा असलेल्या गावकर्‍यांसमोर उभा आहे आणि त्यांना सांगतो आहे. शासकीय कामांचा प्रचंड भार असल्यामुळे सध्या तुमच्यासाठी मला वेळ नाही. मी विरोधी पक्षात जाईपर्यंत वाट पाहा.’ स्वत:चीच सेवा करावी हीच सध्या प्रशासनाची प्राथमिकता बनली आहे. ते जनतेची सेवा काय क रणार? ही परिस्थिती नवीन काळात शक्य उरली नाही. शासन पूर्णपणे कर्जबाजारी होऊन बसलेलं आहे. स्वत:च्या ओझ्याखाली ते पार दबून गेलेलं आहे, त्यामुळे इतरांचं आणि विशेषत: शेतकर्‍यांचं शोषण करावं अशीही ताकद त्याच्यात आता फारशी उरली नाही. या पार्श्र्वभूमीवरती साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या हालचाली लक्षात घ्यायला हव्यात. वर्षानुवर्षे विविध योजनांच्या नावाखाली नोकरशहा, राजकीय नेते, इतकंच नाही तर अगदी समाजसेवेची टिकली मिरवणार्‍या सामाजिक संस्थाही सर्वसामान्यांचं शोषण करत राहिल्या. त्यांच्याच जिवावरती अनुत्पादक असलेला हा वर्ग उड्या मारत राहिला. प्रत्यक्ष उत्पादन करणारे उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. जागतिकीकरणाच्या काळात ही परिस्थिती काहीशी पालटली. बाहेरच्या दबावाने का होईना उद्योगक्षेत्रात मोकळे वारे वाहायला लागले. सरकारची इच्छा नसतानाही लायसन-कोटा-परमिट राज त्यांना संपवावे लागले; पण हा दुष्टपणा शेतीच्या बाबतीत मात्र अजूनसुद्धा चालू आहे; पण आता तो चालू ठेवण्याची शक्यता दिवसेंदिवस संपुष्टात येते आहे; पण हे कबूल करायचं मनाचं मोठेपण सरकारमध्ये नाही आणि राजकीय नेत्यांमध्ये तर अजिबात नाही. आव मात्र असा आणत आहेत, आम्ही शेतीचं भलं करतो आहोत! सर्वसामान्यांचं भलं करत आहोत. अन्नसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत अशीच गोची होऊन बसली आहे. हे सगळ्यांना पूर्णपणे माहीत आहे, की हे विधेयक कायद्यात रूपांतरीत झालं तर अन्नसुरक्षा प्रत्यक्षात देणे शक्य नाही, कुठल्याच पातळीवरती हे करता येणार नाही, पण तसं कबूल करणं राजकीयदृष्ट्या गैरसोयीचं आहे. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याची घोषणा उशीरा का होईना करावी लागणार आहे? त्याच पद्धतीने अन्नसुरक्षेच्या बाबतीतही आज नाही तर उद्या सरकारला उलटा निर्णय घ्यावा लागणार आहे. साखरेची लेव्ही उठवल्यावर रेशन यंत्रणेसाठी खुल्या बाजारातून साखर शासनाला खरेदी करावी लागेल, जी गोष्ट किती अशक्य आणि अव्यवहार्य आहे, हे सगळेच जाणतात, त्याच पद्धतीने अन्नसुरक्षेच्या बाबतही घडू शकेल, हे विधेयक कायद्यात रूपांतरीत झाल्यास पुरेसा अन्नसाठा अतिशय कमी दरात वाटप करण्यासाठी खुल्या बाजारातून तो खरेदी करावा लागेल. सध्या आजच असलेला अन्नसाठा साठवून ठेवण्याची कुठलीही यंत्रणा शासनाकडे नाही, मग या नवीन अन्नसाठ्याचं काय करायचं, याचं उत्तर शासनाकडे नाही, कायदा झाल्यावरती अगदी एखाद्या साध्या माणसानेही सर्वोच्च  न्यायालयात या संदर्भात धाव घेतली, तर शासनाची फेफे उडेल, हे सांगायला भविष्यवेत्याची गरज नाही. शासनाने एकच करायला हवं. ढोंगीपणा सोडून शासनच करायचं हवं. इतर उद्योग पूर्णपणे बंद करायला हवेत. भालचंद्र नेमाडे म्हणाले तसं, वाचनसंस्कृतीसाठी वाचनच करावं लागतं. इतर पळवाटा काहीही कामा येत नाहीत. शासनाने सक्षमपणे शासनाचेच काम करावे, इतर सर्व कामे लोकांवरती सोपवून द्यावीत, फक्त त्यावर देखरेख ठेवावी. परत परत ही गोष्ट सिद्ध होत गेली आहे, की शासन विविध पातळ्यांवरती वारंवार अपयशी ठरत चाललेलं आहे. नवीन काळाची पावलं ओळखून हे बदल झाले नाहीत, तर सर्वसामान्यांचा संताप अजून वाढेल. त्याला तोंड देणार कसं?

