उरूस, 4 जूलै 2017
‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील गाणं आषाढाचा पाऊस कोसळायला लागला की मनात कोसळू लागते. गावोगावची माणसं सार्या प्रापंचिक अडचणी बोचक्यात बांधून घराच्या आढ्याला टांगून ठेवतात. जवळच्या बोचक्यात अगदीच जरूरीच्या चार दोन वस्तू जास्तीचा कपड्याचा जोड घेवून एका आंतरिक ओढीनं पंढरीकडे चालायला लागतात.
आत्तापर्यंत खूप विद्वानांची अभ्यास केला, खुप अभ्यासकांनी प्रत्यक्ष वारीत जावून अनुभव घेतला, देशीच काय पण परदेशी विचारवंत अभ्यासकही यात सहभागी झाले पण कुणालाच वारीचं कोडं उलगडलं नाही. कुसुमाग्रजांनी लिहीलंय
आभाळाचं मन कळत नाही
वारा होवून मुक्त झाल्याशिवाय
प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही
दिवा होवून भक्त झाल्याशिवाय
तसं आपण भक्ताची भूमिका घेतली तर कदाचित वारीचे कोडे उलगडू शकेल. नसता केवळ कोरड्या तत्त्वज्ञानाचा- विचारांचा-अभ्यासाचा आधार काही कामा येणार नाही.
ग्रामिण भागातले लोक मोठ्यासंख्येने वारीत सहभागी होतात. आपल्या गरजा किमान ठेवायच्या, पायी चालायचे, मिळेल ते साधे अन्न खायचे, समुहात रहायचे, ओठांनी विठ्ठलाचे नाम संकिर्तन करायचे, बाकी सारे विचार सगळ्या चिंता सोडून द्यायच्या.
ज्ञानेश्वरांपासून वारीच्या ठळक नोंदी आहेत. त्याच्या काहीसं आधीपासून मोजलं तर जवळपास हजार वर्षांची ही परंपरा महाराष्ट्रात आहेत. जातीभेद विसरून सर्व लोक अगदी मुसलमानही यात सहभागी होत आलेले आहेत.
वारकरी संप्रदाय इतर संप्रदायांपेक्षा सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरला, सगळ्यात जास्त टिकला याचे कारण काय?
एक एकमेव साधे ठळक कारण म्हणजे या संप्रदायाचा साधेपणा.
‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ हे तीन ग्रंथ या संप्रदायाचे प्रमाण ग्रंथ. यांना ‘प्रस्थान त्रयी’ म्हणतात. या तीन ग्रंथांचे पठण करणे. दर महिन्यात येणार्या दोन एकादश्या पाळणे म्हणजेच त्या दिवशी उपवास करणे. गळ्यात तुळशीची माळ परिधान करणे (तुळशीच्या झाडाच्या छोट्याशा खोडापासून मणी तयार करतात. व त्याची माळ करून गळ्यात घालतात). गावातील विठ्ठलाच्या मंदिरात नियमित जाणे. भजन किर्तन करणे. वर्षातून एकदा पंढरीची वारी करणे. ही वारी आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैती अशी चार वेळा एकादशीला केली जाते. त्यातील केवळ आषाढी किंवा त्या खालोखाल कार्तिकी जास्त लोकप्रिय आहे. इतर वेळीही यात्रा भरते पण त्या तुलनेत गर्दी जमा होत नाही. प्रत्येकाच्या ठायी परमेश्वर आहे समजून प्रत्येने प्रत्येकाच्या पाया पडणे. मांसाहार न करणे. दारू न पिणे. देवाची पूजा म्हणजे धूत वस्त्र परिधान करून (सोवळे नाही) विठ्ठलाच्या प्रतिमेला फुलं वाहणे. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ही आरती तर लोकप्रिय आहेच.
बस्स इतक्या साध्या आचरणांवर हा संप्रदाय उभा आहे.
बाबासाहेबांनी सनातन हिंदू धर्मावर टिका करत नविन धर्मात प्रवेश केला. पण याच बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ ही वृत्तपत्रे सुरू करताना त्यांच्या शिर्षस्थानी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या रचनांना स्थान दिले हे लक्षात घेण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केला तर सगळ्या समुहाचे मन समजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलेले आणि काळावर टिकलेले काय असेल तर तो केवळ वारकरी संप्रदायच. महाराष्ट्रातील ‘लिंगायत’ आणि ‘महानुभाव’ संप्रदायांना मर्यादा पडल्या कारण त्यांचे कट्टर स्वरूप. कठोरपणे झालेली बंड आपला समाज स्विकारत नाही. त्याला मर्यादा पडतात. उलट ही बंडं पचवून परत परंपराच मजबूत झालेली दिसते.
