Wednesday, October 25, 2017

रस से भरी तेरी आवाज गिरीजा देवी


उरूस बुधवार 25 ऑक्टोबर 2017

बनारस घराण्याच्या ठूमरी गायिका गिरीजा देवी यांचे वृद्धापकाळाने 24 ऑक्टोबर रोजी निधन झाले. ठुमरीची साम्राज्ञी निवर्तली.

12 वर्षांपूर्वी मुुबईला षण्मुखानंद सभागृहात पंचम निषाद संस्थेच्या शशी व्यास यांनी एक अप्रतिम योग घडवून आणला होता. गानसरस्वती किशोरी आमोणकर, ठुमरी सम्राज्ञी गिरीजा देवी, गानहिरा परवीन सुलताना या तिघींना एक मंचावर आणले होते. पहिल्यांदा मंचावर आल्या परवीन सुलताना. त्या अप्रतिम गाऊन गेल्या. दुसर्‍यांदा मंचावर आल्या गिरीजा देवी. त्यावेळी त्या पंच्च्याहत्तरीत होत्या. फिक्या पिवळ्या रंगाची बनारसी त्या नेसल्या होत्या. शुभ्र केसाची भलीमोठी वेणी खांद्यावरून पुढे ओढून घेतली. कसलाही विलंब न करता आवाज लावला. एका सेकंदात त्यांचा आवाज असा काही लागला की सभागृहाने पहिल्याच सूराला कडाडून टाळी दिली. अतिशय रसरशीत असं ते गाणं. त्यांच्यासोबत त्यांची शिष्या मागे बसून गात होती. एका जागी तिने इतकी सुंदर हरकत घेतली की रसिकांनी तिलाही प्रचंड टाळ्या वाजवून मनसोक्त दाद दिली. गिरीजा देवींनी गाणं क्षणभर  थांबवलं, ‘हमारी बेटीको आपने तालिया दी.. एक गुरू के लिये और क्या चाहिये की लोग उनके शिष्योंको उनके सामने नवाजे... इन्ही के जरिये हमारे घरानेकी ये गायकी आगे जायेगी..’ लोकांनी परत टाळ्या वाजवल्या.

ठुमरी सारख्या गानप्रकाराला दुय्यम समजल्या जातं. स्वातंत्र्योत्तर काळात या ठुमरीला सिद्धेश्वरी देवींपासून बेगम अख्तर, निर्मला देवी, लक्ष्मी शंकर, शुभा गुर्टू, गिरीजा देवी यांनी मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. संगीत तज्ज्ञ अशोक दा. रानडे यांनी आपल्या पुस्तकात एक प्रसंग नमुद करून ठेवला आहे. केसरबाई मुंबईला एका कार्यक्रमात ठुमरी गात होत्या.  त्या सभागृहात सिद्धेश्वरींचे  आगमन झाले. लगेच केसर बाईंनी आपलं गाणं थांबवलं. सिद्धेश्वरी म्हणाल्या "क्यू बंद किया? आच्छा तो चल राहा था."   पण केसरबाई जे बोलल्या ते फार महत्त्वाचे होते. ‘ठुमरी की तालिम पाती तो सर पे बैठ के गाती.’ मला ठुमरीची तालिम भेटली नाही म्हणून गात नाही असं सांगत केसरबाईंनी सिद्धेश्वरींच्या ठुमरीचा गौरवच केला.

‘रस के भरे तोरे नैन’ ही गिरीजा देवींची अतिशय गाजलेली भैरवी ठुमरी. सत्याग्रह (२०१३) चित्रपटात ही ठुमरी वापरली आहे. त्यांच्या आयुष्याची भैरवी झाली आहे.. आज  त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘रस से भरी तोरी अवाजा..’ अशीच भावना दाटून आली आहे.. गिरीजा देवींना विनम्र श्रद्धांजली.

(रस के भरे तोरे नैन या ठुमरीची link)

https://www.youtube.com/watch?v=HJS6Em8y3VU

Wednesday, October 18, 2017

हे शारदासुता ! तेंव्हा कुठे गेला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धर्म?


