Sunday, July 16, 2017

बंद करा संमेलन अध्यक्ष निवडीचा फार्स !


दैनिक महाराष्ट्र टाईम्स १६ जुलै २०१७ 

दरवर्षी मान्सूनचा पाऊस, मृगाच्या पेरण्या, आषाढीची वारी या बातम्या आटोपल्या की सुरू होतात साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या बातम्या. कोण उभं राहणार? याचे आडाखे सुरू होतात. बहुतांश मराठी वाचकांना निवडणुक कशी होते हेच आजतागायत कळलेले नाही. 12 कोटी मराठी माणसांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 18 सदस्य हा खेळ खेळतात. ही अठरा माणसे मिळून जेमतेम हजारभर लोकांना मतदार करतात (निकष काय अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहेत). या लोकांच्या लुटूपुटीच्या खेळाला शासन 25 लाख रूपये देणगी देतं. स्थानिक राजकारण्यांना हताशी धरून दर वर्षी संमेलन संमेलन नावाचा तमाशा आयोजित केला जातो. 

यावर्षीच्या डोंबिवलीच्या संमेलनाआधीपर्यंत निदान लोकांनी केलेली गर्दी तरी चर्चेचा विषय होती. आणि सगळे असं म्हणायचे, ‘काही का असेना लोक तर येत आहेत ना. गर्दी तर जमा होते आहे ना. बस्स झालं !’ पण यावर्षी तेही नाही. सर्वसामान्य रसिकांनी संमेलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. मग कशासाठी हा अट्टाहास चालू आहे? 

सगळ्यात पहिल्यांदा विषय येतो तो संमेलनाच्या अध्यक्षपदाचा. अध्यक्ष म्हणून जो निवडून येतो त्याचे साहित्य किती रसिकांना माहित आहे? त्याची पुस्तके किती लोकांपर्यंत पोचली आहेत? साहित्य संमेलनांना शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. गेली 50 वर्षे आपण सार्वजनिक ग्रंथालय चळवळ चालवित आहोत.  गावोगाव शाळा व त्यांच्या माध्यमातून ग्रंथालये पोचली आहेत. 11 विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली किमान 5 हजार महाविद्यालये. या महाविद्यालयांमध्येही ग्रंथालये आहेत. 

आणि असं असतनाही जेंव्हा एखादा लेखक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडून येतो तेंव्हा यच्चावत पत्रकार, सामान्य रसिक यांना त्याच्या एकाही पुस्तकाची माहिती नसते हे कसे काय? 

नुकतीच आषाढीची यात्रा होवून गेली. वर्षभर महिन्यातील दोन एकादश्यांना उपवास करावयाचा, गळ्यात तुळशीची माळ घालायची, मांसाहार वर्ज्य करायचा, गावातील विठ्ठल मंदिरात किमान एकाशीला भजन किर्तन असतं त्यात सहभागी व्हायचं. कुणालाही गुरू करायचा नाही. प्रत्येकानं प्रत्येकाच्या ठायी परमेश्वर आहे असं समजून एकमेकांच्या पायी लागायचं. आणि असं वर्षभर केल्यावर मग कुठं पंढरीची आषाढीची वारी करायची. पण हे सगळं सोडून केवळ पंढरीची वारी करणे याला महत्त्व नाही. 

वर्षभर कुठलेही वाङ्मयीन उपक्रम राबवायचे नाहीत. आपल्या गावातील ग्रंथालयाचे काय हाल आहेत याचा विचार करायचा नाही. आपल्या गावातील शाळा-महाविद्यालयात मराठी विषयाचे शिक्षक-प्राध्यापक काय दिवे लावतात आपल्याला माहित करून घ्यायचे नाही. ज्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांची जूजबीही माहिती ठेवायची नाही. आणि केवळ एक मोठं संमेलन आयोजित करायचं किंवा त्याला उपस्थित रहायचं. अशानं साहित्य चळवळ वाढणार कशी?  अशानं जो लेखक अध्यक्ष म्हणून निवडून आला आहे त्याची लेखक म्हणून ओळख महाराष्ट्राला होणार कशी? बरं नंतरही वर्षभर ह्या अध्यक्षाचे कार्यक्रम कुठे आयोजित केल्या जातात का? त्याच्या पुस्तकांवर चर्चा घडवून आणली जाते का?

आज जी हजारभर लोकांनी मिळून अध्यक्ष निवडण्याची पद्धत आहे ती अतिशय दोषास्पद आहे. त्यावर कुठलीही चर्चा न करता आधी तातडीने ती बंद केली पाहिजे. यासाठी महामंडळाने ‘लोकशाही आहे काय करणार?’ असले फुसके कारण देवू नये. कारण महामंडळाचा अध्यक्ष निवडणुकीच्या मार्गाने निवडला जात नाही. घटक संस्थांची संमेलने होतात तेंव्हा त्याच्या अध्यक्षपदासाठीही निवडणुक होत नाही. विश्व संमेलनाचा अध्यक्षही निवडून येत नाही. तेंव्हा केवळ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्षच तेवढा निवडणुकीद्वारे हे म्हणणे बरोबर नाही. याला कुठलेही संयुक्तिक कारण नाही.

असली टिका केली लगेच काही जण म्हणतात मग पर्याय सांगा. 

1. साहित्य महामंडळाच्या घटक संस्था या रसिकाभिमुख व्हायला हव्या. प्रकाशक-ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते-ग्रंथ विक्रेते- शालेय /विद्यापीठीय पातळीवर मराठीचे अध्यापन करणारे शिक्षक असे सर्व घटक यात समाविष्ट असावयास हवे. (सुप्रसिद्ध समिक्षक वा.ल.कुलकर्णी यांची जन्मशताब्दि वर्ष होते. त्यासाठी स्थानिक साहित्य संस्था व विद्यापीठ यांनी मिळून कार्यक्रमाचे नियोजन करावे असे आम्ही एकदा सुचवले. तर त्या दोन्ही ठिकाणच्या लोकांनी असा काही चेहरा केला की जणू काही ब्रह्मांड कोसळणार आहे. शिवाय प्रत्येकाचे म्हणणे, ‘आम्हाला काय गरज? हवं तर त्यांनी आमच्याकडे यावं.’ हा पवित्रा अतिशय घातक आहे.) 

तेंव्हा साहित्य महामंडळाने सगळ्यात पहिल्यांदा साहित्य विषयक आस्था असणारे विविध घटक शोधून त्या सर्वांना सांधण्याचे काम करावयाला हवे. त्यासाठी घटक संस्थांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलून रसिकाभिमूख-इतर संस्थांना सोबत घेवून उपक्रम करण्याचे धोरण आखायला हवे. 

2. साहित्य संमेलन म्हणजे आषाढीची वारी आहे असं समजून त्याआधी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जावे. इतर संस्थांनी केलेल्या उपक्रमांची दखल घेतली जावी. वर्षभरातील विविध सहित्य संमेलनांच्या अध्यक्षांना सन्मानाने अखिल भारतीय साहित्य संमेलनात आमंत्रित करण्यात यावे.

3. महामंडळाची जी कार्यकारिणी आहे तिची व्याप्ती वाढवून विविध लोकांकडून अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मागवले जावेत.  यांचा विचार करून अंतिम काही नावांची यादी तयार करण्यात यावी. मग कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जावा. 

प्रत्यक्ष साहित्य संमेलन म्हणजे महामंडळाने स्थानिक आयोजक संस्थेला सोबत घेवून केलेला मनमानी कारभार असे स्वरूप सध्या आलेले आहे. त्यामुळे सामान्य रसिक संमेलनाकडे पाठ फिरवतात. किंवा त्या त्या आयोजकांनी गोळा केलेल्या हौशी लोकांचीच गर्दी होते. साहित्य रसिक त्यात आढळत नाहीत.

यासाठी साहित्य संमेलन म्हणजे आठवडाभर चालणारा माय मराठीचा उत्सव व्हायला हवा. तीन दिवसांचे संमेलन. त्याला जोडून ग्रंथालय संघाचे एक दिवसाचे अधिवेशन. सोबतच प्रकाशक परिषदेचेही एक दिवसाचे अधिवेशन आयोजित करता येवू शकते. एक दिवस ग्रंथविक्री क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते दुकानदार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा. 

अशा पद्धतीनं सहा दिवस विविध कार्यक्रम राबविता येतील. सोबतच नॅशनल बुक ट्रस्ट व साहित्य अकादमी सारख्या संस्थांना हाताशी धरून मोठे ग्रंथ प्रदर्शन सहाही दिवस आयोजित करण्यात यावे. याला जोडून रविवारच्या सुट्टीचा एखादा दिवस वाढवून सात दिवसाचा ‘माय मराठी उत्सव’ साजरा करता येईल. 

या आधी ज्या ठिकाणी संमेलन झाले ती सर्व ठिकाणे टाळून नव्या ठिकाणीच संमेलन आयोजित करण्यात येईल असे धोरण आखले पाहिजे.

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आधी ठरवून त्याने वर्षभर महाराष्ट्रात फिरून साहित्य विषयक जागृती करावी. काही कारणाने अध्यक्ष जास्त फिरू शकला नाही तर इतरांनी ही जबाबदारी घ्यावी. मग वर्षाच्या शेवटी त्याच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पाडले जावे.    

श्रीकांत उमरीकर

Saturday, July 15, 2017

शंकरमहाराज खंदारकर लिखित वारकरी प्रस्थान त्रयी


उरूस, सा.विवेक, 9 जूलै 2017


पंढरीची आषाढीची वारी संपली की सगळे लोक/माध्यमं हा विषय आपल्या डोक्यातून काढून टाकतात. परत पुढच्या वर्षी मॉन्सून आणि मग गावोगावच्या दिंड्यांची लगबग या बातम्या येईपर्यंत सारे काही या गप्पगार असते. 

