Tuesday, April 29, 2014

तालाचा ‘शंकर’ आणि सुरांवर ‘जय’ असा ‘किशन’

                                        दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 29 एप्रिल 2014 

गायकाच्या उजव्या बाजूला तबल्यावर शंकरसिंग रघुवंशी आहेत आणि डाव्या बाजूला हार्मोनियमवर जयकिशन डाह्याभाई पांचाळ. गाणं अप्रतिम आहे आणि लोक भरभरून दाद देत आहेत. असं जर लिहीलं तर कुणाला काहीच कळणार नाही. एखाद्या गाण्याबद्दल हे वर्णन असून कलाकारांची नावे आहेत. पण हेच जर ‘शंकर-जयकिशन’ असा नुसता शब्द लिहीला तर पुढचे फार काही लिहीण्याची गरजच पडणार नाही. जून्या हिंदी गाण्याच्या प्रेमींच्या डोळ्यासमोर शेकडो गाणी दिसायला लागतील. कानात त्यांचे मधुर सुर घुमायला लागतील.
शंकर जयकिशन या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडीतील शंकर यांची 26 एप्रिल ही पुण्यतिथी. (शंकर जन्म:15 नोव्हें.1922  मृ: 26 एप्रिल 1987, जयकिशन जन्म: 4 नोव्हें 1929 मृ.:12 सप्टें.1971)   त्यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेला लग्नाचा हंगाम. घराच्या जवळ मंगल कार्यालयात एक लग्न होतं. त्याच्या वरातील डिजेच्या ढणढणाटी आवाजात गाणी वाजत होती आणि काही जण नाचत होते काही शांतपणे चालत होते. इतक्यात गाणं बदललं. आणि बघता बघता तरूण म्हातारे मध्यमवयीन बायका पुरूष सगळेच नाचायला लागले. ते गाणे होते ‘‘रामय्या वस्तावय्या, मैने दिल तुझको दिया’’. राज कपुरच्या श्री 420 या चित्रपटातील हे प्रसिद्ध गाणे. मी नाचणार्‍या एका अठरा वर्षाच्या पोराला थांबवून उत्सूकतेने विचारले, ‘‘मित्रा, हे गाणं कुठलं आहे? तूला माहित आहे का?’’ तो म्हणाला, ‘‘पता नही अंकल. लेकीन ट्यून कितनी जबरा है.’’ सर्वसामान्यांच्या ओठांवर खेळावीत आणि ऐकता ऐकता पायांनी ताल धरावा, सार्वजनिक ठिकाणी सहजपणे नाचता यावे ही ताकद शंकर जयकिशनच्या गाण्यांची होती.
शंकर हे पृथ्वीराज कपुर यांच्या पृथ्वी थिएटर या नाटक कंपनीत तबला वाजविण्याचे काम करायचे. ते एका गुजराती चित्रपट निर्मात्याकडे संगीत देण्याची संधी मिळते का हे पाहण्यासाठी चकरा मारत होते. तेंव्हा त्यांना जयकिशन नावाच्या तरूण मुलाची गाठ पडली. तोही याच कामासाठी चकरा मारत होता. तो हार्मोनिअम अप्रतिम वाजवायचा. या दोघांची ओळख झाली. संगीत दोघांच्याही रक्तात वहात होते. पुढे ही मैत्री इतकी घट्ट झाली की जयकिशन यांच्या अकाली जाण्यानंरतही 16 वर्षे एकट्या शंकर यांनी चित्रपटांना संगीत दिले पण नाव मात्र ‘शंकर जयकिशन’ असेच ठेवले होते. तसा त्या दोघांत करारच झाला होता असं म्हणतात.
शंकर यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम मिळवून दिले. त्यांच्या सोबतच पृथ्वी थिएटरमध्ये एक गोरा देखणा तरूण आपल्या निळ्या डोळ्यांत नव्या चित्रपटाची स्वप्ने घेवून फिरत होता. त्याने आग नावाने पहिला चित्रपट काढला. त्या चित्रपटाला संगीत देणार्‍याला राम गांगुली यांना सहाय्यक म्हणून शंकर काम करत होते. दुसर्‍या चित्रपटाच्यावेळी त्या तरूणाच्या लक्षात आल्या की जुन्या लोकांशी आपले जमणार नाही. समवयस्क  शंकरसोबत त्याच्या काळजाच्या तारा जुळल्या. त्याचे नाव राज कपुर. शंकरने जयकिशनला सोबत घेण्याचा आग्रह धरला.  बरसात, आह, आवारा, श्री 420, जिस देश मे गंगा बहती है, बुट पॉलिश, संगम, मेरा नाम जोकर असे एकाहून एक चित्रपट देत शंकर-जयकिशन आणि राजकपुर या जोडीने इतिहास घडविला.
