Tuesday, March 23, 2021

दिलखुलास व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड



उरूस, 23 जानेवारी 2021 

हसतमुख दिलखुलास अनोळखी माणसालाही जराशा परिचयांत मोकळं बोलायला लावणारा माझा मोठा मामा वसंत बीडकर 18 मार्चला काळाच्या पडद्याआड गेला. मामाचे 78 वर्षाचे वय, त्याने गेली 20 वर्षे कॅन्सरशी दिलेली कडवी झुंज पाहता हा दिवस कधीतरी येणार हे समजत होतेच. विविध प्रकारच्या लोकांत वावरणार्‍या, माणसांशी बोलण्याचा भेटण्याचा लोभी असलेल्या, अशा या माणसाचा अंत्यविधी कोरोना आपत्तीत पाच सात जवळच्या नातेवाईकांत व्हावा याचा चटका बसला. 

मामाचा मोठा मुलगा कैलास माझ्या अगदी बरोबरचा. माझा मोठा भाऊ श्रीकृष्ण, कैलास आणि मी अगदी 14 महिन्यांच्या अंतरांतील आम्ही तिघे. त्यामुळे भाऊ असण्यापेक्षा आम्ही मित्र जास्त. 

माझे दोन मामा परभणीलाच अगदी आमच्या नानलपेठला लागून वडगल्लीतच होते. तिसरा मामा असम, ओरिसा, कर्नाटक असा दूर दूर राज्यांत नौकरी निमित्ताने असायचा. परिणामी मामाच्या गावाला जाणे म्हणजे या मोठ्या मामाच्या गावाला जाणे. तीर्थपुरी, सेलू ही दोन गावं जास्त आठवतात. नंतर तो औरंगाबादला गेला आणि तोपर्यंत आम्ही मोठे झाल्याने ‘मामाच्या गावाला जावूया’ ही वृत्ती हरवून गेली. 

मामाची पहिली आठवण त्याच्या तीर्थपूरी गावची आहे. तिथे पाटबंधारे खात्यात तो अभियंता म्हणून नौकरीला होता. तिथल्या कॅनॉलचे काम चालू होते. त्या कॅनॉलच्या फरश्यांच्या उतरत्या भिंतीवर आम्ही घसरगुंडी घसरगुंडी म्हणून खेळायचो. आमच्या मनसोक्त खेळण्याचा परिणाम एकच झाला की आमच्या सगळ्या चड्डया पार्श्वभागावर फाटून गेल्या. मामाने न रागवता उत्साहात आम्हाला नविन चड्डया आणून दिल्या. पण खेळण्यापासून रोकले नाही.

पुढे सेलूला बदली झाल्यावर सहकारवाडीत तो राहायला आला. हे घर स्टेशनच्या इतके जवळ होते की पूर्वेकडे प्लॅटफॉर्म संपला की लगेच घरांची रांग सुरू व्हायची. परभणी कडून येणारी गाडी स्टेशनात थांबली की उलट्या दिशेने हातातली छोटी बॅग सांभाळत आम्ही तर्राट धावत सुटायचो. एव्हाना गाडी माहित असल्याने कैलास स्टेशनवर आलेला असायचाच. मोठी माणसं मोठ्या बॅगा घेवून येईपर्यंत आम्ही घराच्या अंगणात पोचलेलो असायचो. रेल्वेस्टेशनच्या अगदी जवळचं घर हे एक फारच मोठं आकर्षण होतं. तेंव्हाच्या कोळश्याची ती इंजिनं त्यांचा गोड वाटणारा आवाज, गाडी येताना धावत रूळांजवळ येवून उभं राहणं, गाडी नजरेआड होईपर्यंत पहात राहणे हा आमचा एक खेळच होता. प्रकाश नारायण संत यांनी आपल्या पुस्तकांत रेल्वेा स्टेशनच्या रेल्वे रूळांच्या रेल्वे गेटच्या  ज्या आठवणी रंगवल्या आहेत त्या मला नितांत आवडतात. त्याचे कारण माझ्या लहानपणी वसंत मामाच्या सेलूच्या घराशी निगडीत आठवणींशी गुंतलेले आहे.

पुढे सेलूलाच जायकवाडी कॉलनी म्हणून पाटबंधारे विभागांतील कर्मचार्‍यांची वसाहत होती तिथे मामाला क्वार्टर मिळाले. सिमेंटचे पत्रे असलेले ते तीन खोल्याचे लहान टूमदार घर आजही माझ्या नजरेसमोरून जात नाही. दारात मामाची एसडी गाडी लावलेली असायची. या वसाहतीत चारी बाजूंना घरे आणि मध्यभागी अतिशय सुंदर बगिचा होता. त्याच्या घसरगुंडीवर खेळण्याइतके आम्ही लहान राहिलो नव्हतो. पण रोज आम्ही तिघे भावंडं संध्याकाळी अंधार  पडल्यावर घसरगुंडीच्या वरच्या भागात बसून गप्पा मारत रहायचो. तेंव्हा मामा घराच्या अंगणात कुणा मित्राशी सहकार्‍याशी मस्त हसत खेळत गप्पा मारत बसायचा. आपण लहान मुलंच गप्पा मारतो हसतो एकमेकांना चिडवतो असं नाही तर ही मोठी माणसंही अशीच वागतात हे नकळत डोक्यात मामाने ठसवले. 

सेलूच्या मामाच्या रेल्वेस्टेशन जवळच्या घराचे जसे आकर्षण होते त्यात अजून एक भाग होता. मामाचा छोटा मुलगा सुधीर तो अगदी लहान होतो. गोरा गोमटा गालाला खळी पडणारा फारच लोभस हा भाउ आम्हाला जिवंत खेळणंच वाटायचा. तो होताही अगदी तस्साच. आमच्यापेक्षा पाच सहा वर्षांनी लहान असलेला हा भाउ आम्हाला फार आवडायचा. त्याला उत्साहात खेळवणे, कडेवर घेणे, त्याला आंघोळ घालणे, मामीबरोबर बाजारात जाताना याला सोबत घेवून चालणे मला फार आवडायचे.

मामा आम्हाला आम्हा भाच्च्यांना ‘काय जावई..’ असंच म्हणायचा. मराठवाड्यात मामाची पोरगी करून घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे बहिणीच्या पोराला जावाईच म्हटलं जातं.  यातही मामाच्या बोलण्यात एक मस्त चिडवण्याचा सूर होता. कारण त्याला पोरगीच नव्हती. दुसर्‍या मामालाही पहिला मुलगाच झाला. ज्या तिसर्‍या मामाला पोरगी झाली तोपर्यंत आम्ही फारच मोठे झालो होतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मामाची पोरगी मिळणार नव्हतीच. 

पण यात दूसरा एक गंमतीचा भाग होता. माझे वडिल ज्या ब्राह्मण पोटजातीचे होते (देशस्थ ऋग्वेदी) त्यांच्यात मामाची पोरगी करतात तर आई ज्या पोटजातीतली आहे (देशस्थ यजूर्वेदी) त्यांच्यात मामाची पोरगी चालत नाही. त्यांच्यात तर अगदी लग्न जूळवताना मामाचेही गोत्र तपासले जाते. (हे माझ्या आईवडिलांचे लग्न झाले तेंव्हाच सगळं निकालात निघालं होतं. शिवाय माझ्या नातेवाईकांत आंतरजातीय, आंतरधर्मिय, आंतरदेशीय अशी मोठ्या संख्येने लग्नं झाल्यानं हा सगळा विषय आमच्यासाठी केवळ थट्टेचा विनोदाचा गंमतीचाच आहे). माझी इकडची आज्जी मात्र मामाला म्हणायची तूम्हाला पोरगी असली असती तर आम्ही नक्कीच करून घेतली असती.

मामामुळे सेलूच्या दिवसांच्या असंख्य सुंदर आठवणी माझ्या आयुष्यात गोळा झाल्या. आजही सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांसाठी सेलूला जातो तेंव्हा पहिली आठवण मामाचीच येते.

मामाची बदली पुढे औरंगाबादला झाली. एव्हाना आम्हीही शिकायला औरंगाबादला आलो होतो. आपला भाच्चा  शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतोय याचा त्याला नितांत अभिमान होता. मला आवर्जून भेटायला हॉस्टेलला तो यायचा तेंव्हा तो शिकला त्या परिसरांतून फिरताना त्याला एक वेगळाच आनंद व्हायचा.  याच परिसरांत तो पॉलिटेक्निक झाला. 

बांधकाम हा त्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आमच्या नातेवाईकांची जवळपास सर्व बांधकामे त्या काळात त्यानं हौसेने स्वत:च्या देखरेखीखाली करून दिली. त्यात त्याचा खरं तर काहीच संबंध नसायचा. केवळ  त्याला या विषयाची आवड होती किंवा असं म्हणूया की त्याला बांधकामाचे व्यसनच होते. 