 उरूस बुधवार 18 ऑक्टोबर 2017 

महाभारत युद्धातील  सतराव्या दिवसाचा प्रसंग आहे. कौरवांचा सेनापती कर्ण, त्याच्या रथाचे चाक चिखलात रूतून बसले आहे. हे चाक तो काढत असताना अर्जून त्याच्यावर शस्त्र उचलतो. ते पाहून कर्ण, ‘हा क्षत्रियाचा धर्म नाही’ असे म्हणत आक्षेप घेतो. तेंव्हा कृष्ण इतिहासातील विविध प्रसंगांचे दाखले देवून कर्ण कसा अधर्माने वागला हे सिद्ध करतो आणि कर्णाला विचारतो, ‘राधासुता, तेंव्हा कुठे गेला होता तूझा धर्म?’

आताचा प्रसंग आहे कलियुगातील. 2014 च्या निवडणुकीचे महायुद्ध होवून केंद्रात लोकशाही मार्गाने भाजपचे सरकार  सत्तारूढ झाले आहे. समाजमाध्यमावर (सोशल मिडीया) काही तरूणांनी (यात आशिष मेटे सारखे सरळ सरळ राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असलेले तरूणही आहेत) मोदींवर-भाजप संघावर जहरी टीका केली. त्यांच्या विरोधात पोलिसांनी कार्रवाई करण्याचे संकेत दिले (प्रत्यक्षात कार्रवाई अजून झालीच नाही) म्हणजे नोटीसा पाठवल्या. लगेच या तरूणांच्या पाठीशी आपण आहोत हे दर्शविण्यासाठी जाणते राजे मा. शरद पवार यांनी या तरूणांची एक बैठक मुंबईत बोलावली. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याचे ठामपणे शरद पवारांनी या तरूणांना सांगितले. शिवाय या तरूणांना कायदेशीर लढाईसाठी सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले.

ज्या सोशल मिडीयावर या तरूणांनी ही गलिच्छ शब्दांतील निंदानालस्ती केली होती त्याच सोशल मिडीयावर या तरूणांनी मा. शरद पवार यांच्या पाठिंब्याची टिमकीही जोरात वाजवायला सुरवात केली.

काय गंमत आहे पहा. प्रसंग आहे जून 1975 चा.  अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ज्या तरूणांच्या पाठिशी शरद पवार ठामपणे उभे राहिले नेमक्या या तरूणांच्या वयाचेच तेंव्हा शरद पवार होते. शरद पवारांचे वय होते केवळ 33 वर्षे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला  धोका नव्हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सरळ सरळ खुनच केला गेला होता. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी  यांनी देशात आणिबाणी लादली होती. तेंव्हा मा. शरद पवार कुठे होते? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने होते का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून करणार्‍यांच्या टोळीत होते? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून झाला त्या रक्ताचे डाग यांच्या स्वच्छ कपड्यांवर उडाले की नाही?

शरद पवार तेंव्हा कॉंग्रेसमध्येच सत्तेत होते. आणिबाणीच्या संपूर्ण कालखंडात हजारोंनी कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबल्या गेले. पवारांनी तेंव्हा चकार शब्दही काढला नाही. की सत्ताही सोडली नाही. महाराष्ट्रात आणिबाणीचा विरोध मोठ्या जोरकसपणे झाला. शरद पवार ज्या साहित्यीक कलावंत विचारवंत यांच्या पाठिशी सतत असल्याचा भास निर्माण करतात त्या सर्वांनी आणिबाणीचा विरोध केला होता. दुर्गा भागवत, नरहर कुरूंदकर आणीबाणी विरोधी  जाहिर भाषणं देत फिरत होते. अनंत भालेराव यांच्यासारखे लढवय्ये संपादक पत्रकारितेचे भिष्मपितामह तुरूंगात होते. वर्तमानपत्रांतून अग्रलेखाची जागा कोरी सोडून दिली जात होती. विनय हर्डीकरांसारखे पत्रकार लेखक केवळ तुरूंगात गेले असे नाही तर त्यांनी यावर ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे सविस्तर पुस्तकच लिहून काढले. या पुस्तकाला  जाहिर झालेला पुरस्कार शासनाने रद्द केला. तेंव्हा शरद पवार सत्तेतच होते. त्यांनी काय भूमिका घेतली?  लोकांनी वर्गणी करून या पुस्तकाचा गौरव केला. पुढेही शरद पवारांसारख्यांनी कशी भूमिका घेतली यावर ‘जन ठायी ठायी तुंबला’ या आपल्या दुसर्‍या पुस्तकांतही सविस्तर लिहीले.