Tuesday, September 13, 2011

योद्धा शेतकरी नेता


शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना अलीकडेच चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने- शेतकरी चळवळीच्या अनुषंगाने शरद जोशी यांच्या लिखाणावर आधारित ‘समग्र शरद जोशी’ प्रकल्प सिद्ध करणाऱ्या प्रकाशकाचे मनोगत..

-----------------------------------------------------------------
दै. लोकसत्ता , लोकरंग दि. ११ सप्टेंबर २०११ मध्ये प्रकाशित झालेला लेख..
-----------------------------------------------------------------

 रद जोशींच्या वयाला नुकतीच ७६ वष्रे पूर्ण झाली. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आठवतो आहे तो त्यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा आणि त्यानिमित्ताने हाती घेतलेला व पूर्णत्वास नेलेला ‘समग्र शरद जोशी’ प्रकल्प! शरद जोशी आपला वाढदिवस साजरा करीत नाहीत. त्यानिमित्त एखादा कार्यक्रम ठेवला तर त्याला नकार देतात हे माहीत होते. त्यांची पुस्तकं मी प्रकाशित करीत होतो. त्यांना पंच्याहत्तरावे वर्ष लागते आहे, हे समजल्यावर काय कार्यक्रम आखावा, यावर विचार करत होतो. प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे यांनी एक चांगला मार्ग सांगितला. तिथीप्रमाणे त्यांचा जन्म ऋषीपंचमीचा आहे. ही तारीख २००९ मध्ये होती २४ ऑगस्टला. औरंगाबादला शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या निमित्ताने ते येणारच होते. तेव्हा २४ ला त्यांच्या एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन ठेवले तर त्याला शरद जोशी नकार देणार नाहीत! मग मी तसा घाट घातला. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित करण्याची तयारी केली.
शरद जोशींचे ‘स्वातंत्र्य का नासले?’ हे पुस्तक १९९८ मध्ये प्रकाशित करून मी प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली होती. पण तेव्हा मी पूर्णवेळ प्रकाशक म्हणून काम करत नव्हतो. त्यांची याच नावाची लेखमाला पाक्षिक ‘शेतकरी संघटक’मध्ये छापून आली होती तेव्हाच मला ती आवडली होती. माझ्यावर आजही तिचा विलक्षण प्रभाव आहे. ‘याचं पुस्तक करा,’ असा लकडा मी म्हात्रे सरांच्या मागे लावला. म्हात्रे सर मोठे वस्ताद! त्यांनी, ‘आता तुमच्यासारख्या तरुणांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे,’ असं म्हणत माझे दात माझ्याच घशात घातले. मला आनंद तर वाटला, परंतु ‘शरद जोशी परवानगी देतील का?,’ असं मी भीत भीत म्हात्रे सरांनाच विचारलं. सरांनीही ‘त्यांनी परवानगी दिली. तू छापतोस का?,’ असं म्हणत मला टोलवलं. आणि अमरावतीला साजऱ्या झालेल्या जनसंसदेच्या भव्य कार्यक्रमात हे पुस्तक माझ्या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केलं. चित्रकार चंद्रमोहन यांनी त्यासाठी अतिशय सुंदर मृखपृष्ठ करून दिलं होतंशेतकरी संघटक’मधून प्रसिद्ध झालेले मुक्त अर्थव्यवस्थेवरील शरद जोशींचे लेखही मला आवडले होते. त्यांचंही चांगलं पुस्तक होऊ शकेल असं मला वाटलं. एव्हाना मी ‘जनशक्ती वाचक चळवळ’ नावानं पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय पूर्णवेळ सुरू केला होता. ‘खुल्या व्यवस्थेकडे.. खुल्या मनाने’ या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध केलं. सोबत शेतकरी संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रे असलेलं माझ्या