Thursday, February 23, 2012

प्रणव मुखर्जी झोप का उडाली?


-----------------------------------------
२१ फेब्रुवारी २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-----------------------------------------


संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आलेले आहे. आतापासूनच अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी ‘माझी झोप उडाली आहे’ अशी विधानं करायला सुरुवात केली आहे. मोठी आश्र्चर्याची गोष्ट आहे. गेली 30 वर्षे स्वत: प्रणव मुखर्जी सतत सत्तेत राहिले आहेत. आजचे पंतप्रधान मनमोहन सिंग त्यांच्या खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी असताना त्यांचे अर्थमंत्री म्हणून मुखर्जींनी अर्थसंकल्प सादर केला आहे. पक्षातील दोन नंबरची जागा फार काळ त्यांनी भूषविली आहे. अशी परिस्थिती असताना आणि गेल्या तीस वर्षांतील जवळपास पंचवीस वर्षे कॉंग्रेस किंवा कॉंग्रेसी नेतेच (व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल) देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ असताना मुखर्जींची झोप आताच कशी काय उडाली? ज्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाने सगळेच खडे फोडत असतात ती येऊनही दोन दशकं उलटून गेली, खरे तर जे काटकसरीचे उपाय योजायला हवे होते त्याबाबत कुठलीही कणखर भूमिका कधीही कॉंग्रेसप्रणित सरकारांनी घेतलेली नाही. परिणामी ‘वाढता वाढता वाढे’ या पद्धतीने अनुत्पादक गोष्टींवर खर्च वाढत गेला नोकरशाही बेफाम बनत गेली. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आज विकासाचा दर नुसताच स्थिरावला नसून उलट्या दिशेने जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक पातळीवरती आर्थिक संकटं येत असताना तेथील सरकारं काटेकोरपणे उपाय योजताना दिसतात. त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते आणि आपले सरकार मात्र बिकट परिस्थिती असतानाही अन्नसुरक्षेच्या गोंडस नावाखाली अन्नधान्यावरील सबसिडी प्रचंड वाढविण्याच्या गोष्टी करते. प्रत्यक्षात या सबसिडीसाठी पैसा कुठून आणायचा याचे कोणाकडेही उत्तर नाही. आपले उत्पन्न कमी कमी होत चालले असून काटकसरीचे उपाय अमलात आणायला पाहिजेत, असं सांगायची हिंमत एखाद्या बापाला असून नये. आणि त्यानेच शेफारून ठेवलेली त्याची मुलेबाळे आणि बायको यांनी उधळपट्टी चालू ठेवावी मग साहजिकच अशा बापाच्या तोंडी माझी झोप उडाली अशी वाक्यं येणारच.
आजही हे शासन उत्पादक वर्गाची भलावण करताना दिसत नाहीत. भलावण तर सोडाच उत्पादकांना किमान पोषक वातावरण निर्माण व्हावे म्हणून काही केलं जात नाही. उलट त्यांच्या मार्गावर आजही शरद जोशी म्हणतात तसं ‘उद्योजकतेच्या वाटे खाच, खळगे, काटेकुटे’ असंच वातवरण आहे. अनुत्पादक वर्ग सोयी-सवलती लाटण्यामध्ये आजही मश्गूल आहे. गरिबांना 2 रु. किलोने तांदूळ द्यायचा आणि त्या गरिबांनी तो तांदूळ 4 रु. किलोने परत बाजारात आणायचा. बिकानेर येथील दैनिक लोकमत या हिंदी वृत्तपत्राचे संपादक अशोक माथूर यांनी मोठा भन्नाट किस्सा या संदर्भात औरंगाबाद येथे जाहीर भाषणात सांगितला. बिकानेर येथील मिठाईवाल्यांचा बिकानेर भुजिया म्हणजे शेव हा पदार्थ मोठा प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळी मटकी, मूग, उडीद