संसदेचे अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा चालू होती. त्या निमित्ताने विरोधी पक्षांना आयतीच चालून आलेली मोठी संधी होती की कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर हल्ला बोल करण्याची. सगळी संसदीय हत्यारे वापरून सरकारला घेरण्याची. विस्ताराने चर्चा घडवून आणण्याची. प्रत्यक्ष अधिवेशन चालू असताना कुठले आंदोलन चालू असेल तर सत्ताधार्यांची मोठी गोची होत असते. अशावेळी त्यांना नेमके कैचीत पकडले तर आंदोलनाचे इप्सित साध्य होण्याची शक्यता असते.
पण मोदी भाजप मोठे नशिबवान आहेत. त्यांना कॉंग्रेस सारखा विरोधी पक्ष आणि त्यांचा राहूल गांधींसारखा अपरिपक्व नेता मिळालेला आहे. तेंव्हा ही कॉंग्रेस मुर्खपणा केल्या शिवाय कशी राहील.
पंतप्रधान हे संसदेचे सर्वौच्च नेते मानले जातात. त्यांच्या खालोखाल विरोधी पक्ष नेत्याचे स्थान आहे. लोकसभेत तर विरोधी पक्ष नेता हे पदच नाही. राज्यसभेत विरोधी पक्ष नेतेपदी गुलाम नबी आझाद आहेत. त्यांचा कार्यकाल संपत होता तेंव्हा त्यावर एक अतिशय चांगली चर्चा शांतपणे राज्यसभेत झाली. गुलाम नबींच्या निरोपाची भाषणंही झाली. आता याच सौहार्दपूर्ण वातावरणाचा फायदा घेवून लोकसभेत सत्ताधार्यांना घेरता आले असते. आंदोलन कसे संपवावे हा आता आंदोलनकारी शेतकरी नेत्यांनाच पडलेला गहन प्रश्न आहे. यासाठी विराधी पक्षांची भूमिका मोठी महत्त्वाची ठरू शकत होती. यातील ‘आंदोलनजीवी’ ही टीका सर्वस्वी डाव्या समाजवादी नेत्यांवर होती. त्याचं ओझं कॉंग्रेसने आपल्या खांद्यावर घेण्याची गरजच नव्हती. आंदोलनजीवी आणि आंदोलनकारी असा जो भेद पंतप्रधान मोदींनी संसदेत मांडला त्याचाच फायदा घेत आपण आंदोलनकारींच्या बाजूने कसे आहोत हे सिद्ध करता आले असते.
रवनीत सिंग बिट्टू नावाचे कॉंग्रेसचे पंजाबातील खासदार आहेत. त्यांनी लोकसभेत कृषी आंदोलनातील ‘आंदोलनजीवी’ योगेंद्र यादव यांच्यावर प्रखर हल्ला चढवला. आता पंतप्रधानांनी आंदोलनजीवी आणि आंदोलनकारी असा फरक करत हा मुद्दा ऐरणीवर आणला होता. कॉंग्रेसच्याच खासदारांना तो पटला आणि त्यांनी स्पष्टपणे संसदेत हे मांडले. मग कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी या चर्चेची सुत्रे पंजाबाच्या खासदारांच्या हाती का नाही जावू दिली? याच्या उलट ज्या अधीर रंजन चौधरी यांच्याकडे सुत्रे होती ते तर नेहमीच स्वत:चे आणि पक्षाचे हसे करून घेतात. अशाच नेत्यांना राहूल गांधी पुढे करतात. आणि रवनीत सिंग बिट्टू सारखे योग्य मुद्दे योग्य भाषेत मांडणारे मागे पडतात. हाच अन्याय ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतीतही होत होता. कश्मिरच्या मुद्द्यावर भाजप बरोबर लदाखचे खासदार नामयांग त्सेरींग यांना पुढे करते. तरूण नेतृत्व म्हणून तेजस्वी सुर्या, पुनम महाजन, जी. किशन रेड्डी, मीनाक्षी लेखी यांना समोर आणले जाते. त्यांना प्रभावी हिंदीत भाषण करण्यासाठी शिकवले जाते. आणि इकडे कॉंग्रेस जे निवडून आलेले तरूण उत्तम वक्ते असलेले खासदार आहेत त्यांची प्रतिभा कुजवते.