वडिलांचं (अ‍ॅड्. अनंत उमरीकर) यांचं ‘वेडेपीर’ हे  पुस्तकही प्रकाशित केलंशेतकरी संघटनेचा कार्यक्रम असला की आम्ही पुस्तकांचे गठ्ठे घेऊन विक्रीला बसायचो. सोबत संघटनेचे बिल्ले, संघटनेत लोकप्रिय असलेले कवी इंद्रजीत भालेराव यांचे कवितासंग्रह, तसेच शेतकरी प्रकाशनाची जुनी पुस्तकंही असत. शरद जोशींचं सगळं वाङ्मय प्रकाशित करावं असं मनापासून वाटायला लागलं. कार्यकत्रे कार्यक्रमाच्या वेळी ही भावना वेळोवेळी व्यक्त करायचे. शरद जोशींनी आत्मचरित्रात्मक असे काही लेख साप्ताहिक ‘ग्यानबा’मध्ये लिहिले होते. आपली आई, बाबुलाल परदेशी, शंकरराव वाघ अशी काही व्यक्तिचित्रं त्यांनी लिहिली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेलं पत्रही ललित साहित्याचा एक उत्तम नमुना होता. हा सगळा मजकूर एकत्र करून त्याचं पुस्तक करायचं ठरवलं. प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी या पुस्तकासाठी माझ्यामागे लकडाच लावला. ‘अंगारमळा’ या नावानं हे पुस्तक शरद जोशी यांच्या वाढदिवशी- ३ सप्टेंबर २००८ रोजी प्रसिद्ध केलं. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा प्रथम पुरस्कारही मिळालाशेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेलं शरद जोशींचं ‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’ या पुस्तकाचे पुनर्मुद्रणही ‘अंगारमळा’नंतर लगेचच औरंगाबाद येथे झालेल्या संघटनेच्या अधिवेशनात प्रकाशित केलं. एव्हाना त्यांची चार पुस्तकं प्रसिद्ध झाली होती. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा करण्याचं ठरलं. त्यांचं जुनं पुस्तक ‘प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश’ (पूर्वी दोन भागांत असलेलं) आणि ‘शेतकऱ्यांचा राजा शिवाजी’ यांची तयारी केली. ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘शतकाचा मुजरा’, ‘शेतकरी कामगार पक्ष- एक अवलोकन’ आणि ‘जातीयवादाचा भस्मासुर’ या छोटय़ा पुस्तिका ‘शेतकऱ्यांचा राजा शिवाजी’मध्ये समाविष्ट केल्या. या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हस्ते शरद जोशींचा सत्कारही केला. इंद्रजीत भालेराव यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. अतिशय मनोज्ञ असं भाषण शरद जोशींनी याप्रसंगी केलंशरद जोशींची सहा पुस्तकं तोवर झाली होती. त्यांचं यापूर्वी ग्रंथरूपात प्रकाशित झालेलं सर्व लिखाण पुनर्मुद्रित झालं, पण शिल्लक लिखाणाचं काय? त्याची वर्गवारी कशी करायची? त्याचं स्वरूप कसं ठेवायचं, हा यक्षप्रश्न होता. औरंगाबादच्या या कार्यक्रमात महिला आघाडीच्या नेत्या शैलजा देशपांडे यांनी एक बाड माझ्या हाती दिलं. शरद जोशी यांनी दै. ‘देशोन्नती’मध्ये ‘जग बदलणारी पुस्तके’ या नावानं लेखमाला लिहिली होती. त्यांचे मूळ लेख असलेलं ते बाड शैलाताईंनी बऱ्याच वर्षांपासून जपून ठेवलं होतं. ‘याचं पुस्तक करा,’ असा त्यांचा प्रेमळ आग्रह होता. मी आधी ते वाचले नव्हते. अधाशासारखं ते बाड वाचून काढलं. याचदरम्यान ‘सातारा भूषण’ पुरस्कार शरद जोशींना जाहीर झाला. त्या कार्यक्रमात ९ जानेवारी २०१० रोजी हे पुस्तक प्रकाशित करण्याचं निश्चित केलं. त्याचवेळी इंद्रजीत भालेरावांचे शरद जोशींवरचे आणि त्यांच्या पुस्तकांवरचे लेख एकत्र करून ‘मळ्यातील अंगार’ हे पुस्तकही प्रकाशित करायचं ठरवलं. विजय कुवळेकरांच्या हस्ते ही दोन्ही पुस्तके साताऱ्याच्या त्या कार्यक्रमात