यांच्या पिठापासून हा पदार्थ बनवला जायचा; पण ही कडधान्ये फार मोठ्या प्रमाणात त्या परिसरात उपलब्ध नाहीत. मग या मिठाईवाल्यांनी मोठी शक्कल लढवली. रेशनच्या दुकानातून स्वस्त मिळणारा तांदूळ, दारिद्य्र रेषेखालील लोकांकडून दुप्पट भावाने खरेदी केला, त्याचं पीठ केलं आणि त्यापासून ही बिकानेरी भुजिया बनवायला सुरुवात केली. आज सर्वत्र रेशनच्या दुकानातल्या तांदळाच्या पिठाची शेव बिकानेरी भुजिया म्हणून आपण खातो. म्हणजे बघा गरिबांसाठी किमान 1 लाख कोटी रुपये खर्चून अन्नधान्य पुरविण्याची योजना राबवायची आणि हा तांदूळ परत मिठाईवाल्यांच्या रुपाने खुल्या बाजारात सामान्य ग्राहकाच्या माथी कैकपट किमतीने आणल्या जातो. इतकंच नाही, रेशनमधील गव्हाच्या पिठाचा असाच उलटा उद्योग बिस्कीट इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात करते, हे एक उघड गुपित आहे. रेशनसाठीचा गहू मोठ्या प्रमाणात पडलेल्या भावाने खरेदी केल्या जातो. त्याचं पीठ बनवून ते बिस्किट उद्योगाकडे विकल्या जातं. आज जर रेशन व्यवस्थेत प्रत्यक्ष अन्नधान्य देण्याऐवजी पैसे द्यायचं ठरलं, तर मोठा हाहाकार उडेल. तो गोरगरिबांत नाही बिकानेरी मिठाईवाल्यांमध्ये आणि तत्सम बिस्किट बनविणार्‍यांमध्ये. असा उलटा उद्योग सर्वत्र सुरू झाल्यावर आणि पाणी डोक्याच्या वरती गेल्यावर आमचे माननीय अर्थमंत्री, अघोषित उपपंतप्रधान, कॉंग्रेसमधील नंबर 2 (खरं तर कॉंग्रेसमध्ये नंबर 1 फक्त सोनिया गांधीच!) प्रणव मुखर्जी यांची झोप उडाली, तर त्यात नवल ते काय?
अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने पायाभूत उद्योगांवरती भर द्यायला हवा. ही मागणी कैक वर्षांपासून सतत होते आहे; पण हे करताना आजही शासन दिसत नाही. कुठल्याही प्रकारची नवीन रोजगार निर्मिती गेल्या पंचवीस वर्षांत हे शासन करू शकलेलं नाही आणि उलट ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होते त्या शेतीचा गळा घोटण्याचं काम मात्र मनापासून केलं जात आहे. ग्रामीण रोजगार योजना असो की अन्नसुरक्षा योजना असो, की शिक्षणाचा मूलभूत अधिकार असो या सगळ्यांत व्यर्थपणे खर्च होणार्‍या अनुदानाला कात्री लावण्याचं धाडस प्रणव मुखर्जी दाखवणार आहेत का? सध्या कुठल्याही निवडणुका तोंडावर नाहीत. सार्वत्रिक निवडणुकांना प्रचंड अवकाश आहे. राज्याराज्यातल्या निवडणुकांबाबत तर काही बोलायलाच नको. कुठलाही निर्णय घेतला तरी त्याचा काहीच फरक राज्याराज्यांवर पडताना दिसत नाही.
विविध करांचे सुसूत्रीकरण करून कर आकारणी सोपी, सुलभ व्हावी यासाठी किमान धाडस प्रणव मुखर्जींना दाखवावे लागणार आहे. जी यंत्रणा करवसुली करते तिने काही एक प्रामाणिकपणे आणि कुशलतेने कार्यक्षमतेने काम केल्यास करांची वसुली चांगल्या पद्धतीने होऊ शकते हे वारंवार सिद्ध झाले आहे. औरंगाबाद शहरातील एक उदाहरण मोठे बोलके आहे. शहराच्या प्रमुख वस्तीतील अतिक्रमणावरती बुलडोझर फिरवण्याची हिंमत आणि कणखरपणा महापालिका आयुक्तांनी दाखविला. ते पाहून इतर भागातील अतिक्रमण केलेल्या मालमत्तांवर नुसत्या खुणा केल्या तरी तेथील सामान्य नागरिकांनी आपण होऊन आपली बांधकामं पाडून घ्यायला सुरुवात केली. प्रणव मुखर्जी तुम्ही थोडं धाडस दाखवा, कर आकारणी सोपी करा, लोकं रांगा लावून कर भरतील आणि शासनाची तिजोरी भरभरून वाहू लागेल.