शरद पवार यांनी आणिबाणी नंतर तर कळसच केला. इंदिरा कॉंग्रेसचा पराभव होवून दिल्लीत जनता पक्ष सत्तेत आला.  महाराष्ट्रात काही सत्ताबदल झाला नाही. इंदिरा गांधींचा गट व वसंतदादांचा गट या दोन कॉंग्रेसच्या गटांनीच मिळून सत्ता राखली. शरद पवारांनी आणिबाणी विरोधात आंदोलन करणार्‍या जनता पक्षाच्या 95 आमदारांच्या पाठिंब्यावर आणि आणिबाणीच्या बाजूनं असणार्‍या सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या 35 आमदारांना  सोबतील घेवून  सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पद पटकावले. म्हणजे आणिबाणीत हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खुन करणार्‍यांच्या टोळीत सामील झाले. आणि आणिबाणीनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचा पाठिंबा घेवून मुख्यमंत्री झाले. अभिव्यक्ती  स्वातंत्र्याचे काहीही होवो पवारांनी आपल्या ‘सत्तावर्ती’ राजकारणारचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ ही ढोलकी दोन्ही बाजूने पवार वाजवत होते. विरोध करणार्‍यांसोबतही आणि पाठिंबा देणार्‍यांसोबतही.

मोदी लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत. त्यांचा विरोध लोकशाही मार्गानेच करता येवू शकतो. किंवा तो तसाच केला पाहिजे. उद्या मोदी हुकूमशाहीच्या मार्गाने गेले तर त्यांनाही कडव्या विरोधाला तोंड द्यावेच लागेल. आत्ता पंजाबातील  गुरूदासपूरची लोकसभेची पोटनिवडणूक आणि  महाराष्ट्रात  नांदेडमध्ये महानगरपालिकेची निवडणुक कॉंग्रेसने लोकशाही मार्गानेच जिंकली आहे. पवारांचा पक्ष तिथे सपशेल पराभूत झाला. सोबतच ग्रामपंचायतीची निवडणुक झाली. त्यातही पवारांच्या राष्ट्रवादीला  विशेष यश मिळवता आले नाही. पवारांनी आपला पक्ष लोकशाही मार्गाने सत्तेत आणावा. त्यांना कुणीही रोकले नाही.

पवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याचा दाखला त्यांनी कृतीतून द्यावा. ज्या भाषेत सोशल मिडीयावर या तरूणांनी मोदी-भाजपवर टिका केली आहे तशी भाषा पवारांच्या विरोधात इतर तरूणांनी वापरली तर पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्या तरूणांशी कसा व्यवहार करतील?

स्वत: पवारांनी निवडणुकांत राजू शेट्टी यांची जात काढली होती, ‘अर्ध्या चड्डीची’ भाषा केली होती, पेशवाईचा उल्लेख केला होता हे कोणते अभिव्यक्ती स्वातंत्र्य? हे पण पवारांनी देशातील जनतेला जाहिरपणे सांगावे.

पवारांच्या 50 वर्षांच्या सांसदिय कारकिर्दीतील जेमतेम 10 वर्षे सोडल्यास 40 वर्षे ते सत्तेत राहिले आहेत. केवळ राज्यच नव्हे तर केंद्रिय मंत्रीमंडळात महत्त्वाची खाती त्यांनी भूषविली आहेत ते पवार मुठभर तरूणांच्या सोशल मिडीयावरील पोस्टच्या प्रकरणात स्वत: लक्ष घालतात हे कशाचे लक्षण आहे? हे काम तर सुप्रियाताई, धनंजय मुंडे किंवा त्यांचा पक्षाच्या कुणाही तरूण/विद्यार्थी नेत्याला करता आले असते.

