दै. कृषीवल, उरूस सदरातील लेख 29 जून 2013
-----------------------------------------------
केदारनाथच्या महाआपत्तीने प्रचंड मोठी हानी घडून आली आहे. मोठ्या प्रमाणात यावर चर्चा चालू आहे. याच ठिकाणी असलेली आदी शंकराचार्यांची योग समाधी बुडून गेली. शंकराचार्यांनी केदारनाथला योग समाधी घेतली असे काही जण मानतात तर काही जण याच ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात त्यांनी देह सोडून दिला असंही समजतात. पण शंकराचार्यांचा शेवट केदारनाथला झाला यावर सर्वांचे एकमत आहे.
केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला दूरवर डोंगराच्या उतरणीवर (सध्याच्या हेलिपॅडच्या पलिकडे) एक छोटासा चौथरा होता. त्यावर महादेवाची एक पिंड स्थापन केलेली होती. ही जागा म्हणजे शंकराचार्यांनी योगसमाधी घेतली ती जागा असे सांगण्यात येते. आता तो चौथरा बुडून गेला. शिवाय मंदिराला लागून उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावरच शंकराचार्यांच्या नावानं एक मंदिर उभारलेलं होतं. त्यात त्यांची छोटी मूर्ती स्थापन केलेली होती. आता तेही सगळं बुडून गेलं. नष्ट झालं.
दोन वर्षांपूर्वी मी केदारनाथला सहकुटूंब गेलो होतो. त्या ठिकाणचे अद्भूत रम्य भिषण रौर्द्र आणि म्हणूनच कदाचित आकर्षित करून घेणारे सौंदर्य पाहिल्यावर मनाला पटले की शंकराचार्यांना या ठिकाणी समाधी का घ्यावी वाटली असेल. बहुतांश यात्रेकरू घाईघाईत केदरानाथ मंदिरात जावून दर्शन घेवून परतायच्या मागे असतात. आणि तेथील वातावरण पाहता ते स्वाभाविकच आहे.
दिवसभराचा पायी प्रवास करून मी अतिशय थकलेल्या अवस्थेत केदारनाथ मंदिराजवळ पोंचलो. डोंगर चढून मंदिरासमोरच्या सपाटीवर आल्यावर जे अप्रतिम दृश्य दिसले त्याने पाय खिळूनच गेले. तसेही ते श्रमाने थांबलेच होते. पावसाची भूरभूर संपून गेली होती. आभाळातले पांढरे ढगांचे पुंजके विरळ झाले होते आणि डाव्या बाजूच्या डोंगर कड्यावरून सुर्याची किरणं मंदिरामागच्या मेरूपर्वतावर पडले होते. पर्वताचा शिखराचा भाग अर्धचंद्राकृती आहे. मावळत्या सूर्याच्या किरणांनी तेवढाच भाग झळाळत होता. मागे निळसर आकाश. डोंगर पूर्ण पांढरा शुभ्र. हे वर्णन शिवतांडव स्तोत्रातील वर्णनाशी अतिशय जूळणारे होते.
जटाकटाह संभ्रम भ्रमन्नीलिम्पनिर्झरी ।
विलोलवीचिवल्लरी विराज मान मूर्धनी ।
धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके ।
किशोर चंद्र शेखरे रति प्रतिक्षणं मम ॥
(शंकराच्या तसराळ्यासारख्या आकारलेल्या जटांमधून गुरफटून फिरणार्या नदीतील चंचल लाटा वेलीसारख्या दिसत आहेत. अशा शोभिवंत मस्तकाने युक्त, धगधगणार्या जाज्वल्यमान अग्नीने ज्याचे ललाट प्रकाशित आहे, त्याने मस्तकावर चंद्राची किशोर कोर धारण केली आहे त्या शंकराच्या ठिकाणी माझी भक्ती जडली आहे)
रात्री मी या डोंगरातून खळाळत येणार्या मंदाकिनी नदीच्या काठावर जावून बसलो. स्वच्छ चांदणे पडले होते. या चांदण्यात हा डोंगर अद्भूत दिसत होता. आभाळातले ढग कोणते आणि बर्फाळ डोंगर कोणता हे कळू नये असे बेमालूम ते एकमेकात मिसळले होते.
