विवेक, उरूस, जूलै 2019
‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं’ अशी कालिदासकृत मेघदूताच्या दुसर्या श्लोकातील ओळ आहे. या ओळीमुळे मेघदुताच्या रचनेचा ऋतू नेमका ओळखता येतो. याच ओळींना अभिवादन करताना आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासाच्या इतर सर्व महाकाव्यांपेक्षाही ज्या छोट्या रचनेला रसिकांची सर्वात जास्त पसंती मिळाली ते काव्य म्हणजे ‘मेघदूत’. 3 जूलै हा दिवस यावर्षी आषाढाचा पहिला दिवस आहे. या निमित्ताने कालिदासाचे स्मरण केल्या जाते.
कालिदासाचे मेघदूत मंदाक्रांता वृत्तात आहे. कुसुमाग्रजांनी ते मराठीत आणताना ‘सुमुदितमदना’ हे वृत्त वापरले आहे. चार ओळींचे श्लेाक चारच ओळींच्या या वृत्तात त्यांनी रचले आहेत.
संस्कृत मेघदूताचा सविस्तर अंगोपांगी अभ्यास भारतीय आणि परकीय भाषांमधुनही खुप झाला आहे. पण या तूलनेत मराठीतील मेघदूतांचा अभ्यास तेवढा झालेला नाही. अभ्यास तर दूरच पण या काव्याचे रसग्रहणही तेवढे झाले नाही. हे होणे गरजेचे आहे. (काही जणांना तर कुसुमाग्रजांनी हा अनुवाद केलाय हेच माहित नाही.)
मेघदूताबाबत आपली भावना कुसुमाग्रजांनी नितळ शब्दांत मांडली आहे,
‘एखाद्या निर्जन बेटावर जातना एकच काव्य नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी ‘मेघदूत’या काव्याचीच निवड करीन असे मला वाटते.
... कालिदासाच्या प्रतिभेचे सर्वोच्च स्वरूप या काव्यात दिसते की नाही यासंबंधी वाद होऊ शकेल, परंतु त्याच्या रसिकतेचे आणि विविध सौंदर्याचा आस्वाद घेण्याच्या सामर्थ्याचे सर्वोत्कृष्ट स्वरूप या काव्यात व्यक्त झाले आहे, हे मला वाटते सर्वांनाच मान्य करावे लागेल.’
कुसुमाग्रज सांगतात तेच या काव्याचे बलस्थान आहे. रसिकांनी लोकप्रियतेची मोहोर यावर लावली त्याचेही कारण हेच आहे.
कालिदासाच्या अफाट प्रतिभेच्या खळाळत्या प्रवाहात लहानसा का होईना कुसुमाग्रजांच्याही प्रतिभेचा आविष्कार या अनुवादातून झुळूझुळू वहाताना दिसतो.
दुसर्या श्लोकात मूळ संस्कृतमध्ये जिथे ‘कनक वलय’ असा शब्द येतो त्याचे मराठीतील रूप ‘सोन्याचे कंकण’ येते तेंव्हा त्याचे सौंदर्य वाढलेले असते.
कृश हातातुन गळून पडले सोन्याचे कंकण
कामातुर हो हृदय कामिनी दूर राहिली पण
आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतापरी
नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रीडांगण !
कालिदासाने अतिशय रम्य अशा निसर्गवर्णनांतून शृंगार चितारला आहे. कदाचित कुसुमाग्रजांना हाच पैलू जास्त भावला असावा. हा मेघखंड प्रवास करत हिमपर्वतावरून जात असताना कसा दिसेल याचे एक वर्णन अतिशय परिणामकारक पदद्धतीने कालिदासाने केले आहे. त्याचा अनुवाद करताना कुसुमाग्रजांनी ही प्रतिमा तितक्याच तरलतेने मराठीत आणली आहे. उलट कालिदासापेक्षाही ही जागा सरस वाटते.
पक्व फलांकित आम्र जयावर, त्या शैलाच्या शिरी
विराजतां तूं, रंग कृष्ण तव केशकलापापरी,
देवांनीही दृश्य बघावें- वसुंधरेचा स्तन
गौरपीत विस्तर भोंवती श्यामल मध्यावरी !
आता मूळ संस्कृतात ही ओळ ‘मध्ये श्याम: स्तन इव भुव: शेषविस्तारपाण्डु:’ अशी आलेली आहे.
मेघदूत हे केवळ काव्य नाही. तो एका प्रवासाचा कलात्मक आलेख आहे. हिमालयातील एका कड्यावर केवळ पक्ष्याची माळ जावू शकेल असे छिद्र असलेली जागा आहे. आजही ही जागा आढळते. कालिदासाची प्रतिभा इतकी अफाट की त्याने ह्या क्रौंच रंध्राचे नेमके वर्णन आपल्या 57 व्या श्लोकात केले आहे. पक्षी जावू शकतील अशा छिद्रातून मोठा मेघखंड जावयाचा झाल्यास त्याला तिरपे होवून जावे लागेल. या वर्णनांत विष्णु वामन अवतारात पाय उचलून बळीच्या मस्तकावर ठेवतो तसा तू तिरपा होत पाय उचलून पलिकडे ठेव असे वर्णन कालिदास करतो. कुसुमाग्रज मराठीत आणाताना त्या प्रतिमेला शब्दांत पकडताना ‘बलिनियमनो’ यासाठी ‘जिंकायासी बली’ अशी सहजता प्राप्त करून देतात तेंव्हा त्यांच्या प्रतिभेला सलाम करावा वाटतो.
