दैनिक कृषीवल (अलिबाग)च्या उरुस सदरातील माझा लेख
पुस्तकांची ‘पायरसी’ रोखणार कशी?
मुंबईच्या फोर्ट भागात फुटपाथवरती नकली मराठी पुस्तके विक्रीस असल्याची बातमी मध्यंतरी प्रसिद्ध झाली. लागलीच या पायरसीवर मोठ्या प्रमाणात चर्चाही सुरू झाली. ज्या पुस्तकांची पायरसी झाली ती नावे बघितली तर ती कशी झाली हे लक्षात येते. ‘अग्निपंख’, ‘बटाट्याची चाळ’, ‘स्वामी’, ‘मृत्युंजय’, ‘ययाती’, ‘यश तुमच्या हातात’, ‘महानायक’ या पुस्तकांची पायरसी प्रामुख्याने झाल्याचे आढळून आले आहे. साधी गोष्ट आहे - एकीकडे वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचत नाहीत; म्हणून आपण तक्रार करतो आणि मग दुसरीकडे नकली पुस्तके फुटपाथवर आली म्हणून तक्रार करतो. एकीकडे पुस्तकांच्या किमती जास्त आहेत म्हणून बोललं जातं आणि दुसरीकडे हरमाल 50 रुपये किंवा नकली स्वस्त पुस्तकांची चलती झालेली आढळते. या सगळ्याच्या मुळाशी जाऊन समजून घेतल्याशिवाय या समस्येचं खरं कारण कळणार नाही.
अतिशय लोकप्रिय भरपूर खपलेले; पण ज्यांची पायरसी झाली नाही अशीही काही पुस्तके मराठीत आहेत. उदा. ‘श्यामची आई’, ‘माझे सत्याचे प्रयोग’ कशामुळे यांची पायरसी झाली नाही? गणित फारसं न येणारा शेंबडा शाळकरी पोरगाही सांगू शकेल कारण यांच्या किमती कमी आहेत म्हणून. या किमती कमी करून ठेवणं या प्रकाशकांना का परवडलं? त्याचं कारण म्हणजे जे पुस्तक जास्त चाललेलं आहे, त्याची मोठ्या प्रमाणात आवृत्ती काढण्यात आली. स्वाभाविकच त्याची किमतीवरती नियंत्रण मिळविता आलं. त्याच्या विक्रीसाठी दिलं जाणारं कमीशन हेही मर्यादित ठेवल्या गेलं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे या पुस्तकांच्या किमती कमी राहिल्या, परिणामी पायरसी करणंसुद्धा परवडेनासं झालं. आता प्रश्र्न असा आहे जी पुस्तके वाचकांनी आपल्या पसंतीने गौरविली, ज्यांची विक्री गेली 50 वर्षे सुखनैव चालू आहे. मग या प्रकाशकांनी या पुस्तकांच्या लोकआवृत्त्या कमी किमतीमध्ये बाजारात का नाही आणल्या? तसेच जी पुस्तके चांगली खपलेली आहेत. त्यांची आवृत्ती एकाच वेळी मोठी काढून मोठी गुंतवणूक करून किमती कमी ठेवण्याचं व्यावसायिक धाडस यांनी का नाही दाखवलं?
पायरसी हा तर गुन्हा आहेच, त्याचं कोणीच कुठल्याच पद्धतीने समर्थन करू शकत नाही आणि करणारही नाही; पण त्याच बरोबर प्रकाशकाची म्हणून जी जबाबदारी असते तिच्याकडे लक्ष द्यायचं की नाही? रोग झाल्यानंतर त्यावर उपचार करणे महागडी औषधे घेणे अवघड शस्त्रक्रिया करणे हे सगळं टाळण्यासाठी मुळातच रोग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लस टोचून घ्यावी. हे करणार की नाही? मराठी प्रकाशकांनी हे केलं नाही म्हणूनच पायरसी असो किंवा हरमाल पचास रुपये असो असले साथीचे आजार ग्रंथव्यवहारात उद्भवलेले दिसतात.