संध्याकाळ आणि रात्र या दोन्ही वेळी या परिसराची अद्भूतता मी अनुभवली होती. शंकराचार्यांंनाही याचा अनुभव आला असेल का? नक्कीच आला असणार. ते तर अतिशय प्रज्ञावान, शिवाय कवी. या सगळ्या पसार्यात मानवी देहाची नश्वरता त्यांना याच ठिकाणी जाणवली असणार.
पहाटेला उठून मी मंदिराच्या पलिकडे असलेल्या त्यांच्या समाधी ठिकाणाजवळ एकटाच चालत गेलो. तिथे कुणीही नव्हते. अलिकडच्या गढवाल मंडलच्या विश्रामगृहाच्या चौकीदाराला मी या ठिकाणाबाबत विचारले होते. त्याने सांगितले ते पलिकडे दिसते आहे तेच शंकराचार्यांचे समाधीस्थळ. मी तिथे गेलो. उजवीकडच्या डोंगराआडून सुर्याची कोवळी किरणे गवतावर पडली होती. त्या प्रकाशात पोपटी गवताने त्या सगळ्या परिसराला नितांत सुंदरता प्राप्त करून दिली होती. त्यावरची छोटी छोटी पिवळी जांभळी गवतफुले तर केवळ अप्रतिम दिसत होती. मंदाकिनी नदीचे छोटे मोठे प्रवाह खळाळत होते. संध्याकाळचे दृश्य, रात्रीच्या चांदण्यातील अद्भूतता आणि आता पहाटेच्या उन्हातील जीवनरसाने भरलेले वातावरण याचे गारूड नक्कीच शंकराचार्यांवर झालेले असणार.
शंकराचार्य या ठिकाणी का आले याचीही एक कथा आहे. केदारनाथ हे ठिकाण पांडवांच्या स्वर्गरोहणाचे ठिकाण मानण्यात येते. पांडवांना असे वाटले की आपण आपल्याच लोकांची हत्या केली महायुद्धात. ते पाप कसे फेडायचे? आयुष्याच्या शेवटच्या पर्वात स्वर्गरोहण करताना पांडव केदारनाथच्या पायाशी आले आणि तिथे त्यांनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली मंदिर उभारलं व आपल्या पापातून मुक्ति मिळवली. या मंदिरात महादेवाची पिंड घडवित असताना ती घडेचना. तेंव्हा साक्षात शिवाने त्यांना सांगितले की या ठिकाणी ही पिंड घडणार नाही. इथली माती ठिसूळ आहे. (आताच्या आपत्तीच्या संदर्भात हे लक्षात घ्या) हा जो मागचा पर्वत दिसतो आहे तो म्हणजेच मी स्वत: शिव आहे. तेंव्हा वेगळी पिंड घडवायची गरज नाही. मग त्यांनी त्या डोंगराच्या अकाराचीच ओबडधोबड रचना केली. तिचीच पुजा पिंड म्हणून करण्यात येते. या पिंडीवर अहिल्याबाई होळकरांनी सोन्याची छत्री करून बसवली. या ओबडधोबड रचनेला चांदीचा कठडा करून दिला. त्यावर सुंदर नक्षिकाम केलेले आहे.
शंकराचार्यांनी चार पिठांची स्थापना केली. ती ठिकाणं अशी-कर्नाटकातील शृंगेरी, गुजरातधमील द्वारका, ओडिशातील जगन्नाथ पुरी, उत्तराखंडयेथील बद्रीनाथ. बद्रीनाथ व केदारनाथ मिळून एक ज्योर्तिलिंग मानण्यात येते.