आमचे सगळे नातेवाईक त्याच्यावर बांधकाम सोपवून निर्धास्त असायचे. आता ज्या पद्धतीने अधिकृत रित्या गुत्तेदार व बांधकाम व्यवसायीक पुढे आलेले आहेत तेंव्हा तसं नसायचं (मला आठवतोय तो 1980 चा काळ). सिमेंट वगैरेची टंचाई असायची. मजूर यायचे नाहीत. आर्किटेक्ट नावाच्या प्राण्याचा सुळसुळाट झाला नव्हता. त्या काळातली ही बांधकामे तो मोठ्या हौसेने पूर्ण करून द्यायचा. 

निवृत्तीनंतर त्यानं हाच व्यवसाय करावा असं मी त्याला सुचवून पाहिलं. आग्रह धरला. पण त्याला त्याचा व्यवसाय करण्यात रस नव्हता. त्याची ती आवड होती, छंद होता. त्याचा व्यवसाय झाला तर आनंद निघून जाईल असं त्याला वाटत असावं. छोट्या मुलानं स्टेशनरीचं दुकान काढलं तिथे तो आनंदाने बसायचा. पण आपला म्हणून बांधकाम व्यवसाय उभा करावा हे त्याला वाटलं नाही हे खरं आहे.

मामा जन्मला आणि त्याची आई निधन पावली. आजोबांनी माझ्या आज्जीशी दुसरं लग्न केलं. त्या क्षणापासून तो माझ्या आज्जीचंच लेकरू झाला. आज्जीची एक सर्वात लहान बहिण (बाबी मावशी-विजया माणकेश्वर) हीच्या जन्मा आधीच तिचे वडिल वारले. ही मावशीआज्जी अगदी मामाच्याच वयाची. या दोघांसाठी जन्म न देताही आज्जीने आईची भूमिका निष्ठेने जिव्हाळ्याने निभावली. हा मामाही आयुष्यभर आपल्या दुसर्‍या आईच्या बहिणी तिचे मावस भाउ तिचे नातेवाईक यांच्यातच रमला. त्याचा सख्खा मामा हयात होता. पण याला कधीच त्या आजोळचा जिव्हाळा लागला नाही.

मामा व बाबी मावशी हे दोघे बरोबरचे. यांची भांडणं लागायची तेंव्हा आज्जी वैतागून असं म्हणायची ‘मेले छळतात मला. एक आईला गिळून बसलंय आणि एक बापाला’ अशी एक आठवण आई सांगते. पण सगळा संसार रेटणार्‍या सतरा अठरा वर्षाच्या बाईचा हा उद्गार वरवरचा असायचा. प्रत्यक्षात या दोघांनाही आज्जीची सर्वात जास्त माया अनुभवायला मिळाली. या आपल्या मावशीला मामा कायम ‘बाबे’ असंच म्हणत आला. आणि तिही ‘वश्या’ असंच म्हणायची. 

आमचे मोठे आजोबा (सखारामपंत बीडकर)  1943 ला अभियंता पदवी घेवून उस्मानिया विद्यापीठांतून बाहेर पडले. मध्य प्रदेशांत तंत्र शिक्षण विभागांत फार मोठ्या पदांवर त्यांनी काम केलं. अगदी म.प्र.शासनाच्या तंत्र शिक्षण सचिव पदावरून ते निवृत्त झाले. मामाला आपल्या या मोठ्या काकांचा अतिशय अभिमान. मराठवाड्यातला पहिला अभियंता आपला काका आहे आणि आपणही त्याच क्षेत्रात काम करतो या भावनेनं त्याची छाती भरून यायची. सगळ्यात लहान आजोबा (डॉ. नारायणराव बीडकर) हे वैद्यकीय क्षेत्रांत आणि औरंगाबादच्या सामाजिक विश्वात एक आदरणीय नांव. निवृत्तीनंतर मामा औरंगाबादला आयुष्याच्या अखेरपर्यंत होता. डॉ. नारायणराव बीडकर (नाना काका) हे पण औरंगाबादलाच होते. त्यांच्यासाठीचा मामाचा असलेला आदर मला त्याच्या बोलण्यात नेहमी जाणवायचा. आपण नारायणराव बीडकरांचे पुतणे आहोत हे तो आवर्जून स्वत:ची ओळख करून देताना सांगायचा. बर्‍याचदा नाना काकांकडे जाताना मला सोबत घेवून जायचा. तेंव्हा त्यांच्याशी बोलताना आदर जिव्हाळा शब्दांशब्दांतून उमटून यायचा. 

लहान दोन मामा ऍटोमोबाईल व्यवसायात होते. व्यवसाय करणार्‍यांचे त्याला फार कौतूक वाटायचे. दिवाळीत आमच्या या परभणीच्या मामांच्या दुकानांत लक्ष्मीपुजनाचा मोठा कार्यक्रम असायचा. हा मोठा मामा तेंव्हा अगत्याने हजर असायचा. बहुतेक वेळा लहान दोघेही मामा मोठ्या मामा मामीलाच पुजेला बसवायचे. सगळ्या भावांडांनी मामाचे मोठेपण आनंदाने मान्य केलेले तर होतेच. मोठा मामाही ही भूमिका मनापासून निभवायचा.

मामा शिकायला होता तेंव्हा त्याची परिक्षा असताना, आजारी असताना आज्जी त्याच्या खोलीवर येवून रहायची आणि त्याच्या सकट त्याच्या दोन मित्रांना स्वयंपाक करून खावू घालायची. त्यामुळे मामाचे दोन्ही मित्र मोहन भाले आणि बिंदू हे आम्हाला मामासारखेच होते.

दोन मुलं सुना पाच नातवंडं असा भरल्या घरात तो गेला. परभणी कडे आईकडचे नातेवाईक कितीही मोठे असो त्याला अरे तूरेच करायची सवय आहे. त्यामुळे बाबांच्या वयाचा हा मामा आमच्यासाठी ‘अरे मामाच’ होता. जावाई म्हणणार्‍या मामानं पोरगी तर दिली नाही पण आयुष्यात खुप आनंद दिला. स्वत:च्या आयुष्यात जन्मापासून आलेलं दु:ख किंवा नंतरही वाट्याला येणार्‍या छोट्या मोठ्या अडचणींचा त्याने कधीच बाउ केला नाही. उलट तो जिथे जाई तिथले वातावरण प्रसन्न करण्याची विलक्षण हातोटी त्याला होती. आमच्या नातेवाईक घरगुती सगळ्या समारंभांत त्याची उपस्थिती अनिवार्य असायची ते त्याच्या या स्वभावामुळेच.

माझा तीन नंबरचा मामा ओरिसात भुवनेश्वरला होता. त्याच्याकडे आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी मिळून जायचे ठरवले.  मोठा मामा, मामी, त्याची दोन मुलं, दोन नंबरचा सुहास मामा, मामी आणि त्याचा एक मुलगा, आई-बाबा आणि आम्ही दोघे भावंडं अशी अकरा जणं आम्ही भुवनेश्वरला रेल्वेने गेलो. तिथे तीन नंबरचा मामा (अनील बीडकर) मामी आणि त्यांची लहान मुलगी श्यामली असे तिन जणं होते. कल्पना करा अशी चौदा माणसं एका अंबॅसिडर गाडीत बसून कोणार्क सुर्यमंदिर,  पुरीचे जन्ननाथ मंदिर, नंदनकानन अभयारण्य अशी सहल केली होती. तेंव्हा अंब्यासिडर गाडीचे समोरचे सीट एकसंध असायचे. या सगळ्या अडचणीवर मामाच्या दिलखुलास कॉमेंट चालायच्या. मोठे लोकं पत्ते खेळताना आमची एक मामी सांगितलं ते एंकायची आणि दुसरी ऐकायची नाही तेंव्हा ‘एैकती आणि न एैकती’ अशी त्यांना नावं ठेवून मामा गंमत करायचा. नंदन कानन अभयारण्यात फिरताना तर मग मागची डिक्की उघडून आम्ही तिघं मोठे भावंडं त्यात बसून प्रवास केला. 

मामे-चुलत-मावस भावंडांत तो सर्वात मोठा. हे ‘दादा’पण त्यानं खर्‍या अर्थाने निभावलं. त्याचे अंत्यदर्शन घेता आले नाही म्हणून त्याच्या सख्ख्या भावंडांइतकेच त्याचे मावस चुलत मामे भावंडं हळहळत होते त्याचं कारण हेच.

