Wednesday, August 28, 2019

पक्ष फोडण्याचे फळा आले पाप । आपलाही पक्ष फुटे आपोआप ॥


      
उरूस, ऑगस्ट 2019
विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षांतरांची लाट आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी ‘पक्षनिष्ठा नावाची काही गोष्टच शिल्लक राहिली नाही.’ असे विधान त्या पार्श्वभूमीवर केले आहे. 

हे विधान अजीत पवारांनी करण्यातही एक अजब असा योग आहे. स्वत: अजीत पवारांना राजकीय कारकीर्द सुरू केल्यापासून कायमच सत्तेत रहाण्याची सवय राहिली आहे. मुळात शरद पवारांचे एकूणच राजकारण कायमच सत्तेभोवती केंद्रित राहिलेले आहे. त्यांनी अगदी तरूण वयात 35 आमदार सोबत घेवून कॉंग्रेस पक्षात फुट पाडली व  विरोधी पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पद प्राप्त केले. 100 आमदार असलेला जनता पक्ष त्यांना पाठिंबा देत होता पण कुणीही असा प्रश्‍न उपस्थित केला नाही की केवळ 35 आमदारांच्या नेत्याला मुख्यमंत्री पद कसे काय? तेंव्हा केवळ इंदिरा गांधींच्या विरोधात सर्व एकत्र आले होते. या फोडाफोडीचे कुणाला काहीच तेंव्हा वाटले नाही. 

अवघ्या दोनच वर्षांत केंद्रातील सरकार पडले. इंदिरा गांधींनी आपल्या वैयक्तिक करिश्म्याच्या बळावर कॉंग्रेसच्या आपल्या गटाला संसदेत बहुमत मिळवून दिले. इंदिरा गांधींनी जनतेने आपल्याला केंद्रात निवडून दिले आहे या नावाखाली महाराष्ट्रातील शरद पवारांचे सरकारही बरखास्त केले. परत नव्याने निवडणुका घेतल्या. त्यात इंदिरा कॉंग्रेसला लोकांनी निवडून दिले. यशवंतराव चव्हाणांसारखे शरद पवारांचे गुरूही तेंव्हा इंदिरा कॉंग्रेसमध्ये परतले. शरद पवार मात्र ‘समाजवादी कॉंग्रेस’ नावाने आपला वेगळा पक्ष करून राहिले. त्यांच्या भोवती महाराष्ट्रातील शेकाप, समाजवादी पक्ष अगदी तेंव्हाचा भाजप सगळे पक्ष गोळा झाले होते. या गटाला पुरोगामी लोकशाही दल ‘पुलोद’ असे म्हटले जायचे. 1985 ची निवडणुक पवारांनी या ‘पुलोद’ आघाडी करून लढवली. थोड्या थोडक्या नव्हे तर 105 इतक्या जागा पुलोदला मिळाल्या होत्या. पण सत्ता मिळाली नाही.

पवारांना सत्तेचा हा विरह फार काळ सहन झाला नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस केंद्रात प्रचंड बहुमताने विजयी झाली. देशभर कॉंग्रेसमध्ये परतायचे वेध जून्या कॉंग्रेस जनांना लागले. शरद पवारांनीही आपला पक्ष 1986 मध्ये औरंगाबादेत आमखास मैदानावर मोठा मेळावा घेवून पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये विसर्जीत केला. सत्तेसाठी आपण कुठल्याही ‘आम’ लोकांसोबत नसून सत्तेच्या ‘खास’ खुर्चीसोबतच आहोत हा संदेश शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. 

1989 ला केंद्रात कॉंग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर फेकला गेला पण पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनून सत्तेत होतेच. 1996 ते 1999 ही केवळ तीन वर्षे पवार सत्तेतून बाहेर होते. पण त्यातही देवेगौडा व गुजराल सरकारला कॉंग्रेसचा पाठिंबा असताना शरद पवारांची त्यात मोठी भूमिका होतीच. शिवाय ते 1998 मध्ये वाजपेयींच्या 13 महिन्याच्या रालोआ सरकारच्या काळात विरोधी पक्ष नेता होतेच. 

पवारांनी 10 जून 1999 मध्ये कॉंग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि चारच महिन्यात सत्तेच्या लोभापायी त्याच कॉंग्रेस सोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. 

सत्तेशिवाय आपण राहूच शकत नाहीत हा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना ते सतत देत राहिले. याचा परिणाम इतकाच झाला की त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सत्तेशिवाय रहायचे कसे? पक्ष टिकवायचा कसा? याचे प्रशिक्षण मिळाले नाही. 2004 ते 2014 या काळात तर केंद्रात आणि राज्यातही पवारांचा पक्ष सत्तेत होता. नेमक्या याच काळात त्यांच्या पक्षाची जी काय व्हायची ती वाढ झाली (जास्तीत जास्त 71 आमदार व 9 खासदार) किंवा पक्ष टिकून राहिला. 

1978 ला पवारांनी कॉंग्रेस फोडली. 1991 ला छगन भूजबळांच्या नेतृत्वाखालील 13 आमदारांसह शिवसेना फोडली, बबनराव पाचपुतेंच्या नेतृत्वाखाली 9 आमदारांसह जनता दल फोडला. या सगळ्यांना कॉंग्रेसच्या मांडवाखाली आणून सत्तेचा टिळा लावला. जर पवारांनी आपल्याच कार्यकर्त्यांना सत्तेची चटक लावली असेल, दुसर्‍या पक्षातून माणसे आणून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोचवली असतील तर आता त्यांच्या पक्षातील लोक त्याच कारणासाठी राष्ट्रवादी सोडत असतील तर दोष कुणाला देणार? 

सत्ता नसताना केंद्रात अथवा राज्यातला भाजपचा छोटा मोठा एकही नेता 2004 ते 2014 या काळात फुटला नाही. मग 2014 मध्ये सत्ता जाताच राष्ट्रवादीचे नेते सैरभैर होवून सत्ता का सोडत आहेत? या प्रश्‍नाचे उत्तर अजीत पवार/ शरद पवार/ सुप्रिया सुळे देवू शकतात का?

