Friday, August 19, 2011

राहूलबाबा हे काय केले !



.............................................................
21 ऑगस्ट २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
.............................................................



उत्तर प्रदेशात शेतकर्‍यांच्या जमिनीसंदर्भात राहूल गांधी काहीतरी करायला काय गेले आणि त्यातून भलतेच काय निघाले? मायावतींच्या विरोधात आंदोलन छेडत सामान्य शेतकर्‍यांची बाजू आपण घेतो आहोत असं दर्शविणार्‍या राहूल गांधींना ही कल्पना नव्हती, भारतभर नेमकी उलटी परिस्थिती आहे. कॉंग्रेसचं शासन आहे त्या सर्व राज्यांतही शेतकर्‍यांवरती जमिनींबाबत असाच अन्याय वर्षानुवर्षे होत राहिला आहे. परवाच्या मावळच्या गोळीबारात बळी पडलेल्या शेतकर्‍यांच्या रक्ताने ही गोष्ट परत एकदा अधोरेखित झाली आहे. मुख्यमंत्री मायावतींनी दिलेलं उत्तर राजकीय असलं तरी मोठं मार्मीक आहे. जमिनीशी संबंधित सर्व कायदे ही केंद्राच्या अखत्यारितली बाब आहे आणि केंद्रात कॉंग्रेस आघाडीचं सरकार आहे. आता राहूलबाबा काय करणार? निघाले होते चोर पकडायला आणि चोरीचा मुद्देमाल आपल्याच घरात सापडावा, चोराला प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही आपल्याच घरातून व्हावी आणि पुढे चोराला अभयही आपल्याच घरात दिलं जावं असं मोठं विचित्रच घडलं की!
राहूल गांधींचे जे कोणी सल्लागार असतील त्यांचं कदाचित कायद्याचं ज्ञान अपूरं असेल किंवा त्यांनी मुद्दामच चूक सल्ला राहूल गांधींना दिला असणार. एकतर जी गोष्ट कॉंग्रेसने आधीपासून करायची होती, तिचा नेहरूंपासून सगळ्यांनाच विसर पडला. ती म्हणजे सर्वसामान्यांशी जवळीक साधत संवाद साधणे! म्हणून तर 14 ऑगस्टच्या मध्यरात्री लाल किल्ल्यावर नेहरूंच्या हस्ते तिरंगा फडकत असताना महात्मा गांधी मात्र दिल्लीपासून शेकडो मैल दूर होते. पश्र्चिम बंगालात नौआखालीमध्ये दंगलग्रस्तांचे अश्रू पुसणारे त्यांचे हात कोणालाच दिसत नव्हते. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे याने तमाम कॉंग्रेसजणांची मोठ्या धर्मसंकटातून सुटका केली. गांधीजींचा नैतिक दबाव कोणालाच नको होता. त्यांचा खून परस्पर झाला हे बरेच झाले, असं कॉंग्रेसजणांना वाटत असणार. सत्ता गेली अथवा डळमळली की कॉंग्रेसच्या धुरिणांना आणि विशेषत: गांधी कुटुंबियांना लोकांचा उमाळा येतो. त्यामुळेच इंदिरा गांधी बिहारमध्ये पुराने वाहणारी नदी हत्तीच्या पाठीवर बसून ओलांडतात. राजीव गांधी उन्हातान्हात ओरिसाच्या आदिवासी भागात दौरे काढतात; पण हे सगळं फक्त सत्ता नसताना! आताही जेव्हा मोठमोठे घोटाळे समोर यायला लागले, अडकलंय कोण याचा शोध घेण्यापेक्षा अडकलं कोण नाही हे शोधणं सोपं जावं अशी परिस्थिती आणि राहूल गांधी अशावेळी सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे नाटक करण्यासाठी का होईना; पण प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत आहेत. भलेही यातून काहीही निष्पन्न न होवो. राहूलबाबांनी त्यांच्याही नकळत त्यांच्या पणजोबाच्या एका विचित्र कायद्याला हात घातला आहे. जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये अतिशय जुलमी आणि केवळ सुलतानशाहीतच शोभावा असा इंग्रजांनी केलेला जुनाट कायदा आजही आपल्या देशात चालू आहे. याचा साक्षात्कार राहूल गांधींना कॉंग्रेसच्या कुठल्याही राज्यात झाला नाही. झाला तो उत्तर प्रदेशात! गेल्या 21 वर्षांपासून जिथल्या सत्तेत कॉंग्रेसला वाटा राहिलेला नाही. म्हणजे परत एकदा केवळ राजकारणासाठी राहूल गांधी यांनी या प्रकरणाला हात घातला; पण त्यातून निघालं ते भलतंच. आता या निमित्ताने एकूणच जमीन अधिग्रहण कायद्याचा केंद्रीय शासनाला विचार करावा लागणार आहे. राहूल गांधींच्या निमित्ताने का होईना हा विषय ऐरणीवर आला हे बरेच झाले. आता गरज आहे ती प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची. या प्रश्र्नावर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काहीही फरक नाही. भाजपच्या राजवटीतही हा विषय त्यांनी चर्चेला घेतला नव्हता. किंबहुना, घटनेच्या नवव्या परिशिष्टाला कोणीच हात लावू इच्छित नव्हते. हे सगळं घडतं आहे. ते कॉंग्रेसला सर्वसामान्यांचा कळवळा आला म्हणून नव्हे, जागतिक पातळीवर घडणार्‍या मोठमोठ्या उलाढाली आपल्या एकूणच व्यवस्थेवर प्रचंड दबाव टाकत आहेत. आम्ही मांडलेल्या समाजवादी संरचनेतल्या कचकड्याच्या बाहुल्या या नवीन रेट्यात पार कोलमडून गेल्या आहेत. आम्हाला बदल करणं भागच आहे; पण तो आम्ही आतापर्यंत करत नव्हतो. कुठल्याही कारणाने का होईना काहीएक बदल करण्याची निदान तयारी तरी आम्ही दाखवली हेही खूप झालं; पण यातून जे काही बाहेर येईल त्याचा कुठलाच फायदा कॉंग्रेसला होण्याची शक्यता नाही, कारण हे त्यांचंच गेल्या 50 वर्षांतलं पाप आहे. आरक्षण चित्रपटात प्रतिक बब्बर शेवटच्या प्रसंगात आपल्या भ्रष्ट बापाच्या विरोधात उभं राहतो आणि त्याला संस्थेवरून निष्काशित करण्याची विनंती हेमामालिनीला करतो. तसंच काहीसं राहूल गांधी यांना करावं लागणार आहे आणि ही विनंती त्यांना त्यांच्या आईलाच करावी लागेल. माझ्या वडिलांनी नाही त्यांच्या आईनेही नाही, तर तिच्याही वडिलांनी केलेली पापं आपण धुवून टाकूयात आणि असं केलं, तर आणि तरच आपला निभाव लागू शकेल. अन्यथा आपला निभाव लागणे कठीण आहे. 
पण असे होणार नाही. भारतीय राजकारणाचा दिग्दर्शक प्रकाश झा नाही. खरे तर ही परिस्थिती कॉंग्रेसच्याही ताब्यात उरलेली नाही. एक विचित्र अशी अवस्था आज प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळेच स्पष्टपणे मर्यादा कळत असूनसुद्धा सर्वसामान्य लोक अण्णा हजारेंना प्रतिसाद देत आहेत. राहूलबाबा हे तुम्ही काय केलंत? नको त्या विषयाला हात घातलात आता बघूत त्याची काय फळं मिळतात!!

No comments:

Post a Comment