खरं तर आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. म्हणजेच देव आता विश्रांतीला जातात. आणि बरोब्बर चार महिन्यांनी कार्तिक महिन्यात एकादशीला हा चातुर्मास संपतो. त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या चार महिन्याच्या काळात पंढरपुरला वारकरी संप्रदायातील साधुपुरूष किर्तनकार अभ्यासक गोळा होतात. चार महिने मुक्काम पंढरपुरातच ठेवतात. आपसात विचारांची आदान प्रदान करणे, चर्चा करणे, संप्रदायातील कुट प्रश्‍न-अडचणी सोडवणे याकाळात घडते. 

त्याच सोबत वारकरी संप्रदायातील ज्या तीन ग्रंथांना प्रस्थान त्रयी म्हणून मान आहे त्या ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ यांच्यावर सखोल अभ्यास या काळात केला जातो. अन्यथा पंढरीची वारी म्हणजे गावोगावातून टाळ कुटत निघालेल्या रिकामटेकड्या लोकांची दिंडी अशीच सगळ्यांची भावना होवून बसली आहे. 

गेल्या शंभर वर्षांत मौखिक परंपरेनं आलेलं ज्ञान नोंदवून ठेवण्याची चांगली प्रथा वारकरी संप्रदायात आता रूळली आहे. सोनोपंत दांडेकर, जोग महाराज,  धुंडामहाराज देगलुकर असे अधिकारी पुरूष या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.   त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे वै.ह.भ.प. शंकरमहाराज खंदारकर. शंकर महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रस्थान त्रयीतील तिनही ग्रंथांवर सटीप भाष्य लिहलं. अन्यथा केवळ ज्ञानेश्वरी, केवळ तुकाराम गाथा यांच्यावरील बर्‍याच अधिकारी पुरूषांची भाष्ये आहेत.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात कंधार गावी साधुमहाराज (इ.स.1708 ते 1812) म्हणून संत अठराव्या शतकात होवून गेले. त्यांच्या घराण्यातील सातवे वंशज म्हणजे शंकर महाराज खंदारकर (1923-1985).
महाराजांनी तुकाराम गाथेवर केलेले भाष्य 1965 मध्ये प्रसिद्ध झाले. (आजपर्यंत त्याच्या 9 आवृत्त्या प्रकाशीत झाल्या आहेत). जवळपास दहा वर्षांनी 1974 मध्ये ज्ञानेश्वरीवरील भाष्य ‘ज्ञानेश्वरी भावदर्शन’ प्रसिद्ध झाले (आठ आवृत्त्या). महाराजांच्या निर्वाणानंतर 1991 मध्ये प्रस्थानत्रयीतिल शेवटचा ग्रंथ ‘भावार्थ एकनाथी भागवत’ प्रकाशित झाला (चार आवृत्त्या). गंभीर ग्रंथांच्या आवृत्त्या म्हणजे वाचकांनी अभ्यासकांनी ही एका प्रकारे दिलेली पावतीच आहे.


शंकरमहाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सोप्या शब्दांत त्यांनी या तिनही ग्रंथांचे मर्म उलगडून दाखवले आहे. संसारात अडकलेली सामान्य माणसे, वारकरी संप्रदायात मानसिक आधार शोधायला येतात. महाराष्ट्रात महानुभाव, लिंगायत, गाणपत्य, शाक्त, दत्त असे कितीतरी संप्रदाय आहेत. सर्वसामान्यांना समावून घेईल असा एकमेव वारकरी संप्रदायच आहे हे काळावर सिद्ध झाले. शंकर महाराजांनी हे ओळखून आपल्या भाष्याची मांडणी केली आहे. महाराज लिहीतात, ‘... शास्त्राच्या दृष्टीने संन्याशाची मुले म्हणून भ्रष्ट ठरलेल्या परिस्थितीतही परमार्थ करता येतो, हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात आहे. कनक-कांता संपन्न असलेल्या परिस्थितीतही परमार्थ करता येतो, हे श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रात आहे. त्याचप्रमाणे विपन्नावस्थेतही परमार्थ कसा करता येतो, हे श्री तुकाराम महाराजांची आपल्या चरित्रात दर्शविले आहे.’


‘श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य’ सगळ्यात पहिल्यांदा प्रकाशित झाले. पहिल्याच ग्रंथांत शंकर महाराजांनी पाठभेद काळजीपूर्वक तपासून आपली भूमिका जाहिर केली आहे. त्यावरून त्यांची दृष्टी एका टाळकुट्या वारकरी सांप्रदायिकाची न राहता चिकित्सक आधुनिक अभ्यासकाची कशी आहे हे लक्षात येते. बोली भाषेतील विविध छटांचे शब्द बदलून तेथे मूळ प्रमाण असणारे संस्कृत शब्द त्यांनी भाष्य करताना योजिले आहे. उदा. आहिक्य- ऐहिक, अतित्यायी- आततायी, अभिळास-अभिलाष, दरुशण-दर्शन, कमळणी- कमलिनी. 

शंकरमहाराज सांप्रदायिक आहेत. त्यांच्या लेखनात परंपरेचा एक जिव्हाळा आढळून येतो. ज्ञानेश्वर माऊली बद्दल लिहीताना स्वाभाविकच त्यांच्या लेखणीलाही पान्हा फुटतो, ‘... आपण समाधिस्थ झाल्यावर माऊलीने बाळाला दररोज दूध पिण्याकरिता हरिपाठ लिहून ठेवला. बाळाने जन्मदरिद्री राहू नये व सर्वकाळ आनंदात राहावे म्हणून अनुभवामृताचे धन साठवून ठेवले. बाळाचे पारमार्थिक आरोग्य कायम राहण्याकरिता पासष्टीच्या रूपाने पासष्ट सुवर्णमात्रा करून ठेवल्या. बाळाला वाईटाच्या संगीतने वाईट वळण लागू नये म्हणून गाथेच्याद्वारा विठ्ठल भक्तीचे संस्कार त्याच्यावर केले...’

शंकर महाराजांचा तिसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘भावार्थ एकनाथी भागवत‘. महाराजांच्या पूर्वी जी संपादने या भागवताची उपलब्ध आहेत त्यांच्यात मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ नाही. शंकर महाराजांनी मात्र मूळ संस्कृत श्लोक, त्याचा अर्थ, त्यावरच्या एकनाथ महाराजांच्या ओव्या आणि मग त्या ओव्यांचा अर्थ आपल्या टिपणीसह असे स्वरूप या ग्रंथाला आहे. म्हणून त्याचे महत्त्व वाढले आहे. काही ठिकाणी तर प्राप्त परिस्थितीचा विचार करून नविन अर्थाची मांडणीही करून दाखवली आहे. त्यातून महाराजांची उच्चकोटीची प्रज्ञा आणि प्रतिभा जाणवते.


एकनाथी भागवताच्या नवव्या अध्यायात 192 क्रमांकाची ओवी आहे

विजातीयभेद ते ठायी । नसे सजातीय भेद कांही ।
स्वगतभेदु तोही नाही । भेदशून्य पाहे ये रीती ॥

आता यात नाथांच्या मूळ ओवीत कितीतरी रिकाम्या जागा आहेत. शंकर महाराजांनी याचा अर्थ उलगडून दाखवताना, ‘... त्या नारायणाचे ठिकाणी वृक्ष पाषाणातल्याप्रमाणे विजातीय भेद नाही. वड-पिंपळातल्याप्रमाणे सजातीय भेद नाही आणि वृक्षांच्या शाखा, पल्लव, पाने, फुले, फळे यांच्यातल्याप्रमाणे स्वगतभेदही नाही. याप्रमाणे नारायणाचे स्वरूप भेदशून्य आहे.’ रिकाम्या जागा भरून काढल्या आहेत. 

गेली आठशे वर्षे अशिक्षीत जनतेला वेदांताचे तत्त्वज्ञान साध्या सोप्या सुबोध भाषेत संतांनी समजावून सांगितले. स्वत:वर अन्याय झाला तरी (ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले, एकनाथांना भावार्थ रामायण अर्धवट ठेवून जलसमाधी घ्यावी लागली, तुकारामांचा शेवट तर गुढच आहे) सामान्य लोकांना भवसागरातून तरून जाण्याचा मार्ग सुचवला. आधुनिक काळात शंकर महाराजांसारख्या साधुपुरूषांनी चिकित्सक दृष्टीनं डोळसपणे हे सगळं विचारधन लिखित स्वरूपात भाष्यासह उपलब्ध करून दिलं. आपण शिक्षणाची इतकी साधनं निर्माण केली, गावोगाव शाळा उघडल्या, हजारोंनी शिक्षक नेमले तरी अपेक्षीत ज्ञान पोंचत नाही म्हणून आपण ओरड करतो. मग या साधु संतांनी शेकडो वर्षे कुठलीही अनुकूलता नसताना ही ज्ञानाची परंपरा केवळ लोकांनी दिलेल्या भिक्षेवर आणि दानावर समृद्ध करून दाखवली हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.       

(शंकर महाराजांची सर्व ग्रंथ संपदा वै. शंकरमहाराज खंदारकर विश्वस्त संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आली असून ती वाचक अभ्यासक वारकरी भक्तांसाठी उपलब्ध आहे.)

   
श्रीकांत उमरीकर, 
जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Monday, July 10, 2017

खार पाळणार्‍या मुलाची गोष्ट


उरूस, सा.विवेक, 9 जूलै 2017

... अशातच मी टोपीचं दुमडलेलं तोंड मोकळं केलं. तेवढ्या उजेडात पिलाचे इवलेसे डोळे लुकलुकताना दिसले. काजव्यासारखे. विचार आला, हिचं नाव ‘लुकलुकी’ ठेवूया. आईनं ‘लकाकी’ सुचवलं. पण त्यापेक्षा ‘लुकी’ म्हटलं तर? माझा मलाच आनंद झाला. मनातल्या मनात बारसं करून मोकळा झालो. ‘लुकी’ नाव पक्कं झालं....