पवारांच्या समर्थकांची सत्तालालसा इतकी होती की 1995 ला महाराष्ट्रात युतीचे सरकार आले तेंव्हा त्याला पाठिंबा देणार्‍यांत जे अपक्ष आमदार होते त्यात बहुतांश पवारांचेच शिष्योत्तम होते. ज्यांनी पुढे चालून राष्ट्रवादीत प्रवेश करून आपल्या पवारनिष्ठेचा म्हणजेच सत्तानिष्ठेचा पुरावाच दिला. 

रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा असतो, लोकांच्या प्रश्‍नांसाठी लढे उभारायचे असतात हे पूर्णत: विसरूनच राष्ट्रवादी पक्षाची सत्ताकेंद्रि बांधणी करण्यात आली. सत्तेच्या लाभाने पक्षाभोवती जे कुणी गोळा झाले त्यांनाच कार्यकर्ते संबोधल्या गेले. या कार्यकर्त्यांनी सत्तेच्या आश्रयाने आप आपली साम्राज्ये उभी केली. शिक्षण, उद्योग, वृत्तपत्रादी माध्यमे, कला-सांस्कृतिक क्षेत्र या सगळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तेच्या आश्रयाने शिरकाव केला. स्वतंत्रपणे निरपेक्ष वृत्तीने सरकारी मदतीशिवाय सत्तेशिवाय काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांची जी कार्यशैली असते तशी कधीच शरद पवारांच्या कार्यकर्त्यांची राहिली नाही. या सगळ्यांच्या निष्ठा शरद पवारांवर केवळ ते सत्ता प्राप्त करून देवू शकतात म्हणून होत्या. जेंव्हा सत्ता मिळत नाही हे स्पष्ट झाले तस तसे हे कार्यकर्ते दूरावायला सुरवात झाली.

प्रत्यक्ष पक्षातले कार्यकर्ते असे सत्तेसाठी दूर जात असताना अजून एका मोठ्या अडचणीला शरद पवारांना तोंड द्यावे लागत आहे. जनता पक्षाच्या पाठिंब्यावर पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेंव्हापासून महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीच्या गळ्यातले ते ताईत बनले होते. हे पुरोगामी कार्यकर्ते विविध सहकारी संस्था, कामगार संघटना, ऍटो रिक्शा चालक संघटना,  मोलकरणींच्या संघटना, अंधश्रद्धा निर्मुलन, पर्यावरण, धरणग्रस्त, दलित-आदिवासी-भटके- विमुक्त यांच्यासाठी काम करणार्‍या चळवळी चालवायचे. यांचा आधार शरद पवारच होते.

म्हणजे एक मोठा विरोधाभास 1978 ते 2014 पर्यंत महाराष्ट्राने बघितला. एकीकडून गावात अत्याचार करणारा बलदंड असा उच्च जातीचा नेता पवारांच्या पक्षाचा प्रमुख असायचा आणि त्याच गावात ज्याच्यावर अत्याचार होतो त्या दलित ग्रामीण बहुजन आदिवासी भटके विमुक्त यांच्या संघटनांनाही परत पवारांचाच आशिर्वाद असायचा. व्यवस्थेविरोधात कलाकार लेखक विचारवंत हे जोरदार आवाज उठवायचे. त्यांच्या संस्थांना पवारांचेच आशिर्वाद असायचे. आणि हे ज्यांच्या विरोधात आवाज उठवायचे ते परत पवारांच्याच सत्ताधारी पक्षाचे नेते असायचे. 

समाजवादी चळवळीतील कित्येकांनी सक्रिय राजकारणातून सक्तिच्या निवृत्तीनंतर विविध सामाजिक संघटना संस्था सुरू केल्या. या सगळ्यांना पवारांचा आधार असायचा.

आता पवारांच्या हातून सत्ता गेल्यानंतर ही सगळी पुरोगामी मंडळीही अस्वस्थ झाली आहे. हे तर पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नव्हते. पण यांच्या हातात पवारांच्या आधाराने स्वतंत्र अशी वेगळी वैचारिक सांस्कृतिक कलाविषयक सत्ता होती. महाराष्ट्रातील 2014 पर्यंतचे साहित्य संस्कृती कला क्षेत्रातील पुरस्कार कुणाला मिळाले याची यादी तपासा म्हणजे सहजपणे लक्षात येईल. किमान 10 अखिल भारतीय साहित्य संमेलने आणि 50 विभागीय साहित्य संमेलने यांचे उद्घाटक शरद पवारच होते आणि त्या संमेलनांचे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादीचेच नेते होते यातच सर्व काही आले. 

2014 पुर्वी संघ प्रणीत सामाजीक समरसता मंचाच्या व्यासपीठावर गेले म्हणून गंगाधर पानतावणें सारख्या दलित विचारवंतावर पुरोगाम्यांचा बहिष्कार सहन करायची पाळी आली. विनय हर्डिकरांसारख्या लेखकाला संघ पार्श्वभूमीमुळे अकादमी पुरस्कार नाकारण्यात याच पवारनिष्ठ गटाचा दबाव होता.  आज अशी परिस्थिती शिल्लक राहिली नाही. राजकीय लेकांची पक्षांतरे उठून दिसतात पण लेखक कलावंत विचारवंत पत्रकार यांनी हळूच ‘विचारांतर’ करून घेतले आहे, संघ प्रणीत व्यासपीठांवर जायला सुरवात केली आहे हे लवकर लक्षात येत नाही.

पवारांची आयुष्यभर फोडाफोडीचे राजकारण केले. ते पाप त्यांच्याच पक्षाला आता भोवत आहे. सत्ताकेंद्रि पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही, सत्तालोलुप कार्यकर्ता सत्तेशिवाय टिकू शकत नाही हे राष्ट्रवादीच्या सामुहीक पक्षांतरांतून दिसून येते आहे.     

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

Friday, August 16, 2019

कश्मीरी जनमत 370 हटविण्याच्याच बाजूने !


16 ऑगस्ट 2019 

370 कलम संबंधी जे जे विरोधी बाजूने मांडणी करत आहेत त्या सर्वांत एकच समान मुद्दा वारंवार पुढे केला जातो. हा मुद्दा म्हणजे कश्मीरी जनतेला विचारले नाही.

