Showing posts with label Anna Hazare. Show all posts
Showing posts with label Anna Hazare. Show all posts

Wednesday, August 31, 2011

शरद जोशी तुमचं आता काय करायचं?

 पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या ६ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रकाशित झालेला  अग्रलेख


आदरणीय शरद जोशी,
सा. न.
तुमच्या 76व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा! खरं तर तुम्हाला काय संबोधावं याचाच मोठा प्रश्र्न आहे. शेतकरी संघटनेचे लाखो पाईक तुम्हाला आदरणीय साहेब म्हणतात... पण हे संबोधन काहीसं सरंजामी वृत्तीचं द्योतक, जे तुम्हालाच फारसं पसंत नाहीत. वैयक्तिक संबंधांचा फायदा घेऊन जवळीक दाखविणारं एखादं संबोधन वापरावं तर संयुक्तिक वाटत नाही... म्हणून आपलं नुसतं शरद जोशी असंच म्हणतो. तुम्हाला चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आणि आम्हाला मोठाच आनंद झाला... पण या निमित्ताने एक वेगळाच आणि गंमतशीर विचार मनात येतोय... परवाच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाने बर्‍याच विद्वानांना खरंचच असा प्रश्र्न पडला असावा, ‘शरद जोशी तुमचं काय करायचं?’
शेतकरी संघटनेच्या आंदोलनावरती बर्‍याच विद्वानांनी टीका करत असताना फार मोठा वैचारिकतेचा आव आणला होता. खरं तर अतिशय शास्त्रशुद्ध अशा पायावर, अभ्यासावर आणि अनुभवांवर तुम्ही आंदोलन उभारलं होतं. तरीही तुमच्यावर टीका करताना बुद्धिवंतांच्या जिव्हा मोकाट सुटायच्या... सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत शेतीच्या शोषणाचा संदेश अतिशय सोपेपणानं तुम्ही पोहोचवलात आणि हे करत असताना कुठेही वैचारिक चौकट ढळू दिली नाही. इतकं करूनही लाखोंच्या संख्येने शेतकर्‍यांचे मेळावे भरवून दाखविले, यशस्वी केले... तुम्ही कधीही काळजाला हात घालणारी भाषा करून हुकमी रडू आणलं नाही; पण तरीही शेतकर्‍यांच्या डोळ्यातून जन्मोजन्मीचं दु:ख घळाघळा वाहत राहिलं. निखळ अर्थशास्त्रावरती आधारलेलं आंदोलन करताना कुठेही लोकांचा प्रतिसाद भेटला नाही, असं घडलं नाही. मोठ्या प्रमाणात लोकं यायला लागले, तेव्हा आपसूकच बुद्धिवंतांच्या पोटात गोळा उठायला लागला आणि त्यांनी ठरवून टाकलं... ज्या अर्थी लोकं येतात त्या अर्थी या आंदोलनात कुठलाही विचार नसणार! आता इतकी वर्षे उलटून गेलीत. तुमच्यावर टीका करणारे सामान्य कार्यकर्तेही नेते बनून फिरायला लागले. त्यांनीही स्वतंत्रपणे आंदोलनं करायला सुरुवात केली; पण तुमच्यासारखं यश, तुमच्यासारखा सर्वसामान्य शेतकर्‍याचा विश्र्वास कुणालाच कमावता आला नाही. तुमचे फोटो शेतकर्‍यांनी देवघरात मांडले. हे भाग्य कुठल्याही नेत्याच्या  वाट्याला आलं नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भल्याभल्यांनी चित्रविचित्र टीका अण्णांवर करायला सुरुवात केली. बुद्धिवंतांना तर अण्णा म्हणजे सगळ्यांत सोपी शिकार! कारण या आंदोलनात खरंचच वैचारिकतेचा अभाव! त्यांच्यावर टीका करणं त्यामुळे सोपं... या आंदोलनावरती बोलतानाही आपली बुद्धी स्थिर ठेवून तुम्ही शांतपणे विश्र्लेषण केलंत. आंदोलनातील लोकांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे हे ऐतिहासिक जनआंदोलन आहे हे नि:शंकपणे मान्य केलंत. स्वत:च्या आंदोलनातल्या मर्यादा स्पष्टपणे सांगितल्या. