Friday, January 29, 2021

मूर्ती मालिका २६


अंजली मुद्रेतील केवल शिव

औंढा (ता. औंढा जि. हिंगोली) येथील नागनाथ मंदिर अभ्यासकांसाठी आणि ज्योतिर्लिंग असल्या कारणे भक्तांसाठी प्रसिद्ध आहे. त्या मंदिरांवरील काही मूर्ती आजही अभ्यासकांसाठी आवाहन आहेत. ही जी मूर्ती आहे ती शैव देवतेची आहे. हातात त्रिशुळ, पात्र, वरद मुद्रेतील हातात अक्षमाला, कमंडलू दिसून येत आहेत. पायाशी मुंडमाला लोंबत आहे. खाली शिवाचे वहान नंदी आहे. मधले दोन हात अंजली मुद्रेत आहेत. अंजली मूद्रेतील तीन भव्यमुर्ती याच मंदिरावर आहेत. आणि त्या शिवाच्याच असल्याचे अभ्यासकांनी पूर्वीच्या पोस्टवर चर्चा करताना सांगितले होते. त्या मूर्ती दोन हातांच्या आहेत. इथे तर सहा हात आहेत.
अंजली मुद्रा आणि नमस्कारासाठी जोडलेले हात यात फरक आहे. नमस्कारासाठीच्या मुद्रेत समांतर असे तळवे एकमेकांना जोडलेले असतात. अंजली मुद्रेत तळवा आणि बोटं यांच्यात कोन केलेला असतो.
एकुण लक्षणं पाहता ही मूर्ती अंजली मुद्रेतील केवल शिवाची असावी असे सिद्ध होते. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. हीला भीक्षाटन शिवमूर्ती असे नाव धम्मपाल माशाळकर यांनी सुचवले आहे. वैराग्य भावना या ठिकाणी जाणवते. मस्तकाच्या पाठीमागे प्रभावळ दाखवलेली आहे. पायात हातात कमरेला अलंकरण केलेले आहे. दंडातही बाजूबंद आहेत.
Dr-Arvind Sontakke
छायाचित्र सौजन्य
Travel Baba Voyage




घोड्याच्या पायदळी शिक्षा
गोकुळेश्वर मंदिर चारठाणा (ता. जिंतुर जि. परभणी) येथील मंदिराच्या खांबावर हे शिल्प आहे. या पूर्वीही खांबावरील गुढ शिल्पावर लिहिले होते. या शिल्पात चार व्यक्ती दिसत आहेत. घोड्याच्या पुढे आणि मागे शस्त्रधारी सैनिक दिसत आहेत. त्यांच्या हातात तलवार, खड्ग किंवा दंडा असे काहीतरी दिसत आहे. एक सैनिक घोड्यावर बसलेला आहे. जो आरोपी आहे तो वाकलेला असून त्याची मान खाली झुकलेली आहे.
हत्तीच्या पायी तुडवणे अशी एक मृत्युदंडाची शिक्षा असते. तसेच गाढवावरून धिंड अशीही एक शिक्षा आहे. इथे घोडा आहे. घोड्याच्या पायी तुडवणे अशीही शिक्षा असावी.
काही शिल्पे ही केवळ शिल्पे नसतात. त्यामागे धार्मिकते पलिकडचा त्या काळातील समाज जीवनाशी संबंधीत काही संकल्पनांचा गुढ अर्थ असतो. याचा वेगळा विचार झाला पाहिजे.
शिल्पांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी मंदिराचे निरिक्षण करण्यात वेळ खर्च करावा लागतो. परत परत त्या मंदिराला भेट द्यावी लागते.
Travel Baba Voyage
thanks for this latest pic.



भैरवी - जाम मंदिर
जाम (ता.जि. परभणी) येथील मंदिराच्या बाह्यांगावर इतर सुरसुंदरीच्या सोबत ही मूर्ती आहे. हीच्या डाव्या हातात खट्वांग आहे. पायाशी मुंडमाळ लोंबत आहे. या दोन खुणांवरून ही शैव उग्र देवता असल्याचे मानता येते. उजवा हात खंडित आहे. त्यावर कोणते शस्त्र आहे दिसत नाही. बाकी देहावरचे अलंकरण अतिशय व्यवस्थित सुंदर आहे. ग्रीविका आहे, हार लोंबतो आहे छातीवर, कमरेला मेखला आहे. मांड्यांवर मोत्याच्या माळा लोंबत आहेत. पायात तोडे आहेत. चेहरा जरा उग्र आहै.
या मंदिराचा जिर्णोद्धार करतान हे सिमेंटचे ओघळ मूर्तीवर आलेत. अतिशय देखण्या अप्रतिम शिल्पाची आपणच अशी वाट लावतो. भंजकांनी मूर्ती फोडल्या यावर आपला संताप उसळतो. मग हे स्वातंत्र्या नंतरचे विकृतीकरण करणारे कोण समजायचे?
फोटो सौजन्य :
Arvind Shahane
- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

Wednesday, January 27, 2021

कृषी आंदोलन डाव्यांनी ‘लाल’ केले


उरूस, 27 जानेवारी 2021 

डाव्यांचा सहभाग कुठल्याही आंदोलनाला हिंसेच्या मार्गावर नेतो हे जगभर सिद्ध झाले आहे. भारतातही वेगळे काहीच होणार नव्हते. या आंदोलनात खालिस्तानी, आयएसआय, अर्बन नक्षल यांची घुसखोरी झाली होती हे पहिल्या दिवसापासून  दिसून येत होते. पण तसं बोललं की लगेच डावे अंगावर धावून जायचे. लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करायचे. शेतकर्‍याला ‘अन्नदाता’ म्हणून कुरवाळायचं आणि आपला लोकशाही राजवट अस्थिर करण्याचा एक कलमी कार्यक्रम साध्य करायचा हेच यांचे धोरण. 

दिल्लीत 26 जानेवारी रोजी कृषी आंदोलनाचा जो क्रुर बिभत्स हिंसक चेहरा समोर आला त्याने या आंदोलनाची भलावण करणार्‍यांचे पितळ उघडे पडले. 

पहिल्या दिवसांपासून या आंदोलनाला कसलाही वैचारिक पाया नाही हे दिसून आले होतेच. केवळ आणि केवळ आडमुठपणा दिसून येत होता. आम्ही काहीच ऐकणार नाही कसलीच चर्चा करणार नाही. 'कानुन वापसी नही तो घर वापसी नही' असल्या घोषणा सातत्याने दिल्या गेल्या होत्या. तेंव्हाच या आंदोलनाचे पुढे काय होणार हे दिसत होते. 

ही सगळी एक विशिष्ट पद्धतीने चालू असलेली खेळी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अगदी नजीकच्या काळातील तीन आंदोलने तपासून पहा. महाराष्ट्रात एल्गार परिषद झाली होती. दुसर्‍या दिवशी बरोबर 1 जानेवारीला स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक येतात तेंव्हाच भीमा कोरेगांव येथे हिंसाचार उसळला. दिल्लीत शाहिनबाग आंदोलन चालू झाले आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रंप येणार त्या वेळी नेमका दिल्लीत हिंसाचार उसळला. तसेच आता आंदोलन चालू होवून 60 दिवस झाले होते. 26 जानेवारीला बरोबर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हिंसाचार उसळला. 