लोकशाही हे मुल्य मानणारे या जाळ्यात अडकतात आणि त्यांच्याही मनात शंका उत्पन्न होते. कश्मीरी जनतेला न विचारता हा इतका मोठा निर्णय घेतला गेला. हा अन्याय आहे.

भारत लोकशाही मानणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. तेंव्हा अशा लोकशाहीप्रेमी देशाने जबरदस्ती करून कश्मीर आपल्या घश्यात घातले. तेंव्हा भारताच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेधच केला पाहिजे. विशेषत: भाजप मोदी शहा यांना या प्रश्‍नावरून झोडलेच पाहिजे. अशी पुरोगामी मंडळींची मांडणी असते.

जनमताची मागणी करणारी पुरोगामी मंडळी जाणीवपूर्वक बुद्धीभेद करत आहेत.

भारतात सामील झालेल्या सर्व संस्थांनांना भारतीय संविधान नंतर लागू झाले. यात कश्मीरही आले. कश्मीरचे सामीलीकरण इतर संस्थानांच्याच पद्धतीने झाले. तेंव्हा ज्या कश्मीर संस्थानच्या सीमा आहेत त्या सर्व सीमांत येणारा प्रदशे हा भारताचा झाला. हा सामीलनामा करताना जनतेचे स्वतंत्र असे मत विचारात घेतले नव्हते. केवळ कश्मीरच नव्हे तर भारतातील सर्व संस्थानांना समील करून घेताना जनमत घेतले गेले नव्हते. ते तसे करणे व्यवहार्यही नव्हते.

1952 पासून नियमित स्वरूपात निवडणुका घेवून मग इतर सर्व निर्णय घेतल्या गेलेले आहेत. एखाद्या प्रश्‍नावर स्वतंत्र जनमत घेतले गेले असे कुठेही घडले नाही. तेंव्हा आताच जनमताची मागणी करणारे कशाच्या आधारावर करत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे.

जम्मु कश्मीरची विधानसभा एक वर्षांपासून बरखास्त आहे. मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार भाजपने पाठिंबा काढल्याने कोसळले होते. खरे तर तेंव्हाच नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस यांनी मेहबुबा यांना पाठिंबा देवून त्यांचे सरकार वाचवायला हवे होते. कारण या सगळ्यांचा भाजप विरोध स्पष्ट होता. पण ते तसे घडले नाही. त्यानंतर तेथे राज्यपाल राजवट अस्तित्वात आली. मेहबुबा मुफ्ती यांनी अधिकृतरित्या राजीनामा दिला. त्यांना कुणीही पदावरून हटवले नव्हते. राज्यपाल हटवू शकतही नव्हते. सभागृहात त्यांना इतर पक्षांच्या आधाराने बहुमत सिद्ध करता आले असते.

2019 ची लोकसभा निवडणुक झाली तेंव्हा भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे तेथे लढला होता. भाजपने 370 हटविण्याबाबतची आपली भूमिका कधीही लपवून ठेवली नाही. सत्ता नसतानाही सातत्याने अगदी आधीपासून ही भूमिका त्यांनी मांडली आहे. तेंव्हा 2019 च्या लोकसभा निवडणुकांत ज्यांनी भाजपला मतदान केले त्यांचा याला पाठिंबा असणार हे गृहीत आहे.

इतर भारतीय मतदारसंघात काय घडले हे बाजूला ठेवू. पण जम्मु कश्मीर मधील ज्या 6 लोकसभा मतदारसंघात निवडणुक झाली त्याची आकडेवारी तरी डोळ्याखालून घालायची की नाही? जनमताची ज्यांना काळजी आहे ते या मतदानाचा विचार करणार की नाही?

2019 च्या लोकसभा निवडणुका जम्मु कश्मीरच्या 6 मतदार संघामध्ये भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच शांततेत पार पडल्या. या सहा पैकी 3 जागा भाजपला मिळाल्या. आणि नॅशनल कॉन्फरन्सला 3 जागा मिळाल्या. म्हणजे आकड्यांच्या भाषेत 6 पैकी 3 म्हणजे 50 टक्के यश भाजपला मिळाले.

प्रत्यक्ष प्राप्त मतांची आकडेवारी अशी आहे. भाजप- 16,48,041. कॉंग्रेस- 10,11,527.  नॅशनल कॉन्फरन्स- 2,80,356 आणि पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टी-84,054. विरोधी मतांची  एकत्र बेरीज केली तरी ती 13,75,937 इतकी होते.

मग जर जम्मू कश्मीर मधील एकूण मतांपैकी भाजपची मते  इतर विराधी मतांपेक्षा जास्त असतील तर हे जनमत कशाचे द्योतक आहे? भाजपला मतदान करणार्‍यांना आधीपासूनच माहित होते की भाजप 370 हटविण्याच्या बाजूने आहे. या उलट इतर पक्षांना मतदान करणारे हे जाणून होते की हे पक्ष 370 रहावे याच बाजूने आहेत. मग त्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून भाजपचा दावा खोडून का नाही काढला?

भाजप हा जम्मु कश्मीर मध्ये कधीही एक राजकीय ताकद म्हणून अस्तित्वात नव्हता. मग काय म्हणून इतर पक्षांना मागे टाकून त्याच्या झोळीत कश्मीरी जनतेने इतक्या मतांचे दान घातले? आज जे वारंवार जनमताची बाब समोर आणत आहेत ते ही आकडेवारी का नजरेआड करत आहेत? 

जम्मूचे खासदार आणि आता केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले डॉ. जितेंद्र सिंह आणि आपल्या तडाखेबंद भाषणाने लोकप्रियता प्राप्त झालले लदाखचे युवा खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी आपल्या प्रदेशाची भावना स्पष्टपणे मांडली ती त्या प्रदेशातील जनतेची भावना नव्हती का? विरोध करणारे नॅशनल कॉन्फरन्सचे हसनान मसुदी हेच केवळ कश्मीरचे प्रतिनिधी मानायचे का? 