शंकर जयकिशनचे नाव काढले की पहिल्यांदा राज कपुरच डोळ्यांसमोर येतो. मुकेशचा आवाज आपल्या कानात घुमायला लागतो ‘मेरा जुता है जपानी’, ‘आवारा हुं’, ‘किसी की मुस्कूराहटों पे हो निशा’, ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समाई, काहे को दुनिया बनाई’, ‘होठों पे सच्चाई होती है’ हीच गाणी येतात. कारण तशी प्रतिमाच तयार झाली आहे.
शंकर जयकिशनबद्दलची भरपूर माहिती आता महाजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध आहे. एकाने तर बरीचशी अचुक अशी आकडेवारीच दिली आहे. ती बघितली की जरा आश्चर्याचा धक्काच बसतो. राजकपुर मुकेश यांच्याशी आपण शंकर जयकिशनला कायम जोडत आलो. पण त्यांच्याकडे लता मंगेशकरला सर्वात जास्त (466) गाणी आहेत.मोहम्मद रफी (363), आशा भोसले (213) यांच्यानंतर मुकेश (134) चा नंबर लागतो. किशोर कुमार (103) आणि मन्ना डे (77) हे नंतर येतात.
पं. नेहरूंच्या समाजवादी व्यवस्थेचा तो काळ होता. त्यामुळे राजकपुरचे चित्रपट त्या विचारसरणीकडे झुकलेले असायचे. हाच धागा गीतकार शैलेंद्र यांनी पकडला. शंकर जयकिशन यांच्या संगीताने या विचारसरणीला कलात्मक रूप दिले. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चिमात्य संगीत असा त्रिवेणी संगम जर कुणाच्या गाण्यात प्रामुख्याने दिसत असेल तर तो शंकर जयकिशन यांच्याच. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या दोन गीतकारांचा सर्वात जास्त वापर त्यांनी आपल्या गाण्यात केला.
मुकेशचा आवाज ज्यांच्या संगीताची ओळख बनला त्यांना फिल्म फेअर पुरस्कार मात्र ‘चोरी चोरी’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा मिळाला ज्यात मुकेशचे एकही गाणे नाही. काय आश्चर्य आहे हा चित्रपट राजकपुर-नर्गिसचा आहे पण आरके बॅनरचा नाही.  ‘आजा सनम मधुर चांदनी मे हम’, ‘ये रात भिगी भिगी’, ‘जहा मै जाती हु वही चले आते हो’, ‘पंछी बनु उडके फिरू’, ‘मन भावन के घर आये गोरी’ अशी एकापेक्षा एक अप्रतिम गाणी यात आहे ज्यांनी शंकर जयकिशनच्या नावावर पहिल्यांदा पुरस्काराची मोहर उठवून दिली.
त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या पावणेदोनशेच्या घरात आहे. वयाच्या 41 व्या 1971 मध्ये वर्षी जयकिशन यांचे अकस्मात निधन झाले. गुजरात मध्ये त्यांच्या जन्मगावी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. जयकिशनयांच्या अंत्ययात्रेला प्रचंड जनसमुदाय लोटला होता. जयकिशन गेल्यावर ते ज्या चर्चगेटच्या गेलॉर्ड हॉटेलमध्ये बसायचे त्या टेबलावर मेणबत्ती लावून ‘हा टेबल जयकिशन यांच्यासाठी राखीव आहे’ अशी महिनाभर पाटी ठेवलेली होती.
जयकिशन यांच्या मृत्यूनंतर शंकर आणि राजकपुर यांचे सांगितिक संबंध तुटले. पुढची 16 वर्षे शंकर एकट्याने संगीत देत होते. पण आता त्यांच्यातील प्राणच निघून गेला होता. हळू हळू शंकर एकटे पडत गेले. 1986 मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेंव्हा अंत्यसंस्कार समयी अतिशय मोजके लोक होते. राजकपुरही तेंव्हा उपस्थित नव्हते.
मेरा नाम जोकर हा राजकपुर सोबतचा त्यांचा शेवटच्या काळातला चित्रपट. यात शैलेंद्रचे गाणे आहे

