Monday, May 30, 2016

मजरुह सुलतानपुरी : सैगल ते सलमान 50 वर्षांची ‘हिट’ कारकीर्द



उरूस, दै. पुण्य-नगरी, सोमवार ३० मे २०१६  

जवळपास 1946 ते 1996 या पन्नास वर्षांच्या कालावधीत कुठल्याही दशकातील गाजलेली हिंदी गाणी निवडा, त्यात मजरूह सुलतानपुरीची गाणी हमखास सापडतीलच. पन्नास वर्षे एखाद्या गीतकाराचा प्रभाव टिकून रहावं ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. या काळात तीन पिढ्या बदलल्या. 24 मे हा मजरूह सुलतानपुरी यांचा स्मृती दिन. 81 वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभलेल्या मजरूह यांना भारतीय चित्रपट सृष्टीत अतिशय मानाचा समजल्या जाणार्‍या  दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविल्या गेले. असा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच गीतकार. (नंतर कवी प्रदीप आणि गुलजार या दोघा गीतकारांना हा पुरस्कार प्राप्त झाला)

1946 मध्ये कुंदनलाल सैगल यांचा ‘शहाजहान’ हा चित्रपट आला होता. त्यातील ‘हम जी के क्या करेंगे, जब दिल ही टूट गया’ हे  गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. नौशाद यांनी संगीत दिलेल्या या गीताचे बोल लिहीले होते मजरूह सुलतानपुरी यांनी. या ‘हिट’ गीतापासून सुरू झाली मजरूह यांची ‘हिट’ कारकीर्द. या गीताला इतकी लोकप्रियता मिळाली की स्वत: सैगल यांनी जिवंतपणीच अशी इच्छा व्यक्त केली होती की माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी हेच गाणे वाजविण्यात यावे. 

प्रेमाचा त्रिकोण आपल्या सिनेमामध्ये विलक्षण लोकप्रिय ठरला आहे. त्यातील गाणी फार गाजली. याची सुरवात झाली तो सिनेमा म्हणजे 1949 मध्ये आलेला राजकपुर-नर्गिस-दिलीपकुमार यांचा ‘अंदाज’. याचीही गीतं मजरूह यांचीच होती. नौशाद यांनी याच चित्रपटात लताच्या आवाजात ‘उठाये जा उनके सितम, और जीयेे जा’ हे अतिशय वेगळं आर्त स्वरातलं गाणं दिलं होतं. त्याला मजरूहचे शब्दही तसेच समर्पक होते. राजकपुर साठी रफी आणि दिलीपकुमारसाठी मुकेश असे आवाज नौशाद यांनी या चित्रपटात वापरले होते . (राजकपुरसाठी मुकेशचा वापर याच वेळी शंकर जयकिशननं ‘बरसात’ मध्ये केला. याच काळात राजकपुरसाठी तलत महमुदचा वापर खेमचंद प्रकाश यांनी ‘जान पेहचान’ मध्ये केला होता.)

खय्याम हा अतिशय कमी पण अतिशय दर्जेदार संगीत देणारा गुणी संगीतकार. त्याच्या पहिल्या चित्रपटात 1953 च्या ‘फुटपाथ’ मध्ये तलत मेहमुदचे सदाबहार गाणे आहे ‘शाम-ए-गम की कसम’. हे गाणे अली सरदार जाफरी आणि मजरूह या दोघांच्या नावावर आहे. तेंव्हा गाण्याचे निदान 50 टक्के श्रेय मजरूहला जाते. 

