उरूस, 18 जून 2021
उसंतवाणी- 82
(राम मंदिर न्यासाच्या नविन जागो खरेदी प्रकरणांत काहीतरी खुसपट काढून विरोधक गदारोळ माजवित आहेत. ही जमिन खासगी मालकीची असून मुळ जमिनीला लागून असल्याने न्यासाने खरेदी करायचे ठरवले. तिचा जूना वाद मिटवून जूना व्यवहार पूर्ण करून नविन बाजारातील दराप्रमाणे किंमत मोजून जमिन खरेदी झाली. सगळा व्यवहार बँक खात्यातून झाला. पण काहीतरी गदारोळ उठवणे हेच एकमेक कर्तव्य बनल्यासारखे विरोधक वागत आहेत. )
रामाच्या नशिबी । पुन्हा वनवास ।
चर्चा बकवास । जमिनीची ॥
पारदर्शी सारा । बँक व्यवहार ।
तरी करी वार । विरोधक ॥
भक्तांनी देवूनी । उत्स्फुर्त देणगी ।
भरली कणगी । मंदिराची ॥
भव्य मंदिराचे । सुरू झाले काम ।
आणती हराम । अडथळे ॥
रावणाने नेली । जानकी लंकेला ।
तैसेची शंकेला । बात नेली ॥
लोकमानसीचा । जाणती न राम ।
जाहले नाकाम । पुरोगामी ॥
होवो निरसन । शंका नि कुशंका ।
जळो त्यांची लंका । कांत म्हणे ॥
(16 जून 2021)
उसंतवाणी- 83
(उत्तर प्रदेशात गाझियाबाद येथे एका वृद्ध मुस्लिमास मारहाण करतानाचा व्हिडिओ ट्विटरवर आला. जय श्री राम म्हण नसल्याने त्याला मारहाण केल्याची ती घटना होती. प्रत्यक्षात हा व्हिडिओ मारहाणीचा आहे पण त्याचा संबंध जय श्रीरामशी नाही असे पोलिसांनी तपासात स्पष्ट केले. ज्यांनी ज्यांनी ट्विटरवर हे शेअर केलं त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला. )
देश विघातक । ट्विटर ट्विटर ।
वाहते गटर । सेक्युलर ॥
मुसलमानासी । हिंदूंनी चोपले ।
दाढीस कापले । म्हणे ऐसे ॥
तपास करता । समोर ये सत्य ।
खोट्याचे अपत्य । मिरवती ॥
जोरात पसरू । अफवेची हवा ।
तपावू या तवा । राजकिय ॥
खोटे ट्विटवाले । सगळे गोत्यात ।
योगीने पोत्यात । घातले हे ॥
नोंदवल्या गेला । एफ.आय.आर. ।
कायद्याचा मार । सोसा आता ॥
‘कांत’ स्वातंत्र्याची । कैसी अभिव्यक्ती ।
शिव्या देणे सक्ती । हिंदूलाच ॥
(17 जून 2021)
उसंतवाणी- 84
(मनसुख हिरन हत्या, एंटिलिया केस या प्रकरणात एनआयए ने एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला ताब्यात घेतले. त्याचा या सर्व प्रकरणांत हात असल्याचे पुरावे समोर आले आहेत. प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत उभा होता. )
ताब्यात घेतले । प्रदीप शर्माला ।
लागला वर्माला । बाण ऐसा ॥
एंटिलिया केस । हिरेनचा घात ।
यात होता हात । स्पष्ट झाले ॥
दहा अधिकारी । घेतले ताब्यात ।
‘मातोश्री’ गोत्यात । तडफडे ॥
शर्माला तिकिट । विभानसभेला ।
सेनेने शोभेला । दिले होते? ॥
तपासाचे जाती । कुठवर धागे ।
कोण पाठीमागे । कशासाठी? ॥
शर्माच्या हाताने । शंभराच्या वर ।
एनकाउंटर । कुणी केले ॥
घातक साखळी । नेते अधिकारी ।
संपो गुन्हेगारी । कांत म्हणे ॥
(18 जून 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575