Wednesday, September 29, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६२



उरूस, 28 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 184

(संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी ज्यो बायडेन यांच्यासाठी एक ट्विट केले. त्यात भारतातील किसान आंदोलनाची दखल घेवून मोदींना समजावून सांगा असा आग्रह धरला आहे.)

टिकैत करतो । बीडेनला ट्विट ।
नवे टूलकिट । जाणा जरा ॥
बायडेन तुला । घालतो साकडे ।
सांग बोल खडे । मोदीसाठी ॥
‘कनुन वापसी’ । अडकली गाडी ।
गवसेना नाडी । किसानांची ॥
बोलभांड खुप । पुरोगामी दर्दी ।
शेतकरी गर्दी । जमेचीना ॥
सर्वौच्च कोर्टात । आता आहे चेंडू ।
कोणाशी मी भांडू । कळेचीना ॥
पत्रकार आता । पाहतात टाळू ।
कुणासाठी गाळू । अश्रु दोन ॥
परक्या दाराशी । घरचे भांडण ।
बुद्धीचे कांडण । कांत म्हणे ॥
(26 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 185

(संजय राउत नेहमीप्रमाणे बेताल बोलले आहेत. 2024 पर्यंत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार, राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार यांना त्यांनी इशारा दिला आहे की मुख्यमंत्री अमित शहांना भेटले आहेत तेंव्हा लक्षात घ्या. नाना पटोले यांनी दादापेक्षा नाना मोठा असा चिमटा अजीत दादांना काढला आहे.)

नेहमीप्रमाणे । संजय उवाच ।
बोलतो उगाच । काही बाही ॥
आवेश तो पहा । ‘आता दिल्लीवर ।
आमची नजर । सज्ज रहा’ ॥
बेडकी फुगुन । होईल का बैल ।
जीभ जरी सैल । सोडली ही ॥
बोलभांड नाना । बोललेत ज्यादा ।
नानापेक्षा दादा । धाकलाच ॥
अजीत दादांची । उगा काढी खोडी ।
मित्रपक्ष फोडी । आघाडी ही ॥
राजकारण ना । स्टँडप कॉमेडी ।
जनताच वेडी । पाहणारी ॥
घालविली पत । नको ते बोलुन ।
इज्जत खोलुन । कांत म्हणे ॥
(27 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-186

(संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदचे आवाहन केले. त्याला लोकांनी अतिशय अल्प असा प्रतिसाद दिला. कांही जागी जाणीवपूर्वक मोठे ट्रक लावून रस्ता अडवला गेला. परिणामी 5/10 किमी लांब चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी सामान्य लोकांना अतिशय अडचणीला तोंड द्यावे लागले. )

‘भारत बंद’चा । केला ऐसा खेळ ।
कुणाचा न मेळ । कुणापाशी ॥
कृषी आंदोलन । राहिला न मुद्दा ।
जनतेला गुद्दा । बसतसे ॥
अडवले रस्ते । वाहनांच्या रांगा ।
अरेरावी नंगा । नाच चाले ॥
संचार स्वातंत्र्य । आणले धोक्यात ।
टिकैत झोक्यात । सत्ताकांक्षी ॥
कृषी आंदोलन । राहिले न ‘कृषी’ ।
राजकीय उशी । सोयीची ती ॥
सामान्य जनता । धरली वेठीला ।
देशाच्या गाठीला । गोंधळ हा ॥
कांत कायद्याने । शोधावे तत्पर ।
प्रश्‍नाला उत्तर । आडमुठ ॥
(29 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, September 26, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६१


 
उरूस, 25 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 181

(महालक्ष्म्या गणपती हे सण झाले. कोरोना आपत्तीतही लोकांनी सण साजरे केले. अपार श्रद्धेच्या बळावर हा समाज इतकी वर्षे टिकला आहे. सातत्याने आघात होवूनही आपली श्रद्धा त्यांनी जतन केली.)

