Saturday, March 9, 2013

‘महोत्सवां’ची चलती, ‘मैफलीं’ना गळती !

दै. कृषीवल दि. ९ मार्च २०१३



मार्च महिना जवळ आला की काही संस्थांच्या अंगात येते. आणि भराभर जिकडे तिकडे कार्यक्रम व्हायला लागतात. त्याची चाहूल तशी डिसेंबर जानेवारीपासूनच लागलेली असते. यातही विशेषत: संगीताचे कार्यक्रम मोठ्या धडाक्याने होतात. कुणाला असे वाटेल की काय रसिकता उतू जात आहे. काय हे कलेचे प्रेम. काय या संस्थांना संगीताबद्दल आस्था.
अयोजनातल्या एखाद्या दुय्यम पण ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी असते अश्या पदाधिकार्‍याला विचारलं की लगेच याचं बिंग बाहेर पडते. मार्च महिन्याच्या आत ‘बजेट’ संपवायचे असते. शिवाय वर्षभर काहीतरी केलं असं दाखवायचं असतं. मग करा काहीतरी भराभर. त्यात कलेचे काही का वाट्टोळे होईना. सर्वसामान्य रसिकांना वाटते, ‘चला काही का होईना चार मोठ मोठे कलाकार तर ऐकायला बघायला मिळाले.’ मोठ्या शहरांमध्ये असा एक वर्ग तयार झाला आहे की त्याला प्रत्यक्ष कलेशी काही देणं घेणं नसते. त्याला इतकंच माहित असतं की हरिप्रसाद चौरसिया नावाचा एक मोठा बासरीवादक आहे. त्याचा कार्यक्रम ऐकला असं आपण इतरांना सांगितलं की झालं. किंवा त्याच्यासोबत एखादा फोटो काढता आला, पोराला ‘ऍटोग्राफ बुक’वर सही घेवून देता आली की झालं. जसं दारू प्यायला मोठ्या हॉटेलात जावं आणि दारू पिण्यापेक्षाही तिथे जमलेल्या इतरांना आपणही इथे येतो असं दाखवावं तसंच काहीसं हेही आहे. 
वरवर पाहता यात कलेचे काही नुकसान झाले असं कुणाला वाटणार नाही. पण जेंव्हा या समारंभाचे आकडे आपल्या हाती लागतात आणि मग त्यातले सत्य बाहेर येते. सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या एका सामाजिक संस्थेचे संगीताचे कार्यक्रमाचे बजेट मी पाहिलं. त्यात 5 लाखाच्या खर्चामध्ये जेमतेम एक लाख रूपये कलाकारांवर खर्च झालेले होते. त्यात कलाकारांचे जाणेयेणे, बिदागी, राहणे सर्व आले. आणि जागेचे भाडे, रंगमंचाची सजावट करणारे, शुटिंग करणारे, फोटोग्राफर, ध्वनीव्यवस्था सांभाळणारे, पत्रिका महिती पत्रक छापणारे, पदाधिकार्‍यांचे खाणे पिणे, पाण्याच्या बाटल्या, फुलं या सगळ्याचा खर्च 4 लाख रूपयांच्या जवळपास होता. मग गाणार्‍याला बसण्यासाठी स्टेज केलेलं आहे का स्टेज तसंच रिकामं कसं ठेवायचं म्हणून गाणारा आणून बसवला आहे?
या मोठ्या हायफाय कार्पोरेट महोत्सवांमध्ये गाण्याला जागा किती आहे? गाणं कुणाला कळतं आहे? तर याचं उत्तर दुर्दैवाने नकारार्थीच द्यावं लागेल. उस्ताद राशिद खां सारखा मोठा गायक औरंगाबादला वेरूळ महोत्सवात तासभर शास्त्रीय संगीत गायला. नंतर त्याला फर्माईश आली, जब वुई मेट चित्रपटातील गाण्याची. त्यानं डोक्यावर हात मारून घेतला. उघड्यावर थंडीत गाताना आधीच त्याचे हाल झाले होते. त्यानं गाणंच आवरतं घेतलं आणि मंचावरून निघून गेला.