शंकर जयकिशनच्या आगमनाने हिंदी गाण्यांचे सुवर्णयुग सुरू झाले. त्याला आणखी खुमारी आणली ती 1954 मध्ये ओ.पी.नय्यरच्या संगीताने. उडत्या ठेक्याने जी लोकप्रियता मिळवली ती विलक्षण होती. या उडत्या ठेक्याला शोभणारे शब्द होते मजरूह यांचे. गीता चे ठसक्यातले ‘ये लो मै हारी पिया’ किंवा अतिशय गाजलेले ‘बाबूजी धीरे चलना’, शमशाद चे  शीर्षक गीत, ‘कभी आर कभी पार लागा तीरे नजर’ किंवा रफी-गीताचे ‘मुहोब्बत कर लो जी भर लो’, ‘सुन सुन जालिमा’ अशी सगळीच गाणी हिट ठरली. ओ.पी-मजरूह या जोडीचा हा चित्रपट म्हणजे केवळ अपघात नव्हता. पुढे मि.ऍण्ड मिसेस. 55, किंवा सी.आय.डी. सारख्या चित्रपटांमधूनही या जोडीने हल्लकल्लोळ उडवून दिला. 

नौशाद किंवा ओ.पी.सोबत ‘हिट’ गाणे देणार्‍या मजरूहचे सुर लवकरच एस.डी.बर्मनशी जूळले. देवानंदच्या नवकेतनचा ‘नौ दो ग्यारह’ हा या जोडीचा पहिला चित्रपट. किशोर-आशा चे ‘आंखो मे क्या जी, रूपहला बादल’, रफी-आशाचे ‘ओ आ जा पंछी अकेला है’ किशोरचे अतिशय गाजलेले ‘हम है राही प्यार के’ यातच आहे. 

मजरूह हे असे नांव होवून बसले की संगीतकार कुठलाही असो, गायक गायिका कोणीही असो मजरूहचे गाणे म्हणजे ते ‘हिट’ होणारच. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शैलेंद्र व मजरूह हे दोनच गीतकार असे होते की त्यांची शब्द रचना गाण्याला अतिशय पोषक राहिलेली आहे. यांचे शब्द कधीही तुटत नहीत, जास्त अक्षरांचे शब्द गीतात हे कधी वापरत नाहीत, शब्दांचा सोपेपणा आहे पण दर्जा कधी घसरत नाही. 

1958 मध्ये संगीतकार रवी यांचा ‘दिल्ली का ठग’ हा किशोरकुमार-नुतनचा चित्रपट आला. रवी तेंव्हा नविनच होते. मजरूहनी पहिल्यांदाच त्यांच्यासाठी गीतं लिहीली. त्या गीतांनी रवीचे स्थान भक्कम करून टाकले. किशोर-आशा चे ‘ये राते ये मौसम नदी का किनारा’ किंवा एकट्या किशोरचे मस्तीखोर ‘सी ए टी कॅट’, ‘ हम तो मोहब्बत करेगा’ गीताचे मादक ‘ओ बाबू ओ लाला, मौसम देखो चला’ या गाण्यांनी धूम केली.

‘पारसमणी’ चित्रपटांतून कारकिर्द सुरू करणार्‍या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना उदंड लोकप्रियता मिळवून देणारा सुरवातीचा चित्रपट म्हणजे ‘दोस्ती’ (1964). यातील रफीची गाणी विलक्षण गाजली. ‘चाहूंगा मै तूझे सांज सवेरे’, ‘राहि मनवा दुख की चिंता’, ‘जानेवालो जरा मुडके देखो मुझे’ ही सगळी शब्दकळा मजरूह यांची होती.

राहूल देव बर्मन यांनी छोटे नवाब या चित्रपटापासून आपली कारकिर्द सुरू केली. त्यांच्या नावाचा झंझावात निर्माण करणारा चित्रपट होता 1966 ला आलेला ‘तिसरी मंझिल’. यातील ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘ओ हसिना जुल्फोवाली’, ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना’ किंवा इतरही गाणी असोत. यांच्या सशस्वीतेमध्ये मजरूह यांच्या शब्दांचाही मोठा वाटा आहे हे मान्य करावे लागेल. 1946 ला सैगल-सुरैय्यासाठी, 1950 ला राज कपुर-दिलीप कुमार-नर्गिससाठी, 1957 ला देवाआनंद-नुतन-किशोरकुमारसाठी आणि आता 1966 ला शम्मी कपुर-आशा पारेखसाठी शब्द पुरवणारा हा जादूगार एकच होता. 

अमिताभ बच्चन-जया भादूरीचा 1973 मध्ये आलेला ‘अभिमान’ स्मरणातून जातच नाही. एस.डी.बर्मन यांचे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील अवीट गोडीचे संगीतही सगळ्यांच्या कानात अजून ताजे आहे. ‘अब तो है तूमसे’, ‘नदिया किनारे’, ‘तेरी बिंदीया रे’ ‘पिया बीना पिया बीना’ ही सगळी गीतं मजरूहच्या लेखणीतून उतरली होती. 

विजय आरोरा-झिनत अमान या तरूण जोडीला घेवून नाझिर हुसेन ने ‘यादों की बारात’ 1973 ला काढला. ‘अभिमान’ मधल्या वडिलांच्या संगीतापेक्षा अतिशय वेगळा बाज आर.डी.बर्मने आपल्या गाण्यांचा ठेवला होता. ‘यादों की बारात निकली है आज’ किंवा ‘चुरा लिया है तूमने जो दिल को’‘लेकर हम दिवाना दिल’ वगैरे सुंदर गाणी यात होती. बाप लेक दोघांसाठी गीतकार मात्र एकच होता. तो म्हणजे मजरूह सुलतानपुरी. पुढे ऋषी कपुरचा 1977 ला आलेला ‘हम किसीसे कम नही’ हा आर.डी.बर्मनचे संगीत असलेला गाण्यांसाठी गाजलेला चित्रपट. त्याचीही गीतं मजरूहचीच. 

1966 ते 1988 या जवळपास 22 वर्षांच्या काळात हिंदी चित्रपटांमधून गाण्याचे स्थान दुय्यम होत गेले. स्वाभाविकच संगीतकार गीतकार गायक यांच्यापेक्षा इतर बाबींना महत्त्व आहे. ज्या चित्रपटाने हिंदी गाण्यातील गोडवा परत आणला तो चित्रपट होता 1988 ला आलेला अमिर-जूही या कोवळ्या जोडीचा ‘कयामत से कयामत तक’. या चित्रपटाला संगीत दिलं होतं जुन्या पिढीतील प्रतिभावंत संगीतकार चित्रगुप्त याच्या मुलांनी ‘आनंद-मिलींद’ यांनी. आपल्या बापाच्या गाण्यांचे गोडव्याचे खानदान पोरांनी चांगलेच सिद्धही केले. ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ या गाण्याने परत एकदा धुम केली. गायक नविन (उदीत नारायण), संगीतकार नविन (आनंद मिलींद), नायक नविन. जूना होता फक्त गीतकार. आणि तो होता मजरूह सुलतानपुरी. 

मजरुह यांनी वयाची सत्तरी गाठली होती. त्यांची पच्च्याहत्तरी आली तरी ते एकापेक्षा एक हिट गाणी देतच राहिले. ‘जो जीता वोही सिंकदर’ (1992) किंवा शाहरूखचा ‘कभी हा कभी ना’ (1994) यालाही गीतं मजरूहचीच होती. ‘कभी हा कभी ना’ मध्ये एक गाणं आहे ‘वो तो है अलबेला, हजारो मे अकेला’. आता मजरूह खरंच अकेले उरले होते. त्यांच्या सोबतचे सगळे निघून गेले. सैगल-सुरैय्या पाशी नौशादच्या सुरांनी सुरू झालेली कारकीर्द शाहरूख-सुचित्रापाशी जतिन ललित या नातू शोभणार्‍या संगीतकारापर्यंत येवून ठेपली होती.

खामोशी (1996) हा मजरूहचा शेवटचा चित्रपट. सलमान-मनिषा कोईराला यांच्या तोंडी अगदी शेवटच्या चित्रपटातही सदाबहार गाणी मजरूहने दिली. रसिकांच्या पदरात गोड गाण्यांचे माप भरभरून टाकले. ‘आज मै उपर, आसमां नीचे’ हे मजरूहच्या कारकीर्दीबाबत त्यांनी स्वत:च आनंदात म्हणावे असे त्यांचे गीत. अजून दोन वर्षांनी मजरूहची जन्मशताब्दी येत आहे.  

श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment