Monday, December 28, 2015

मनुस्मृती दहन दिन : 25 डिसेंबर

उरूस, पुण्यनगरी, 27 डिसेंबर 2015

डिसेंबर महिना विविध घटनांनी भरलेला आहे. 6 डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण, याच दिवशी बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्या गेली, 24 डिसेंबर साने गुरूजींची जयंती, अभिनेता देवानंद याची पुण्यतिथी याच महिन्यात आहे (3 डिसेंबर) आणि शोमॅन समजला गेलेला राज कपुरचा जन्मही (14 डिसेंबर) याच महिन्यातला आहे. शरद पवार आणि गोपिनाथ मुंडे यांचा वाढदिवसही याच महिन्यात (12 डिसेंबर) आणि शेतकरी नेते शरद जोशी यांचा स्मृती दिनही (12 डिसेंबर) याच महिन्यात. 

या शिवाय अजून एक वेगळी घटना याच महिन्यात घडली. 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले. या घटनेला आता 88 वर्षे झाली. बाबासाहेब हे भारतीय परंपरांचे दर्शनांचे मोठे अभ्यासक. त्यांना एखादा ग्रंथ जाळणे म्हणजे काय हे पूर्णपणे माहित होते. पुढे चालून दुर्गाबाई भागवत यांनी ग्रंथ जाळण्याबाबत जी टीका बाबासाहेबांवर केली त्याची जाणीव त्यांना निश्‍चितच असणार. पण  ‘लाथों के भूत बातों से नही मानते’ या म्हणी प्रमाणे एक सणसणीत कृती करावीच लागते. महात्मा फुल्यांनी धार्मिक ग्रंथांची खल्लड ग्रंथ म्हणून निर्भत्सना पूर्वीच केली होती. मग बाबासाहेबांना ग्रंथ जाळण्याचे पुढचे पाऊल उचलणे भागच होते. ते त्यांनी उचलले. बाबासाहेबांच्या या कृतीवर नरहर कुरूंदकरांनी केलेले भाष्य अतिशय मार्मिक आहे.  ‘हा ग्रंथ दिसेल तिथे जाळून टाकण्याची बाबासाहेबांची भूमिका नाही. ग्रंथ जाळून नष्ट करण्याचा रानटीपणा बाबासाहेबांना मान्य नव्हता. त्यांचे खरे भांडण पुस्तकाशी नसून त्यात व्यक्त झालेल्या समाजरचनेशी होते. ती समाजरचना जतन करू पाहणार्‍या मनोवृत्तीशी होते. म्हणून ते प्रतीकात्मक दहन होते. एक धक्का देवून सवर्ण समाजाला खडबडून जागे करण्याचा हेतू त्यामागे होता.’

ही मनुस्मृती नेमकी आहे तरी काय? त्यातील बहुतांश भाग टाकावू आहे यात काही वाद आता उरला नाही. 
1950 नंतर घटना लागू झाली आणि देशभर निदान कागदोपत्री समानता प्रस्थापित झाली. तेंव्हा बाबासाहेबांची कृती निश्‍चितच महत्त्वाची होती. पण सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करणार्‍यांना मात्र या ग्रंथांला बाजूला ठेवून चालत नाही. आ.ह. साळूंके व नरहर कुरूंदकर यांच्यासारख्या विद्वानांनी यावर अतिशय प्रतिकूल लिहीले आहे. स्वामी वरदानंद भारती यांनी ‘श्री मनुस्मृती सार्थ सभाष्य’ हा ग्रंथ संपादित करून अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामूळे त्यात काय आहे हे आता सहज उपलब्ध आहे. 
महात्मा फुल्यांनी जेंव्हा अभ्यास करण्याच्या निमित्ताने हा ग्रंथ हाती घेतला तेंव्हा त्यांच्यासमोर इंग्रजी भाषांतर उपलब्ध होते. 1813 मध्ये या ग्रंथांची संस्कृत संहिता पुस्तक रूपात उपलब्ध झाली. मराठी भाषांतर उपलब्ध होण्यास 1877 साल उजाडावे लागले. जनार्दन महादेव गुर्जर यांनी केलेले हे भाषांतर निर्णयसागर प्रेसने प्रकाशीत केले. 

सध्या उपलब्ध असलेल्या संहितेप्रमाणे यात 2684 श्‍लोक आहेत. यातील फक्त 1 ते 58 श्लोक हे मनुने सांगितले आहेत. बाकी सर्व श्लोक हे भृगू ने सांगितले आहेत. म्हणजे एकप्रकारे ही भृगू संहिताच जास्त आहे. यातील किमान दहा टक्के श्लोक आजही विचार करावे असे आहेत. उदगीर येथील डॉ. गुडसूरकर यांनी अभ्यास करून यातील 268 ते 300 श्लोक शोधून काढले आहेत की ज्यांच्यावर आज कुठलाही वाद नाही. आजच्या काळाशी ते सुसंगत आहेत. निखळ वैचारिक भूमिकेतून या श्लोकांचा अभ्यास झाला पाहिजे असे त्यांचे अग्रहाचे प्रतिपादन आहे.

अरोग्य व आहार विषयक काही श्लोक मनुस्मृतीत आहेत. उष्टे अन्न खावू नये, अतिभोजन हे अनारोग्यकारक, आयुष्य कमी करणारे व दुसर्‍याचा घास हिरावणारे असते म्हणून ते टाळावे. संध्याकाळी जेवू नये व झोपू नये. पचण्यास जड असलेले पदार्थ खाऊ नये. जेवण केल्यावर लगेच स्नान करू नये. उलट स्नान केल्यावर मगच जेवण करावे. जव, गहू व दूध यापासून बनविलेले पदार्थ बर्‍याच दिवसांपवूर्वी केलेले असले तरी खाण्यायोग्य असतात. उदा. दुधातील दशमी वगैरे. आजच्या मांसाहाराविषयी जे समज गैरसमज पसरले किंवा पसरविले आहेत त्याबाबत एक अतिशय धक्कादायक धाडसी विधान मनुस्मृतीत आहे. या जगातील प्रत्येक सजीव वस्तू ही खाण्यायोग्य आहे. (श्लोक 5-28). आरोग्य विषयक लिहीताना ज्या गावात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल त्या गावात राहू नये. रात्री झाडाखाली झोपू नये. कामवासना उत्कट झाली तरी रजस्वला स्त्रीशी संभोग करू नये. 

ही सगळी विधाने आजही लागू पडतात. त्यातील विज्ञान आपण आज योग्यरितीने समजून घेतले आहे. तेंव्हा या भागाचा विचार आजही आपण करू शकतो. 

विद्या ही ब्राह्मणांनी आपल्या जवळ लपवून ठेवली आणि ती इतरांना दिली नाही असा एक आरोप केला जातो. पण मनुस्मृतीत मात्र विद्येसंबंधी वेगळे विचार आहे. विद्या ही आपल्या वरिष्ठांकडूनच नव्हे तर कनिष्ठा जवळ असली तरी शिकून घ्यावी. (इथे वरिष्ठ कनिष्ठ हे जातीप्रमाणे नसून सिनिअर ज्युनिअर या अर्थाने आहेत) गुरूने शिष्याला जे काही शिकवायचे ते ताडन न करता मधुर वाणीने शिकवाने. आज मुलांना मारू नये म्हणून जो नियम मानस शास्त्राच्या अभ्यासकांनी करायला लावला आहे त्याचा दाखला मनुस्मृतीत आढळतो. मूल्य घेवून शिकवू नये असा एक नियम मनुस्मृतीत सांगितला आहे. त्याचा आजच्या काळात इतकाच अर्थ काढता येतो की शिक्षणाचा बाजार मांडता कामा नये. 

स्त्रीयांवर मनुस्मृतीने अन्याय केला हे खरेच आहे. पण याच मनुस्मृतीत मातृगौरव सांगताना दहा उपाध्यायांपेक्षा आचार्य श्रेष्ठ, शंभर आचार्यांहून पिता, पित्यापेक्षा सहस्त्रपट माता गौरवार्ह आहे असं सांगितले आहे. आई म्हणजे सर्व भार सोसणारी पृथ्वीच होय असेही वर्णन यात आलेले आहे. 

थोरल्या भावाची पत्नी ही धाकट्या भावास गुरुमातेप्रमाणे व धाकट्या भावाची पत्नी थोरल्या भावास सुनेप्रमाणे आहे. परस्त्रीशी बोलताना भगिनी सुभगे असे संबोधून बोलावे. असेही यात आलेले आहे.
लग्नाच्या बाबत कन्येसाठी कुठलेही शुल्क घेवू नये असे सांगितले आहे. म्हणजे कुठल्याही अर्थाने हुंडा पद्धत त्याज्य. घरातील वडिलधार्‍यांनी मुलीचे लग्न योग्य वयात लावून दिले नाही तर तिने स्वत: पती निवडावा. 
आपल्या समाजाचा सगळ्यात छोटा घटक हा एक कुटूंब आहे. तेंव्हा गृहस्थाश्रम आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा मानला गेला आहे. मनुस्मृतीने गृहास्थाश्रमास सर्व आश्रमांचा ‘प्राणवायु’ मानले आहे.

सार्वजनिक वाहतुकीचेही नियम मनुस्मृतीत आले आहेत. वृद्ध, रोगी, स्त्री, ओझे वाहणारा, विद्वान व राजा यांना आधी मार्ग उपलब्ध करून द्यावा. आजही हे आपण पाळणे संयुक्तीक आहे. प्रदुषणावर मनुस्मृतीत जे सांगितले आहे ते म्हणजे मल-मूत्र, रक्त, थुंकी, घाण व विष हे जलाशयांत टाकू नये. प्रत्येक गावाच्या भोवती किमान 400 हात रूंदीची मोकळी जागा (हरित पट्टा) गुरांच्या चरण्यासाठी राखून ठेवावी. नगराभोवती हाच पट्टा 2000 हात रूंदीचा असावा. राजमार्गावर घाण, केरकचरा टाकणे दंडनीय आहे. 

सार्वजनिक सुरक्षे बाबत सांगताना संध्याकाळी ग्रामांतर करू नये, गाव किंवा घर यांची तटबंदी ओलांडून उडी मारून प्रवेश करू नये, ज्या जलाशायाचे ज्ञान नाही त्यात उतरून स्नान करू नये, भल्या पहाटे अंधारात प्रवासाला निघू नये. हे सगळे साधारणत: दोन हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक स्थितीवर लिहीले आहे. 
विद्या, शिल्प, शेती, गोरक्षण, मजुरी, भिक्षा व दान यातून अतिरिक्त धन संचय होवू शकत नाही हे मनुने सांगितले आहे. म्हणजे यातून उपजिविका होवू शकते, पोटापुरते मिळू शकते पण काही शिल्लक राहू शकत नाही असे मनुस्मृतीचे म्हणणे आहे. 

भेसळीच्या बाबतही काही कडक दंड यात सुचविले आहेत. अंकुरित न होणारी बीजे विकणे तसेच बियाणांची भेसळ या गुन्ह्यासाठी मृत्यूदंड सुचवला आहे. अभिचार कर्म (भानामती, चेटूक, मूठ मारणे इत्यादी वशीकरणाचे प्रयोग करणारे) तसेच जादूटोणा करारे यांना 200 पट दंड सुचविलेला आहे. दाभाळकरांची हत्या झालेल्या या महाराष्ट्रात या बद्दल अजून काय सांगायचे?वैद्यक शास्त्राचे कसलेही ज्ञान नसताना चिकित्सक बनुन जे औषणे वगैरे देतात त्यांनाही जबर दंड सुचविला आहे. बोगस डॉक्टरांच्या कितीतरी बातम्या आपण वाचत असतो.

असे किमान 300 श्लोक आज विचार करावे असे आहेत. डॉ. रंगनाथ गुडसूरकर यांनी आपल्या ‘निवडक मनुस्मृती’ या पुस्तकात यावर चर्चा घडवून आणली हे महत्त्वाचे काम केले आहे. 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन. या निमित्ताने या ग्रंथाला शिव्यादेण्यापेक्षा त्याच्या काळसुसंगत पैलूवर चर्चा होणे हे जास्त महत्त्वाचे.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, December 20, 2015

एकनाथी भागवत ग्रंथाचा ४४२ वा वाढदिवस !!


उरूस, दै. पुण्यनगरी, २० डिसेंबर २०१५

वेदांतविचारात उपनिषदे, ब्रह्मसुत्रे व भगवद्गीता यांना प्रस्थान त्रयी म्हणून संबोधण्यात येते त्याच प्रमाणे वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामगाथा या तीन ग्रंथांना प्रस्थानत्रयी म्हणतात. वारकरी संप्रदायात या तीन ग्रंथांचे पारायण करणे आवश्यक मानले गेले आहे. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यांच्यावर विवेचनात्मक असंख्य ग्रंथ आहेत. या तुलनेत एकनाथ महाराजांचे ‘भावार्थ एकनाथी भागवत’ मात्र कमी चर्चिल्या/वाचल्या जातं. दिवाळी नंतर येणार्‍या पौर्णिमेच्या (त्रिपुरारी पौर्णिमा) दिवशी या ग्रंथाची पुर्तता झाली. म्हणजे या 25 नोव्हेंबरला या ग्रंथाला बरोब्बर 442 वर्षे पूर्ण झाली. हा ग्रंथ एकनाथांनी काशीत बसून पूर्ण केला. तेथील विद्वानांनी या ग्रंथाचा सखोल अभ्यास करून आपला अनुकूल अभिप्राय दिला. या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. 

मराठी माणसांनी अभिमान बाळगावा अशी एक खास गोष्ट या ग्रंथाबाबत आहे. संस्कृत श्रीमद्भागवताचा इतर भाषांमध्ये अनुवाद गद्य स्वरूपात झालेला नव्हता. कन्नड तामिळ सारख्या भाषांमध्ये भागवताच्या दहाव्या स्कंधावर जो की कृष्णाच्या लीलांवर आधारीत आहे काव्य आढळतात. खुद्द संस्कृतमध्येही दहाव्या स्कंधावर काव्यरचना आहे. पण तत्त्वज्ञानात्मक असलेल्या एकादश स्कंधावर लिहील्या गेलं नव्हतं. संत एकनाथ हे या संस्कृत भागवताच्या एकादश स्कंधावर टीका लिहीणारे संस्कृतेत्तर पहिले विद्वान ठरतात. म्हणून त्यांचे महत्त्व आहे.

मराठी भाषेच्या संदर्भात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे नाथांनी गायलेली मराठीची थोरवी. संस्कृतमधील ज्ञान आपण मराठीत आणले हे जाणीवपूर्वक केलेले काम आहे. संस्कृतचे महत्त्व ज्यांना असाधारण वाटते अशा विद्वनांनी हा प्रादेशीक भाषेतील ग्रंथ आहे म्हणून याची उपेक्षा करू नये हे एकनाथांनी आग्रहाने मांडले आहे.  

धनवंतु रत्नपारखी पुरा । तेणे धुळीमाजी देखिल्या हिरा । 
गांधी बांधोनि आणी घरा । पारखी खरा निजज्ञाने॥ 
तैसे ज्ञाते विद्वज्जन । ग्रंथु मराठी देखोन । 
उपेक्षा न करितां करावा यत्न । पारखोनि चिद्रत्न साधावया ॥ 
क्षुद्रदृष्टी पाहणे पाहतां । बोलू लागेल व्यासाचे ग्रंथा । 
मा हे तरी मराठी कविता । सांडूनि कुटिलता पाहावी ॥

याहीपुढे जात नाथांनी मराठी भाषेचा गौरव आपल्या ओव्यांमधून एकनाथी भागवताच्या सुरवातीलाच केला आहे. संस्कृत देवांची भाषा आहे मग मराठी भाषा काय चोरापासून झाली असा रोकडा सवाल नाथांनी चारशे वर्षांपूर्वी केला होता. 

संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृती काय उणीवी । 
नवी जुनी म्हणावी । कैसेनि केवी सुवर्णसुमने ॥ 
कपिलेचे म्हणावे क्षीर । मा इतरांचे काय ते नीर । 
वर्णस्वादे एकचि मधुर । दिसे साचार सारिखे ॥ 
जे पाविजे संस्कृत अर्थे । तेचि लाभे प्राकृते । 
तरी न मानावया येथे । विषमचि ते कायी ॥ 
दुबळी आणि समर्थ । दोहीस राये घातले हात । 
तरी दोघीसिही तेथ । सहजे होत समसाम्य ॥ 
देशभाषावैभवे । प्रपंचपदार्थी पालटली नांवे । 
परी रामकृष्णादिनामां नव्हे । भाषावैभवे पालटू ॥ 
संस्कृत वाणी देवे केली । प्राकृत तरी चोरापासोनि जाली । 
असोतु या अभिमानभुली । वृथा बोली काय काज ॥

ज्ञानेश्वर नामदेव संतांनी मराठीत रसाळ रचनेची एक वाट नाथांच्या समोर घालून दिलेलीच होती. नाथांची या पायवाटेचा हमरस्ता करण्याचा यत्न केला. आज इंग्रजी सारख्या भाषेशी तुलना करताना मराठीत विविध विषयांतील ज्ञानाची कमतरता जाणवते. नाथांनी त्या काळाला अनुसरून तेंव्हाचे ज्ञान मराठीत आणले आणि हे करताना सार्थ अभिमानही बाळगला. आजही मातृभाषेतून रचना करणार्‍यांनी ही नाथांची भावना उरी बाळगायला हवी. 

एकनाथी भागवताचा बोलबाला तत्त्वज्ञान ग्रंथ म्हणून झालेला असला तरी त्यातील काव्यही अप्रतिम आहे. प्रलयकाळी शंभर वर्षे जी घनघोर अतिवृष्टी झाली तीचे वर्णन म्हणजे पावसाच्या रौद्र रूपाचा एक अप्रतिम नमूना आहे. आजच्या कुठल्याही आधुनिक कवितेमध्ये असे वर्णन आढळत नाही.

स्वर्ग आणि पाताळतळा ।
कवळूनि उठल्या अग्निज्वाळा ।
तंव प्रळयकर्त्या मेघमाळा ।
क्षोभल्या त्या काळा अतिदुर्धरा ॥
म्हणाल तेथ मोठमोठे ।
वर्षो लागले थेंबुटे ।
तैसे नव्हे गा कडकडाटे ।
एकी धार सुटे अनिवार ॥
जैसी की मदगजाची सोंड ।
तैशा धारा अतिप्रचंड । 
शत वर्षेवरी अखंड ।
पर्जन्य वितंड पैं वर्षे ॥
विजु निजतेजे नभ जाळी ।
कडकडाटे दे आरोळी ।
काळाची बैसे दातखिळी ।
ऐसा प्रलयकाळी मेघ खवळे ॥

या सगळ्या रचनेत कुठे काय देव धर्म यांचा संदर्भ येतो? स्वर्ग पाताळ या पारंपरिक संकल्पना येतात पण त्या धार्मिक अंगाने येत नाहीत. संतांच्या कित्येक रचना या विशुद्ध भावकविता आहेत हेच आपण विसरून चाललो आहोत. ज्या संतांची रचना आहे त्याची जात आपण आधी पाहतो आणि मग तीला चांगली म्हणायचे की नाही याचा निर्णय घेतो. 

मैत्रीवरच्या ओव्याही या एकनाथी भागवतात आहेत. फ्रेंडशिप डे साजरा करणार्‍यांनी नाथांच्या 400 वर्षांपूर्वीच्या या ओव्या जरूर वाचाव्यात. 

जे विषयवियोगे न विटे । नाना विकल्पी न तुटे । 
आलिया परम संकटे । मैत्री नेटपाटे सदा ग्राह्य ॥ 
या नांव गा मित्रभावो। प्राण गेलिया न तुटे पहा हो । 
देखतां कल्पांतकाळाघावो । निजमित्रसमुदावो एकवटे की ॥ 

(जी मैत्री विषयाच्या वियोगाने विटत नाही, नाना प्रकारच्या संशयांनी तुटत नाही तीच सर्वकाळ मनी बाळगावी. प्राण गेला तरी न तुटणारा हा मित्रभाव याच्यावर घाव पडताच सर्व मित्र एकत्र येवून  हल्ला परतवून लावतात.)

धार्मिक वर्गात मोडल्या जाणार्‍या साहित्याचे एक दुर्दैव असे की त्याला सरसकट लाल बासनात बांधून गुंडाळून ठेवल्या जाते. भक्तांना चिकित्सा नको असते आणि विरोधकांना तर स्पर्शही करायचा नसतो. मग अशा ग्रंथांमधले शब्दांचे काव्याचे सौंदर्य कसे समजणार? 

एकनाथी भागवतावर भाष्य करणारे फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. जे उपलब्ध आहेत त्यात ह.भ.प.वै. शंकरमहाराज खंदारकर यांची टीका प्रमाण मानली जाते. वारकरी संप्रदायात खंदारकर महाराजांच्या भाष्याला मोठी किंमत आहेत. खंदारकर महाराजांच्या देहावसनानंतर 1991 मध्ये ‘भावार्थ एकनाथी भागवताची’ पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. एकनाथ पैठणचे-मराठवाड्याचे. खंदारकर महाराजांचे घराणेही मराठवाड्यातीलच. नांदेड जिल्ह्यातील कंधार या गावी साधुमहाराज म्हणून संत इ.स. 1708-1812 या काळात होवून गेले. त्यांचे वंशज म्हणजे शंकर महाराज खंदारकर. पंढरपुरात ते महान निरुपणकार म्हणून प्रसिद्धी पावले. धुंडामहाराज देगलुरकर व मामासाहेब दांडेकर यांच्या बरोबरीने शंकर महाराजांच्या शब्दाला वारकरी फडांमध्ये महत्त्व प्राप्त झाले.

एकनाथांच्या भागवत रचनेवरील भाष्यग्रंथ लिहून खंदारकर महाराजांनी मोठं काम करून ठेवलं आहे. आपण त्याचे निदान वाचन तरी केले पाहिजे. 