कॉंग्रेसने उत्तम चर्चा न करता पंतप्रधानांच्या भाषणांत वारंवार अडथळे आणले. आणि शेवटी तर भाषण चालू असताना लोसभेतून बाहेर जाणे म्हणेच सभात्याग स्वीकारला.
याच काळात प्रियंका गांधी सहारणपूर मध्ये याच कृषी कायद्यांच्या विरोधात अतिशय तर्कशून्य पद्धतीनं काले कानून किसानोंको खा जायेंगे अशी भाषा करत होत्या.
कुठलीही चर्चा न करता सभात्याग करायचा होता तर मग आधीपासून चर्चा झालीच नाही ही बोंब का मारली? जे पत्रकर पुरोगामी विचारवंत मोदी भाजपवर चर्चा झाली नाही म्हणून आरोप करत आहेत ते आता कॉंग्रेसला खडा सवाल करणार का की चर्चा चालू असताना तूम्ही सभात्याग का केला? चर्चेत भाग घेवून धारदार तर्कशुद्ध मुद्दे का नाही उपस्थित केले? तूम्हाला निवडून कशासाठी दिले आहे? सभात्याग करण्यासाठी?
हीच बाब कृषी कायद्यांच्या बाबतीत. राज्यसभेत यावर चर्चा चालू असताना कृषी कायद्याचा मसुदा फाडण्याचे आततायी उद्योग याच विरोधी पक्षांनी केले. धिंगाणा घातला. त्या विरोधी खासदारांना निलंबीत केल्यावर परत उर्वरीत विरोधी खासदारांनी या निलंबनाच्या विरोधात सभात्याग केला. आता हा जो आक्रस्ताळेपणा आहे त्याला काय म्हणणार? संसदेत चर्चेची चालून आलेली संधी हे गमावतात आणि परत चर्चाच होवू दिली नाही म्हणून बाहेर गळे काढतात. वैचारिक भ्रष्टाचाराची ही कमाल आहे.
चीनच्या प्रश्नावर राहूल गांधी संसदेत काहीही बोलले नाही. संसदेचे अधिवेशन चालू असताना हे गायब राहतात. जेव्हा उपस्थित असतात तेंव्हा आपल्या सहकार्यांना सभात्याग करण्यास उकसवतात. पंतप्रधानांचे भाषण चालू असताना मध्येच आरडा ओरडी आपल्याच खासदारांना करायला सांगतात. हे नेमके काय धोरण आहे? पंतप्रधान मला भीतात, डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत, मी जर बोललो तर भुकंप होईल असे बोलणारे राहूल गांधी प्रत्यक्ष वेळ येते तेंव्हा बोलत का नाहीत? गेली 17 वर्षे ते खासदार आहेत. कुणीही त्यांचे संसदेतील एक तरी संस्मरणीय भाषण आठवून सांगावे. एक तर मुद्दा राहूल गांधी यांनी प्रभावीपणे संसदेत मांडला हे दाखवून द्यावे.
आता संसदेच्या कामकाजाचे चित्रण लाईव्ह चालू असते. सर्व देश हे कामकाज पाहू शकतो. गेल्या 17 वर्षांतील कामकाज कुणाही माणसाने तपासावे. आणि सिद्ध करून दाखवावे की राहूल गांधी यांनी प्रभावीपणे काहीतरी मांडले आहे. ते केवळ आज विरोधी पक्षात आहेत म्हणून ही अपेक्षा मी व्यक्त करतो आहे असे नाही. 2004 ते 2014 या काळात कॉंग्रेस सत्तेत होती. त्या काळात राहूल गांधी काय भाषा बोलत होते? काय प्रभाव पाडत होते?