कल खेल मे हम हो ना हो
गर्दीश मे तारे रहेंगे सदा
भूलोंगे तूम भूलेंगे वो
पर हम तूम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहा अपने निशा
इसके सिवा जाना कहा

शंकर यांच्याही ओठांवर मृत्यूसमयी हीच ओळ असेल.
पतिता हा त्यांचा अगदी सुरवातीच्या काळातला राजकपुर प्रभावाच्या बाहेरचा अतिशय वेगळा चित्रपट. यात लताच्या आवाजात शैलेंद्रचे शब्द अतिशय समर्पक आहेत. भारतीय रसिकांची शंकर जयकिशन यांच्या प्रती हीच भावना असेल

वो रंग भरते है जिंदगी मे
बदल रहा है मेरा जहां
कोई सितारे लूटा रहा था
किसीने दामन बिछा दिया

रसिकांच्या पदरात चांदण्याचे दान देणार्‍या या प्रतिभावंतांना श्रद्धांजली.
   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, April 22, 2014

वाराणसी निवडणुक आणि गालिबची कविता



                                        दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 22 एप्रिल 2014 

सध्या वाराणसी फार चर्चेत आहे. कारण नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल येथून लोकसभेची निवडणुक लढवत आहेत म्हणून. नरेंद्र मोदी निवडणुक लढवित आहे म्हणजे मुलसमानांची मते कुणाला, मुसलमान उमेदवार कसा उभा करायचा किंवा उभा राहू द्यायचा नाही यावर चर्चा रंगल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर गालिब सारख्या फार्सी-उर्दूच्या महाकविला या शहराबद्दल काय वाटत होते हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी कुणालाही आवश्यकता वाटण्याचे कारणच नाही. 

गालिब हा प्रतिगाम्यांपेक्षा पुरोगाम्यांची अडचण करणारा कवी आहे. त्याने या शहराचे वर्णन ‘चराग-ए-दैर’ (दिव्यांचे देऊळ) कवितेत जे करून ठेवले आहे त्याने भल्या भल्यांची गोची होवून बसली आहे. गालिबची ही कविता मुळ फार्सीत आहे. त्याचे हिंदी-इंग्रजी भाषांतर सर्वत्र उपलब्ध आहे. पवन कुमार शर्मा यांनी गालिब वर एक सुंदर पुस्तक इंग्रजीत लिहीले आहे (गालिब : द मॅन, द टाईम्स, प्रकाशक साहित्य अकादमी, दिल्ली). या पुस्तकाचे मराठी भाषांतर प्रा.निशिकांत ठकार यांनी केले आहे. या पुस्तकात ही कविता त्यांनी गद्य स्वरूपात दिली आहे. एरवी गालिबच्या उर्दू गझलांचे दाखले सगळेच देतात. पण त्याच्या फार्सी  रचना मात्र फारश्या अभ्यासल्या, चर्चिल्या जात नाहीत. "माझ्या अस्सल प्रतिभेचे दर्शन फार्सी कवितेतच सापडते" असे गालिब यानेच लिहून ठेवले आहे. शिवाय आपल्याकडे फक्त गझलांचेच कौतुक करायची परंपरा आहे. त्यामुळे गझलेशिवाय जे काही गालिब किंवा इतर उर्दू कवींनी लिहून ठेवले आहे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. चराग-ए-दैर या सुंदर कवितेचा मराठी भावानुवाद असा  होईल...

दिव्यांचे देऊळ

आपल्या रंगभर्‍या मस्तीने
स्वर्गाला लाजविणार्‍या बनारसला
न लागो कुणाची वाईट नजर
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात
इथल्या मरणाला लाभतो 
अमरत्वाचा जर

हे मंदिर आहे
रंगीबिरंगी आश्चर्याचे जग
इथल्या वसंतात
सदोदीत फुलण्याची धग

इथे शरद बनून राहतो
उजळ कपाळीचा चंदनटिळा
आणि वसंतवारा घालतो
फुललहरींचे जानवे
इथली धुसर संध्या
स्वर्गीच्या भुवयांमधल्या 
कुंकवागत जाणवे

पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून 
घडलेल्या इथल्या मूर्ती
त्यांच्या चेहर्‍यावर
गंगेकाठच्या दिव्यांच्या
लवथवत्या उत्साहाची पूर्ती
सूर्य-चंद्र जेंव्हा रेंगाळतात
पूर्व क्षितीजावर टेहळण्यासाठी
ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा
आपले लावण्य न्याहळण्यासाठी

