Tuesday, June 24, 2014

काम करी तो पक्का । आयते खाई तो छक्का ॥


                              दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार २४ जून २०१४ 

तृतियपंथीयांवरच्या ‘जयजयकार’  या मराठी चित्रपटाने कलेतून सामाजिक समस्या मांडायचे अवघड काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. एखाद्या कर्तृत्वहीन माणसाला ‘छक्का’ म्हणून शिवी दिली जाते. बहुतांश तृतियपंथीयांनाही काही न करता भीक मागणे हा आपला हक्कच आहे असे वाटते. या सगळ्याला छेद देणारी मांडणी ‘जयजयकार’ या चित्रपटातून दिग्दर्शक शंतनू रोडे याने केली आहे. कोवळ्या वयातील ‘लाजो’ ला मेजर अखंड बनलेले दिलीप प्रभावळकर अतिशय  सोप्या पद्धतीने त्याची समस्या उलगडून दाखवतात. काम करण्यात काय लाज आहे? जे अपंग आहेत ते आपल्या अवयवाच्या कमकुवतपणाचा कुठे बाऊ करतात. मग तूम्ही कशाला करता? मेजर अखंड यांच्या तोडी जी व्याख्या दिग्दर्शकाने दिली आहे, ‘काम करी तो पक्का। आयते खाई तो छक्का ॥' यातच सारे सार आले आहे.

दिग्दर्शक शंतनू रोडे, मावशीची अफलातून भूमिका करणारा संजय कुलकर्णी सुगांवकर व मेजर अखंड साकारणारे दिलीप प्रभावळकर या तिघांनी हा चित्रपट पेलला आहे. मेजर अखंड यांच्या साथीला पार्वतीची भूमिका साकारणार्‍या सुहिता थत्ते (यदुनाथ थत्ते यांची मुलगी) व मावशीच्या सोबत तीन तृतीयपंथी रंगवणारे लाजो (आकाश शिंदे), राणी (धवल पोकळे), चंपा (भुषण बोरगांवकर) यांनीही अतिशय उत्तम साथ दिली आहे. 
चित्रपटाचे कथानक साधे आहे. रेल्वेत भीक मागणार्‍या तृतियपंथीयांवर चोरीचा आळ त्यांच्यावर येतो. लोक त्यांच्या मागे लागतात. पळत पळत ते एकटे राहणार्‍या मेजर अखंड यांच्या घरात रात्रीच्या आसर्‍यासाठी शिरतात. मग मेजरसाहेबांच्या घरातील अंगठी नाहीशी होणे, ती सापडणे आणि त्या निमित्ताने ‘लाजो’ला मेजरसाहेबांनी घरात आणणे. तिच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे. मग बाकीच्याही तीन तृतियपंथीयांचे पुनर्वसन करणे. गावाचा असलेला विरोध. या सगळ्यातून चित्रपट खुलत जातो. तृतियपंथीयांना आपण माणूस म्हणून समजून घ्यायला पाहिजे हा अतिशय साधा सोपा वाटणारा पण वास्तवात अवघड असा संदेश प्रेक्षकाच्या मनात ठसतो. 

ही कथा घेवून हा तरूण दिग्दर्शक बर्‍याच जणांकडे फिरला. पण या कथेत कुणाला फारसा रस दिसला नाही. म्हणून शंतनू रोडे याने स्वत:च हा चित्रपट काढला. चित्रपटात तांत्रिक चुका आहेत, गती अजून वाढवायला हवी, गांव नेमके कुठले आहे ते स्पष्ट होत नाही अशा कितीतरी चुका काढता येतील. पण त्याला काही अर्थ नाही. जो प्रयत्न हा दिग्दर्शक करतो आहे ते समजून घेतले पाहिजे.

तृतियपंथी म्हटले की समोर येणारी व्यक्ती आणि तिची बंबईया हिंदी भाषा हे घट्ट समिकरण डोक्यात येते. इथे शंतनू रोडे याने मावशीसाठी मराठवाडी भाषा, चंपासाठी विदर्भाची भाषा, लाजोची शहरी प्रमाण भाषा तर राणीची साधी हिंदी असा अफलातून प्रयोग केला आहे. अख्खा चित्रपट तृतियपंथीयांवर आहे पण कुठेही तो बिभत्स होणार नाही याची अतोनात काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. 

या सर्वांनी भीक मागणे सोडून आपल्या पायावर उभे रहावे असा प्रयत्न मेजरसाहेब करतात. काही दिवसांतच याला कंटाळून परत आपण भीक मागू असा प्रस्ताव मावशी मांडते. खेळण्याचे दुकान चालविणारी चंपा म्हणते ‘नको मावशी. माझ्या दुकानात कितीतरी छोटी छोटी पोरं येतात. ते मला ताई म्हणतात.’ समाजाशी आपण चांगल्यापद्धतीने जोडल्या जावे ही त्यांची तळमळ दिसून येते. राणी जी नटण्या मुरडण्यात रस घेणारी असते. ती ब्युटी पार्लर चालवायला लागली आहे. ती असे म्हणते, ‘गावातल्या बायकांचा माझ्यावर विश्वास बसला आहे. त्या आता माझ्याकडूनच मेकअप करून घेतात.’ 

‘हरिश्‍चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात परेश मोकाशी यांनी  फाळकेंच्या व्यक्तिरेखेला मिश्किल रंग देवून चांगला परिणाम साधला होता. तसेच ‘जयजयकार’ या चित्रपटात शंतनू रोडे यांनी मेजर अखंड या भूमिकेला गंमतीदार व्यक्ती बनवून प्रेक्षक खिळवून ठेवला आहे. दिलीप प्रभावळकर यांनी ही भूमिका फारच प्रभावीपणे साकारली आहे. समाजसेवा करणारी व्यक्ती बर्‍याचदा एकारली जाते. मग त्याच्या आजूबाजूची माणसेही करवादतात. आपण काही फार मोठं काम करतो आहोत याचेच दडपण ते इतरांवर सतत आणत राहतात. परिणामी माणसे जवळ यायच्या ऐवजी दूर जातात. पु.ल. देशपांडे म्हणतात ‘मोहाचा त्याग करणे सोपे आहे. पण त्यागाचा मोह आवरणे खरेच कठीण.’ मेजर अखंड ही व्यक्ती जीवनाचा आनंद घेताना आपले दु:ख विसरून इतरांना मदत करू पाहते. यात कुठलीही कृत्रिमता नाही. चारही तृतियपंथीयांच्या मनात सारखी शंका असते या म्हातार्‍याला आपल्यासाठी काही का करावं वाटतं आहे? याचा काय स्वार्थ आहे? मावशी व मेजर यांच्यातील एका प्रसंगातून याचा साधेपणाने उलगडा दिग्दर्शकाने करून वेगळीच उंची गाठली आहे.

‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’ या नावाचा एक लेख शरद जोशींनी लिहीला होता. समाजसेवा ही मनातून उगवली पाहिजे. कुठल्याही बाह्य दडपणाखाली ती केली की त्याचा बोजवारा उडतो असा त्याचा आशय होता. या चित्रपटात मेजर अखंड यांच्या घरात तृतियपंथी शिरतात. मुद्दाम तृतियपंथीयांच्या शोधात मेजर निघालेले नाहीत.  

तृतियपंथीयांकडे वासना शमविण्याचे साधन म्हणून समाजाचा दृष्टिकोन दाखविणारा एकच प्रसंग आणि तोही अतिशय संयमाने रंगविला आहे. लाजो हा कोवळा पोरगा रेल्वेत भीक मागताना एका तरूण पोरांच्या टोळक्याच्या तावडीत सापडतो. त्यावेळी मावशीची भूमिका करणार्‍या संजय कुलकर्णी यांनी अप्रतिम बेअरिंग सांभाळत प्रसंग रंगविला आहे. सर्व चित्रपटात तृतियपंथीयांची बाजू संयमाने आणि परिणामकारण पद्धतीने संजय कुलकर्णी यांनी दाखविली आहे. मेजर कडे पहिल्यांदा काम करण्यासाठी लाजो जाणार आहे. त्यासाठी राणी व चंपा तयार नाहीत. पण मावशी तीच्या पाठीशी उभी राहते आणि तीला जाऊ देते. रात्री लाजोला जवळ घेवून झोपणं असो की सर्वांना चुलीवर रांधून खाऊ घालणं असो यातून तृतियपंथीयांना बांधून ठेवणारा धागा हे मावशीचे रूप ठळकपणे समोर येते. तृतियपंथीयांची मावशी म्हणजे हिजड्यांची फौज पदरी बाळगणारी, त्यांचे शोषण करणारी अशी व्यक्तिरेखा आत्तापर्यंत रंगवली गेली आहे.‘जयजयकार’ चित्रपटात पहिल्या दृश्यापासून ते शेवटपर्यंत कुठेही ही व्यक्तीरेखा तशी न होता एक सामान्य माणूस कशी आहे तीलाही भावभावना कशा आहेत, बरोबरच्या इतर तृतियपंथीयांवर तिने मायेची पाखर कशी घातली आहे याचे सुंदर चित्रण यात आले आहे.

एक अतिशय वेगळा प्रयोग साधणार्‍या या चित्रपटाकडे केवळ चित्रपट म्हणून पाहू नये. सहा कैद्यांना घेवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयोग ‘दो आंखे बारा हाथ’ चित्रपटात व्हि.शांताराम या मराठी माणसाने रंगविला होता. आता शंतनू रोडे या मराठी तरूणाने चार तृतियपंथीयांच्या पुनर्वसनाचा विषय चित्रपटातून मांडला हा एक वेगळाच योगायोग. अभिजीत जोशी या तरूण संगीतकाराने ‘चांदण्या गोंदल्या बाई’ हे एकच गाणे मोठे श्रवणीय बनवले आहे. 