आमच्या सगळ्या मामा मावश्यांना आज्जी आजोबा गेल्यावर आज्जीच्या तीन बहिणी गेल्यावर याच मामाचा आधार वाटायचा. मीना मावशी मला म्हणाली, ‘बाळ्या (मला बाळ्या म्हणणार्‍या मोजक्या माणसांत ही मावशी आहे) दादा असल्याने वाटायचं कुणीतरी आहे आपल्या पाठीशी. पण आता तोच गेला की रे.’ तीला पुढे बोलवेना. मंजू मावशी तर बोलूच शकत नव्हती. तीनं अर्धवट बोलून फोनच ठेवून दिला. कोरोना मुळे आई आणि इतर मामांना येण्यापासून रोकता रोकता माझ्या मोठ्या भावाच्या नाकी नउ आले. भुषण मामा, नंदू मामा बोलता बोलताच गप्प झाले. संजू मामा भंडारी दवाखान्यात चार तास बसून होता. माझे तीन चुलतमामा अंत्यविधीला हजर होते. त्यांची भावना घरातला सगळ्यात मोठा भाऊ वडिलधारा गेला अशीच होती.

मामासारखी माणसं जातात त्याचं एक जवळचा नातेवाईक म्हणून आतोनात दु:ख तर असतंच. पण आयुष्याकडे सकारात्मकतेने  पाहणारा सर्वांना हसत खेळत ठेवणारा जगण्याचा खरा अर्थ आपल्या कृतीतून समोर ठेवणारा असा माणूस गेला म्हणून जास्त दु:ख होते. आता आपलीच जबाबदारी आहे की आपण तसे वागायचा प्रयत्न करणे. छोट्या मामाच्या मुलीने राधा दंडे हिने मला फोन केला आणि तिला रडू कोसळलं. कुणीच कुणाकडे जाणं शक्यच नव्हतं. तरी मी तिच्याघरी गेलो. दुर अंतरावर बसून आम्ही डोळ्यांनीच एकमेकांचे सांत्वन केलं. शब्द तर फुटत नव्हतेच. माझ्या लक्षात आलं वसंतमामा सारखी व्यक्तिमत्वं ही फक्त कुणा एकाची नातेवाईक नसतात. ही एक रसरशीत अशी जीवनवृत्ती आहे. ती आपण जपणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली.     

   

 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Monday, March 22, 2021

नविन मराठी वेब मालिका- ‘आजोळ’




उरूस, 22 मार्च 2021
 

गावाकडच्या गोष्टी ही वेब मालिका चांगलीच गाजली. गावच्या मातीचा सुगंध या मालिकेला होता. अस्सल रसरशीत अशी ही मालिका 100 भागांतून समोर आली. मराठी कला विश्वात दीर्घकाळ चालली. मोठ्या प्रमाणावर त्यांना दर्शक लाभले. याच निर्माता दिग्दर्शकांनी आता नविन मालिका आणली आहे-‘आजोळ’.

नितीन पवार या तरूण दिग्दर्शकाच्या या नविन मालिकेचे दोन भागही प्रदर्शित झाले आहेत. एक फार महत्त्वाची बाब या तरूणाने केली आहे. ती म्हणजे गावोगाव पसरलेला छोटी मोठी नौकरी उद्योग करणारा शेती करणारा तरूण वर्ग आहे त्याच्या भावभावनाला कलारूप देण्याचा अतिशय यशस्वी प्रयत्न केला आहे. याची पहिल्यांदा दखल घेतली पाहिजे. 

शाळेत जाणारी लहान मुलं, वयात येणारी किशोरवयीन मुलं, तरूण, त्यांच्या प्रेम भावना, त्यांचे उद्योग व्यवसायाचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या, आई वडिलांचे आपल्या मुलांशी संबंध, भावकिचे प्रश्‍न, गावातील सामाजिक राजकीय समस्या अशा कितीतरी गोष्टींना अगदी सहज सुंदर शैलीत मांडले जात आहे. 

हे सगळे विषय मराठी कलाविश्वात फारसे येत नव्हते. जेंव्हा येत होते तेंव्हा टिंगलीच्या स्वरूपात बाष्कळ विनोद निर्मितीसाठी येत होते. चित्रपटांतून मराठी तमाशा ज्या पद्धतीने आला तसा इतर ग्रामीण कलाविष्कार आला नाही. गावातले राजकारण हे त्यातील इरसालपणा दाखविण्यासाठी आले पण गावातील भावजीवन फारसे आले नाही. 

नागराज मंजूळे च्या फँड्री, सैराट (मध्यंतरापूर्वीचा भाग), नाळ या चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भावजीवनाला रूपेरी पडद्यावर आणून त्याची दखल घेण्यास भाग पाडले. असे अजून काही चित्रपट सांगता येतील. पण मालिकांमध्ये मात्र असा प्रयोग होत नव्हता. ज्या मालिका स्वत:ला ग्रामीण म्हणवून घेतात त्यांच्या दर्जाबद्दल न बोललेले बरे. 

सोशल मिडियाचा प्रभाव वाढायला लागला तस तसे वेब मालिका सुरू झाल्या. त्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग तयार झाला. जगभरांतून त्याला मागणी यायला लागली. पण हा प्रयोग मराठीत फारसा केला जात नव्हता. या पार्श्वभूमीवर मराठी वेब मालिका काढणे आणि ती यशस्वी करून दाखवणे हे एक आव्हान होते. ते कोरी पाटी प्रॉडक्शन ने यशस्वी करून दाखवलेे. त्यासाठी त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन. 

आजोळ चे पहिले दोन भाग प्रदर्शीत झाले आहेत. मामा आपल्या बहिणीला भेटायला मोठ्या शहरात येतो. सुट्ट्या असल्याने भाच्च्याला गावाकडे घेवून जाण्याचा प्रस्ताव ठेवतो. अचानक मामाच्या गावाला जायला भेटणार म्हणून भाच्चा खुष होतो. मामा भाच्चे ही जोडगोळी गावाकडे येते असं साधं गोड कथानक पहिल्या भागात येवून गेलं आहे.

आज सोमवारी प्रदर्शीत झालेल्या दुसर्‍या भागात भाच्चा गावात बरोबरच्या मित्रांसोबत फिरतो आहे, विहिरीत पोहतो आहे, गावच्या मंदिरात घोडा घोडा खेळत आहे, मामे बहिण तिच्या मैत्रिणी सोबत खेळपाणी खेळत असताना त्यात जावू इच्छित आहे, मोठ्या मामेभावाच्या नाजूक प्रेमप्रकरणाचा उलगडा त्याच्या छोट्याशा मेंदूत होवू पहात आहे, मामेभाऊ मंदिरात अतिशय सुंदर असा अभंग गातो असाही एक प्रसंग यात आलेला आहे. त्याच्या गाण्यावर त्याची प्रेयसी लट्टू आहे. 

नितीन पवारचे एक वैशिष्ट्य आहे. व्यंकटेश माडगुळकरांच्या शब्दांत जशी एक ग्रामीण वास्तव सौंदर्यपूर्णरित्या टिपण्याची क्षमता होती तसे नितीनच्या कॅमेर्‍याचे आहे. हा कॅमेरा हळूवारपणे गाव टिपत जातो. आपण होवून काही वेगळं करायला न लावता सहजतेने पात्रांकडून तो अभिनय करून घेतो. किंवा त्यांना त्यांचे संवाद सहज बोलायला लावतो, प्रसंग सहजतेने उभे राहतात आणि हळूच कॅमेरा ते टिपून घेतो. यातील संवाद फार सोपे वाटतात. पण हा सोपेपणा रियाजातून आलेला आहे. जयपूर घराण्याचे दिग्गज गायक मल्लिकार्जून मन्सूर मारव्याची एक तान अशी काही घेतात की त्यात आख्खा राग उलगडतो. ही सोपी वाटणारी तान येते अतिशय मोठ्या रियाजातून. तसं नितीनचे वाटते. नागराज मंजूळे जसा सोलापूरची भाषा फार हुकमतीने वापरतो तसा नितीन पवार सातार्‍याकडची भाषा सुंदर सहजतेने वापरतो.

कॅमेरा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. काय दाखवावे यापेक्षा काय दाखवू नये हे त्याला चांगले कळले पाहिजे. त्या पद्धतीने नितीन पवारचा कॅमेरा संपूर्ण मालिकेत नेमके दाखवत राहतो. प्रसंग कुठे कट करावा आणि कुठे जोडावा याचेही एक तंत्र त्याने विकसित केले आहे. गावाकडच्या गोष्टींच्या 100 भागांतून आलेली सफाई आता आजोळ मध्येही जाणवते. 

यातील बायका विलक्षण चिवट, कर्तृत्ववान, ठसठशीत व्यक्तीमत्व असलेल्या रंगवल्या आहेत. लहान मुले हा तर नितीनचा ‘वीक’ पॉईंटच आहेत. जसे निल्या, बाब्या, गोट्या आधीच्या मालीकेत होते तसे यातील लहान मुलंही फार छान आली आहेत. त्यांच्याकडून असं काम करून घेणं हेच एक आव्हान आहे. 

अगदी तालूकाही नसलेल्या, जिथपर्यंत मुख्य सडक हमरस्ता पोचत नाही अशा आडवळणाचे गाव यात रंगवले आहे. अशा गावांतील दहावी बारावी पास नापास असा एक तरूणांचा वर्ग हा नितीनच्या मालिकेचा मोठा दर्शक वर्ग आहे. याच वर्गाची भाव भावना प्रामुख्याने ही कलाकृती दृश्यस्वरूपात दाखवते. सगळ्यांनी उठून शहरात जावे. शहरांतल्यांनी महानगरांत जावे. महानगरांतल्यांनी परदेशांत जावे अशी एक स्थलांतराची मोठी मालिकाच आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दाखवत आलेलो आहोत. अनुभवत आहोत.चित्रपटांतही असेच दिसून येते. 

नेमकी ही स्थलांतराची दिशा बाजूला ठेवून नितीन गावाकडेच राहणारी माणसे आणि विशेषत: तरूण रंगवतोय हे विशेष. ज्याचं भावविश्‍व गावातलेच आहे, ज्याला आपले भविष्यही गावच्या मातीतच उजळताना दिसत आहे, ज्याला गावासाठीच काहीतरी करायची उर्मी आहे, ज्याला आपल्या मातीचा अभिमान आहे आत्मियता आहे. आणि यासाठी कसलीही शब्दबंबाळ भाषा या कलाकृतीत येत नाही. कसलाही भावनिक भडकपणा यात येत नाही. गावाकडच्या अडचणी दाखवताना कुठे कमीपणा नाही, गावचा माणसांचा भलेपणा दाखवताना कुठे आमच्यातच खरी माणूसकी आणि शहरांत नाही असाही भाव नाही. अस्सल प्रतिभावंत जी शांत संयमी भूमिका घेत कलाविष्कार साधतो तशी ही भूमिका आहे. 

आपल्या कलाकृतीतील व्यक्तीरेखा स्वतंत्रपणे वाढू द्याव्यात. त्यांच्यावर आपले ओझे लादू नये याचे एक भान या तरूण दिग्दर्शकाला आहे असे जाणवते. 

या नविन मालिकेला खुप खुप शुभेच्छा. मराठी दर्शकांना विनंती की ही मालिका जरूर पहा. त्यावर तूमच्या प्रतिक्रिया द्या. कोरोना आपत्तीच्या काळात संकटावर मात करून कुणी कलात्मक काही करू पहात आहे हे फार धाडस आहे. आपण या धाडसाला प्रतिसाद देवून आपल्या रसिकतेची पावती देवू या.    

 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Sunday, March 21, 2021

‘परम’ स्फोटाचा । जाहला आवाज । हादरला आज । महाराष्ट्र ॥



उरूस, 21 मार्च 2021 

मुंबईचे आत्तापर्यंत पदावर असलेले पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले. त्या ‘लेटर बॉंम्ब’ चा मोठाच स्फोट महाराष्ट्राच्या राजकारणात झाला असून त्याचे पडसाद आता सर्वत्र ऐकू येत आहेत. 
या निमित्ताने समाज माध्यमांत (सोशल मिडिया) जो धुराळा उठला त्यातून एक विचित्र अशी चर्चा समोर येताना दिसत आहे. जी निरोगी लोकशाहीला घातक आहे. म्हणून त्याची दखल आधी घेतली पाहिजे. 

एक वर्ग जो भाजप संघ मोदी अमितशहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे त्यांच्या जातीवर आडून आडून टिप्पणी करण्यात मग्न असतो त्याने या सर्व प्रकरणांवर आक्षेप घेत काही वेगळेच मुद्दे समोर केले आहेत. मुळात हे प्रकरण दोन कारणांसाठी अतिशय गंभीर आहे. एक तर सध्या पदावर कार्यरत असलेल्या उच्च स्तरीय पोलिस अधिकार्‍याने हे पत्र लिहीले आहे. पोलिस दलांतील जवळपास सर्वांनाच गोवल्या जाईल असा हा खंडणीचा विषय आहे. यात स्पष्टपणे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव घेतले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे याची कल्पना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिलेली होती असे परमवीर सिंह म्हणत आहेत. हे तर फारच झाले. इतक्या उघडपणे पदावरचा कुणी अधिकारी महाराष्ट्राच्या राजकीय सर्वोच्च नेत्याचा संदर्भ घेतो आहे आणि तेही परत सर्व लेखी स्वरूपात. 

यावर प्रतिक्रिया देणारे शिवसेना-राष्ट्रवादी (कॉंग्रेस यात कुठेच नाही) समर्थक आंधळेपणाने या पत्रावर सहिच नाही, परमवीर सिंह यांनी आधीच का नाही तक्रार केली, भाजपला सरकार पाडायची घाईच झाली आहे, अमित शहा मुद्दामच असे खेळ करत आहेत असं काही सांगत आहेत. सेनेचे प्रवक्ते माध्यमांत तर काय बोलत आहेत हे त्यांना तरी कळतंय की नाही हे स्व. बाळासाहेबच जाणो. असले आरोप भंपकपणाचे आहेत असेही एकाने मांडले. 

यातील सर्व पक्षीय दृष्टीकोन राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवू. कालपर्यंत विधानभवनांत गृहमंत्री जे काही मांडत होते त्याच्या नेमके विपरीत असे समोर येत आहे. सचिन वाझेची बाजू ज्या पद्धतीने आधी लावून धरली गेली होती आणि नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन.आय.ए.) आपल्या हाती सुत्र घेताच तातडीने हालचाली झाल्या. याच सचिन वाझेला ज्याची बाजू गृहमंत्री आणि अगदी खुद्द मुख्यमंत्रीही लावून धरत होते अटक झाली. पाच अलिशान गाड्या जप्त झाल्या. 

गृहमंत्री अनिल देशमुख परमवीर सिंह यांची बदली ही शिक्षाच होती. चुकीला माफी नाही असे मुलाखतीत सांगतात आणि दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते अशा बदल्या नियमित होतच असतात त्यात वेगळं काही नाही असं सांगतात. म्हणजे कुणाचा पायपोस कुणाला नाही.

उरली सुरली कसर मा.खा. कुमार केतकर यांनी राज्यसभेत याच बाबतीत एक मुद्दा उपस्थित करून भरून काढली. दादरा नगर हवेलीचे खासदार मनोहर डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा केतकरांनी शुन्य प्रहरात उचलून धरला. त्यावर सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी केतकरांना त्यांची चुक दाखवून देत संसदेच्या पटलावरून हे उल्लेख हटवले. आणि परमवीर सिंह आपल्या पत्रात मनोहर डेलकर यांच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांना करण्याचे कारण नाही, गुन्हा इथेच घडला तरी सर्व संशयीत दादरा नगर हवेलीचे आहेत. आपल्या कार्यकक्षेत हे येत नाही असं सांगत आहेत. गृहमंत्री त्याला विरोध करत तपास मुंबई पोलिसांनी करण्या आग्रह धरत होते म्हणून पत्रात उल्लेख आहे. आता परमवीर, कुमार केतकर, अनिल देशमुख या तिघांत एक वाक्यता का नाही? याला कोण जबाबदार? 

असे कितीतरी मुद्दे समोर येत आहेत. त्यातून सरकारी पातळीवरचा प्रचंड अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येतो आहे. हे सर्व लोकशाहीला घातक आहे, सामाजिक स्वास्थ्य पूर्ण बिघडवणारे आहे. यावर तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे. आणि असं असताना काही लोकांना यात राजकारण दिसत आहे. यातून सरकार पाडण्याच्या हालचालींचा सुगावा लागतो आहे. हे पत्र आणि त्यातून समोर येणारी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी किंवा राष्ट्रपती राजवटीची मागणी  म्हणजे कसे राजकारण आहे हे सांगीतले जात आहे. ही तर कमाल झाली.

सर्व लोकशाहीप्रेमींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली पाहिजे. जे कुणी भ्रष्ट असतील त्यांचे अप्रत्यक्षही समर्थन नको. सत्तेवर असलेली आघाडी मुळातच अनैतिकतेने सत्तेवर आली होती. कॉंग्रेस राष्ट्रवादी सेना यांची निवडणुकपूर्व युती असली असती तर त्यांचा सत्तेवरचा दावा समजता आला असता. अगदी सर्व पक्ष स्वतंत्र लढले असते आणि नंतर सत्तेसाठी काही एक गणितं जूळली असती तरी ते समजून घेता आले असते. पण एकाबरोबर सात फेरे घ्यायचे, आणि नवरा असताना बाहेरच्या याराला डोळा घालायचा असा हा प्रकार आहे. त्यामुळे सत्तेवरीच आघाडीचे कसलेच समर्थन करता येत नाही. असं लिहिलं की लगेच भाजपने अशा अनैतिक सोयरीकी कशा केल्या याची जंत्री समोर ठेवल्या जाते. त्याचेही आम्ही कधीच समर्थन करत नाही. आणि दुसर्‍याचा दोष दाखविल्याने आपला लपत नसतोच. सत्ताधार्‍यांना विरोध करणार्‍यावर भाजप समर्थक अंधभक्त चड्डीवाले असा शिक्का मारून काहीही साध्य होणार नाही. 

