Tuesday, June 17, 2014

अहिल्याबाई होळकरांचा वेगळा पैलू


                              दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 17 जून 2014 


अहिल्याबाई होळकरांची जयंती नुकतीच साजरी झाली. (जन्म 31 मे 1725, मृत्यू 23 ऑगस्ट 1795) बर्‍याच ठिकाणी पिवळे झेंडे नाचवित उत्साहात मिरवणुका निघाल्या. अहिल्याबाईंची साध्वी अहिल्याबाई अशी प्रतिमा तयार करण्यात आली आणि तिच जनमानसात रूजली. ज्याने कोणी पहिल्यांदा डोक्यावर पदर, कपाळावर भस्माचा आडवा पट्टा, डाव्या हातावर शिवलिंग, उजव्या हाताने त्यावर बेलाचे पान वहात धरलेली सावली हे चित्र काढले असेल त्या कलाकाराला याची कल्पनाही नसेल अशा कृतीने एक महान स्त्रीच्या मुत्सद्देगिरीकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत. 
महात्मा गांधींच्या चळवळीचे वर्णन साध्या शब्दांत ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमतीके संत तूने कर दिया कमाल’ या गाण्यात नेमके केले गेले आहे. पण गांधींच्या दोनशे वर्ष आधी हाती शस्त्र न घेता, धर्माचा चांगल्या अर्थाने वापर करून एक विधवा स्त्री आपला वचक भारतीय राजकारणावर निर्माण करते हे आपण लक्षात घेत नाही. विनया खडपेकर यांनी ‘ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर’ या पुस्तकांत (राजहंस प्रकाशन) अहिल्याबाईंचा मुत्सद्दीपणा अभ्यासपूर्वक मांडला आहे. प्रभावी राजकारणी अशी त्यांची प्रतिमा पहिल्यांदाच उजळून निघाली आहे. 
अहिल्याबाईंचे पहिले पत्र उपलब्ध आहे तेच मुळी त्यांच्यातील करारीपणाचे दर्शन घडविणारे. तेंव्हा त्या गादीवर बसल्याही नव्हत्या. त्यांच्या पतीने खंडेराव होळकरांनी पंढरपुरच्या विठोबाच्या नैवेद्यासाठी वार्षिक पैशाचा करार लावून दिला. त्यासोबत अहिल्याबाईंनी रूक्मिणीसाठी दागिने पाठविले. खंडेराव होळकर लिहीतात  ‘....प्रतिवर्षी श्रीला महानैवेद्य पोहोचता करणे. यास अंतर करू नये हे विनंती.’ पण तेच अहिल्याबाईंची भाषा पहा. रूक्मिणीच्या पूजेचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्या उत्पातांना त्या लिहीतात, ‘... आईचे पायेचा रमझोन सोन्याचा बाळोजी नाटे यांज बरोबर पाठविला आहे. तरी प्रत्यही भोगवीत जाणे. यात अंतर पडिले तर उत्तम नसे. येविशीचा जाबसाल तुम्हास पुसिला जाईल.’ (6 एप्रिल 1750)
जाबसाल पुसण्याची भाषा त्यांच्या अंगातील धमक दाखविते. सासरा, पती, नवरा यांच्या निधनानंतर खचून न जाता अहिल्याबाईंनी समर्थपणे संस्थानच्या कारभाराची धुरा सांभाळली. आपल्याला वारस ठरवून हाती सत्ता भेटेल हे इतके सोपे नाही हे त्या ओळखून होत्या. होळकर घराण्यातील तुकोजी होळकर हे गादीवर बसण्यासाठी उत्सूक होते. पण अहिल्याबाईंनी मोठ्या मुत्सद्दीपणाने पेशव्यांकडे पत्र पाठविले आहे. ‘‘... मी खासगी व दौलत असे दोन्ही अधिकार आजपावेतो चालवून होळकरांचे नाव कायम ठेविले असून. तुकोजीराव होळकर सरकार चाकरीचे उपयोगी समजून त्यांचे नावे वस्त्रे यावीत म्हणून विनंती.’’
तुकोजी होळकर हे सरकारी चाकरी म्हणजे मुलूखगिरी करतील लढाया करतील  पण अधिकार मात्र माझ्याकडे राहिल हे सुचवून त्यांनी पेशव्यांनाही चकित केले आहे. पुढे प्रत्यक्ष तसे वागुन अहिल्याबाईंनी आपला दराराही दाखवून दिला. खरं तर लढाईत खुन खराबा, पैशाची नासडी फार होते आणि निष्पन्न काहीच होत नाही याची जाणिव अहिल्याबाईंना आपल्या सासर्‍यांच्या हाताखाली कारभार करतानाच आली होती. मल्हारराव होळकर यांनी युद्धभूमिवर जे यश मिळविले त्याबरोबर मुलकी कारभारातही त्यांनी यश मिळविले. सामाजिक/धार्मिक प्रश्न सोडविण्यातही ते कुशल होते.  इंदोरच्या खेडापती मारूतीच्या पुजेचा एक बखेडा उत्पन्न झाला होता. मुरादशहा फकीर हे मुस्लिम संत त्या मारूतीची पुजा करत असत. त्यावरून समाजात अस्वस्थता निर्माण झाली. तेंव्हा मल्हारराव होळकरांनी महंत बैरागी रूपदासबाबा यांच्यावर ही पुजेची जबाबदारी दिली. मुरादशहा फकिरास तीन बिघे जमिनीवर (3 हजार स्क्वे.फु) मोठा वाडा उभारून त्याची सोय लावून दिली. हे अहिल्याबाईंनी ध्यानात ठेवले. पुढे त्यांनी धर्मासंबंधी जे धोरण अवलंबिले त्यावरून हे स्पष्ट होते. इंदोरात कामाला येणार्‍या लोकांसाठी ‘सरकारी वाडा असताना तूम्ही इतरत्र मुक्काम करू नये’ अशी सुचनाच मल्हारराव होळकरांनी केलेली होती. कारण कामासाठी येणारे कमाविसदार, मामलेदार, देशमुख, देशपांडे बाहेर राहिले तर दुसर्‍यांशी त्यांची जवळीक होऊन कारस्थाने शिजण्याची शक्यता. त्यापेक्षा ते सरकारी वाड्यात राहिले तर त्यांची जवळीक प्रत्यक्ष मल्हाररावांशीच होणार. हे सारे अहिल्याबाई पहात होत्या. 
