दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 10 जून 2014
राम
पटवर्धन हे मराठीतील ज्येष्ठ संपादक. मराठी साहित्य विश्वात सर्वात जास्त
चर्चिल्या गेलेल्या ‘सत्यकथा’ मासिकाचे संपादक म्हणून राम पटवर्धन
सर्वांना परिचित होते. वृद्धापकाळाने 86 व्या वर्षी मंगळवार 3 जून रोजी
त्यांचे निधन झाले. एका तरूण मुलाने विचारले, ‘‘संपादक म्हणजे ते काय करत
होते?’’ संपादक म्हणून नेमके काय काम करावे लागते हे समजावून सांगायची वेळ
आता आली आहे. वर्तमानपत्राचा संपादक म्हणजे काय हे थोड्याफार जणांना माहित
असते पण वाङ्मयिन नियतकालिके, प्रकाशन गृहे यांत संपादकाची भूमिका काय हे
माहित नसते.
लेखक लिहीतो तेंव्हा त्या मजकुरातील सुसंगती, लेखनातील वैचारिक
सामाजिक भूमिका, काळाचे संदर्भ, व्यक्तिरेखा अशा कितीतरी बाबी तपासाव्या
लागतात. या गोष्टी लेखकाला शक्य होतातच असे नाही. कथा, कादंबरी सारख्या
मोठ्या गद्य लिखाणात तर वरील बाबी तपासणे फार गरजेचे असते. अशावेळी
प्रकाशनगृहांना संपादकाची गरज पडते. काहीवेळा एखाद्या विषयावर पुस्तक लिहून
घ्यायचा असेल तर संपादकाची भूमिका फारच महत्त्वाची बनते.
राम पटवर्धन हे अव्वल दर्जाचे संपादक होते. 1987 मध्ये ते निवृत्त
झाल्यानंरही संपादनाची कामे करीत होते. अगदी अलिकडच्या काळातील ‘आश्रम
नावाचे घर’ हे अचला जोशी यांचे पुस्तक त्यांनी संपादित केले होते. आजही ते
पुस्तक वाचताना अचला जोशी यांच्या प्रतिभेच्या जोडीलाच पटवर्धनांच्या
संपादकीय गुणांचीही आपल्याला जाणीव होते.
संपादनाचे काम स्पष्टपणे समोर दिसत नाही. त्याचे योग्य ते श्रेय मिळत
नाही. त्यामुळे कितीतरी पुस्तकांची कामे करूनही त्याचे पुरेसे श्रेय
पटवर्धनांना मिळाले नाही हे सत्य आहे. पण एक मोठं काम त्यांच्या हातून घडले
आणि आजही त्यांच्या प्रतिभेचा, बुद्धिमत्तेचा पुरावा म्हणून ते आपल्यासमोर
आहे.
मार्जोरी किनन रॉलिंग्ज या अमेरिकन लेखिकेच्या ‘द इयरलिंग’ कादंबरीचा
अनुवाद पटवर्धनांची ‘पाडस’ या नावाने केला आहे. मराठीतील उत्कृष्ठ
अनुवादाचा नमुना म्हणून हे पुस्तक मराठी वाचकांसाठी आज उपलब्ध आहे.
मूळ
पुस्तक ज्यांनी वाचले असेल त्यांनी परत हा अनुवादही वाचुन पहावा. मराठीत
असे फार थोडे अनुवादक आहेत की ज्यांना मूळ पुस्तकाइतकीच उंची अनुवादातही
गाठता आली. जी.ए.कुलकर्णी यांनी अनुवाद केलेली कॉनराड रिश्टर यांची पुस्तके
(रान, शिवार, गाव, रानातील प्रकाश), श्रीकांत लागुंनी जॉर्ज ऑरवेलच्या
‘ऍनिमल फॉर्म’चा केलेला संक्षिप्त अनुवाद, भारती पांडे यांनी पर्ल बक च्या
‘द गुड अर्थ’ चा ‘काळी’ नावाने केलेला अनुवाद, उमा कुलकर्णी यांनी
एस.एल.भैरप्पा यांच्या पुस्तकांचे केलेले अनुवाद (पर्व, तंतू, दाटू,
वंशवृक्ष, आवरण) अशी फार थोडी उदाहरणे मराठीत आहेत.
‘पाडस’ ही अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यातील जंगलात राहणार्या बॅक्स्टर
कुटूंबाची कथा आहे. जंगल साफ करून तिथे शेती करत जगण्याचा संघर्ष करणारे
हे कुटूंब. निसर्गाशी, हिंस्त्र प्राण्यांशी संघर्ष करायचा शिवाय
त्यांच्याशी मैत्रीही ठेवायची अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. आई,
वडिल आणि बारा वर्षांचा लहान मुलगा ज्योडी असे हे छोटेसे कुटूंब. निरागस
विश्वात वावरणार्या ज्योडीला हरणाचे एक गोंडस पाडस मिळते. त्याला त्याचा
अतोनात लळा लागतो. पण हे पाडस जेंव्हा मोठे होते आणि शेती उद्ध्वस्त करायला
लागते तेंव्हा त्याच्याशी असलेला लळा तोडून त्याला शिस्त लावण्याचा आग्रह
ज्योडीचा बाप पेनी धरतो. अखेरीस जेंव्हा शेतातील धान्य उद्ध्वस्त करणार्या
पाडसाला पेनी गोळी घालतो तेंव्हा चिडून ज्योडी घर सोडून निघून जातो. भटकत
असताना त्याला जीवनाच्या संघर्षाची खरी जाणीव होते. भूक म्हणजे काय हे
त्याला कळते. रानावनात भटकणार्या छोट्याशा ज्योडीची मानसिकता रंगवताना मूळ
मजकुराचा जो अनुवाद पटवर्धनांनी लिहीला आहे तो फारच अफलातून आहे, ‘‘भूक
म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे अशी त्याची कल्पना होती. त्याला ठाऊक
असलेली भूक ही काहीशी सुखाची जाणीव होती. आता त्याला कळलं की ती केवळ अन्न
खाण्याची इच्छा होती. उलट ही भूक अगदीच वेगळी होती. ही फार भयानक होती. ही
त्याला अख्खा तोंडात टाकू शकत होती आणि हिची नखं त्याच्या मर्मापर्यंत पोचत
होती.’’