मृत्यूंजय ही मराठीतली अतिशय लोकप्रिय अशी शिवाजी सावंत यांची कादंबरी ही कादंबरी वर्षानुवर्षे बेस्टसेलर म्हणून प्रसिद्ध आहे. विक्रेत्यांना या पुस्तकाच्या विक्रीचा अनुभवही अतिशय चांगला आहे. गेल्या 50 वर्षांत या कादंबरीच्या स्वरूपात बदल करण्याचे प्रकाशकाने किती प्रयत्न केले? मुलांसाठी संक्षिप्त रंगीत आवृत्ती, मोठ्या आकारात डिलक्स आवृत्ती, सर्वसामान्य लोकांसाठी पेपरबॅक स्वरुपातील आवृत्ती असं काही करावं असं यांना का वाटलं नाही? फक्त एक साधी आणि एक पक्क्या बांधणीची अशा दोनच आवृत्त्या या पुस्तकाच्या प्रकाशकाने सिद्ध केल्या. पुस्तकाचं मुखपृष्ठही वर्षानुवर्षे बदलल्या गेलं नाही. या प्रवृत्तीला काय म्हणावे? स्वामी ही कादंबरी देशमुख आणि कंपनीने अतिशय आकर्षक आणि डौलदार स्वरुपात प्रकाशित केली होती. तिच्या खपासाठी विविध प्रयोग देशमुखांनी केले होते. त्याही पेक्षा जुनं जाऊन विचार केला तर लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्य या आपल्या पुस्तकासाठी प्रकाशनपूर्व नोंदणीची योजना राबविली होती. खपणारी पुस्तके तर सोडाच; पण न खपणारी गंभीर पुस्तकेही विविध योजनांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवून पैसा उभा करण्याचे प्रयोग शंभर वर्षांपूर्वी मराठीत होत होते. आगरकरांनी आपली पुस्तके लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा योजना राबविल्याची नोंद आहे. प्रश्न असा पडतो, आताच्या प्रकाशकांना हे का करावे वाटत नाही.
हिंदी आणि इंग्रजीमध्ये दोन प्रकारची पुस्तके बाजारात आलेली आढळतात. पक्क्या बांधणीची पुस्तके ज्यांना वाचनालय आवृत्ती (लायब्ररी एडिशन) म्हणतात. मोठमोठे वाचनालय, महाविद्यालयांतील ग्रंथालये आवर्जून अशा पक्क्या बांधणीचीच पुस्तके खरेदी करतात. ही पुस्तके सर्वसामान्य लोकांसाठी सहसा नसतातच. याच्या नेमकं उलट सर्वसामान्य लोकांसाठी म्हणून पेपरबॅक पुस्तके प्रकाशित होतात. ही पुस्तके साध्या बांधणीची असतात. कागद कमी वजनाचा व हलका वापरला जातो आणि या पुस्तकांवर सहसा कुठलीही सूट मिळत नाही. अशा व्यवस्थेमध्ये पायरसी करायला जागाच नसते. कारण, मूळ प्रकाशकानेच बाजाराचा विचार करून आवृत्ती सिद्ध केलेली असते. याच धर्तीवर जर मराठी प्रकाशकांनी विचार केला, तर पायरसी होईल कशी?
पायरसी ही एक वृत्ती आहे. ती होत राहणार यात काही शंका नाही; पण तिला आळा घालणे, पायबंद करणे आणि तिचे प्रमाण कमी करणे हे मात्र आपल्या पूर्णपणे हातात आहे. मराठी प्रकाशकांची अडचण ही आहे, मराठी ललित पुस्तकांची बाजारपेठ रुंदावण्यासाठी कुठलाही फारसा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसत नाही. मग स्वाभाविकच या बाजारपेठेला एखाद्या डबक्याचे स्वरूप येते. डबक्यामध्ये किडे वाढावेत, अळ्या वाढाव्यात त्या पद्धतीने पायरसी असो, वाचनालयांची भ्रष्ट खरेदी असो, हरमाल 50 रुपये असो अशा अपप्रवृत्ती वाढतात. जर पुस्तकांची बाजारपेठ विस्तारली, हा प्रवाह खळाळता राहिला तर त्यात स्वाभाविकच अपप्रवृत्तींना फारसा वाव राहत नाही.