एकनाथांचा गौरव करताना संत तुकारामांनी फार सोप्या पण मार्मिक भाषेत अभंग रचना केली आहे. 

ब्राह्मणाचा पोर खेळिया एक भला ।
तेणे जन खेळकर केला रे ।
जनार्दन बसवंत करुनिया तेणे ।
वैष्णवांचा मेळ मिळविला रे ।
एकचि घाई खेळता खेळता ।
आपणचि बसवंत झाला रे ॥

लोकांना सोप्या भाषेत अध्यात्माच्या आवरणातून व्यवहाराचे ज्ञान नाथांनी दिले. मातृभाषेचा गौरव सामान्यांच्या मनात ठसवला. 442 वर्षांचा त्यांचा ग्रंथ त्यामुळे आजही महत्त्वाचा ठरतो.  
       
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Monday, December 14, 2015

शरद जोशी : शेतकऱ्याच्या सनातन दु:खाला वाचा फोडणारा नेता






दै. पुण्य नागरी, उरूस, 13 डिसेंबर 2015

शेतकऱ्याचे  दु:ख नेमकं जाणून त्याला वाचा फोडणारा नेता म्हणजे शरद जोशी. शेतीच्या हिशोबाचे चुकलेले गणित शरद जोशी यांनीच पहिल्यांदा उलगडून दाखवले. आपले दु:ख जाणले म्हणून अडाणी शेतकऱ्यांनी  या नेत्याला आपल्या काळजात जागा करून दिली.  शेतकरी म्हणजे बटाट्याचे पोते. तो संघटीत होणं शक्य नाही असं मार्क्सनं म्हटलं होतं. पण शरद जोशी यांनी ही किमया करून दाखवली. इंद्रजीत भालेराव यांनी शरद जोशी यांच्यावर लिहीलेल्या कवितेत असं म्हटलं आहे

लोंढा गढूळ पाण्याचा
तुवा बांध बांधलास
तडा तडकला त्याचा
तुवा सांध सांधलासे

रानभर पांगलेले
पाणी गोळा झाले कसे?
चुकलेल्या हिशोबाचे
आणे सोळा झाले कसे?

12 डिसेंबर ला या योद्धा शेतकऱ्याने  वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला.
शरद जोशी यांचा जन्म 3 सप्टेंबर 1935 रोजी झाला. सातारा हे त्यांचे गाव. त्यांचे वडिल अनंतराव जोशी पोस्टात  नोकरीला होते. खात्याच्या परिक्षा देत सिनियर  सुपरिन्टेण्डण्टच्या पदावरून निवृत्त झाले. त्यांची आई सौ. इंदिराबाई पंढरपुरच्या बडवे घराण्यातली. वडिलांच्या बदल्यांमुळे शालेय शिक्षणासाठी बेळगाव, नाशिक करत त्यांनी मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालयातून एस.एस.सी. ची परिक्षा 1951 मध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पदवी व पदव्यूतत्तर अभ्यासक्रम त्यांनी मुंबईच्या सिडनेहॅम महाविद्यालयातून पूर्ण केला. पुढे लोकसेवा आयोगाची परिक्षा देऊन इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये रूजू झाले.

1968 ला सित्झर्लंडची राजधानी बर्न येथे जागतिक पोस्टल युनियनमध्ये संख्याशास्त्र विभागात ते दाखल झाले. त्यांचा हुद्दा होता चीफ, इन्फर्मेशन सर्व्हिस, इंटरनॅशनल ब्युरो. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असताना हाती येत चाललेल्या तिसऱ्या  देशातील आकडेवारींनी शरद जोशी अस्वस्थ होत गेले. तिसऱ्या देशातील दारिद्र्याचा  प्रश्‍न कोरडवाहू शेतीत अडकला असल्याची त्यांची स्पष्ट धारणा झाली. या विषयावर अभ्यास करण्यासाठी भारतात परतायचे त्यांनी निश्‍चित केले. 19%6 मध्ये ते पत्नी लिला, दोन मुली श्रेया व गौरी यांच्या सोबत भारतात परतले.

पुणे जिल्ह्यात चाकण जवळ अंबेठाण या गावी 28 एकर कोरडवाहू शेती त्यांनी खरेदी करून आपल्या अभ्यासाला सुरवात केली. आपल्या अनुभवांतून आणि अभ्यासातून त्यांची खात्री पटत गेली की शेती कायमची तोट्यात रहावी अशीच धोरणे शासनाकडून आखली जातात. शेतकऱ्याचा  उत्पादन खर्चही भरून निघू नये इतके कमी भाव जाणीवपूर्वकच  दिले जातात. शेतकरी आपला माल बाजारात घेऊन जातो तेंव्हा वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, मार्केट कमिटीचा चार्ज, मुख्यमंत्री फंडाला दिलेले पैसे इतका खर्च वजा केला तर परत शेतकऱ्यालाच  खिशातून पैसे द्यायची वेळ येते. हे जे उलटी पट्टी’चे गणित आहे ते शरद जोशींच्या लक्षात आले.  शेतमालाच्या अपुऱ्या  किमती हेच शेतकऱ्याच्या दारिद्य्राचे मूळ आहे. आणि शेतकऱ्याचे दारिद्य्र हेच देशाचे दारिद्य्र आहे. या मांडणीतूनच पुढे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव मिळालाच पाहिजे’ हा एक कलमी कार्यक्रम पुढे आला.

16 फेब्रुवारी 1980 रोजी सगळ्यात पहिल्यांदा चाकण परिसरात कांद्यासाठी आंदोलन झाले आणि या चळवळीची सुरवात झाली. कांद्याचा चिघळलेला प्रश्न, देशाच्या कांद्यांच्या एकूण बाजारपेठेत चाकणचे स्थान आणि आंदोलनाच्या दृष्टीने मुंबई आग्रा रोडची चाकणची जागा या सगळ्यांचा विचार करून योजनापूर्वक कांद्यासाठी रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले.

या आंदोलनाचा संदेश सगळ्या भारतभर गेला. यानंतर शरद जोशींनी लगेच हाती घेतलं ते निपाणी (कर्नाटक) चे तंबाखू आंदोलन. त्यानंतर नाशिकचे उसाचे आंदोलन आणि मग विदर्भातील कापसाचे आंदोलन. ही सगळी आंदोलने शांततापूर्ण अहिंसक मार्गाने करण्यात आली होती. तरीही शासनाने शस्त्र वापरून आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतकऱ्याचे नाहक बळी गेले. अगदी सुरवातीपासूनच शरद जोशी यांनी शेतकरी समाज हा मुलत: स्वतंत्रतावादी आहे’ हे ओळखून संपूर्ण शेतकरी आंदोलनही त्या विचाराभोवतीच उभे केले.

शेतकऱ्याला त्याच्या मालाच्या उत्पादन खर्चा इतका भाव दिला जात नाही कारण कारखान्यांसाठी कच्चा माल स्वस्त हवा असे सरकारचे धोरणच आहे हे त्यांनी मांडायला सुरवात केली. तेंव्हा कुणाचाच यावर विश्वास बसत नव्हता. सरकार आपल्याच शेतकऱ्याचे दुष्मन कसे असणार? शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण ही शेतकरी संघटनेची घोषणा प्रचंड लोकप्रिय बनली.

शरद जोशी यांच्या लक्षात असे आले की एका पीकापुरता शेतीचा प्रश्‍न मर्यादीत नाही. पीक कुठलंही असो शेतमालाचे शोषण ठरलेलेच आहे. तेंव्हा एका एका पिकांपुरते आंदोलन मर्यादीत न ठेवता त्याची व्याप्ती मोठी करत समग्र शेतीप्रश्नालाच भिडण्याची रणनीती त्यांनी आखली. कांदा, तंबाखू, उस, कापूस  अशी सुरवातीच्या काळातील आंदोलनं यशस्वी झाल्यावर परभणीच्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात समग्र शेती प्रश्नासाठी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव मिळालाच पाहिजे’ ही एककलमी मागणी पुढे आली.

शेतकऱ्यामध्ये कोरडवाहू, बागायती असा भेद किंवा प्रदेशाप्रमाणे केला जाणारा भेद किंवा पिकांप्रमाणे केला जाणारा भेद हे सगळं विसरायला लावून सर्व शेतकऱ्यांना  एका झेंड्याखाली आणण्याचे महत्त्वाचे काम शरद जोशींनी केले. भावनिक प्रश्नांवर अस्मितेच्या मुद्द्यांवर आंदोलन उभारणं सोपे असते पण शरद जोशींनी शुद्ध आर्थिक पायावर चळवळीची उभारणी केली जे विशेष.

सटाणा येथे जानेवारी 1982 मध्ये संघटनेचे पहिले अधिवेशन भरले. त्यानंतर परभणी, मग धुळे, अशी अधिवेशनं भरत गेली (शेतकरी संघटनेची आता पर्यंत 12 अधिवेशने झाली आहेत). सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरले ते 1986 मध्ये चांदवड येथे भरलेले शेतकरी महिला आघाडीचे अधिवेशन. या आधिवेशनात उपस्थित राहिलेल्या लाखो शेतकरी आयाबहिणींची दखल अगदी जागतिक पातळीवर घेण्यात आली. शरद जोशींनी महिलांच्या प्रश्नांची अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करून जागतिक महिला चळवळीला वेगळा आयाम दिला. पुरूषांच्या जागा स्त्रियांनी मिळवायच्या अशीच फक्त मांडणी स्त्रीवादी चळवळीने केली होती. पण सरकारवर अवलंबून न राहता शेतकरी चळवळीच्या मूळ ध्येयधोरणानूसार स्वतंत्रतावादी वृत्तीनं महिल प्रश्नाची सोडवणूक करता येईल असे शरद जोशींनी मांडले.

महिला प्रश्नावर लक्ष्मीमुक्तीचा शरद जोशींनी राबविलेला कार्यक्रम क्रांतीकारी ठरला. आपल्या पत्नीच्या नावाने आपल्या संपत्तीचा एक वाटा करून द्यायचा हा कार्यक्रम म्हणजे लक्ष्मीमुक्ती. या उपक्रमात विदर्भ मराठवाड्यातील हजारो शेतकर्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने जमिनी करून दिल्या.

फक्त महाराष्ट्रातील शेतीपुरता विचार त्यांनी कधीच केला नाही. दिल्लीच्या बोटक्लब मैदानावर 1989 मध्ये एक प्रचंड शेतकरी मेळावा देशभरच्या शेतकरी संघटनांनी भरवून दाखवला.  पण उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांचे जाट नेते महेंद्रसिंग टिकैत यांनी माथेफिरूपणे शरद जोशींना मंचावर धक्काबुक्की केली आणि हा मेळावा उधळला गेला. शरद जोशींना हृदयविकाराचा मोठा झटका आला व त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करावे लागले. यावेळेपर्यंत देशभरच्या शेतकऱ्यांमध्ये शरद जोशींच्या विचारांचा संदेश स्वच्छपणे पोंचला होता.