भूकच माणसाला खाऊन टाकते असं लिहून पटवर्धनांनी फारच नेमकेपणाने
शेतीच्या सुरवातीच्या काळातील माणसाच्या मन:स्थितीचे वर्णन केले आहे. बरं
हे वर्णन करताना मूळ लेखिकेने किंवा अनुवाद करताना पटवर्धनांनी कुठेही
आक्रस्ताळी अशी डावी भूमिका मांडलेली नाही. निसर्गाशी अन्नाचा संघर्ष
करताना त्यातील स्वाभाविकताच या कादंबरीत सर्वत्र आढळून येते. हे एक फार
मोठे बलस्थान या कादंबरीचे आहे. पटवर्धनांनीही ते ओळखून त्या पद्धतीने शब्द
वापरले आहेत हे फार महत्त्वाचे.
घरातून पळून गेलेला ज्योडी जगण्याचा अस्सल अनुभव घेऊन परत येतो. परत
आलेल्या ज्योडीला त्याचा बाप पेनी जवळ घेतो. त्याच्या थंड पडलेल्या हातांना
चोळीत राहतो. पेनीची गरम आसवं त्याच्या हातावर पडतात. जीवनाचे तत्त्वज्ञान
अतिशय सोप्या भाषेत पेनी पोराला समजावून सांगतो. ‘‘माणसांच्या दुनियेत काय
चालतं ते पाहिलं आहेस तू. नीचपणा, दुष्टपणा करणारी माणसं तुला माहित आहेत.
मृत्यूच्या युक्त्याप्रयुक्त्या तू पाहिल्या आहेस. भूक आणि उपासमार म्हणजे
काय ते तुला कळलं आहे. जीवन सुंदर आणि सोपं असावं असं प्रत्येकालाच वाटत
असतं. जीवन सुंदर आहे पोरा, फार सुंदर आहे. पण ते सोपं मात्र नाही.’’
घरची शेतीवाडी सांभाळायचं आश्वासन ज्योडी आपल्या बापाला देतो आणि ही
कादंबरी संपते. राम पटवर्धनांची जी भाषा वापरली आहे ती पाहता पात्रांची
नावं सोडली तर ही कादंबरी आपल्याच प्रदेशातील जंगलं तोडून शेती करू
पाहणार्या आपल्या पूर्वजांचीच आहे असं वाटत राहतं.
बंगालीत विभुतिभुषण बंदोपाध्याय यांची ‘आरण्यक’ ही कादंबरी जंगल हटवून
शेतीसाठी जमिन तयार करणे या विषयावरच आहे. आपल्या प्रदेशातील एक फार
अप्रतिम प्रसंग इतिहासातील आहे. पुण्याच्या परिसरातील उजाड झालेली जमिन
सोन्याचा फाळ लावून शिवाजी महाराजांनी नांगरली. आजूबाजूचा जास्तीत जास्त
प्रदेश शेतीखाली येईल हे पाहिले. शेती करणार्यांनी नांगराचे लोखंड वितळवून
तलवारी केल्याआणि राज्य स्थापन केले असा आपला इतिहास आहे. सैनिक लढाईतून
परतून परत शेती करत. शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे शेतीच्या संघर्षाची
अन्नाच्या संघर्षाची गाथा आहे हे आपण विसरतो. मिर्झा राज्यांशी झालेला तह
जून महिन्यातील मृग नक्षत्र लागण्याच्या काळातला आहे. राज्यातील शेती
वाचावी म्हणून महाराजांनी तह केला. यावर मराठी प्रतिभावंतांनी लेखन व्हायला
पाहिजे.
पटवर्धनांच्या माघारी शिल्लक राहणारे काम म्हणजे पाडस ही कादंबरी.
कलावंत साहित्यीकांच्या स्मारकांची हेळसांड आपण खुप केलेली आहे आणि करतही
आहोत. मोठमोठ्या लेखकांच्या स्मारकांची पुतळ्यांची वाट आम्ही लावली आहे.
तिथे राम पटवर्धनांसाठी कोणी काही करेल याची शक्यता फारच कमी आहे.
बोरकरांनी लिहून ठेवले होते
मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्रफुलांची छत्री
त्या
प्रमाणेच ‘पाडस’ सारखा अनुवाद राम पटवर्धनांच्या समाधीवर चंद्रफुलांची
छत्री धरून मराठी वाचकांच्या कायम स्मरणात राहिल. पटवर्धन कायम स्मरणात
राहतील ते ‘पाडस’वाले पटवर्धन म्हणूनच.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment