Tuesday, July 3, 2018

‘आरेसेस’- संघद्वेषाचा नुसता फेस ।


उद्याचा मराठवाडा, 3 जुलै  2018

इ.स.2014 मध्ये लोकशाहीच्या मार्गाने भारतीय जनता पक्षाने स्वबळावर केंद्रात बहुमत मिळवले व सत्ता हस्तगत केली. अजूनही हे लोकशाही परिवर्तन, लोकशाही मानणार्‍या, पुरोगामी विचारवंत अभ्यासक पत्रकार यांना पचलेले दिसत नाही. लोकांनी तर मते दिली आहेत. सत्तेवरून निदान पाच वर्षे तर हे सरकार हटणार नाही. मग शिल्लक एकच मार्ग राहतो. तो म्हणजे लेख लिहून/भाषणं करून/पुरस्कार वापसी करून या सरकारवर टीका करायची. लोकशाहीत तेही मंजूर आहे. पण असे लिखाण करण्यासाठी मोठा अभ्यास, मोठी बैठक आवश्यक आहे. फुटकळ लेख लिहायचे आणि मग त्याचे पुस्तक करून आपला संघद्वेष सिद्ध करायचा याला काय म्हणावे? 

प्रा.जयदेव डोळे यांचे ‘आरेसेस’ हे पुस्तक अशाच संघद्वेषाचा एक नमुना आहे. सदर पुस्तक एप्रिल 2017 ला प्रकाशीत झाले. अपेक्षेप्रमाणे डाव्यांचे गृहप्रकाशन असलेल्या ‘लोकवाङ्मयगृह’ या प्रकाशन संस्थेने ते प्रकाशीत केले. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही लगेच सहा महिन्यांत प्रकाशीत झाली आहे. 

खरं तर जयदेव डोळे यांच्या समोर त्यांचे वडिल प्राचार्य ना.य. डोळे यांचे उदाहरण होते. डोळे सरांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेवा दल’ या नावाने सविस्तर पुस्तकच लिहीले होते. 92 वर्षांची एखादी संघटना देंशाच्या सामाजिक जीवनात काही एक काम करते आहे. तिच्या राजकीय शाखेने स्वत:च्या जीवावर लोकशाही मार्गाने सत्ता संपादून दाखविली आहे. असे असताना तिचा सविस्तर सखोल अभ्यास टीकेसाठी का करावा वाटत नाही? स्वत: डोळेंनीच मनोगतात असे लिहीले आहे, ‘संघाचा अभ्यास समाजशास्त्रीय, धर्मशास्त्रीय, जातिव्यवस्थात्मक, राजकीय, मानसशास्त्रीय, ऐतिहासिक अशा अनेक बाजूंनी करता येतो. माझा प्रयत्न त्या मानाने अगदीच त्रोटक आणि वरवरचा आहे.’ 

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर खाकी चड्डीतला एक स्वयंसेवक दाखवला आहे. आता डोळे यांना संघाचा गणवेश बदलला हे माहित नाही का? हाफ चड्डी म्हणून हिणवण्यात जी सोय आहे ती फुल पँट मध्ये नाही याचे दु:ख होते आहे की काय? या स्वयंसेवकाच्या हातात मोबाईल आहे. म्हणजे चालू काळच डोळेंना सुचवायचा आहे. बाकीचे लोक पारंपरिक कॅमेरे घेवून फोटो काढत आहेत. आणि हा स्वयंसेवक मात्र मोबाईल कॅमेर्‍याने फोटो काढत आहे. म्हणजे संघ आधुनिक होतो आहे असा अर्थ निघतो. जो की डोळेंच्या पुस्तकातील निष्कर्षाच्या अगदी विपरीत आहे. मग डोळेंना काय सुचवायचे आहे? आपल्या मुखपृष्ठासाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या लोकवाङ्मयगृहाची ही घसरण संघद्वेषाची धूळ डोळ्यात गेल्याने झाली का? प्रसिद्ध चित्रकार संदेश भंडारे यांना हे चित्र टिपताना हे लक्षात आले नाही का? 