‘खारिच्या वाटा’. ल.म.कडू यांच्या या पुस्तकाला यावर्षीचा साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एक छोटा चौथीतला शाळकरी मुलगा खारीचं पिल्लू पाळतो त्याची ही गोष्ट आहे  एक साधं छोटं कथानक. कादंबरी जेमतेम दीडशे पानांची. वाक्यांची सुटी सुटी रचना असल्याने पानं इतकी भरली. नसता जेमतेम शंभरच भरतील. पण ज्या साधेपणानं, ज्या निरागसतेनं, ज्या उत्कटतेनं यात गावाचं लहानमुलांच्या विश्वाचं निसर्गाचं वर्णन आलंय त्याला तोड नाही. 

मोरानं पावसाळ्यात आपला पिसरा उलगडत न्यावा तसा इतका हा नाजूक विषय ल.म.कडू यांनी वाचकांसमोर उलगडत नेला आहे. मोराचा आणि पावसाळ्याचा संदर्भ आठवण्याचं एक कारण म्हणजे या पुस्तकातच तसा संदर्भ आहे. हा छोटा मुलगा आणि त्याचा मित्र दिनू गायरानात गुराखी जनावरं चरायला जातात तिकडे रोज खेळायला जात असतात. त्यांना एक मोठी दगडी उंच शिळा आढळते. त्यांना असं वाटतं की आपण यावर मोराचे चित्र कोरले पाहिजे. त्या प्रमाणे ते कामाला सुरवात करतात. दोघं मित्र समोरा समोर बसलेले दोन मोर दगडात कोरतात. आणि असं नियोजन करतात की हे सगळं काम आषाढाच्या पहिल्या दिवसापर्यंत पूर्ण व्हावं. आणि तसं ते पूर्ण होतंही.

काय पण प्रतिभा आहे .. इकडे कालिदासाच्या  मेघदुतात आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसलेल्या ढगामुळे यक्षाला बायकोची आठवण होते असं वर्णन आहे. आणि इथे या कादंबरीत लेखक आषाढाच्या पहिल्या दिवसापर्यंत मोराचे शिल्प पूर्ण होण्याचा प्रसंग रंगवतो. जेणे करून पुढच्या नियमित कोसळणार्‍या पावसात जणू हे मोर नाचणारच आहेत. हे मोर त्या दोन लहान मुलांच्या मनात नाचू लागले हे निश्‍चित. कडू यांच्या प्रतिभेची आणि त्यांच्या चित्रकार असण्याची साक्ष अजून पुढच्या एका वर्णनात पटते. या मोराच्या शिल्पात खाली रिकामी जागा राहिली असते. तिथे त्यांनी पाळलेल्या ‘लुकी’ खारीचं शिल्प ते रेखाटतात. आणि पुढे ल.म.कडू यांनी असं लिहीलं आहे, 

...दोन दिवसांत कोरीव काम पूर्ण झालं. चंदनं ‘लुकी’ असं नावही कोरलं. ‘ल’ चा उकार मोठा करून त्याला शेपटीसारखा झुबकाही काढला....

संपूर्ण कादंबरीत लहान मुलांचे विश्व, गावगाडा आणि निसर्ग असे तिन पातळीवरील वर्णनं आलेली आहेत. 

गावातल्या एका लग्नाचं वर्णन करताना सगळा कसा एकमेकात मिसळून गेला आहे हे अगदी साधेपणात नकळतपणे लेखक रंगवून जातो. त्यात कुठेही अभिनिवेश येत नाही. कुठेही शब्दांचा अतिरिक्त फुलोरा नाही. 

... लग्न ही काही एका दिवसात उरकायची गोष्ट नसे. आधी हळदी. दुसर्‍या दिवशी लग्न. तिसरा दिवस वरातीचा. चौथ्या दिवशी देवाची ‘पांजी’. असा सगळा रमणा. त्यात अख्खा गाव गुंतलेला. ‘चूलबंद’ निमंत्रण. एकाही घरात चूल पेटत नसे. सारं काही लगीन घरीच. गाव एक कुटूंब होई. बलुतेदार, कातकरी, धनगर त्यातच येत...

चौथितला हा मुलगा आपल्या शाळेचं, मित्रांचं वर्णनही अगदी सहज बोलता बोलता एखादं चित्र रेखाटावं, रेखाटन काढावं तसं मांडून जातो. खरं तर निसर्ग, गावगाड्यातील माणसं ही इतकी इकमेकांत मिसळून गेलेली असत की त्यांना वेगळं वेगळं काढता येत नाही. लेखक हे सगळं नेमकेपणानं टिपत जातो. 

त्याची शाळा भरते आहे तिच मुळी भैरोबाच्या मंदिरात. मंदिराच्या परिसरात भरपूर झाडी. खारी अंबा असा हळूवार खायच्या की त्यांनी खाल्लेला अंबा तसाच झाडाला लटकून असायचा. कधीतरी मोठा वारा आला की तो अंबा पडायचा. त्याचा मंदिराच्या पत्र्यांवर आवाज व्हायचा. पोरांना वाटायचं की हा पाडाचाच अंबा आहे. 

ल.म.कडू यांनी जी वर्णनं केली आहेत ती त्यांच्यातल्या प्रतिभावंत चित्रकाराची साक्ष देतात. चित्रापेक्षाही रेखाटनांची जास्त आठवण येते. आता एक वर्णन आहे शाळा भरते त्या भैरोबाच्या देवळाचे

...देवाची मूर्ती दगडाची. काळी कुळकुळीत. गुळगुळीत. वर छोटी कमान. मधोमध लटकती पितळी घंटा. भरवती नवसाचे पाळणे, नारळाच्या वाट्या, तांबडी निशाणं, बारक्या घंट्या असं काही बाही अडकवलेलं. गाभारा अंधूक. देवापुढं दगडी चीप. त्यावर नारळ फुटत. कमानीच आत दोन लहानग्या देवळ्या. त्यात दगडी पणत्या. तेलानं मेणचटलेल्या. वात लावल्यावर उजेड पांगायचा. भैरोबाची मूर्ती स्पष्ट दिसायची. चांदीचे डोळे चमकायचे...

चित्रपटात एखादा निकराचा हाणामारीचा जगण्या मरण्याशी संबंधीत ‘क्लायमॅक्स’चा प्रसंग असतो तसा एक छोटा पण फार प्रत्यंयकारी प्रसंग लेखकानं यात रंगवला आहे. एकदा ही खार या छोट्या मुलाच्य खांद्यावरून बैलाच्या अंगावर जावून पडते. काहीतरी अंगावर बसलं म्हणून तो झटकायला जातो. भिवून लुकी त्याच्या वशिंडाजवळ येवून चिटकून बसू लागते. तस तसा तो बैल चवताळत जातो. तो बेभान होतो. तसतशी खार अजूनच त्याला भितीनं चिटकून राहते. बैल अजूनच चवताळतो. उधळतो. आता काय होणार म्हणून सगळे भयचकित होवून पहात असतात. खारीनं खाली उडी मारावी असं सगळ्यांना वाटत असतं पण तसं सांगणार कसं? बैलाच्या शेपट्याचा मार्‍यानं शेवटी ही लुकी खाली पडते. ती निपचित पडते हे पाहून छोट्या मुलाच्या काळजाचा ठोका चुकतो. त्याचा मित्र दिनू त्याला समजावतो. शेवटी जेंव्हा लुकी थोडी मान हलवते तेंव्हाच यांच्या जिवात जीव येतो. 

कांदबरीभर असे प्रसंग विखूरलेले आहेत. लाकडाच्या रचलेल्या ढिगात साप शिरतो असा समज होतो. त्या जागेतून तो बाहेर काढायचा तर एवढी मोठी लाकडं बाहेर काढावी लागणार. ते तर शक्य नसतं. मग दिनू सुचवतो की लुकीला आपण या ढिगात सोडू. ती अलगद पुढच्या फटीतून बाहेर आली की कळेल धोका नाही. आणि धोका असेल तर ती परत सोडल्या रस्त्यानंच वापस येईल. त्या प्रमाणे लुकीला सोडतात. ती सुखरूप पलिकउच्या बाजूनं बाहेर येते तेंव्हा सगळेच निश्‍वास सोडतात की आत साप नाही. 

असे प्रसंग तर अतिशय विलक्षण असे उतरले आहेत. 

कादंबरीचा शेवट अतिशय प्रत्ययकारी केला आहे. धरण होणार म्हणून गाव उठतं. सगळे घरदार सोडून सामान सुमाान बांधून जायला निघतात. हा छोटा मुलगा लुकीला पण आपल्या सोबत घेवून जावू पहात असतो. पण त्याचा पायच गावातून निघत नसतो. 

... माझी वाट बघून ट्रकचा रबरी भोंगा ‘पोंऽऽ पों ऽऽ’ वाजायला लागला. निघायलाच हवं होतं. उठून उभा राहत होतो, इतक्यात लुकी घाईनं डाव्या हातावरून खाली उतरली. एकवार माझ्याकडं पाहिलं आणि मंद चालीनं चिंचेच्या झाडाकडे गेली. बुंध्याजवळ थबकली. पुन्हा वळून पाहिलं आणि त्याच गतीनं चिंचेवर चढली. नाराज झाली की तिची चाल मंद व्हायची. तिला गाव सोडायचा नव्हता. ‘सोड’ असं कुणी म्हणूनही शकत नव्हतं. आईची हाक आली. ट्रककडे गेलो. आईच्या हातात कापण्यांची पुरचुंडी होती. दिनूनं दिलेली. ती घेऊन चिंचेकडे धावलो. आडव्या फांदीनं वर चढलो. दोन फांद्यांच्या बेचक्यात पुरचुंडी नीट ठेवली. ‘दिन्यानं तुझ्यासाठी कापण्या दिल्यात. पुरवून पुरवून खा..’ असं काहीतरी सांगावंसं वाटत होतं. ती माझ्याकडं बघत होती. आणि मी तिच्याकडं.....

