दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार २४ जून २०१४
तृतियपंथीयांवरच्या ‘जयजयकार’ या मराठी चित्रपटाने कलेतून सामाजिक समस्या मांडायचे अवघड काम यशस्वीरित्या पार पाडले आहे. एखाद्या कर्तृत्वहीन माणसाला ‘छक्का’ म्हणून शिवी दिली जाते. बहुतांश तृतियपंथीयांनाही काही न करता भीक मागणे हा आपला हक्कच आहे असे वाटते. या सगळ्याला छेद देणारी मांडणी ‘जयजयकार’ या चित्रपटातून दिग्दर्शक शंतनू रोडे याने केली आहे. कोवळ्या वयातील ‘लाजो’ ला मेजर अखंड बनलेले दिलीप प्रभावळकर अतिशय सोप्या पद्धतीने त्याची समस्या उलगडून दाखवतात. काम करण्यात काय लाज आहे? जे अपंग आहेत ते आपल्या अवयवाच्या कमकुवतपणाचा कुठे बाऊ करतात. मग तूम्ही कशाला करता? मेजर अखंड यांच्या तोडी जी व्याख्या दिग्दर्शकाने दिली आहे, ‘काम करी तो पक्का। आयते खाई तो छक्का ॥' यातच सारे सार आले आहे.
दिग्दर्शक शंतनू रोडे, मावशीची अफलातून भूमिका करणारा संजय कुलकर्णी सुगांवकर व मेजर अखंड साकारणारे दिलीप प्रभावळकर या तिघांनी हा चित्रपट पेलला आहे. मेजर अखंड यांच्या साथीला पार्वतीची भूमिका साकारणार्या सुहिता थत्ते (यदुनाथ थत्ते यांची मुलगी) व मावशीच्या सोबत तीन तृतीयपंथी रंगवणारे लाजो (आकाश शिंदे), राणी (धवल पोकळे), चंपा (भुषण बोरगांवकर) यांनीही अतिशय उत्तम साथ दिली आहे.
चित्रपटाचे कथानक साधे आहे. रेल्वेत भीक मागणार्या तृतियपंथीयांवर चोरीचा आळ त्यांच्यावर येतो. लोक त्यांच्या मागे लागतात. पळत पळत ते एकटे राहणार्या मेजर अखंड यांच्या घरात रात्रीच्या आसर्यासाठी शिरतात. मग मेजरसाहेबांच्या घरातील अंगठी नाहीशी होणे, ती सापडणे आणि त्या निमित्ताने ‘लाजो’ला मेजरसाहेबांनी घरात आणणे. तिच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे. मग बाकीच्याही तीन तृतियपंथीयांचे पुनर्वसन करणे. गावाचा असलेला विरोध. या सगळ्यातून चित्रपट खुलत जातो. तृतियपंथीयांना आपण माणूस म्हणून समजून घ्यायला पाहिजे हा अतिशय साधा सोपा वाटणारा पण वास्तवात अवघड असा संदेश प्रेक्षकाच्या मनात ठसतो.
ही कथा घेवून हा तरूण दिग्दर्शक बर्याच जणांकडे फिरला. पण या कथेत कुणाला फारसा रस दिसला नाही. म्हणून शंतनू रोडे याने स्वत:च हा चित्रपट काढला. चित्रपटात तांत्रिक चुका आहेत, गती अजून वाढवायला हवी, गांव नेमके कुठले आहे ते स्पष्ट होत नाही अशा कितीतरी चुका काढता येतील. पण त्याला काही अर्थ नाही. जो प्रयत्न हा दिग्दर्शक करतो आहे ते समजून घेतले पाहिजे.
तृतियपंथी म्हटले की समोर येणारी व्यक्ती आणि तिची बंबईया हिंदी भाषा हे घट्ट समिकरण डोक्यात येते. इथे शंतनू रोडे याने मावशीसाठी मराठवाडी भाषा, चंपासाठी विदर्भाची भाषा, लाजोची शहरी प्रमाण भाषा तर राणीची साधी हिंदी असा अफलातून प्रयोग केला आहे. अख्खा चित्रपट तृतियपंथीयांवर आहे पण कुठेही तो बिभत्स होणार नाही याची अतोनात काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.
या सर्वांनी भीक मागणे सोडून आपल्या पायावर उभे रहावे असा प्रयत्न मेजरसाहेब करतात. काही दिवसांतच याला कंटाळून परत आपण भीक मागू असा प्रस्ताव मावशी मांडते. खेळण्याचे दुकान चालविणारी चंपा म्हणते ‘नको मावशी. माझ्या दुकानात कितीतरी छोटी छोटी पोरं येतात. ते मला ताई म्हणतात.’ समाजाशी आपण चांगल्यापद्धतीने जोडल्या जावे ही त्यांची तळमळ दिसून येते. राणी जी नटण्या मुरडण्यात रस घेणारी असते. ती ब्युटी पार्लर चालवायला लागली आहे. ती असे म्हणते, ‘गावातल्या बायकांचा माझ्यावर विश्वास बसला आहे. त्या आता माझ्याकडूनच मेकअप करून घेतात.’