Sunday, February 12, 2012

साखरेची नियंत्रणमुक्ती : पापाची कबुली


-----------------------------------------
६ फेब्रुवारी २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-----------------------------------------


ज्येष्ठ मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांना एका मुलाखतीत प्रश्र्न विचारला होता, ‘वाचनसंस्कृतीसाठी काय करायला हवे?’ तेव्हा नेमाडे उत्तरले होते, ‘काही नाही, सरळ वाचनच करायला हवे!’ नेमाडे यांच्या या साध्या उत्तरात एक मोठी खोच आहे. आज जे काही संम्मेलनं आणि तत्सम कार्यक्रमांच्या रूपाने चालू आहे. त्यातून वाचनसंस्कृतीला काहीच फायदा होत नाही. ही खंत नेमाड्यांना व्यक्त करायची होती. शेतीप्रश्र्नांच्याबाबतीतसुद्धा काहीसा असाच प्रकार आहे. बत्तीस वर्षांपूर्वी शेतीसाठी काय करायला पाहिजे, या प्रश्र्नाला शरद जोशी यांनी दिलेलं उत्तर ‘काहीच नाही, शेतमालाला भाव मिळू दिला पाहिजे. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यावरून हेच लक्षात येतं, की गेली कैक वर्षे उसाला भाव भेटू नये म्हणूनच हा सगळा उपद्व्याप चालू होता. आज शेवटी परिस्थिती पूर्णपणे हाताच्या बाहेर गेल्यावर शहाजोगपणे शासन साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या गप्पा करीत आहे. तिकडे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया अनुदानात कपात केल्याशिवाय पर्याय नाही, अशी विधानं करीत आहेत. कृषिमंत्री शरद पवार अन्नसुरक्षा विधेयकाचे कायद्यात रुपांतर करताना अस्वस्थ आहेत, यासाठी लागणारी प्रचंड सबसिडी आणायची कुठून, त्याहीपेक्षा शेतकरी असल्यामुळे त्यांना पडलेला मूलभूत प्रश्र्न फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे मुळात अन्नधान्य उपलब्ध होण्याची काय खात्री. या सगळ्याचा विचार केल्यावर आता असं लक्षात येतं आहे, 30-32 वर्षांपासून शरद जोशी आणि शेतकरी संघटना ज्या मुद्‌द्यासाठी प्राण पणाला लावून लढत आहेत, त्याच मुद्‌द्यापाशी सगळे येऊन थांबले आहेत. कृषी उद्योगाला कुठलीही भीक नको होती. मुळात ‘भीक नको, हवे घामाचे दाम’ अशी सरळ साधी वाटणारी; पण अतीशय गंभीर अर्थ असलेली घोषणा शेतकरी चळवळ देत होती. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता जागतिक पातळीवरती प्रचंड मोठ्या उलथापालथी चालू आहेत. व्यापारविषयक धोरणं विविध दिशेने जाताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढत चालला आहे. भारतापुरतं जे काही शोषण करायचं होतं, जे काही ढोंग करायचं होतं. ते सगळं संपुष्टात आलं आहे. मनात इच्छा असूनही प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसणं सरकारला आता शक्य उरलेलं नाही. केवळ मूठभरांचे पगार व्हावेत म्हणून करोडोंना वेठीस धरण्याचे दिवस आता पूर्णपणे संपले आहेत.