महाराष्ट्राबाहेर गुजरात, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील शेतकर्यांसाठी काम करणार्या विविध संंघटनांची एक समन्वय समिती देश पातळीवर त्यांनी स्थापन केली. या द्वारे शरद जोशींचे नेतृत्व तोपर्यंत देशपातळीवर स्थिरावले होते.

व्हि.पी.सिंग पंतप्रधान असतांना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय शरद जोशींनी लावून धरला. तत्त्वश: शेतकऱ्यावरील कर्ज हे सरकारचे पाप आहे. त्याच्या मालाला कमी किंमत मिळत असल्याने सरकारच शेतकऱ्याचे देणे लागते ही बाब अर्थशास्त्रीय भाषेत शरद जोशींनी मांडून दाखवली. त्यामुळे कर्जमाफी न म्हणता कर्जमुक्ती म्हणा असा त्यांचा आग्रह होता. मार्च 1990 मध्ये व्हि.पी. सिंग पंतप्रधान असताना शरद जोशींच्या अध्यक्षतेखाली स्थायी कृषी सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल राष्ट्रीय कृषिनीती या नावाने शरद जोशी यांनी सादर केला. त्यातील तरतुदी बघितल्यास त्यांच्या दूरदृष्टीची आजही जाणीव होते.  पुढे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कृषी कार्यबलाच्या अध्यक्षपदावरही शरद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. तो अहवाल शासनाला सदर झाला.

1990 च्या विधानसभा निवडणुका जनता दलाच्या चिन्हावर शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी लढवल्या होत्या. त्यापैकी पाच जण विधानसभेवर आमदार म्हणून निवडूनही आले. याच पाच सहकार्यांसह आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यार 1994 मध्ये शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना केली. स्वत: शरद जोशी यांनी 1995 मध्ये हिंगणघाट (वर्धा), बिलोली (नांदेड) या दोन मतदारसंघातून विधानसभेची तर 1996 मध्ये नांदेड मतदारसंघातून लोकसभेची निवडणुक लढवली. पण त्यांना अपयश स्वीकारावे लागले.

1990 मध्ये डंकेल प्रस्तावाला जोरदार समर्थन देण्याची त्यांची भूमिका डाव्या/समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना पटली नाही. शेतकर्याचं भलं खुल्या व्यवस्थेत आहे असं आग्रही प्रतिपादन शरद जोशी मांडत गेले. कुठलाच पक्ष खुलेपणाने जागतिकीकरणाचा स्वीकार करण्यास तयार नसण्याच्या काळात शरद जोशींनी केलेले समर्थन हे दूरदृष्टीचेच होते हे आज जास्त पटत आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात कृषी कार्यबलाचे अध्यक्ष म्हणून शरद जोशींना केंद्रिय मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता. या काळात स्वतंत्र भारत पक्ष सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होता.2004-2010 या काळात  शरद जोशी राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत होते. अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलतांना त्यांनी मांडलेली मते लक्षणीय म्हणून कामकाजात नोंदल्या गेली आहेत.

शरद जोशींनी खुल्या आर्थिक धोरणाबाबत मांडलेला विचार हा फक्त शेतकऱ्यापुरता मर्यादित न राहता सर्व भारतीयांच्या हिताचा विचार ठरला.  शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचे स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य यांची आग्रही मागणी त्यांनी केली. पण हे करत असताना बाजरपेठेत ग्राहक हा राजा असतो तेंव्हा ग्राहकाचे हीत साधल्या जाणे महत्त्वाचे असं सांगायला ते कचरले नाहीत. जर भारतीय ग्राहकाला परदेशातून अन्नधान्य स्वस्त मिळत असेल तर ते खरेदी करणं त्याचा हक्क आहे. आमच्या शेतकऱ्याचा महागडा माल ग्राहकाच्या गळ्यात आम्ही मारणार नाही हा विचार शरद जोशींनी मांडला तेंव्हा भले भले अवाक झाले. शरद जोशींनी कृत्रिम रित्या परदेशातून महागडा शेतमाल (डाळ, कच्ची साखर, तांदूळ, गहू) सुट देवून स्वस्त विकण्याला कडाडून विरोध केला. भारत हा शेतीप्रधान देश आहे. तेंव्हा भारताला शेतमालाच्या निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकिय चलन मिळू शकते यावर आपल्या अर्थतज्ज्ञांचा विश्वासच बसत नव्हता. बी.टी. कॉटनच्या वापरानंतर दहा वर्षात भारत जगातील एक नंबरचा निर्यातदार देश बनला. यातूनच शरद जोशींच्या द्रष्टेपणाचा पुरावा मिळतो.

खुल्या व्यवस्थेचा स्विकार केल्यानंतर ही व्यवस्था शेती क्षेत्रात मात्र पूर्णपणे येऊ दिली गेली नाही याबद्दल शरद जोशींनी आणि शेतकरी संघटनेने सातत्याने आवाज उठवला. आंदोलनं केली.संपूर्णपणे आर्थिक पायावर उभे राहिलेले आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेले स्वतंत्र भारतातील हे एकमेव आंदोलन. भीक नको हवे घामाचे दाम’ या घोषणेतच सर्व काही आले.

इंडिया विरूद्ध भारत ही त्यांची मांडणी अतिशय गाजली. पोराला पॉकेटमनी म्हणून सहज 100 रू. दिला जातो तो इंडिया आणि चार आणे हरवले तर अंधारात कितीतरी वेळ सापडत बसतो तो भारत अशी त्यांची व्याख्या होती. ढोबळमानाने शहरी भागाने ग्रामीण भागाला सापत्न वागणूक दिली. इंडियाने भारताचे शोषण केले. अशी शरद जोशींची मांडणी होती.

शेतकरी संघटनेच्या विचारांच्या प्रसारासाठी शेतकरी संघटक’ या पाक्षिकाची सुरूवात 6 एप्रिल 1983 रोजी करण्यात आली.  शरद जोशी यांनी त्यांचे जवळपास सर्वच लिखाण या पाक्षिकातून केले आहे.

10 नोव्हेंबर 2010 रोजी शेगांव येथे शरद जोशी यांच्या वयाला पंच्चाहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कुठलेली स्वागत, हार तुरे ते स्वीकारत नाहीत म्हणून ज्येष्ठ वयोवृद्ध शेतकऱ्याच्या हस्ते त्यांना एक मानपत्र देऊन त्यांचा गौरव सामान्य शेतकऱ्यांनी  केला. या मेळाव्याला लाखो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून या शेतकरी नेत्यापोटी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

आपल्या विचारांची मांडणी पंधरा पुस्तकांमधून अतिशय सोप्या भाषेत शरद जोशींनी करून ठेवली आहे. सामान्य शेतकऱ्यांना  हा विचार कळावा या जाणीवेनेच त्यांची भाषा साधी सोपी अर्थवाही राहिली आहे.

असे हे वादळ वयाच्या 81 व्या वर्षी शांत झाले. लाखो शेतकऱ्यांना आपल्या घरातील कुणी वडिलधारे माणूस गेल्याच्या भावनेने आज पोरकेपण आले आहे. या शेतकरी नेत्याला विनम्र श्रद्धांजली !!

( शरद जोशी लिखीत पुस्तके : 1. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती 2. प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, 3. शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख 4. चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्‍न 5. स्वातंत्र्य का नासले 6. खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने  ७ . अंगारमळा 8. जग बदलणारी पुस्तके 9. अन्वयार्थ-भाग 1, 10. अन्वयार्थ-भाग 2, 11. माझ्या शेतकरी भावांनो माय बहिणींनो 12. अर्थ तो सांगतो पुन्हा 13. बळीचे राज्य येणार आहे 14. पोशिद्यांची लोकशाही 15. भारता’साठी. इंग्रजी पुस्तके 1. Down to earth  2.Answering before god)

-श्रीकांत अनंत उमरीकर  9422878575

Sunday, December 6, 2015

सुरेगाव कापुस आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मरण !





(सुरेगाव आंदोलनातील हुतात्मे निवृत्ती कर्‍हाळे, परसरामजी  कऱ्हाळे, ज्ञानदेव टोंपे  यांचे पुतळे)

उरूस, पुण्यनगरी, 6 डिसेंबर 2015


भारतावर परकियांचे राज्य होते तेंव्हा त्यांच्या विरूद्ध लढून शहिद झालेल्यांना हुतात्मा संबोधले जाते. पण आपल्याच सरकारविरूद्ध आंदोलन करावे लागले, त्यात आपल्याच सरकारने गोळीबार केला, आपलेच भाऊबंद शहीद झाले तर त्यांना काय संबोधायचे?

परक्यांशी लढताना येणारं
पवित्र मरण 
आमच्या वाट्याला येणार नाही
आपल्याच लोकांनी केलेल्या वारांनी
ते बाटल्या शिवाय राहणार नाही
पण आई 
तूझं काळीज मात्र भगतसिंगाच्या आईचं असू दे !

आजच्या तरूणांची ही व्यथा आहे. 

10 डिसेंबर 1986 रोजी कापूस प्रश्नी परभणी-हिंगोली रस्त्यावरील सुरेगाव इथे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर महाराष्ट्र पोलिसांनी गोळीबार केला. त्यात ज्ञानेश्वर टोणपे, निवृत्ती कर्‍हाळे व परसरामजी कर्‍हाळे हे तीन शेतकरी शहीद झाले. हा असंतोष का उठला होता? अचानक झालं का हे सगळं?   

फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात बरोबर 29 वर्षांपूर्वी कापूस प्रश्नावर शेतकर्‍यांचा भडका उठला. गेल्या वर्षी मिळाले होते तितकेही दर देण्यास महाराष्ट्र सरकार तयार झाले नाही. शंकरराव चव्हाण तेंव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षात असलेल्या शरद पवार यांनी आपला समाजवादी कॉंग्रेसपक्ष  नुकताच पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये विलीन केला होता. ही घटना याच कापसाच्या परिसरात औरंगाबादेत घडली. ज्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नाची नाडी कळते असे मानले जाते त्यांनाही शेतकर्‍यांच्या या असंतोषाचा सुगावा लागला नव्हता. 

महात्मा गांधींच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबरला अकोल्यात शेतकरी संघटनेने कापूस परिषद घेतली. नोव्हेंबर मध्ये चांदवड येथे प्रचंड मोठे महिला अधिवेशन पार पडले. 23 नोव्हेंबरला अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, हिंगोली या कापसाच्या पट्ट्यात दिवसभराचे चक्काजाम आंदोलन शेतकर्‍यांनी केले. लाखो शेतकरी त्यात सहभागी झाले. कापसाच्या प्रश्नावर शेतकर्‍यांचा प्रचंड असंतोष उफाळून येत होता. 7 डिसेंबर पासून बेमुदत रस्ता रोको करण्याचे शेतकर्‍यांनी ठरविले. म्हणजे 2 ऑक्टोबर पासून 7 डिसेंबर अशी तब्बल दोन महिन्याची मुदत सरकारला मिळाली होती. या काळात शेतकर्‍यांच्या मागण्या संदर्भात सरकाने काय पाऊल उचलले?