जागतिक वाङ्मयात शोभून दिसावी अशी कलाकृती एका मराठी लेखकाच्या हातून घडली याचा अभिमान आहे आणि तिचा सन्मान आज मोठ्या महत्वाच्या पुरस्कारानं होतो आहे याचा मनापासून आनंद आहे.    
     
श्रीकांत उमरीकर, 
जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Tuesday, July 4, 2017

साधेपणा हाच वारकरी संप्रदायाचा गाभा


उरूस,  4 जूलै 2017

‘पाऊले चालती पंढरीची वाट’ हे प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील गाणं आषाढाचा पाऊस कोसळायला लागला की मनात कोसळू लागते. गावोगावची माणसं सार्‍या प्रापंचिक अडचणी बोचक्यात बांधून घराच्या आढ्याला टांगून ठेवतात. जवळच्या बोचक्यात अगदीच जरूरीच्या चार दोन वस्तू जास्तीचा कपड्याचा जोड घेवून एका आंतरिक ओढीनं पंढरीकडे चालायला लागतात.

आत्तापर्यंत खूप विद्वानांची अभ्यास केला, खुप अभ्यासकांनी प्रत्यक्ष वारीत जावून अनुभव घेतला, देशीच काय पण परदेशी विचारवंत अभ्यासकही यात सहभागी झाले पण कुणालाच वारीचं कोडं उलगडलं नाही. कुसुमाग्रजांनी लिहीलंय

आभाळाचं मन कळत नाही
वारा होवून मुक्त झाल्याशिवाय
प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही
दिवा होवून भक्त झाल्याशिवाय

तसं आपण भक्ताची भूमिका घेतली तर कदाचित वारीचे कोडे उलगडू शकेल. नसता केवळ कोरड्या तत्त्वज्ञानाचा- विचारांचा-अभ्यासाचा आधार काही कामा येणार नाही.

ग्रामिण भागातले लोक मोठ्यासंख्येने वारीत सहभागी होतात. आपल्या गरजा किमान ठेवायच्या, पायी चालायचे, मिळेल ते साधे अन्न खायचे, समुहात रहायचे, ओठांनी विठ्ठलाचे नाम संकिर्तन करायचे, बाकी सारे विचार सगळ्या चिंता सोडून द्यायच्या.

ज्ञानेश्वरांपासून वारीच्या ठळक नोंदी आहेत. त्याच्या काहीसं आधीपासून मोजलं तर जवळपास हजार वर्षांची ही परंपरा महाराष्ट्रात आहेत. जातीभेद विसरून सर्व लोक अगदी मुसलमानही यात सहभागी होत आलेले आहेत.
वारकरी संप्रदाय इतर संप्रदायांपेक्षा सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरला, सगळ्यात जास्त टिकला याचे कारण काय?

एक एकमेव साधे ठळक कारण म्हणजे या संप्रदायाचा साधेपणा.

‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ हे तीन ग्रंथ या संप्रदायाचे प्रमाण ग्रंथ. यांना ‘प्रस्थान त्रयी’ म्हणतात. या तीन ग्रंथांचे पठण करणे. दर महिन्यात येणार्‍या दोन एकादश्या पाळणे म्हणजेच त्या दिवशी उपवास करणे. गळ्यात तुळशीची माळ परिधान करणे (तुळशीच्या झाडाच्या छोट्याशा खोडापासून मणी तयार करतात. व त्याची माळ करून गळ्यात घालतात). गावातील विठ्ठलाच्या मंदिरात नियमित जाणे. भजन किर्तन करणे. वर्षातून एकदा पंढरीची वारी करणे. ही वारी आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैती अशी चार वेळा एकादशीला केली जाते. त्यातील केवळ आषाढी किंवा त्या खालोखाल कार्तिकी जास्त लोकप्रिय आहे. इतर वेळीही यात्रा भरते पण त्या तुलनेत गर्दी जमा होत नाही. प्रत्येकाच्या ठायी परमेश्वर आहे समजून प्रत्येने प्रत्येकाच्या पाया पडणे.  मांसाहार न करणे. दारू न पिणे. देवाची पूजा म्हणजे धूत वस्त्र परिधान करून (सोवळे नाही) विठ्ठलाच्या प्रतिमेला फुलं वाहणे. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ही आरती तर लोकप्रिय आहेच.

बस्स इतक्या साध्या आचरणांवर हा संप्रदाय उभा आहे.

बाबासाहेबांनी सनातन हिंदू धर्मावर टिका करत नविन धर्मात प्रवेश केला. पण याच बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ ही वृत्तपत्रे सुरू करताना त्यांच्या शिर्षस्थानी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या रचनांना स्थान दिले हे लक्षात घेण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केला तर सगळ्या समुहाचे मन समजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलेले आणि काळावर टिकलेले काय असेल तर तो केवळ वारकरी संप्रदायच. महाराष्ट्रातील ‘लिंगायत’ आणि ‘महानुभाव’ संप्रदायांना मर्यादा पडल्या कारण त्यांचे कट्टर स्वरूप. कठोरपणे झालेली बंड आपला समाज स्विकारत नाही. त्याला मर्यादा पडतात. उलट ही बंडं पचवून परत परंपराच मजबूत झालेली दिसते.

आज संतांच्या अभंगांचे दाखले घेवून हे कसे चातुवर्ण्य मानणारे होते, यांना कसे ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व मान्य आहे, संत कसे टाळकुटे होते, संतांनी महाराष्ट्र घडविला नसून बिघडवला आहे असे काही अभ्यासक उच्च स्वरात सांगत असतात.

वारकरी संप्रदायाचा बारकाईने अभ्यास केला, वारकर्‍यांचे मन समजून घेतले तर लक्षात येते की हे सगळे आक्षेप फारच वरवरचे आहेत. संतांच्या रचनांमधुन विषमतेचे पुरावे मिळतात हे खरे आहे. पण ते फसवे आहेत. त्या काळी चालत असलेल्या रूढी परंपरांना फारसा विरोध न करता, त्यांच्या विरोधात फारसे बंड न करता शांतपणे समतेचा एक प्रवाह वारकरी संप्रदायाने वाहता ठेवला आहे. आणि तिच पद्धत जास्त उपयुक्त ठरली.

जे संत जन्माने ब्राह्मण होते त्यांनाही सनातन ब्राह्मणांनी वाळीतच टाकले. ज्ञानेश्वर आणि त्यांची तिनही भावंडे यांना ब्राह्मण म्हणून मान्यता शेवटपर्यंत मिळालीच नाही. ना त्यांच्या मुंजी झाल्या ना लग्नं झाली. चारही जणांना समाधी घ्यावी लागली. समाधानानं शांतपणे भरपूर आयुष्य जगू दिलं गेलं नाही.  दुसरे संत एकनाथ. एकनाथांनाही सनातनी ब्राह्मणांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. एकनाथांचा शेवट जलसमाधी घेवूनच झाला. शिवाय ते लिहीत असलेले भावार्थ रामायण अर्धवटच राहिले. याचा अर्थच असा होतो की एकनाथांना त्याकाळच्या ब्राह्मणांनी जगणे नकोसे करून सोडले असणार. तुकाराम तर बोलूनचालून कुणबी वाणी. म्हणजे यांच्या लेखी क्ष्ाुद्रच. पण आज याच संतांच्या रचनांना वारकरी संप्रदायाने आपले प्रमाण ग्रंथ म्हणून मान्यता दिली. त्याची पारायणे नियमितपणे केली जातात.

वारकरी संप्रदायाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुठलेही अवडंबर या संप्रदायात नाही. या संप्रदायात गुरू केला जात नाही. देवाला तुळशीची माळ आणि त्याच्या समोर भजन किर्तन केलं की संपलं.

मध्यभारतात तीन लोकदैवतं प्रसिद्ध आहेत. पहिला आहे ओरिसातील पुरीचा जगन्नाथ. याला ‘अन्नब्रह्म’ म्हणतात. म्हणजे अन्नदान केल्याने तेथे पुण्य मिळते. या ठिकाणच्या जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही ज्या मुळच्या भारतीय भाज्या आहेत त्यांचाच वापर केला जातो. दुसरे दैवत म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरूपतीचा बालाजी. याला ‘कांचनब्रह्म’ म्हणतात. याला सोने अर्पण केल्याने पुण्य मिळते. आणि तिसरा आहे पंढरपुरचा आपला विठोबा. याला ‘नादब्रह्म’ म्हणतात. हा केवळ भजन किर्तनानं सुखी होतो. केवळ नामसंकिर्तन केल्याने इथे पुण्य लाभते.

बहिणाबाईने आपल्या कवितेत विठोबाचे वर्णन अतिशय सार्थ असे केले आहे

सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्‍याचा इठोबा
पानाफुलातच राजी

बहिणाबाईच्या या वर्णनातच वारकरी संप्रदायाच्या साधेपणाचा अर्थ प्रकटला आहे. आणि तेच या संप्रदायाचं खरं बलस्थान आहे.        

 
श्रीकांत उमरीकर,
जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

Sunday, July 2, 2017

पुस्तकांनी समृद्ध भिलार ! मग उर्वरीत गावं का भिकार ?



उरूस, सा.विवेक, 2 जुलै  2017

महाबळेश्वर जवळचे भिलार गाव महाराष्ट्र शासनाने पुस्तकांनी समृद्ध केले. एक अतिशय अभिनव कल्पना शासनाने वास्तवात उतरवली. याच गावात वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम करण्याचेही नियोजन आता करण्यात आले आहे. मराठी ललित पुस्तकांवर प्रेम करणार्‍या तमाम रसिकांना या घटनेमुळे मनोमन आनंदच झाला असणार. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला जाणारे लोक आता वाट चुकवून भिलारच्या रस्त्याला लागतील आणि पुस्तकांचा आस्वाद घेत काही काळ तिथे रेंगाळतील अशी अपेक्षा. 