‘काम करी तो पक्का । आयते खाई तो छक्का ॥ही नवी म्हण सार्थक करण्यासाठी हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी आवश्य पहावा. नसता ‘मराठी सिनेमा । कुणी पाहिना॥ही वेळ येईल. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे शो प्रेक्षकांअभावी बंद पडत आहेत. नुसते अनुदान देऊन आणि मराठीसाठी ‘खळ खट्ट्याक’ करून काही होणार नाही. चांगल्या चित्रपटांना पदरचे पैसे खर्चून प्रतिसाद द्यायची जबाबदारी आपलीच आहे.    

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ९४२२८७८५७५ 

Tuesday, June 17, 2014

अहिल्याबाई होळकरांचा वेगळा पैलू


                              दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 17 जून 2014 


अहिल्याबाई होळकरांची जयंती नुकतीच साजरी झाली. (जन्म 31 मे 1725, मृत्यू 23 ऑगस्ट 1795) बर्‍याच ठिकाणी पिवळे झेंडे नाचवित उत्साहात मिरवणुका निघाल्या. अहिल्याबाईंची साध्वी अहिल्याबाई अशी प्रतिमा तयार करण्यात आली आणि तिच जनमानसात रूजली. ज्याने कोणी पहिल्यांदा डोक्यावर पदर, कपाळावर भस्माचा आडवा पट्टा, डाव्या हातावर शिवलिंग, उजव्या हाताने त्यावर बेलाचे पान वहात धरलेली सावली हे चित्र काढले असेल त्या कलाकाराला याची कल्पनाही नसेल अशा कृतीने एक महान स्त्रीच्या मुत्सद्देगिरीकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत. 
महात्मा गांधींच्या चळवळीचे वर्णन साध्या शब्दांत ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमतीके संत तूने कर दिया कमाल’ या गाण्यात नेमके केले गेले आहे. पण गांधींच्या दोनशे वर्ष आधी हाती शस्त्र न घेता, धर्माचा चांगल्या अर्थाने वापर करून एक विधवा स्त्री आपला वचक भारतीय राजकारणावर निर्माण करते हे आपण लक्षात घेत नाही. विनया खडपेकर यांनी ‘ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर’ या पुस्तकांत (राजहंस प्रकाशन) अहिल्याबाईंचा मुत्सद्दीपणा अभ्यासपूर्वक मांडला आहे. प्रभावी राजकारणी अशी त्यांची प्रतिमा पहिल्यांदाच उजळून निघाली आहे. 
अहिल्याबाईंचे पहिले पत्र उपलब्ध आहे तेच मुळी त्यांच्यातील करारीपणाचे दर्शन घडविणारे. तेंव्हा त्या गादीवर बसल्याही नव्हत्या. त्यांच्या पतीने खंडेराव होळकरांनी पंढरपुरच्या विठोबाच्या नैवेद्यासाठी वार्षिक पैशाचा करार लावून दिला. त्यासोबत अहिल्याबाईंनी रूक्मिणीसाठी दागिने पाठविले. खंडेराव होळकर लिहीतात  ‘....प्रतिवर्षी श्रीला महानैवेद्य पोहोचता करणे. यास अंतर करू नये हे विनंती.’ पण तेच अहिल्याबाईंची भाषा पहा. रूक्मिणीच्या पूजेचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्या उत्पातांना त्या लिहीतात, ‘... आईचे पायेचा रमझोन सोन्याचा बाळोजी नाटे यांज बरोबर पाठविला आहे. तरी प्रत्यही भोगवीत जाणे. यात अंतर पडिले तर उत्तम नसे. येविशीचा जाबसाल तुम्हास पुसिला जाईल.’ (6 एप्रिल 1750)
जाबसाल पुसण्याची भाषा त्यांच्या अंगातील धमक दाखविते. सासरा, पती, नवरा यांच्या निधनानंतर खचून न जाता अहिल्याबाईंनी समर्थपणे संस्थानच्या कारभाराची धुरा सांभाळली. आपल्याला वारस ठरवून हाती सत्ता भेटेल हे इतके सोपे नाही हे त्या ओळखून होत्या. होळकर घराण्यातील तुकोजी होळकर हे गादीवर बसण्यासाठी उत्सूक होते. पण अहिल्याबाईंनी मोठ्या मुत्सद्दीपणाने पेशव्यांकडे पत्र पाठविले आहे. ‘‘... मी खासगी व दौलत असे दोन्ही अधिकार आजपावेतो चालवून होळकरांचे नाव कायम ठेविले असून. तुकोजीराव होळकर सरकार चाकरीचे उपयोगी समजून त्यांचे नावे वस्त्रे यावीत म्हणून विनंती.’’
तुकोजी होळकर हे सरकारी चाकरी म्हणजे मुलूखगिरी करतील लढाया करतील  पण अधिकार मात्र माझ्याकडे राहिल हे सुचवून त्यांनी पेशव्यांनाही चकित केले आहे. पुढे प्रत्यक्ष तसे वागुन अहिल्याबाईंनी आपला दराराही दाखवून दिला. खरं तर लढाईत खुन खराबा, पैशाची नासडी फार होते आणि निष्पन्न काहीच होत नाही याची जाणिव अहिल्याबाईंना आपल्या सासर्‍यांच्या हाताखाली कारभार करतानाच आली होती. मल्हारराव होळकर यांनी युद्धभूमिवर जे यश मिळविले त्याबरोबर मुलकी कारभारातही त्यांनी यश मिळविले. सामाजिक/धार्मिक प्रश्न सोडविण्यातही ते कुशल होते.  इंदोरच्या खेडापती मारूतीच्या पुजेचा एक बखेडा उत्पन्न झाला होता. मुरादशहा फकीर हे मुस्लिम संत त्या मारूतीची पुजा करत असत. त्यावरून समाजात अस्वस्थता निर्माण झाली. तेंव्हा मल्हारराव होळकरांनी महंत बैरागी रूपदासबाबा यांच्यावर ही पुजेची जबाबदारी दिली. मुरादशहा फकिरास तीन बिघे जमिनीवर (3 हजार स्क्वे.फु) मोठा वाडा उभारून त्याची सोय लावून दिली. हे अहिल्याबाईंनी ध्यानात ठेवले. पुढे त्यांनी धर्मासंबंधी जे धोरण अवलंबिले त्यावरून हे स्पष्ट होते. इंदोरात कामाला येणार्‍या लोकांसाठी ‘सरकारी वाडा असताना तूम्ही इतरत्र मुक्काम करू नये’ अशी सुचनाच मल्हारराव होळकरांनी केलेली होती. कारण कामासाठी येणारे कमाविसदार, मामलेदार, देशमुख, देशपांडे बाहेर राहिले तर दुसर्‍यांशी त्यांची जवळीक होऊन कारस्थाने शिजण्याची शक्यता. त्यापेक्षा ते सरकारी वाड्यात राहिले तर त्यांची जवळीक प्रत्यक्ष मल्हाररावांशीच होणार. हे सारे अहिल्याबाई पहात होत्या. 
अहिल्याबाईंसमोर खरा पेचप्रसंग राघोबादादा पेशव्यांनी निर्माण केला. दत्तकाचे निमित्त पुढे करून राघोबादादांना इंदोरवर हक्क मिळवायचा होता. त्यांच्या वकिलाला बाणेदार उत्तर देत अहिल्याबाईंनी गार केले. ‘कैलासवासी सुभेदारांच्या वारसांतल्या एकाची मी पत्नी आहे आणि दुसर्‍याची माता आहे. दत्तक वारस निवडायचाच तर तो आमचा अधिकार आहे. खुद्द पेशव्यांनीही त्यात ढवळाढवळ करणे नाही.’ आपणांस भेटावयास आलेल्या राघोबादादा पेशव्यांना त्या आपणहून वाजत गाजत हत्तीवरून मिरवत आपल्या सत्तेचे प्रदर्शन करीत निघाल्या.  वाटेत सर्व जनता त्यांना आपली राणी म्हणून मान देत होती. अशा प्रकारे जनतेचे दडपण आणून त्यांनी राघोबादादांना युद्धाशिवाय गार केले. माधवराव पेशव्यांनी अहिल्याबाईंच्या नावे पत्र देऊन त्यांना राज्य चालविण्याचा अधिकार दिला आणि होळकरशाहीच्या वारसाचा प्रश्न मिटवला. 
अहिल्याबाईंची मुत्सद्देगिरी ही की त्यांनी इंदूर सोडले व महेश्वर आपल्या राज्यकारभारासाठी निवडले. कारण महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिर होती. त्यावेळच्या संकेताप्रमाणे खासगी जहागिरीवर आक्रमण करता येत नव्हते. अगदी खुद्द सातारचे छत्रपती किंवा पेशव्यांचेही हात तिथे पोचू शकत नव्हते. इतिहासात या शहराला मोठे महत्त्व होते. ते स्थानमहात्म्यही अहिल्याबाईंच्या कामा आले. शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा गाजलेला वादविवाद याच शहरात झाल्याची अख्यायिका आहे. मंडनमिश्रांच्या पत्नीने या निवाड्यात न्यायाधिशाची भूमिका बजावली होती. त्याच जागी बसून अहिल्याबाईंनी राज्यकारभार पहावा यालाही एक वेगळा अर्थ आहे.
त्या काळातील राजकारणाचीही त्यांची जाण अतिशय बारीक होती. सवाई माधवराव पेशव्यांचे पुण्याला लग्न होते. त्या वेळी तुकोजी होळकर तिथे हजर राहिले. पण महादजी शिंदे मात्र दिल्लीच्या राजकारणाच्या धामधुमीत होते. त्यांनी दिल्लीवर कब्जा याच काळात मिळवला. पुण्याच्या लग्नापेक्षा दिल्लीच्या सिंहासनाचे राजकारण महत्त्वाचे हे अहिल्याबाई जाणून होत्या. ‘तुकोजीबाबा पाटीलबाबांस (महादजी शिंदे) सामील असते तर या यशकीर्तीस पात्र ठरले असते. तिकडे पुण्यास जाऊन काय मेळविले?’ असे उद्गार त्यांनी काढले. 
पुण्याची पेशवाई उताराला लागलेली, दिल्लीच्या बादशाहीचे काही खरे नाही, मराठ्यांची राजधानी सातारा दुबळी झालेली अशा स्थितीत अहिल्याबाईंनी कारभार केला. मठ मंदिरे देवळे नदीवर घाट यांची उभारणी केली तर त्या त्या परिसरात शांतता पसरेल. आणि मुख्य म्हणजे त्या काळातील जनतेच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल परिणामी आपल्याला चांगला राज्यकारभार करणे शक्य होईल. हे त्यांचे अनुमान त्या काळातील दुसर्‍या कुठल्याच राज्यकर्त्याला काढता आले नाही. धर्मभोळेपणापेक्षा समाजाचे अस्तित्व आणि अस्मिता जागविण्याची त्यांची भूमिका होती हे विनया खडपेकर यांचे निरीक्षण फारच नेमके आणि महत्त्वाचे आहे. 
काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार, गंगेवरील मनकर्णिका घाट, परळीच्या वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, सोमनाथचे मंदिर, वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, केदारनाथ बद्रीकेदार, उज्जैन, जगन्नाथपुरी येथील पुजेची व्यवस्था अशी कितीतरी ठिकाणांनी अहिल्याबाईंची आठवण जागती ठेवली आहे. 
दुसर्‍या महायुद्धानंतर सर्व जगाला युद्धाची किंमत काय मोजावी लागते हे स्पष्टपणे उमगले. व त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना (डब्लू.टि.ओ.) झाली. अहिल्याबाईंच्या काळात जागतिक  व्यापार ही संकल्पना नव्हती. पण त्यांनी   लढाईची विनाशकता ओळखली व आयुष्यभर ती  टाळून शांतता प्रस्थापित करत यशस्वी करभार करून दाखवला हे फार महत्त्वाचे.  
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, June 10, 2014