सरकारने एकच तातडीने गोष्ट केली. ती म्हणजे शेतकर्‍यांची जे नेते होते, या भागातील कार्यकर्ते होते त्यांची धरपकड करून त्यांना तुरूंगात टाकले. तेंव्हा शेतकरी संघटनेचे परभणी जिल्ह्याचे प्रमुख असलेले ऍड. अनंत उमरीकर यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे की, ‘मी पोलिसांना सांगत होतो. तूमचा निर्णय चुकीचा आहे. सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबून टाकलंत तर रस्त्यावर जमा होणार्‍या हजारो लाखो कार्यकर्त्यांवर नियंत्रण कोण ठेवणार? त्यांना मार्गदर्शन कोण करणार?  पण पोलिसांनी काहीही ऐकलं नाही. आम्हा सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना जिंतूर रोडच्या मुख्य तुरूंगात परभणी येथे अटक करण्यात आली.’

7 डिसेंबर पासून आंदोलनास सुरवात झाली. शेकडो शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरणं पसंद केलं. शेतकर्‍यांना पकडून तुरूंगात टाकण्याची मोहिम सरकारने चालविली. पण तुरूंग भरून गेला. आता इतक्या लोकांना ठेवायचं कुठे? 9 डिसेंबरला पकडून आणलेल्या शेकडो शेतकर्‍यांना मैदानावर उघड्यावर डांबून ठेवण्यात आलं. जेवणाची सोय करणं शक्यच नव्हतं. खाण्याची पाकिटं दिली. शेवटी या सगळ्या शेतकर्‍यांना बाया बापड्यांना मध्यरात्री अचानक सोडून देण्यात आलं. इतक्या रात्री जायचं कुठं? आम्हाला निदान रात्रभर तरी काही आडोसा द्या रहायला. आम्ही सकाळी निघून जातो असं गरीब बाया बापड्या म्हणत असताना या गोरगरीब जनतेवर पोलिसांनी अमानुष लाठीमार सुरू केला. किती आश्चर्य पहा. पकडून आणलं सरकारनंच. त्यांची सोय लावता येत नाही हे पाहून त्यांना हाकलून लावलं परत सरकारनंच. शिवाय त्यांच्यावर लाठीहल्ला केला सरकारनंच. पोलिसांच्या लाठीहल्ल्याने जायबंदी झालेले हे बहादूर शेतकरी भाऊ बहिणी बिलकूल न घाबरता आपआपल्या गावी कसेबसे परतले आणि त्यांनी इतरांना आंदोलन अजूनच तीव्र करण्याची प्रेरणा दिली. 

आता तर परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली. 10 डिसेंबरला सुरेगाव पाटीला मुख्य रस्त्यावर  साधारण सकाळी 9 च्या सुमारास शेतकरी गोळा व्हायला सुरवात झाली होती. आजूबाजूच्या गावांतून फार मोठ्या प्रमाणात शेतकरी गोळा होत आहेत ही खबर पोलिसांना लागली. त्यांनी आंदोलन आवरतं घ्या म्हणून जमा झालेल्या शेतकर्‍यांशी हुज्जत घालायला सुरवात केली. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अंजली पातूरकर व शेतकरी कार्यकर्ते दत्तराव नाईक यांच्या पत्नी लीलाताई या शेतकरी मायबहिणींसमोर भाषण करत होत्या. पोलिसांनी जमावर अंदाधुंद लाठीहल्ला सुरू केला. जमाव प्रक्ष्ाुब्ध झाला. लोकांची संख्या वाढत चालली हे पाहून गोळीबार सुरू केला. याच गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. गोळीबाराचे समर्थन करावे म्हणून दोन बस पोलिसांनीच जाळून टाकल्या. बाजूला दत्तराव नाईक यांची पिठाची गिरणीही जाळली. 

पुढे चौकशीत सरकाने असे सांगितले की जमाव हिंस्र झाला होता. त्यांनी 12 बोअरच्या बंदूकीतून पोलिसांवर गोळीबार केला. जाळपोळ केली. पोलिसांवर दगडफेक केली. म्हणून आम्हाला गोळीबार करावा लागला. शिवाय दोन पोलिसही या लोकांनी मारून टाकले. 

सरकारचे पितळ चौकशी अहवालात पुर्ण उघडे पडले. आजूबाजूला सगळा काळ्या मातीचा प्रदेश. तिथे फेकायला दगडं कुठून मिळणार? ज्यांची गिरणी जाळली ते दत्तराव नाईक स्वत: आंदोलनात आधीच तुरूंगात जावून बसलेले. त्यांची पत्नी धीरपणे भाषण करते आहे. त्यांची गिरणी जमाव जाळणार कसा? लोकांनी गोळीबार केला तर त्या बंदूका कुठे गेल्या? जे पोलिस मेले असा दावा सरकाने केला होता ते दोन पोलिस गावकर्‍यांनी आपल्या घरात दडवून ठेवले होते. कारण पोलिसच लोकांच्या प्रचंड संतापाला घाबरून गेले होते. हे दोन पोलिस जर बाहेर दिसले असते तर त्यांना लोकांनी ठेचून मारले असते अशी त्यांनाच भिती होती.

इतकेच काय पण हुतात्मा परसरामजी कर्‍हाळे यांचा मुलगा पाणीपुरवठा विभागात नौकरी करत होता. त्याच्या अंगावर खाकी कपडे होते. कामावरून परतत  असताना त्याला वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली. तो वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास गेला असता पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. त्याच्या अंगातील कपड्यांमुळे जमाव त्याच्यावरही धावून जाईल अशी भिती खुद्द पोलिसांनाच वाटत होती. 

सरकारने पोलिसांना हताशी धरून केलेले हे पाप त्यांच्या इतके अंगाशी आले की पुढे 6 दिवस या परिसरात एकाही पोलिसाची सरकारी प्रतिनिधीची फिरायची हिंम्मत होईना. लोक प्रचंड चिडलेले. सगळी वाहतूक रस्त्यावर झाडं टाकून ठप्प करून ठाकलेली. तुरूंगात असलेल्या सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना बाहेर सोडणं शासनाला भाग पडलं. पत्रकारांना सोबत घेवून हे कार्यकर्ते या परिसरात लोकांना भेटी देत फिरले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी स्वत: येवून हुतात्म्यांच्या घरी जावून सांत्वन केलं. परत आंदोलन झालं तर आम्ही स्वत: आणि आमची पोरंही रस्त्यावर येवूत असं जेंव्हा या हुतात्म्यांच्या वीर पत्नींनी सांगितलं तेंव्हा तर उपस्थितीतांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते.  

आज बरोबर 29 वर्षांनीहि शेतकऱ्याची भयानक परिस्थिती आहे. या हुतात्म्यांची स्मारकं लोकांनी वर्गणी गोळा करून उभारली आहेत. दरवर्षी या हुुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 10 डिसेंबरला लोक जमा होतात. कापूस आंदोलनातील या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन !
        
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575


Sunday, November 29, 2015

75 वर्षांची तरूण नर्तिका हेलन

उरूस, पुण्यनगरी, 29 नोव्हेंबर 2015

हिंदी चित्रपट सृष्टीत तीन व्यक्तीमत्व कायम तरूण म्हणून ओळखली जातात. एक सुरैय्या. जिनं कधीच चरित्र भूमिका केल्या नाहीत. नायिका म्हणून काळ संपला की निवृत्त झाली. तिचं वृद्धावस्थेतील एकही छायाचित्र उपलब्ध नाही. दुसरा देव आनंद. त्यानं उशिरापर्यंत चित्रपटांत कामं केली. तो म्हातारा झाला तरी तरूणांचीच कामं करायचा. लोक आणि तोही स्वत:ला शेवटपर्यंत (वय वर्षे केवळ 88) तरूणच समजत राहिला. तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे हेलन जेरॅक रिचर्डसन उर्फ हेलन. 21 नोव्हेंबर 1938 ही हेलनची जन्मतारिख. म्हणजे तीची पंच्याहत्तरी उलटून गेली. आणि आजही तीची प्रतिमा नायकाला/खलनायकाला घायाळ करणारी तरूण कमनीय बांध्याची मादक नृत्यांगना अशीच आहे.

पडद्यावरील आपल्या प्रतिमेच्या अगदी उलट तीची हृदयद्रावक कौटूंबिक कहाणी आहे. ब्रह्मदेशात (आजचे म्यानमार) अँग्लो इंडियन वडिल व ब्रह्मदेशी आई यांच्या पोटी जन्मलेल्या हेलनला लहान वयात अतिशय वाईट परिस्थीतीला तोंड द्यावे लागले. दुसर्‍या महायुद्धात तिचे वडिल मारले गेले. जपानने म्यानमारवर ताबा मिळवला तेंव्हा हे कुटूंब ब्रिटीश सैन्याच्या सहाय्याने आसामला पळून आले. सोबतच्या कित्येक नातेवाईक आप्तस्वकियांचा या काळात मृत्यू झाला. खुद्द हेलनची आई या वेळी गरोदर होती. तिचाही गर्भपात झाला. आसाममधून हे कुटूंब कामाच्या शोधात मुंबईला पोचले. आई नर्स म्हणून काम करायची. त्या उत्पन्नात घर चालवणे मुश्किल होते. मग शेवटी हेलनने काम शोधायला सुरवात केली. तेंव्हाची गाजलेली आयटम गर्ल कक़्कु (बरसात, आवारा, मि.अँड मिसेस 55, चलती का नाम गाडी मधील तिची गाणी खुप गाजली) जी की स्वत: अँग्लो इंडियनच होती तिने हेलनची अडचण जाणली. तिच्या अंगातील लवचिकता ओळखली आणि तिला आपल्या सोबत चित्रपटात कामं मिळवून द्यायला सुरवात केली. 

‘यहुदी’ (1958) चित्रटात या दोघींचे एक सुंदर गाणे आहे. शंकर जयकिशनचे संगीत असलेले ‘बेचैन दिल खोयी सी नजर’ हे गोड गाणे लता आणि गीता यांच्या आवाजात आहे. या गाण्यावर कक्कु आणि हेलनचे सुंदर नृत्य आहे. कुठेही अश्‍लिल हातवारे नाहीत, भारतीय शैलीत शोभतील असे कपडे असे हे गाणे तेंव्हा बर्‍यापैकी गाजले. हे गाणे म्हणजे आयटम गर्लचा चार्ज कक्कु कडून हेलन कडे आला याचे प्रतिकच आहे. कारण पुढे कक्कुची कारकीर्द खरेच उताराला लागली.