शंकराचार्य भारतभर फिरले त्यामागे एक विशिष्ट सुत्र होते. त्यांचे जन्मगाव कालडी हे केरळात आहे. हा सगळा परिसर जगातील विविध धर्ममतांसाठी भारतातील प्रवेशद्वार मानण्यात येते. इस्लाम व ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी इथूनच भारतात आपल्या धर्माचा प्रचार प्रसार सुरू केला होता. हा काळ शंकराचार्यांचाच काळ आहे. (शंकराचार्य जन्म इ.स.788-समाधी 820). त्या पार्श्वभूमीवर शंकराचार्यांना विविध मतमतांमध्ये विभागलेला हिंदू समाज अद्वैताच्या एका धाग्यामध्ये गुंफायचा होता. आणि आपल्या 32 वर्षांच्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी हे प्रचंड मोठे काम केले. (महाराष्ट्रासाठी या अद्वैताचा संबंध म्हणजे आपला वारकरी संप्रदाय याच अद्वैत मतावर आधारलेला आहे.)
अभ्यासकांनी शंकराचार्यांनी केलेल्या प्रवासाचा मार्ग संशोधनाने आता निश्चित केला आहे. कालडी (जन्मस्थान, केरळ)- ओंकारेश्वर (मध्यप्रदेश-गुरूमंत्र गोविंद भागवद्पाद यांचेकडून)-वाराणसी (उत्तर प्रदेश, वेदांवरील भाष्याचे लिखाण)-बद्रीनाथ (उत्तराखंड, बादरायणाच्या वेदांत सुत्रावरती भाष्य तसेच उपनिषद, भगवद् गीता यांच्यावरील भाष्य, विष्णु सहस्त्रनामाचे लिखाण)-प्रयाग (अलाहाबाद-उत्तरप्रदेश, कुमारील भट्ट यांच्याशी भेट)-महिष्मती (बिहार, मंडन मिश्रांची भेट व वादविवादात त्यांचा पराभव)-श्रीशैल (आंध्रप्रदेश)-गोकर्ण (गोकर्ण महाबळेश्वर महाराष्ट्र)- मुकांबिका (कर्नाटक)- शृंगेरी (कर्नाटक)- कालडी (केरळ, आईचा अत्यंविधी केला)-रामेश्वर (तामिळनाडू)-तिरूपती (आंध्रप्रदेश)-अमरावती (विदर्भ महाराष्ट्र)-द्वारका (गुजरात)-उज्जैन (मध्यप्रदेश)-कामरूप (आसाम, नवगुप्त या शाक्तपंथिय पंडिताला हरवले व व्यास सुत्रांवर भाष्य केले)- जगन्नाथ पुरी (ओडिशा)- श्रीनगर (कश्मिर)-बद्रीनाथ (शेवटचे दिवस)-केदारनाथ (योगसमाधी)
हा नुसता प्रवास बघितला तरी आचंबित व्हायला होतं. त्या काळचं वातावरण बघता सर्व प्रकारचे धर्मविषयक विचार भारतात प्रसार पावत होते व या सगळ्यांवर इथल्या मातीचा एक वेेगळा रंग चढत होता. अगदी आजही कोल्हापुरच्या क्रिश्चन वस्तीत ‘‘॥ श्री येशु ख्रिस्त प्रसन्न ॥ ’’ असं लिहीलेलं आढळतं. शंकराचार्यांच्या काळात केरळात एक चेरामन जामा मशीद या नावाची मशीद आहे. तिचे तोंड पूर्वेकडे आहे. या मशीदीत रोज दिवा लावला जातो. ही मशीद महंमद पैगंबर यांच्या हयातीत बांधली गेलेली भारतातील पहिली मस्जिद आहे. इथल्या प्रथेप्रमाणे प्रार्थना स्थळांचे तोंड पूर्वेला असते मग आमच्याही प्रार्थना स्थळाचे तोंड पूर्वेलाच ठेवा असं तेंव्हाचे धर्मप्रसारक म्हणाले.