‘पाडस’वाले पटवर्धन गेले

                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 10 जून 2014 

राम पटवर्धन हे मराठीतील ज्येष्ठ संपादक. मराठी साहित्य विश्वात सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या  ‘सत्यकथा’ मासिकाचे संपादक म्हणून राम पटवर्धन सर्वांना परिचित होते. वृद्धापकाळाने 86 व्या वर्षी मंगळवार 3 जून रोजी त्यांचे निधन झाले. एका तरूण मुलाने विचारले, ‘‘संपादक म्हणजे ते काय करत होते?’’ संपादक म्हणून नेमके काय काम करावे लागते हे समजावून सांगायची वेळ आता आली आहे. वर्तमानपत्राचा संपादक म्हणजे काय हे थोड्याफार जणांना माहित असते पण वाङ्मयिन नियतकालिके, प्रकाशन गृहे यांत संपादकाची भूमिका काय हे माहित नसते.
लेखक लिहीतो तेंव्हा त्या मजकुरातील सुसंगती, लेखनातील वैचारिक सामाजिक भूमिका, काळाचे संदर्भ, व्यक्तिरेखा अशा कितीतरी बाबी तपासाव्या लागतात. या गोष्टी लेखकाला शक्य होतातच असे नाही. कथा, कादंबरी सारख्या मोठ्या गद्य लिखाणात तर वरील बाबी तपासणे फार गरजेचे असते. अशावेळी प्रकाशनगृहांना संपादकाची गरज पडते. काहीवेळा एखाद्या विषयावर पुस्तक लिहून घ्यायचा असेल तर संपादकाची भूमिका फारच महत्त्वाची बनते.
राम पटवर्धन हे अव्वल दर्जाचे संपादक होते. 1987 मध्ये ते निवृत्त झाल्यानंरही संपादनाची कामे करीत होते. अगदी अलिकडच्या काळातील ‘आश्रम नावाचे घर’ हे अचला जोशी यांचे पुस्तक त्यांनी संपादित केले होते. आजही ते पुस्तक वाचताना अचला जोशी यांच्या प्रतिभेच्या जोडीलाच पटवर्धनांच्या संपादकीय गुणांचीही आपल्याला जाणीव होते.
संपादनाचे काम स्पष्टपणे समोर दिसत नाही. त्याचे योग्य ते श्रेय मिळत नाही. त्यामुळे कितीतरी पुस्तकांची कामे करूनही त्याचे पुरेसे श्रेय पटवर्धनांना मिळाले नाही हे सत्य आहे. पण एक मोठं काम त्यांच्या हातून घडले आणि आजही त्यांच्या प्रतिभेचा, बुद्धिमत्तेचा पुरावा म्हणून ते आपल्यासमोर आहे.
मार्जोरी किनन रॉलिंग्ज या अमेरिकन लेखिकेच्या ‘द इयरलिंग’ कादंबरीचा अनुवाद पटवर्धनांची ‘पाडस’ या नावाने केला आहे. मराठीतील उत्कृष्ठ अनुवादाचा नमुना म्हणून हे पुस्तक मराठी वाचकांसाठी आज उपलब्ध आहे. 
मूळ पुस्तक ज्यांनी वाचले असेल त्यांनी परत हा अनुवादही वाचुन पहावा. मराठीत असे फार थोडे अनुवादक आहेत की ज्यांना मूळ पुस्तकाइतकीच उंची अनुवादातही गाठता आली. जी.ए.कुलकर्णी यांनी अनुवाद केलेली कॉनराड रिश्टर यांची पुस्तके (रान, शिवार, गाव, रानातील प्रकाश), श्रीकांत लागुंनी जॉर्ज ऑरवेलच्या ‘ऍनिमल फॉर्म’चा केलेला संक्षिप्त अनुवाद, भारती पांडे यांनी पर्ल बक च्या ‘द गुड अर्थ’ चा ‘काळी’ नावाने केलेला अनुवाद, उमा कुलकर्णी यांनी एस.एल.भैरप्पा यांच्या पुस्तकांचे केलेले अनुवाद (पर्व, तंतू, दाटू, वंशवृक्ष, आवरण) अशी फार थोडी उदाहरणे मराठीत आहेत. 
‘पाडस’ ही अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यातील जंगलात राहणार्‍या बॅक्स्टर कुटूंबाची कथा आहे. जंगल साफ करून तिथे शेती करत जगण्याचा संघर्ष करणारे हे कुटूंब. निसर्गाशी, हिंस्त्र प्राण्यांशी संघर्ष करायचा शिवाय त्यांच्याशी मैत्रीही ठेवायची अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. आई, वडिल आणि बारा वर्षांचा लहान मुलगा ज्योडी असे हे छोटेसे कुटूंब. निरागस विश्वात वावरणार्‍या ज्योडीला हरणाचे एक गोंडस पाडस मिळते. त्याला त्याचा अतोनात लळा लागतो. पण हे पाडस जेंव्हा मोठे होते आणि शेती उद्ध्वस्त करायला लागते तेंव्हा त्याच्याशी असलेला लळा तोडून त्याला शिस्त लावण्याचा आग्रह ज्योडीचा बाप पेनी धरतो. अखेरीस जेंव्हा शेतातील धान्य उद्ध्वस्त करणार्‍या पाडसाला पेनी गोळी घालतो तेंव्हा चिडून ज्योडी घर सोडून निघून जातो. भटकत असताना त्याला जीवनाच्या संघर्षाची खरी जाणीव होते. भूक म्हणजे काय हे त्याला कळते. रानावनात भटकणार्‍या छोट्याशा ज्योडीची मानसिकता रंगवताना मूळ मजकुराचा जो अनुवाद पटवर्धनांनी लिहीला आहे तो फारच अफलातून आहे, ‘‘भूक म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे अशी त्याची कल्पना होती. त्याला ठाऊक असलेली भूक ही काहीशी सुखाची जाणीव होती. आता त्याला कळलं की ती केवळ अन्न खाण्याची इच्छा होती. उलट ही भूक अगदीच वेगळी होती. ही फार भयानक होती. ही त्याला अख्खा तोंडात टाकू शकत होती आणि हिची नखं त्याच्या मर्मापर्यंत पोचत होती.’’
भूकच माणसाला खाऊन टाकते असं लिहून पटवर्धनांनी फारच नेमकेपणाने शेतीच्या सुरवातीच्या काळातील  माणसाच्या मन:स्थितीचे वर्णन केले आहे. बरं हे वर्णन करताना मूळ लेखिकेने किंवा अनुवाद करताना पटवर्धनांनी कुठेही आक्रस्ताळी अशी डावी भूमिका मांडलेली नाही. निसर्गाशी अन्नाचा संघर्ष करताना त्यातील स्वाभाविकताच या कादंबरीत सर्वत्र आढळून येते. हे एक फार मोठे बलस्थान या कादंबरीचे आहे. पटवर्धनांनीही ते ओळखून त्या पद्धतीने शब्द वापरले आहेत हे फार महत्त्वाचे. 
घरातून पळून गेलेला ज्योडी जगण्याचा अस्सल अनुभव घेऊन परत येतो. परत आलेल्या ज्योडीला त्याचा बाप पेनी जवळ घेतो. त्याच्या थंड पडलेल्या हातांना चोळीत राहतो. पेनीची गरम आसवं त्याच्या हातावर पडतात. जीवनाचे तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत पेनी पोराला समजावून सांगतो. ‘‘माणसांच्या दुनियेत काय चालतं ते पाहिलं आहेस तू. नीचपणा, दुष्टपणा करणारी माणसं तुला माहित आहेत. मृत्यूच्या युक्त्याप्रयुक्त्या तू पाहिल्या आहेस. भूक आणि उपासमार म्हणजे काय ते तुला कळलं आहे. जीवन सुंदर आणि सोपं असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. जीवन सुंदर आहे पोरा, फार सुंदर आहे. पण ते सोपं मात्र नाही.’’
घरची शेतीवाडी सांभाळायचं आश्वासन ज्योडी आपल्या बापाला देतो आणि ही कादंबरी संपते. राम पटवर्धनांची जी भाषा वापरली आहे ती पाहता पात्रांची नावं सोडली तर ही कादंबरी आपल्याच प्रदेशातील जंगलं तोडून शेती करू पाहणार्‍या आपल्या पूर्वजांचीच आहे असं वाटत राहतं. 
बंगालीत विभुतिभुषण बंदोपाध्याय यांची ‘आरण्यक’ ही कादंबरी जंगल हटवून शेतीसाठी जमिन तयार करणे या विषयावरच आहे. आपल्या प्रदेशातील एक फार अप्रतिम प्रसंग इतिहासातील आहे. पुण्याच्या परिसरातील उजाड झालेली जमिन सोन्याचा फाळ लावून शिवाजी महाराजांनी नांगरली. आजूबाजूचा जास्तीत जास्त प्रदेश शेतीखाली येईल हे पाहिले. शेती करणार्‍यांनी नांगराचे लोखंड वितळवून तलवारी केल्याआणि राज्य स्थापन केले असा आपला इतिहास आहे. सैनिक लढाईतून परतून परत शेती करत. शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे शेतीच्या संघर्षाची अन्नाच्या संघर्षाची गाथा आहे हे आपण विसरतो. मिर्झा राज्यांशी झालेला तह जून महिन्यातील मृग नक्षत्र लागण्याच्या काळातला आहे. राज्यातील शेती वाचावी म्हणून महाराजांनी तह केला. यावर मराठी प्रतिभावंतांनी लेखन व्हायला पाहिजे.
पटवर्धनांच्या माघारी  शिल्लक राहणारे काम म्हणजे पाडस ही कादंबरी. कलावंत साहित्यीकांच्या स्मारकांची हेळसांड आपण खुप केलेली आहे आणि करतही आहोत. मोठमोठ्या लेखकांच्या स्मारकांची पुतळ्यांची वाट आम्ही लावली आहे. तिथे राम पटवर्धनांसाठी कोणी काही करेल याची शक्यता फारच कमी आहे. बोरकरांनी लिहून ठेवले होते
मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्रफुलांची छत्री
त्या प्रमाणेच ‘पाडस’ सारखा अनुवाद राम पटवर्धनांच्या समाधीवर चंद्रफुलांची छत्री धरून मराठी वाचकांच्या कायम स्मरणात राहिल. पटवर्धन कायम स्मरणात राहतील ते ‘पाडस’वाले पटवर्धन म्हणूनच.  