तार्‍यांनी खच्चून भरल्या एका रात्री
विशुद्ध भाव बाळगून गात्री
मी विचारले एका साधुला
महाराज,
या दु:खी जगातून
निष्ठा-प्रेम-भलेपणा-विश्वास
यांनी घेतला अखेरचा श्वास
बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा
भावाचा भावाच्या वाईटावर डोळा
सार्‍या कोमल भावनांचा 
झाला लय
मग का होत नाही प्रलय ?
का वाजत नाही शेवटची रणभेरी ?
अंतिम संहाराची 
कोणा हाती दोरी ?
मंद हसू ओठांवर खेळवत
प्रेमभाव डोळ्यांत मिळवत
तो म्हणाला
ही नगरी आहे
विधात्याचे प्रिय काळीज-वतन
तो होऊ देणार नाही ही नष्ट
वा हीचे पतन 

हे एैकून अभिमानाच्या गुलालाने
भरून गेले बनारसचे कपाळ
विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये
असे उंचावले बनारसचे आभाळ


वाराणसीबद्दल इतकी पवित्र भावना बाळगणार्‍या गालिब यांचे गाव होते दिल्ली. आजही दिल्लीला त्यांची कबर आहे. ते रहात असलेल्या बल्लीमारा मोहल्याचे मोठे सुंदर वर्णन गुलजार यांनी केले आहे. गुलजार लिहीतात,

बल्लीमारा मोहल्ले की वो पेचिदा दलिलों की सी गलिया ।
सामने टाल के नुक्कड पे बटेरों के कसिदे ।
गुडगुडाती हुई पान की पिकों मे वो दाद वो वाह वाह ।
चंद दरवाजे पर लटके हुये बोसिदा से कुछ टाट के पर्दे ।
एक बकरी की ममियाने की आवाज ।
और धुंदलाई हुयी श्याम के बेनुर अंधेरे
ऐसे दिवारोंसे मूं जोड के चलते है यहा,
चुडीवालां की कटरी की बडी बी जैसे,
अपनी बुझती हुई आखोंसे दरवाजे टटोले।
इसी बेनूर अंधेरी गलीकासिम से
एक तरतीब चरागों की शुरू होती है,
एक पुराने सुखन का सफा खुलता है ।
असद उल्ला खॉं गालिब का पता मिलता है ।


गालिबच्या भाषेला न्याय द्यायला गुलजार यांचेच शब्द पाहिजेत. याचे काय भाषांतर करणार?   

केवळ कविता लिहूनच गालिब थांबला असे नाही तर आपल्या एका मित्राला लिहीलेल्या पत्रात त्याने असे लिहीले आहे, "धर्माचा त्याग करून एका हातात माळ घ्यावी, कपाळावर टिळा लावावा, गळ्यात जानवे घालावे, गंगेकाठी जाऊन बसावे, अस्तित्वाच्या प्रदूषणापासून स्वत:ला पवित्र करावे आणि थेंब होऊन नदीशी एकरूप होऊन जावे अशी इच्छा मला झाली होती." (गालिब : काळ आणि कर्तृत्व, पवन कुमार वर्मा, अनु. निशिकांत ठकार, साहित्य अकादमी पृ.37)
गालिब यांनी आपल्या कवितेतून आणि पत्रातून व्यक्त केलेली भावना अतिशय विशुद्ध अशी आहे. त्याचा धर्माचा तसा काही संबंध नाही. मोदीं आणि त्यांना विरोध करायचा म्हणून केजरीवाल यांचे हेतू धार्मिक राजकीय आहेत हे काही लपलेले नाही. पण एक सुंदर-पवित्र नगरी, हीचे सौंदर्य पावित्र्य अबाधित ठेवण्याचे काही कोणी निवडणुक प्रचारात बोललेले नाही.
भोवतालच्या सर्व प्रदुषणाचा मनापासून वीट येऊन गालिबसारख्याला वाराणसीच्या गंगेकाठी विशुद्ध पवित्र असं वातावरण सापडले आणि त्याचा त्याला मोह पडला. आजच्या वातावरणात गालिब यांना असे ‘वाराणसी’ कविता लिहायला सापडेल का?  गालिबच्या कवितेच्या मोहात पडून आपण वाराणसीला गेलो तर आपल्या हाती काहीच सापडणार नाही. गालिबची कविता आपण आपल्याच मनातील वाराणसी किंवा आपल्याला आवडणारे नदी काठचे कुठलेही गाव/शहर यांना लागू करून मनातल्या मनात आनंद साजरा करू. (मूळ फार्सी कविता चिराग-ए-दैर मला उपलब्ध झाली नाही. कुणाला ती मिळाल्यास जरूर सांगा. अर्थात त्यातील शब्दांच्या अर्थासहीत आणि देवनागरी लिपीत पाठवा. मला स्वत:ला उर्दू लिपी वाचता येत नाही.)   