प्रसिद्ध इंग्रजी लेखक पाउलो कोएलो याचं उदाहरण मोठं बोलकं आहे. 4 वर्षांपूर्वी टाईम्स ऑफ इंडियाने त्यावर एक मोठं फिचर छापलं होतं. अल्केमिस्ट या गाजलेल्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणावर रशियामध्ये होत असलेली त्याला आढळून आली. तसेच हे पुस्तक नेटवरून वाईट पद्धतीने डाऊनलोड करून घेण्याचे प्रमाणही वाढल्याचे त्याच्या प्रकाशकाने सांगितले. परिणामी पुस्तकाची विक्री रशियामध्ये खालावली. पाऊलो कोएलो याने गांभीर्याने विचार करून आपलं संपूर्ण पुस्तक अधिकृतपणे नेटवर उपलब्ध करून दिलं. हे पुस्तक अधिकृतरीत्या डाऊनलोड करून देण्याची सोयही देण्यात आली. याचा परिणाम असा झाला की, लोकांना पुस्तकाची उत्सुकता निर्माण झाली, समांतररीत्या पुस्तकाला मागणी वाढत गेली. परिणामी पुस्तकाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. आजही बर्याच इंग्रजी लेखकांनी आपली पुस्तके नेटवरती मोफत उपलब्ध करून दिली आहेत. तसेच पुस्तकांची स्वस्त आवृत्ती जाणीवपूर्वक बाजारात उपलब्ध करून दिली आहे. याचाच परिणाम म्हणजे त्या ठिकाणी पायरसी कमी झालेली आढळली.
खरे तर दुसरा एक मुद्दा गंभीर आहे. आणि तो म्हणजे पायरसी आढळल्यानंतर त्याला आपण कुठल्या प्रकारची शिक्षा देतो. ज्या युरोप आणि अमेरिकेबद्दल उठता बसता लाथा झोडणे हे डावे विचारवंत करतात त्यांनी हे लक्षात घ्यावे या देशांनी भांडवलशाही व्यवस्थेबरोबरच कायद्याची भक्कम चौकटही त्यांच्याकडे उभारली आहे. आपल्याकडे प्रश्र्न असा पडतो, गुन्हा झाल्यानंतर आपण शिक्षेबाबत फारसे गंभीर नसतो. परिणामी आपल्याकडे पायरसीच्या गुन्ह्यात पकडल्या गेलेले काही दिवसांनी सहजरीत्या परत पायरसी करताना आढळतात. हे परदेशात घडत नाही. कारण पायरसी केलेला माणूस इतकी जबर शिक्षा भोगतो की, तो जवळजवळ आयुष्यातून तरी उठतो किंवा त्या व्यवसायातून तरी बाहेर फेकल्या जातो.
म्हणजे आता मराठी पुस्तकांच्या पायरसी बाबत दोन टप्प्यांत उपाययोजना करावी लागेल. सगळ्यांत पहिली गोष्ट म्हणजे प्रकाशकांनी लोकप्रिय पुस्तकांच्या कमी किमतीच्या पॉकेटबुक आवृत्त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणे (राजहंस प्रकाशनाने असे प्रयोग करून काही प्रमाणात यश मिळवलेही आहे.). म्हणजे पायरसी करण्याची भावनाच निर्माण होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी पायरसी आढळली आहे, त्या सर्व व्यक्तींवर तातडीने खटले दाखल करून त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा व्हायला हवी. या दोन्हीही अपेक्षा व्यक्त करत असतानाच त्यातला फोलपणाही मला कळतो आहे. संकुचित बाजारपेठेमध्ये स्वस्त लोकआवृत्ती मोठ्या प्रमाणातली शक्य होत नाही आणि बलात्कारासारखे, भ्रष्टाचारासारखे गंभीर गुन्हे करूनही लोक आरामात निसटू शकतात त्या जागी पायरसीसारख्या ‘किरकोळ’ (?) गुन्ह्यांना कोण भीक घालणार? आशा व्यक्त करणे आपले काम आहे.
श्रीकांत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.