क्रौंच गिरीतिल रंध्र, जयांतुन जाती हंसावली
अमर पताका भृगुराजाच्या धनुर्बलाची भली !
तिरपा होउन जातां त्यांतुन दिसेल शोभा तुझी
चरण जणूं हरि श्यामल उची जिंकायासी बली !
कालिदासाची प्रतिभा अगदी कळसाला पोचली असा जो श्लोक मानला जातो तो म्हणजे उत्तरमेघातील 20 व्या क्रमांकांचा आहे. मूळ श्लोक बहुतेक ठिकाणी दिलेला असतो, (तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्ठी) पण कुसुमाग्रजांचा मराठी अनुवाद फारसा आढळून येत नाही. कालिदासाइतका नाही तरी एका उंचीवर जावू शकेल असा अनुवाद कुसुमाग्रजांनी केलेला आहे
देह मुलायम, दांत मनोहर, अधर तोंडल्यापरी,
उदरकटी कृश, चकित मृगासम नजर जरा बावरी,
स्तनभारानें लवली किंचित, मंद नितंबामुळे,
स्त्रीरूपाची पहिली प्रतिमा हीच विधाता करी !
कालिदासाचा कालखंड चौथ्या व पाचव्या शतकाच्या दरम्यानचा मानला जातो. (कालिदास, वा.वि.मिराशी, पृ. क्र.40) आज जवळपास 16 शतके होवून गेली आहेत. आजही कुसुमाग्रजांसारख्या प्रतिभावंताला या कालिदासाच्या मेघदूतचा मोह पडतो. त्याचा एक सरस अनुवाद त्यांच्या लेखणीतून उतरतो. या मेघदूतवर मागच्या वर्षी औरंगाबाद शहरात सुंदर गीत संगीत नृत्यात्मक कार्यक्रम पार पडला होता.
या वर्षी कालिदासाच्याच ‘ऋतुसंहार’ या निसर्गवर्णनपर सुंदर काव्यावर नृत्य-नाट्य-गायन-वादन असा एक सुंदर अभिजात कलाकृतीचा आनंद देणारा कार्यक्रम महागामी गुरूकुलाच्या वतीने औरंगाबादेत सादर करण्यात आला. ओडिसी व कथ्थक नृत्य शैलीत बांधलेला हा नृत्याविष्कार रसिकांना चकित करून गेला. अगदी वेशभुषा, केशभुषा यांचा अभ्यासपूर्ण कलात्मक केलेला वापर, संगीताचा वापर करताना जाणीवपूर्वक कालिदासाच्या काळाचा आभास देणारी वाद्ये (पखवाज, मर्दल, खोल, सरोद, बांसरी). या सगळ्यांतून एक वेगळी समृद्ध अनुभूती रसिकांना मिळाली.
याच ‘ऋतुसंहार’ चे मराठीत रसाळ असे भाषांतर धनंजय बोरकर यांनी केलेले आहे. बोरकरांच्या भाषणाचा कार्यक्रमही कालिदास दिनाच्या निमित्ताने याच औरंगाबाद शहरात संपन्न झाला.
मराठी कवींनी कालिदासावर प्रचंड प्रेम केले आहे. इतर भारतीय भाषांपेक्षा मराठीत जास्त चांगले आणि सरस अनुवाद मेघदुताचे झाले आहेत. मराठी माणसांना कालिदासाचे मेघदूत जवळचे वाटायचे महत्त्वाचे कारण म्हणजे या काव्याचे जन्मस्थान. नागपूर जवळच्या रामटेकला या कवितेचा जन्म झाला असे मानले जाते. तसा उल्लेखच पहिल्या श्लोकांत आहे.
यामुळे असेल कदाचित मेघदूताचे सर्वात जास्त अनुवाद/रूपांतरे/स्वैर भाषांतरे मराठीतच झाली आहेत. भारताचे अर्थमंत्री सी.डी. देशमुख, कवी कुसुमाग्रज, बा.भ.बोरकर, वसंत बापट, शांता शेळके अशा कितीतरी प्रतिभावंतांना मेघदूताची मोहिनी पडली आणि त्यांनी मेघदूत मराठीत आणले.
हजार दीड हजार वर्षे ही कलाकृती रसिकांना रिझवत आलेली आहे. कालिदासाच्या रूपाने एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा आपल्यापर्यंत येवून पोचते. आजच्या काळातील अगदी 14 वर्षाच्या मुलीला कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ वर ओडिसी नृत्य करावे वाटते, एका तरूण वासरीवादकाला आपल्या वंशीचे हळूवार स्वर कालिदासाच्या शब्दांभोवती गुंफावे वाटतात, कुणा तरूण अभिवाचकाला मेघदुतचे शब्द आपल्या ओठांवर खेळवताना सांस्कृतिक परंपरा जतन केल्याचे अनिवार समाधान लाभते आणि रसिकांना हे सर्व पाहताना ऐकताना एक समृद्ध करणारा अनुभव येतो.
इग्लंडचे लोक शेक्सपिअरचे अभिमानी आहेत असं सतत सांगितलं जातं. आम्हा भारतीयांचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जागतिक मोठ्या लेखकांच्या कलाकृतींचा आनंद घेतोच पण सोबत आमचे कालिदासा सारखी अफाट प्रतिभेची उत्तुंग शिखरे आहेत त्यांना सतत आठवत आळवत कलेतून जागवत राहतो.
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
अप्रतिम वर्णन 👍🙏🌹
ReplyDeleteसुंदर वर्णन आषाढस्य प्रथम दिवसें गेल्या वर्षी च्या कार्यक्रमाची आठवण झाली.
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete