Sunday, July 29, 2018

मलिक अंबर कबर- पर्यटक बेखबर !


उरूस, सा.विवेक, जूलै 2018

दक्षिण भारताची एक अस्मिता जागृत करण्याचे काम एका परदेशी गुलामाने केले असे सांगितले तर तरूण पिढीला कदाचित आश्चर्य वाटू शकेल. ज्याने शहाजी महाराजांचे लग्न जिजाबाईंशी लावून दिले. ज्याने शिकवलेल्या गनिमी काव्याचा वापर करून पुढे चालून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला. ज्याने जमिनी मोजणीची आदर्श व्यवस्था उभी करून दाखवली. ज्याने महसुलाची रचना आखून दिली. ज्याने शहर नियोजनाचा (टाऊन प्लानिंग) पाया घातला. ज्याने भूमिगत जल योजना 16 व्या शतकात कार्यान्वित करून एक चमत्कार घडविला. ज्याने इमारत बांधकामाचा मध्ययुगात एक सुरेख नमुना सादर केला. औरंगाबाद (तेंव्हाचे खडकी) शहराला देखणेपण प्राप्त करून देणार्‍या मध्ययुगातील 86 वर्षे जगलेल्या या माणसाचे नाव आहे मलिक अंबर.

या मलिक अंबर याचा मृत्यू 14 मे 1626 रोजी झाला. त्याची कबर दौलताबादजवळ खुलताबाद येथे आहे. खुलताबादपासून थंड हवेचे ठिकाण असलेल्या म्हैसमाळला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सुफी संत जर्जरी बक्ष यांच्या दर्ग्यापाशी ही कबर आहे. त्याला लागूनच सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रसिद्ध असे विश्रामगृह आहे. हे विश्रामगृह तेथील कलात्मक चिनीमातीची क्रॉकरी, सोन्या चांदीचा वर्ख असलेली भांडी, या ठिकाणच्या खानसाम्याने बनविलेल्या समिष भोजनासाठी एकेकाळी अतिशय प्रसिद्ध होते. हे ठिकाण सर्वांना माहित आहे. याला लागूनच चार छोटे घुमट आहेत. त्यापैकी सर्वांत टूमदार देखणा घुमट म्हणजे मलिक अंबरची कबर. 

मलिक अंबरचा जन्म नेमका केव्हा झाला याची निश्‍चित माहिती उपलब्ध नाही. पण 1550 मध्ये बगदाद येथे मीर कासीम या व्यापार्‍याने अंबरला गुलाम म्हणून विकत घेतल्याची नोंद आहे. तेंव्हा तो साधारण 10 वर्षांचा असावा. म्हणजे त्याचा जन्म साधारणत: 1540 चा असल्याचे मानावे लागते. हा व्यापारी अहमदनगरच्या निजामाकडे व्यापारासाठी आला असताना निजामशाहीतील एक सरदार चेंगीजखान याने अंबरला त्याच्याकडून खरेदी केले. आपल्या कर्तुत्वाने अंबर निजामशाही सैन्यात पुढे जात राहिला. 1595 मध्ये निजामशाहीत सुंदोपसुंदी-मोगलांचे आक्रमण-चांदीबिबीचा खुन अशा घटना घडत गेल्या. या सगळ्यात मलिक अंबर पुढे सरसावला आणि त्याने निजामशाही मजबूत करण्यास सुरवात केली. चांदबिबी ही निजामशहाची मुलगी व अदिलशाहीची सुन होती. परिणामी या नात्यासंबंधाचा फायदा घेत दक्षिणेतील राजवटींना एकत्र आणण्याचा प्रयास त्याने केला. मोगल हे बाहेरचे असून सर्व दक्षिणेतील राजांनी त्याविरूद्ध एकवटले पाहिजे हा विचार अंबरने पहिल्यांदा मांडला. अंबर हयात असेपर्यंत मोगलांना निजामशाही संपवता आली नाही. पुढे त्याच्या मृत्यनंतर दहा वर्षांतच निजामशाहीचा अंत झाला. 

मलिक अंबरविषयी जहांगीरनाम्यात जो मजकूर आला आहे तो असा, ‘युद्धकला, सेनापतित्व, व्यवहारज्ञान आणि राज्यशासन यांमध्ये मलिक अंबराच्या तोडीचा दुसरा कोणीही आढळत नाही. त्याने दंगेखोर लोकांना धाकामध्ये ठेविले आणि शेवटपर्यंत आपला मोठा दर्जा राखून सन्मानानें आपली कारकीर्द संपविली. इतिहासामध्ये एक हबशी गुलाम एवढ्या मोठ्या पदावर चढल्याचे दुसरे उदाहरण नाही.’