संघावर टीका करताना डोळे कसे बहकत जातात याचे उदाहरण पहिल्याच लेखात आहे. लेखाचा शेवट करताना डोळे लिहीतात, ‘.. किंबहुना शाखांच्या जागा मोकळ्या करून गरीब छोट्या व्यापार्‍यांसाठी त्या उपलब्ध करून दिल्या तरी खुप झाली राष्ट्रसेवा !’.. आता डोळ्यांना हेच माहित नाही की संघाची शाखा सार्वजनिक खुल्या जागांवर भरते. या जागा संघाच्या मालकीच्या नाहीत. मग त्या मोकळ्या करून गरीब छोट्या व्यापार्‍यांना कशा देणार? चला या निमित्ताने का होईना समाजवादी डोळ्यांना व्यापारीही छोटा गरीब असतो हे मान्य झाले. नसता व्यापारी शोषण करणारा श्रीमंत गलेलठ्ठ इतकीच यांची समज. 

मोहन भागवत यांचे एक चिंतन फेसबुकवर डोळ्यांच्या वाचनात आले. फेसबुकवरील मजकूर हा मुळ चिंतनाचे संपादित रूप आहे. यातील भागवतांच्या एका वाक्याचा आधार घेत डोळे वडाची साल पिंपळाला कशी जोडतात ते पहा. भागवतांचे वाक्य असे आहे, ‘..... सामाजिक जीवन के मूलभूत ढाचों का मानवीय मूल्यों पर आधारित आधारभूत परिवर्तन अनिवार्य है. फिर विषय चाहे सामाजिक सुरक्षा, व्यवस्था, अवसर अथवा शिक्षाका ही क्यों न हो.’

आता यात असे काय भयंकर आहे? डोळे लगेच आरोप करतात की संघाला राज्यघटना बदलायची आहे. राज्यघटनेनुसार चालणारे जीवन संघाला त्यांच्या मापदंडानुसार बदलून हवे आहे. सामाजिक सुरक्षा असा शब्द अल्पसंख्यांक, आदिवासी, अनुसूचित जाती, महिला आदीऐवजी वापरला आहे, व्यवस्था म्हणजे लोकशाही प्रजासत्ताकाची राज्य व्यवस्था, अवसरचा अर्थ स्पष्टपणे आरक्षण होतो असे जावाई शोध डोळे लावतात. शिक्षा म्हणजे शिक्षण जे सर्वांना मोफत दिले जाते ते चुक आहे असेच भागवतांना म्हणायचे आहे असा उलटासुलटा अर्थ डोळे काढतात. आता या आटापिट्याला काय म्हणावे? 

एका लेखाचे शिर्षकच ‘नमस्ते सत्ता वत्सले..’ असे आहे. आता भारतीय जनसंघाची स्थापना कधी झाली? आपली राजकीय भूमिका संघाने कधी लपविली आहे का? सत्ता राबविण्या संदर्भात काही घोळ आहे असे मानण्याचा घोळ डोळे का करत आहेत? ‘जो जो सण उत्सव पूजाअर्चा यांत सामील होत जाईल तो तो आपला हे संघाचे तत्त्व आहे.’ असा आरोप डोळे या लेखात करतात. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापुजा म्हणजे एक सार्वजनिक उत्सव आहे. डावे पक्षही त्यात मोठ्या प्रमाणात नेहमीच सहभागी झाले आहे. मग डाव्यांना संघाने किंवा संघाला डाव्यांनी आपला मानला का? मुंबईत किंवा संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात आहेत. मग या सर्वठिकाणी संघ विस्तारला का?   किंवा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात मंदिरांचे उत्सव, पूजा, कर्मकांड चालत असतात. अगदी आजही मंदिरात प्रवेश करताना कुठले वस्त्र परिधान करावे यांवरही बंधनं आहेत. या सगळ्या ठिकाणी संघ कुठे आहे? चार धाम यात्रा, बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा किंवा महाराष्ट्रातील अष्ट विनायक, भातरभरची देवीची 52 शक्तिपिठे (महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठं) या सर्व ठिकाणी काय संघाच्या विशेष शाखा आहेत? 

शंकराचार्यांची विविध पिठं आहेत. यातील कुठल्या शंकराचार्यांच्या निवडीवर संघाचे नियंत्रण राहिले आहे? डोळे उचलली जीभ लावली टाळ्याला या पद्धतीनं बेफाम आरोप करत आहेत. अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं भारतभरच्या देवस्थानांचा जिर्णोद्धार केला, त्यांना वर्षासनं लावून दिली, देवीदेवतांना दागिने अर्पण केले तसं काही कुठे संघाने केलं आहे का? दसर्‍याचे एक शस्त्रपुजन आणि गुरूपौर्णिमेचा उत्सव हे दोन काहीसे अपवाद वगळता हिंदूंच्या कुठल्या सण समारंभांना संघाच्या वार्षिक नियोजनात महत्त्वाचे स्थान आहे?

संघाशी संबंधीत एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक उभे केले. पण त्याची ख्याती एक धार्मिक स्थळ म्हणून आजतागायत झालेली नाही. इतकेच काय पण विवेकानंद आश्रमाचे- रामकृष्ण मिशनचे काम ज्या पद्धतीनं विस्तारले त्याला परंपरा कर्मकांड पूजा उत्सव सण समारंभ अशी किनार कुठे लाभली? काही ठराविक तिथीला लोक विवेकानंदांची यात्रा करत आहेत असं घडलं का? 

विश्वसंवाद केंद्राने पत्रकारांना नारद पुरस्कार देण्यास सुरवात केली म्हणून टीका करणारा डोळ्यांचा एक लेख या पुस्तकात आहे. यात त्यांनी महात्मा फुल्यांनी हिंदू देवदेवतांची कशी हेटाळणी केली हे सोदाहरण सांगितले आहे. संघ या प्रदेशातील परंपरांना मानतो असा तूम्हीच आरोप करत आहात तर त्यांनी त्या परंपरेतील जून्या देवतांच्या नावे पुरस्कार देण्यास सुरवात केली तर त्यात गैर ते काय आहे? डाव्यांनी कठोरपणे हिंदू धर्माची चिकित्सा केली टिका केली तरी या प्रदेशातील लोक त्या देवतांची पुजा करतातच ना? तूम्हाला हा पुरस्कार कुणी देतो म्हणाले तर नाकारायचा हक्क आहे. पण 'असे पुरस्कार का दिल्या जातात?' ही टीका अनाठायी आहे.

काही ठिकाणी डोळे बौद्धीक भ्रष्ट मार्गांचा अवलंब करतात तेंव्हा अचंबा वाटतो. संघाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद या मुल्यांवर विश्वास नाही असा आरोप करताना डोळे जाणून बुजून ‘समाजवाद’ हे कसे आधुनिक जगाचे मुल्य आहे आणि ते कसे सर्वांनी मानले पाहिजे असा आपला समाजवादी हट्ट मांडतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीनंतर समोर आलेली आधुनिक मुल्ये जगाने आता स्विकारली आहेत. पण यात समाजवाद कुठून आला? आणि तो संघाने का मान्य करावा? संघच कशाला समाजवाद्यांखेरीज इतरांनी तो का स्विकारावा? हा कसला आग्रह डोळ्यांचा? बरं याच पुस्तकात संघ घटनेची चौकट मोडायला निघाला असा आरोप डोळे करतात. मग भारताच्या मुळ घटनेत समाजवाद हा शब्द नाही. तो नंतर इंदिरा गांधींनी घुसडला. घटनेचे 9 वे परिशिष्ट घुसडून नेहरूंनी शेतकर्‍यांचा जमिनीवरचा अधिकार काढून घेतला. ही घटनेची चौकट मोडली गेली ते डोळ्यांना गोड वाटले का? बाबासाहेबांची मुळ घटना तशीच ठेवा असा आग्रह धरला तर तो डोळ्यांना मान्य होईल का? संघाला घटना मोडीत काढायची म्हणून आक्रोश करणार्‍या डोळ्यांनी घटना प्रत्यक्षात मोडली त्या बाबत काय भूमिका घेतली? म्हणजे यांच्या समाजवादी विचारांसाठी घटना उलटी पालटी केली तर चालते आणि संघ तसे करणार आहे अशी केवळ कल्पना करून टीका चालू केली जाते. या दुटप्पी भूमिकेला काय म्हणावे?  