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील कोरडेपणा आणि त्यामुळे शेतकरी आंदोलनाला आलेलं गद्यपण हेही मान्य केलंत; पण हे सगळं मान्य करत असताना अण्णांच्या मर्यादा सांगायला तुम्ही चुकला नाहीत. इतकंच नाही, ज्या आंदोलनाशी अण्णांच्या आंदोलनाची तुलना होते, त्या महात्मा गांधी यांच्या आंदोलनाच्या मर्यादाही तुम्ही सांगितल्या आणि ही सगळी चर्चा कुठे खासगीपणे नव्हे तर दूरदर्शनवर स्पष्टपणे करोडो लोकांसमोर केलीत. आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचंच तुम्ही दर्शन सगळ्यांना दिलंत आणि म्हणूनच म्हणतो, आमचे  विद्वान मोठे बावचळून गेले आहेत. त्यांना प्रश्र्न पडला आहे - ‘शरद जोशी तुमचं काय करायचं?’
सगळ्या पातळ्यांवरती सगळी हत्यारं वापरून झाली. कधी परिस्थितीची, कधी जातीची, कधी निवडणुकांच्या वेड्यावाकड्या तंत्राची, कधी वैचारिकतेचा आव आणत सगळ्या सगळ्या पद्धतींनी तुमच्यावर चढाई करून झालं... पण सगळ्यांतून तुम्ही स्वच्छपणे बाहेर पडून दोन बोटं वरतीच उरलात. आता तुमचं काय करायचं? तुमचा रस्ता भारतीय परंपरेतला तसा नवा रस्ता नाही. गौतम बुद्ध असो, आदि शंकराचार्य असो, किंवा अगदी अलीकडच्या काळातील महात्मा फुले, आगरकर, आंबेडकर असोत या मार्गांनी तुम्ही चालायचं ठरवलंत आणि त्यावर चालत असताना कुणालाच माफ केलं नाहीत... अगदी स्वत:लासुद्धा! जे काही निर्णय घेतले त्याची किंमत सगळ्या परीने मोजलीत आणि म्हणूनच तुम्ही स्वच्छपणे आजही करोडो लोकांसमोर 76व्या वर्षी बुद्धि स्थिर ठेवून स्वत:च्याही चळवळीचं कठोर विश्लेषण करू शकता. स्वत: बुद्धिवंत म्हणवून घेताना अण्णा हजारेंवर टीका करणं ही फार सोपी आणि सोयीची गोष्ट असते; पण शरद जोशींवर टीका करताना आपण हळूहळू नि:संदर्भ, निस्तेज आणि नि:सत्व होत जातो हेच बर्‍याच जणांना कळत नाही. तुम्ही 93 साली म्हणालात - ‘नोकरशाही हा प्रचंड मोठा भस्मासूर आहे’ आणि अण्णांच्या आंदोलनावर  चर्चा करताना नोकरशाहीचा विषय येतो आणि परत तुमच्याच मुद्यापाशी येऊन थांबावं लागतं. कापसाचे भाव 7 हजारांच्या पुढे गेल्यावर निर्यातबंदीची कुर्‍हाड सरकार चालवतं आणि त्याचा झटका बसताच मोठी तीव्र प्रतिक्रिया उमटते. परत विषय येतो तो तुम्ही सांगितलेल्या खुल्या निर्यातीचा... खताच्या अनुदानाचा खेळखंडोबा होत राहतो, ग्रामीण दारिद्य्राचा प्रश्र्न कुठलीही रोजगार योजना, कुठलीही निराधार मदत योजना, कुठलीही धान्य वितरण व्यवस्था सोडवू शकत नाही आणि परत येऊन थांबावं लागतं तुम्ही सांगितलेल्या शेतीमालाच्या रास्त भावापाशीच. शेतकरी आंदोलनाला उलटलेली 31 वर्षे आणि तुमच्या वयाची उलटलेली 76 वर्षे परत आम्ही तुम्ही सांगितलेल्या उत्तरांपाशीच येऊन थांबतो. सांगा शरद जोशी तुमचं आता काय करायचं?