तूम्ही या सगळ्या घटनांच्या आधी वर्तमानपत्रांत छापून आलेले लेख तपासून पहा. दलित दुबळे कष्टकरी अल्पसंख्य यांच्यावर कसा अत्याचार होतो आहे. यांची गळचेपी कशी होते आहे. असहिष्णू वातावरण कसे आहे. मोदी अमित शहा हे कसे हुकूमशहा आहेत. यांना निवडणुका नको आहेत. यांना मनुस्मृती हवी आहे. देशाची घटना हे बदलून टाकतील. अशी भाषा सातत्याने वापरली गेली. घरी बसून विचार करणारा एक मोठा वर्ग असा आहे जो प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत नाही. त्याची वैचारिक दिशाभूल करण्याचे काम बरोबर आधीपासून केले जाते. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणारा एखादा मोठा समुह हाती पकडला जातो. भीमा कोरेगांवच्या निमित्ताने दलित, शाहिनबाग प्रकरणांत मुस्लीम आणि आता शेतकरी. या वर्गाच्या छोट्या मोठ्या आंदोलनात हवा भरली जाते. अस्वस्थता कुठे आहे ते हुडकून बरोबर त्या आगीत तेल कसे ओतता येईल हे बघितले जाते. एकदा लक्षात आले की हवा तापत आहे मग बरोबर इतर सर्व मार्ग अवलंबले जातात.

एल्गार परिषद, शाहिनबाग आणि कृषी आंदोलनात हिंसाचार घडून आला म्हणून मी हे प्रतिपादन करतो आहे असे नाही. ज्या वेळी यांचे प्रयास फसले आहेत ती प्रकरणं पण तूम्ही तपासून पहा. बंगलुरू मध्ये दलित आमदाराने मुस्लीमांबद्दल जी फेसबुक पोस्ट टाकली त्यावरूनही असाच मोठा दंगा भडकवण्याचा प्रयत्न झाला. पण तो केवळ बंगलुरू पुरताच मर्यादीत राहिला. अमेरिकेत जून महिन्यात जॉर्ज फ्लॉईड याचा पोलिस कस्टडित झालेला मृत्यू पण असाच आपल्याकडे दंगे पेटवण्यासाठी वापरला गेला. पण तोही प्रयास फसला. 

या सगळ्यांतून लक्षात येते की देशातील विविध प्रश्‍नांवर विविध समाजघटकांत असलेली अस्वस्थता हेरून त्याचा वापर करून हिंसेचा आगडोंब उसळविण्याची एक ‘मोडस ऑपरेंडी’ तयार झाली आहे. 

आश्‍चर्य म्हणजे याला पाठिंबा देणारा एक नवा वैचारिक वर्ग आता तयार होवू लागला आहे. एकेकाळी आपल्या  अभ्यासाने वक्तृत्वाने रस्तयावर उतरून आंदोलन करण्याच्या ताकदीने ओळखले जाणारे डावे समाजवादी आता चळवळी संपून गेल्याने पूर्णत: हताश झाले होते. त्यांना आता हा एक नविन प्रकार सापडला आहे. आयते तयार असलेले आंदोलन शोधायचे. त्यात उडी घ्यायची. आपणच नेते असल्याची टीमकी मिरवायची. पत्रकार परिषदा घ्यायच्या. भाषणं करायची. लेख लिहायला यांचे वैचारिक सगे सोयरे तर तयार असतातच. माध्यमांवर आजही यांची पकड आहे. 

मोदी संघ अमित शहा भाजप विरोधी एक मोठा असा वर्ग आहेच ज्याला बसल्या जागी काहीच करता येत नाही. मग तो या लेखांना शेअर करणे, त्यावर आपल्या प्रतिक्रिया देणे, समाज माध्यमांवर टवाळ्या करणे, पुरस्कार वापसीचे समर्थन करणे असली कामं तातडीने बसल्या बसल्या करत राहतो. आणि हे सगळे मिळून असे काही वातावरण तयार करतात की केवळ माध्यमांपुरतीच ज्याची आकलन शक्ती आहे त्याला वाटू लागते बाप रे हे काय चालू आहे. किती अहिष्णु वातावरण आहे. लोकशाही तर कधीचीच संपून गेली आहे. 