दि. 1 फेब्रुवारीच्या दि टाइम्स ऑफ इंडिया मध्ये अजित निनान यांचे एक अप्रतिम व्यंगचित्र आले आहे. ‘शासकीय फौजफाटा घेऊन एक मंत्री उघड्या वाघड्या, हाडाचा सापळा असलेल्या गावकर्‍यांसमोर उभा आहे आणि त्यांना सांगतो आहे. शासकीय कामांचा प्रचंड भार असल्यामुळे सध्या तुमच्यासाठी मला वेळ नाही. मी विरोधी पक्षात जाईपर्यंत वाट पाहा.’ स्वत:चीच सेवा करावी हीच सध्या प्रशासनाची प्राथमिकता बनली आहे. ते जनतेची सेवा काय क रणार? ही परिस्थिती नवीन काळात शक्य उरली नाही. शासन पूर्णपणे कर्जबाजारी होऊन बसलेलं आहे. स्वत:च्या ओझ्याखाली ते पार दबून गेलेलं आहे, त्यामुळे इतरांचं आणि विशेषत: शेतकर्‍यांचं शोषण करावं अशीही ताकद त्याच्यात आता फारशी उरली नाही. या पार्श्र्वभूमीवरती साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या हालचाली लक्षात घ्यायला हव्यात. वर्षानुवर्षे विविध योजनांच्या नावाखाली नोकरशहा, राजकीय नेते, इतकंच नाही तर अगदी समाजसेवेची टिकली मिरवणार्‍या सामाजिक संस्थाही सर्वसामान्यांचं शोषण करत राहिल्या. त्यांच्याच जिवावरती अनुत्पादक असलेला हा वर्ग उड्या मारत राहिला. प्रत्यक्ष उत्पादन करणारे उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. जागतिकीकरणाच्या काळात ही परिस्थिती काहीशी पालटली. बाहेरच्या दबावाने का होईना उद्योगक्षेत्रात मोकळे वारे वाहायला लागले. सरकारची इच्छा नसतानाही लायसन-कोटा-परमिट राज त्यांना संपवावे लागले; पण हा दुष्टपणा शेतीच्या बाबतीत मात्र अजूनसुद्धा चालू आहे; पण आता तो चालू ठेवण्याची शक्यता दिवसेंदिवस संपुष्टात येते आहे; पण हे कबूल करायचं मनाचं मोठेपण सरकारमध्ये नाही आणि राजकीय नेत्यांमध्ये तर अजिबात नाही. आव मात्र असा आणत आहेत, आम्ही शेतीचं भलं करतो आहोत! सर्वसामान्यांचं भलं करत आहोत. अन्नसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत अशीच गोची होऊन बसली आहे. हे सगळ्यांना पूर्णपणे माहीत आहे, की हे विधेयक कायद्यात रूपांतरीत झालं तर अन्नसुरक्षा प्रत्यक्षात देणे शक्य नाही, कुठल्याच पातळीवरती हे करता येणार नाही, पण तसं कबूल करणं राजकीयदृष्ट्या गैरसोयीचं आहे. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याची घोषणा उशीरा का होईना करावी लागणार आहे? त्याच पद्धतीने अन्नसुरक्षेच्या बाबतीतही आज नाही तर उद्या सरकारला उलटा निर्णय घ्यावा लागणार आहे. साखरेची लेव्ही उठवल्यावर रेशन यंत्रणेसाठी खुल्या बाजारातून साखर शासनाला खरेदी करावी लागेल, जी गोष्ट किती अशक्य आणि अव्यवहार्य आहे, हे सगळेच जाणतात, त्याच पद्धतीने अन्नसुरक्षेच्या बाबतही घडू शकेल, हे विधेयक कायद्यात रूपांतरीत झाल्यास पुरेसा अन्नसाठा अतिशय कमी दरात वाटप करण्यासाठी खुल्या बाजारातून तो खरेदी करावा लागेल. सध्या आजच असलेला अन्नसाठा साठवून ठेवण्याची कुठलीही यंत्रणा शासनाकडे नाही, मग या नवीन अन्नसाठ्याचं काय करायचं, याचं उत्तर शासनाकडे नाही, कायदा झाल्यावरती अगदी एखाद्या साध्या माणसानेही सर्वोच्च  न्यायालयात या संदर्भात धाव घेतली, तर शासनाची फेफे उडेल, हे सांगायला भविष्यवेत्याची गरज नाही. शासनाने एकच करायला हवं. ढोंगीपणा सोडून शासनच करायचं हवं. इतर उद्योग पूर्णपणे बंद करायला हवेत. भालचंद्र नेमाडे म्हणाले तसं, वाचनसंस्कृतीसाठी वाचनच करावं लागतं. इतर पळवाटा काहीही कामा येत नाहीत. शासनाने सक्षमपणे शासनाचेच काम करावे, इतर सर्व कामे लोकांवरती सोपवून द्यावीत, फक्त त्यावर देखरेख ठेवावी. परत परत ही गोष्ट सिद्ध होत गेली आहे, की शासन विविध पातळ्यांवरती वारंवार अपयशी ठरत चाललेलं आहे. नवीन काळाची पावलं ओळखून हे बदल झाले नाहीत, तर सर्वसामान्यांचा संताप अजून वाढेल. त्याला तोंड देणार कसं?