उरूस, 12 जून 2021
उसंतवाणी- 76
(राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 10 जून हा वर्धापनदिन. 22 वर्षाच्या या पक्षाला तीन आकडी आमदार आणि दोन आकडी खासदार संख्या गाठता आली नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि पक्षातील इतर सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी यासाठी आत्मपरिक्षण केले पाहिजे. )
बाविशीची आज । झाली राष्ट्रवादी ।
मोठी झेप कधी । घेणार ही? ॥
तीन आकड्यांत । नाही आमदार ।
नाही खासदार । दोन अंकी ॥
आंबेडकर नी । फुले शाहू वादी ।
स्व-समाजवादी । म्हणविती ॥
सातत्य कधी ना । दिसे धोरणांत ।
मुतू धरणात । भाषा एैसी ॥
घरात पोसले । लाडावले टगे ।
बाहेरचे फुगे । उडविती ॥
शब्दारती साठी । भाट पत्रकार ।
भोवती लाचार । गोतावळा ॥
‘कांत’ क्षमता ही । जिंकू शके दिल्ली ।
लाभे ‘पाव’गल्ली । महाराष्ट्री ॥
(10 जून 2021)
उसंतवाणी- 77
(माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार जितीन प्रसाद यांनी कॉंग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला. उत्तर प्रदेशांतील हे तरूण नेतृत्व कॉंग्रेससाठी आशादायक होते. कॉंग्रेस पक्ष परिवाराभोवती फिरत राहिल्याने आपण भाजपात जात असल्याचे त्यांनी सांगितले. )
जितीन प्रसाद । गेले भाजपात ।
काही न ‘हातात’ । उरे म्हणे ॥
राहिला तो बडा । गेला तोची ‘कुडा’ ।
ऐसा नवा धडा । कॉंग्रेसचा ॥
सिब्बल-गुलाम । ज्येष्ठ हे तेवीस ।
झाले कासावीस । कामकाजे ॥
भाजपाचा खरा । स्टार प्रचारक ।
राहूल मारक । कॉंग्रेसला ॥
पळतो विदेशी । तरूण हा तुर्क ।
कुत्र्यामध्ये गर्क । पक्षापेक्षा ॥
सचिन बंडाचा । फुलवी निखारा ।
मिलिंद देवरा । वाट पाही ॥
‘कांत’ हवा तोची । गांधी उपेक्षीला ।
नको तो रक्षीला । कॉंग्रेसने ॥
(11 जून 2021)
उसंतवाणी- 78
(मुकूल रॉय हे मुळचे कॉंग्रेसचे. गेले तृणमुल मध्ये. तिथून भाजपात. आता परत गेले तृणमुलमध्ये. अशा कुंपणावरच्या लोकांना जास्तीचे महत्त्व दिल्याने लोकशाही कमकुवत होते. सामान्य कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो.)
बंगाली जादूचा । सुरू झाला खेळ ।
परतीची वेळ । झाली म्हणे ॥
घरी परतले । मुकुल हे रॉय ।
भाजपची हाय । खावुनिया ॥
ममता कडक । घे रूद्रावतार ।
विरोधक गार । एक एक ॥
मतदारांवरी । बसवी जरब ।
म्हणे ‘‘या रब!’’ । सिद्दीकी हा ॥
नाही जुमानले । दिल्लीच्या घंटीला ।
बांधले खुंटीला । सचिवासी ॥
पक्ष सोडल्यांना । देवूनी इशारा ।
बोलवे माघारा । धूर्तपणे ॥
कांत बसलेले । कुंपणा वरती ।
तयांची भरती । कुचकामी ॥
(12 जून 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575