आत्ता तातडीने गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. शिवाय परमवीर सिंह यांनी उपस्थित केलेल्या मुदद्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी झाली पाहिजे. या खंडणीखोरीचे धागेदोरे खुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचणार असतील तर हे सरकारच बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. नव्याने निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. तसेच इथुन पुढे ज्या पद्धतीने पक्षांतर बंदी कायदा पक्षांतील सर्व निवडुन आलेल्यांना लागू होतो तसाच तो निवडणुकपूर्व युतीलाही लागू केला पाहिजे. म्हणजे निवडणुकीआधी एकासोबत आणि नंतर सत्तेसाठी दुसर्‍यासोबत हे चालणार नाही. स्वतंत्र लढणार्‍या पक्षांना हे स्वातंत्र्य असू शकते. पण जर एका पक्षातील लोक एका चिन्हावर एका संयुक्त जाहिरनाम्या नुसार लोकांसमोर जातात तसेच युतीतील पक्षही जात असतात. तेंव्हा जो नियम एका पक्षांतर्गत सर्व सदस्यांना लागू होतो तो तसाच युतीतील घटकांनाही लागू कसा करता येईल हे पाहिले पाहिजे. 
याचा कायदा व्हावा किंवा काय ही नंतरची गोष्ट आहे. सगळेच प्रश्‍न कायद्याने सुटतात असे नाही. लोकांनीच अशा पद्धतीने जनादेश नाकारणार्‍यांना धडा शिकवला पाहिजे. 

‘परम’ स्फोटाचा । जाहला आवाज ।
हादरला आज । महाराष्ट्र ॥
महिन्याला फक्त । शंभरच कोटी ।
बाब आहे छोटी । ‘काका’ म्हणे ॥
शंभराचे वाटे । करताना तीन ।
कोण मारी पीन । दिल्लीतून ॥
सिंहासनाखाली । लागला सुरूंग ।
दाखवी तुरूंग । देवेंद्र हा ॥
राजकारण्यांनी । सोडलीय लाज ।
दिसे मज आज । ‘कांत’ म्हणे ॥
  
    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Saturday, March 20, 2021

19 मार्च - शेतकरी आत्महत्या नव्हे ‘कर्जबळी’



उरूस, 20 मार्च 2021 

साहेबराव करपे या विदर्भातील शेतकर्‍याने 19 मार्च 1986 रोजी कुटूंबासह आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्येची सरकारी पातळीवरची ही पहिली अधिकृत नोंद. तेंव्हापासून सुरू झालेले शेतकर्‍यांचे आत्महत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 19 मार्च हा दिवस किसान पुत्र आंदोलनाच्यावतीने  अन्नदात्यासाठी अन्नत्याग करून पाळला जातो. 

शेतकर्‍यांच्या बाबतीत दोन फार मोठे गैरसमज शेतीशी संबंध नसणार्‍या शहरी वर्गात पसरलेले आहेत. त्यातील एक आहे कर्जमाफी आणि दुसरा आहे शेतकर्‍यांच्या आत्महत्या. कुणीही स्वत:ला जराफार शहाणा समजणारा उठतो आणि कर्ज बुडविण्याची वृत्ती कशी वाईट आहे, अशाने चुक पायंडे कसे पडतील, कशासाठी माफी द्यायची? आत्महत्या हा काय उपाय झाला का? याच्यापेक्षा वाईट परिस्थितीत जगणारे दीन दलित कुठे आत्महत्या करतात? केवळ पुरूषच आत्महत्या का करतात? बायकां का नाही करत? असले असे बौद्धीक तारे तोडू लागतो

शेतकर्‍यांच्या आत्महत्या आपल्या शेतीची लुट करणार्‍या सरकारी धोरणाचा परिपाक आहे हे एकदा नीट सविस्तर समजून घेतले पाहिजे. जोपर्यंत आपण हे समजून घेणार नाही तोपर्यंत आत्महत्यांबाबत आपण असंवदेनशीलतेने बोलत राहूत लिहीत राहूत. कच्चा माल औद्योगीक उत्पादनांसाठी स्वस्तच ठेवला पाहिजे हे अगदी इंग्रजांपासूनचे असलेले धोरण स्वातंत्र्योत्तर काळातही तसेच राबवले गेले. त्यामुळे अगदी साधी बाळबोध आकडेवारी तपासून पहाता येते. 1947 ला ज्या विविध उत्पादनांच्या किमती काय होत्या आणि शेतमालाच्या किमती काय होत्या. तसेच त्या आत्ता काय आहेत? एक साधी तूलना करून कुणीही हे समजून घेवू शकतो. म्हणजे जाणीवपूर्वक शेतमालाच्या किमती कशा पाडल्या गेल्या हे लक्षात येईल. शेतीवरची लोकसंख्या तीच राहिली आणि शेतीचा राष्ट्रीय उत्पान्नातील घटत गेला. स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा 54 टक्के असलेला शेती उत्पन्नाचा वाटा आता केवळ 13 टक्के इतकाच उरला आहे. आणि शेतीवर पोट भरणारी अवलंबून असणारी लोकसंख्या मात्र फारशी घटलेली नाही (78 पासून 63 टक्केपर्यंत आली आहे).

त्यामुळे धोरणातच काही चुकत आहे हे लक्षात घ्या. अगदी गव्हाची किंमत वाढत नाही पण त्याचे पीठ करून त्याची पोळी केली की तिची किंमत वाढते. गव्हाची किंमत वाढत नाही पण दळण दळण्याची किंमत मात्र वाढलेली असते. दुधाची किंमत वाढत नाही पण चहाची किंमत मात्र वाढलेली असते. डाळीची किंमत वाढत नाही पण भज्यांची किंमत वाढलेली असते. तेंव्हा कच्चा शेतमाल आर्थिक दृष्ट्या सडवायचे आपले धोरण समजून घ्या म्हणजे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा उलगडा होत जाईल. 

कोरडवाहू शेतीतल्य या समस्या आहेत पाणी दिले की शेतीचा प्रश्‍न सुटेल असे मानणारेही किती चुक होते हे पंजाब हरियाणातील शेतकरी आत्महत्या करतो आहे रस्त्यावर उतरला आहे हे पाहून समजून येते आहे. सरकारी खरेदीत गव्हाला तांदळाला पुरेसा भाव मिळत नाही ही आकडेवारी कुणीही तपासून पाहू शकतो. आणि ही पाण्यावरची पीकं आहेत.

दुसरा मुद्दा समोर येतो तो म्हणजे शेती कर्जाचा. शेतकरी संघटनेने वारंवार हे स्पष्ट केले आहे ‘कर्जमाफी’ हा शब्दच आम्हाला मान्य नाही. शेतकर्‍याने काय गुन्हा केला आहे की त्याला तूम्ही ‘माफी’ देत आहात. याला आम्ही कर्जमुक्ती असाच शब्द आग्रहाने वापरतो. आणि इतरांनी पण तो वापरावा असा आमचा वैचारिक आग्रह आहे. कारण घेतलेले कर्ज बुडित निघते याला जबाबदार आम्ही नसून तूमचे धोरण आहे. खुल्या बाजारात आमच्या मालाला जो भाव भेटायला पाहिजे होता तो तूम्ही भेटू दिला नाही. जागतिकीकरण पर्वात डंकेल प्रस्तावात  आपले तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रबण मुखर्जी यांनी लेखी स्वरूपात कबुली दिली आहे की भारतात शेतकर्‍यांना उणे 72 टक्के इतकी सबसिडी मिळते. म्हणजेच त्याच्या 100 रूपयांच्या मालाला केवळ 28 रूपये मिळातात अशी धोरणं राबविली जातात. म्हणजेच या शेतकर्‍याला आम्ही 72 टक्क्यांनी मारतो.

शरद जोशींनी याचा एक हिशोबच सरकारी आकडेवारीचाच आधार घेवून मांडला आहे. 1981 ते 2000 या 20 वर्षांच्या कालखंडात शेतमालाला उणे सबसिडी देण्याच्या धोरणाने शेतकर्‍यांचे 3 लाख कोटींचे नुकसान झाले. म्हणजेच जो भाव भेटला आणि प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जो भाव होता यातील तफावत ही 3 लाख कोटींची होती. दुसरीकडे या काळातील शेतकर्‍यांचे एकूण थकित कर्ज 1 लाख 30 हजार कोटींचे होते. शेतकर्‍यांना खते वगैरे सवलतीत दिले जातात त्या सबसिडीची रक्कम 80 हजार कोटी रूपये होते. ती शेतकर्‍याला भेटतच नाही पण जरी वादासाठी ती शेतकर्‍याला भेटते असे गृहीत धरले तर कर्ज व ही सबसिडी मिळून एकूण रक्कम होते 2 लाख 10 हजार कोटी. आणि शेतकर्‍याची जी लुट सरकारी धोरणाने झाली ती होती 3 लाख कोटी. म्हणजेच सरकारच शेतकर्‍याचे 90 हजार कोटी रूपयांचे देणे लागते. (संदर्भ- बळीचे राज्य येणार आहे, लेखक शरद जोशी, पृ. क्र. २४४, प्रकाशक जनशक्ती वाचक चळवळ, लेख ६ मार्च २००८ च्या पाक्षिक शेतकरी संघटक मधील आहे.)