जयपूर घराण्याचे गायक आणि अभ्यासक वामनराव देशपांडे यांनी आपल्या पुस्तकात भारतीय शास्त्रीय संगीताचे स्वरूप स्पष्ट करताना हे गाणं छोट्या मैफीलींमधून कसे फुलत जाते, श्रोत्याचा सहभाग कसा महत्वाचा आहे, आणि तो जर नसेल तर या संगीताची वाढ कशी खुंटेल हे स्पष्ट केलं आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे कागदावर नोटेशन करून ठेवायचे आणि ते वाचून कुणीतरी गात बसायचं असं नाही हे मूळात समजून घेतलं पाहिजे. रागाची एक चौकट फक्त आखुन दिलेली असते. कुठले स्वर या रागात आहेत हे सांगितलेलं असतं. पण त्याची मांडणी प्रत्येक गायकानं आपला गळा, आपली बुद्धी आपली प्रतिभा व त्याला श्रोत्यांचा मिळणारा प्रतिसाद हे जाणून करायची असते. आणि तसं केलं तरच हे गाणं पुढे पुढे जात राहिल. फुलत राहिल.
मोठ्या महोत्सवात हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत होतं काय की श्रोता डोळ्यासमोर दिसतच नाही. त्याची मिळालेली दाद किंवा त्याला हे संगीत कुठपर्यंत पोंचलय हे कळायला मार्गच नसतो. शिवाय नुसता दिव्यांचा झगमगाट करून टाकलेला असतो. म्हणजे गायकाच्या वादकाच्या डोळ्यांसमोर अंधारीच येते. मग तो काय करतो तर आपल्या मनानं जे सुचेल, त्याची जी तयारी असेल तेवढंच फक्त वाजवतो. मग श्रोते ज्याला टाळ्या देउ शकतील अशी द्रुत गतीतील रचना सादर करतो, तबलेवालाही त्याला जोरदार साथ करून उरलेल्या टाळ्या घेतो. दुसरा कलाकार विंगेमध्ये वाटच पहात असतो. याला रंगत चाललेलं गाणं लगेच संपवावं लागतं. नवा कलाकार परत हाच खेळ चालू करतो.
याच्या नेमकं उलट छोट्या मैफिलीमध्ये घडते. तिथे एकच कलाकार असतो. मोठा महोत्सव नसल्यामुळे स्टेज म्हणून फार उंच फार लांब असं काहीच केलेलं नसतं. श्रोत्याशी जवळीक साधता येते.100/150 लोकांमध्ये गायकाला लोकांचे चेहरे स्पष्टपणे वाचता येतात. एखादाच कलाकार असल्यामुळे त्याला वेळही भरपूर मिळतो. साहजिकच त्याला संगीतातले जे काही प्रयोग करायचे आहेत ते तो मोकळेपणाने करू शकतो. 
पंडित विजय कोपरकर यांचे गाणे अशा छोट्या मैफिलीत ऐकण्याचा योग मला नुकताच आला. त्यांच्या सांगण्यावरूनच मला छोट्या मैफिली आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या नात्याचा उलगडा झाला. जेमतेम 125 श्रोते कार्यक्रमाला होते.विजय कोपरकरांनी ‘किरवाणी’ राग जो कमी वेळात आणि तेही वादकांकडूनच सादर केला जातो ते निवडला. आणि सविस्तर सादर केला. शिवाय त्यानंतर ‘रागेश्रीकंस’ नावाचा अनवट राग सादर केला. गाताना त्यांनी रागाची रचना समजावून सांगितली. त्याचं सौंदर्य कसं खुलत जातं हेही विशद केलं. राजाभैय्या पुछवाले यांच्याकडून या रागाची माहिती कशी मिळाली. त्यावर मी विचार करून आज हा राग इथे कसा गायलो हेही सांगितलं. कोपरकरांचा प्रश्न असा होता की ही सवलत मोठ्या महोत्सवात मिळणार आहे का? आणि जर असा विचार झाला नाही, प्रयोग झाला नाही तर आपले संगित पुढे जाणार कसे?