संघाच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना संघाला अर्थशास्त्र कसे कळत नाही असे म्हणत रघुराम राजन यांना पहिला कार्यकाळ संपताच संघाच्या दबावाने भाजप सरकारने कसे बाजूला टाकले असा आरोप करतात. आसा आरोप करताना डोळेंच्या लगेच लक्षात येते की आपण भांडवलशाहीचे समर्थक असलेल्या राजन यांची भलावण करतो आहोत. ते लगेच सावरून घेत लिहीतात, ‘.. राजन यांच्यासारख्या निखालस भांडवलदारी समर्थक अर्थतज्ज्ञची आपण बाजू घेण्याचाही मुद्दा नाही. आर्थिक प्रश्‍नापेक्षा देशभक्तीला महत्त्व देताना संघ बाजू भांडवलशाहीची घेतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.’ याच लेखात भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रिय अध्यक्ष वैद्यनाथ राय यांची भाजप सरकारवर कडक टीका करणारी मुलाखतही डोळेंनी उदघृत केली आहे. म्हणजे डोळेंना नेमके काय म्हणायचे आहे? संघ स्वदेशी जागरण मंचच्या माध्यमातून परकिय वस्तु परकिय गुंतवणूक याला विरोध करत आला आहेच. आणि संघाला विरोध करून भाजप सरकारने असे काही निर्णय घेतले आहेत. आधीच्याच लेखात सर्व मंत्र्यांना बोलावून संघ विचारांची शपथ कशी घ्यावी लागते आणि त्यानूसार काम करावे लागले अशी टीका डोळे करतात. आणि लगेच संघाचे आदेश भाजप कसा ऐकत नाही असेही म्हणतात. म्हणजे भाजप सरकार सत्तेवर असताना देशाच्या हिताप्रमाणे आणि संविधानाच्या चौकटीप्रमाणेच काम करते हेच सिद्ध होते ना. मग तुमचा आरोप काय आहे? संघाचे भाजप ऐकत नाही ही चांगली गोष्ट आहे की चुक? 

या सगळ्यांतून डोळे आपलाच गोंधळ सिद्ध करतात. टीका करण्याच्या नादात डोळे कधी कधी शब्दांचा विपर्यास करतात. अ.भा.वि.(द्रु)प. नावाच्या लेखात शेवटची ओळ अशी आहे, ‘... पण त्याला (विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता) क्रौर्य व शिस्तपालन यांतला फरक कळत नाही आणि रोहित मारला जातो.’ वाचून कुणालाही असे वाटेल की परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रोहित वेमुलाला ठेचून ठेचून ठार मारले. जेंव्हा की वास्तवात वेमुलाने आत्महत्या केलेली असते. शिवाय वेमुला ज्या डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेचा सभासद असतो तो सतत ‘कम्युनिस्टांच्या पॉलिट ब्युरोत दलितांना स्थान का नाही?’ असे विचारतो आहे ज्याकडे डोळ्यांसगट सगळे डावे पुरोगामी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात आणि आरोप मात्र विद्यार्थी परिषदेवर करून मोकळे होतात. महात्मा गांधींचा ‘वध’ केला ही भाषा वापरली तर डोळे संतापून जातात कारण तो ‘खूनच’ आहे अशी मांडणी ते करतात. मग रोहित वेमुलाची आत्महत्या ही डोळेंकडून हत्या कशी काय संबोधली जाते? 

डोळेंची चटकदार भाषा वापरण्याची सवय कधी कधी इतकी विचित्र बनते की आपण काय लिहीतो आहेत हे त्यांना तरी कळते का अशी शंका येते. असमच्या निवडणुका भाजपने जिंकल्या याचा काही तरी विलक्षण त्रास डोळ्यांना होतो आहे. (लेख लिहीला तेंव्हा त्रिपुराच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. तो निकाल आल्यावर तर डोळ्यांना कसली उबळ आली असेल!) डोळे लिहीतात, ‘..1956 साली पहिला स्वयंसेवक असमला पोचला आणि मग हळू हळू इतके पोचले की त्यांनी 2016 ची विधानसभा भाजपच्या हवाली केली. चहा पिता पिता प्रत्येक स्वयंसेवकाला असम जिंकण्याची शपथच बहुधा घ्यावी लागली. खेरीज चायवाल्या पंतप्रधानाला चहाचे मळे भेट म्हणून देणे हे केवढे औचित्यपूण कर्तृत्व ! चिअर्स !! नव्हे, चायर्स !’.. काय ही भाषा? मोदिंना चायवाला म्हणून हिणवणे वैचारिक म्हणविल्या जाणार्‍या लेखनात कसे शोभणार? लोकशाहीच्या मार्गाने असमची सत्ता भाजपने मिळवल्यानंतर त्या सगळ्या निकालाचे विस्तृत परिक्षण करण्याऐवजी काय ही उथळ शेरेबाजी? या ठिकाणची असम गण परिषद सारखी संघटना की जी नंतर पक्ष बनून सत्तेवर आली होती जी आज भाजपबरोबर आहे. हा पुरोगामी राजकारणाचा पराभव आहे हे समजून आत्मपरिक्षण का नाकारले जाते? 