कमाल ही आहे की संसदेत चर्चा झालीच नाही असा गळा जेंव्हा पुरोगामी काढतात मग त्यांच्या पैकी कुणीच कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांना जाब का नाही विचारत की तूम्ही संसदीय चर्चेतून पळ का काढता? सत्ताधार्यांना तर विरोधकांचा सभात्याग सोयीचाच असतो. सत्ताधार्यांना अनुकूल असेच हे पाउल जर विरोधक उचलत असतील तर सरकारला धारेवर धरणारे आधी या विरोधकांना का नाही धारेवर धरत?
नजीकच्या काळात 3 मुद्दे चर्चेत प्रामुख्याने आले होते. पहिला मुद्दा राहूल गांधी यांनीच ओढवून घेतला होता. चौकीदार चोर है चा नारा लावत त्यांनी राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याची बोंब केली होती. मग या प्रश्नावर जेंव्हा संसदेत चर्चा झाली तेंव्हा याच राहूल गांधी यांनी काय प्रभावी भाषण केलं? किंवा कॉंग्रेसकडून या मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी कुठल्या संसदीय आयुधांचा वापर केला गेला?
दुसरा मुद्दा होता चीनच्या गलवान खोर्यातील घुसखोरीचा. वारंवार या प्रश्नावर सरकारने, लष्कराने, पत्रकारांनी प्रत्यक्ष जागेवर जावून माहिती दिली. त्यावर संसदेत चर्चेची तयारीही दाखवली. प्रत्यक्षात या चर्चेच्या वेळी राहूल सोनिया संसदेतून गायब झाले.
तिसरा मुद्दा आत्ताच्या कृषी आंदोलनाचा होता. संसदेत चर्चेला मिळालेला वेळ विरोधी पक्षांनी कारणी लावला नाही. आणि कॉंग्रेसने तर पंतप्रधानांचे भाषण चालू असताना सभात्याग करून कळसच गाठला. चर्चा झाली नाही म्हणायचे आणि जेंव्हा प्रत्यक्ष चर्चेची संधी येते तेंव्हा ती मातीत घालायची असे काही एक अधिकृत मुर्खपणाचे धोरण कॉंग्रेसने ठरवले आहे की काय?
कॉंग्रेसच भाजपची बी टीम आहे की काय असा आता संशय येत चालला आहे. हे बरोबर भाजपला राजकीय दृष्ट्या सोयीची अशी भूमिका घेतात. तसाच मुर्खपणा करतात जेणे करून भाजप त्याचा लाभ उठवत राहिल.
कर्नाटकांतील विधानसभा निवडणुकीचा किस्सा भाजप पदाधिकारी असलेल्या एका मित्राने सांगितला. महाराष्ट्राच्या सीमाभागांतील या मतदारसंघात राहूल गांधींची एक तरी सभा होवू द्या असा आग्रह भाजप उमेदवाराने धरला. ही सभा काही होवू शकली नाही. अर्थात ही गंमत होती कारण राहूल गांधींच्या सभेचे भाजपच्या हाती काही कसे असेल? पण निकालानंतर त्या उमेदवाराने तक्रार केली, ‘अगर राहूल गांधी की सभा होती तो मै जरूर चुन के आता. सिर्फ थोडे मार्जीन से हारा हूं. अगले बार राहूल गांधी की सभा लगवाओ. मै जरूर चून के आउंगा.’
राहूल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष बनावे म्हणून भाजपचे कार्यकर्ते देव पाण्यात घालून बसले आहेत हा विनोद खराच असावा अशी परिस्थिती स्वत: कॉंग्रेसनेच आपल्या राजकीय मुर्खपणाने निर्माण केली आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575