नेमके याच काळात शांतपणे निवडणुका होत राहतात. सोशल मिडियाच्या आधीन नसलेली सामान्य जनता आपले मत नोंदवून येते. त्यातून निकाल बाहेर पडतात तेंव्हा या घरबश्या डाव्या विद्वानांचे आणि त्यांच्या समर्थकांचे डोळे पांढरे होतात. यांनी विरोध केला त्या भाजपलाच लोकांनी मोठ्या पाठिंब्याने निवडुन दिलेले असते. योगेंद्र यादव तर मतदारांनी भाजपला मते दिलीच कशी? त्यांची काॅलर पकडून मी विचारू इच्छितो अशी भाषा करत होते २०१९ च्या लोकसभा निकालानंतर.

कृषी कायद्याच्या बाबत तर एक इतकं मोठं वैचारिक आश्चर्य घडून आलं. कॉंग्रेसने याच कायद्यांची हमी आपल्या जाहिरनाम्यात दिली होती. पंजबाने शेती विषयक करार आधीच केले होते. डाव्यांच्या केरळात तर कृषी उत्पन्न बाजार समितीच अस्तित्वात नव्हती. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरात तर किमान आधारभूत किंमती प्रमाणे खरेदीच नाही. पण हे सगळे वैचारिक दिवाळखोर केंद्रावर मात्र या कृषी कायद्याच्या निमित्ताने तुटून पडलेले दिसून आले.

सोशल मिडियात मी स्वत: कृषी आंदोलकांच्या समर्थकांना एक एक कलम घेवून चर्चा करण्याचे खुले आवाहन केले. कृषी कायद्याचा मराठी मसुदा सर्वांसाठी पीडिएफ मध्ये उपलब्ध करून दिला. वारंवार त्यांना विचारतो आहे की यातील नेमके कुठले कलम शेतकर्‍यावर अन्याय करते आहे असे तूम्हाला वाटते आहे? नेमकी काय अडचण यातून समोर येते आहे ते स्पष्ट करा. हे कायदे शरद जोशी समितीने सरकारी पातळीवर दोन अहवाल सादर केले आहेत त्याच शिफारशींवर आधरलेले आहेत. हे सर्व मी सप्रमाण मांडत राहिलो आहे. पण कृषी आंदोलकांचे समर्थक याकडे संपूर्णत: दुर्लक्ष करून ‘काळ्या कायद्याने शेतकर्‍याचा गळा घोटला’ असाच धोशा लावून बसले आहेत. वैचारिक क्षेत्रातही मी काहीच वाचणार नाही मी काहीच समजून घेणार नाही अशी भूमिका घेवून कुणी बसले तर त्याचा काय प्रतिवाद करणार?

आज डाव्यांनी कृषी आंदोलन ‘लाल’ केले. यातच त्यांच्या संपूर्ण पराभवाची बीजे पेरली गेली आहेत. खुन की नदिया बहेगी म्हणणार्‍या मेहबुबा मुफ्ती यांना लोकशाही मार्गाने तेथील जनतेने हद्दपार केले. पश्चिम बंगाल, त्रिपुरा येथून डावे हद्दपार झाले. येत्या निवडणुकांत केरळांतूनही ते हद्दपार होतील अशीच शक्यता आहे. कामगारांची, सरकारी कर्मचार्‍यांची, बँक कर्मचार्‍यांची आदांलने फसल्यावर तसेही हे बेकार बनले होते. यांना वाटले शेतकरी हाताशी पकडून काही एक आंदोलन उभं राहिलं तर आपल्याला भवितव्य राहिल. पण आता तेही धूसर झाले आहे. 26 जानेवारीच्या हिंसाचाराने या आंदोलनावर प्रश्‍नचिन्ह उभं केलं आहे. हिंसाचारावर कारवायी करण्याच्या निमित्ताने सरकार कृषी आंदोलन पूर्णत: गुंडाळून टाकेल हे निश्चित. तशीही रस्ता रोकून यांनी सामान्य जनतेची सहानुभूती गमावली होतीच. आता हिंसाचाराने सरकारच्या हाती आपण होवून कोलीत दिले आहे. सरकार याचा पुरेपूर वापर करणार. 

26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस म्हणजे भारतातील डाव्या चळवळीचा स्मृती दिन ठरेल असे दिसते आहे. ग्रामीण भागात एक इरसाल म्हण आहे ‘माकड म्हणते माझीच लाल’. आता ही कशी आणि कुठे लागू पडते हे वाचकांनीच ठरवावे.         