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, April 15, 2014

बाबासाहेब आणि ज्ञानेश्वर-तुकाराम


                                     गवसे ना ओंजळीत | उरे व्यापून आभाळ |
                                     त्याची  खुण म्हणूनिया | घेतो माखून कपाळ ||

                                            
                                      दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 15 एप्रिल 2014


बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा एक फार मोठा सण म्हणून साजरी केली जाते. मोठ्या मिरवणुका काढल्या जातात आणि या निमित्ताने सर्व वातावरण निळं होऊन जातं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ‘‘आज जयभीम वाल्यांचा सण आहे’’ असं म्हणून इतर समाज अंग झटकून बाजूला होतो. बाबासाहेबांच्या महानिर्वाणालाही आता 60 वर्षे होत आहेत. तरीही आपण दलितांना आणि त्यातही परत बुद्ध धर्म स्वीकारलेल्या पूर्वाश्रमीच्या महारांना वेगळं समजतो. कालपर्यंत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारच होता. आज तो उघड नाही पण छुप्या पद्धतीने मात्र चालूच आहे.
स्वत: आंबेडकरांना भारतीय उपखंडांतील चालिरीती, धर्म संकल्पना, संस्कृती या बद्दल संपूर्ण आणि सम्यक भान होते. त्यांनी पहिले वृत्तपत्र पाक्षिक ‘मुकनायक’ 31 जानेवारी 1920 ला सुरू केले. या पाक्षिकाच्या पहिल्याच अंकात बोधवाक्य म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग वापरला आहे.

काय करू आता धरूनिया भीड ।
नि:शंक हे तोंड वाजविले ॥
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । 

सार्थक  लाजून नव्हे हीत ॥
दलितांमध्ये साक्षरांची संख्या हजारात 9 इतकी मामुली असतानाही बाबासाहेबांनी पाक्षिकाचा उपद्व्याप केला. त्यामागे त्यांची दूर दृष्टी दिसून येते. साक्षर सवर्णांचा मोठा वर्ग त्यांच्या समोर असावा हे तर उघडचे आहे. तुकाराम महाराजांचा अभंग वापरायचे कारण त्यांना वारकरी संप्रदाय आणि त्याचा प्रभाव याची पूर्ण जाणीव होती. जनसामान्यांच्या प्रबोधनाचे काम करावयाचे तर त्यासाठी त्यांना समजेल अशीच भाषा वापरली पाहिजे. त्या काळात आणि खरं तर आजही तळागाळात वारकरी संप्रदायाने एक अध्यात्मिक सामाजिक परिभाषा रूजवली.आपल्या मुक राहिलेल्या सामाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी आपण नायक बनलोच पाहिजे इतकेच नाही तर प्रत्येक सामान्य मुक जन हा ‘मुकनायक’ बनला पाहिजे हे त्यांना अभिप्रेत होते. आणि त्यासाठी त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग वापरला.
अभंगाच्या पुढच्या ओळी ज्या त्यांनी प्रत्यक्ष वापरल्या नाहीत पण त्यातूनही बाबासाहेबांचा दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट जाणवते

आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । 
धीट नीट जीवे होऊनिया ॥
तुका म्हणजे जीवा समर्थांशी गाठी ।
घालावी हे मांडी थापटूनी ॥ 3211॥
(श्रीसार्थ तुकारामाची गाथा, संपादक विष्णुबुवा जोग, ढवळे प्रकाशन आठरावी आवृत्ती, पृ. 667)
वारकरी संप्रदायावर कुणी कितीही टिका केली तरी एक गोष्ट सर्वांनाच मान्य करावी लागते की त्यांनी एका धाग्यात अवघ्या लोकांना बांधून ठेवले. विठ्ठल हे दैवत, महिन्यातील दोन दिवस (एकादशीला) उपवास करणे, मांसाहार न करणे, धुत वस्त्र परिधान करणे, प्रत्येकाच्या ठायी देव आहे हे उमजून एकमेकांच्या पाया पडणे, वर्षातून एक वेळ पंढरीची वारी करणे इतक्या साध्या बाबींवर संप्रदायाचा संपूर्ण डोलारा उभा केला. बाबासाहेबांना ही गोष्ट तीव्रतेने लक्षात आली असणार. आणि म्हणूनच त्यांना आपल्या समाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी तुकारामांच्या ओळी समर्पक पद्धतीने वापराव्या वाटल्या.
बाबासाहेब पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि हे पाक्षिक बंद पडले. पुढे सात वर्षांनी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक सुरू केले (पहिला अंक दि. 3 एप्रिल 1927) दुसरे पाक्षिक चालू करताना तर बाबासाहेबांनी संत वाङ्मयाचा अभ्यास केल्याचे खैरमोडे यांनी लिहूनच ठेवले आहे. ‘‘ वर्तमानपत्र काढण्याचे मुक्रर केल्यानंतर साहेबांनी मराठी भाषेचा व हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा अभ्यास करण्याचे ठरविले. मुकुंदराय, मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी संतांचे वाङ्मय विकत घेवून त्याचा अभ्यास पाच-सात महिन्यांत केला.’’ (डॉ.आंबेडकरांचे अंतरंग, द.न.गोखले, मौज प्रकाशन, 1ली आवृत्ती, पृ.87). आपल्या समाजाच्या दुबळ्यांचा मुक आक्रोश मांडण्यासाठी मी आवाज उठवणार आहे असे म्हणणारे बाबासाहेब आता मात्र नुसता आवाज उठवून शांत बसण्यास तयार नाहीत. प्रत्यक्ष कृती करण्याची गरज मांडताना ते  ज्ञानेश्वरतील कृष्णाने अर्जूनाला केलेल्या उपदेशाचा आधार बाबासाहेब घेतात.

आता कोदंड घेऊनि हाती । आरूढ पां इये रथी ।
देई अलिंगन वीरवृत्ती । समाधाने ॥
जगी कीर्ति रूढवी । स्वधर्माचा मानु वाढवी ।
इया भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥
आतां पार्था नि:शंकु होई । या संग्रामा चित्त देई ।
एथ हे वांचूनि कांही । बोलो नये ॥
(ज्ञानेश्वरी अध्याय 3, ओवी क्र. 189, पारायण प्रत, पृ.70, प्रकाशक-ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, आळंदी)

कुठलीही शंका मनात न ठेवता तू शस्त्र हाती घे आणि ही पृथ्वी वाचव हा संदेश कृष्णाचा अर्जूनाला जसा आहे तसाच बाबासाहेबांचा त्यांच्या अनुयायांना आहे. कुठलीही शंका मनात न घेता आता शस्त्र हाती घ्या आणि लढा. पण आधुनिक काळातील युद्ध हे शस्त्राने लढण्याचे नसून शिक्षणाने लढावयाचे आहे. त्यामुळे वृत्तपत्राचे शस्त्र त्यांनी हाती घेतले.
भारतीय तत्त्वज्ञानात शेवटचे दर्शनकार म्हणजे महात्मा गौतम बुद्ध. नंतरच्या लोकांनी या दर्शनांचा अन्वयार्थ लावणे, त्याची मिमांसा करणे हे काम केले पण पूर्णपणे नविन दर्शन मांडले नाही.  या दर्शनकारांची जी विचार मांडणी करण्याची पद्धत आहे त्यात मागचे सगळे खोडून माझेच सगळे खरे असं म्हणण्याची पद्धत नाही. मागचे काय मी स्वीकारत आहे आणि काय नाकारत हे सकारण आणि सविस्तर नोंदवून ठेवण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे नविन काही मांडणी करताना जूने काय आहे ते सांगावे लागते. बाबासाहेबांना जी नविन मांडणी करायची होती त्यासाठी जून्यातील जे काय आहे त्याचा आधार घेतला पाहिजे याचीही त्यांना जाणिव होती. स्वाभाविकच वारकरी संप्रदायातील काही बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे. हे समजून त्यांनी ज्ञानेश्वर तुकारामांच्या ओळी वापरल्या.
आधुनिक म्हणवून घेताना बुद्ध धर्म स्वीकारलेल्या दलितांनी सरसकट सगळ्या जून्या परंपरा मुल्य नाकारायची आणि  इतरांनी दलितांना  नाकारायचे  असला बाष्कळपणा बाबासाहेबांसारख्या विद्वानाला कधीच मंजूर झाला नसता. त्यामुळे त्यांनी बंड करतानाही भारतीय परंपरेतीलच धर्म स्वीकारला. कारण त्यांना आपल्या संस्कृतिची पूर्ण जाण होती.
ज्ञानेश्वरांचा आणि त्यातही परत इतर अभंग किंवा रचना न घेता ज्ञानेश्वरीतीलच ओळ वापरण्यात दुसराही एक अर्थ त्यांना अभिप्रेत असावा. महाभारतावर संशोधन करताना रविंद्र गोडबोले यांनी हे निदर्शनास आणून दिले आहे की यात एकही माणूस ‘धर्म’ संकल्पनेवर बोलत असताना ब्राह्मणांचा संदर्भ देत नाही. किंवा ब्राह्मणांच्या तोंडी धर्मवचने येत नाहीत. याचाच अर्थ त्यावेळच्या रूढी, परंपरा, धर्म, तत्त्वज्ञान यावर ब्राह्मणेतर समाजाचे वर्चस्व असले पाहिजे. हीच बाब अप्रत्यक्षपणे ज्ञानेश्वर आणि नंतर तो संदर्भ वापरणारे बाबासाहेब यांनाही अधोरेखित करावयाची असावी.
हे आपण समजून घेत नाही कारण हे सगळे गैरसोयीचे आहे. आजच्या कळपवादी, जमातवादी, जातवादी राजकारणाला हे परवडणारे नाही. बाबासाहेबांच्या 123 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण जरा डोळसपणे विचार करायला लागलो तरी खुप आहे.