आपण एक गाव पुस्तकांनी समृद्ध केले पण महाराष्ट्रातील इतर हजारो छोट्या गावांचे काय? गाव तेथे ग्रंथालय अशी घोषणा करून 50 वर्षे उलटून गेली. शासनाने यासाठी आर्थिक मदतही घोषित केली. सध्या जी दहा हजार सार्वजनिक ग्रंथालयं कागदोपत्री का असेनाच चालू आहेत त्यांना कमी-जास्त अनुदान मिळतही आहे. पन्नास साठ वर्षांत महाराष्ट्रातील पन्नास हजार गावांपैकी केवळ दहा हजार गावांपर्यंतच आपण पुस्तकं पोचू शकलो असे का? 

प्रत्येक वेळी शासनाने काय करावे हे आपण मोठ्या शहाणपणाने सांगतो. खरं तर रस्ते-वीज-पाणी-रेल्वे-सुरक्षा आदी महत्त्वाचे विषय शासनावर सोडून द्यावेत.  पण इतर विषयांतही शासनाचीच जबाबदारी आहे हे आपण किती दिवस म्हणत बसणार आहोत?

विशेषत: साहित्य संस्कृतिविषयक कितीतरी बाबी शासनाच्या खांद्यावरून काढून लोकांनी आपल्या खांद्यावर घेतल्या पाहिजेत आणि व्यवस्थितपणे निभावल्या पाहिजेत. हे आता ठामपणे सांगायची वेळ आली आहे.
भिलारच्या निमित्ताने आता या पैलू कडे सगळ्या या क्षेत्रातल्या सुजाण लोकांनी लक्ष दिले पाहिजे. 

नुसती टिका न करत बसता नेमकं काय केलं पाहिजे हे सांगणं महत्त्वाचे आहे. टिका करणं सगळ्यात सोपं आहे.

ग्रामपंचायत पातळीवर आपण या विषयाचा विचार करू. महाराष्ट्रातील 50 हजार पैकी दहा हजार गावांमध्ये ग्रंथालयं आहेत. जवळपास गावांमध्ये रोजची वर्तमानपत्रं पोचतात. बहुतेक गावांमध्ये फक्त मराठीच वर्तमानपत्रं पोचतं. इंग्रजी पोचत नाही. एक मराठी आणि एक इंग्रजी वर्तमानपत्रं, तसेच शासन मुलांसाठी प्रसिद्ध करतं ते ‘किशोर’ सारखं केवळ 7 रूपये किंमत असलेलं मासिक, इतर काही साप्ताहिके, पाक्षिके, मासिके अशी जवळपास 800 रूपये किंमतीची वाचन सामग्री दर महिन्यात त्या ग्रामपंचायतीला पोचतील अशी व्यवस्था केली गेली पाहिजे. वर्षभराची ही रक्कम दहा हजाराच्या जवळपास जाते. आज ज्या गावांमध्ये ग्रंथालये आहेत ती आणि अजून चाळीस हजार गावे अशा सर्व 50 हजार गावांसाठी वर्षभरासाठी केवळ 50 कोटी इतक्या रकमेची गरज आहे.

ही जबाबदारी घ्यायची कुणी? पैसा कसा उभा करायचा? विविध कंपन्या आपल्या जाहिराती अभिनव मार्गांनी करतच असतात. त्यासाठी त्यांना प्रचंड खर्च येतो. त्या मानाने ही रक्कम अगदीच किरकोळ आहे. अशा कंपन्यांना हाताशी धरून, वर्तमान पत्रं वाटप करणार्‍या यंत्रणेचा उपयोग करून, या गावांपर्यंत ही सामग्री सध्या आहे त्याच यंत्रणेद्वारे पोचू शकते. पंचायतीच्या पारावर, एखाद्या मंदिराच्या ओट्यावर, ओसरीत असा हा खुल्यातील वाचन कक्ष चालवता येईल. ही सगळी वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिके नंतर जवळच्या शाळेत जमा करण्यात यावीत. किंवा ग्रामपंचायतीनं ती सांभाळावी.

नांदेड जिल्ह्यात कंधार तालूक्यातील काही गावांनी एक अभिनव प्रयोग चालवला आहे. मंदिराच्या माईकवर रोज सकाळी एक जण वृत्तपत्रातील महत्त्वाच्या बातम्या, लेख यांचे वाचन करतो. सगळ्या गावाला ते ऐकू जाते. मी जेंव्हा त्यांना विचारले की भोंग्यावर कश्यामुळे? तर त्यांनी उत्तर सांगितले की सकाळी लोक शेतावर कामाला निघाले असतात. गडबड असते. तेंव्हा त्यांच्या कानावर हे पडलं तर त्यांना ते सोयीचं जातं. 

आता हे जर ग्रामिण भागातील लोकांना सुचलं असेल तर त्याला आपण सगळ्यांनी मिळून थोडासा रेटा दिला तर ही चळवळ महाराष्ट्रात चांगली पसरू शकते. मी आग्रहाने वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके यांचेच नाव सुरवातीला का घेत आहे? तर त्याचे कारण म्हणजे यांची वितरणाची यंत्रणा अस्तित्वात आहे. आणि आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सुदूरपर्यंत लिखित स्वरूपात काय पोचत असेल तर केवळ पेपर पोचतो. (बाकी टिव्ही, रेडिओ हा विषय आपल्या कक्षेत येत नाही.)

तेंव्हा आपण याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा गावांपर्यंत वर्तमानपत्रे (एक मराठी व किमान एक इंग्रजी), मासिके, नियतकालिके, पाक्षिके पोचवणे. तेथे लोकांना वाचणे, त्यावर चर्चा करणे, आपली मते लेखी स्वरूपात या नियतकालिकांना कळविण्याची सवय लावणे, आवडलेल्या लेखकाचा मो. क्र. दिलेला असेल तर त्याला आवर्जून कळवणे, शक्य असेल त्या लेखकाला गावात आमंत्रित करणे.  हे सगळं करावं अग्रक्रमाने करावे लागेल. 

या पुढची पायरी म्हणजे मग यातील ज्या गावांचा प्रतिसाद योग्य असेल, सकारात्मक असेल, जी गावं आपणहून यात काही गुणात्मक वाढ करून दाखवतील त्या गावांकडे विशेष लक्ष पुरवून त्या ठिकाणी ग्रंथालय उभारणे, असलेलं ग्रंथालय समृद्ध करणे, त्याच्या वतीने विविध उपक्रम कसे साजरे होतील याकडे लक्ष पुरवणे हे सगळं करावं लागेल. 

यातील काहीही करण्यासाठी शासनाची काहीही मदत घेण्याची गरज नाही. शासन त्याच्या त्याच्या परीने जे काही करत आहे त्याची समिक्षा आपण स्वतंत्रपणे करू. त्यावर टिका किंवा त्याची भलामण स्वतंत्रपणे करू. पण शासनावर आपली जबाबदारी ढकलून आपण काहीही न करता मख्ख सारखं बसून राहणं हे सगळ्यात घातक आहे. 

जवळपास सर्वच गावात बर्‍यापैकी मंदिर असते. त्या मंदिराचे बांधकाम आजकाल नव्याने केलेले आढळते. त्या ठिकाणी एखादे कपाट या सगळ्यासाठी ठेवता येईल. शिवाय या मंदिराच्यावतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यात भंडारा किमान एकदा दोनदा होतोच. यावर प्रचंड मोठा खर्च होतो. तेंव्हा यातून वाचनासाठी वर्षभराचे दहा हजार बाजूला काढणे मूळीच कठिण नाही. जर एखादे वाचनालय गावात असेल तर त्यांचीही मदत या कामासाठी घेता येईल. त्यांच्याकडे काही वर्तमानपत्रे येतच असतात. 

तेंव्हा आहे त्या स्थितीत एक रूपयाही शासनाकडे भीक न मागता आपली गावं आपण वाचनाच्या प्राथमिक पातळीपर्यंत सहज नेवू शकतो.

Monday, June 5, 2017

जयदेव डोळे यांचा ‘मोदीबिंदू’


समाजवादी विचारवंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांचा ‘उजवी उड्डाणे’ हा लेख लोकरंग पुरवणीत (21 मे 2017) प्रसिद्ध झाला. लेखातून सगळ्यात स्पष्टपणे काय जाणवते तर मोदींसह तमाम उजव्यांच्या बाबतीतली त्यांची पूर्वग्रहदुषित दृष्टी. डोळ्यांच्या डोळ्यात ‘मोदीबिंदू’ झाल्यानं त्यांना जगात सध्या काय चालले आहे ते स्पष्टपणे दिसत नाही. किंवा त्यांना ते समजून घ्यायचे नाहीये. 

1991 मध्ये जागतिकीकरण (डाव्यांच्या भाषेत खासगीकरण उदारीकरण जागतिकीकरण खाउजा) पर्व सुरू झाले तेंव्हा जगाची दारे उघडत चालली आहेत म्हणून यांनीच आक्रस्ताळी टिका केली होती. आता मोदी, ट्रंम्प, ब्रेक्झिट, फ्रान्समध्ये मारी ल पेन यांना मिळालेली 25 टक्के मते यांमुळे जगाची दारे बंद होत चालली आहेत म्हणून हे परत टिका करत आहेत. यांचा नेमका काय आक्षेप आहे? 

‘जगातिल कामगारांनो एक व्हा’ ही डाव्यांची मोठी लाडकी घोषणा. तिच्या सुरात सूर मिसळून डोळ्यांसारखे समाजवादीही कालपरवा पर्यंत हेच लिहीत बोलत होते. मग ‘जगातील ग्राहकांनो एक व्हा’, ‘जगातिल व्यापार्‍यांनो एक व्हा’, ‘जगातिल उद्योगांनो एक व्हा’, ‘जगातिल बाजारपेठ एक होवो’ असे काही होत असेल तर यांच्या पोटात नेमकं काय दुखत आहे? 