               

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Tuesday, January 26, 2021

राम मंदिराची उभारणी म्हणजे ज्ञानेश्वर तुकारामांचा पराभव?



उरूस, 26 जानेवारी 2021 

राम मंदिराची उभारणी सुरू झाली आहे. त्यासाठी देशभरांतून देणग्या गोळा केल्या जात आहेत. अपेक्षेप्रमाणे यावर टीकाही सुरू झाली आहे. लोकशाहीत टीका व्हायला हवी. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. पण यावर होणारे दोन आरोप मोठे विचित्र आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी समाजमाध्यमांवर यावर टीका करणारी एक पोस्ट लिहीली. त्यात गरजू माणसांसाठी काम करणार्‍या संघटना पै पै साठी तरसत आहेत आणि निर्जीव वास्तुसाठी करोडो रूपये वहात आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा याहून मोठा पराभव कोणता? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

मोदी-संघ-अमित शहा-भाजप या एम.एस.ए.बी. वर कोणत्याही निमित्ताने टीका करण्याचे काही लोकांचे धोरण आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. मी काही भाजपचा प्रवक्ता समर्थक भक्त कार्यकर्ता नाही. दुसरा मुद्दा निर्जीव वस्तूंवर खर्च कशाला करायचा असा जो आहे त्यावर मात्र विचार केला पाहिजे. विश्वंभर चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेंव्हा आपल्या परंपरेत प्रतिकांना किती महत्त्व आहे हे ते कदाचित विसरले असावेत. या प्रतिकांसाठी मोठी किंमत भारतीय माणूस मोजत आला आहे. जागेला महत्त्व आहे म्हणूनच लाखो वारकरी पंढरपुरला शेकडो वर्षांपासून धाव घेत आले आहेत. याच मंदिरांचा जिर्णाद्धार झालेला आहे. यात नव्हे तर भारतातील कित्येक मंदिरांचा जिर्णोद्धार केवळ त्या जागेवर श्रद्धा आहे म्हणूनच केला गेला आहे. नसता ती जागा सोडून दुसरीकडे तेच मंदिर उभारलं गेलं असते ना. 

ज्या वारकरी संप्रदायाचा उल्लेख विश्वंभर करतात त्या संप्रदायानं निर्गुणासोबतच सगुणाचीही उपासना केली आहे. तेंव्हा समोर प्रत्यक्ष वास्तू प्रतिक म्हणून लागतेच. केवळ मुर्तीच नव्हे तर समाधीही बांधून त्या जागेवर पुजा केली जाते. वारकरी संप्रदायानेच गावोगावी मंदिरं उभारली आहेत. तिथे सातत्याने किर्तनं भजनं होत असतात. सप्ताह साजरे होतात. पंढरपूर सोबतच देहू, आळंदी, पैठण, आपेगांव, नेवासा, मुक्ताईनगर, सासवड, श्रीगोंदा, त्र्यंबकेश्वर, नर्सी नामदेव अशा कितीतरी ठिकाणांचा धार्मिक स्थळ म्हणून विकास वारकरी संप्रदायीकांच्या रेट्यामुळेच झाला आहे. या ठिकाणी मोठ मोठ्या वास्तु उभारल्या गेल्या आहेत. हे कसं विसरता येईल. या सर्व ठिकाणच्या निर्जीव वास्तू आपल्याला जरी निर्जीव वाटत असल्या तरी तसं सश्रद्ध वारकर्‍यांना वाटत नाही. 