Friday, August 19, 2011

राहूलबाबा हे काय केले !



.............................................................
21 ऑगस्ट २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
.............................................................



उत्तर प्रदेशात शेतकर्‍यांच्या जमिनीसंदर्भात राहूल गांधी काहीतरी करायला काय गेले आणि त्यातून भलतेच काय निघाले? मायावतींच्या विरोधात आंदोलन छेडत सामान्य शेतकर्‍यांची बाजू आपण घेतो आहोत असं दर्शविणार्‍या राहूल गांधींना ही कल्पना नव्हती, भारतभर नेमकी उलटी परिस्थिती आहे. कॉंग्रेसचं शासन आहे त्या सर्व राज्यांतही शेतकर्‍यांवरती जमिनींबाबत असाच अन्याय वर्षानुवर्षे होत राहिला आहे. परवाच्या मावळच्या गोळीबारात बळी पडलेल्या शेतकर्‍यांच्या रक्ताने ही गोष्ट परत एकदा अधोरेखित झाली आहे. मुख्यमंत्री मायावतींनी दिलेलं उत्तर राजकीय असलं तरी मोठं मार्मीक आहे. जमिनीशी संबंधित सर्व कायदे ही केंद्राच्या अखत्यारितली बाब आहे आणि केंद्रात कॉंग्रेस आघाडीचं सरकार आहे. आता राहूलबाबा काय करणार? निघाले होते चोर पकडायला आणि चोरीचा मुद्देमाल आपल्याच घरात सापडावा, चोराला प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही आपल्याच घरातून व्हावी आणि पुढे चोराला अभयही आपल्याच घरात दिलं जावं असं मोठं विचित्रच घडलं की!
राहूल गांधींचे जे कोणी सल्लागार असतील त्यांचं कदाचित कायद्याचं ज्ञान अपूरं असेल किंवा त्यांनी मुद्दामच चूक सल्ला राहूल गांधींना दिला असणार. एकतर जी गोष्ट कॉंग्रेसने आधीपासून करायची होती, तिचा नेहरूंपासून सगळ्यांनाच विसर पडला. ती म्हणजे सर्वसामान्यांशी जवळीक साधत संवाद साधणे! म्हणून तर 14 ऑगस्टच्या मध्यरात्री लाल किल्ल्यावर नेहरूंच्या हस्ते तिरंगा फडकत असताना महात्मा गांधी मात्र दिल्लीपासून शेकडो मैल दूर होते. पश्र्चिम बंगालात नौआखालीमध्ये दंगलग्रस्तांचे अश्रू पुसणारे त्यांचे हात कोणालाच दिसत नव्हते. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे याने तमाम कॉंग्रेसजणांची मोठ्या धर्मसंकटातून सुटका केली. गांधीजींचा नैतिक दबाव कोणालाच नको होता. त्यांचा खून परस्पर झाला हे बरेच झाले, असं कॉंग्रेसजणांना वाटत असणार. सत्ता गेली अथवा डळमळली की कॉंग्रेसच्या धुरिणांना आणि विशेषत: गांधी कुटुंबियांना लोकांचा उमाळा येतो. त्यामुळेच इंदिरा गांधी बिहारमध्ये पुराने वाहणारी नदी हत्तीच्या पाठीवर बसून ओलांडतात. राजीव गांधी उन्हातान्हात ओरिसाच्या आदिवासी भागात दौरे काढतात; पण हे सगळं फक्त सत्ता नसताना! आताही जेव्हा मोठमोठे घोटाळे समोर यायला लागले, अडकलंय कोण याचा शोध घेण्यापेक्षा अडकलं कोण नाही हे शोधणं सोपं जावं अशी परिस्थिती आणि राहूल गांधी अशावेळी सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे नाटक करण्यासाठी का होईना; पण