यामुळे शेतकरी संघटना कायम कर्जमाफी हा शब्द नाकारून ‘कर्जमुक्ती’ असा शब्द वापरत आली आहे. शेतकर्‍याला सरकार लुटते तेंव्हा कर्जखाते खारीज करून म्हणजेच सात बारा कोरा करून त्या पापापासून सरकारनेच मुक्ती मिळवावी. म्हणून कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही आग्रही मागणी होते.

नवविवाहितेची आत्महत्या हा शब्द जावून महिला आंदोनाने अतिशय आग्रहाने ‘हुंडा बळी’ असा शब्द रूजवला. त्याप्रमाणेच शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा शब्द जावून सरकारी धोरणाचे बळी म्हणजेच कर्जबळी असा शब्द चळवळीत वापरला जातो. आणि बळी शब्द आल्यावर तो घेणारा कुणीतरी गुन्हेगार आहे हे स्पष्ट होते. 

19 मार्चच्या साहेबराव करपेंच्या कर्जबळी प्रकरणानंतर देशभर शेतकर्‍यांचे कर्जबळी पडत गेले. अजूनही हे चालूच आहे. गेली 35 वर्षे सातत्याने हे कर्जबळी होत आहेत. तेंव्हा आता तरी डोळे उघडून या सर्व विषयाकडे पहावे अशी कळकळीची विनंती शहरी शेतीशी संबंध नसलेल्या वर्गाला आहे. तूम्ही ज्यांचे शोषण करून स्वत:चे फायदे करून घेतले, तूम्ही त्याच्या ताटातले हिसकावून घेतले, त्या शेतकरी भावा साठी जरा तरी सहानुभूती ठेवा. जरा तरी संवेदन क्षमता बाळगा. आजही शेती हाच सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे. तेंव्हा शेतीची उपेक्षा केल्यावर निर्माण होणारी समस्या ही हळू हळू तूमच्या पर्यंतही येवून पोचते. शहरंही त्यापासून वाचत नाहीत. कारण तिथून होणारी स्थलांतरे ही शहरी व्यवस्थेवर ताण वाढवत जातात. मग शहरांत रस्ते, पाणी, कचरा, अतिक्रमण, रोजगार समस्या वाढत जातात. जटील बनतात. 

शेतकर्‍याला उचलून काही द्या, तुमच्या पदरचे काढून द्या, त्याच्यावर दया दाखवा असे बिलकूल नाही. त्याच्या हाक्काचे जे आहे ते हिसकावून घेवू नका. त्याला मिळू पाहणार्‍या खुल्या बाजारातील रास्त भावापासून रोकू नका. किंबहुना महात्मा गांधी म्हणायचे तसे गरीबासाठी काही करण्यापेक्षा आधी गरीबाच्या छातीवरून उठा. तसेच शेतकर्‍यासाठी काहीच करून नका. आधी शेतकर्‍याच्या छातीवर तूम्ही बसला अहात ते उठा.

  

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Thursday, March 18, 2021

दु:खा जावे शरण असे की । बांधापाशी धरण जसे की ॥



उरूस, 18 मार्च 2021 

गेली 10 वर्षे मी क्वेस्ट फॉर फ्रिडम हा ब्लॉग चालवतो आहे. नुकताच 3 लाख दर्शकांचा टप्पा पार केला. त्यानंतर असं लक्षात आलं की आपण विविध विषयांवर लिहितो पण ज्याला सर्वात कमी प्रतिसाद मिळतो त्या साहित्य क्षेत्रावरच काहीतरी लिहावं. त्यातही लक्षात आलं की कवितेला सगळ्यात कमी प्रतिसाद मिळतो. जसं आजारी अपंग लेकरू आईचं लाडकं असतं. किंवा त्यातच तिचा जीव अडकलेला असतो. कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ मधील एक फार सुंदर कविता आहे

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणि करते व्याकुळ केंव्हा
त्या माज घरांतील मंद दिव्यांची वात

आज मलाही या 3 लाख दर्शकांच्या झगमगाटात सगळ्यात कमी ज्या विषयाला प्रतिसाद मिळाला तो कवितेचा प्रांतच जास्त आठवतो आहे. कळत नाही असं का होतं. खुप आनंदाच्या प्रसंगीही दु:ख आपल्याला चिटकून बसलेलं असतं. किंवा आपणच दु:खाला कवटाळून का बसलेलो असतो? नुकताच औरंगाबाद शहरात पीर बाजार कडून वेदांत हॉटेल (आताचे व्हिटस) कडे जाणार्‍या रस्त्यावर अतिशय देखणा सुर्यास्त बघायला मिळाला. कुसुमाग्रजांनी टागोरांच्या कवितेचा जो अनुवाद केला त्यातील एक शब्द ‘दिन मावळता’ माझ्या डोक्यात घुसून बसला होता. हाच शब्द मनात घोळायला लागला. त्याला जोडून पुढच्या ओळी तयार झाल्या. एक लय गेले काही दिवस सारखी घुमत आहे. त्याच लयीत घोळून घोळून हे शब्द समोर आले. 

दिन मावळता । उगवून येते ।
दु:ख सनातन । काळजातूनी ॥
सांत्वन फुंकर । कितीही घाला ।
बसते हटूनी । ठणकत आतूनी ॥

मना वाटते । दु:ख पांगळे ।
चालत चालत । जाईन कोठे ॥
दु:ख बेरके । हुकवूनी टाकी ।
सर्व अडाखे । छोटे मोठे ॥

जानेवारी महिन्यात पैठणला नाथ सागरावर गेलो होतो. पहाटे त्या अथांग पाण्यापाशी एक वेगळीच अनुभूती आली आणि त्यावर एक कविता सुचली. तोही लेख याच ब्लॉगवर टाकला आहे. याच साठलेल्या पाण्याची एक वेदना या नविन कवितेत जाणवली. वाहत्या पाण्याला रोकून ठेवल्याने काय होते? हळू हळू हे पाणी धरणाचे दरवाजे उघडून वाहू दिली जाते आणि त्यातून येणारी एक वेगळीच अनुभूती लक्षात आली.

सोडूनी द्यावा । हट्ट आपुला ।
दु:खा जावे । शरण असे की ॥
वाहणे विसरून । बांधापाशी ।
पाणी गुपचूप । धरण जसे की ॥

साठू द्यावा । सोशिकतेचा ।
तुंबारा हा । अथांग मागे ॥
त्या दाबाने । पीळे उसवूनी ।
दु:खाचे हे । विरती धागे ॥

दार उघडता । दु:ख जरासे ।
वाहू लागते । हळू हळू ॥
कोंब उगवतो । रसरशीत हा ।
जीर्ण शीर्ण । लागते गळू ॥

दु:खाचे एक सनातन रूप आपोआप शब्दांतून उमटत गेले. जगण्याच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच सनातन दु:ख. ते तर चिटकून राहणारच आहे. उलट या दु:खामुळेच आपले मन ताळ्यावर राहते. 

कितीही ढकला । चिटकून राहते ।
हृदयापाशी । दु:ख सनातन ॥
आपुल्या नकळत । सदैव ठेवी ।
ताळ्यावरती । भरकटले मन ॥

माझ्या ब्लॉगवर कवितांवरच्या सर्व लेखांना प्रतिसाद दिला त्यांच्या रसिकतेला ही कविता विनम्रपणे अर्पण. 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Wednesday, March 17, 2021

बँक कर्मचार्‍यांनो कायमचेच संपावर जा..



उरूस, 17 मार्च 2021 

बँक कर्मचार्‍यांचा संप सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी पार पडला. नेमकी शनिवार रविवारला जोडूनच या संपाची योजना करण्यात आली होती. जेणे करून चार दिवस बँक बंद ठेवून ग्राहकांची चांगलीच अडचण व्हावी हो हेतू होता. हा आरोप केवळ आजच झाला आहे असे नाही. कित्येक वर्षांपासून बँक कर्मचार्‍यांचे संपाचे हेच धोरण राहिले आहे.

बरोबर 27 वर्षांपूर्वी शरद जोशी यांनी ‘बँकांची व्यंकटी सांडो’ नावाचा एक लेख लिहीला होता. त्या वर्षी 11 मे रोजी संप पुकारल्या गेला होता. कारण 12 तारखला शिवजयंतीची सुट्टी होती. 13 तारखेला अक्षय्य तृतिया होती.  14 व 15 मे हे दोन दिवस शनिवार रविवार होते. अशा पद्धतीने 5 दिवस ग्राहकांना कोंडीत पकडल्या गेले. 