बरं इकडे या तरूणांच्या पाठिशी उभे राहिल्याचा देखावा आणि तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत पायघड्या हे नेमके काय धोरण आहे? इकडे पवार तरूणांची बैठक घेतात आणि तिकडे अजीतदादा नितीन गडकरींच्या दिल्लीतील ‘वाड्यावर’ जातात ही राष्ट्रवादीची नेमकी कोणती अभिव्यक्ती आहे? 

महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल पुरते लागायच्या आतच पवारांनी भाजप सरकारला  न मागताही बाहेरून बिनशर्त पाठिंबा जाहिर केला होता.  मग आता हा बिनशर्त पाठिंबा न सांगता तातडीने परत का नाही घेतल्या जात?

भारतभर डाव्या चळवळीतील लेखकांनी पुरस्कार वापसीचे आंदोलन छेडले होते. मग पवारांनी त्यांच्या सुरात सुर मिसळून आपला पद्मविभुषण पुरस्कार का नाही वापस केला?

म्हणजे जेंव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत, असहिष्णुतेबाबत भाजप सरकार विरोधी आंदोलन भरात होते, लेखक पुरस्कार वापस करत होते, कन्हैय्याकुमार सारखे विद्यार्थी ‘आझादी’च्या घोषणा देत होते, रोहित वेमुलासारखे विद्यार्थी आत्महत्या करत होते. शेतकरी तर लाखोंच्या संख्येने आत्महत्या करतच आहेत. नोटाबंदी मग नंतर जी.एस.टी. ने सगळे हैराण आहेत असे चित्र सगळे विरोधी पक्षाचे लोक डाव्या चळवळीतील लोक रंगवत असताना पवार काय करत होते? ते राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत ‘पद्मविभुषण’ पुरस्कार स्विकारत होते.

सरकारच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने जेंव्हा पवार तरूणांच्या पाठिशी उभे असल्याचे चित्र जाणिवपूर्वक रंगविल्या जाते आणि त्याच वेळी त्याचवेळी स्वत: पवार याच सरकारकडून पद्मविभुषण पुरस्कार स्विकारतात...   म्हणूनच विचारावे वाटते, ‘हे शारदासुता ! तेंव्हा कुठे गेला होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धर्म?’ 
 
        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

 
   

Thursday, October 5, 2017

लेखकाच्या स्मृतीत सांस्कृतिक सोहळे


उरूस, विवेक, 24 सप्टेंबर 2017

काळ अतिशय प्रतिकूल असा स्वातंत्र्यापूर्वीचा, जात्यांध-सरंजामदारी निजामी राजवटीचा. एक लेखक अतिशय हलाखीच्या स्थितीत हैदराबाद या राजधानीच्या गावापासून मैलो दूर परभणी सारख्या तेंव्हाच्या खेडेवजा शहरात राहून वाङ्मय निर्मिती करतो. एक दोन नाही तर तब्बल सात कादंबर्‍या, पाच कथा संग्रह, सव्वाशे कविता इतकी निर्मिती अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात करतो. ओढग्रस्तीत त्याची तब्येत खालावत जाते. शेवटी नोकरीच्या ठिकाणीच 7 सप्टेंबर 1953 ला हृदय बंद पडून त्याचा करूण देहांत होतो. तो दिवस असतो पोळ्याचा. अमावस्येचा. 

बरोबर पन्नास वर्षांनी 7 सप्टेंबर 2002 साली अमावस्याच असते. या लेखकाच्या स्मृतीत एक कोटी रूपये खर्च करून भव्य स्मारक उभारल्या जाते. ग्रेस सारख्या प्रतिभावंत कविच्या हस्ते त्या स्मारकाचे उद्घाटन होते. 
कविवर्य बोरकरांनी असं लिहून ठेवलं होतं

मी विझल्यावर त्या जागेवर
नित्याच्या जनरितीप्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे

मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्र फुलांची छत्री

ओळी लिहिल्या बोरकारांनी. पण अगदी शब्दश: त्या खर्‍या ठरल्या या लेखकाच्या बाबतीत. अमावस्येलाच या कविच्या कवितांनी त्याच्या साहित्यानेच त्याच्यावर चंद्र फुलाची छत्री धरली. त्याचे सुंदर स्मारक साकार झाले. या कविचे नाव आहे बी. रघुनाथ. 