मलिक अंबरचे शहाजी महाराजांवर पूत्रवत प्रेम होते. त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहूनच लखुजी जाधव यांना त्यांची मुलगी त्यांनी शहाजीला द्यावी असा आग्रह अंबरने धरला. लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादवांच्या घराण्याचे वंशज. त्यांना आपल्या घराण्याचा अभिमान. त्या तुलनेत शहाजींचे वडिल मालोजी राजे हे वेरूळचे पाटील. पण मुलगा भविष्यात नाव काढेन हे ओळखून मलिक अंबरने हा आग्रह धरला. जो पुढे खरा सिद्ध झाला. गनिमी काव्याचे तंत्र मलिक अंबरकडून शहाजींनी आणि पुढे शिवाजी महाराजांनी शिकून घेतले.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात जी एक शिस्त होती त्याचे धागेदोरेही मलिक अंबरपर्यंत पोचतात. 

मलिक अंबरने जमिनीची मोजणी करवून घेतली. जमिनीचे बागायती व जिरायती हे दोन प्रकार पक्के करून त्या प्रमाणे सारा ठरवला. जमिनीच्या उत्पन्नाच्या दोन पंचमांश भाग सारा म्हणून देण्याची प्रथा रूढ केली. धान्य रूपाने सारा गोळा करण्याची पद्धतीत दोष आढळून आल्याने पुढे चालून धान्याची किंमत ठरवून त्या किंमतीचा तिसरा हिस्सा रोकड घेण्याची पद्धत त्याने सुरू केली. याचा चांगला परिणाम असा झाला की लढाया सुरू असल्याच्या अस्थिर काळातही  सरकारी खजिना भरलेला राहिला. शेरशहा सुरीने व्यवहारात नाण्यांचा वापर सुरू केला. त्याच्या नंतर शंभर वर्षांनी मलिक अंबरनेही नाण्यांच्या स्वरूपात सारा वसुलीला सुरवात केली. हे पाऊल त्या काळाच्या मानाने फारच महत्त्वाचे होते.  सैनिकांचे पगार, जमिनीची योग्य मोजणी, सारा वसुलीची पद्धत या सर्व गोष्टी पुढे शिवाजी महाराजांच्या काळात मलिक अंबर पद्धतीनेच चालू राहिल्या. त्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर जी जबरदस्त पकड त्या काळात महाराजांची राहिली त्याचे काहीसे श्रेय मलिक अंबरला जाते. 


जून्या औरंगाबाद शहराची रचना पाहिल्यास मलिक अंबर एक शहर रचनाकार म्हणूनही कसा द्रष्टा होता याची साक्ष मिळते. आज थोड्याशा पावसांत शहरांची जी दैना उडते आहे ती पाहिली की मलिक अंबरसारख्यांचे महत्त्व जास्तच जाणवत राहते. पाण्याची व्यवस्था केवळ उमीर उमराव राजे रजवाडे यांच्यासाठीच न करता सामान्य लोकांसाठी करून एक वेगळी दृष्टी मलिक अंबरने दाखवली होती. तो स्वत: गुलामातून पुढे असल्यामुळे असेल कदाचित पण त्याचे सामान्य रयतेवर कायम प्रेम राहिले. त्याने जे सैन्य उभे केले तेही बेरडांचे होते. शिवाजी महारांना मावळ्यांचे सैन्य उभे करण्याची प्रेरणा हीच असावी.
मलिक अंबरच्या कबरीपाशी माहिती फलक अजूनही शासनाने लावला नाही. इतके दिवसांपासून इतिहासप्रेमींनी पाठपुरावा केल्याने कबरीच्या दुरूस्तीचे काम बर्‍यापैकी सुरू झाले आहे. पुरातत्व खात्याने संरक्षीत वास्तु असल्याचा फलक लावला आहे. शिवाय एक चौकीदार नेमून सुरक्षेची सोय केली आहे. कबरीच्या परिसरात जो मुसाफिरखाना आहे त्याच्या दुरूस्तीचे कामही मार्गी लागले आहे. 