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, June 3, 2014

वेदांतील पर्जन्यसूक्त : एक कविता मुक्त ।


                              दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 3 जून 2014 

वातावरणात असह्य उकाडा असतो. जिवाची तगमग तगमग होत असते. काय करावे सुधरत नाही. बोरकरांच्या कवितेत एक ओळ येते तसे काहीसे सर्वत्र वातावरण असते

जिथल्या तेथे पंख मिटूनीया
निमूट सारी घरे पाखरे
राख माखुनी पडून आहे
लूत लागले सुणे बिचारे


यात सुणे म्हणजे कुत्रे पण हा शब्द असा आला आहे की तो जिणे असावा असे वाटते. आणि असे लूत लागले जिणे पडून आहे. काय करावे म्हणजे ही स्थिती पालटेल? मर्ढेकर लिहीतात त्याप्रमाणे हे सारे पालटेल फक्त आणि फक्त पाऊस पडू लागल्यावरच.

शिरेल तेव्हा शिरो बिचारे
हवेत असल्या पाउस-पाते
जगास तोवर वैशाखाच्या
मृगाविनाही मृगजळ चढते !


पावसाची वाट सगळे पहात आहेत. आदिम काळापासून पावसाची वाट माणूस पहात आहे. आज इतकी परिस्थिती बदलली. विज्ञानाने नवे नवे शोध लावले. वातावरणातील तापमानाला विरोध करीत ऐसी शोधून काढला. पण पावसाची वाट पाहण्याची जी तीव्रता आहे ती मात्र कमी झालीच नाही. 

पावसाचे महत्त्व माणसाला होतेच पण ते केंव्हा जास्त वाटायला लागले? शेतीचा शोध लागला आणि पाऊस मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला. भारतासारख्या देशात आजही बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. सिंचन घोटाळ्यातील आकडेवारी बाजूला ठेवली तरी एक विदारक सत्य आजही समोर आहे. आणि ते म्हणजे शेतीला पाणी पुरविण्याची वेगळी व्यवस्था आम्ही करू शकलेलो नाही. त्यामुळे एक वाकप्रचार आपल्याकडे आलेला आहे, ‘अस्मानी आणि सुलतानी’. लहरी पाऊस आणि सुलतानी म्हणजे शासनव्यवस्था ह्या दोन्ही बेभरवश्याच्या आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मृगाच्या पावसाची मोठ्या आशेने शेतकरी वाट पहातो. मृगाआधी रोहिणी नक्षत्रात पावसाच्या सरी कोसळतात. त्यावरची जात्यावरची ओवी मोठी सुरेख आहे

मृगाआधी पाऊस । पडतो रोहिणीचा ॥
भावाआधी पाळणा । हलतो बहिणीचा ॥


मांगाच्या बाण्यामध्येही मृगाच्या पावसानंतर शेतकर्‍याची कशी लगबग सुरू होते. पेरणीची मोठी धांदल उडते याचे वर्णन आले आहे. 

सुताराच्या नेहावर एक नवल घडले
समरत सोईर्‍याने सोनं मोडून चाडं केलं


इंद्रजीत भालेराव यांनी जात्यावरच्या ओव्यांचे संपादन केले आहे. त्यात पावसाच्या-पेरणीच्या ज्याओव्या आलेल्याआहेत त्या आपली पारंपरिक मानसिकता स्पष्ट दाखवतात. परभणी परिसरातील या ओव्या असल्यामुळे तसे संदर्भही आले आहेत.

पाण्या बाई पावसाचं 
आभाळ आलंय मोडा
आभाळ आलंय मोडा
तिफनीचे नंदी सोडा

पड पड रे पावसा
व्हवू दे रे वल्ली माती
बईलाच्या चार्‍यासटी
कुणबी आले काकूळती

पाण्याबाई पावसाचं 
आभाळ आलंय कोट
सख्या परभणी गाठ
माल आडतीत लोट


जात्यावरच्या ओव्या किंवा आधुनिक मराठी कविता असो या सगळ्यात पावसाचे, त्याची वाट पाहण्याचे जे काही वर्णन आले आहे त्या सगळ्याचा धागा पार वेदकाळात जाऊन पोंचतो. ऋग्वेदात 1028 सूक्ते आहेत. विश्वनाथ खैरे यांनी यातील  पंधरा निसर्गवर्णनपर सूक्तांचा मराठीत सुंदर असा अनुवाद केला आहे. ‘वेदांतील गाणी’ या नावाने हे छोटे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली या पुस्तकाची अजून पहिलीच आवृत्ती चालू आहे. वाचन संस्कृतिवर भरमसाठ बडबड करणार्‍यांनी ही वस्तुस्थिती समजून घ्यावी. वेदांचा प्रचार मौखिक पंरपरेत झाला. लेखी स्वरूपात वेद अगदी अलिकडच्या काळात आले. त्यांचा सविस्तर शास्त्रार्थ सायणाचार्यांनी पहिल्यांदा मांडला ज्याच्या आधारावर इतर विद्वानांनी वेदांतील मंत्रांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. सायणाचार्य हे तेराव्या शतकातील विजयनगरच्या राजाचे  प्रधान होते. सायणाचार्यांच्या भाष्याचा आधार खैरेनी घेतला. आपल्या लोकसाहित्यात ज्या चालिरीती, परंपरा यांचा निर्देश आलेला आहे. त्यालामिळत्या जूळत्या वेदांतील सुक्तांचा त्यांनी अनुवाद केला. 

पर्जन्यसूक्त ही एक मुक्त अशी कविता आहे. पावसाने सारी समृद्धी येते. या पावसात औषधी वनस्पती वाढतात. पोटासाठी अन्न मिळते. निसर्गाचे चक्र या पावसामुळेच गतिमान आहे अशी भावना या सूक्तात आहे.

पावसाच्या थोर देवा मंत्र गावे
नमन करावे आणि सेवाभावे
बैल डरकत यावा तसा येतो
पाण्याने औषधी बीजे वाढवीतो

सुसाटती वारे वीजा कडाडती
झरता हे आकाश औषधी वाढती
भूमी सारे जग पोसाया समर्था
पावसाचा देव पाणी तिला देतो


दहा कडव्यांच्या या छोट्या प्रार्थनेत धो धो वाहणार्‍या पावसाला आता थांब आणि पुढे कोरड्या प्रदेशात जा अशी विनंती करण्यात आली आहे. खाण्यासाठी अन्न आणि पिण्यासाठी पाणी देणार्‍या पावसाचे मोठ्या तृप्त मनाने आभार मानले आहेत.

धो धो धो आलास ओढून घे धारा
कोरड्या देशांना जाई तू पुढारा
खाण्यापिण्या झाले मोप अन्नपाणी
वाहिली तुला ही आभाराची गाणी 


वेदांचा काळ जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीचा मानल्या जातो. वादाखातर तो थोडा कमी जरी केला तरी किमान तीन हजार वर्षांपूर्वीचे हे साहित्य आहे यात वादच नाही. वेद, उपनिषदे यांच्यावर आधुनिक काळातील विद्वान टिका करतात. त्यांना सोवळ्यात बांधून आधुनिक काळात वैचारिक अस्पृश्यता बाळगतात. असं करण्यानं या वाङ्मयातील किमान सौंदर्यालाही आपण मुकतो हे त्यांच्या लक्षात येत नाही.