 श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, April 3, 2014

.............. चैत्र पालवी । मनी फुटावी।


                              उरूस, गुरूवार 3 एप्रिल 2014

नुकताच गुढी पाडवा होवून गेला. त्या दिवशी अतिशय गलिच्छ मजकुर फेसबुकवर फिरत होता. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या या दिवशी झाली. परिणामी हा सण साजरा करणे ही कशी ब्राह्मणी विकृती आहे असे सांगितले जात होतं. आपल्याकडे सण समारंभ म्हटले की त्याचा धर्माशी आणि स्वाभाविकच ब्राह्मणांशी संबंध जोडणं ही एक सोय आहे. खरं तर काही सण समारंभ यांचा ब्राह्मणांशी काडीचाही संबंध नाही. पण इतका सारासार विचार अशा विकृत लोकांना करायचा नसावा.

पाडव्याचा पहिला संदर्भ येतो तो रामायणातील. प्रभु श्रीराम या क्षत्रिय राजाने रावण या ब्राह्मणाचा पराभव करून त्याचा वध करून विजय मिळविला. अशा श्रीरामाचे लक्ष्मण, सीता, हनुमान व इतर वानर सैन्यासह अयोध्येत आगमन झाले तो हा दिवस. या दिवशी अयोध्येतील जनतेने मोठ्या आनंदाने आपआपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या. तोरणं बांधली. रांगोळ्या काढल्या. आज ज्याला साडी व त्यावर उलटा तांब्या असं म्हणून हिणवलं गेलं ते म्हणजे जरीचे वस्त्र व त्यावर कलश अशी रचना आहे. जमिनीवर कलश मांडताना सुलटा ठेवला जातो तर तोच कलश काठीवर ठेवायचा असेल तर उलटा केला जातो त्यामागे कुठलेही कारस्थान असण्याचे कारण नाही. संभाजी महाराजांचे मस्तक म्हणजे हा कलश असा विपरीत अर्थ कशासाठी काढल्या जातो? आणि जर जातीचाच विचार केला तर या सणाची सुरूवात ही क्षत्रियांपासून होते. ब्राह्मणांपासून नाही.

दुसरा संदर्भ आहे तो शेती करणार्‍या कुणब्यांचा. शेतीची सर्व कामे या काळात संपलेली असतात. मोठी पेरणी जी दिवाळीच्या दरम्यान होते तीचे खळे उरकलेले असते. इंद्रजीत भालेराव यांच्या ‘पीकपाणी’ या संग्रहात शेतीसंबंधी एक दीर्घ कविता आहे. तिच्या शेवटच्या तुकड्यात

खळेदळे उरकले
झाला कुणबी मोकळा
चैती वाहुटळीसंग
उडू लागला पाचोळा


असा संदर्भ आलेला आहे. पाडव्याला जुने सगळे हिशोब मिटवून नव्यानं ‘साल’ सुरू होतं. नविन सालदार याच दिवशी नेमले जातात. भारत काळे यांच्या ‘ऐसे कुणबी भुपाळ’ या कादंबरीत हे संदर्भ आलेले आहेत. तेंव्हा पाडवा म्हणजे कुणब्याचा मार्च एन्ड होवून नविन वर्ष सुरू होण्याचा दिवस.