आज संतांच्या अभंगांचे दाखले घेवून हे कसे चातुवर्ण्य मानणारे होते, यांना कसे ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व मान्य आहे, संत कसे टाळकुटे होते, संतांनी महाराष्ट्र घडविला नसून बिघडवला आहे असे काही अभ्यासक उच्च स्वरात सांगत असतात.
वारकरी संप्रदायाचा बारकाईने अभ्यास केला, वारकर्यांचे मन समजून घेतले तर लक्षात येते की हे सगळे आक्षेप फारच वरवरचे आहेत. संतांच्या रचनांमधुन विषमतेचे पुरावे मिळतात हे खरे आहे. पण ते फसवे आहेत. त्या काळी चालत असलेल्या रूढी परंपरांना फारसा विरोध न करता, त्यांच्या विरोधात फारसे बंड न करता शांतपणे समतेचा एक प्रवाह वारकरी संप्रदायाने वाहता ठेवला आहे. आणि तिच पद्धत जास्त उपयुक्त ठरली.
जे संत जन्माने ब्राह्मण होते त्यांनाही सनातन ब्राह्मणांनी वाळीतच टाकले. ज्ञानेश्वर आणि त्यांची तिनही भावंडे यांना ब्राह्मण म्हणून मान्यता शेवटपर्यंत मिळालीच नाही. ना त्यांच्या मुंजी झाल्या ना लग्नं झाली. चारही जणांना समाधी घ्यावी लागली. समाधानानं शांतपणे भरपूर आयुष्य जगू दिलं गेलं नाही. दुसरे संत एकनाथ. एकनाथांनाही सनातनी ब्राह्मणांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. एकनाथांचा शेवट जलसमाधी घेवूनच झाला. शिवाय ते लिहीत असलेले भावार्थ रामायण अर्धवटच राहिले. याचा अर्थच असा होतो की एकनाथांना त्याकाळच्या ब्राह्मणांनी जगणे नकोसे करून सोडले असणार. तुकाराम तर बोलूनचालून कुणबी वाणी. म्हणजे यांच्या लेखी क्ष्ाुद्रच. पण आज याच संतांच्या रचनांना वारकरी संप्रदायाने आपले प्रमाण ग्रंथ म्हणून मान्यता दिली. त्याची पारायणे नियमितपणे केली जातात.
वारकरी संप्रदायाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुठलेही अवडंबर या संप्रदायात नाही. या संप्रदायात गुरू केला जात नाही. देवाला तुळशीची माळ आणि त्याच्या समोर भजन किर्तन केलं की संपलं.
मध्यभारतात तीन लोकदैवतं प्रसिद्ध आहेत. पहिला आहे ओरिसातील पुरीचा जगन्नाथ. याला ‘अन्नब्रह्म’ म्हणतात. म्हणजे अन्नदान केल्याने तेथे पुण्य मिळते. या ठिकाणच्या जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही ज्या मुळच्या भारतीय भाज्या आहेत त्यांचाच वापर केला जातो. दुसरे दैवत म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरूपतीचा बालाजी. याला ‘कांचनब्रह्म’ म्हणतात. याला सोने अर्पण केल्याने पुण्य मिळते. आणि तिसरा आहे पंढरपुरचा आपला विठोबा. याला ‘नादब्रह्म’ म्हणतात. हा केवळ भजन किर्तनानं सुखी होतो. केवळ नामसंकिर्तन केल्याने इथे पुण्य लाभते.
बहिणाबाईने आपल्या कवितेत विठोबाचे वर्णन अतिशय सार्थ असे केले आहे
सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्याचा इठोबा
पानाफुलातच राजी
बहिणाबाईच्या या वर्णनातच वारकरी संप्रदायाच्या साधेपणाचा अर्थ प्रकटला आहे. आणि तेच या संप्रदायाचं खरं बलस्थान आहे.
श्रीकांत उमरीकर,
जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575
खूप छान...
ReplyDeleteचांगली माहिती 🙏🌹💐
ReplyDeleteछान मांडणी
ReplyDeleteVithal vithal vithal
Delete