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात परेश मोकाशी यांनी फाळकेंच्या व्यक्तिरेखेला मिश्किल रंग देवून चांगला परिणाम साधला होता. तसेच ‘जयजयकार’ या चित्रपटात शंतनू रोडे यांनी मेजर अखंड या भूमिकेला गंमतीदार व्यक्ती बनवून प्रेक्षक खिळवून ठेवला आहे. दिलीप प्रभावळकर यांनी ही भूमिका फारच प्रभावीपणे साकारली आहे. समाजसेवा करणारी व्यक्ती बर्याचदा एकारली जाते. मग त्याच्या आजूबाजूची माणसेही करवादतात. आपण काही फार मोठं काम करतो आहोत याचेच दडपण ते इतरांवर सतत आणत राहतात. परिणामी माणसे जवळ यायच्या ऐवजी दूर जातात. पु.ल. देशपांडे म्हणतात ‘मोहाचा त्याग करणे सोपे आहे. पण त्यागाचा मोह आवरणे खरेच कठीण.’ मेजर अखंड ही व्यक्ती जीवनाचा आनंद घेताना आपले दु:ख विसरून इतरांना मदत करू पाहते. यात कुठलीही कृत्रिमता नाही. चारही तृतियपंथीयांच्या मनात सारखी शंका असते या म्हातार्याला आपल्यासाठी काही का करावं वाटतं आहे? याचा काय स्वार्थ आहे? मावशी व मेजर यांच्यातील एका प्रसंगातून याचा साधेपणाने उलगडा दिग्दर्शकाने करून वेगळीच उंची गाठली आहे.
‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’ या नावाचा एक लेख शरद जोशींनी लिहीला होता. समाजसेवा ही मनातून उगवली पाहिजे. कुठल्याही बाह्य दडपणाखाली ती केली की त्याचा बोजवारा उडतो असा त्याचा आशय होता. या चित्रपटात मेजर अखंड यांच्या घरात तृतियपंथी शिरतात. मुद्दाम तृतियपंथीयांच्या शोधात मेजर निघालेले नाहीत.
तृतियपंथीयांकडे वासना शमविण्याचे साधन म्हणून समाजाचा दृष्टिकोन दाखविणारा एकच प्रसंग आणि तोही अतिशय संयमाने रंगविला आहे. लाजो हा कोवळा पोरगा रेल्वेत भीक मागताना एका तरूण पोरांच्या टोळक्याच्या तावडीत सापडतो. त्यावेळी मावशीची भूमिका करणार्या संजय कुलकर्णी यांनी अप्रतिम बेअरिंग सांभाळत प्रसंग रंगविला आहे. सर्व चित्रपटात तृतियपंथीयांची बाजू संयमाने आणि परिणामकारण पद्धतीने संजय कुलकर्णी यांनी दाखविली आहे. मेजर कडे पहिल्यांदा काम करण्यासाठी लाजो जाणार आहे. त्यासाठी राणी व चंपा तयार नाहीत. पण मावशी तीच्या पाठीशी उभी राहते आणि तीला जाऊ देते. रात्री लाजोला जवळ घेवून झोपणं असो की सर्वांना चुलीवर रांधून खाऊ घालणं असो यातून तृतियपंथीयांना बांधून ठेवणारा धागा हे मावशीचे रूप ठळकपणे समोर येते. तृतियपंथीयांची मावशी म्हणजे हिजड्यांची फौज पदरी बाळगणारी, त्यांचे शोषण करणारी अशी व्यक्तिरेखा आत्तापर्यंत रंगवली गेली आहे.‘जयजयकार’ चित्रपटात पहिल्या दृश्यापासून ते शेवटपर्यंत कुठेही ही व्यक्तीरेखा तशी न होता एक सामान्य माणूस कशी आहे तीलाही भावभावना कशा आहेत, बरोबरच्या इतर तृतियपंथीयांवर तिने मायेची पाखर कशी घातली आहे याचे सुंदर चित्रण यात आले आहे.
एक अतिशय वेगळा प्रयोग साधणार्या या चित्रपटाकडे केवळ चित्रपट म्हणून पाहू नये. सहा कैद्यांना घेवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयोग ‘दो आंखे बारा हाथ’ चित्रपटात व्हि.शांताराम या मराठी माणसाने रंगविला होता. आता शंतनू रोडे या मराठी तरूणाने चार तृतियपंथीयांच्या पुनर्वसनाचा विषय चित्रपटातून मांडला हा एक वेगळाच योगायोग. अभिजीत जोशी या तरूण संगीतकाराने ‘चांदण्या गोंदल्या बाई’ हे एकच गाणे मोठे श्रवणीय बनवले आहे.
‘काम करी तो पक्का । आयते खाई तो छक्का ॥ही नवी म्हण सार्थक करण्यासाठी हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी आवश्य पहावा. नसता ‘मराठी सिनेमा । कुणी पाहिना॥ही वेळ येईल. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे शो प्रेक्षकांअभावी बंद पडत आहेत. नुसते अनुदान देऊन आणि मराठीसाठी ‘खळ खट्ट्याक’ करून काही होणार नाही. चांगल्या चित्रपटांना पदरचे पैसे खर्चून प्रतिसाद द्यायची जबाबदारी आपलीच आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ९४२२८७८५७५