यापूर्वी भारतात जेंव्हा राज्यासंबंधी एखादा निर्णय झाला तेंव्हा तो केंद्रातूनच झाला आहे. त्यासाठी त्या प्रदेशातील विधानसभेचा ठराव अनुकूल आहे का प्रतिकूल हे बघितले नाही. अगदी ताजे उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशचे विभाजन झाले तेंव्हा त्या विधानसभेने तसा ठराव केला नव्हता. आज जे ‘जनमत’ मागत आहेत ते तेंव्हा काय भूमिका घेवून बसले होते?

370 च्या निमित्ताने स्पष्टपणे समोर आलेली बाब म्हणजे भारतीय लोकशाहीत संसद सर्वश्रेष्ठ आहे. संसदेत ठरलेले निर्णय सगळ्यांना बंधनकारक आहेत. त्याच्या विरोधात जावून कुणी राज्य किंवा एखादा प्रदेश आपले मत घेवून अडून बसला असेल तर ती समस्या सोडविण्याची सर्वोच्च जागा परत संसद हीच आहे. जम्मू कश्मीर प्रदेशातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांचा  विचार केला तरी त्यातून जो कल दिसतो तो 370 हटविण्याच्याच बाजूनेच आहे हे मान्य करावे लागते.

केवळ कश्मीरच नाही तर आता पाकव्याप्त कश्मीर, अक्साई चीन हा सगळा प्रदेश (नकाशात आपण पाहतो तो सर्व) अधिकृत रित्या आपल्या ताब्यात असायला हवा. यात कुठलीही युद्धखोरी नाही. यात कुठलीही दडपशाही नाही. महाराजा हरिसिंह यांनी जो सामीलनामा भारतासोबत केला त्यात त्यांच्या संस्थांच्या सर्व सीमा म्हणजेच भारतीय प्रदेश आहेत. संसदेत देखील या प्रश्‍नावर कुठलाही संशय गृहमंत्री अमीत शहा यांनी ठेवलेला नाही.
ज्यांना सध्याच्या कश्मीरी जनमताची चिंता आहे त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांतील मतांचे आकडे समजून घ्यावेत. ज्यांना समजून घ्यायचे नाहीत त्यांच्याशी कसलाच प्रतिवाद न करता त्यांच्याकडे पूर्णत: दूर्लक्ष करायला हवे.
   
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

Sunday, August 11, 2019

कॉंग्रेस अध्यक्षपदाला ‘370’ कलम लागू !



11 ऑगस्ट 2019 

सोमवारी व मंगळवारी संसदेत मतदान होवून 370 कलम हटवल्या गेले. पण आता प्रश्‍न आला की या कलमाचे काय करायचे? ते काश्मिरमधून हटवले पण आता ते कुठे ठेवायचे?

लोकसभेचे निकाल 23 मे ला लागले. तेंव्हापासून आजपर्यंत म्हणजे तब्बल 80 दिवस कॉंग्रेस अध्यक्षपद रिकामे होते.  त्यावर कुणाला बसवावे अशी ‘घमासान’ चर्चा झाली. गांधी कुटूंबातील कुणीच अध्यक्ष राहणार नाही असे ‘ठामपणे’ सांगितल्यानंतर सर्व कॉंग्रेसजनांनी एकमताने ठामपणे गांधी शिवाय कुणीच अध्यक्ष असणार नाही असा स्वाभिमानाने ताठ कण्याने निर्णय घेतला आणि 10 ऑगस्टच्या रात्री ‘तरूण तडफदार’ सोनिया गांधींना अध्यक्ष म्हणून निवडले.

तूमच्या पक्षाला अध्यक्षच नाही असे म्हणून टिव्हीवरील चर्चात सतत टोमणे मारणार्‍यांच्या तोंडावर महान परंपरा असणार्‍या कॉंग्रेस पक्षाने करारी ‘तमाच्या’ मारला आहे. सगळे पूर्वग्रह दूषीत लोक सतत आरोप करत होते की कॉंग्रेसवाले गांधी घराण्याचे ‘गुलाम’ आहेत. पण आपण ‘गुलाम’ नसून आदर्श ‘नबी’ (शिष्य) असल्याचे दाखवत तत्त्वासाठी आपण गुरूचेही ऐकत नाही हे कॉंग्रेसजनांनी सिद्ध केले आहे. गांधी घराण्याचे न ऐकता आपण ‘आझाद’ असून ‘गांधी घराण्यातील कुणीच अध्यक्ष असणार नाही’ हे बिल्कुल ऐकणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.

पंडित नेहरू इंदिरा गांधी काळात भारताची रशियाशी विशेष मैत्री होती. रशियात तेंव्हा लोकांना हवे ते दूरदर्शन चॅनेल पाहण्याचे स्वातंत्र्य होते. पण प्रत्येक चॅनलवर स्टॅलिनचेच भाषण ऐकायला मिळायचे. त्या प्रमाणे कॉंग्रेस पक्षात हवा तो अध्यक्ष निवडायचे पूर्ण स्वातंत्र्य कॉंग्रेसच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांना दिल्या गेले होते. पण प्रत्येकाने सुचवलेले नाव गांधी घराण्यापैकीच होते त्याला काय करणार? आणि मा. खा. राहूल गांधी यांनी वेताळाप्रमाणे खुर्ची सोडण्याचा आपला हट्ट सोडलाच नाही. प्रियंकाताई यांनीही निस्पृहपणे खुर्चीला स्पर्श करणार नाही असे सांगितले. मग अपरिहार्यपणे महान त्यागी सोनिया गांधी यांनाच ती खुर्ची स्वीकारावी लागली.