महालक्ष्म्या झाल्या । गणपती गेले ।
श्रद्धावंत डोळे । ओले ओले ॥
जगण्यावरती । कोरोनाचे वण ।
तरी केला सण । साजरा हा ॥
शतकांपासुनी । झेलुनी आघात ।
जपलेली वात । अस्मितेची ॥
बदलाची ऐसी । कित्येक वादळे ।
श्रद्धेचिया बळे । पचविली ॥
भोगल्या वेदना । पापण्याला पुर ।
सोसल्याचा सुर । होतो इथे ॥
गोदेचा गंगेचा । प्रदेश सुपीक ।
तरारले पीक । संस्कृतीचे ॥
दु:ख दळुनिया । खाती ही माणसे ।
विश्वावर ठसे । कांत म्हणे ॥
(23 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 182

(राज्यपालांनी पत्र लिहून राज्यातील महिलांवरील आत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. आणि विधीमंडळाचे अधिवेशन बोविण्याची सुचना मुख्यमंत्र्यांना केली. याला उत्तर देतांना आधी भारतातील इतर राज्यांतील स्त्री अत्याचारांची दखल घ्या आणि संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा सल्ला राष्ट्रपतींना द्या असा अगोचरपणा मुख्यमंत्र्यांनी केला.)

बाण प्रती बाण । रामायणी जैसे ।
पत्रापत्री तैसे । चाले इथे ॥
कोशियारी लिही । उद्धवासी पत्र ।
स्त्री दु:खाचे सुत्र । सांगतसे ॥
उद्धवाचे आले । रागात उत्तर ।
चालवा थुत्तर । केंद्राकडे ॥
संसदेचे आधी । बोलवा की सत्र ।
मग लिहा पत्र । आम्हाला हे ॥
उच्चपदी चाले । लेटरा लेटरी ।
खेटरा खेटरी । सामान्यांना ॥
पिडीत स्त्रियांचा । उमटे आक्रोश ।
बेधुंद बेहोश । सत्तांध हे ॥
स्त्रीच्या प्रतिष्ठेला । तुडवी जो पायी ।
रसातळा जाई । कांत म्हणे ॥
(24 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-183

(अमेरिकेत क्वॅड परिषदेसाठी पंतप्रधान मोदी गेलेले आहेत. तिथे त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. दोन मोठे लोकशाहीवादी देश एकमेकांना भेटत आहेत. त्यातून जगात सर्वत्र विकासात्मक कामासाठी लोकशाही मुल्ये रूजविली जावीत अशी अपेक्षा. )

लोकशाहीवादी । दोन मोठे देश ।
जगाला संदेश । काय देती ॥
एक लोकशाही । ज्येष्ठ जी वयाने ।
दुजी आकाराने । मोठी असे ॥
एक आधुनिक । दुसरा प्राचीन ।
भेटीमुळे चीन । चिंताग्रस्त ॥
चीन नियमांची । करी मोडतोड ।
जिरवाया खोड । सज्ज सारे ॥
अमेरिका आणि । सज्जन भारत ।
मिळविती हात । जगासाठी ॥
जग विकसेल । लोकशाहीमुळे ।
युद्ध हेच खिळे । उपटा की ॥
अमेरिका करी । शस्त्राचा बाजार ।
मुख्य तो आजार । कांत म्हणे ॥
(25 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, September 23, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६०



उरूस, 22 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 178

(किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यावर उलट त्यांच्यावरच कोल्हापुर जिल्हाबंदीचा आदेश लागू करण्यात आला. )

रोज पोलखोल । आणतोय झीट ।
सोमय्या किरीट । महाराष्ट्री ॥
कोल्हापुरामध्ये । प्रवेशाला बंदी ।
आरोपाची बुंदी । रोज पाडे ॥
पन्नास शंभर । कोटींचे आरोप ।
बदनामी खुप । होत आहे ॥
हजारो कोटींत । आमचा नंबर ।
पन्नास शंभर । शोभेची ना ॥
एकट्याच्या नको । उखाळ्या पाखाळ्या ।
पकडा महाळ्या । मुख्य तोची ॥
सेना राष्ट्रवादी । आरोपात बाजी ।
प्रकटे नाराजी । कॉंग्रेसची ॥
सत्ता म्हणजेच । भ्रष्टाचार गंगा ।
हर एक नंगा । कांत म्हणे ॥
(20 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 179
(राजस्थानमध्ये मुस्लिम जमावाने दलित तरूणांची मारहाण करून हत्या केली. यावर आता सर्व पुरोगामी चुप्प आहेत. पंजाबमध्ये दलित चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवला म्हणून स्वत:ची पुरोगामी आरती ओवाळणारे याच कॉंग्रेसची राजवट असलेल्या राजस्थानमध्ये दलितांच्या ‘लिंचिंग’बद्दल मौन बाळगतात हा दुट्टप्पीपणा आहे.)