या लेखाच्या शेवटी शरद जोशींनी असं लिहिलं होतं, ‘.. संपानंतर माझे मत अधिक ठाम झाले आहे. खासगी बँका येऊ देत, परदेशी बँका येऊ देत, अगदी बहुराष्ट्रीय बँका येऊ देत पण राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचार्‍यांची नांगी ठेचणे आवश्यक आहे. 

राष्ट्रीयकृत बँकांची सद्दी संपो, दुरितांचे तिमिर जावो आणि ग्राहकांवर अरेरावी करणार्‍या देशी मग्रूर बँकसाहेबांचा नि:पात होवो, जिद्दीने स्पर्धा करून ग्राहकांना अधिकाधिक सेवादेणार्‍यांचा सूर्य लवकर उगवो, अशी प्रार्थना करण्यापलीकडे आपल्या हाती काय आहे?’ (पाक्षिक शेतकरी संघटक, 6 जून 1994)

आज इतक्या वर्षांनी काय परिस्थिती आहे? कुठलाही सर्वसामान्य ग्राहक बँक व्यवस्थापनावर नाराज का असतो? त्याची अडवणुक केली जाते, त्याला योग्य ती सेवा योग्य त्या प्रमाणे मिळत नाही असे का वाटत राहते? 

1971 दरम्यान बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तेंव्हा गावोगावी बँक सेवा पुरविली गेली नाही असे कारण दिले गेले होते. आज 50 वर्षांनी सरकारने याच बँकांचा खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा काय परिस्थिती आहे? आजही गावोगावी राष्ट्रीयकृत बँका का पोचल्या नाहीत? 

ए.टी.एम. तंत्रज्ञान आल्यावर ते तरी गावोगाव आम्ही का पोचवू शकलो नाही? आज ज्यासाठी बँक कर्मचारी संप करत आहेत ते हे कधी लक्षात घेणार की तूमची उपयुक्तता कधीच संपली आहे. 

आज या संपाची साधी बातमीही माध्यमांनी ठळकपणे समोर आणली नाही. कारण सामान्य लोकांना बँक कर्मचार्‍यांबाबत कसलीही सहानुभूतीच शिल्लक राहिली नाही. यांना संपावर जायचे असेल तर यांनी कायमस्वरूपी जावे. त्यांच्या जागी दुसरे तरूण काम करण्यास कमी पगारावर तयार आहेत. या सर्व बँकांचे खासगीकरण झाल्यावर चांगली स्पर्धा निर्माण होईल आणि सामान्य ग्राहकाला चांगली सेवा मिळेल अशी आशा वाटते. 

कारण शरद जोशींनी 1994 ला लिहीले त्यापेक्षा आता परिस्थिती तंत्रज्ञाने अजूनच पालटली आहे. आता पैसे भरणे आणि काढणे, दुसर्‍याच्या खात्यावर पैसे जमा करणे यासाठी प्रत्यक्ष बँकेत जायची गरजच शिल्लक राहिलेली नाही. मोबाईलवर बँकिंग सुरू झाल्यावर या बँकेच्या मक्तेदारीवर सर्वात मोठा आघात झाला आहे. आता बँक कुठे आहे, तिथला कर्मचारी जागेवर आहे की नाही, रोख व्यवहाराची वेळ संपली तर काय होणार असल्या चिंता सामान्य ग्राहकाच्या जवळपास संपून गेल्या आहेत.  

अगदी गाडीवाल्याकडे भाजी घेतली किंवा फळं घेतले तरी तो सामान्य व्यवहार मोबाईल द्वारे सुलभतेने होवू लागला आहे. कर्जासाठीच सध्या सरकारी बँकांकडे तोंड वेंगाडण्याची पाळी येते आहे. त्यातही वाहन व्यवसायीकांनी ज्या पद्धतीने पतपुरवठ्याची वेगळी व्यवस्था उभारून राबवून दाखवली तशी विविध क्षेत्रांत उभारल्या गेली तर सरकारी बँकांची नांगी पूर्णत: मोडली जाईल. आज तरी या बँका खासगी करू नका म्हणून आंदोलन केले जात आहे. उद्या कशा का असेना बँका चालू ठेवा म्हणून याच कर्मचार्‍यांना रडत मागणी करावी लागेल. कारण चालवता येत नसेल तर बँका बंद करा असाच दबाव आहे. 

ज्या पद्धतीने लघु बँका (स्मॉल सेव्हिंग्ज बँक) कुशलतेने काम करत आहेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तिथे केला जातो आहे, विविध कागदोपत्रांचा गबाळा कारभार जावून मोबाईलवरच विविध कामे होत आहेत हे पाहता आपण आत्तापर्यंत या गचाळ सरकारी बँकांत काय करत होतो असा प्रश्‍न निर्माण होतो.

सरकारी नियंत्रणाने बँक व्यवसायाचे पार वाट्टोळे झाले. तसेच डाव्यांच्या कर्मचारी संघटनांनी या बँका कशा संपतील अशाच पद्धतीने संपाचे हत्यार वापरले. आता या बँकांसाठीची सामान्य लोकांची सहानुभूती पूर्ण संपून गेली आहे. 

खासगीकरणाचा निर्णय सरकारने अपरिहार्यपणे घेतला आहे. जितक्या लवकर यांचे खासगीकरण होईल तितके सामान्य ग्राहकाच्या हिताचे आहे. याला ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी व्हि.आर.एस. घेवून घरी सुखाने बसावे. गिरणी कामगारांचा संप दत्ता सामंत यांनी ताणून ताणून काय झाले हे सर्वांच्या समोर आहे. विविध उद्योगांमधील कामगारांचे संप ताणून ताणून त्याची काय अवस्था झाली हे पण सर्वांच्या समोर आहे. अशीच अवस्था बँक कर्मचार्‍यांची पण होणार आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या संपाची पण अशीच अवस्था होत जाईल. वसंत दादा पाटील यांच्यासारखा एखादा खमक्या मुख्यमंत्री आला तर तो सरकारी कर्मचार्‍यांचा संपही कठोरपणे मोडून काढेल. शिक्षकांच्या संपाचेही असेच होणार आहे.  या सर्व कर्मचारी कामगार हमाल मापाडी  संघटना डाव्यांच्या आहेत हे लक्षात घ्या. या सगळ्यांची एकच मोडस ऑपरंडी आहे. उद्योग बुडाला तरी हरकत नाही पण कामगारांचे पगार वाढलेच पाहिजेत. बँक तोट्यात जावो, एनपीए कितीही वाढो गैर मार्गाने कितीही कर्ज दिल्या जावो कर्मचार्‍यांचे पगार वाढलेच पाहिजेत, सरकारची वित्तीय तुट कितीही वाढो पण कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे. ही सगळी एकच मानसिकता आहे. आधुनिक काळात नविन तंत्रज्ञान, आधुनिक बाजारपेठ व्यवस्था यात ही जूनी मानिकसता निकालात निघते आहे. हे समजून घ्यायला हे बँक कर्मचारी तयारच नाहीत. यांनी कायमच संपावर निघून जावे. सामान्य ग्राहक सुखात दुसरी व्यवस्था स्विकारतील. 

या संपाची दखल माध्यमांनी का नाही घेतली म्हणून रविशकुमार यांनी एक प्राईम टाईम केला. सामान्य लोकांचा पाठिंबा आणि सहानुभूती संपूनच गेली असेल तर अशी दखल माध्यमं तरी का घेतील? रविशकुमार यांनी भाजप विरोधी धोरणाचा भाग म्हणून कितीही ओरड केली तर यातून निष्पन्न काय होणार?

बॅक कर्मचारी संपाने एक चांगली गोष्ट केली आहे. हे संपावर गेले तरी सामान्य लोकांचे व्यवहार अडत नाहीत हेच दाखवून दिले आहे. आपल्याच पायावर यांनी कुर्‍हाड चालवून घेतली आहे. आता यांनी मोकळ्या मनाने खासगीकरण स्विकारावे नसता घरी जावून बसावे.

(,माझे जवळचे मित्र नातेवाईक यांनी राष्ट्रीय बँकेत अतिशय चांगले काम केलेले मला माहित आहे. पण म्हणून खासगीकरण रोका म्हणता येत नाही. प्रतिवाद करताना कृपया वैयक्तिक उद्हारणे देऊ नयेत)


    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Tuesday, March 16, 2021

उडण्याआधीच कटला एमआयएम चा पतंग



उरूस, 16 मार्च 2021 

ओवैसी यांचा एमआयएम पक्ष ज्या हैदराबाद येथील आहे तिथल्या भाषेत एक म्हण आहे, ‘बाहर से शेरवानी, अंदरसे परेशानी’. पाच राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकांत ओवैसी यांच्या पक्षाची अवस्था अशीच झाली आहे. पाच राज्यांत मिळून विधानसभेच्या 824 जागां आहेत. (प.बंगाल 294, तामिळनाडू 234, केरळ 140, असम 126, पुद्दुचेरी 30) यापैंकी तामिळनाडूंत केवळ 3 जागी एमआयएम ने उमेदवार घोषीत केले आहेत. बाकी कुठेच काही नाही. 