तसे तर चि. कु. रीहान रॉबर्ट वडरा गांधी याने अध्यक्षपदी बसावे असा प्रस्ताव आला होता. महाराष्ट्रातील काही महान नेत्यांनी थोर शहाजी राजे यांनी निजामशाहीचे वंशज 8 वर्षीय मुर्तूजा यांना मांडीवर बसवून निजामशाहीची गादी वाचवली होती याचा दाखला दिला. लगेच काही कार्यकर्ते उत्साहात येवून 18 वर्षीय चि.कु. रीहान रॉबर्ट वडरा गांधी यांस मांडीवर घेण्यास तयारही झाले. पण मांडीवर घेवून कोणी बसावे यावर काही एकमत होईना. मग सोनिया आज्जीच्या मांडीवर त्यास बसवून कारभार चालवावा असे ठरले. तर आज्जीची तब्येत पडली ‘नरम गरम’. नातवाला मांडीवर बसवून आपल्याला जास्तीच आजारी पाडायचा डाव असावा असा संशय आल्या कारणाने आज्जीने स्वत:च स्वत:च्या मांडीवर बसायचे ठरवले. त्याप्रमाणे डिसेंबर 2017 मध्ये राजीनामा दिलेल्या जून्या सोनिया गांधी यांनी आत्ताच्या ताज्या तरूण तडफदार सोनिया गांधी यांना मांडीवर घेवून अध्यक्षपदाची गादी स्वीकारली.

पूर्वी दक्षिणेत या पद्धतीने निजामशाही, अदिलशाही, कुतूबशाही, इमादशाही, बरिदशाही यांच्यात गादीबद्दल गोंधळ झाल्यास उत्तरेत मोगल सल्तनेत आनंदाने मिठाई वाटल्या जायची. आता उत्तरेतील कॉंग्रसच्या सोनियाशाही सल्तनतीत गादीनशीन समारंभावरून सादर झालेली ‘नौटंकी’ पाहून भाजप सम्राटांच्या दरबारात आनंदाचा माहौल पसरला असल्याची गोपीनीय कुणाला न सांगावी अशी ‘पक्की’ खबर आहे.

मोदी शहांनी काश्मिरातून हटवलेले 370 व 35 अ कलम गुपचूप कॉंग्रेस अध्यक्षपदाला लागू केले आहे. तिथे आता ‘गांधी’ असल्याशिवाय कुणालाच अध्यक्षपदाची जमिन अधिग्रहीत करता येणार नाही.

संसदेत 370 कलम पास होण्यासाठी सोनिया गांधी आणि अमीत शहा यांची मिलीभगत असल्याची चर्चा आहे. रिकामे पडलेले 370 कलम आता कॉंग्रेस कार्यालयात सुखनैव नांदत आहे. चि.कुमार रिहान आणि चि.कुमारी मिराया यांना भविष्यात गादीनशीन होण्यासाठी खास तालीम देण्यासाठी ए.के. अँटनी, दिग्विजय सिंह, अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे या शिक्षकांची नेमणूकही तातडीने केली गेली आहे.

श्रावणातील शनिवारची ही कहाणी आहे. जी शहाणी माणसे असतील ती ही कहाणी कुणालाही न सांगण्याची अट पाळून पुढे पाठवतील. ज्यांना हे गुपीत कळेल त्यांनीही कुणाला सांगू नये. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

Thursday, August 1, 2019

कालिदासाच्या उपेक्षीत ‘ऋतुसंहार’चा मराठी भावानुवाद


संबळ, अक्षरमैफल, ऑगस्ट 2019

कालिदासाच्या स्मृतीत आषाढाचा पहिला दिवस ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ साजरा केला जातो. कालिदासाच्या सर्वात लोकप्रिय ‘मेघदूता’तील दुसर्‍या श्लोकातच हा आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख आहे. कालिदासाचे नाटक ‘शाकुंतल’ हे जास्त चर्चिले गेले. काव्यामध्ये मेघदूता खेरीज ’रघुवंश’ व ‘कुमारसंभव’ ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. कालिदासाच्या एकूण उपलब्ध 7 रचनांपैकी ऋतुसंहार व विक्रमौर्वशीय या दोन काहीशा उपेक्षीत आहेत. 

3 जूलै हा दिवस या वर्षी आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने औरंगाबाद येथे धनंजय बोरकर यांचे कालिदासाच्या ऋतुसंहार काव्यावर एक व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. 

धनंजय बोरकर यांनी कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’चा मराठीत भावानुवाद केला आहे. या भावानुवादाच्या दोन आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. 

बोरकर हे अभियंता असून भारतीय संरक्षण खात्यात त्यांची अधिकारी म्हणून काम केले आहे. एअर इंडिया मुंबई आणि सिंगापुर एअरलाईन्स येथेही त्यांनी काम केले आहे. निवृत्तीनंतर बोरकरांनी संस्कृतच्या ध्यासातून संस्कृत काव्याचा अभ्यास करायला सुरवात केली. जयदेवाच्या ‘गीत गोविंद’चे त्यांचे भाषांतरही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. 

सहा ऋतूंचे सहा सर्ग अशी मांडणी ‘ऋतुसंहार’ या खंडकाव्याची आहे. या काव्याची सुरवात वसंताने न होता ग्रीष्माने होते. कदाचित कालिदास मूळचा काश्मिरी असल्याने ग्रीष्मापासून सुरवात केल्याचा उल्लेख बोरकरांनी प्रस्तावनेत केला आहे. चार वेदांत अथर्ववेदाच्या सहाव्या कांडात ग्रीष्माचा उल्लेख पहिला ऋतू म्हणून येतो. अथर्ववेदाच्या एका शाखेचा उगम काश्मिरात आहे. त्यामुळे कालिदासही अशी मांडणी करत असावा. यापेक्षा दुसरा एक तर्क पटण्यासारखा आहे. कालिदासाच्या रचना या सुखांत आहेत. त्यामुळे सुरवात जर ग्रीष्मापाशी केली तर आपोआपच शेवट वसंतापाशी येतो. तेच जर सुरवात वसंतापाशी केली तर शेवट शिशीरात म्हणजेच पानगळीत होतो. हे कालिदासाच्या प्रकृतीला रूचणारे नाही.

मूळात कालिदासाला ऋतूवर्णनाची आवडच असल्याचे मिराशींसारख्या विद्वानांनी आपल्या अभ्यासातून मांडले आहे. कुमारसंभव-वसंत ऋतू, विक्रमोर्वशीय-वर्षा ऋतू, मेघदूत-वर्षा ऋतू, शाकुंतल-ग्रीष्म, आणि रघुवंशात जवळपास सर्वच ऋतूंची वर्णने आलेली आहेत.  