आर्थिक प्रश्‍नावर संघावर टीका करताना डोळे वारंवार आक्षेप घेतात. खरं तर संघानं याबाबत कुठलेही धोरण स्पष्ट केले नाही हाच आरोप डोळे करतात. मग परत टीका कशासाठी? समजा संघ काही स्पष्ट भूमिका घेणारच नाही तर त्यात नेमकी काय अडचण आहे? डोळ्यांना जी काय टीका करायची ती भाजप सरकारच्या धोरणांवर करावी. 

संघाचा जो कारभार चालतो त्याच्या आर्थिक उलाढालींवरही डोळे शंका उपस्थित करतात. संघांशी संबंधीत ज्या ज्या संस्था देशभर (विदेशातही) काम करतात त्या संबंधीत जिल्ह्यात धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवलेल्या आहेत. माहितीच्या अधिकारात त्यांच्या आर्थिक उलाढालींची/ देणग्यांची/ शासकीय अनुदानांची माहिती सहज काढता येते. मग तसे न करता संघावर आर्थिक गैरव्यवहाराचे शिंतोडे उडवून डोळ्यांना नेमके काय साधायचे आहे? डोळे ज्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करायचे त्या विद्यापीठाअंतर्गत संघाशी संबंधीत किमान 50 तरी महाविद्यालये आहेत. मग यांच्यातील शिक्षणाचा दर्जा, यांचे आर्थिक गैरव्यवस्थापन, यांच्या गैरकारभाराचे काही पुरावे असे नीट गोळा करून यावर डोळे सविस्तर लिहू शकले असते. पण तसं काही डोळे करत नाहीत. 

हे पुस्तक म्हणजे संघावरची उथळ शेरेबाजी आहे. खरं तर डोळे बुद्धीमान आहेत. एखादा प्रतिभावान गायक आपल्या संथ ख्यालाचे सौंदर्य चटकदार ताना पलटे आलापींची अतिरिक्त बरसात करून बिघडवून टाकतो तसे डोळे करतात (उदा. वसंतराव देशपांडे). त्यांची संघावरच्या टीकेची दिशा येाग्यच आहे. कितीतरी महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या लिखाणात इतस्तत: विखुरलेले सापडतात. त्यांचे आक्षेपही मुलभूतच आहेत. पण व्रात्यपणे डोळे संघद्वेषात आपलीच लेखन रांगोळी विस्कटून टाकतात. 

आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जयदेव डोळे यांनी संघावर सविस्तर मोठा ग्रंथ लिहावा. त्यासाठी जो काही अभ्यास करावा लागेल तो करावा. त्यासाठी पुरेसा वेळ त्यांना आता निवृत्तीनंतर उपलब्ध आहे. तसं काही केलं तर त्याची दखल मोठ्या प्रमाणात घेतली जाईल. अशा फुटकळ पुस्तकांना फारसे आयुष्य नसते. सदरांची पुस्तके करून आपल्या नावावर पुस्तकांची संख्या वाढवायची असला बालीश उत्साह आता डोळ्यांच्या वयाला, ज्ञानाला, प्रतिष्ठेला शोभत नाही.
     
श्रीकांत उमरीकर, 
जशक्ती वाचक चळवळ, 
औरंगाबाद. 


मो. 9422878575

3 comments:

  1. आंधळे डोळे! दुसरं काय?

    ReplyDelete
  2. लेख छान आहे, पण मधातच वसंतराव देशपांडेंवर कॉमेंट कशासाठी ?

    ReplyDelete