प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत आहेत. भलेही यातून काहीही निष्पन्न न होवो. राहूलबाबांनी त्यांच्याही नकळत त्यांच्या पणजोबाच्या एका विचित्र कायद्याला हात घातला आहे. जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये अतिशय जुलमी आणि केवळ सुलतानशाहीतच शोभावा असा इंग्रजांनी केलेला जुनाट कायदा आजही आपल्या देशात चालू आहे. याचा साक्षात्कार राहूल गांधींना कॉंग्रेसच्या कुठल्याही राज्यात झाला नाही. झाला तो उत्तर प्रदेशात! गेल्या 21 वर्षांपासून जिथल्या सत्तेत कॉंग्रेसला वाटा राहिलेला नाही. म्हणजे परत एकदा केवळ राजकारणासाठी राहूल गांधी यांनी या प्रकरणाला हात घातला; पण त्यातून निघालं ते भलतंच. आता या निमित्ताने एकूणच जमीन अधिग्रहण कायद्याचा केंद्रीय शासनाला विचार करावा लागणार आहे. राहूल गांधींच्या निमित्ताने का होईना हा विषय ऐरणीवर आला हे बरेच झाले. आता गरज आहे ती प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची. या प्रश्र्नावर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काहीही फरक नाही. भाजपच्या राजवटीतही हा विषय त्यांनी चर्चेला घेतला नव्हता. किंबहुना, घटनेच्या नवव्या परिशिष्टाला कोणीच हात लावू इच्छित नव्हते. हे सगळं घडतं आहे. ते कॉंग्रेसला सर्वसामान्यांचा कळवळा आला म्हणून नव्हे, जागतिक पातळीवर घडणार्‍या मोठमोठ्या उलाढाली आपल्या एकूणच व्यवस्थेवर प्रचंड दबाव टाकत आहेत. आम्ही मांडलेल्या समाजवादी संरचनेतल्या कचकड्याच्या बाहुल्या या नवीन रेट्यात पार कोलमडून गेल्या आहेत. आम्हाला बदल करणं भागच आहे; पण तो आम्ही आतापर्यंत करत नव्हतो. कुठल्याही कारणाने का होईना काहीएक बदल करण्याची निदान तयारी तरी आम्ही दाखवली हेही खूप झालं; पण यातून जे काही बाहेर येईल त्याचा कुठलाच फायदा कॉंग्रेसला होण्याची शक्यता नाही, कारण हे त्यांचंच गेल्या 50 वर्षांतलं पाप आहे. आरक्षण चित्रपटात प्रतिक बब्बर शेवटच्या प्रसंगात आपल्या भ्रष्ट बापाच्या विरोधात उभं राहतो आणि त्याला संस्थेवरून निष्काशित करण्याची विनंती हेमामालिनीला करतो. तसंच काहीसं राहूल गांधी यांना करावं लागणार आहे आणि ही विनंती त्यांना त्यांच्या आईलाच करावी लागेल. माझ्या वडिलांनी नाही त्यांच्या आईनेही नाही, तर तिच्याही वडिलांनी केलेली पापं आपण धुवून टाकूयात आणि असं केलं, तर आणि तरच आपला निभाव लागू शकेल. अन्यथा आपला निभाव लागणे कठीण आहे. 
पण असे होणार नाही. भारतीय राजकारणाचा दिग्दर्शक प्रकाश झा नाही. खरे तर ही परिस्थिती कॉंग्रेसच्याही ताब्यात उरलेली नाही. एक विचित्र अशी अवस्था आज प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळेच स्पष्टपणे मर्यादा कळत असूनसुद्धा सर्वसामान्य लोक अण्णा हजारेंना प्रतिसाद देत आहेत. राहूलबाबा हे तुम्ही काय केलंत? नको त्या विषयाला हात घातलात आता बघूत त्याची काय फळं मिळतात!!