राजस्थानमध्ये । दलिताची हत्या ।
पंजाबात सत्ता । देखावा तो ॥
दलित वापरू । इलेक्शन तोंडी ।
बाकी त्यांची कोंडी । सदोदीत ॥
जगजीवनांना । सदा वापरले ।
नाही बसवले । उच्च पदी ॥
निवडणुकीत । सुशील कुमार ।
निकाला नंतर । देशमुख ॥
हरियाणामध्ये । शैलजा कुमारी ।
सत्तेची पायरी । दुय्यमच ॥
कॉंग्रेस धोरण । बाबासाहेबांना ।
भारतरत्न ना । कधी दिले ॥
कांत राजकिय । वेशीच्या बाहेर ।
मानाचा आहेर । दलितां ना ॥
(21 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-180

(सेनेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार हे कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसणारे आहेत. ते आमचे नेते कसे काय होवू शकतील? असा सवाल करून मोठा गदारोळ उठवून दिला आहे. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत असा सुर त्यांनी आपल्या भाषणात लावला होता.)

गीतेमुळे तेंव्हा । अर्जून पेटला ।
शत्रुला खेटला । जोरदार ॥
‘गीते’मुखी आता । शब्दबाण सुटे ।
सैनिक हा पेटे । मनोमन ॥
खुपसून ज्यांनी । पाठीत खंजीर ।
सत्तेचा अंजीर । मिळविला ॥
आमुचा तो नेता । कशास म्हणता ।
राजा हा जाणता । म्हणो कुणी ॥
बाळासाहेबांचे । आम्ही निष्ठावंत ।
नाही सत्ताजंत । लाचार जे ॥
‘अनंत’मुखाने । प्रगटली वाणी ।
विद्रोहाची गाणी । ‘गीते’तुनी ॥
कांत सत्तेसाठी । असंगाशी संग ।
उडू लागे रंग । आघाडीचा ॥
(22 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Sunday, September 19, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५९



उरूस, 19 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 175

(उत्तर प्रदेश मध्ये निवडणुकांची धुळवड रंगणे सुरू झाले आहे. आत्तापासूनच विविध भडक वक्तव्यं समोर येत आहेत आणि माध्यमे त्याला जास्त भडक करून समोर आणत आहेत. )

निवडणुकीला । दिसतो तत्पर ।
प्रदेश उत्तर । ताकदीने ॥
नेता उधळतो । ऐसी मुक्ताफळे ।
शेफारती बळे । पंटर ते ॥
कुणी ‘चचाजान’ । कुणी ‘अब्बाजान’ ।
कुणी ‘हुक्मरान’ । दावा करी ॥
दोन आकड्यांत । नाही आमदार ।
जीभ सैल फार । कॉंग्रेसची ॥
हिरव्या मतांचा । ओवैसींचा दावा ।
विभाजन कावा । मतदाने ॥
बडबडीमध्ये । कुणी तैल बुद्धी ।
कुणी बैल बुद्धी । सिद्ध होई ॥
कांत मतदार । पाहती परिक्षा ।
बक्षीस वा शिक्षा । योग्य देती ॥
(17 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 176

(एका दिवसांत सव्वा दोनकोटी लस दिल्या गेल्या. हा एक प्रकारे विक्रम होता. पण यावरही विरोधकांनी राजकारण केले. मोदींच्या वाढदिवसा साठी हे नाटक होते असा आरोप केला. ‘रबीश’ मिडियाने सातत्याने कोरोबाबत नकारात्मक चित्र उभे केले आहे.)