शंकराचार्यांच्या नर्मदाअष्टकांत असं वर्णन आहे

अलक्ष्य लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं ।
सुलक्ष्य नीर तीर धीर पक्षि लक्षमकूजितम् ।
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ॥


दृष्टिला न दिसणार्‍या लक्षावधी किन्नर, देव दैत्य यांनी तूझ्या पायाची पूजा केली आहे. तूझ्या काठावर धीर धरून राहणारे लक्षावधी पक्षी आपल्या मंजूळ आवाजाने तूझा काठ रम्य करीत आहेत. अशा नर्मदे तूझ्या मी पाया पडतो. या वर्णनात कुठे काय देव देवता सोवळे ओवळे असे धर्माचे अवडंबर आले आहे? पण आपण ते समजून घेत नाही. 

पावसाची चातकासारखी वाट पाहण्याची आजची आपली मनोवृत्ती वेदकालीन आपल्या पूर्वजांसारखीच आहे. आजही आपल्यावर आपल्या पूर्वजांइतकी निसर्गाची जबरदस्त मोहिनी आहे हेच खरे.    

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, June 1, 2014

चॅनल फोर : आशय झिरो, वर्णनांवर जोर


                              लोकसत्ता "लोकरंग" पुरवणी रविवार १ जुन २०१४ 
                                        (आशयही  महत्वाचा आसतो  राव )


मराठी साहित्यात सदाशिवपेठी साहित्यावर एक जळजळीत प्रतिक्रिया म्हणून दलित साहित्य पुढे आले. त्याची अतिशय चांगली दखल समीक्षकांनी, गंभीर वाचकांनी घेतली. मग ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य हे प्रवाह सुरू झाले. याचे समर्थन करताना अभ्यासक असे म्हणायला लागले की विविध स्तरातील जीवन मराठी साहित्यात यायला हवे. याचा एक अर्थ नंतरच्या काळात सामान्य वकुबाच्या लेखकांनी असा घेतला की आपल्या आपल्या भोवतालचे विश्व साहित्यात  आत्तापर्यंत फार आले नसेल तर पाडा त्यावर एखादी कादंबरी. असे केल्याने निर्माण होणारे साहित्य हे किमान दर्जाचे तरी असते का? याचे उत्तर मात्र नाही असेच द्यावे लागेल.
पत्रकारितेवर मराठीत फारश्या कादंबर्‍या नाहीत. म्हणून पत्रकार आणि त्याच्या भोवतीचे राजकारण अरूण साधू यांनी सिंहासन मध्ये रंगवले नव्हते. अरूण साधू हे मुळात दर्जेदार लेखक आहेत. त्यांनी आपल्या भोवतालच्या सामग्रीचा उपयोग करून घेतला.  रिक्शावाल्यांचे जग मराठीत आणलं म्हणून मनोहर तल्हार मोठे नाहीत तर ‘माणूस’ ही कादंबरी मानवी मनाच्या मुलभूत भावभावनां लक्षात घेवून काही कलात्मक मांडणी करते म्हणून महत्त्वाची आहे.
समीरण वाळवेकर यांच्या मनात ‘चॅनल फोर लाईव्ह’ लिहीताना काही गैरसमजूती आहेत असे दिसते आहे. ही कादंबरी लिहीताना त्यांच्यासमोर अरूण साधूंची 'सिंहासन' होती हे तर स्पष्टच जाणवते. व्यक्तिरेखा परिचय सुरवातीलाच देऊन त्यांनी हे सिद्धही केलं आहे. शिवाय सगळी मांडणीही सिंहासन सारखीच ते करतात. साधुंचा दिगु आणि यांचा सलील देसाई हा पत्रकार हे सारखेच आहेत. मुख्यमंत्री मदनराव पाटील असो किंवा इतर व्यक्तीरेखा असोत यांवर सिंहासनचाच पगडा आहे.  फक्त साधू छापिल माध्यमाचा पत्रकार रंगवताहेत आणि वाळवेकर इलेक्ट्रॉनिक. पण वरवरच्या साम्यासोबतच सारं संपून जातं. (सिंहासनही ग्रंथालीनेच छापली होती. सिंहासन पासून चानेल ४ पर्यंतचा ग्रंथालीच आलेख भलताच उतरता आहे आसे म्हणावे लागेल) संपूर्ण कादंबरीचा आराखडा आखताना मुख्यमंत्री मंत्रीमंडळ बदलाची घोषणा करतात आणि ती बातमी रेडिओवरून येते यासारखा अप्रतिम शेवट जसा साधूंनी केला आहे त्याचा मोह होवून वाळवेकरही बातमीवर येवून कादंबरी संपवतात. इथे तर ते अशोक चव्हाण प्रकरणासारखेच ‘श्रीया सोसायटी’ प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व केंद्रात राज्यमंत्री असलेल्या राजवर्धन मोहिते यांना राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठविले जाते असे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे प्रकरण रंगवतात.  पण साधुंनी राजकीय प्रक्रिया जवळून अभ्यासली असल्यामुळे ते शेवट अर्थपूर्ण करतात. सत्तेचे राजकारण कुठल्या दिशेने जाते याचा अंदाज साधूंना आहे. परिणामी तशी मांडणी ते करतात. नंतरही महाराष्ट्रच कशाला देशातल्या कित्येक राज्यात हे सिद्ध झाले आहे. याउलट वाळवेकरांना काय सांगायचे आहे तेच शेवटपर्यंत समजत नाही.
मोदी-अंबानी, तात्या खामकर-अण्णा हजारे, श्रीकांत सबनीस-अविनाश धमाधिकारी, खामगाव-राळेगण सिद्धी, दादा सामंत-नारायण राणे, आरती बेणारे-मेधा पाटकर (कट्टर कम्युनिस्ट विचारांची कार्यकर्ती-खरं तर वाळवेकर यांना पत्रकार म्हणून समाजवादी आणि मार्क्सवादी यातला फरक कळायला पाहिजे होता. तो बहुतेक कळत नाही) लेण्याद्री-सह्याद्री  असा कितीतरी साम्य दर्शविणारा खेळ करून लेखक म्हणून आपला कमकुवतपणा वाळवेकर सिद्ध करतात. 
पैसा आणि वासना यांचा खेळ म्हणजे सत्ता असं एक सुत्र वाळवेकर मांडतात. बरं मग जेंव्हा मोठ मोठ्या वाहिन्या बंद पडल्या त्यांचे प्रसारण कमी झाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून कित्येक दर्जेदार पत्रकार बाहेर पडले हे त्यांच्या लिखाणात कुठेच येत नाही हे कसे? आज घडीला निखिल वागळे, राजदीप सरदेसाई, राजीव खांडेकर अशी मोजकीच नावे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांत आहेत ज्यांचा दर्जा पत्रकार म्हणून वरचा आहे. बाकी गावोगावचे किमान दर्जा असलेले पत्रकार परत वर्तमानपत्रांकडे वळले आहे. 
वासनेबाबत तर वाळवेकरांचे काय गैरसमज आहेत तेच जाणो.जवळपास प्रत्येक पुरूष किंवा स्त्री एकमेकांकडे वासना शमवायचे साधन म्हणूनच पाहते आहे अशी वर्णनं त्यांनी केली आहेत. सलील रावी (पृ. 10), सलील-मसाज करणारी पोरगी (पृ.30), मदनराव पाटील-व्हेनेझुएलन ब्युटी क्वीन (पृ.31)  कनकलाल रामजी झवेरीचा मुलगा युवराज- कित्येक मुलींशी संबंध (पृ. 109) अँकर अनिमिष-प्रिति ठुकराल (पृ. 75). इशा-युवी (पृ. 135), गिरीश-बिन्नी (153), मोगरा बोरगावकर-मुख्यमंत्री (पृ.179)
बरं ही वर्णनं करताना वाळवेकर केवळ खाज म्हणून हे लिहीताहेत असा आरोप करता यावा इतका पुरावाही त्यांनी सोडला आहे. नताशाच्या फ्लॅटवर पार्टीसाठी सलील-रावी-नताशा जमतात. रावीला गोळ्या देवून नताशा झोपी घालते. सलील आणि नताशा संभोग करतात. त्याला थोड्या वेळात फोन येतो. मिताली आनंदात न्हाउन निघाली. असं वर्णन येतं. आता ही मिताली कोण? नताशा कुठे गेली.  परत पुढे नताशाला बाजूला सारून सलील ताडकन उठला. पुढे पृ. 127 वर मितालीनं जो काही धिंगाणा घातला असं वाक्य येतं. काय सांगायचं आहे वाळवेकरांना? 
