उरूस, 21 नोव्हेंबर 2021
उसंतवाणी- 238
(वीर दास या स्टँडअप कॉमेडियनने भारतावर टिका करताना स्त्रीची सकाळी पुजा करतात आणि रात्री तिच्यावर बलात्कार करतात असे शब्द वापरले. त्यावरून मोठा संताप सामान्य भारतीयांत उसळला.)
पहाटेला देवी । म्हणोनिया हार ।
रात्री बलात्कार । भारतात ॥
स्त्रीचा उपमर्द । करी ‘वीर दास’ ।
मारावे पन्नास । जोडे त्याला ॥
परदेशी करी । स्वधर्माची निंदा ।
किफायती धंदा । स्टँडअप ॥
समर्थना धावे । लिब्रांडूंची फौज ।
पुरोगामी मौज । हिंदूद्वेष ॥
दिनभर रोजा । रेप करी रात्री ।
आहे दम गात्री । बोलण्याचा? ॥
शांत सहिष्णु जो । त्याला देती लाथा ।
धर्मांधांना माथा । मिरवती ॥
ऐसा ‘वीर’फेडी । हिंदुत्वाचे पांग ।
तुळशीत भांग । कांत म्हणे ॥
(19 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी- 239
(तीनही कृषी कायदे मोदींनी मागे घेत असल्याची घोषणा पहाटे केली. यातून झुंडशाही पुढे मोदींनी शेपूट घातली हेच सिद्ध होते. )
झुंडशाहीपुढे । घालती शेपूट ।
कायदे निमूट । घेती मागे ॥
मातीमोल होवो । शेती शेतकरी ।
‘इंडिया’ ही खरी । व्होट बँक ॥
काहीही होवू दे । तरी बेहत्तर ।
तीनशे सत्तर । हटविले ॥
सीएए आणिक । ट्रिपल तलाक ।
आणुनिया धाक । बसविला ॥
परि शेतीसाठी । वाघ बने शेळी ।
गप्प आळीमिळी । क्षणार्धात ॥
देशद्रोही सार्या । डंकेल बीटीच्या ।
झीरो बजेटच्या । खेळी यांच्या ॥
कुणब्याला आता । कुणी नाही वाली ।
काळरात्र आली । कांत म्हणे ॥
(20 नोव्हेंबर 2021)
उसंतवाणी-240
(शाळांमधून मराठी सक्तीची करण्यात आली. ज्या शाळां हे पाळणार नाहीत त्यांना एक लाख रूपये दंड आकारण्यात येईल असे महाराष्ट्र शासनाकडून जाहिर करण्यात आले. )
मराठी भाषेची । शाळांतूनी सक्ती ।
जडते का भक्ती । जबरीने? ॥
भाषेपाठी हवी । ताकद भक्कम ।
मोजूनी रक्कम । व्यवहार ॥
सर्वत्र हवा तो । भाषेचा वापर ।
नसता खापर । फुटणार ॥
भाषा वाढते ना । काढल्याने गळा ।
वाढल्याने लळा । वाढते ती ॥
अनुभवे होते । भाषा ही समृद्ध ।
परभाषा युद्ध । जिंकावया ॥
ज्ञानाच्या तुक्याच्या । भाषेत गोडवा ।
अक्षर पाडवा । मनोहारी ॥
कांत मराठीचा । ताठ आहे कणा ।
डिवचता फणा । काढते ही ॥
(21 नोव्हेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575