अहिल्याबाईंसमोर खरा पेचप्रसंग राघोबादादा पेशव्यांनी निर्माण केला. दत्तकाचे निमित्त पुढे करून राघोबादादांना इंदोरवर हक्क मिळवायचा होता. त्यांच्या वकिलाला बाणेदार उत्तर देत अहिल्याबाईंनी गार केले. ‘कैलासवासी सुभेदारांच्या वारसांतल्या एकाची मी पत्नी आहे आणि दुसर्‍याची माता आहे. दत्तक वारस निवडायचाच तर तो आमचा अधिकार आहे. खुद्द पेशव्यांनीही त्यात ढवळाढवळ करणे नाही.’ आपणांस भेटावयास आलेल्या राघोबादादा पेशव्यांना त्या आपणहून वाजत गाजत हत्तीवरून मिरवत आपल्या सत्तेचे प्रदर्शन करीत निघाल्या.  वाटेत सर्व जनता त्यांना आपली राणी म्हणून मान देत होती. अशा प्रकारे जनतेचे दडपण आणून त्यांनी राघोबादादांना युद्धाशिवाय गार केले. माधवराव पेशव्यांनी अहिल्याबाईंच्या नावे पत्र देऊन त्यांना राज्य चालविण्याचा अधिकार दिला आणि होळकरशाहीच्या वारसाचा प्रश्न मिटवला. 
अहिल्याबाईंची मुत्सद्देगिरी ही की त्यांनी इंदूर सोडले व महेश्वर आपल्या राज्यकारभारासाठी निवडले. कारण महेश्वर ही होळकरांची खासगी जहागिर होती. त्यावेळच्या संकेताप्रमाणे खासगी जहागिरीवर आक्रमण करता येत नव्हते. अगदी खुद्द सातारचे छत्रपती किंवा पेशव्यांचेही हात तिथे पोचू शकत नव्हते. इतिहासात या शहराला मोठे महत्त्व होते. ते स्थानमहात्म्यही अहिल्याबाईंच्या कामा आले. शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा गाजलेला वादविवाद याच शहरात झाल्याची अख्यायिका आहे. मंडनमिश्रांच्या पत्नीने या निवाड्यात न्यायाधिशाची भूमिका बजावली होती. त्याच जागी बसून अहिल्याबाईंनी राज्यकारभार पहावा यालाही एक वेगळा अर्थ आहे.
त्या काळातील राजकारणाचीही त्यांची जाण अतिशय बारीक होती. सवाई माधवराव पेशव्यांचे पुण्याला लग्न होते. त्या वेळी तुकोजी होळकर तिथे हजर राहिले. पण महादजी शिंदे मात्र दिल्लीच्या राजकारणाच्या धामधुमीत होते. त्यांनी दिल्लीवर कब्जा याच काळात मिळवला. पुण्याच्या लग्नापेक्षा दिल्लीच्या सिंहासनाचे राजकारण महत्त्वाचे हे अहिल्याबाई जाणून होत्या. ‘तुकोजीबाबा पाटीलबाबांस (महादजी शिंदे) सामील असते तर या यशकीर्तीस पात्र ठरले असते. तिकडे पुण्यास जाऊन काय मेळविले?’ असे उद्गार त्यांनी काढले. 
पुण्याची पेशवाई उताराला लागलेली, दिल्लीच्या बादशाहीचे काही खरे नाही, मराठ्यांची राजधानी सातारा दुबळी झालेली अशा स्थितीत अहिल्याबाईंनी कारभार केला. मठ मंदिरे देवळे नदीवर घाट यांची उभारणी केली तर त्या त्या परिसरात शांतता पसरेल. आणि मुख्य म्हणजे त्या काळातील जनतेच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल परिणामी आपल्याला चांगला राज्यकारभार करणे शक्य होईल. हे त्यांचे अनुमान त्या काळातील दुसर्‍या कुठल्याच राज्यकर्त्याला काढता आले नाही. धर्मभोळेपणापेक्षा समाजाचे अस्तित्व आणि अस्मिता जागविण्याची त्यांची भूमिका होती हे विनया खडपेकर यांचे निरीक्षण फारच नेमके आणि महत्त्वाचे आहे. 
काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार, गंगेवरील मनकर्णिका घाट, परळीच्या वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार, सोमनाथचे मंदिर, वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, केदारनाथ बद्रीकेदार, उज्जैन, जगन्नाथपुरी येथील पुजेची व्यवस्था अशी कितीतरी ठिकाणांनी अहिल्याबाईंची आठवण जागती ठेवली आहे. 
दुसर्‍या महायुद्धानंतर सर्व जगाला युद्धाची किंमत काय मोजावी लागते हे स्पष्टपणे उमगले. व त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना (डब्लू.टि.ओ.) झाली. अहिल्याबाईंच्या काळात जागतिक  व्यापार ही संकल्पना नव्हती. पण त्यांनी   लढाईची विनाशकता ओळखली व आयुष्यभर ती  टाळून शांतता प्रस्थापित करत यशस्वी करभार करून दाखवला हे फार महत्त्वाचे.  
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

1 comment: