दैनिक कृषीवल दि. २३ मार्च २०१३ मधील माझ्या "उरूस" या सदरातील लेख
.....................................................................................................................
भारतीय परंपरा ही एक मोठी गंमतशीर गोष्ट आहे. झापडबंद पद्धतीने काही एक निष्कर्ष काढायला जावं तर समोर वेगळंच उदाहरण उभं राहतं. त्याचा अन्वयार्थ लावता लावता परत आपली दमछाक होते.
ज्ञानाच्या बाबतीत ऋषीचे कुळ विचारू नये असं म्हणतात. आणि ते खरेही आहे. ज्ञान कुणाकडेही असू शकते आणि त्यासाठी आपल्याला नम्र होवून त्याच्याकडे याचना करायला हवी असं आपली परंपराच सांगते. एक उदारमतवादी दृष्टीकोन ठेवला तरच हे सगळं समजून घेणं शक्य होतं.
कबीराचे उदाहरण मोठं मासलेवाईक आहे. वीणकर असलेल्या मुस्लिम जोडप्याला सापडलेलं हे मुल. याचा धर्म कुठला? याचा उलगडा शेवटपर्यंत कुणाला करता आला नाही. त्या कबीरानंच मोठं सुंदर लिहून ठेवलं आहे
जाती न पुछो साधु की पुछो उसका ग्यान ।
मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान ॥
पण आपल्याकडे ‘म्यान’च फार महत्त्वाची बाब होऊन राहिली. म्यान तर सोडाच पण त्या बाहेर दिसणारी तलवारीची मुठ तेवढी शोभिवंत रत्नजडित करण्याची ‘आयटी-म्यानेजमेंटी’ दिखाऊ कला आपण प्राप्त केली. मग या सगळ्या खटोटोपीत आतली तलवार गंजून गेली, तीची धार बोथट झाली, ती काहीच उपयोगाची उरली नाही. त्याची कुणाला परवा नाही.
‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ या तीन ग्रंथांना वारकरी संप्रदायात ‘प्रस्थान त्रयी’ म्हणतात. यांचे पारायण करणे ही आवश्यक बाब या संप्रदायात मानली गेली आहे. संत ज्ञानेश्वरांना शेवटपर्यंत तेंव्हाच्या ब्राह्मण समाजाने स्वीकारले नाही. परिणामी धार्मिक अर्थाने ते ब्राह्मण नव्हेत. संत एकनाथांनी अस्पृश्यांच्या बाबत जी उदार भूमिका घेतली त्यावरही मोठी टिकेची झोड तत्कालिन उच्चवर्णीय समाजाने घेतली. परिणामी अतिशय करूण असा ‘जलसमाधी’चा पर्याय आयुष्याच्या उत्तरार्धात एकनाथांना स्विकारावा लागला. तुकाराम तर बोलून चालून वाणीकुणबी. त्यांचे हाल तेंव्हाच्या उच्चवर्णीयांनी केले यात काय आश्चर्य. जिथे ज्ञानेश्वर एकनाथाचा पाड यांनी लागू दिला नाही. तिथे तुकारामांना हे काय मोजणार? पण याच तुकाराम महाराजांना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळच्या शिवूर गावच्या संत बहिणाबाईंनी स्वत: ब्राह्मण असून गुरू केले आणि सर्व परंपरावाद्यांच्या तोंडात मारली.
संत बहिणाबाई यांचे शिऊर हे देवगिरी किल्ल्याच्या परिसरातील गाव. या परिसरात ज्ञानाची एक मोठी उदारमतवादी परंपरा गेली 800 वर्षे नियमित चालू असलेली आढळून येते. त्या परंपरेत अगदी शोभून दिसावं असं बहिणाबाईंचे उदाहरण.
ही मोठी उदाहरणं झाली. मला असं सारखं वाटत होतं की जर ही परंपरा असेल तर त्याचे काही तरी अवशेष या परिसरात नक्कीच आढळतील. या परिसरातील मुस्लिम संतांना गुरू करण्याची परंपरा आढळली. ब्राह्मण संताने मराठा समाजातील ज्ञानी माणसास गुरू केलेले आढळल्याचा पुरावा मिळाला आणि इतिहासाचा हा धागा जुळून आला.
परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी पूर्णे जवळ टाकळी म्हणून गाव आहे. या गावाला दाजी महाराज टाकळी असेच म्हणतात. या गावात धनगर समाजाची वस्ती जास्त असल्यामुळे त्याला पूर्वी धनगर टाकळी म्हणायचे. पण अलिकडच्या काळात दाजी महाराज या सत्पुरूषाच्या नावाने हे गाव ओळखले जाते. दाजीमहाराजांच्या मंदिरात त्यांची आरती चालू असताना मी पोंचलो. तेंव्हा त्या आरतीत ‘गंगाजी बापू मराठा’ असा उल्लेख आला. माझे कान टवकारले. ज्या आरत्या चालू होत्या त्यांच्या चाली माझ्या परिचयाच्या होत्या. माहूरला विष्णुकवींची समाधी आहे. त्यांनी रचलेल्या बहुतांश रचना या परिसरात देवीच्या आरत्या-पदे-अष्टके म्हणून भक्तिभावाने गायिल्या जातात. त्यांच्या ज्या चाली आहेत त्याच प्रकारच्या चालींवर बर्याच आरत्या नंतर रचल्या गेल्या. लोकगीतांच्या त्या पारंपरिक चाली आहेत. महानुभाव संप्रदायाच्या आरत्याही याच चालींवर आहेत. माझी उत्सूकता मला शांत बसू देईना. सध्या गादीवर असलेल्या उमेश महाराजांचे तरूण पुत्र अवधूत महाराज हे माझे मित्र. मी त्यांना आणि त्यांच्या मोठ्या बंधूंना गंगाजी बापू बाबत विचारले. तेंव्हा त्यांनी सविस्तर माहिती दिली. शिवाय ज्या पोथीत हे संदर्भ आहेत ती पोथीही दिली. दाजी महाराज शिष्यांना गंगेकाठी (आमच्या प्रदेशात गोदावरी नदीला गंगाच म्हणतात.) संथा देत होते. शिकवत असताना त्यांचे लक्ष ढळले, शिष्यांनीही चुक उच्चार केले. पण हे कोणाच्याच लक्षात नाही. बाजूला एक शेतकरी गायी चरत बसला होता. तो दोर वळता वळता महाराजांना म्हणाला, ‘लक्ष कुठे आहे, शिष्यांना चुक शिकवता की काय?’ महाराज चपापले. त्यांनी विचारले, ‘पण हे आपणाला कसे कळले?’ तेंव्हा तो शेतकरी म्हणाला, ‘ते नंतर सांगतो, आधी चुक दुरूस्त करा.’ महाराजांनी मग शिष्यांना बरोबर संथा दिली. शिष्यांना जावयास सांगितले. व त्या शेतकर्याचे पाय धरून म्हणाले, ‘तूम्ही माझी चुक दाखविली. तूम्ही माझे गुरू. मजला अनुग्रहित करा.’ तो शेतकरी म्हणजे गंगाजी बापू. गंगाजी बापू यांनी अमृतगीर महंत म्हणून नाथपंथी गोसावी होते त्यांच्याकडून दिक्षा घेतली होती. आपल्या गुरूकडून त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. त्यांना दोन पुत्र होते तान्हाजी व उमाजी. पण त्यांच्याकडून ज्ञानाची परंपरा पुढे चालणार नाही हे जाणून सत्पात्री ज्ञानदान द्यावे म्हणून ते शिष्याच्या शोधात होते.
दाजी महाराजांच्या रूपाने त्यांना योग्य शिष्य मिळाला व त्यांनी आपली सिद्धी दाजी महाराजांना दिली.
ही सगळी कथा मला त्या पोथीतून आणि अवधूत महाराजांच्या बोलण्यातून समजली. यातील इतर सर्व विसरून मी ज्ञान हस्तांतरणाच्या या विलक्षण कहाणीने जास्त मोहित झालो. दाजी महाराजांचा काळ म्हणजे 1862 ते 1930 हा कालखंड. आज आपण शिवाजी महाराजांचे गुरू रामदास होते की नव्हते यावर गदारोळ माजवतो. प्रत्यक्षात ते नव्हते असेच 1928 साली न.र.फाटकांनी सिद्ध केलं होतं. पण तथाकथित ब्राह्मण वर्चस्ववादी वृत्ती ‘बुद्धि फक्त ब्राह्मणांनाच असते’ मानत असताना शंभर वर्षांपूर्वी याच परिसरातील (रामदासांचे गाव मराठवाड्यातीलच, शिवाजी महाराजांचे वतन वेरूळचे म्हणजे मराठवाड्यातीलच) एक ब्राह्मण एका मराठा समाजातील ज्ञानी सिद्ध पुरूषासमोर नतमस्तक होतो, त्याला आपला गुरू करतो ही ज्ञानमार्गातील फार मोठी उदारमतवादी घटना आहे. आजही दाजी महाराजांचे वंशज गंगाजी बापूंच्या गावी त्यांचा उत्सव साजरा करतात.
म्हणजे आजच्या पिढीलाही आपल्या घराण्याचे गुरू घर इतर जातीतील आहे याचा सार्थ अभिमानच आहे. ही ओळख लपविण्याचे कुठलेही प्रयत्न त्यांनी केले नाहीत.
आज छोट्या गावांमधून ब्राह्मण जवळपास हद्दपार झाले आहेत. त्याची सामाजिक सांस्कृतिक कारणं काहीही असो. पण आज तालूक्यापेक्षा खालच्या गावात ब्राह्मण नाहीत ही वस्तूस्थिती आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की या ठिकाणच्या ज्या छोट्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे पावित्र्य, त्यांचा किमान एक दर्जा राखण्याचे काम करायचे कुणी? ही जबाबदारी निश्चितच ब्राह्मणेतर बहुजन समाजावर येवून पडते. ज्ञानाची परंपरा आपल्याकडे नेहमीच उदारमतवादी राहिली आहे. जे ज्ञान विशिष्ट जातीत अडकले होते ते कुबट पोथ्यांमधले ज्ञान संपून गेले. उलट जे ज्ञान बाहेर पडले त्यांने चमत्कार दाखविला असा इतिहास आहे. ब्राह्मणांनी ज्ञान नाकारले पण निदान ते पोथ्यांमधून जपून ठेवले होते म्हणून आज काही प्रमाणात तरी शिल्लक आहे. पण बहुजन समाजातील कारागिरांनी आपले ज्ञान कुठेच नोंदवून ठेवले नाही. परिणामी साधी जून्या वाड्याची दगडी भिंत ढासळली तर तीला जोड देताना आपल्या तोंडाला फेस येतो. कारण तशी दगडी जोडणी करणारे करागीरही नाहीत व त्यांनी वास्तूशास्त्राचे जे ज्ञान कमावले होते त्याच्या नोंदी नाहीत.
कुणीबीकी करणार्यांकडे प्रचंड प्रमाणात त्या विषयाचे पारंपरिक ज्ञान आजही आहे. पण याच्या नोंदी करण्याचे कष्ट कुणी घेताना दिसत नाही. ज्ञानाची तथाकथित मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती असं म्हणत आम्ही निवांत राहिलो. ब्राह्मण गेले गाव सोडून आणि इतर समाजही ज्ञानाबाबतची आपली जबाबदारी सोडून निवांत बसला आहे. याचे दुष्परिणाम आता जाणवायला लागले आहेत. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आजही जून्या दगडी बारवांमधे पाणी आढळलते. ते कसे जपले गेले याचे उत्तर डोके खाजवूनही आम्हाला सापडत नाही. सिंचनाच्या घोटाळ्यात खालपासून वरपर्यंत बहुजन समाजाचे धुरीणच अडकलेले पाहून ज्ञानाच्या परंपरेचे काय झाले हे वेगळे सांगायची गरजच नाही.
खूपच छान. ..सुरेश कुलकर्णी केसापूरकर जालना
ReplyDeleteछान खुप माहिती मिळाली
ReplyDeleteअत्यंत उत्तम लेख
ReplyDeleteऐसे जोड़नीचे काम गांवोगावी जय बहुजन लोकनि केले त्यांचे उल्लेख आदरने होने गरजेचे आहे
गांधी हत्येनन्तर ब्राह्मणानां गैसोडून जावे लागले
पन त्यातही काहिलोक त्याकाली असेही होते की त्यानी ब्राह्मणानां आपल्या घरात ठेऊन शुरवीरांसरखे त्यांचे संरक्षण केले ,त्यांच्या सम्पतिचे रक्षण केले
काळाच्या पडद्याआड हे सार्वत्रीक रित्या लोप झाले तरी त्या त्या घरात अजूनही या कथा जेवताना का होईना जीवंत आहेतच
आपन समन्वय साधनारा खूप उत्तम लेख लिहिले
तुमचे अभिनंदन.
अत्यंत उत्तम लेख
ReplyDeleteऐसे जोड़नीचे काम गांवोगावी जय बहुजन लोकनि केले त्यांचे उल्लेख आदरने होने गरजेचे आहे
गांधी हत्येनन्तर ब्राह्मणानां गैसोडून जावे लागले
पन त्यातही काहिलोक त्याकाली असेही होते की त्यानी ब्राह्मणानां आपल्या घरात ठेऊन शुरवीरांसरखे त्यांचे संरक्षण केले ,त्यांच्या सम्पतिचे रक्षण केले
काळाच्या पडद्याआड हे सार्वत्रीक रित्या लोप झाले तरी त्या त्या घरात अजूनही या कथा जेवताना का होईना जीवंत आहेतच
आपन समन्वय साधनारा खूप उत्तम लेख लिहिले
तुमचे अभिनंदन.
आजच्या काळात आत्याबश्यक असा लेख
ReplyDelete