कालपरवा पर्यंत परदेशी कंपन्या येवून तूमच्या गायीची कालवडही ओढून नेतील ही भाषा हे करत होते. प्रत्यक्षात झाले उलटे. अमेरिका असो, युरोप असो, इंग्लंड असो मोठ्या देशाने दारे उघडल्यावर मोठ्या प्रमाणावर तिसर्‍या देशांमधून कामगार तिकडे जायला लागले. खिडकी कधी एकाच बाजूच्या वार्‍यासाठी उघडता येत नाही. त्यातून वारे बाहेर जावू शकते तसे आतही येवू शकते. आज अमेरिका, इंग्लंड किंवा फ्रान्समध्ये जे काही घडत आहे ते यांच्या मताच्या अगदी उलटे घडत आहे हे तरी हे मान्य करणार की नाही? 

‘जगाचा ताबा विशेषज्ञ, सल्लागार, तंज्ञज्ञ यांनी घेऊन नैसर्गिक नेतृत्वाचा अंत केला’ असे वाक्य डोळे आपल्या लेखात वापरतात. मग यात त्यांचा आक्षेप नेमका काय आहे? विशेषज्ञ, सल्लागार, तंत्रज्ञ यांने नेतृत्व नैसर्गिक नसते काय? नैसर्गिक नेतृत्व म्हणजे समाजवादी नेतृत्व काय? 

भारतातील तरूण परत एकदा मोठ्या प्रमाणावर एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी.च्या मागे लागला आहे याचे कारण डोळे यांना काय वाटते? सरकारी नौकरांचे होत असलेले भलते लाड जागतिकीकरणाचे फळ नसून त्यांच्याच समाजवादी धोरणाची ही विषारी फळं आहेत. ती जागतिकीकरणातही भारत सरकारने कायम ठेवली म्हणून तरूणांचा ओढा अजूनही तिकडे राहिला आहे. 

भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्येला समावून घेणारा व्यवसाय म्हणजे शेती. या शेतीची उपेक्षा केल्यावर त्यातील तरूणांची लोकसंख्या दुसरीकडे जाण्यासाठी धडपड करणारच. हीच लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परिक्षांच्या मार्गाने सरकारी नौकरीत जावू पहाते आहे हे वास्तव डोळे का दुर्लक्षित करतात?  

वास्तव असे आहे की जागतिकीकरण ही प्रक्रिया 1991 पासून नाही तर दुसर्‍या महायुद्धानंतर म्हणजे 1945 ला सुरू झाली. जपानवरच्या अणूहल्ल्यानंतर सगळे जग हादरले. सगळ्यांच्याच लक्षात आले की परत हे असले संहारक युद्ध होणे नाही. हे कोणाच्याच हिताचे नाही. म्हणून जागतिक व्यापार परिषदेची स्थापना झाली. (डब्लू.टि.ओ.) पण हा विचार खुमखूमी असलेल्यांच्या पचनी पडणे शक्य नव्हते म्हणून 1945 ते 1990 असा तब्बल 45 वर्षे शीतयुद्धाचा खेळ चालला. याच काळात जागतिक व्यापारासाठी फेर्‍यांवर फेर्‍या होत गेल्या. शेवटी अंतिम तारीख ठरवून 1991 ला जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी जागतिक पातळीवर व्यापार सुरळीत करण्याच्या कराराव सह्या केल्या. त्यात भारतही होता. 1991 ते आत्तापर्यंत अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यानंतरही जागतिक व्यापारात जग पुढे पुढेच जात राहिलेले आहे. आता ही वाट परत फिरणे नाही. 

रशिया नंतर आता बंदिस्त चीनही मोकळा होवू लागला आहे. नुकतीच चीनने जागतिक व्यापार सुरळीत होण्यासाठी रस्ते रेल्वे बंदरे यांच्या बांधणीचा मोठा आराखडा जगासमोर ठेवण्यासाठी जागतिक परिषद घेतली आहे. याचा उल्लेखही डोळे यांनी टाळला आहे. कदाचित त्यांच्या तो सोयीचा नसावा. इंग्लंडपर्यंत रेल्वे नेण्याची चीनची योजना आहे. मग या मार्गातील इतर राष्ट्रं काय हातावर हात देवून बसणार आहेत? 

जगातिल व्यापाराचा प्रवाह आता कुणाची इच्छा असो नसो, कितीही ट्रंप येवो, कितीही मोदी राष्ट्रवादाचा जप करो थांबू शकत नाहीत. पाणी उतराचा वेध घेत धावत जातं तद्वतच भांडवल अनुकूल बाजार उत्पादन शोधत धावत जातं. आणि त्याला रोकता येणे अशक्य आहे. 

आणि काय म्हणून डोळे कायमस्वरूपी नौकर्‍यांच्या भाकड गोष्टींची भलावण करत आहेत? या कायमस्वरूपी नौकर्‍या जेमतेम गेल्या 50 वर्षांतीलच देण आहेत ना? ही व्यवस्था कोसळून पडली तर असे काय आभाळ पडणार आहे? 

काटकसर आणि कंजुषी यातील फरक बहुराष्ट्रीय कंपन्यांना कळत नाही हे डोळे कुठल्या आधारावर लिहितात? ‘मेरे पास बाजरपेठ है’ हा तद्दन फिल्मी संवाद यासाठी आहे की आजही भारत हा जगाच्या व्यापारपेठेच्या 1 टक्के इतक्याही हिश्याइतका नाही. मग डोळ्यांचा सलिम जावेद असले संवाद कोणत्या आकडेवारीच्या आधारावर लिहितो? आज बाजारपेठ म्हणून जगाला भारताची जेवढी गरज आहे त्याच्या 100 पट भारताला जगाची गरज आहे हे डोळ्यांनी डोळे उघडे ठेवून आणि उजव्या डोळ्यांतील ‘मोदीबिंदूची’ शस्त्रक्रिया करून पहावे. 

कायमस्वरूपी नौकर्‍या, पेन्शन व्यवस्था, मुजोर कामगारशाही, उत्तरदायीत्व नसलेली नौकरशाही ही सगळी समाजवादी विचारसरणीची देण आहे. हे सगळे कोसळून पडत आहे हे डोळे यांचे खरे दु:ख आहे. गंमत म्हणजे ज्या उजव्यांवर टिका डोळ्यांसारखे डावे विचारवंत करत आले आज त्यांच्याच राष्ट्रवादाच्या मांडीला मांडी लावून यांनी आपली पत्रावळ मांडली आहे. काळ सुड उगवतो तो असा. 

1991 मध्ये जगाची दारं उघडी होत असताना विरोध करत यांची बस हुकली होती. आता परत बंद होत जाणारी दारे ही तात्कालीक प्रतिक्रिया खरी आहे असं समजून टिका करत असताना यांची बस परत हुकत चालली आहे. व्यंकटेश माडगुळकर यांच्या सत्तांतर कादंबरीत मेलेले मुल थानाला लावून फिरणार्‍या माकडीणीची एक हृदयस्पर्शी गोष्ट आली आहे. त्यात माडगुळकर लिहितात मुल मेलं तरी हीचं आईपण मरत नव्हतं.  तसं डोळे यांचे झाले आहे. समाजवादाचे मेलेले मुल हे थानाला लावून फिरत बसले आहेत.    

श्रीकांत उमरीकर,जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.


जयदेव डोळे यांच्या लेखाची link
http://epaper.loksatta.com/1215264/loksatta-pune/21-05-2017#page/17/2

Tuesday, May 9, 2017

आसमानी सुलतानीचा दुपेडी फास.... शेतकर्‍याचा घेतो घास... !!


सा.विवेक, 9 मे 2017

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तूरीमुळे शेतकर्‍यांची जी अवस्था झाली आहे ती पाहता जुनीच म्हण परत खरी असल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकर्‍याचे दोन दुष्मन आसमानी आणि सुलतानी.  एक म्हणजे आसमानी. निसर्गाच्या लहरीवर शेती अवलंबून आहे. परिणामी निसर्गातील बदलाला त्याला तोंड द्यावे लागते. पाऊस कमी पडला, जास्त पडला, पडलाच नाही, गारपीट झाली, पुर आला, दुष्काळ पडला, टोळधाड आली एक ना दोन. कितीतरी गोष्टींमुळे शेतीतील उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आसमानी संकटाला शेतकर्‍यांना आदीम काळापासून तोंड द्यावे लागत आलेले आहे.

दुसरे संकट आहे सुलतानी. पुर्वीच्याकाळी राज्य करणारे शेतीतील उत्पादनाचा काही वाटा लुटून न्यायचे आणि शेतकरी हतबल होवून पहात रहायचा. आताचे राज्यकर्ते शहाणे आहेत. ते सरळ पीक लुटून नेत नाहीत. पण शेतमालाचे भाव कसे पडतील अशी धोरणं काटेकोर पद्धतीनंआखतात. परिणामी शेतकर्‍याला आपला माल बाजारात नेऊन मातीमोल भावाने विकून टाकावा लागतो. प्रसंगी तसाच फेकुन द्यावा लागतो. कारण वापस न्यायचा खर्चही परवडत नाही. हे झालं सुलतानी संकट.

गेली तीन वर्षे दुष्काळ होता. पाऊस कमी पडला. पण मागच्या वर्षी मात्र चांगला पाऊस झाला. शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहाने खरीपाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली. वर्षभर पावसाने साथ दिली. यावेळी खरीपात तूरीचे बंपर पीक आले. आता सगळ्यांना असे वाटले की शेतकरी खुष असायला पाहिजे. त्याची समस्या संपली. पण प्रत्यक्षात जेंव्हा हा शेतकरी आपली तूर घेवून बाजारात गेला तेंव्हा मिळणारा भाव पाहून त्याचे डोळेच पांढरे झाले. 250 रूपयांपर्यंत गेलेले तूरीचे भाव यावर्षी शेतकर्‍यांची तूर बाजारात आली की धाडकन 40 रूपयांपर्यंत पडले. शासनाने हमी भाव जाहिर केला 50 रूपये. पण तेवढ्या भावानेही कुठे खरेदी झाली नाही. 