म्हणजे जो पक्ष 824 पैकी केवळ 3 जागी निवडणुक लढवत आहे त्याची चर्चा मात्र, ‘हातभर लाकुड दहा हात ढिलपी’ अशी दिसून येते. म्हणजेच याचा अर्थ केवळ आणि केवळ माध्यमांनी मिळून उभे केलेली ही हवा  आहे. राजकीय दृष्ट्या ओवैसी यांचा पक्ष कसलेच  आव्हान उभं करत नाही. 

बिहारच्या निवडणुकांनंतर असे चित्र उभं केल्या गेले होते की प.बंगाल मध्ये मुसलमानांची लोकसंख्या 30 % इतकी प्रचंड आहे. तेंव्हा याचा फार मोठा फायदा ओवैसींच्या पक्षाल होईल. तसे वक्तव्य वारंवार ओवैसी यांच्याकडूनही दिल्या गेले होते. असे केल्याने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला कसा फटका बसेल. त्याचा फायदा भाजप कसा घेईल. अशी चर्चा गेली 4 महिने सातत्याने केल्या गेली. माध्यमांत यावर घमासान म्हणता येईल अशा चर्चा रंगल्या. सामान्य दर्शकाला चक्क मुर्ख बनवल्या गेले. आणि जेंव्हा प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ आली तेंव्हा एमआयएम चे हाल झालेले दिसून आले.

ज्या प. बंगालची चर्चा सर्वात जास्त झाली तिथे फुर्फुरा शरीफचे पीरजादा आब्बास सिद्दीकी यांच्यावर ओवैसींची सर्व मदार होती. त्यांनी आपला वेगळा पक्षच स्थापन करून डावे आणि कॉंग्रेस सोबत आघाडी करणे पसंद केले. ओवैसींच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जमीर-उल-हसन यांना पक्षांतून काढून टाकण्यात आले किंवा त्यांच्या म्हणण्या नुसार तेच बाहेर पडले. परिणाम एकच झाला की एमआयएम ला एकाही जागी उमेदवार मिळाला नाही. 

केरळात आधीच मुस्लीम लीग सारखा पक्ष अस्तित्वात आहे. त्यासमोर ओवैसींचे काही चालणे शक्यच नव्हते. हीच गत असम मधेही आहे. बद्रुद्दीन अजमल यांचा पक्ष तिथे मुस्लीम राजकारण करतो आहे. त्याने कॉंग्रेस सोबत युती केली आहे. तिथेही ओवैसींना काहीच संधी नव्हती. तामिळनाडूत मुळातच मुसलमानांचे प्रमाण अतिशय कमी आहे. तिथले राजकारण अजूनही डिएमके आणि एडिएमके या पक्षां भोवती फिरत आहे. तिथे अजूनही तिसर्‍या पक्षाला शिरकाव मिळालेला नाही. त्यात ओवैसी सारख्यांचा तर निभाव लागणे शक्यच नाही. तरी तिथे त्यांनी शशिकला यांचे भाच्चे दिनाकरन यांच्या पक्षासोबत युती करून तीन जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुद्दुचेरी अतिशय लहान आहे. तिथेही यांना काही राजकीय संधी मिळण्याची शक्यता नव्हतीच.  

या पार्श्वभूमीवर ओवैसींच्या पक्षाच्या राजकीय बळाची चर्चा झाली पाहिजे. 2014 नंतर भाजपची जसजशी राजकीय वाढ होत गेली तस तशी ओवैसींची चर्चा वाढत गेली. भाजपला सांप्रदायिक पद्धतीने शिव्या देत आपली जागा तयार करण्याची सोय आपल्या तथाकथित सेक्युलर म्हणवून घेणार्‍या देशांतल्या राजकारणांत आहे. याचाच फायदा ओवैसी घेत आहेत. 

याचा एक  सर्वात ताजा पुरावा नुकताच समोर आला आहे. उत्तर प्रदेशांत योगी सरकारने एनकाउंटर मध्ये मारलेल्या गुन्हेगारांची यादी जाहिर केली. त्यात 37 % नावे मुसलमानांची आहेत. त्यावरून एक मोठा गदारोळ ओवैसींनी आत्तापासूनच सुरू केला आहे. वस्तुत: सध्या निवडणुका चालू कुठे आहेत? त्यातील आपली भूमिका काय आहे? यावर त्यांनी मुग गिळून गप्प बसणं पसंद केलंय. आणि उत्तर प्रदेशांत पुढच्या वर्षी होणार्‍या निवडणुकांसाठी आत्तापासूनच वातावरण  निर्मिती करण्यास सुरवात केली. याच ओवैसी यांनी 2017 ची उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुक लढवली होती. त्यात त्यांना संपूर्ण अपयश आले. 

ओवैसींना आत्तापर्यंत आपणच  मुसलमानांचे तारणहार आहोत असे वाटत होते. कॉंग्रेसने कसा मुसलमानांचा वापर करून घेतला हे ते वारंवार सांगायचे. पण 2014 नंतर हळू हळू भाजप विरोधी राजकारणाचे केंद्र कॉंग्रेस पासून सरकत सरकत इतर प्रदेशीक पक्षांकडे गेले आहे. त्यामुळे भाजपला टक्कर देवू पहाणारे जे इतर लहान प्रादेशीक पक्ष आहेत त्यांची शक्ती वाढताना दिसत आहे. आणि स्वाभाविकच ज्यांना भाजपला विरोध करायचा आहे ते सरळ सरळ या प्रादेशीक पक्षांकडे झुकत आहेत. आत्ताच्या निवडणुकांचा विचार केल्यास प.बंगाल मध्ये ममता, तामिळनाडूत स्टॅलिन आणि केरळात डाव्या आघाडीकडे मुसलमान भाजपला सशक्त राजकीय पर्याय म्हणून पाहू शकतात.

ओवैसींची हीच खरी तडफड आहे. उत्तर प्रदेशांत मायावती किंवा अखिलेश, बिहारमध्ये तेजस्वी, तेलंगणात चंद्रशेखर राव, दिल्लीत केजरीवाल असे कितीतरी पर्याय मुसलमांनां समोर आहेत. एक साधा विचार मुसलमान मतदार करतो आहे की आपण आपला म्हणून वेगळा गट करण्यापेक्षा मध्यवर्ती प्रवाहातील राजकीय पक्षांचा पर्याय निवडावा. 

मुळात मुसलमानांचे व्होट बँकेचे राजकारणच भाजपने उद्ध्वस्त केल्याने हळू हळू ओवैसींचे राजकारणही आटत जाणार आहे. भाजपेतर ज्या पक्षांना इथून पुढे मुसलमानांची मतं हवी आहेत त्यांना त्यांच्याकडे इतरांसाखेच एक सन्मानिय मतदार म्हणून पहावे लागेल. विशेष वेगळी वागणूक देत त्यांच्या समोर लांगूलचालन केले तर त्याचा फायदा भाजपलाच होतो याचा अंदाज आता इतर सर्व राजकीय पक्षांना आलेला आहे. त्याप्रमाणे या निवडणुकांत ममता, स्टालिन आणि डावी आघाडी यांचे वर्तन दिसून येते आहे. याचा एक त्रास ओवैसींना होतो आहे. 

ज्या राज्यांत निवडणुका चालू आहेत तिथे न जाता ओवैसी जेंव्हा उत्तर प्रदेशांत वेळ खर्च करत आहेत यावरून हेच दिसून येते. आंध्र प्रदेशांतील स्थानिक स्वराज्य संस्था  निवडणुकांत सभा घेत ते फिरत राहिले पण त्यांना फारसे काहीच हाताला लागले नाही. उलट ज्या पश्चिम बंगालात त्यांनीच मोठ्या आशा उंचावल्या होत्या तिथून ते पूर्ण गायब झाले. यातून त्यांची राजकीय दिवाळखोरी दिसून येते आहे. 

गुजरात मधील गोध्रा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांत आपले उमेदवार कसे निवडुन आले याचा ते डंका पिटत आहेत. अहमदाबाद मध्ये मुस्लीम बहुल भागात आपले सात नगरसेवक कसे निवडुन आले हे जोर जोरात सांगत आहेत. पण हे एकूण सर्व जागांत मिळून किती किरकोळ आहे हे ते लक्षात घेत नाहीत.

महाराष्ट्रात दलित राजकारणाने एकेकाळी नगर पालिकेत छोटे छोटे गट करून राजकीय वाटमारी करण्यात धन्यता मानली. त्याचा परिणाम आता दिसून येतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून दलित राजकारणाची जी काही सद्दी होती ती संपून गेली. हीच अवस्था काही दिवसांत देशांतल्या राजकारणांत ओवैसींच्या पक्षाची झालेली दिसून येईल.         

 

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575