प्रकाशित झालीदै. ‘लोकमत’मध्ये ‘अन्वयार्थ’ या नावानं शरद जोशींनी लेखमाला लिहिली होती. १९९२ ते ९४ आणि २००० ते २००१ या काळात हे लेख प्रसिद्ध झाले होते. त्यांचं पुस्तक आधी करा, असं स्वत: जोशींनीच सुचवलं. मी त्यादृष्टीनं काम सुरू केलं. मध्यंतरीच्या काळात आपल्या खासदार निधीतून त्यांनी परभणीच्या गणेश वाचनालयास दहा लाख रुपये दिले होते. त्या निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचं काम पूर्ण होत आलं होतं. त्याच्या उद्घाटनासाठी जोशींनी यावं, असं संस्थाचालकांना वाटत होतं. पण शरद जोशी परभणीच्या कार्यकर्त्यांवर काही कारणानं नाराज होते. त्यामुळे ते परभणीला यायला तयार नव्हते. माझ्या वडिलांनी मला पुस्तक प्रकाशनाचं निमित्त करून त्यांना बोलवू, असं सुचवलं. ‘अंगारमळा’ला शासनाचा पुरस्कार मिळाला, त्या समारंभासाठी ते जाणार नव्हते. मी तो पुरस्कार, रकमेचा धनादेश व स्मृतिचिन्ह त्यांना द्यायला अंबेठाणला गेलो. त्यांचा चांगला मूड बघून हळूच परभणीला यायचं पिल्लू सोडून दिलं. ‘अन्वयार्थ’चं प्रकाशन असेल तर येतो, अशी अट त्यांनी घातली. मी ‘हो’ म्हणून तारीखही ठरवून टाकली. मला औरंगाबादला परत आल्यावर लक्षात आलं की, मजकूर फारच मोठा झालेला आहे. इतका मजकूर एका पुस्तकात मावणं शक्य नाही. दोन खंड करावे लागतील. पण आता माघार घेणं शक्य नव्हतं. मग ‘अन्वयार्थ-१’ आणि ‘अन्वयार्थ-२’ अशी दोन पुस्तकं प्रकाशित करायचं ठरवलंयाचदरम्यान शरद जोशींचा अमृतमहोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याच्या हालचाली शेतकरी संघटना आणि त्यांचे हितचिंतकांकडून सुरू झाल्या. बघता बघता त्याला गती आली. ६ जूनला औरंगाबाद येथे साहित्य मेळावा, २ ऑक्टोबरला रावेरीला महिला मेळावा आणि १० नोव्हेंबरला शेगाव येथे शेतकरी महामेळावा असा कार्यक्रमाचा तपशीलही ठरला. ही बठक परभणीला गणेश वाचनालयाच्या नव्या सभागृहात संपन्न झाली. त्या बठकीनंतर माझ्या मात्र पोटात गोळा उठला. कारण या तोकडय़ा कालावधीत मला त्यांचं उर्वरित लिखाण प्रसिद्ध करायचं होतं आणि लेखांची फाईल तर अवाढव्य झाली होती. १९९० पर्यंतचं त्यांचं लिखाण सुरेशचंद्र म्हात्रे यांनी ग्रंथबद्ध केलं होतं. त्याचं पुनर्मुद्रण ‘शेतकरी संघटना- विचार आणि कार्यपद्धती’, ‘प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश’ व ‘शेतकऱ्याचा राजा शिवाजी आणि इतर लेख’ या पुस्तकांतून आम्ही पूर्ण केलं होतंलेखांची अवाढव्य कात्रणं लावता लावता त्यांच्या भाषणांचा एक वेगळा विभाग होऊ शकतो असं लक्षात आलं. खुल्या अधिवेशनातील, कार्यकारिणीच्या बठकीतील, सभांमधील ही भाषणं होती. ती एकत्रित केली. पुस्तकाला ‘माझ्या शेतकरी भावांनो, मायबहिणींनो’ असं समर्पक नाव दिलं. कारण हेच संबोधन शरद जोशी नेहमी वापरतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चांदवडच्या ऐतिहासिक अधिवेशनातील भाषण करतानाचा शरद जोशींचा फोटो जशाचा तसा वापरला आणि अक्षरंही कवीमित्र दासू वैद्य यांच्या हस्ताक्षरात करून घेतली. त्यासोबत विजय परूळकरांचं गाजलेलं ‘योद्धा शेतकरी’ची नवी आवृत्तीही प्रकाशित केलीशरद जोशींनी शेतकरी आंदोलनविषयक जे लिखाण केलं होतं त्याचं संकलन ‘बळीचे राज्य येणार आहे’ या नावानं केलं. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ ही मांडणी शरद जोशींनी पहिल्यांदा केली आणि रुजवली. याशिवायचं जे लिखाण होतं त्याचं संकलन ‘भारता’साठी’ या नावानं कर, असं महापारेषणमधील माझा अभियंता मित्र शशांक जेवळीकर याने सुचवलं. अर्थसंकल्पावर दरवर्षी शरद जोशी एक लेख जरूर लिहीत. त्या संकलनास ‘अर्थ तो सांगतो पुन्हा’ हे नाव दिलं. मििलद बोकिल यांनी विनोबा भावेंच्या पुस्तकाला ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ हे नाव दिलं होतं, त्यावरून हे नाव सुचलं. राजकीय लेखांचं संकलन करताना त्याला काय नाव द्यावं, कळत नव्हतं. त्यांच्या लेखात ‘पोिशद्यांची लोकशाही’ हा शब्द सापडला आणि हेच नाव योग्य वाटलं.चांदवडचं महिला अधिवेशन ही एक मोठी ऐतिहासिक घटना होती. त्यावेळी ‘चांदवडची शिदोरी’ ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. तिचं लिखाण महिला कार्यकर्त्यांच्या मदतीनं शरद जोशींनीच केलं होतं. त्यानंतरचे या प्रश्नावरचे लेख एकत्र करून त्याच नावानं हे पुस्तक रावेरीच्या महिला मेळाव्यात सिद्ध केलंशेगावला शरद जोशींच्या अमृतमहोत्सवानिमित्त शेतकरी महामेळावा आयोजिण्यात आला होता. शरद जोशी येतात की नाही, अशी शंका सगळ्यांनाच होती. पण ते आले. त्यांनी सत्कार मात्र स्वीकारला नाही. फक्त वयोवृद्ध शेतकऱ्याच्या हस्ते मानपत्र स्वीकारलं. तरुण कार्यकर्त्यांच्या हस्ते ‘समग्र शरद जोशी प्रकल्पा’तली शेवटची दोन पुस्तके ‘पोिशद्यांची लोकशाही’ आणि ‘भारता’साठी’ प्रकाशित करण्यात आली. लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही पुस्तके प्रकाशित झाली. आपण योजिलेला प्रकल्प पूर्ण झालेला पाहताना मला खूप भरून आलं.माझ्यावर शेतकरी संघटनेची आंदोलने, सभा आणि भाषणांपेक्षा शरद जोशींच्या लिखाणानं विलक्षण प्रभाव पाडला आहे. वयाच्या १४ व्या वर्षी माझ्या घरात ‘शेतकरी संघटक’ हे पाक्षिक यायला लागले. तेव्हापासून मी त्यांच्या लिखाणाने प्रभावित होत आलेलो आहे. प्रत्यक्ष त्यांचं भाषण मात्र नंतर दहा वर्षांनी मी ऐकलंराष्ट्रीय कृषिनीती’ नावानं एक छोटी पुस्तिका शरद जोशींनी लिहिली होती. व्ही. पी. सिंहांच्या काळातील कृषी समितीचा तो अहवाल होता. त्यानंतर वाजपेयी सरकारच्या काळातील कृषी कार्यदलाचाही एक अहवाल आहे. या दोन्हींचं पुस्तक मराठीत करणं शिल्लक आहे. ‘शेतकरी संघटना : आठवणी, आस्था, अपेक्षा आणि आक्षेप’ हे पुस्तक सध्या मी संपादित करतो आहे. शरद जोशी आणि शेतकरी संघटनेवर अनेक मान्यवरांनी, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं लिखाण यानिमित्तानं संपादित करून ते प्रसिद्ध करण्याची योजना आहे. सदा डुंबरे आणि राजू परुळेकर यांनी घेतलेल्या शरद जोशींच्या मुलाखतींचाही त्यात समावेश आहे. अलीकडेच शरद जोशी यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्या सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा मानस आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. . ना. धनागरे, विजय कुवळेकर, मििलद मुरुगकर, दत्तप्रसाद दाभोळकर, सतीश कामत, भानू काळे, विद्युत भागवत, हेरंब कुलकर्णी, आसाराम लोमटे यांचे लेख त्यात आहेत. चंद्रकांत वानखेडे, तुकाराम निरगुडे, अमर हबीब, राजीव बसग्रेकर, रमेश चिल्ले, बाबुलाल परदेशी या कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या आठवणीही त्यात असतीलशरद जोशीचं समग्र साहित्य अभ्यासकांसाठी आता उपलब्ध असताना एकच अपेक्षा आहे की, या साहित्याचा किमान अभ्यास न करता कुणी शेतकरी चळवळीवर टीका करू नये.
- श्रीकांत अनंत उमरीकर