खुलताबादमध्ये औरंंगजेबाच्या कबरी बद्दल माहिती दर्शविणारे फलक आहेत. औरंगजेबाच्या पन्नास वर्षे आधी दौलताबाद-खडकी परिसराचा विकास करून या परिसराला सुंदर बनविणार्‍या त्याच कबरीच्या जवळ असलेल्या मलिक अंबर कबरीबाबत मात्र अनास्था आहे. 

औरंगजेबाने आपल्या दक्षिण सुभ्याचा कारभार इथून पाहिला पण ही काही त्याची राजधानी नव्हती. या परिसराला यादवांच्या नंतर मोहमंद तुघलकाने संपूर्ण भारतवर्षाची राजधानी बनवली होती. त्यानंतर या परिसरावर खर्‍या अर्थाने कुणी प्रेम केले असेल जीव लावला असेल तर तो मलिक अंबरने. निजामशाहीची राजधानी त्याने अहमदनगरहून देवगिरी किल्ल्यावर आणली. खडकी या छोट्या खेड्याचे मोठे आकर्षक शहर बनवले. बावन्न पुरे आणि बावन्न दरवाजे असे हे देखणे औरंगाबाद शहर म्हणजे मलिक अंबरचे स्वप्न होय. 

पण याच मलिक अंबरची कबर आज उपेक्षेत आहे. मलिक अंबरच्या सर्व वास्तुंवर साखळीला खालच्या बाजूला जमिनीकडे तोंड करून असलेले फुल असे बोधचिन्ह दगडांत कोरलेले असते. आपण गुलाम होतो याची खुण म्हणजे ही साखळी आणि त्याच्या प्रदेशातील अफगाणी फुल यांना या बोधचिन्हावर स्थान आहे. अगदी अंबरच्या कबरीवरही हेच बोधचिन्ह कोरलेले आहे.

मलिक अंबरने ज्या किल्ल्यावर मोगलांच्या बलाढ्य सेनेचा पराभव करून दक्षिणेच्या राजवटींना जीवनदान दिले तो अंतुरचा किल्ला अजिंठ्याच्या डोंगररांगांत अगदी उपेक्षीत अवस्थेत होता. त्या किल्ल्याच्या डागडुजीचे कामही आता बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे. पण किल्ल्याला जायला चांगला रस्ताच नाही. 

मलिक अंबर कालीन बर्‍याच वास्तु औरंगाबाद परिसरात अगदी धुळखात पडून आहेत. काही दरवाजे तर अगदी मोडकळीस आले आहेत. जे दरवाजे चांगले आहेत त्यांचे तरी सुशोभन करणे व रस्ता त्यांच्या बाजूने काढून देणे गरजेचे आहे.  

मलिक अंबरवर वि.स.वाकसकर यांनी लिहीलेले ‘मलिक अंबर’ हे छोटे पुस्तक (प्रकाशक शब्दालय, श्रीरामपुर) आणि नरेंद्र मोहन यांनी हिंदीत लिहीलेले नाटक वगळता फारसे साहित्य उपलब्ध नाही.  दक्षिणेच्या अस्मितेचे प्रतिम म्हणून मलिक अंबरची आठवण सदैव जागती ठेवली पाहिजे. अंबर नसता तर या प्रदेशाची अस्मिता मोगलांनी चिरडून टाकली असती.
(छायाचित्रे व्हिन्सेंट पास्किलीनी या फ्रेंच मित्राने काढलेली आहेत. दरवाजाच्या जाळीचे छायाचित्र श्याम देशपांडे यांनी काढलेले आहे. दोघांचे आभार. )


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

7 comments:

  1. माहितीपूर्ण आणि महत्वाचा लेख

    ReplyDelete
  2. खुप छान महत्वपुण॔ माहीती..

    ReplyDelete
  3. अडचण हीच आहे की वारंवार पाठपुरावा करूनही या परिसराचा विकास होत नाही. किमान साफसफाई, पाण्याची व्यवस्था, बागबगीचा याची तर व्यवस्था झाली पाहिजे.

    ReplyDelete
  4. मलिक अंबर बद्दल छान मुद्देसूद लेखन केले आहे। त्याचे मूळ गाव अफगाणिस्तान नसून हबसाण प्रांत (Abyssiniya किंवा Ethiopia)होते। तेथून त्यांना गुलाम म्हणून बगदाद अणि मक्केच्या बाजारात विकण्यात आले होते।
    Info:wikipedia

    ReplyDelete
  5. अभ्यासपूर्ण व सर्वाना संग्रहीठेवावा असा लेख.

    ReplyDelete
  6. खुप नाविण्यपुर्ण लेख.

    ReplyDelete