चॅनल फोरचा अँकर अनिमिष आणि मिताली यांची एटीएम सेंटर मधील संभोगाची सीडी चॅनल फोरच्या मालकाला दाखवून कुणी मार्केटिंग अधिकारी युनायटेड बँकेत खाते उघडायला लावतो. साडेतीन हजार कर्मचारी असलेली मोठी मिडिया कंपनी केवळ आपल्या एका कर्मचार्‍याचा संभोग करतानाचा व्हिडीओ सापडला म्हणून असं करेल? वाटलं तर त्या दोघांही कर्मचार्‍यांना काढून टाकेन. मोठ्या समुहांची आर्थिक व्यवहार करण्याची पद्धत वाळवेकरांना इतकी बाळबोध वाटते का? 
राजकारणाची नेमकी काय समज लेखकाला आहे हे कळत नाही. मंत्र्यांचे अनैतिक संबंध कळले म्हणजे राजकारण कळते का? यांचा मुख्यमंत्री  स्वत: ‘लोकमानस’ चे संपादक राजाभाऊ पानसेंना फोन करतात, आणि ‘सांस्कृतिक मंत्री सापडले लोककलावंतीणी बरोबर’ अशी बातमी देतात. राजाभाऊ पानसे त्यांना बाणेदारपणे ‘काय छापायचे ते मला शिकवू नका’ हे सांगतात. मोठे नेते संपादक इतक्या बालिशपणे एकमेकांशी बोलतील का? किंवा हा प्रसंग कादंबरीत एखादा प्रतिभावंत असा बाळबोधपणे घेईल का? 
 नांदेडच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची इमारत जळाली हे प्रकरण जशाला तसे परभणी बँकेची इमारत म्हणून लेखकाने घेतले आहे. लोककलावंत जनार्दन नांदूर्डीकरांना मृख्यमंत्री भेटतात, मीरचंदानी बिल्डींग अतिक्रमण असे प्रत्यक्ष घडलेल्या घटनांशी संपूर्णत: साधर्म्य असलेले प्रसंग नाव बदलून दाखवले म्हणजे वाङ्मयाची निर्मिती होते का?गोपाळराव दामले -गोविंदराव तळवलकर (पृ. 83), गॅलेक्सी ग्रुप-रिलायन्स, इंदूभाई-धिरूभाई (पृ. 87) त्यांची आशिष-अमीत ही मुलं म्हणजेच अनिल अंबानी-मुकेश अंबानी. असे साधर्म्य दाखविल्याने काय साध्य होते?
चॅनेल फोरच्या स्टुडिओतील चंकी व सलीलची मारामारी, दादा सामंतांचा स्टुडिओतील राडा, पोलिस इन्सपेक्टर सुजीत वळसे  गुंड धोत्रेचे एन्काउंटर करतो हे सगळे प्रसंग बाबा कदमांची कादंबरी किंवा राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटात शोभावे असे लिहून काय मिळवले?  
परळीच्या डॉक्टरांनी स्त्रीभ्रृणहत्या केल्या त्याच्याशी साधर्म्य सांगणारा आख्खा प्रसंग यात आहे. बरं हा लिहीताना किमान स्थळाच्या, नावाच्या चुका तरी करू नयेत. विनिता काळे ही सामाजिक कार्यकर्ती हा विषय मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हाती घेते. परभणीच्या डॉक्टर्सचे पत्ते आपली वर्ग मैत्रिण वल्लरी कर्दळेला फोन करून ती विचारते, ‘तूला डॉ.धनाजी भोंगळे माहित आहे का?’ आणि वरच्या परिच्छेदात लिहीले आहे की तीला डॉ.रमेश भोंगळेची चौकशी करायची असते.  रमेश की धनाजी? हे काय प्रकरण आहे. एकाच पानावर नाव बदलले. परभणीच्या सोनोग्राफी करणार्‍या डॉक्टरकडे एमटीपी करून घ्यायला जवळच्या पाच पंचविस गावातून नागपुर, चंद्रपुर, अकोल्यापासून माणसं येतात. ही गावं परभणी जवळ आहेत? पुढे पृ. 182 वर अमरावतीपासून विनिताची गाडी 40-50 कि.मी.वर थांबते. स्टिंग ऑपरेशन करायचे आहे. सोनोग्राफी होते परभणीत. आणि स्टींग ऑपरेशन अमरावतीत. गाव कुठले परभणी का अमरावती? हे स्त्री गर्भाचे लहान गोळे कुत्र्यांना खावू घातले जातात. परत मूळ घटनेशी साम्य.  म्हणजे लेखकाला या विषयाचे गांभिर्य नाही. केवळ खरी घडलेली एक घटना उचलली आणि पुस्तकात चिटकवली. 
ही कादंबरी दूरदर्शन वाहिन्यांशी संबंधीत आहे. साहजिकच या वाहिन्यांचे जे बलस्थान आहे, ग्रामीण भागातील निरक्षर वर्ग, किंवा आता नव्याने साक्षर असलेला पण फारसा विचार करू न शकणारा वर्ग याला काहीच तोशीस न लागता हे मनोरंजन आयते मिळते. साहजिकच अतिशय थोड्या काळात वाहिन्यांचा प्रभाव वाढला. याची कुठे जाणीवच लेखकाला नाही. 
पत्रकारीतेला जोडून यात राजकारण आणि थोड्याप्रमाणात उद्योग विश्व येते. सारे काही सरकारने करायचे या भूमिकेमूळे सत्तेचे महत्त्व वाढले. आणि उदारीकरणाच्या काळातही मोकळी हवा काही उद्योगांनाच लाभली. यातून धिरूभाऊ अंबानी, सुब्रोतो रॉय, विजय मल्ल्या यांची साम्राज्य उभी राहिली. यांच्या दोर्‍या परत सत्ताधार्‍यांच्या हाती एकवटल्या. यातून ही भ्रष्ट युती तयार झाली. याची खोलवर चिकित्सा न करता लेखक वरवर बायका, दारू, पैसा यांच्या वर्णनात अडकून पडतो.
यात पत्रकारितेच्या बाजूने केवळ कोकण रेल्वेच्या अपघाताची बातमी (पृ.35-44) येते तितकाच तो काय अपवाद. एरवी कुठेही या क्षेत्राबद्दल त्या क्षेत्राच्या दृष्टीने काही मांडल्या जात नाही. मंत्रालयात अद्यायावत सभागृह पत्रकार परिषदेसाठी उभारल्या गेले म्हणजे पत्रकारिता क्षेत्राची माहिती दिली असं होतं का? या वाहिनीच्या उंच इमारतीवर हेलिकॉप्टर उतरायची सोय कशी आहे याचे वर्णन केलं म्हणजे पत्रकारितेने किती उंची गाठली हे सांगणं आहे का? 
लहान पोराला एखादा नविन शब्द मिळाला की ते त्याचाच वापर करत राहतं. किंवा एखादं नविन खेळणं मिळालं की त्याच्याच मागे ते दिवसभर असतं. त्याप्रमाणे चॅनल हा एक नविन शब्द आणि खेळणं लेखकाला त्या क्षेत्रात असल्यामुळे मिळालं असं वाटतंय. कारण त्याची दृष्टी त्या पलिकडे जाऊन काही मुलभूत सांगू पाहण्याची दिसत नाही.  
मुखपृष्ठ हे चंद्रमोहन यांचे असून त्यांच्या ‘माणूस व खुर्ची’ या मालिकेतून घेतले आहे. खुर्चीच्या हाताची चौकट आणि त्यात अडकलेला माणूस, त्याचा हात हे सगळे अतिशय कलात्मक आहे. पण लेखकाला या माध्यमाची सत्ताच नीट कळलेली नसल्यामुळे त्यात अडकून पडलेला माणूस तो रंगवू शकला नाही. मजकुराची मांडणी करताना दोन दोन तीन तीन ओळींचे परिच्छेद करत उगीच तूकडे पाडले आहेत. परिणामी मजकुर बेढब वाटतो. नेमाडे किंवा पठारे यांच्या मोठ्या कादंबर्‍यांची सलग मोठ मोठ्या परिच्छेदात मांडणी करून एक सौंदर्यदृष्ट्या आणि आशयदृष्ट्या चांगला परिणाम अक्षर जुळणी करताना साधला गेला आहे. त्याच्या नेमके उलट इथे होते आहे. या मांडणीचा विपरीत परिणाम होऊन वाचकाची एकाग्रता भंगते. 
मजकुरावरून कुठल्याच संपादकाचा हात फिरला नाही असे दिसते आहे. हा संपादक बाहेरचाच असला पाहिजे असे नाही. लेखक स्वत:ही हे काम स्वप्रेमातून थोडा बाहेर येवून करू शकतो. आशय महत्वाचा. नुसती वर्णने करून कादंबरी कशी तयार होणार?     
(चॅनल फोर लाईव्ह, लेखकःसमीरण वाळवेकर, प्रकाशकः ग्रंथाली, पृष्ठेः386, मुल्यः400 रू.)