मोठे महोत्सव कलाकारांची व्यवहारिक गरज भागवू शकतात. त्याबद्दल आपण काय बोलणार? पण सांगितिक गरजेचे काय? छोट्या मैफिलींची गरज ही भारतीय शास्त्रीय संगीताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे याचा मात्र गांभिर्याने विचार व्हायला पाहिजे. अशा मैफिलींचे आयोजन विविध ठिकाणी नियमितपणे केलं जायला हवं. 
श्रोते घडविण्यासाठीही हे आवश्यक आहे. कारण मोठ्या मोठ्या ठिकाणी जी एक घाई असते त्यातून सामान्य श्रोत्याला हे गाणं समजून घेण्यासाठी जी उसंत लागते ती मिळत नाही. हे संगीत नुसते ऐकलं आणि आवडलं असं होत नाही. याचा एक संस्कार श्रोत्यांच्या कानावर व्हावा लागतो आणि तो होण्यासाठी छोट्या मैफिलींतील गाणे पोषक ठरते. 
शास्त्रीय कशाला उपशास्त्रीय किंवा आपल्याकडील नाट्यगीत-भावगीत-भक्तिगीतांच्या बाबतही आजकाल परिस्थिती मोठी कठिण होत चालली आहे. संगणकावर तयार संगीताचे तुकडे मिळातात. त्याचा वापर करून गायक एखादा निवेदक आपल्या सोबत घेतो आणि कार्यक्रम करतो. यातून जिवंतपणा हरवून चालला आहे. जून्याकाळी जत्रेत मोठमोठ्या नट नट्यांची कट आउटस् करून ठेवलेले असायचे. त्याच्या खांद्यावर किंवा कमरेवर हात ठेवून फोटो काढायची सोय असायची. असे फोटो आपल्या घराच्या बैठकीत लावून मी अमिताभ बरोबर फोटो काढला, किंवा हेमा मालिनीच्या (मी त्या काळातलीच उदाहरणे देत आहे) कमरेला हात घालून फोटो काढला असे समाधान लोक मिळवायचे. संगणकावर तयार संगीतावर गाउन हे असेच समाधान गाणारे व ऐकणारे लोक मिळवत आहे.
मोहरमचे वाघ पाहाता पाहाता खरा वाघ आला तर ओळखूच ऐवू नये असंच होण्याची शक्यता आहे. म्हणजे महोत्सवातील आक्रस्ताळे, रसिकशरण, टाळ्याखाऊ गाणे किंवा संगणकावर तयार संगीतासोबत म्हटलेले गाणे ऐकण्याची सवय झाली अन् अस्सल सणसणीत गाणं ऐकायला मिळालं तर आपला श्रोता गांगरूनच जायचा. 
पुढच्या पिढीवर संस्कार करताना हे फारच घातक आहे हे लक्षात येते आहे. सध्या 12 वी फिजिक्सचा पेपर सगळ्यांना अवघड गेला. त्याचे समोर आलेले कारण फारच धक्कादायक आहे. ट्युशनच्या नोट्सच्या अहारी गेलेल्या, प्रश्न आणि त्याची ठराविक पठडीतील उत्तरे अशी घोकंपट्टी करणार्‍यांची अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न जरा फिरवून विचारले तर भंबेरी उडाली. इतका आपला पाया कच्चा राहून गेला आहे.
संगीत असो की जगण्यातील इतर कुठलीही गोष्ट असो आपण ‘महोत्सवां’च्या अहारी गेलो इतकं गेलो आहोत की आपल्याला स्वाभाविक ‘मैफिली’ची ओळखही राहिली नाही.   

No comments:

Post a Comment