एक दिवसांत । दोन कोटी लस ।
तरी ठसठस । पुरोगामी ॥
केले होते उभे । भितीदायी चित्र ।
मृत्यूचे विचित्र । केले दावे ॥
कोरोनाचा खोटा । खुप केला कल्ला ।
फुकटचा सल्ला । खुल दिला ॥
पत्रकारितेची । ‘रबीश’ आवृत्ती ।
ल्युटन प्रवृत्ती । देशद्रोही ॥
जळत्या प्रेतांचे । गाजविले फोटो ।
विकृत हा ‘मोटो’ । सिद्ध केला ॥
सार्‍याला पुरून । जनता उरली ।
लस टोचविली । विक्रमी ही ॥
कांत पचवुनी । आपत्ती विपदा ।
भारत सर्वदा । उद्धरला ॥
(18 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-177

(पंजाबात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेस मधील मतभेद उघडपणे चव्हाट्यावर आले.)

कॅप्टनच गेला । मागे उरे टीम ।
मिडियात मीम । फिरू लागे ॥
स्वपक्ष घाताची । किती हौस भारी ।
खुश झाली स्वारी । राहुलची ॥
सत्ता मिळवणे । कॅप्टनचा गुन्हा ।
होई पुन्हा पुन्हा । अपमान ॥
राज्यसभेमध्ये । व्हावे खासदार ।
पडावे लाचार । दिल्ली द्वारी ॥
कॉंग्रेसी नेत्यांची । हीच खरी शैली ।
सत्ता गंगा ‘मैली’ । याच पापे ॥
राज्या राज्यांमध्ये । सिद्धु पेरलेले ।
नेते घेरलेले । विद्रोहिंनी ॥
कॉंग्रेस संपवा । गांधी इच्छा पुर्ती ।
बुडू लागे मुर्ती । कांत म्हणे ॥
(19 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Thursday, September 16, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५८



उरूस, 16 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 172

(पवारांच्या टिकेला उत्तर देताना बाळासाहेब थोरात असे म्हणाले की राष्ट्रवादीने आता कॉंग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे.)

गाजली बेरकी । पवारांची बोली ।
पडकी हवेली । कॉंग्रेसची ॥
तयाला देताना । उत्तर जोरात ।
बालले थोरात । आवेशात ॥
कॉंग्रसमध्येच । करा विसर्जन ।
कशाला भजन । राष्ट्रवादी ॥
वेगळी मांडली । चुल तरीपण ।
तिला सरपण । पुरेचना ॥
वेगळी जमिन । कसण्याचे खुळ ।
मेटाकुटी कुळ । आले जणू ॥
‘देशमुखा’ पाठी । अडके ‘हसन’ ।
भविष्य भिषण । दिसतसे ॥
कांत राष्ट्रवादी । गाजराची पुंगी ।
मोडण्याची तंगी । सदोदीत ॥
(14 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 173

(कट्टरपंथीयांनी अफगाणिस्तान नंतर आता आपला डोळा कश्मिरकडे वळवला आहे. भारतात घातपाती कार्रवायांची योजना आखली गेली होती. सहा दहशतवादी पकडल्या गेले आणि हा कट उघड झाला.)

अफगाणिस्तान । तालिबान्या हाती ।
व्यवस्थेची माती । क्षणार्धात ॥
मध्ययुगीनहा । कायदा शरिया ।
वृत्तीचा ‘जरिया’ । बुरसट ॥
हीच कट्टरता । आणु भारतात ।
त्याचा कश्मिरात । खेळ करू ॥
सापडले सहा । घातपात दंगा ।
हिंसा नाच नंगा । योजणारे ॥
कट रचला हा । गजवा-ए-हिंद ।
लोकशाही धिंड । काढणारा ॥
मजबुत ऐसी । सुरक्षा यंत्रणा ।
ऐश्या गणंगांना । धडा दावी ॥
कश्मिरी आतंक । तालिबानी खुळ ।
उपटु समुळ । कांत म्हणे ॥
(15 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-174

(महात्मा गांधींच्या भोवती बायका दिसतात तशा मोहन भागवतांच्या सोबत असतात का? असा विचित्र मुद्दा राहूल गांधी यांनी उपस्थित करून विनाकारण नविन वाद ओढवून घेतला.)