भगवान रघुनाथ कुलकर्णी हे त्या लेखकाचे मूळ नाव.  निजामी राजवटीत तेलगू पद्धतीप्रमाणे त्यांनी लेखक म्हणून टोपण नाव स्विकारले ‘बी. रघुनाथ’.

या लेखकाच्या नावाने परभणीत स्मारक उभारल्या गेले आहे. त्यांच्या स्मृतीत एक सभागृह त्यांच्या मृत्यूनंतर लगेच 1956 ला भर गावात उभारण्यात आले होते. नंतर 2002 मध्ये नविन स्मारक पुतळ्यासह उभारण्यात आले. इतकेच नाही तर गेली 15 वर्षे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सप्टेंबर महिन्यात चार दिवसांचा ‘बी. रघुनाथ महोत्सव’ भरविला जातो.  बी. रघुनाथांच्या नावाने मोठे महाविद्यालय परभणी शहरातच सुरू करण्यात आले आहे. 

औरंगाबादला गेली 28 वर्षे ‘बी. रघुनाथ स्मृती संध्येचे’ आयोजन करण्यात येते. त्यांच्या नावाने एक मोठा वाङ्मयीन पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार प्रा. नितीन रिंढे यांच्या ‘लिळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाला प्रख्यात नाटककार अजित दळवी यांच्या हस्ते देण्यात आला आहे. 

एखाद्या लेखकाचे स्मारक उभारणे आणि त्याच्या स्मृतीत असे सोहळे साजरे करणे हे महाराष्ट्रात फार दूर्मिळ आहे. केशवसुतांचे मालगुंडला देखणे स्मारक उभे आहे.  पु.ल.देशपांडे यांच्या नावाने एक अकादमी मुंबईला स्थापन करण्यात आली आहे. पु.लं.चा पुतळाही रविंद्र नाट्य मंदिराच्या परिसरात आहे. कुसूमाग्रजांच्या स्मृती नाशिककर सतत जागवत असतात. कुसूमाग्रज प्रतिष्ठानने मोठे कामही उभे केले आहे. नांदेडला प्रा. नरहर कुरूंदकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. जळगांवला ‘काव्य रत्नावली’ चौक उभारून कविंची स्मृती जागविली गेली आहे. हे ठळक अपवाद वगळले तर लेखकाची स्मृती जपण्याचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. उलट विखारी जातीय भूमिका घेत लेखकांचे पुतळेच उखडून टाकण्याची मात्र उदाहरणे आहेत. 

साहित्य संमेलनांची मोठी परंपरा महाराष्ट्रात असताना लेखकांची मात्र उपेक्षा कशामुळे केली जाते? 

 सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाच्या लेखकाच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व साहित्याचे पुनर्मुद्रण झाले पाहिजे. जे लिखाण प्रसिद्ध झाले नसेल ते प्रकाशात आले पाहिजे.  दूसरं महत्त्वाचे काम म्हणजे त्या लेखकाच्या महत्त्वाच्या कलाकृतींवर आधारीत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण. रविंद्रनाथ टागोरांवर आजही बंगालात विविध कार्यक्रम सातत्याने घेतले जातात. रविंद्र संगीताचे सादरीकरण आजही तरूण कलाकार मोठ्या उत्साहने करतात.
पण मराठीत हे होताना दिसत नाही. आधुनिक काळातील लेखक तर नंतरची बाब आहे. पण ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, चोखा मेळा, महदंबा, सोयराबाई, मुक्ताबाई, जनाबाई यांच्या समग्र लिखाणाची अर्थासह स्पष्टीकरण देणारी सटीप आवृत्ती आहे का?

अण्णाभाऊंचे पुतळे जातिय राजकारणाच्या सोयीसाठी गावोगाव उभारलेले दिसतात. पण त्याचा साहित्य प्रेमाशी काडीचाही संबंध आढळून येत नाही. 