हे सगळे शंकराचार्यांच्या आसपास घडत होते. बृहडेश्वराच्या मंदिरावर बुद्धाची अतिशय मोहक अधि पद्मासनातील मुर्ती याच परिसरात आहे. सेंट थॉमसने ख्रिश्चन धर्मप्रसाराला सुरवात याच परिसरातून शंकराचार्यांच्या काळात केली. हे सगळं समजून घेत शंकराचार्य भारतभर फिरले.
अशा या प्रतिभावंताला आपल्या प्रवासात शेवटी केदारनाथला तेथल्या वातावरणात मोक्षाचा आनंद प्राप्त झाला. तिथली धार्मिक महती (पांडवांचे स्वर्गरोहण) पाहता आपण येथेच येागसमाधी घ्यावी असे त्यांना वाटले असणे स्वाभाविक आहे. आयुष्यभर पांडित्यपूर्ण विवेचन करत फिरणार्या, तत्त्वज्ञानविषयक वादविवादात सर्वांना पराजित करणार्या या महान प्रतिभावंताने आयुष्याच्या शेवटी फक्त सहा श्लोकांचे निर्वाणषटक लिहीले व आपली जिवन यात्रा संपवली.
शंकराचार्यांच्या समाधीजवळ मला जी प्रसन्नता अनुभवायला मिळाली त्यावरून मला असं वाटलं की नेमकी समाधी कुठे घेतली ते सांगता यायचं नाही पण त्यांनी निर्वाणषटक याच जागी बसून लिहीलं असणार हे नक्की. (शेवटी निर्वाणषटक व त्याचा अर्थ दिला आहे.)
आज ही समाधी वाहून गेली आहे. पूनर्निर्माण करताना शंकराचार्यांच्या या योगसमाधीस्थळाचीही सुंदर रचना केली जावी आणि तीही बंदिस्त नसावी. उघड्यावरती त्यांची सुंदर मूर्ती बसवून भोवती बाग करावी. मूर्तीपाशी निर्वाणषटक दगडात कोरून ठेवावे. कुणीही इथे बसला तर त्याला ती अनुभूती यायला हवी.
निर्वाणषटकम्
मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मन बुद्धी, अहंकार, चित्त यातील काहीही मी नाही; तसेच कान, जीभ, नाक, डोळे मी नाही; आकाश भूमी, तेज अथवा वायुही मी नाही (चित् म्हणजे ज्ञान) ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, मी शिव आहे
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पश्चकोश: ।
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
प्राणसंज्ञक वायू, अथवा प्राण अपान इत्यादी पाच वायू मी नाही; रस, रक्त इत्यादी सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) अथवा अन्नमयादी पाच कोष मी नाही ; वाणी, हात, पाय व इतर कर्मेंद्रिये मी नव्हे
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला कुणाबद्दल द्वेष नाही व आसक्ती नाही; लोभ व मोह मला नाही. गर्व मला कशाचाच नाही व कुणाबद्दल मत्सर नाही; धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थापैकी मला काही नको
न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मंत्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा: ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दु:ख नाही, मंत्र, तीर्थ, वेद व यज्ञ यांच्याशी मला कर्तव्य नाही; मी भोजन-व्यापार नाही, भोज्य पदार्थ नाही व त्याचा उपभोग घेणाराही नाही
न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बन्धुर्न मित्रं गुरूर्नैव शिष्यश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला मृत्यू नाही व मृत्यूची शंका व भिती नाही, जातिविषयक भेदभाव मला नाही; मला वडील आई नाही किंबहूना जन्मच नाही, कोणी नात्यागोत्याचे मित्र, गुरू वा शिष्य मला कोणी नाही.
अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि ।
सदा मे समत्त्वं न मुक्तिर्न बन्धश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मी निर्विकल्प म्हणजे संकल्प, विकल्प, संशय यांनी रहित आहे, मी आकाररहित आहे, कारण सर्व ठिकाणी व सर्व इंद्रिये यांना मी व्यापून राहिलो आहे, मला कशाची आसक्ती नाही व म्हणून मुक्तिही नाही.