दैनिक लोकसत्ता दि. २६ फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रकाशित झालेली प्रतिक्रिया..
ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव यांच्यावर शिंतोडे उडविणारे राजेंद्र दर्डा यांची बातमी लोकसत्तात आली. त्यावर खुलासे करणारे पत्र दर्डांचे झिलकरी लोकमतचे पोटार्थी पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी लिहीले. दर्डांची वकिली करता करता आपण त्यांना आणि लोकमत परिवाराला अजूनच उघडे पाडत आहोत याची कल्पना कुलकर्णी यांना आली नसेल. अतुल कुलकर्णी यांनी खुलाश्यात ज्या बाबी लिहील्या त्याने अजूनच संशय वाढला आहे.
1. राजेंद्र दर्डा यांना औरंगाबादला वृत्तपत्र सुरू करावयाचे होते तर त्यांनी आपल्या ‘लोकमत’ नावामागे मराठवाडा लावून नोंदणी का केली? अनंतराव यांनी आक्षेप घेतला किंवा नाही हा मुद्दा नंतरचा आहे. पहिल्यांदा मराठवाडा हे नाव त्यांना का घ्यावे वाटले याचा खुलासा राजेंद्र दर्डा यांनी करावा.
2. एकदा मिळालेले नाव रद्द करून दुसरे नाव घेण्याचे काम आर.एन.आय. कडे इतक्या तातडीने कसे काय झाले? आजही वृत्तपत्राचे टायटल मिळविताना कोण यातायात करावी लागते शिवाय वेळही लागतो. मग दर्डा यांना ‘मराठवाडा लोकमत’ हे नाव बदलून ‘दैनिक लोकमत’ हे नाव तातडीने कसे काय मिळाले? हे तातडीने नाव मिळविण्यासाठी काय चलाखी करावी लागते याचे गुपित त्यांनी इतरांनाही सांगावे. किंवा यासाठी एखादी क्लासच काढावा.
3. राजेंद्र दर्डा यांच्यात धमक होती म्हणून त्यांनी मराठवाडा हे नाव गाळून ‘दैनिक लोकमत’ या नावाने वृत्तपत्र सुरू केले असा मुद्दा अतुल कुलकर्णी पुढे करतात. मग राजेंद्र दर्डा यांनी ‘राजेंद्रमत’ नावानेच नोंदणी करायची व आपल्या ‘अतुल’नीय कर्तृत्वाने नविन वृत्तपत्र चालवून दाखवायचे. त्यांच्या वडिलांनी (कै.जवाहरलाल दर्डा) त्यांच्या मोठ्या भावाने (खा. विजय दर्डा) मोठे केलेले ‘लोकमत’ हे नाव तरी त्यांना का घ्यावे वाटले? बरं हे 'लोकमत" नावही दर्डा यांचे नाही. थोर स्वातंत्र्यसेनानी लोकनायक बापुजी अणे यांनी स्वातंत्र्यापुर्वी 'लोकमत' नावाने साप्ताहिक सुरू केले होते. तेच नाव जवाहरलाल दर्डा यांनी त्यांच्याकडून घेतले. हिंदी भाषेत 'लोकमत' सुरू करताना दर्डा यांना हे नाव घेता आले नाही. कारण 'लोकमत' नावाचे हिंदी दैनिक 90 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यसैनिक अंबालाल माथुर यांनी बिकानेर येथून सुरू केले होते. हे नाव त्यांच्याकडून घेण्याचा जोरदार प्रयत्न दर्डा यांनी केला. पण माथुर यांनी ते नाकारले. सध्या अंबालाल माथुर यांचे चिरंजीव अशोक माथुर लोकमत हे हिंदी वृत्तपत्र बिकानेरहून चालवितात. म्हणून दर्डा यांना हिंदी लोकमतसाठी ‘लोकमत समाचार’ हे नाव घ्यावे लागले.