एक अतिशय साधी योजना आखता येवू शकते. त्या त्या परिसरातील दिवंगत साहित्यीकाच्या स्मारकासाठी त्या  त्या परिसरातील ‘अ’ दर्जाच्या ग्रंथालयाला विशिष्ठ निधी देवून त्यांना- पुतळा उभारणे, पुस्तके प्रकाशीत करणे, स्मृती सोहळे साजरे करणे - यासाठी प्र्रोत्साहित केल्या जावू शकते. महाराष्ट्रात 235 जिल्हा ‘अ’ दर्जाची शासनमान्य ग्रंथालये आहेत. यांना नियमित अनुदानही दिले जाते. सर्व ग्रंथालयांना स्वत:ची छोटी मोठी इमारत आहे, सभागृह आहे, पुतळाच उभारायचा असेल तर जागाही उपलब्ध होवू शकते. काही ठिकाणी नगर पालिका महानगरपालिकेची खुली जागा ग्रंथालयांला लागून असेल तर तीपण पुतळ्यासाठी उपलब्ध होवू शकते. काही लेखकांचे नातेवाईक जे की आर्थिक दुष्ट्या सुस्थितीत असतील ते देणगीही देवू शकतात. (औरंगाबादला पत्रकार अनंत भालेराव यांच्या कुटूंबियांनी त्यांचा पुतळा साहित्य परिषदेला देणगी दाखल दिलेला आहे.) 

काही शैक्षणिक संस्थाही यासाठी पुढाकर घेवू शकतात. नांदेडला असा पुढाकार नरहर कुरूंदकर स्मारकासाठी तेथील शैक्षणिक संस्थेने घेतलाही आहे. 

प्रत्येक वेळी शासनाची मदत पाहिजे, अनुदान पाहिजे असेही नाही. गावोगावी विविध उत्सव दणक्यात साजरे होतच असतात. अगदी खेड्यागावातही हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह होतात. त्यावर प्रचंड खर्चही होतो. मग काही ठिकाणी अशा संस्थांनी पुढाकार घेवून हेच सोहळे त्या त्या भागातील प्रतिभावंतांच्या स्मृतीत साजरे केले तर कुठे बिघडले? 

हे का करायचे? तर हे प्रतिभावंत काळाच्या पुढचे पहात असतात. ज्यांची प्रतिभा काळावर टिकते त्यांची दखल आपण घ्यायलाच हवी. बी. रघुनाथ यांनी 1945 मध्ये असं लिहीलं होतं

राऊळी जमतो भावूक मेळा
गुरवाचा गांजावर डोळा
त्यातही डोळे किती निराळे
भक्त कुणा समजावे
आज कुणाला गावे

संन्याश्याच्या छाटीत चोळी
मुमुक्षु  फिरतो गल्ली बोळी
विविधरंगी या शुका-बकातील 
नितळ कसे निवडावे
आज कुणाला गावे

आज जिकडे तिकडे सामान्य भक्तांची दिशाभूल करणार्‍या बाबा/बुवा/बापुंचा विषय चर्चेत आहे. आणि सत्तर वर्षांपूर्वी एक कवि नेमकं हेच टिपून ठेवतो हे त्याच्या प्रतिभेचे मोठेपण नाही का?

बी. रघुनाथांच्या स्मृतीत सामान्य रसिक एकत्र येवून सोहळा साजरा करतात हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच हा उत्सव टिकून आहे. त्यात औपचारिकता नसून उत्स्फुर्तता आहे. 

आषाढीला महाराष्ट्राभरातून विविध संतांच्या नावाने दिंड्या निघतात. आणि त्या सगळ्या मग आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरला जमा होतात. या प्रमाणेच विविध साहित्यीकांच्या नावाने महाराष्ट्रभर वर्षभर सोहळे साजरे व्हावेत. आणि या सगळ्यांची ‘वाङ्मयीन एकादशी’ साहित्य संमेलनाच्या रूपात साजरी व्हावी.  
 
          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575