याच काळात जत्रा भरतात. लग्न समारंभ याच रिकाम्या काळात आटोपले जातात. कारण कुणब्याच्या हातात पैसा आलेला असतो शिवाय शेतात काही महत्त्वाचे काम नसते. त्यामुळे पाडवा साजरा करण्यात येतो. यात कुठेही ब्राह्मणांचा आणि धार्मिक संदर्भ नाही.

तिसरा संदर्भ तर फारच महत्त्वाचा आहे. आणि तो म्हणजे निसर्गाचा. रामाचा जय असो नाही तर संभाजी महाराजांची हत्या असो याच्या पलिकडे निसर्ग ही एक फार मोठी शक्ति आपल्या जीवनाला व्यापून राहिलेली आहे. भारतीय उपखंडात हा काळ वसंत ऋतू म्हणून ओळखल्या जातो. जुनी पानं टाकून झाडांना नविन पालवी फुटते. लिंबाच्या मोहराचा घमघमाट सर्वत्र पसरलेला असतो. पिंपळ, कडु लिंब, अंबा, पळस ही या ऋतूची सुंदर प्रतिकं आहेत. पिंपळाच्या कोवळ्या लुस पानांवरून अक्षरश: नजर ठरत नाही. कडु लिंबाच्या घमघमाटाने सारा आसमंत भरून जातो. अंब्याचा मोहोर आणि मग त्याला लगडलेल्या कैर्‍या, पळसाच्या फुलांचा अप्रतिम लाल केशरी रंग आणि त्यांच्या देठाजवळचा काळसर मखमाली रंग नजरेला वेडं करतात. झाडांच्या पालवीला म्हणून जो शब्द आहे तो ‘चैत्र पालवी’ असा आहे नुसता पालवी असा नाही. शिवाय या काळात एक विलक्षण रिकामपण, एक शांतता पसरलेली असते. मर्ढेकरांनी मोठं सुंदर वर्णन या काळाचे केलं आहे

झोपली ग खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी या रित्या वेळी

चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वार्‍याच्या धमन्या
धुकल्या ग अंतराळी


या काळातील रंग आणि गंध याचा मोह बोरकरांसारख्या कवीला न पडता तरच नवल. बाराही महिने आणि त्या काळातील निसर्ग यांच्या उपमा प्रेयसीला देताना बोरकर लिहीतात

फुलवित चित्र चैत्र तुझ्या अंगी झाला धुंद
वक्षी फळून वैशाख उरी लोटी दाह गंध


हे सारं विसरून काही तरी विकृती मनात ठेवायची आणि तिचं प्रदर्शन या इतक्या सुंदर काळात करायचं याला काय म्हणावं? खरं तर हा काळच जुनं सारं विसरून नव्यानं काही तरी करण्याची उमेद बाळगावी असा असतो. जगण्याचे तत्त्वज्ञानच या काळात निसर्ग आपल्याला शिकवतो. धनंजय चिंचोलीकर या मित्राच्या दारापुढील पिंपळाला पाहून मला जी कविता सुचली होती तिच्यात मी हेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे

कात टाकूनी पुन्हा नव्याने
करितो सळसळ दारी पिंपळ
मिटवून टाकी पानगळीचे
अंगोपांगी उठलेले वळ

अटवून टाकी चैत्राचे ऊन
साकळलेले दु:खाचे जळ
डबडब भरण्या सज्ज जाहले
मनामनाचे सुकलेले तळ

जीर्ण शीर्ण जे पडले ते ते
उडवूनी लावी पिशी वावटळ
जूने बाजूला सरल्यावरती
नव्यास मिळते रूजण्याला बळ


जूने साचलेले कुबट अटून जावून नविन लसलसणारे चैतन्यमय असे काही तूमच्या मनामनात रूजो हीच चैती पाडव्याच्या निमित्ताने प्रार्थना. (लेखातील छायाचित्र -श्रीकृष्ण उमरीकर)

  श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575