हे केवळ एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. वर्षानुवर्षे हेच चालत आलेले आहे. यामुळे शेती तोट्यात राहिली. किंबहुना शेती तोट्यात रहावी म्हणूनच धोरणं आखली गेली. याचा परिणाम म्हणजे हळू हळू आपल्या जवळ असलेले बीज भांडवल विकून शेतकरी जगू लागला. म्हणजे जमिनीच विकू लागला. जवळची सगळी बचत संपवू लागला. हळू हळू ही पण अवस्था संपून गेली. आणि शेवटची भयाण अवस्था आली. ज्यात शेतकरी आत्महत्या करायला लागला. 19 मार्च 1986 ला साहेबराव करपे या विदर्भातील शेतकर्‍याने आत्महत्या केली. नोंद झालेली ही पहिली शेतकरी आत्महत्या. तेंव्हापासून आत्महत्येचा ‘सिलसिला’च सुरू झाला. आजतागायत साडे तीन लाख शेतकर्‍यांनी या भारतात आत्महत्या केल्या. 30 वर्षांत साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करतात. म्हणजे रोज किमान 35 शेतकर्‍यांनी आपल्या आहुती दिल्या. पण अजूनही शासनाचे डोळे उघडायला तयार नाहीत. 

डो़क्यावरून पाणी गेल्यावर आता सगळेच विचारायला लागले आहेत की काय केलं म्हणजे शेतकर्‍यांच्या आत्महत्या  थांबतील? कारण जे काही उपाय योजले त्यानं आत्महत्या थांबत नाहीत हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे. 

जे करायचं नाही ते साडून दुसरंच करत बसण्यात काय अर्थ आहे? मुल्ला नसिरूद्दीनची एक गोष्ट आहे. आपल्या घराच्या अंगणात तो अंगठी शोधत असतो. त्याला पाहून दुसरा एक त्याला शोधायला मदत करतो. मग तिसरा करतो. पण एकाला मात्र सुबुद्धी सुचते आणि तो विचारतो, 

‘तू अंगठी शोधतोस हे कळलं पण ती नेमकी हरवली कुठे.‘ 
तेंव्हा मुल्ला उत्तर देतो की, 
‘अंगठी दूर तिकडे जंगलात हरवली आहे.’ 
‘मग तू इकडे का शोधत आहेस? जंगलात का शोधत नाहीस?’
‘इथे सपाट जमीन आहे. माझ्या घराजवळचेच हे आंगण आहे. इथे चांगला उजेड आहे. तिकडे जंगलात किती त्रास अंगठी शोधायचा. जागा चांगली नाही. श्‍वापदांचे भय. शिवाय अंधार पडला असल्यामुळे शोधणे शक्य नाही.’
जंगलात हरवलेली अंगठी अंगणात शोधून कसं जमणार? तसंच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचे होवून बसले आहे. 

शेतकर्‍यांच्या समस्येचे मुळ शेती तोट्यात असणे हे आहे. ही शेती तोट्यातच रहावी असे प्रयत्न वारंवार केले गेले हे आता उघड झाले आहे. फार दुरचे कशाला अगदी आत्ताचे ताजे तूरीचे उदाहरण आहे. तुरीचे भाव 250 रूपयांपर्यंत गेले तेंव्हा शासनाने तातडीने हस्तक्षेप करून डाळ आयात करण्याची घोषणा केली. डाळ व्यापार्‍यांवर छापे घातले. मुठभर शहरी मध्यमवर्गीयांना बरं वाटावं म्हणून डाळीचे भाव पाडले. खरं तर बाजाराच्या नियमाप्रमाणे नवी तूर बाजारात आली असती तर आपोआपच भाव उतरले असते. शिवाय गेली कित्येक वर्षे आपण डाळ आयातच करतो आहोत. मग अशा स्थितीत शेतकर्‍यांनी जास्त तूर पिकवली तर ती सगळी तातडीने खरेदी करून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम शासनाने का नाही केले? एरव्ही परदेशातून डाळ आयात करणारे सरकार आपल्याच देशातील शेतकर्‍यांची तूर खरेदी करायला खळखळ का करते? 
काही शहरी ग्राहकांना एक बाळबोध प्रश्‍न पडतो. शेतकरी उगी कितीही जास्तीचं पिकवेन. शासनाने ते काय म्हणून खरेदी करावे? शासनाची हीच जबाबदारी आहे का? शासनाने काय काय म्हणून करावे? 

सवाल एकदम बीनतोड आहे. फक्त तो विचारायची जागा चुकली आहे. हाच प्रश्‍न तूरीचे भाव 250 रूपयांपर्यंत गेले की हे लोक विचारतात का? तेंव्हा शासनाने मध्ये पडून आम्हाला 100 रूपये भावाने तूर द्यावी म्हणून गळा काढणारे हेच लोक आहेत. तेंव्हा असा दुतोंडीपणा चालणार नाही. जर शासनाला भाव चढले तेंव्हा हस्तक्षेप करायचा असेल तर भाव कोसळतील तेंव्हाही हस्तक्षेप करून किमान भावाने खरेदी करावीच लागेल. 

तूर, कापूस, ऊस, सोयाबीन असे एक एक पीक घेवून त्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा आणि धोरण ठरविण्यापेक्षा एकूणच शेतमालासंबंधी समग्र असा विचार करून धोरण ठरविले पाहिजे. आणि तसे केले तर आणि तरच शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल आणि शेतकर्‍यांची आत्महत्या थांबतील. 
यासाठी काय केले पाहिजे?

1. जीवनावश्यक वस्तू कायदा तातडीने बरखास्त केला पाहिजे. 1964 च्या हरितक्रांती नंतर जगभरात अन्नधान्याची विपूलता आलेली आहे. एका ठिकाणी असलेलं धान्य दुसरीकडे पोंचवता आले नाही म्हणून कुपोषणाने लोक मृत्यूमुखी पडले असतील पण अन्नधान्य नाही म्हणून लोक मुत्यूमुखी पडले असं एकही उदाहरण गेल्या 50 वर्षांतले जगभरातले नाही. तेंव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणून अतिशय जूनाट असा जीवनावश्यक वस्तू कायदा बरखास्त केला पाहिजे. वादासाठी डाळी आणि अन्नधान्य यांना जीवनावश्यक वस्तू कायदा लावणं आपण समजू शकतो. पण साखर आणि कांदा हे कसे काय जीवनावश्यक? कुणी तरी वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ असं सांगतो का की हे पदार्थ न मिळाल्यामुळे माणसाचे जीवन धोक्यात आले आहे? पण केंव्हातरी मोहम्मद गझनीच्य डोक्याने चालणार्‍या अचाट डोक्याच्या राज्यकर्त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी या वस्तूही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकल्या. 

2. शेतकर्‍याची जमीन आणि त्यासंबंधी सर्व बाबी घटनेच्या 9 (ए)व्या परिशिष्टात टाकल्या आहेत. सिलिंग कायदा लवताना कमाल 54 एकर जमिनीची मर्यादा घालून ठेवली आहे. ही बंधनं कशासाठी? 54 एकर जमिनीचा मालक म्हणजे किती संपत्तीचा मालक? शहरातील आणि रस्त्या लगतची जमिन सोडली तर कुठल्याही शेतजमीनीला फारशी किंमत नाही. मग ही अट काय म्हणून? एखादा उद्योग उभा करताना तूम्ही इतकाच धंदा केला पाहिजे किंवा इतकीच संपत्ती बाळगली पाहिजे अशा अटी शासन घालतं का? मग शेतकर्‍यांसाठीच ही अट का? जर प्रत्येक उत्पादनामागे तोटाच होतो तर जास्तीची जमीन म्हणजे जास्तीचे उत्पादन म्हणजे जास्तीचा तोटा. मग जास्त जमीन असलेला जमीनदार म्हणून खलनायक असा का रंगवला जातो? डाव्यांच्या बागायतदार शेतकरी म्हणजे प्रचंड कमावणारा शेतकरी या मांडणीला सणसणीतपणे उत्तर गेल्या 35 वर्षांत शेतकरी चळवळीने दिले आहे. अगदी  उसासारख्या पीकाचाही उत्पादन खर्च भरून निघत नाही. तेंव्हा अर्थशास्त्रदृष्ट्या असली वाह्यात मांडणी करू नये.  

तेंव्हा तातडीने घटनेचे 9 ए हे परिशिष्ट रद्द करून शेतजमीनींची बाजारपेठ मोकळी केली पाहिजे. कुणालाही हवी तेवढी जमिन खरेदी करता आली पाहिजे किंवा विकता आली पाहिजे. शेतकरी असलेल्यालाच शेती करता येते असल्या बाष्कळ अटी काढून टाकल्या पाहिजेत. शेतजमीनींचा काळाबाजार चालतो म्हणून राजकारणी, डॉक्टर, नट, वकिल, सी.ए. सगळ्यांना जमिनी खरेदी करायच्या असतात. शेती तोट्यात आहे तर मग इतका सगळ्यांना शेतीचा का पुळका? कारण यांना आपले दोन नंबरचे उत्पन्न लपवायचे असते. एखादी जमीन एखादा राजकारणी खरेदी करतो. लगेच त्या जमीनीवरचे आरक्षण उठते. ती जमीन इतर वापरांसाठी खुली केली जाते. आणि तिचे भाव आकाशाला भिडतात. 