Wednesday, May 28, 2014

गावाकडील ताठ कण्याचे आई-वडिल !

दै. पुण्यनगरी, उरूस,  बुधवार  28 मे 2014 

आपल्याकडे कुणीही भेटले आणि थोडाफार जिव्हाळा त्याच्याबाबत वाटला की आपला स्वाभाविक प्रश्न असतो, ‘‘तूमचे गाव कुठले?’’त्याचे उत्तर मिळाल्यावर पुढचा प्रश्न समोर येतो, ‘‘गावाकडं कोण असतं?’’ भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षात शहरीकरणाचा वेग फार मोठा राहिला आहे. शहरातील लोकसंख्या आता जवळपास 50 टक्के इतकी झाली आहे. पण अजूनही का कुणास ठाऊक बहुतांश मराठी माणसांचं मन (भारतीय देखील) गावातच अडकून पडलेलं असतं. गावाकडं कोण या प्रश्नाचं उत्तर मिळतं, ‘‘आई वडिल असतात.’’
गावाकडे आईवडिल असतात असं म्हटलं की समोर येणारं चित्र साधरणत: असं असतं. पक्की सडक सोडून गाव थोडासा आतमध्ये असतो. ही कच्ची सडक पुढे दुसर्‍या छोट्या गावाकडं गेलेली असते. फाट्यावर थोडीफार दुकानं, टपरीवजा हॉटेल. मोडक्या अवस्थेत बस स्टॉपचं पत्री शेड. जून्या खराब आणि आता सिमेंटच्या पक्क्या रस्त्यानं आत गेलं की एकमेकांना खेटून असलेली बसकी घरं लागतात. रस्त्याच्या बांधकामानं घरं खाली गेलेली असतात. 
सर्वसाधारण घरं साधी दगडा-मातीची ढासळलेल्या अवस्थेत दिसतात. दरवाजा जरा बर्‍या अवस्थेत असतो. त्यातून आत गेलो की खाटेवर पडलेले वडिल आणि स्वयंपाकघराच्या उंबर्‍याशी बसून काहीतरी निवडीत टिपत बसलेली म्हातारी आई. जनावरांचा गोठा ओस पडलेला. तिथली मातीची जमिन पूर्ण उखडलेली. बाकी घराच्या काही भागात जूजबी थोडंफार दूरूस्तीकाम करून घेतलेलं असतं. आईवडिल थकलेले असतात. वाड्यात जळमटं झालेली असतात. आर्थिक परिस्थिती खराब असेल तर घर म्हणजे वाडा नसून नुसतं पत्र्याचं छोटं शेड असतं. बाकी वरवरची सुबत्ता सोडता आई वडिल मात्र कुठल्याही गावाकडच्या घरातले थकलेले, उदास डोळ्यांचे, पोरंबाळं आता फिरकत नाही ही खंत बाळगणारे असतात.  त्यात फारसा फरक नाही.
बरेच आईवडिल गावाकडं अडकून पडतात ते केवळ मुलांच्या संसारात अडगळ नको म्हणून नाही. तर गावाकडचं घर आणि शेतीचा तुकडा, गावगाड्यातले रीतरिवाज परंपरा त्यांना बांधून ठेवत असतात. आपल्या देहाची माती गावच्या मातीत मिळावी असली काहीतरी समजूत मनाशी घट्ट बाळगून ते गावपांढरीशी चिटकून असतात.
पण शेत नाही, गावात जूनं घर नाही असा कुणी शहरातील मोठं घर सोडून गावाकडं निवृत्तीनंतर घर बांधून राहिल का? धनंजय चिंचोलीकर या आमच्या लेखक मित्राच्या आईवडिलांनी हा समज खोटा ठरवला. कन्नड सिल्लोड रस्त्यावरील चिंचोली लिंबाजी हे त्यांचे मुळ गाव. धनंजयच्या शिक्षक असलेल्या आईवडिलांनी (लक्ष्मीकांतराव व सुमन चिंचोलीकर) निवृत्तीनंतर गावाकडं उचं जोतं घेवून, मोठ्या उंचीचं छोटं तीन खोल्यांचं टूमदार घर बांधलं. परसात कडीपत्ता, लिंब, मोगरा अशी छोटीशी बाग धनंजयच्या आईनं मोठ्या हौसेनं पोसली आहे. स्वत: धार्मिक कर्मकांडांना महत्त्व न देणार्‍या या जोडप्यानं स्वखर्चानं दत्ताचं एक मंदिर विठ्ठल मंदिराच्या परिसरात उभारलं. औरंगाबाद शहरात स्थायिक असलेल्या दोन मुलं दोन मुलींचा आग्रह न जुमानता गावाकडं राहण्याचा निर्णय घेतला आणि गेली 20 वर्षे तो अमलात आणून दाखवला आहे.  मुलाबाळांच्या संसारातून बाजूला होण्याची "वानप्रस्थ" आश्रमाची परंपरा आपल्याकडे आहे. आधुनिक काळातील वानप्रस्थाचे उदाहरणच चिंचोलीकर काका-काकूंनि समोर ठेवले आहे.
त्यांच्या घरात देवीची एक मोठी मुर्ती पाहण्यात आली. कापडांत झाकून ठेवलेली होती. चौकशी केल्यावर लक्षात आलं की सार्वजनिक नवरात्र महोत्सवातील ही मूर्ती आहे. म्हणजे या उपक्रमांतही यांचा सहभाग मोलाचा असणार. शिवाय स्वाध्यायाचे वर्ग त्यांच्याकडे चालतात.
गावानेही या जोडप्याला मोठा आदर दिला आहे. दसर्याच्या पूजेचा मान त्यांना दिला जातो. घराबाहेर पडले कि कुणीही त्यांना बस स्थानका पर्यंत सोडते. सगळ्या उपक्रमात त्यांचा सल्ला घेतला जातो. त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो.
गावचे ग्रामदैवत असलेल्या देवीचे विसर्जन त्यांच्या दारासमोरच्या आडात केले जाते. तो आड त्यांची चांगला व्यवस्थित बांधून घेतला आहे. त्यावर लोखंडाची जाळी बसवून कुणी पडू नये याचीही काळजी घेतलेली आहे. अंगणातील सामाजिक धार्मिक असो की परसातील बाग असो या जोडप्यानं कलात्मक दृष्टिकोन  जपत आपलं आयुष्य समृद्ध केलं आहे.

वाडवडिलांची शेतवाडी घरदार काहीच नसताना या जोडप्याला गावाकडं का रहावं वाटत असेल? स्वतंत्र पेन्शन  असल्याने कुणावर अवलंबून राहण्याचीही गरज नाही. ही कुठली ओढ असेल? काकांच्या बोलण्यातून सतत साधेपणा आणि माणसांबद्दलचा जिव्हाळा वहात असतो.  काकू तर फारशा बोलतच नाहीत. त्या केवळ नजरेनंच बोलतात असं लक्षात आलं.
गावकर्‍यांना अडीअडणींना हे जोडपं मदत करत राहतं. खरं तर आपल्या पुढच्या पिढीतील किंवा त्याही पुढच्या पिढीतील कुणीच गावाकडं परतणार नाही हे माहित आहे. गावातली कुठलीच सत्ता त्यांच्यापाशी नाही. आपण काही फार मोठी समाजसेवा करत आहोत असा आव बोलण्यात वा कृतीत नाही. गावाला एकत्र बांधून ठेवायचं म्हणून धार्मिक उपक्रम आवश्यक असतात इतक्या साध्या विचारसरणीतून त्यांनी नवरात्र महोत्सव असो, दत्त मंदिर असो, स्वाध्याय असो की गावदेवीची जत्रा असो यांचे महत्त्व ओळखले. ज्या काळात पुरोगामी विचारवंत कुठल्याही जत्रा उत्सवांकडे हेटाळणीने पहायचे. आजही पाहतात. त्या काळात एक निवृत्त शिक्षक आपल्या बायकोला घेवून गावाकडं येतो आणि या सगळ्यात रस घेतो हे विलक्षण आहे. या उपक्रमांमुळे गावातील व्यसनांचे प्रमाण कमी होते हे त्यांचे निरिक्षण मोठं मार्मिक आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्यावरील पुस्तकात विनया खडपेकर यांनी अहिल्याबाईंनी मंदिरं, नदिवरील घाट यांच्या उभारणीतून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याचे धोरण कस आखले याचे मोठे मार्मिक विश्लेषण केले आहे. युद्धामुळे प्रचंड नुकसान होते शिवाय आपण बाई असल्यामुळे आपल्याला मर्यादा आहेत. त्यापेक्षा आपण धार्मिक बाबींचा चांगला उपयोग समाजासाठी करून घेवूत हे ध्यानात ठेवून त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने धार्मिक स्थळांचा विकास केला. चिंचोलीकर काकांना हे सारं स्पष्टपणे कदाचित माहितही नसेल. पण त्यांनी एक छोटं प्रात्यक्षिक आपल्या गावात करून दाखवलं आहे. सामाजिक काम करताना किंवा धार्मिक कामांतही सहभाग नोंदवताना माणसं अतिशय कदरलेली असतात. वैताग दाखवत राहतात. उगाच हे सारं गळ्यात पडलं असा भाव त्यांच्या मनात असतो. पण चिचांलीकर काकांच्या आणि काकुंच्या वागण्या बोलण्यात हे काहीच दिसत नाही. अगदी सहजपणे ऐंशी वर्षाच्या वयातही ते या उपक्रमांमधून वावरत असतात. 
ज्या काळात प्रवास करणे मोठं जिकीरीचं काम होतं. त्या 1960 ते 80 च्या काळात या जोडप्याने जवळपास संपूर्ण भारत पालथा घातला आहे. हे मला समजलं आणि मोठं आश्चर्यच वाटलं. मिळेल त्या साधनांनी काका काकूंनी भारतभर मिळून प्रवास केला. स्वत:ची गाण्याची नाट्य संगीताची आवड जोपासली. आजही त्यांची नातवंडं आजीआजोबांची आठवण आली की गाडीत तबला पेटी घेवून गावाकडं जातात. आजीआजोबांना जमेल तसं गाणं ऐकवतात. स्वत: आनंद घेतात, त्यांना आनंद देतात. आयुष्याच्या निरस चित्रात कलेचा रंग भरून घेतात/देतात. 
धनंजयच्या सासुबाईंचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. निर्णय घेणं सोपं असतं पण राबविणं महाकठीण. जमलेल्या लोकांना वाटले घरची म्हातारी माणसं अशा निर्णयाला परवानगी देतील का? पण धनंजयच्या आई-वडिलांनी पारंपरिक मतं बाजूला ठेवून सुनेच्या निर्णयाला पाठिंबा देवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 
हिंदू धर्मात उदारमतवादी विचारांची एक फार मोठी अशी परंपरा शतकानुशतके राहिलेली आहे. या परंपरेचे नेतृत्व मोठ मोठ्या संत महात्म्यांनी केलं हे खरं आहे. पण ही परंपरा बळकट करण्याचे महत्त्वाचे काम चिंचोलीकर काका- काकुंसारख्यांनी गावपातळीवर केलं आहे.   इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या एका कवितेत वर्णन केले होते

मी  पाहतो तुझा गाव
आणि तू येतोस माझ्या गावाला
उगाच नावाला  कौतुक करतो आपण
एकमेकांच्या आईबापाचे घरादाराचे
चौकटीवर बहिणींनी काढलेल्या
मोडक्या तोडक्या मोराचे
भाऊ भावजयांनी रोपलेल्या शेताचे
आणि गावकर्यांनी केलेल्या स्वागताचे
सगळ्यांची मेटे मोडलेली दिसत असताना.


याच्या नेमके उलट धनंजयच्या गावाकडे गेले की मेटे न मोडलेले 
म्हातारे पण  ताठ कण्याचे आईवडील दिसतात. आपल्या जवळच्या मित्राचे ते आईवडिल आहे या समाधानापेक्षा असा विचार करणारी माणसं आपल्या जवळ आहे हे समाधान वाटत राहते.    
  
   

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 20, 2014

‘नोटा’ चा सोटा ‘आप’च्या पाठीत !!