  ‘ऋतुसंहार’ मध्ये ग्रीष्माच्या पहिल्या सर्गात 28 श्लोक आहेत. ‘प्रचंडसूर्य: स्पृहणीयचंद्रमा:’ या पहिल्याच श्लोकाचे बोरकरांनी अतिशय सुलभ असे भावांतर केले आहे

प्रखर सुर्य तापतो नी चंद्र वाटतो हवा
जलाशयहि आटले जलौघ ना दिसे नवा
दिवस तप्त करत स्नान मदनही विसावला
जनावनास तापवीत ग्रीष्म आज पातला॥

विरोधी प्रतिमा वापरण्याची कालिदासाची शैली या अगदी पहिल्या श्लोकापासूनच दिसून येते.कालिदासाचे हे पहिले काव्य समजले जाते. ग्रीष्मात सूर्य प्रखर असा तळपत आहे आणि त्या सोबतच याच ऋतूत रात्री शीतल असा चंद्र अनुभवावयास येतो आहे. जितका दिवस तापलेला तितकी चंद्रप्रकाशात न्हालेली रात्र शीतल आहे. 

भावानुवादात बोरकरांनी काही ठिकाणी मुळ संस्कृत शब्द तसेच ठेवूनही त्याला मराठी बाज चढवला आहे. कारंज्यासाठी कालिदासाने ‘जलयंत्र’ हा जो संस्कृत शब्द योजला आहे त्याचा तसाच वापर बोरकर करतात. त्याने मुळचे सौेदर्य कायम राहते. 

होत मुदित कौमुदीत सैर रात्र उजळता
शैत्य मिळतसे तनूस जलयंत्री खेळता।
 
अशी छान रचना ते करून जातात.
बोरकरांनी भावानुवाद करताना साध्या शब्दांसोबतच शब्दरचनाही मराठी वळणाची सोपी ठेवली आहे. संस्कृत शब्दरचना कोड्यासारखी उलगडत जाणारी असते. तशी शैली मराठीत कामाची नाही. 

ग्रीष्मातीलच एक वर्णन असे आहे की प्रचंड असा उष्मा जाणवत आहे. तहानेने सर्व जीवजंतू व्याकूळ झाले आहेत. एरव्ही एकमेकांच्या जीवावर उठलेले प्राणीही जलाशयी मात्र सोबतच तहान भागवत आहेत. असे अद्भूत चित्र एरव्ही कधी पहायला मिळत नाही. मूळच्या ग्रीष्म सर्गातील 27 व्या श्लोकाचे मराठी रूपांतर बोरकरानी सुबोध मराठीत केले आहे

वणवा देई चटके झाले पशू जणू मित्र
वैर त्यागुनी गवे सिंह अन कुंजर एकत्र ।
घरे सोडूनी निघती सारे अतीव खेदाने
उतारावरी वाट पुळणिची नव्या उमेदीने ॥

पहिल्या सर्गाचा शेवट करताना ग्रीष्म्याचा दाह सह्य होण्यासाठी रात्री चांदण्यात गीत संगीताची मैफल जलयंत्रांभोवती बसून रसिकांनी रंगवली आहे अशी शब्दकळा कालिदासाने योजली आहे. कालिदासाच्या ओळी आहेत, ‘सुख सलिलनिषेक: सेव्यचन्द्रांशुजाल:’ याचे भावांतर बोरकर सहजपणे ‘उडो फवारे सुखद जलाचे शुभ्र चांदण्यात’ असे करतात. 

दुसरा सर्ग वर्षा ऋतूचा आहे. वर्षाऋतू मनाला भावणारा आहे. एखाद्या राजाप्रमाणे त्याची स्वारी कशी वाजत गाजत येते आहे. स्त्रीयांनी भरलेले घडे राजासमोर रिते करावेत, शृंगारलेल्या हत्तींचे पथक पुढे चालले आहे, चौघडे वाजत आहेत

कृष्णमेघ संपृक्त जाहले भरले जेवी घडे
पथक चालले मत्त गजांचे शोभायात्रेपुढे
वीज कडाडुनि मेघामधुनी वाजतात चौघडे
वर्षाऋतुची राजसवारी रसिकमना आवडे ॥

बोरकरांची ही रचनेची साधी शैली पाहिली की ही मुळची मराठीच कविता आहे की काय अशी शंका येत राहते.  पण हे करत असताना कालिदासाच्या मूळ कवितेतील भावाला कुठेही धक्का पोचत नाही हे महत्त्वाचे आहे. 

अप्रतिम कल्पना विस्तार, उपमा, शब्दसौंदर्य यांच्या बाबतीत कालिदासाचा हात धरणारे कुणी नाही याचा प्रत्यय या पहिल्या साहित्यकृतीतही आढळते. याच ‘ऋतूसंहार’ मध्ये वर्षा ऋतूच्या सर्गात 14 व्या क्रमांकाच्या श्लोकात कमळे नसल्याने भूंगे काय करावे हे न सुचून भ्रमित झाले आहेत. अशा भूंग्यांसाठी जे वर्णंन कालिदास करतो त्याचा तोय प्रत्यय बोरकरांच्या भावानुवादातही येतो. 

पाठ फिरवुनी मधुप पळाले नसताना कमळे
कर्णमधुर जे करीत होते गुंजारव सगळे
पिसे फुलवुनी नर्तन चाले मयुरांचे दंग
निळ्या पंकजी आशा, वेडा झेपावे भृंग ॥

कमळे न आढळल्याने मोराच्या पिसार्‍यावरच भुंगे भाळले आहेत हे मूळ कालिदासाचे वर्णन मराठीत वाचतानाही प्रभावी वाटते. त्याचा आनंद रसिकांना त्याच तीव्रतेनं घेता येतो. 

या वर्षा ऋतूच्या सर्गात 28 श्लोक आहेत. पुढचा सर्ग अर्थातच शरद ऋतूचा आहे. शरदातील पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या कोजागिरीच्या चांदण रातीसाठी एक सुंदर उपमा कालिदासाने वापरली आहे. उदा. म्हणून तेवढी एकच इथे नोंदवतो. विस्तारभयास्तव सगळी वर्णनं देणं शक्य नाही. धरती आणि आकाश दोन्हीकडे एक समृद्धीची सायच जणू पसरली आहे. तळ्यात पाणी आहे, त्यात राजहंस विहरत आहे. तसाच नभात कोजागिरीचा चंद्र विहरत आहे.  

दिव्य रूप ते आकाशीचे धरतीचे साजिरे
कमळे फुलली स्फटिकजली  अन् निरभ्रव्योमी हिरे
सलिली जेवी मार्ग काढितो राजहंस लिलया
पसरित आभा सखा निशेचा साथ देतसे तया ॥

कालिदासाचा मूळ स्वभाव शृंगाराचाच आहे. त्याला निसर्गाकडे पाहून स्त्रीया आणि स्त्रीकडे पाहून निसर्गच आठवत राहतो. शरद ऋतूच्या सर्गाचा शेवट करताना त्याने जे स्त्रीयांचे वर्णन शरदाच्या माध्यमातून केले आहे त्यातून ही वृत्ती ठळकपणे समोर येते. ही सगळी वर्णनं शालिनतेने येतात. त्यात कुठेही उन्मादकता अश्‍लिलता असे काही आढळून येत नाही. शरदाच्या सौम्य प्रकृतीसारखीच ही वर्णनंही आहेत. 

विकसित कमलापरी नेत्र अन् नेत्र निळी कमळे
हरित तृणाच्या शुभ्र फुलाचे वस्त्र असे आगळे
कुमुदफुलापरी मोहक कांती मादक रूपमती
शारद वनिता फुलवो जीवनी तुमच्या बहुप्रीती ॥

या तिसर्‍या सर्गात 26 श्लोक आहेत. ( शरदातील कमळासाठी खास कुमुद शब्द वापरला आहे. ज्याचा अर्थ शुभ्र कमळ असा होतो. पुढे वसंतातील कमळासाठी पद्म असा शब्द आहे. ज्याचा अर्थ लाल कमळ असा होतो.)

चौथा सर्ग हेमंताचा आहे. या सर्गात तशा काही विशेष अशा रचना नाहीत. पण एक श्लोक मोठा विलक्षण आहे. कर्नाटकातील बेलूर मंदिरावर दर्पण सुंदरीचे एक अप्रतिम असे शिल्प आहे. या शिल्पाला आधार असा संस्कृत साहित्यातील हा श्लोक असावा. हा शृंगार नेमका हेमंत ऋतूतील आहे हे पण विशेष. अन्यथा शृंगारासाठी वसंत किंवा वर्षा किंवा फार तर शरद ऋतूची निवड कालिदासाने केली असती. पण आपल्याकडे बोलीत एक म्हण आहे, ‘उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी’. त्या अनुषंगाने या दर्पण संुंदरीचे वर्णन करण्यासाठी हेमंत ऋतूच योग्य आहे. कालिदासाने हे हेरून हा श्लोक नेमका याच ऋतूत रचला आहे. 

घेत तनुवरी ऊन कोवळे पसरे जे भूवरी
मुखकमला सजविण्या सुंदरी दर्पण घेई करी
पाही अधरी निरखुन आपुल्या जेवी दंतव्रणा
अधरामृत प्राशिता ठेवि तो प्रियकर मागे खुणा ॥

या सर्गातील श्लोक आधीच्या तिन्हीपेक्षा कमी आहेत. या सर्गात 18 श्लोक आहेत.

पाचवा सर्ग शिशिराचा आहे. पानगळीचा हा ऋतू कालिदासाला फारसा भावलेला दिसत नाही. कुठलीही विशेष अशी वर्णनं यात आलेली नाहीत. कालिदास काश्मिर भागातील होता हे पटणारी काही वर्णनं या सर्गात आलेली आहेत. विशेषत: हिमवर्षावाचा अनुभव हिमाचल, काश्मिर भागात येतो तसा इतरत्र येत नाही. हिमांकित थंड रात्रीची वर्णनं कालिदासाने यात केलेली आहेत. 

हिमाच्या झोतांनी अधिकच हवा थंड बनली
तया इन्दूकिरणे झिरपून जणू धार चढली
नभीचे न दिसती पुंज जसे धुरकट नयना
अशा रात्री तेणे गमती सुखदा आज न जना ॥ 

शिशिरात येणारी संक्रांत हा एक मोठा सण मानला जातो. याचे वर्णन शेवटच्या श्लोकात एका ओळीत आलेले आहे. 

’उदंड झाल्या गुळ रेवड्या, रस, साळी, शर्करा
उत्कट रतिरंगाने येई पंचशरा तोरा ।

बाकी या सर्गात फारशी इतर वर्णनं नाहीत. या सर्गात एकूण 16 इतके कमी श्लोक आहेत.

सहावा आणि शेवटचा सर्ग ऋतूराज वसंताचा आहे. वसंत म्हणजे शृंगार रसाची मनापासून आवड असणार्‍या कालिदासासाठी ‘होमपीच’ आहे. या ऋतूत मदन जणू योद्धा बनून हे कामयुद्ध जिंकण्यास निघालेला आहे अशी वर्णनं कालिदासाने केली आहेत. आंब्याचे झाड या ऋतूचे प्रतिक म्हणून समोर येते. एक तर जो डेरेदारपणा आंब्याला आहे तो इतर कुठल्याच झाडाला नाही. त्यामुळे त्याच्या पायथ्याशी घनदाट सावली मिळते. हा जो आकार आंब्याला प्राप्त झालेला आहे तसा डौल इतर कुठल्याच झाडाला नाही. दुसरं म्हणजे अंब्याच्या मोहराचा धुंद करणारा गंध. कोकिळेला त्यामुळे फुटलेला कंठ. कैरी आणि पुढे चालून पिकलेला रसाळ अंबा. म्हणजे रस रंग गंध या सगळ्याचा सर्वोत्कृष्ट अविष्कार इथे प्रत्ययाला येतो. शिवाय नेत्राला सुखद, कोकिळेच्या मधुर आवाजाने कानाला सुखद असा अनुभव देणारा एकमेव वृक्ष म्हणजे आम्रवृक्ष. साहजिकच त्याचे वर्णन करताना कालिदासाच्या प्रतिभेला नवे नवे कोंब न फुटले तरच नवल. वसंताच्या सर्गातील पहिलाच श्लोक याच आम्रवृक्षावर आहे.