दोन मोहनांची । करूनी तुलना ।
हलवी पाळणा । विवादाचा ॥
राहुल जाणावा । विचाराने अंध ।
बुद्धीने हा मंद । खरोखरी ॥
महात्म्या सोबत । असती बायका ।
दुज्याच्या आहे का । आजू बाजू ॥
भागवत आहे । संघ ब्रह्मचारी ।
त्यांच्या बाजू नारी । कशा नाही ॥
राहुलचा आहे । बालबुद्धी तर्क ।
मुर्खपणा अर्क । राजकिय ॥
‘पुर्णवेळ’ खरा । स्टार प्रचारक ।
भाजपा तारक । ओळखावा ॥
कॉंग्रेसी नाशाचे । चालवी जो व्रत ।
राहुल सांप्रत । कांत म्हणे ॥
(16 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५७



 उरूस, 13 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 169

(शरद पवारांनी एका मुलाखतीत कॉंग्रेस म्हणजे कुळकायद्यात जमिन गेलेल्या उत्तर प्रदेशातील जमिनदारासारखी आहे असा आरोप केला.)

कॉंग्रेसची झाली । पडकी हवेली ।
दुरूस्त ना केली । सांप्रतला ॥
बेरकीपणाने । काका करी हल्ला ।
राज्य सत्ता गल्ला । सांभाळुनी ॥
जमिनीचे होते । सालदार मुळ ।
लावुनिया कुळ । खेळ केला ॥
युपीए मधुन । करतात काडी ।
तिसरी आघाडी । जोडा तोडी ॥
ममता जगन । हे ही होते गडी ।
मालकाला तडी । दिली त्यांनी ॥
मालकाचे पोर । बुद्धीने भुस्कट ।
गड्यांनी इस्कोट । चोख केला ॥
कांत सुत्र जाता । मुढ वंशा हाती ।
पक्ष वा संपत्ती । वाटी लागे ॥
(10 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 170

(डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व या नावाने एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद 10-12 सप्टेंबर या कालावधीत ऑन लाईन पार पडला. हिंदू विरोधी हा जो अजेंडा डाव्यांचा जागतिक पातळीवर प्रयास आहे त्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. आयोजकांनी स्वत:चे नावही लपवले आहे.)

डिसमेंटलिंग । ग्लोबल हिंदुत्व ।
चर्चेचे महत्त्व । जाणा जरा ॥
ऑनलाईन हा । जमला मेळावा ।
गोंधळ घालाया । वैचारिक ॥
करितात भेद । हिंदुत्व नी हिंदू ।
सडलेला मेंदू । विरोधाचा ॥
आहे स्मृती दिन । नउ अकराचा ।
तिथे बसे वाचा । विचारांची ॥
चिकित्सा करता । इस्लाम कट्टर ।
पडते खेटर । जोरदार ॥
ग्लोबल हिंदुत्व । चालविण्या चर्चा ।
कोण देतो खर्चा । सांगा जरा ॥
कांत मेंदुवर । लादेनचा हल्ला ।
लिब्रांडुंचा किल्ला । कोासळला ॥
(12 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-171

(कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे महाअभिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यावर टीका केली आहे. राज्याने न्यायालयात जे खटले लढवले त्यात पराभव पत्कारावा लागला याला जबाबदार कुंभकोणी आहेत असा नाना पटोले यांचा आरोप आहे. )