4. अनंत भालेराव दर्डा यांचा उल्लेख ‘लुटायला आलेले व्यापारी’ असा तुच्छतेने कसा करतील? कारण गोविंदभाई श्रॉफ, काशीनाथ नावंदर, रमणभाई पारख, ताराबाई लड्डा अशा कित्येक ‘व्यापारी जातीतील’ सहकार्यांबरोबर अनंतरावांनी आयुष्यभर काम केले. राजेंद्र दर्डा असे खोटे वाक्य अनंतरावांच्या तोंडी का घालतात?
5. मी तुम्हाला आशिर्वाद देवू शकत नाही असे अनंतराव म्हणू तरे कसे शकतील? बरोबरच्या कुठल्याच वर्तमानपत्राशी अनंतरावांनी शत्रूत्व दर्शविले नाही. अनंतरावांचे अग्रलेखच्या अग्रलेख त्या काळात दै. महाराष्ट्र टाईम्स मध्ये पुनर्मुद्रीत झाले आहेत. हे आत्तापर्यंत कधीच घडले नाही. दैनिक अजिंठा तेंव्हा औरंगाबादहून निघत होते. ते तर दैनिक मराठवाड्याच्याही आधी निघाले होते. पण त्या वृत्तपत्रानेही कधी अनंतरावांबाबत अशी तक्रार केली नाही. उलट अजिंठाचे संस्थापक दादासाहेब पोतनिस (गांवकरी वृत्तपत्र समुह) यांच्या जन्मशताब्दि अंकात अनंतरावांवर गौरवपूर्ण लेख आहे.
6. अनंतराव भालेराव यांचे 1991 मध्ये निधन झाले. दैनिक मराठवाडा इ.स.2000 मध्ये बंद पडला. त्यानंतर गेली पंचेविस वर्षे लोकमतला मराठवाडा विभागाचे मैदान मोकळेच मिळाले होते. त्यांना आत्तापर्यंत एकही ताकदीचा संपादक का निर्माण करता आला नाही? आजपर्यंत बाबा दळवी, महावीर जोंधळे, कुमार केतकर, दिनकर रायकर, सुरेश द्वादशीवार, मधुकर भावे, अनंत दिक्षीत, विजय कुवळेकर, प्रविण बर्दापुरकर, सुभाषचंद्र वाघोलीकर असे ‘आयात’ धोरण का चालू ठेवावे लागले? बंद पडूनही मराठवाड्याचा प्रभाव सगळीकडे जाणवतो आणि चालू असूनही लोकमतची दखल घेतली जात नाही. हे दु:ख राजेंद्र दर्डा आणि त्यांचे झिलकरी अतुल कुलकर्णी यांना वाटते आहे का?
7. दैनिक ‘मराठवाडा’कडे व्यावसायिकता नव्हती परिणामी ते बंद पडले. समाजवादी मराठवाडाच कशाला संघवादी ‘तरूण भारतही’ बंद पडला आहे. पण आता व्यावसायिक गणितं चांगली जमणारी इतर वृत्तपत्रे औरंगाबादला आली आहेत. त्यांचे बस्तान बसत चालले आहे. त्यांच्याशी स्पर्धा करणे लोकमतला जड जाते आहे. शिवाय गेली पस्तीस वर्षे सत्तेची उब मिळवत वृत्तपत्राची दादागिरी निर्माण करता आली. आता दिल्ली आणि मुंबई दोन्हीकडची सत्ता गेली आहे. शिवाय वैयक्तिक पातळीवरही पराभव स्वीकारावा लागल्यामुळे राजेंद्र दर्डा यांना त्यांच्या कर्तृत्वाचे फळ असलेल्या ‘दैनिक लोकमत’ चे भवितव्य अंधारात दिसू लागले आहे की काय?
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा सगळा खुलासा राजेंद्र दर्डा यांनी करावायचा तर तो अतुल कुलकर्णी का करत आहेत?
अनंतरावांबद्दल केलेल्या खोडसाळपणाचा खुलासा राजेंद्र दर्डा यांनीच करावा. तसेही कागदोपत्री ते लोकमतचे संपादक आहेतच. तेंव्हा त्यांनी लेखणी (कधीतरी) उचलावीच. अनंतरावांच्या तोडीचा नाही तरी निदान स्वत:वर जे आक्षेप आहेत त्याला उत्तर देणारा एखादा लेख लिहावाच. अनंतरावांचे अग्रलेख दैनिक महाराष्ट्र टाईम्स छापत असे. आता राजेंद्र दर्डा यांचा खुलासेवजा लेख लोकसत्ताने छापावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
दर्डाजी सत्तेची कवचकुंडले पांघरून धंदा करता येतो पण पत्रकारितेची प्रतिष्ठा कमाविण्यासाठी अर्जूनाच्या निष्ठेने अव्यभिचारी साधनाच ‘अनंत’काळ करावी लागते.
ज्या मूळ मुलाखतीवरून हे प्रकरण सुरू झाले ती शब्दश: इथे देत आहे. परत शब्दा शब्दावरून विपर्यास होणे नको.
‘लोकमत’ सुरू होताना आपण अनंत भालेरावजींना भेटला होतात...
राजेंद्र दर्डा : हो, मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. माझी ओळख करून दिली. मी तरुण आहे, मला काही तरी करून दाखवायचे आहे. आपला आशीर्वाद हवा, असे म्हणालो. तेव्हा ते म्हणाले, मी आशीर्वाद देणार नाही. तुम्ही व्यापारी आहात, लुटायला आलात, ‘मराठवाडा लोकमत’ अस नाव तुम्ही घेतले आहे. तुम्हाला यश मिळविण्यासाठी तुम्ही आमच्या नावाचा वापर तुमच्या नावासोबत केला आहे. तेव्हा मी त्यांना म्हणालो, माझी सगळी तयारी झाली होती. एवढा खर्च केलाय. तेव्हा ते म्हणाले, तुम्हाला ‘मराठवाडा’ या नावाचा फायदा करून घ्यायचा आहे. बाकी काही नाही. मी काहीसा नाराज होऊन घरी आलो. बाबूजींना फोन केला. त्यांना सगळे बोलणे सांगितले. विजयभय्यांना फोन केला. दोघांनाही म्हणालो, की मी ‘लोकमत’च्या नावामागे मराठवाडा शब्द न लावता यश मिळवून दाखवीन. मला ‘लोकमत’च्या आधी दैनिक शब्द लावण्याची परवानगी द्या. दोघांनीही मान्यता दिली. मी लगेच दिल्लीला जाऊन बसलो. वृत्तपत्राचे टायटल देणारी संस्था तेथे आहे. तेथे बसून ‘दैनिक लोकमत’ हे नाव घेतले. डिक्लेरेशन बदलले. ऑक्टोबर 1981 रोजी ‘लोकमत’ सुरू होणार होता. त्याचे प्रकाशन पुढे ढकलले. छापलेली सगळी स्टेशनरी रद्द केली. ‘दैनिक लोकमत’ नावाची स्टेशनरी तयार केली. पहिले सहा दिवस डमी पेपर काढून पाहिले आणि नव्या नावाने पेपर सुरू केला.
(लोकमतचा दर्जा कसा खराब आहे हे राजेंद्र दर्डाच कबूल करतात असा बराच मजकूर आहे. पण सध्या इतकेच पुरे.)
(आमचं विद्यापीठ, लेखक-संपादन : अतुल कुलकर्णी, रेखा प्रकाशन मुंबई. पहिली आ. 2015, पृ. 127)
खुपच झणझणीत, लोकमतने कायम भडक बातम्या देउन सर्व सामान्य लोकांची अभिरुचि बदलुन स्वतःच्या तुंबड्या भरल्या आहेत. त्याच्या लौकिकतेला साझेल असे फेकमत हे नाव धारण करावे...
ReplyDeleteलोकमत आणि राजेंद्र दर्डा हे जे काही आहेत ते आहेत. त्याबद्दल आम्हाला काहीही इथे म्हणायचे नाही पण त्यांनी अनंत भालेराव सारख्या महान पत्रकारावर शिंतोडे उडविणे घृणास्पद आहे...
DeleteWell written sir
ReplyDeletekhupch parakhad pane lihile sir...
ReplyDelete