हेलन खरी गाजली ती हावरा ब्रीज (1958) मधील ओ.पी.नय्यरच्या गाण्याने. गीता दत्तच्या आवाजातील ‘मेरा नाम चिंन चुन चु’ या हीट गाण्याने हेलनचे नशिबच पालटले. अक्षरश: पुढची 20 वर्षे तिने आपल्या या प्रतिमेवर हिंदी चित्रपट सृष्टीत राज्य केलं. 1983 ला निवृत्ती जाहिर करेपर्यंत तिची हीच प्रतिमा होती. 
हेलन आणि जॉनी वॉकर यांच्या शिवाय त्या काळात हिंदी चित्रपट हीटच होत नाहीत अशी एक गंमतीदार समजूत होती. आणि खरंच बर्‍याच हिट चित्रपटात हे दोघं आहेतच. दिल अपना और प्रीत पराई (1960) हा मीना कुमारी राजकुमार यांचा गाजलेला चित्रपट. यात आशा भोसलेच्या आवाजात ‘इतनी बडी मेहफील और इक दिल किसको दू’ म्हणत हेलन सुंदर नाचली आहे. दिलीप कुमार वैजयंतीमाला यांच्या गाजलेल्या ‘गंगा जमुना’ (1961) मध्ये तिने ‘तोरा मन बडा पापी सांवरीया’ म्हणत छानसा मुजरा सादर केला आहे. संगीतकार कोणीही असो हेलनसाठी एक वेगळे गाणे तो द्यायचाच. चायना टाउन (1962) हा शम्मी कपुर-शकिलाचा  ‘बार बार देखो’ गाण्यासाठी गाजलेला सिनेमा. यातही हेलनचे गाणे ‘यम्मा यम्मा यम्मा, तू परवाना मै शम्मा’ आहेच. 
तिच्या गाजलेल्या गाण्याची यादी जरी बघितली की लक्षात येते नायक नायिका संगीतकार या सगळ्या सोबत हेलन हेही एक स्वतंत्र प्रकरण आहे. ‘ऊई मां ऊई मां ये क्या हो गया- पारसमणी (1963)’, ‘ओ हसिना जुल्फोवाली जाने जहा- तिसरी मंझिल (1966)’, ‘आ जाने जा -इंतेकाम (1969)’, ‘पिया तू अब तो आ जा-कारवां (1971)’, ‘आओ ना गले लग जावो ना-मेरे जीवनसाथी (1972)’, ‘मेहबुबा मेहबुबा- शोले (1975)’, ‘मुंगडा मुंगडा-इन्कार (1978)’, ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना-डॉन (1978)’1958 ते 1978 अशा 20 वर्षात सतत तिचे चित्रपट येत होते. त्यातील गाणी गाजत होती.

हेलन एक चांगली अभिनेत्री होती हे मात्र काहीसं दूर्लक्षिलं गेलं. डोळा चकणा झाला म्हणून ललिता पवार ला कायम खलनायिकी भूमिका कराव्या लागल्या, निरूपमा रॉयला आईच्या भूमिका कराव्या लागल्या, जॉनी वॉकरला विनोदी भूमिका कराव्या लागल्या तसेच हेलनचे झाले. खरं तर आपली नृत्याची ताकद तिनं वेगळ्या पद्धतीनंही दाखवून दिली आहे. पंजाबी असो, मुजरा असो की शास्त्रीय हे नृत्यं ती चांगले करू शकायची. पण तिची प्रतिमा झाली ती कॅबरे डान्सर म्हणूनच. 

1961 मध्ये जॉय मुखर्जी सोबत नायिका म्हणून तिचा ‘हम हिंदूस्थानी’ नावाचा चित्रपट आला होता. ‘रात बिखरी हुई’ हे मुकेशच्या आवाजातील वेगळे छान गाणे यात आहे. या गाण्यात गंमत म्हणजे नायक जॉय मुखर्जीच कमी कपड्यांत (टॉपलेस) आणि हेलन मात्र संपूर्ण कपड्यात आहे. यातीलच दुसरे गाणे आशा रफीच्या आवाजात ‘नीली नीली घटा’ हेलन जॉय मुखर्जीवर आहे. उषा खन्नाचे संगीत असलेल्या या चित्रपटांतील ‘छोडो कल की बाते’ हे सुनील दत्तवरचे गाणे तर आजही लोकप्रिय आहे. याच वर्षी ‘संपूर्ण रामायण’ नावाच्या चित्रपटात शुर्पणखाची भूमिका हेलने केली होती. या चित्रपटात एक अतिशय गोड गाणे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘बार बार बगिया मे कोयल ना बोले’ या भरत व्यासांच्या शब्दांवर शुद्ध शास्त्रीय नृत्य करून हेलनने सर्वांनाच चकित केले आहे. तिच्या या गुणाचा वापर पुढे केला गेला नाही. 

1964 मध्ये वो कौन थी मध्ये मदन मोहनने ‘छोडकर तेरे प्यार का दामन’ हे लता-महेंद्र कपुरच्या आवाजातील गाणे दिले आहे. हे गाणे हेलन व मनोजकुमारवर आहे. यात ती केवळ एक आयटम गर्ल म्हणून आलेली नाही.
1964 मध्ये ‘चा चा चा’ नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटाची हेलन नायिका होती. हैदराबादच्या इक्बाल कुरेशी याने या चित्रपटाला संगीत दिलं होतं. हैदराबादमुळे असेल कदाचित त्याला मक्दुम मोईनोद्दीन या तिथल्या शायरच्या प्रसिद्ध कवितेचा मोह पडला. त्याने आवर्जून या चित्रपटात मक्दूमची ‘एक चमेली की मंडुवे तले, दो बदन प्यार की आग मे जल गये’ही कविता घेतली.  सलिम अनारकलीच्या वेशात चंद्रशेखर व हेलनवर हे गाणे चित्रीत झाले आहे. 

नाचाव्यतिरिक्त आपल्यातल्या अभिनेत्रीची फार दखल घेतली गेली नाही याची खंत तिने कधीच जाणवू दिल नाही. महेश भटच्या ‘लहू के दो रंग’(1979) चित्रपटात तिने केलेल्या कामाची दखल घेत तिला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. 

वैयक्तिक आयुष्यात उठलेली वादळं तिनं पडद्यावर येवू दिली नाहीत. चित्रपट दिग्दर्शक पी.एन.आरोरा सोबत ती बराच काळ राहिली. नंतर  प्रसिद्ध लेखक सलिम जावेद जोडीतील सलिम खान यांच्या सोबत 1981 मध्ये वयाच्या 44 व्यावर्षी लग्न केले. सलमान खानची सावत्र आई बनलेल्या हेलनने अर्पिता नावाची एक मुलगी दत्तक घेतली. या दत्तक मुलीचे नुकतेच मोठ्या थाटात लग्न झाले. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटांत तिने सलमानच्या आईची भूमिका मोठ्या रूबाबात सादर केली.  

तसं तर तिनं 1983 पासूनच चित्रपट संन्यास घेतला. शांतपणे सलिम खान सोबत आपलं आयुष्य व्यतित करण्यास सुरवात केली. आपल्या गत आयुष्याबद्दल कुठलाही कडवटपणा तिनं कधी व्यक्त केला नाही. हे तिचं मोठेपणच म्हणावे लागेल. 1964 मध्ये ‘गुमनाम’ चित्रपटात लताच्या आवाजात शंकर जयकिशनच्या गाण्यावर हेलन नाचली आहे. हसरत जयपुरीचे बोल तिनं स्वत:च्या आयुष्याबाबत स्वत:ला समजावून सांगितले असतील. 

इस दुनिया मे जिना है तो सुन लो मेरी बात
गम छोड के मनावो रंगरेली

पंच्च्याहत्तरीला ‘अमृत महोत्सव’ म्हणतात. कुसुमाग्रजांनी गमतीनं असं म्हटलं आहे, ‘पंच्च्याहत्तर वर्षांची सुट देवूनही जी माणसं मृत होत नाहीत त्यांची गणती अ‘मृता’त करण्याशिवाय काय गत्यंतर आहे...’ हेलनला तिची पंच्च्याहत्तरी होवून गेल्यावर उशीरा का होईना या शुभेच्छा !   
      

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575


      

Sunday, November 22, 2015

शेत जमिनीची बाजारपेठ खुली करा!!


उरूस, पुण्यनगरी, 22 नोव्हेंबर 2015

शेतजमीनीचा औद्योगिककारणांसाठी वापर करायचा तर सरकारची परवानगी घ्यावी लागायची. ही अट काढून टाकण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.  शेतकरी या निर्णयावर खुष आहे. शेतकर्‍याची जमिन कुणालाही हवी असेल तर त्यात अडचण काय? असा एक प्रश्‍न शहरातील लोकांना पडतो. त्यांना मुळात हा विषय कसा गुंतागुंतीचा आहे हेच माहित नसते. आपला एखादा प्लॉट आहे. तो चांगला भाव आला की विकून टाकायचा किंवा बापजाद्याचे जूने भले मोठे घर आहे. ते एखाद्या बिल्डरला विकून आपण त्यात एखादा फ्लॅट मिळवायचा इतकीच त्यांची विचार करण्याची क्षमता. सरकारी नौकरी करताना जास्तीचा मिळालेला पैसा कुठे ठेवायचा? तर त्याचे प्लॉट घ्या शेती घ्या असे सगळे सोपे आहे असाच समज कित्येकांचा आहे. 

प्रत्यक्षात शेत जमिन विकत घेणे आणि विकणे यात सरकार नावाचा भलामोठा अडथळा आहे. घटनेत जमिन कायद्यांच्या संदर्भात दुरूस्ती करण्यात आली. घटनेचे 9 वे परिशिष्ट असे सांगते की कुठलीही शेतजमिन ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला राहिल. त्याला काय मोबदला मिळेल हे पूर्णपणे सरकारवर अवलंबून आहे. त्यावर न्यायालयात दाद मागता येणार नाही. पुढे 1964 मध्ये त्यात छोटीशी दूरूस्ती करून हा मोबदला बाजारभावाप्रमाणे असेल अशी दुरूस्ती करण्यात आली. बाजारभाव म्हणजे काय हे प्रत्यक्ष न सांगता अतिशय गोलमाल अशी ही दुरूस्ती होती.

एका माणसाकडे किती जमिन असावी असा कायदा करण्यात आला. हा करताना संपत्तीबाबत समानता असावी असे धोरण होते. मग साधा प्रश्न आहे ज्या वेळी 18 एकर बागायती किंवा 54 एकर जिरायती जमिनीची अट घालण्यात आली त्याच वेळी मुंबईत एका एका घराची किंमतही त्यापेक्षा जास्त होती. त्यावर हा सिलींगचा कायदा का नाही बसवला? समजा एका माणसाकडे 18 एकर पेक्षा जास्त बागायती जमिन असेल तर तो श्रीमंत, शोषण करणारा, जमिनदार असे असेल तर याच किमतीचा ज्याचा प्लॉट आहे, घर आहे तो गरीब कसा? शासनाने अशी अट का नाही घातली की 1 कोटी रूपये पुढे ज्याच्या घराची किंमत असेल त्या घराचा काही भाग सरकार ताब्यात घेईल? 

मुंबईत 80 च्या दशकात एक अतिशय लोकप्रिय घोषणा कामगार चळवळीत होती. ‘श्रमेल त्याची गिरणी आणि कसेल त्याची धरणी’ पुढे गिरणी कामगारांचा संप झाला. दत्ता सामंत त्यांचे नेते. ते 1984 च्या लोकसभेत इंदिरा गांधींच्या हत्येची सहानुभतीची लाट असतानाही कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवाराच्या विरूद्ध निवडून आले खासदार झाले. त्यांच्या संपांनी गिरण्याच बंद पडल्या. हळू हळू सगळे कामगार देशोधडीला लागले. गिरणी बंद पडली. मालकांनी टाळेबंदी जाहिर केली. पुढे या सगळ्या सोन्याच्या भाव असलेल्या जमिनी विकून मालक मालामाल झाले. मग दत्ता सामंत यांनी कामगारांचे हित पाहिले की गिरणी मालकांचे? या घोषणेतील दुसरा भाग होता ‘कसेल त्याची धरणी’. शहरातील जमिन म्हणजे सोन्याची खाण. तर गावाकडची शेत जमिन म्हणजे निव्वळ कचरा. कारण त्यात जो कसतो तो वरती येतच नाही. 

ज्यांना जमिन नाही त्यांना जमिन मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन झाले. गायरानाच्या पडिक मोकळ्या जमिनी दलितांना वाटण्यात आल्या. गांधीवादी विनोबा भावेंनी भूदानासाठी मोठी यात्रा काढली. आज काय परिस्थिती आहे? ज्यांच्यापाशी जमिनी आहेत ते सगळे दारिद्य्रात खितपत पडले आहे. या उलट ज्यांनी जमिनींचा नाद सोडून दिला. शहरात आले. उत्पन्नाचे दुसरे साधन मिळवले ते सगळे श्रीमंत झाले. जमिनीतून येणारे उत्पन्न हे कायम तोट्यातच राहिले आहे. आश्चर्य म्हणजे ज्या दलितांना गावात जमिनी मिळाल्या ते गावातच अडकून पडले गरीबच राहिले. आणि ज्या दलितांना गावात जमिनी मिळाल्या नाहीत ते शहरात स्थलांतरीत झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.  

नेहरूंच्या समाजवादी विचारांनी जमिनदार म्हणजे शोषण करणारा अशी मांडणी करून जमिनी ताब्यात घेतल्या. या जमिनी शेतीशिवाय इतर गोष्टींसाठी वापरात आल्या की मात्र त्यांना सोन्याचे भाव यायला लागले. शेती तोट्यात पण शेतीची जमिन एन.ए. म्हणजे नॉन ऍग्रीकल्चर अकृषी केली की तीला भाव येणार हे काय गौडबंगाल आहे?

औरंगाबाद शहराला लागून दिल्ली मुंबई औद्योगिक पट्टा (डि.एम.आय.सी.) विकसित करण्याचे ठरले. हा अधिकृत निर्णय व्हायच्या आधीच या भागातील कित्येक जमिनी मोठ मोठ्या राजकारण्यांनी, उद्योगपतींनी, धनदांडग्यानी विकत घेतल्या. शासनाचा अधिकृत निर्णय झाला आणि या जमिनींना कैकपट भाव आला. ज्यांनी या जमिनी घेतल्या त्यातल्या कुणालाही उद्योग उभा करण्यात रस नव्हता. लाखात भाव असलेली जमिन करोडोत गेली. ती विकून केवळ काही दिवसांत करोडो रूपये कमाविण्याचा हा एक योजनाबद्ध शासकीय कट ठरला. 

ज्या प्रमाणे शहरात किंवा इतरत्र जमिनी खरेदी विक्री व्यवहार होतात त्याप्रमाणे शेतजमिनीचे व्यवहार का होवू शकत नाहीत? शेतकर्‍यांना जमिन म्हणजे काळी आई, आपल्या आईला तो कसे विकणार? आणि ही जमिन त्याच्याकडून गेली तर त्याने काय करायचे? असले गारूड डावी समाजवादी मंडळी उभी करते. असं बोलणार्‍या कित्येकांचे आईबाप वृद्धाश्रमात खितपत पडलेले असतात आणि यांना शेतकर्‍याच्या काळी आईची चिंता !

महाराष्ट्र हा पुढारलेला आहे. महाराष्ट्रात शहरीकरण बर्‍यापैकी झालेले आहे. तोट्यात जाणारा शेती व्यवसाय सोडून बहुतांश शेतकरी दुसरा कुठलाही उद्योग व्यवसाय करायला तयार आहेत. पश्चिम बंगाल मध्ये सिंगूर येथील शेतजमिन ताब्यात घेण्यावरून जी दंगल उसळली तशी महाराष्ट्रात होवू शकत नाही. कारण त्या राज्यात शेतीशिवाय काय करावे हा जनतेसमोर प्रश्न आहे. महाराष्ट्रात तसे नाही. इथे आक्षेप आहे तो शेतकर्‍याची जमिन त्याच्याकडून बेभाव काढून घेतली जाते. ती इतरांकडे आली की तीची किंमत कैक पटीने वाढून त्याचा फायदा इतरांनाच मिळतो. यात राजकारणी आणि नोकरशहा यांचे साटेलोटे आहे. शेतकरी अशी मागणी करतो आहे की आम्ही आमची जमिन आम्हाला हवी त्याला पटेल त्या भावाने विकू. सरकारने त्यात पडायचे काही कारण नाही. 

काही जण असं सांगतात की सरकारी कामासाठी मोठ्या प्रमाणात जमिन हवी असते तेंव्हा काय करणार? हा युक्तिवाद अतिशय फसवा आहे. सरकारने आत्तापर्यंत बेभाव ताब्यात घेतलेली कित्येक एकर जमिन न वापरता तशीच पडून आहे. सरकारी आकडेवारीनुसार एकूण ताब्यात घेतलेल्या जमिनीपैकी फक्त 1/3 वापरली गेली आहे. 2/3 जमिन तशीच पडून आहे. मग शासनाकडे ही जी जमिन पडीक आहे तीचा वापर शासन करणार कधी? आणि जर तो करायचा नसेल तर ज्याची ती जमिन आहे त्याच्या ती परत ताब्यात का दिली जात नाही?

शेतीशिवाय बरीच जमिन पडिक स्वरूपात आहे. तीचा कुठलाही उपयोग होत नाही. अशी जमिन जी सरकारच्याच ताब्यात असते. तिचा वापर अकृषी कामासाठी का केला जात नाही? आणि जर शेतजमीनच खरेदी करायची असेल तर शेतकर्‍याला खुल्या बाजारातील किंमत देवून का खरेदी केली जात नाही? 

शेतीचे तर शोषण स्वातंत्र्यानंतर सतत केले गेले. आणि शेत जमिन जी की शेतकर्‍याचे एका अर्थाने फिक्स डिपॉझिट आहे ते मोडायचे तर त्याचेही फायदे मिळू दिले जात नाहीत. हा काय दुष्टावा आहे? स्टॅलिनने शेतकर्‍यांवर रणगाडे घालून दोन कोटी शेतकरी मारले होते. त्यापेक्षा हे नेहरूवादी धोरण महाभयानक आहे. यांनी प्रत्यक्षात तसे न करता धोरणाचा रणगाडा घातला आणि गेल्या पंधरा वर्षात लाखोनी शेतकर्‍यांना आत्महत्या करायला भाग पाडले. 

शेतजमिनीची बाजारपेठ खुली करा ही मागणी आता शेतकरी करत आहे. आमची जमिन कुणाला विकायची आणि काय भावाने विकायची ते आम्ही ठरवू. शासनाला लोकहितासाठी जमिन हवी असेल तर आधी स्वत:च्या ताब्यात असलेली जमिन वापरा. आणि जर शेतकर्‍यांची जमिन हवी असेल तर बाजारभाव दिला जावा. निवडणुकीच्या कामासाठी कर्मचार्‍यांचा वापर सरकार करते तेंव्हा त्यांना भत्ता कुठल्या हिशोबाने देता? तेंव्हा म्हणता का की हे सरकारी काम आहे तूम्हाला अतिशय कमी भत्ता मिळेल. सरकारी बांधकाम करताना गुत्तेदारांना म्हणता का की हे सरकारी काम आहे कमी दर मिळेल?  

तेंव्हा शेत जमिनीच्या व्यवहारात शासनाने पडू नये. तूम्हाला शेतकर्‍याचे काही भले करता येत नसेल तर किमान त्याच्या मार्गातली धोंड तरी होवू नका !   

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575      

Monday, November 16, 2015

केदारनाथच्या कुशीत निर्वाण षट्काच्या छायेत

सामना दिवाळी २०१५ 

केद्रारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या यात्रेला उत्तर भारतात छोटा चारधाम असं म्हणतात. कुटूंबातील आम्ही 6 जोडपी हिमालयात या यात्रेसाठी गेलो होतो जून महिन्यात 2011 गेलो होतो. केदारनाथ हे सगळ्यात अवघड ठिकाण. गौरीकुंड या तळाच्या गावापासून 14 कि.मी. अंतर पायी चालत जावं लागतं. घोडे किंवा डोलीची सोय आहे. तसंच वातावरण चांगलं असेल तर हेलिकॉप्टरचाही आजकाल वापर होतो आहे. मी मात्र डोंगरातला हा अवघड प्रवास पायी केला. सकाळी सातलाच गौरीकुंडपासून चालायला सुरूवात केली. रस्ता मोठा अवघड. सारखा दम लागत होता. पण जरा आजूबाजूला नरज टाकली की सगळ्या श्रमाचा विसर पडायचा. हिरवेगार सुंदर डोंगर, त्यावर उतरलेले ढग, खळाळत वाहणारी मंदाकिनी नदी.  

दिवसभर पायपीट केल्यावर दुपारी 4 ला मी केदारनाथला पोंचलो तेंव्हा अगदी थकून गेलो होतो. इंचभरसुद्धा चालणं शक्य वाटत नव्हतं. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर नजरेच्या टप्प्यात आला होता. वातावरण तसं ढगाळच होतं. पाऊस थोडासा पडून गेला होता. ढग थोडे विरळ होत चालले होते. आणि अचानक सूर्यासमोरचे ढग विरून गेले. सूर्याचे किरण समोरच्या हिमालयाच्या शिखरांवर चमकायला लागले. त्या दृश्यानं मी आवाक्च झालो. त्या शिखराला मेरू पर्वत म्हणतात. ते शिखर म्हणजेच महादेव समजण्यात येतं. शंकराचार्यांना याच ठिकाणी शिवाचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी त्यांनी निर्वाणषटकम् लिहीलं आणि योग समाधी घेतली. हिरवेगार सुंदर डोंगर, त्यांची बर्फाळ शिखरं, त्यावर चमकणारं उन, निळंभोर आभाळ. मी तसाच रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिलो. त्या शिखराला पाहूनच हात जोडले. मला नंतर मंदिरात गेल्यावर समजलं की मंदिरातील महादेवाची पिंड म्हणजे या पर्वत शिखराचीच प्रतिकृती आहे. मंदिरात अर्थात माझ्यासारख्याचा जीव घुसमटतो. बाहेरच महादेवानं मला दर्शन दिलं. आणि एक वेगळीच भावना मनात दाटून आली. वाटलं आपलं आयुष्य संपून गेलंय. 

हळू हळू सूर्याची किरणं लालसर गुलाबी होत गेली. पर्वताचं ते शिखर पश्चिमेला बाह्यगोल झालेलं आहे. त्या लालसर प्रकाशात किरणांनी एक चंद्रकोरच शिखरावर निर्माण केली आहे असं वाटत होतं. रावणानं शिवताण्डव स्तोत्र लिहीलं आहे. त्याच्या दुसर्‍या कडव्यात ‘किशारचंद्रशेखरे रति: प्रतिक्षणं मम’ अशी ओळ आहे. शंकराच्या मस्तकावर जी चंद्रकोर आहे तीचं वर्णन किशोरचंद्रशेखरे असं केलेलं आहे. लहान नाही आणि पूर्ण चंद्रही नाही नेमकी युवाअवस्थेतील चंद्रकोर म्हणजे ‘किशोर’ चंद्रकोर. इतका नेमका शब्द मला मराठीतही सापडला नाही. मला दिसलेल्या दृश्यात सूर्याच्या किरणांमूळे अशीच आकृती त्या डोंगरावर निर्माण झाली होती. तो नेमका फोटो माझ्या मोठ्या भावानं फारच सुंदर घेतला आहे.  

रात्री शेजारती साठी आपण मंदिरात जाऊ असं कवितानं माझ्या पत्नीनं सुचवलं. थकल्यामुळं इतर कोणीच यायला तयार नव्हतं. आम्ही दोघंच मंदिरात गेलो.  तर दरवाजा बंद. तिथल्या सुरक्षा रक्षकानं बाजूच्या दरवाजानं जायला सांगितलं. खरं तर त्यानं आम्हाला तसं का सांगितलं ते मला कळालं नाही. तिथे जाऊन पाहतो तर मंदिरात तिन पूजार्‍यांशिवाय कुणीच नाही. त्यांची परवानगी काढून आम्ही दोघं त्या रिकाम्या मंदिरात बसून राहिलो. ते त्यांचं साफसफाईचं काम करत होते. मंदिरात पाचही पांडव, द्रौपदी, कुंती आणि श्रीकृष्ण यांच्याही मूर्ती आहेत. हे मंदिर पांडवांनी बांधलं अशी अख्यायिका आहे. आपल्या हातून घडलेल्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी काय करावं याची त्यांनी व्यासांपाशी पृच्छा केली. तेंव्हा व्यासांनी त्यांना शिवाची आराधना करण्यास सांगितलं. शिवानं त्यांना दर्शन दिलं. त्याची पिंड तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही. तेंव्हा हा पर्वत म्हणजेच मी आहे असं शिवानं सांगितलं. आणि ती पिंड म्हणजेच त्या मेरू पर्वताची प्रतिकृती म्हणून राहिली. अहिल्याबाई होळकरांनी त्यावर सुंदर असं चांदीचं छत्र लावलं आहा.

रात्रीही योगायोगानं आभाळ निरभ्र होतं. चंद्राचा सुंदर प्रकाश पडला होता. खळाळत वाहणार्‍या मंदाकिनी नदीच्या काठावर मी बसून राहिलो. चांदण्यात तेच शिखर पाहताना अगदी वेगळं आणि काहीतरी अद्भूत पाहतो आहोत असं वाटत होतं. हे जे काही आहे ते खरं नाही. चित्रच काढलेलं आहे. आणि आपण त्याच्या समोर बसलेलो आहोत. ते सगळं वातावरण खरं तर भितीदायक वाटायला हवं होतं. कारण सगळीकडेच सन्नाटा पसरलेला. नदीचा आवाज सोडला तर कसलाच आवाज नाही. पण तो पर्वत मला आश्वासक वाटत होता. शंकराचार्यांना काय वाटलं असावं याचा थोडाफार अंदाज येत होता.

दुसर्‍या दिवशी सकाळीही आभाळ निरभ्र राहिलं. आता पर्वताच्या दुसर्‍या बाजूनं सूर्याची कोवळी किरणं पडलेली होती. मंदिराच्या उजव्या बाजूला मोकळ्या मैदानात मी जावून बसलो. सुंदर हिरवळ, तिच्यावर पिवळी जांभळी रानफूलं डोलत असलेली, पाण्याचे नितळ असे प्रवाह खळाळत जाणारे, समोर हिरवागार डोंगर, त्याच्यामागचं मेरूपर्वताचं शुभ्र शिखर. हे सगळं वातावरण संमोहीत करणारं होतं. मी ध्यान लावून बसलो आणि निर्वाण षटकाचे पठण केले. त्या वातावरणातून उठावेच वाटत नव्हते. बरोबरचे सगळे मंदिरात अभिषेक करत होते आणि मी बाहेर त्या पर्वताच्या समोर बसून निर्वाण षटकाचे पठण करत होतो मोकळ्या हवेत. याच जागेवर बसून शंकराचार्यांनी निर्वाणषटक हे शेवटचे स्तोत्र लिहीलं आणि योग समाधी घेतली. त्यांचं समाधी मंदिरही इथे बांधलेलं आहे.ही योगसमाधी 2013 मध्ये आलेल्या महाप्रलयात वाहून गेली. शंकराचार्यांनी केदारनाथला योग समाधी घेतली असे काही जण मानतात तर काही जण याच ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात त्यांनी देह सोडून दिला असंही समजतात. पण शंकराचार्यांचा शेवट केदारनाथला झाला यावर सर्वांचे एकमत आहे.

केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला दूरवर डोंगराच्या उतरणीवर एक छोटासा चौथरा होता. त्यावर महादेवाची एक पिंड स्थापन केलेली होती. ही जागा म्हणजे शंकराचार्यांनी योगसमाधी घेतली ती जागा असे सांगण्यात येते. आता तो चौथरा बुडून गेला. शिवाय मंदिराला लागून उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावरच शंकराचार्यांच्या नावानं एक मंदिर उभारलेलं होतं. त्यात त्यांची छोटी मूर्ती स्थापन केलेली होती. आता तेही सगळं बुडून गेलं. नष्ट झालं.

हा विषय इथेच संपला असता. आम्ही तिथून निघून उत्तरकाशी इथे आलो. त्या ठिकाणी अनंत महाराज आठवले यांनी समाधी घेतली ती जागा आहे. त्यांनी निर्वाण षटकाचा अर्थ विषद केला ते पुस्तक माझ्या वाचनात मागच्यावर्षी आलं होतं. गोरठा (ता. उमरी जि. नांदेड) इथे दासगणु महाराजांचा अनंत महाराजांनी स्थापन केलेला आश्रम आहे.  तिथल्या उत्सवासाठी माझी आई नेहमी जाते. तिने अनंत महाराजांचा गुरूमंत्र घेतलेला आहे. 2010 च्या एप्रिलमध्ये मी मुद्दाम त्या आश्रमात गेलो होतो. तेथून निर्वाणषटकाचे छोटं पुस्तक आणलं होतं. 

उत्तरकाशीच्या आश्रमात आम्ही दोन दिवस राहिलो. गंगेच्या अगदी काठावर (तिला तिथे भागिरथी म्हणतात) तो आश्रम आहे. अनंत महाराज आठवले यांनी सन्यास घेतल्यावर वरदानंद भारती हे नाव धारण केलं. बारा वर्षे ते उत्तरकाशीला होते. त्यांनी तिथेच योगसन्यास घेतला. त्या जागेवर दुसर्‍या दिवशी सकाळी गंगेत स्नान करून मी निर्वाण षटकाचे पठण केलं. ही जागा मोठी प्रसन्न आहे. 

वेरूळ महोत्सवात पं. जसराज यांचं गाणं होतं (इ.स.1991). मी माझ्या दोन मित्रांसोबत (शशांक जेवळीकर आणि गणेश चाकुरकर) या महोत्सवात गेलो होतो. जसराजजींनी आपल्या गाण्याची सांगता निर्वाण षटकाने केली. त्यांचा आवाज असा काही विलक्षण लागला होता. की गाणं संपल्यावर लोकांना टाळ्या वाजवायचंही सुचेना. सगळे आपापल्या जागेवर शांतपणे उभे राहिले. 

चित्रा वैद्य या चित्रकर्तीचं एक चित्र श्याम देशपांडेकडच्या पुस्तकात मला पहायला मिळालं. महादेवाची पिंड आणि त्यावरती चंद्रकोर असं ते चित्र होतं. त्याचं नावंच ‘अल्टीमेट ट्रुथ’ असं दिलं होतं. शिवाय त्याखाली रविंद्रनाथ टागोरांची एक ओळही छापली होती. ‘ Facts are many but the truth is one.

गेली जवळपास 20 वर्षे निर्वाणषटकाने माझा पिच्छा पुरवला. मी रूढ अर्थानं अध्यात्मिक नाही. रोजची पुजा अर्चा असं काही करत नाही. पण या निर्वाणषटकाने एक वेगळीच अनुभूती मला दिली. त्याचं वर्णन नेहमीच्या भौतिक पातळीवरच्या जगण्याच्या चौकटीत नाही करता येत. 

मनोबुद्धयहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मन बुद्धी, अहंकार, चित्त यातील काहीही मी नाही; तसेच कान, जीभ, नाक, डोळे मी नाही; आकाश भूमी, तेज अथवा वायुही मी नाही (चित् म्हणजे ज्ञान) ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, मी शिव आहे 

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पश्चकोश: ।
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
प्राणसंज्ञक वायू, अथवा प्राण अपान इत्यादी पाच वायू मी नाही; रस, रक्त इत्यादी सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) अथवा अन्नमयादी पाच कोष मी नाही ; वाणी, हात, पाय व इतर कर्मेंद्रिये मी नव्हे

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला कुणाबद्दल द्वेष नाही व आसक्ती नाही; लोभ व मोह मला नाही. गर्व मला कशाचाच नाही व कुणाबद्दल मत्सर नाही; धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थापैकी मला काही नको

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मंत्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा: ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता श्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दु:ख नाही, मंत्र, तीर्थ, वेद व यज्ञ यांच्याशी मला कर्तव्य नाही; मी भोजन-व्यापार नाही, भोज्य पदार्थ नाही व त्याचा उपभोग घेणाराही नाही

न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म ।
न बन्धुर्न मित्रं गुरूर्नैव शिष्यश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मला मृत्यू नाही व मृत्यूची शंका व भिती नाही, जातिविषयक भेदभाव मला नाही; मला वडील आई नाही किंबहूना जन्मच नाही, कोणी नात्यागोत्याचे मित्र, गुरू वा शिष्य मला कोणी नाही.

अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि ।
सदा मे समत्त्वं न मुक्तिर्न बन्धश्चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥
मी निर्विकल्प म्हणजे संकल्प, विकल्प, संशय यांनी रहित आहे, मी आकाररहित आहे, कारण सर्व ठिकाणी व सर्व इंद्रिये यांना मी व्यापून राहिलो आहे, मला कशाची आसक्ती नाही व म्हणून मुक्तिही नाही.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ४३१ ००१.