तेंव्हा दुसरी जी मागणी आहे ती म्हणजे शेत जमिनींचा बाजार मोकळा केला पाहिजे. खुल्या बाजारातून जमिनी घेता आल्या पाहिजेत. त्यात शासनाचा हस्तक्षेप नको. 

उद्योजकांसाठी शासन काय म्हणून जमीन खरेदी करते? ते इतर यंत्रयामग्री, इमारत, मनुष्यबळ यासाठी खुल्या बाजारात जातात आणि किंमत मोजतात पण जागेसाठी त्यांना शासनाचा हस्तक्षेप का लागतो? कारण यात सगळ्यांचेच हितसंबंध गुंतलेले आहेत. 

3. शेतकर्‍याचा माल तयार झाल्यावर त्याला तो विकण्यासाठी बाजारात यावे लागते. तेंव्हा त्याच्यावर प्रचंड बंधनं घातली जातात. कृषी उत्पन्न बाजार समितीतच माल विकण्याची बंदी आत्ता आत्तापर्यंत होती. तसेच एका प्रदेशातून दुसर्‍या प्रदेशात शेतमाल नेण्यास बंदी होती. आयात निर्यात बंदी तर कधीही लावली जाते. या सगळ्यामुळे शेतमालाचा बाजार नासून जातो. परिणामी शेतकर्‍याच्या मालावर प्रक्रिया करणे, त्यांची साठवणूक करणे, त्याची वर्गवारी करणे यासाठी कुणीही व्यवसायीक पद्धतीनं पैसे गुंतवायला तयार होत नाही. तेंव्हा तिसरी जी मागणी आहे ती म्हणजे शेतमालाची बाजारपेठ खुली असली पाहिजे. शासनाने त्यावर लक्ष ठेवावे. प्रसंगी नियम तयार करावेत. शासनाचा जो काही कर असेल तर तो जमा होतो की नाही हे कसोशीने पहावे. पण कुठल्याही स्थितीत शेतमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करू नये. कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्याकडे झालेल 60 टक्के व्यवहार नोंदवलेच नाहीत असे कॅगच्या अहवालात स्पष्ट झाले आहेत. म्हणजे शासनाचा तेवढा अधिकृत महसूल बुडाला. पण इकडे तर शेतकर्‍यांकडून तो वसुल झाला होता ना. तेंव्हा ही असली अजागळ व्यवस्था संपवली पाहिजे. शेतमालाच्या विक्रीसाठी आधुनिक सुसज्ज बाजारपेठा तयार झाल्या पाहिजेत.  

4. शेतीच्या मुळावर उठणार्‍या योजना तातडीने बंद झाल्या पाहिजेत. उदा. दोन रूपयांत गहू, तांदूळ, एक रूपयांत झुणका भाकर असल्या बाष्कळ योजनांची जेंव्हा घोषणा होते तेंव्हा तातडीने त्याला विरोध झाला पाहिजे. मुळात शासन या मुळे शेतीमालाची बाजारपेठ नासवून टाकते हे ध्यानात घेतले पाहिजे. ज्या गव्हाची किंमत 1 किंवा 2 रूपये किलो आहे तो गहू दळायला 4 रूपये लागतात हे लक्षात का घेतले जात नाही? 
लोकांना अशा फुकटच्या धान्याची गरज तरी आहे का? खरं तर अशा पद्धतीनं शेतमालाची बाजारपेठ नासवून टाकण्यापेक्षा दारिद्य्र रेषेखालील व्यक्तिचे बँकेत खाते उघडून ठराविक रक्कम जमा केली जावी. 

5. शेतीमालाची बाजारपेठ खुली झाली म्हणजे नफा मिळण्याची संधी तयार होईल. परिणामी या व्यवसायात भांडवल गुंतवण्यास लोक तयार होतील. आज कुठलाही मोठा उद्योग शेतीत भांडवल का ओतत नाही? कारण शासनाची धरसोडीची धोरणे. आज कमी भाव आहे म्हणून व्यापार्‍यांनी तूर खरेदी केली आणि त्याचा साठा केला. पण शासनाने या साठ्यावर छापे घातले तर त्याने व्यवसाय करायचा कसा? आज शेतकर्‍यांची आपल्याकडचा कापुस बाजारात आणला आणि शासनाने निर्यात बंदी लादली. परिणामी भाव कोसळले. मग अशा स्थितीत व्यवसाय करणार कसा? 

6. शेतकर्‍याला शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान हवे आहे. काहीच कारण नसताना आधुनिक तंत्रज्ञान युक्त बियाणे शेतकर्‍यांना पेरण्यासाठी का दिले जात नाहीत? शास्त्रज्ञांनी जर त्याविरूद्ध अहवाल दिला तर समजू शकतो. पण जगभरात बी.टी. बियाणे वापरले जातात पण आपण मात्र ते वापरायचे नाहीत. अशानं आपला शेतकरी जगाच्या बाजारात टिकणार कसा? नविन बियाणे, नविन तंत्रज्ञान यांचे गुणदोष शास्त्रज्ञांनी प्रयोग करून लोकांसमोर मांडावेत. त्यांनी जो अहवाल दिला असेल त्यानुसार शासनाने धोरण ठरवावे. ते शेतकरी मान्य करतील. पण शेजारच्या बांग्लादेशात बी.टी. वांगे पीकणार आणि आमच्या भारतात मात्र त्यावर बंदी असे कसे जमणार? बाहेरून बी.टी. मका आमच्याकडे प्रक्रिया होवून येणार. त्या मक्याचे पदार्थ मिळणार. पण आम्हाला मात्र हे बियाणे घेण्यास बंदी. हा काय अन्याय आहे?  आणि ही धोरणं का? तेंव्हा शेतकर्‍याची मुळ मागणी तंत्रज्ञान स्वातंत्र्याची आहे. 

आज तातडीने काय करता येईल? 

आता खरीपाची पेरणी तोंडावर आहे. तातडीने शेतकर्‍याला पेरणीसाठी कर्ज दिले जावे. सगळ्या सहकारी बँका जवळपास बंदच पडल्या आहेत. ती सगळी अजागळ व्यवस्था पूर्णपणे संपवून सध्या जी महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे तीला सक्षम केले पाहिजे. तिला जास्तीचा निधी देवून शेतकर्‍यांचे पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट वाढवले पाहिजे. यावर्षीही पावसाळा चांगला असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तेंव्हा आजच तातडीने जास्तीचा कर्जपुरवठा करण्यात यावा. शेतकर्‍यांचा कर्जमाफीच्या नावाने बोटं मोडणार्‍या विद्वानांनी याचे उत्तर द्यावे की आजही थकित कर्जाच्या आकडच्यात सर्वात वरचा क्रमांक औद्योगिक कर्जाचा आहे. नंतर व्यवसायिक कर्जं आहेत. नंतर खासगी कर्जं आहेत. आणि सगळ्यात शेवटचा क्रमांक कृषी कर्जाचा आहे. म्हणजे इतकं करूनही शेतकरी बुडवा नाही हेच आकडेवारीनं सिद्ध होतं आहे. 

सध्याचे जे कर्ज आहे ते सर्व कर्ज खारीज करून शेतकर्‍याला कर्जमुक्त घोषित केले पाहिजे. कारण शेतकर्‍याचे कर्ज हे त्याचे नसून यंत्रणेचे/ धोरणांचे पाप आहे. तेंव्हा त्याला त्याला कर्जातून मुक्ती देवून तूम्हीच तूमचे पाप धूवून टाकणार आहात. आज महाराष्ट्रात एका तूरीचा हिशोब केला तर 20 लाख क्विंटल तूरीच्या खरेदीत किमान हजार रूपये एका क्विेंटल मागे म्हणजे 200 कोटी रूपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. तेंव्हा असा हिशोब केला तर शेतकर्‍याला देय असणारी रक्कम कित्येक कोटींची आहे. 

एकट्या उत्तर प्रदेशात गेल्या चार वर्षांत शेतकर्‍यांला जी कमी किंमत मिळाली किंवा पुरामुळे नुकसान झाले, शासनाने पीकविम्याचे पैसे भरले नाहीत म्हणून भरपाईची बुडालेली रक्कम यांचा हिशोब केला तर तो 41 हजार कोटी रूपयांचा निघतो. त्यामुळे तेथील भाजपा सरकारने 36 हजार कोटींची कर्जमाफी शेतकर्‍यांना दिली ते योग्यच केले. अजून पाच हजार कोटी शेतकर्‍यालाच देणे शिल्लक आहे. 

शेतकरी संघटना कधीच कर्जमाफी हा शब्द वापरत नाही. कारण माफी म्हटलं की काहीतरी गुन्हा केला असं वाटतं. शेतकरी संघटनेने कर्जमुक्ती असा शब्द वापरला आहे.

केवळ आपल्या मालाला चांगला भाव मिळतो ही प्रेरणा शेतकर्‍याला पुरेशी आहे हे तूरीच्या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे. 250 रूपयांपर्यंत भाव गेले की शेतकर्‍यांनी प्रचंड उत्पादन घेऊन  दाखवले. तेंव्हा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शेतकर्‍याची नफा मिळवण्याची जी प्रेरणा आहे ती मारली न गेली पाहिजे. इतर सगळे उपाय निरूपयोगी ठरलेले दिसतात. 

शेतीमालाचा बाजार मुक्त करणे, शेतमालावर प्रक्रिया करण्यावर बंधने नसणे, शेतमाल साठवणुकीला प्रोत्साहन देणे, आठवडी बाजार व्यवस्था बळकट करणे, शेतीविरोधी कायदे रद्द करणे, शेतकर्‍याला तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य बहाल करणे ही दूरगामी धोरणं आखावी लागतील. असे केले तरच शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील. शेती एक उद्योग म्हणून बहरेल. अन्यथा रोग म्हशीला आणि मलम पखालीला असे करण्याने काहीच हाती लागणार नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत.  

-श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 431 001. 9422878575