कुंभकोणी नावे । करिती ठणाणा ।
आघाडीचे नाना । पटोले हे ॥
विधानसभेची । सुटताच खुर्ची ।
झोंबतसे मिर्ची । पटोलेंना ॥
वकिलाच्या नावे । फोडती जे खडे ।
आरोपी ते वेडे । ओळखावे ॥
आघाडी निर्णय । सदागडबड ।
कार्टात थप्पड । ठरलेली ॥
आघाडीचे दिव्य । विधी सल्लागार ।
प्रशासन गार । पाडिताती ॥
जरी बदलला । महाअधिवक्ता ।
विवेकाचा पत्ता । कोण दावी ॥
कांत आघाडीचा । पाया अनैतिक ।
काय कवतिक । कायद्याचे ॥
(13 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





Friday, September 10, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५६

 

उरूस, 10 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 166

(बेळगांव मनपाच्या निवडणुकीत शिवसेनेने काहीच कारण नसतांना उडी घेतली. म.ए.समितीला पाठिंबा दिला. वास्तविक लोकसभेच्या पोट निवडणुकीत समितीचा उमेदवार अमानत रक्कम गमावून बसला होता. तेंव्हा आता हात पोळून घेण्याचे शिवसेनेला काहीच कारण नव्हते. पण संजय राउत यांनी विनाकारण हा प्रश्‍न प्रतिष्ठेचा केला आणि आपले नाक कापुन घेतले.)

बेळगांवी झाले । इलेक्शन छोटे ।
सेनेला हे मोठे । धडे दिले ॥
तोंड झाले कडू । बेळगांवी कुंदा ।
अस्मितेचा धंदा । आटोपला ॥
तोंड दावायाला । उरली ना जागा ।
संजयाचा त्रागा । माध्यमांत ॥
मराठी माणसे । येती निवडुन ।
भाजपाकडून । सुखेनैव ॥
नउपैकी सहा । इस्लामचे बंदे ।
कॉंग्रेसचे धंदे । जाणा जरा ॥
तरी संजयाला । कॉंग्रेसचा लळा ।
पुरोगामी शाळा । आवडते ॥
मराठी अस्मिता । बोथटे तल्वार ।
बदला हत्यार । कांत म्हणे ॥
(8 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 167

(बेळगांव निवडणुकांत भाजपला अपशकून करणे हेच धोरण शिवसेनेचे राहिले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आपली ताकद नसताना राजकीय उठाठेव सेना करत आली आहे प्रत्येकवेळी त्यांना दारूण पराभवाला तोंड द्यावे लागले. उत्तर प्रदेशची 2017 ची निवडणुक याचे सर्वात मोठे उदाहरण.)

लंडन पालिका । फडकवु झेंडा ।
सेनेचा अजेंडा । संजु म्हणे ॥
फडणविसांना । देताना दणका ।
तुटतो मणका । आपलाच ॥
नवरा मरू दे । नाही हरकत ।
रंडकी सवत । होवू दे गा ॥
मोदी भाजपचे । कापण्यास नाक ।
धावे हाकनाक । प्रवक्ता हा ॥
बेळगावी आले । 36 मराठी ।
तरी ही तुर्‍हाटी । मराठीची ॥
महाराष्ट्र देशी । पक्ष चतकोर ।
तरी भाषा थोर । देशव्यापी ॥
आधाराचे नव्हे । दिखाव्याचे खांब ।
जीभ सैल लांब । कांत म्हणे ॥
(9 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-168

(आज गणेश चतुर्थी. देवापाशी एकच मागणे की आमच्या नेत्यांना सद् बुद्धी दे.)

विनवितो तुला । देवा गजानना ।
बुद्धी दे नेत्यांना । आमच्याच ॥
धर किंवा सोड । अध्यक्षपदाला ।
राहूल गांधीला । सांग जरा ॥
कॉंग्रेस पाठिंबा । विरोधाचा खेळ ।
मिटव गोंधळ । पवारांचा ॥
जातींमध्ये जिची । अडकली मती ।
ऐसी मायावती । सांभाळ रे ॥
नावाने ममता । वृत्तीने अंगार ।
बंगाली संसार । नीट चालो ॥
फेकु नको फक्त । मोदीला हे सांग ।
भारताचे पांग । फेड ऐसे ॥
कांत मागतसे । लेखणीला बळ ।
अन्यायाचे वळ । मिटविण्या ॥
(10 सप्टेंबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575