गावाकडच्या गोष्टी ही वेब मालिका चांगलीच गाजली. गावच्या मातीचा सुगंध या मालिकेला होता. अस्सल रसरशीत अशी ही मालिका 100 भागांतून समोर आली. मराठी कला विश्वात दीर्घकाळ चालली. मोठ्या प्रमाणावर त्यांना दर्शक लाभले. याच निर्माता दिग्दर्शकांनी आता नविन मालिका आणली आहे-‘आजोळ’.
नितीन पवार या तरूण दिग्दर्शकाच्या या नविन मालिकेचे दोन भागही प्रदर्शित झाले आहेत. एक फार महत्त्वाची बाब या तरूणाने केली आहे. ती म्हणजे गावोगाव पसरलेला छोटी मोठी नौकरी उद्योग करणारा शेती करणारा तरूण वर्ग आहे त्याच्या भावभावनाला कलारूप देण्याचा अतिशय यशस्वी प्रयत्न केला आहे. याची पहिल्यांदा दखल घेतली पाहिजे.
शाळेत जाणारी लहान मुलं, वयात येणारी किशोरवयीन मुलं, तरूण, त्यांच्या प्रेम भावना, त्यांचे उद्योग व्यवसायाचे प्रश्न, त्यांच्या समस्या, आई वडिलांचे आपल्या मुलांशी संबंध, भावकिचे प्रश्न, गावातील सामाजिक राजकीय समस्या अशा कितीतरी गोष्टींना अगदी सहज सुंदर शैलीत मांडले जात आहे.
हे सगळे विषय मराठी कलाविश्वात फारसे येत नव्हते. जेंव्हा येत होते तेंव्हा टिंगलीच्या स्वरूपात बाष्कळ विनोद निर्मितीसाठी येत होते. चित्रपटांतून मराठी तमाशा ज्या पद्धतीने आला तसा इतर ग्रामीण कलाविष्कार आला नाही. गावातले राजकारण हे त्यातील इरसालपणा दाखविण्यासाठी आले पण गावातील भावजीवन फारसे आले नाही.
नागराज मंजूळे च्या फँड्री, सैराट (मध्यंतरापूर्वीचा भाग), नाळ या चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भावजीवनाला रूपेरी पडद्यावर आणून त्याची दखल घेण्यास भाग पाडले. असे अजून काही चित्रपट सांगता येतील. पण मालिकांमध्ये मात्र असा प्रयोग होत नव्हता. ज्या मालिका स्वत:ला ग्रामीण म्हणवून घेतात त्यांच्या दर्जाबद्दल न बोललेले बरे.
सोशल मिडियाचा प्रभाव वाढायला लागला तस तसे वेब मालिका सुरू झाल्या. त्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग तयार झाला. जगभरांतून त्याला मागणी यायला लागली. पण हा प्रयोग मराठीत फारसा केला जात नव्हता. या पार्श्वभूमीवर मराठी वेब मालिका काढणे आणि ती यशस्वी करून दाखवणे हे एक आव्हान होते. ते कोरी पाटी प्रॉडक्शन ने यशस्वी करून दाखवलेे. त्यासाठी त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन.
आजोळ चे पहिले दोन भाग प्रदर्शीत झाले आहेत. मामा आपल्या बहिणीला भेटायला मोठ्या शहरात येतो. सुट्ट्या असल्याने भाच्च्याला गावाकडे घेवून जाण्याचा प्रस्ताव ठेवतो. अचानक मामाच्या गावाला जायला भेटणार म्हणून भाच्चा खुष होतो. मामा भाच्चे ही जोडगोळी गावाकडे येते असं साधं गोड कथानक पहिल्या भागात येवून गेलं आहे.
आज सोमवारी प्रदर्शीत झालेल्या दुसर्या भागात भाच्चा गावात बरोबरच्या मित्रांसोबत फिरतो आहे, विहिरीत पोहतो आहे, गावच्या मंदिरात घोडा घोडा खेळत आहे, मामे बहिण तिच्या मैत्रिणी सोबत खेळपाणी खेळत असताना त्यात जावू इच्छित आहे, मोठ्या मामेभावाच्या नाजूक प्रेमप्रकरणाचा उलगडा त्याच्या छोट्याशा मेंदूत होवू पहात आहे, मामेभाऊ मंदिरात अतिशय सुंदर असा अभंग गातो असाही एक प्रसंग यात आलेला आहे. त्याच्या गाण्यावर त्याची प्रेयसी लट्टू आहे.
नितीन पवारचे एक वैशिष्ट्य आहे. व्यंकटेश माडगुळकरांच्या शब्दांत जशी एक ग्रामीण वास्तव सौंदर्यपूर्णरित्या टिपण्याची क्षमता होती तसे नितीनच्या कॅमेर्याचे आहे. हा कॅमेरा हळूवारपणे गाव टिपत जातो. आपण होवून काही वेगळं करायला न लावता सहजतेने पात्रांकडून तो अभिनय करून घेतो. किंवा त्यांना त्यांचे संवाद सहज बोलायला लावतो, प्रसंग सहजतेने उभे राहतात आणि हळूच कॅमेरा ते टिपून घेतो. यातील संवाद फार सोपे वाटतात. पण हा सोपेपणा रियाजातून आलेला आहे. जयपूर घराण्याचे दिग्गज गायक मल्लिकार्जून मन्सूर मारव्याची एक तान अशी काही घेतात की त्यात आख्खा राग उलगडतो. ही सोपी वाटणारी तान येते अतिशय मोठ्या रियाजातून. तसं नितीनचे वाटते. नागराज मंजूळे जसा सोलापूरची भाषा फार हुकमतीने वापरतो तसा नितीन पवार सातार्याकडची भाषा सुंदर सहजतेने वापरतो.
कॅमेरा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. काय दाखवावे यापेक्षा काय दाखवू नये हे त्याला चांगले कळले पाहिजे. त्या पद्धतीने नितीन पवारचा कॅमेरा संपूर्ण मालिकेत नेमके दाखवत राहतो. प्रसंग कुठे कट करावा आणि कुठे जोडावा याचेही एक तंत्र त्याने विकसित केले आहे. गावाकडच्या गोष्टींच्या 100 भागांतून आलेली सफाई आता आजोळ मध्येही जाणवते.
यातील बायका विलक्षण चिवट, कर्तृत्ववान, ठसठशीत व्यक्तीमत्व असलेल्या रंगवल्या आहेत. लहान मुले हा तर नितीनचा ‘वीक’ पॉईंटच आहेत. जसे निल्या, बाब्या, गोट्या आधीच्या मालीकेत होते तसे यातील लहान मुलंही फार छान आली आहेत. त्यांच्याकडून असं काम करून घेणं हेच एक आव्हान आहे.
अगदी तालूकाही नसलेल्या, जिथपर्यंत मुख्य सडक हमरस्ता पोचत नाही अशा आडवळणाचे गाव यात रंगवले आहे. अशा गावांतील दहावी बारावी पास नापास असा एक तरूणांचा वर्ग हा नितीनच्या मालिकेचा मोठा दर्शक वर्ग आहे. याच वर्गाची भाव भावना प्रामुख्याने ही कलाकृती दृश्यस्वरूपात दाखवते. सगळ्यांनी उठून शहरात जावे. शहरांतल्यांनी महानगरांत जावे. महानगरांतल्यांनी परदेशांत जावे अशी एक स्थलांतराची मोठी मालिकाच आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दाखवत आलेलो आहोत. अनुभवत आहोत.चित्रपटांतही असेच दिसून येते.
नेमकी ही स्थलांतराची दिशा बाजूला ठेवून नितीन गावाकडेच राहणारी माणसे आणि विशेषत: तरूण रंगवतोय हे विशेष. ज्याचं भावविश्व गावातलेच आहे, ज्याला आपले भविष्यही गावच्या मातीतच उजळताना दिसत आहे, ज्याला गावासाठीच काहीतरी करायची उर्मी आहे, ज्याला आपल्या मातीचा अभिमान आहे आत्मियता आहे. आणि यासाठी कसलीही शब्दबंबाळ भाषा या कलाकृतीत येत नाही. कसलाही भावनिक भडकपणा यात येत नाही. गावाकडच्या अडचणी दाखवताना कुठे कमीपणा नाही, गावचा माणसांचा भलेपणा दाखवताना कुठे आमच्यातच खरी माणूसकी आणि शहरांत नाही असाही भाव नाही. अस्सल प्रतिभावंत जी शांत संयमी भूमिका घेत कलाविष्कार साधतो तशी ही भूमिका आहे.
आपल्या कलाकृतीतील व्यक्तीरेखा स्वतंत्रपणे वाढू द्याव्यात. त्यांच्यावर आपले ओझे लादू नये याचे एक भान या तरूण दिग्दर्शकाला आहे असे जाणवते.
या नविन मालिकेला खुप खुप शुभेच्छा. मराठी दर्शकांना विनंती की ही मालिका जरूर पहा. त्यावर तूमच्या प्रतिक्रिया द्या. कोरोना आपत्तीच्या काळात संकटावर मात करून कुणी कलात्मक काही करू पहात आहे हे फार धाडस आहे. आपण या धाडसाला प्रतिसाद देवून आपल्या रसिकतेची पावती देवू या.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575