                                        दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 20 मे 2014 


मोदीलाटेत सारेच वाहून गेले. आधीच शस्त्र टाकून देणारी कॉंग्रेस सोडून द्या पण स्थिर बुद्धी ठेवून विचार करणारेही वाहून जात आहेत. खरे तर समोर आलेल्या आकडेवारीचा आभ्यास करून सारासार विचार करून काही एक मांडणी केली जायला हवी.  या निवडणुकीत वरिल पैकी कुणीही नाही (नन अबाव्ह द ऑल-नोटा) चा पर्याय मतदान यंत्रावर देण्यात आला होता. हा प्रयोग यापूर्वी दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभा निवडणुकी झाला होता. या नोटाला मिळालेल्या मतांचा विचार करायला हवा. 
महाराष्ट्राचा विचार केल्यास  एकूण सरासरी मतदान 65 टक्के इतके झाले आहे. म्हणजे पहिलेच 35 टक्के लोक घरीच बसले. तरी एकूण मतदान पूर्वीपेक्षा दहा टक्क्यांनी वाढलेले आहे. अशी नेहमी मांडणी केली जाते की मतदारांना घरातून बाहेर काढणे मोठे कठीण काम आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज पाहिजे आहे. पैसे पाहिजे आहेत. इतकं करून हे लोक कुणाला मतदान करतील सांगता येत नाही. मोठे प्रस्थापित पक्ष साम-दाम-दंड-भेद वापरून मतदान करून घेतात हा आरोप छोटे पक्ष नेहमी करत आले आहेत. एखादा चांगला चारित्र्यवान बुद्धीमान उमेदवार नेहमीच असे सांगतो की आपल्यापाशी पैसे नाहीत. आपल्यापाशी ताकद नाही. आहे तो फक्त सामान्य  लोकांचा पाठिंबा. हे लोक घराबाहेर पडले आणि त्यांनी मतदान केले की आपला विजय नक्कीच आहे. 
आता हाच नेमका विचार करण्यासाखा प्रश्न आहे. मोठ्या पक्षांना मिळालेले मतदान सोडून देऊ. ते कुठल्यातरी अमिषाने पडले आहे किंवा जाहिरातींचा भडिमार झाला म्हणून पडले असे थोड्यावेळापुरते गृहीत धरू. पण जे लोक आपणहून घराबाहेर पडले. मतदान केंद्रापर्यंत गेले. त्यांची नावे गहाळ झाली नव्हती. त्यांना व्यवस्थित मतदान करता आले. आणि या लोकांनी सगळ्या उमेदवारांना नाकारून नोटा (पैसा) नाकारून नोटाचा (वरिलपैकी कुणी नाही) पर्याय निवडला त्यांचे काय? हे अपयश कुणाचे आहे? हा कुणाला इशारा आहे?
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणुका झाल्या. यात थोड्या थोडक्या नाहीत तर तब्बल 17 जागांवर दहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी नोटाचा पर्याय निवडला. हे मतदार संघ असे आहेत
बारामती- 14216, बुलढाणा-10546, दिंडोरी-10897, गडचिरोली-24488, हातकणंगले-10059, लातुर-13996, मावळ-11186, मुंबई पश्चिम-11009, नंदूरबार-21178, पालघर-21797, परभणी-17502, रायगड-20362, रत्नागिरी-12313, सातारा-10589, शिरूर-11995, सोलापुर-13118, ठाणे-13174. 
ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की घराबाहेर पडून आग्रहाने मतदान करून गडचिरोली, नंदूरबार, पालघर या भागातील आदिवासी मागास लोकांमध्ये लोकशाहीवर विश्वास दाखवावा इतकी प्रगल्भता जरूर आहे पण सोबतच सर्वांनाच नाकारायची लोकशाहीची ताकदही ते दाखवून देतात. हे मोठे विलक्षण आहे. रायगड मुंबईला लागूनच आहे. त्यामानाने विकासाची फळे जास्त चाखायला मिळाली असा ग्रामीण भाग आहे. पण तिथेही नोटाचा पर्याय लोकांनी मोठ्या प्रमाणावर हाती घेतला आहे. परभणीत सतत शिवसेनेचा खासदार निवडून येतो आणि तो पक्ष बदलून कॉंग्रेसकडे जातो. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा राग आहे. कॉंग्रेसवर तर सर्वत्रच नाराजी आहे. शरद पवार यांच्या बारामतीत आणि छत्रपतींचे वंशज असल्याचा माज दाखविणार्‍या उदयन राजे यांच्या सातार्‍यातही नोटाला मिळालेली मते मोठी आहेत.
पण हे विश्लेषण एवढ्यावरच थांबत नाही. नोटाचा सोटा कुणाच्या पाठी? असे विचारले तर याचे उत्तर या निवडणुकी ‘आप’च्या पाठी असेच द्यावे लागेल. त्याचे कारणही तसेच आहे.
सर्व प्रस्थापित पक्षांवर टिका करत आम आदमी पक्षाची स्थापना झाली. शिवाय आम्ही वेगळे आहोत असं त्यांनी आग्रहाने सांगायला सुरवात केली. पहिल्या दिवसापासून ते तसे भासवत होते. दिल्लीत सरकार आल्यावर तर ‘आप’ला जास्तीचा जोर चढला. संपूर्ण भारतात सर्वात जास्त (कॉंग्रेस-414 आणि भाजप-415) 443 जागा आम आदमी पक्षाने लढविल्या होत्या. सर्व प्रस्थापित पक्ष (यात छोटे मोठे सर्व आले) मतदारांना आमिष दाखवतात. आणि निवडून येतात. साहजिकच ‘आप’च्या मताने जे विचारी समजदार लोकशाहीवर विश्वास असणारे मतदार आहेत ते सर्व त्यांचे मतदार आहेत. अगदी एकही जागा न जिंकू शकलेल्या बहुजन समाज पक्षावरही आरोप केला जातो की दलितांची विशिष्ट मते ते खेचून घेतात बाकी त्यांना काही कुणी मोजत नाही. घरातून बाहेर न पडलेल्या मतदारांवर टिका करणे सोपे आहे. पण जे घरातून बाहेर पडले. त्यांनी मतदान केले. मात्र हे मतदान ‘आप’च्या उमेदवाराला केले नाही याचे कोणते कारण ‘आप’ देऊ शकतो?
ज्या मतदारसंघात दहा हजारपेक्षा जास्त मते नोटाला मिळाली त्यातीलही परत दहा मतदार संघ असे आहेत की ज्या ठिकाणी आम आदमीच्या उमेदवारांपेक्षाही नोटाला जास्त मतदान लोकांनी केले. (उदा परभणी. आपच्या उमेदवाराला मिळालेली मते 4459 आणि नोटाला मिळालेली मते 17502). हिंगोली आणि रायगडमध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा नोटाला मिळालेली मते जास्त आहेत.  
प्रस्थापित पक्ष म्हणजेच भाजप आघाडी आणि कॉंग्रेस हे तर नोटाचा विचारच करणार नाहीत कारण त्यांना तशी काहीच गरज नाही. निवडून येवो किंवा पडो त्यांना मिळणारी मते ही त्यांनी खेचून घेतलेली मते आहेत असंच आमचे तथाकथित विद्वान मानतात. म्हणजे आपणहून सामान्य मतदार लोकशाहीवर विश्वास ठेवून यांना मतदान करत नाही असाच यांचा आरोप असतो. इतर छोटे पक्ष यांनी आपआपले डबके तयार करून घेतले आहे. उदा. बहुजन समाज पार्टी. महाराष्ट्रात यांना ठराविक दलित मते मिळत राहतात. त्यांचा आपण विचार करण्याची काही गरज नाही असाच आव सर्वांनी आणलेला असतो. माध्यमांमधूनही बसपाची चर्चा होत नाही. ‘मनसे’ सारखे तोंडाळ आणि वाचाळ पक्ष म्हणजेच मुख्येत्वेकरून त्यांचे नेते सभेत मोठ मोठी भाषणं करत फिरतात, त्यांच्या मोठ्या बातम्या होतात. शिवसेनेलो पाडण्याचे पवित्र कार्य मागच्या निवडणुकात केल्यावर यावेळेस त्यांना लोकांनीच घरचा रस्ता दाखवला. तेंव्हा यांचाही या नोटाच्या पर्यायाशी काही संबंध नाही. त्यामुळे उरतो फक्त आम आदमी पक्ष. हे मतदान आपल्याकडे खेचण्यात आम आदमी पक्षाला अपयश आले. नोटाचा सोटा आम आदमी पक्षाच्याच पाठी बसला असेच म्हणावे लागते.  
महाराष्ट्रात जवळपास एक टक्का इतके मतदान नोटाला लोकांनी दिले आहे. बहुजन समाज पक्ष (2.6 टक्के) आम आदमी पक्ष (2.2 टक्के), मनसे (1.5 टक्के) शेकाप (1 टक्के), अपक्ष व इतर (3.3 टक्के) यांना मिळालेली मते बघितली तर नोटा ची काय ताकद आहे ते लक्षात येईल. म्हणजे महाराष्ट्रात स्वतंत्रपणे विचार करणारी आणि आपल्या विचारासाठी प्रत्यक्ष कृती करणारी माणसे चार लाख तेहतीस हजार एकशे ऐंशी आहेत हे तरी आपण मान्य करणार आहोत की नाही? 
भाजपने धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण केले यात काही शंकाच नाही. कॉंग्रेसही यात कणभर मागे नाही. उलट कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक-लांगूलचालनाच्या धोरणामुळेच भाजपचे फावले हे स्पष्ट आहे. डाव्यांच्या नेतृत्वाखालची तिसरी आघाडी नावाची गोष्ट आजी आजोबांनी नातावांना सांगावी तशी ‘आटपाट नगर होते, तिथे एक गरीब तिसरी डावी आघाडी रहात होती’ अशी उरली आहे. अशावेळी महाराष्ट्रात चार लाखांपेक्षा जास्त लोक नोटाचा पर्याय निवडतात हे विचार करण्यासारखे आहे. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575