आम्रतरूचे नूतन पल्लव बाण तीक्ष्ण साचा
रूंजी घाली माळ भ्रामरी धनुची प्रत्यंचा
हाती घेऊन पहा पातला योद्धा ऋतुराज
मना जिंकण्या प्रणयिजनांच्या चढवितसे साज ॥

काही ठिकाणी अनुवाद करताना बोरकरांना भाषेची आणि वृत्तीचीही अडचण झालेली जाणवते. संस्कृत साहित्यात शृंगार जसा सहज येतो तसा तो मराठीत येत नाही.  वसंत ऋतूचे वर्णन करताना कालिदासाने जी अप्रतिम ओळ लिहून ठेवली आहे

द्रुमा: सपुष्प सलिलं सपद्मम् । स्त्रिया: सकाम: पवन: सुगन्धि: ॥

या ओळीचे भाषांतर करताना स्त्रिया: सकाम: पाशी बोरकर अडतात. हे मराठीत आणताना 

पानोपानी फुले डंवरली जलीजली कमळे
मुक्त खेळता वायुसंगे सुगंधही दरवळे

इथपर्यंतच येवून ते थांबतात. ही अडचण केवळ बोरकरांची नसून मराठी माणसाच्या वृत्तीचीही येत असणार. कारण याचे मराठीत योग्य भाषांतर होत नाही. दूसरी एक अडचण संस्कृत संकेत व्यवस्थेचीही असणार. सलील म्हणजे पाणी इतकेच अपेक्षीत नाही. तिथे तळे सरोवर पाणसाठा असे खुप पैलू आहेत. यासाठी बोरकरांनी शोधलेला मार्ग बरोबर आहे. ‘जलीजली कमळे’ म्हणून ते चांगली योजना करतात. संस्कृत मध्ये पद्म, पंकज, अंबुज, कुमुद, कुवलय ही सगळी कमळासाठीचीच नावे आहेत. पण यात सुक्ष्म अर्थभेद आहेत. (उदा. कुमुद म्हणजे पांढरे कमळ. पद्म म्हणजे लाल कमळ. कुवलय म्हणजे नीळे कमळ). इथे सलिलं सपद्मम् असं कालिदास म्हणतो तेंव्हा त्याला लाल कमळ असे तर अपेक्षीत आहेच पण सोबतच पद्मचा अजून एक अर्थ आहे. तो म्हणजे चंचल असे कमळ. ही चंचलता वसंतातच शोभून दिसते. शरदातील कमळाला कुमुद (मागे उल्लेख आला आहे) म्हणत असतानाच त्याचा कदाचित दुसरा अर्थ शांत कमळ म्हणजेच चंचल नसलेले असा पण असे शकतो. तज्ज्ञांनी शोध घ्यावा. 

वसंत म्हणजे रंगाची उधळण. या ऋतूत मोठी झाडे फुलांनी नटलेली असतात. त्यामुळे ‘द्रुमा: सपुष्प’ असा शब्द कालिदास वापरतो. 

वसंताच्या सर्गात 27 श्लोक आहेत. शेवटच्या श्लोकात हा राजाधिराज कसा शोभतो असे वर्णन परत आले आहे. जसे शरदातील पौर्णिमा महत्त्वाची तशीच नेमकी तिच्यापासून सहा महिन्यांच्या अंतरावर असलेली वसंतातील पौर्णिमा (होळी पौर्णिमा) पण सुंदर आणि महत्त्वाची आहे. या वसंत ऋतूराजाचे वर्णन बोरकरांनी खुप प्रत्ययकारी पद्धतीनं मराठीत आणलं आहे

आम्रमंजिरी बाण जयाचे पलाश होई धनू
भृंगमालिका प्रत्यंंचा अन् मलयानिल वाहनु ।
पूर्णचंद्रमा छत्र जया दे कोकिळ ललकारी
तो ऋतुराजा जीवन तुम्हा देवो हितकारी ॥

पुस्तकाच्या शेवटी बोरकरांनी कालिदासाच्या या काव्यात ज्या ज्या फुलांचे वृक्षांचे संदर्भ आले आहेत त्यांची यादी दिली आहे. सोबतच त्यांची इंग्रजी व मराठी नावे पण दिली आहेत. प्राजक्ताला संस्कृतमध्ये शेफालिका म्हणतात, जाई म्हणजे मल्लिका, कोरांटीला कुरबक म्हणतात अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी नोंदली आहे.

ऋतुसंहारच्या प्रस्तावनेत कालिदासाबाबत माहितीही बोरकरांनी दिलेली आहे. त्यासाठी वापरलेले संदर्भग्रंथ कोणकोणते आहेत त्याचीही यादी पुस्तकाच्या परिशिष्टात जोडली आहे. वा.वि. मिराशींचे ‘कालिदास’ हे पुस्तक तसेही मराठी वाचकांना कालिदास प्रेमींना परिचित आहेच. 

अजिभात संस्कृत वाङ्मय मराठीत आणताना आपल्या परंपरेचा धागा जोडून दाखवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम बोरकर करून जातात. ही बाब आज जास्त महत्त्वाची आहे. काव्याच्या सौंदर्यशास्त्राची ओळखही रसिकांना होते. आधुनिक काव्याच्या नावाखाली एक रूक्षताच जास्त करून पसरवली जाते. अशा काळात आपल्या वाङ्मय परंपरेतील सौंदर्यस्थळे परत रसिकांच्या नजरेखालून घालणे आवश्यक आहे. 

संस्कृतच्या अभ्यासकांनी विविध संस्कृत साहित्याचे मराठी अनुवाद, त्याचा रसास्वाद, त्यावरच्या टीका, काव्याचे भावानुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्याची आज गरज आहे. धनंजय बोरकरांनी हे महत्त्वाचे काम केले. इतरही संस्कृत काव्यांबाबत ते काम करत आहेत. ही मराठीसाठी फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी बोरकरांनी एक रसिक म्हणून लाख लाख धन्यवाद !

श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575