उरूस, 25 सप्टेंबर 2021
उसंतवाणी- 181
(महालक्ष्म्या गणपती हे सण झाले. कोरोना आपत्तीतही लोकांनी सण साजरे केले. अपार श्रद्धेच्या बळावर हा समाज इतकी वर्षे टिकला आहे. सातत्याने आघात होवूनही आपली श्रद्धा त्यांनी जतन केली.)
महालक्ष्म्या झाल्या । गणपती गेले ।
श्रद्धावंत डोळे । ओले ओले ॥
जगण्यावरती । कोरोनाचे वण ।
तरी केला सण । साजरा हा ॥
शतकांपासुनी । झेलुनी आघात ।
जपलेली वात । अस्मितेची ॥
बदलाची ऐसी । कित्येक वादळे ।
श्रद्धेचिया बळे । पचविली ॥
भोगल्या वेदना । पापण्याला पुर ।
सोसल्याचा सुर । होतो इथे ॥
गोदेचा गंगेचा । प्रदेश सुपीक ।
तरारले पीक । संस्कृतीचे ॥
दु:ख दळुनिया । खाती ही माणसे ।
विश्वावर ठसे । कांत म्हणे ॥
(23 सप्टेंबर 2021)
उसंतवाणी- 182
(राज्यपालांनी पत्र लिहून राज्यातील महिलांवरील आत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. आणि विधीमंडळाचे अधिवेशन बोविण्याची सुचना मुख्यमंत्र्यांना केली. याला उत्तर देतांना आधी भारतातील इतर राज्यांतील स्त्री अत्याचारांची दखल घ्या आणि संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा सल्ला राष्ट्रपतींना द्या असा अगोचरपणा मुख्यमंत्र्यांनी केला.)
बाण प्रती बाण । रामायणी जैसे ।
पत्रापत्री तैसे । चाले इथे ॥
कोशियारी लिही । उद्धवासी पत्र ।
स्त्री दु:खाचे सुत्र । सांगतसे ॥
उद्धवाचे आले । रागात उत्तर ।
चालवा थुत्तर । केंद्राकडे ॥
संसदेचे आधी । बोलवा की सत्र ।
मग लिहा पत्र । आम्हाला हे ॥
उच्चपदी चाले । लेटरा लेटरी ।
खेटरा खेटरी । सामान्यांना ॥
पिडीत स्त्रियांचा । उमटे आक्रोश ।
बेधुंद बेहोश । सत्तांध हे ॥
स्त्रीच्या प्रतिष्ठेला । तुडवी जो पायी ।
रसातळा जाई । कांत म्हणे ॥
(24 सप्टेंबर 2021)
उसंतवाणी-183
(अमेरिकेत क्वॅड परिषदेसाठी पंतप्रधान मोदी गेलेले आहेत. तिथे त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतली. दोन मोठे लोकशाहीवादी देश एकमेकांना भेटत आहेत. त्यातून जगात सर्वत्र विकासात्मक कामासाठी लोकशाही मुल्ये रूजविली जावीत अशी अपेक्षा. )
लोकशाहीवादी । दोन मोठे देश ।
जगाला संदेश । काय देती ॥
एक लोकशाही । ज्येष्ठ जी वयाने ।
दुजी आकाराने । मोठी असे ॥
एक आधुनिक । दुसरा प्राचीन ।
भेटीमुळे चीन । चिंताग्रस्त ॥
चीन नियमांची । करी मोडतोड ।
जिरवाया खोड । सज्ज सारे ॥
अमेरिका आणि । सज्जन भारत ।
मिळविती हात । जगासाठी ॥
जग विकसेल । लोकशाहीमुळे ।
युद्ध हेच खिळे । उपटा की ॥
अमेरिका करी । शस्त्राचा बाजार ।
मुख्य तो आजार । कांत म्हणे ॥
(25 सप्टेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575