नदीवरचे अप्रतिम असे घाट उभारल्या गेले आहेत. अहिल्याबाईंनी मध्ययुगीन कालखंडात भारतीयांची सश्रद्ध मानसिकता  जपण्याचे मोठे काम मंदिरं मठ नदीवरचे घाट आणि बारवा या निर्जीव वास्तू उभारूनच केले ना? त्यांच्यावरच्या अभ्यासपूर्ण ग्रंथात विनया खडपेकर यांनी तर असे सप्रमाण सिद्ध केले आहे की ज्या ठिकाणी मठ मंदिरं उभारली जातात नदीवरचे घाट बांधले जातात बारवांची दुरूस्ती होते त्या ठिकाणी शांतता नांदते. असे एक अधिकृत धोरणच ठरवून अहिल्याबाईंनी देशभर या आपल्याला वाटणार्‍या निर्जीव पण अस्मितेसाठी सश्रद्ध मानसिकता जपण्यासाठीच्या उर्जावान वास्तूंची उभारणी केली. आजही त्याचे ढळढळीत पुरावे आपल्याला मिळतात. 

सोमनाथचे मंदिर असेच नजिकच्या काळात उभारल्या गेले. त्यातून तिथे नेमके काय दंगेधोपे झाले? जिथे पूर्वी मंदिर होते आणि त्याचे पुरावेही उत्खननात प्राप्त झाले आहेत म्हणूनच हा हट्ट भाजप संघ विश्व हिंदू परिषद आदींनी धरला. आणि न्यायालयानेही तो त्याच कसोटीवर तपासून घेतला ना. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यावर अधिकृतरित्या निर्णय दिल्यावर न्यासाची रितसर स्थापना झाल्यावर आता टीका कशासाठी? राम मंदिराच्या देणगीसाठी कुणी कुणाला धमकावल्याचे एकही उदाहरण अजून तरी समोर आले नाही. तेंव्हा ही अशी टीका योग्य नाही. 

दुसरा मुद्दा गरीबांसाठी काम करण्याचा. तर धार्मिक संस्थानांनी जितकी समाजसेवा या देशात केलीय तेवढी आत्तापर्यंत कुठल्याच ‘एनजीओ’ ला करता आलेली नाही. गोरगरिबांना अन्नदान हे सगळ्यात मोठे काम हजारो वर्षांपासून मंदिरे करत आली आहेत. कितीतरी संस्था अनाथांसाठी अन्नछत्र चालवतात. राहण्याची सोय करतात. अंध अपंग मानसिक दृष्ट्या खचलेले यांना सांभाळण्याचे मोठे काम या देवस्थानांनीच केले आहे. हे विसरून कसे चालेल. या देवस्थानांमुळे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात होते आणि रोजगाराला चालना मिळते. या बाबींकडे कसे काय दुर्लक्ष करायचे? आजही मोठ्या देवस्थानांनी आपल्या निधीतील मोठा वाटा सातत्याने सामाजिक कामासाठी वापरलेला दिसून येतो. ज्या गरिबांच्या अडचणी आहेत त्या कुठल्याही मोठ्या देवस्थानांना कळवा. मला खात्री आहे भारतभरची देवस्थाने गरिबांसाठी गरजूंसाठी विकलांगांसाठी मदत करतील. 

तिसरा मुद्दा यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना ओढण्याचा आहे. वारकरी संप्रदायातीलच असलेले त्याच परंपरेतून आलेले जयंत देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या संदर्भात अनेक दाखले देत त्यांनी विश्वंभर यांचा हा आरोप खोडून काढला आहे. स्वत: तुकाराम महाराजांनी आपल्या गावातील विठ्ठलाचे मंदिर दुरूस्त केले होते याचा संदर्भही जयंत देशपांडे यांनी दिला आहे. आता अपेक्षा आहे विश्वंभर यांनी याला उत्तर द्यावे.

खरं तर ही देणगी मोठ्या प्रमाणावर गोळा होते आहे ती सर्व स्वेच्छा देणगी आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. सर्व सामान्य गोरगरिबांची अडचण ओळखून त्यांना खर्‍या अर्थाने मदत करण्याचे काम अशा मंदिरे मठांनीची केले आहे. हे विसरून चालणार नाही. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी पंढरपुरची वारी का पुढे चालू ठेवली? आज काळावर मात करून ही परंपरा केवळ टिकलीच असे नव्हे तर ती वृध्दिंगत झाली. इतका प्रचंड प्रतिसाद आजही पंढरीच्या वारीला कसा काय मिळतो आहे? आजही गावोगावच्या यात्रा तुडूंब गर्दीने कशा काय फुलून येतात? या जून्या वास्तू आजही लोक प्राणपणाने कशा काय जपत जातात? विश्वंभर चौधरी यांच्याच घराच्या बाजूला वालूर येथे लिंगायत समाजाचा प्राचीन मठ आहे. वास्तु शास्त्राच्या दृष्टीनेही ती वास्तू अप्रतिम अशी आहे. दगडी ओवर्‍या, भक्कम लाकडी खांब हे सर्व प्राचीन संपन्न असा वारसा आहे. विश्वंभर यांच्याच गावात प्राचीन सुंदर बारवा आहेत. मंदिरं आहेत. शिल्पं आहेत. हिंदू बांधकाम शैलीचा अविष्कार असेली मस्जीदही आहे. या सर्वांना केवळ निर्जीव प्रतिकं समजता येईल का? 

भाजप संघ मोदी अमित शहा यांच्यावरची टिका ही वेगळी बाब आहे. ती ज्यांना कुणाला करायची त्यांनी ती करावी. विश्वंभर ज्या महात्मा गांधींना मानतात त्या गांधीनीही वैष्णव जन तो तेणे कहिये सारखे भजन आपल्या सार्वजनिक सभांमध्ये सातत्याने वापरले होते. महात्मा गांधींना पाहिलेला एकमेव चित्रपट अशी ज्याची जाहिरात केली गेली तो चित्रपट होता ‘रामराज्य’. धार्मिक श्रद्धा आणि धर्मांधता यात फरक आहे. वारकरी संप्रदायाने हा फरक नेमका ओळखून त्या प्रमाणे आपल्या समाजाला पटणारा पचणारा असा मार्ग दाखवला. आज राम मंदिराचे निर्माण हे एका स्वतंत्र न्यासाच्या वतीने होते आहे. त्यात भाजप मोदी संघाला ओढून तूम्ही त्यांच्या सोयीची अशी चर्चा घडवून आणत आहात. 

भाजपने उघडपणे 1989 पासून आपल्याला धोरणात या मुद्द्यांचा समावेश केला होता. राम मंदिर, 370, तिन तलाक, समान नागरी कायदा हे विषय ठामपणे मांडले होते. त्यामुळे त्यांच्यावर आता टिका कशी काय करता येईल? त्यांच्या जाहिरनाम्यातच या गोष्टी होत्या. लोकांनी त्यांना यासाठीच निवडुन दिले आहे. लोकशाही मार्गानेच त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यावरच राम मंदिराचे निर्माण सुरू झाले आहे. 

म्हणजे कसा विरोधाभास आहे. जे मोदी भाजप यांच्यावर लोकशाही विरोधी असल्याची टीका करत आहेत तेच कृषी आंदोलनात लोकशाही मानायला तयार नाहीत. अवैध रित्या रस्ता अडवून बसले आहेत. सर्वौच्च न्यायालयाने नेमलेली समिती यांना नको आहे. सर्वौच्च न्यायालयात यांना जायचे नाही. याच काळात विविध राज्यांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत, बिहार सारखे राज्यही हे आंदोलन पंजाबात चालू होते तेंव्हा जिंकल्या. हैदराबाद महानगर पालिकेत  4 वरून 48 जागांवर झेप घेवून दाखवली. आता लोकशाही चौकटीत टिका नेमकी काय आणि कशी करता येईल? कुमार केतकर यांनी आरोप केला होता की निवडणुका होवू दिल्या जाणार नाहीत. पण त्या झाल्या. मोदी सत्ता सोडणारच नाहीत. पण त्यांना ती अधिकृतरित्या सोडायची वेळच आली नाही. एक जरी जागा कमी झाली तरी मोदींनी राजीनामा द्यायला हवा असे केतकर बोलले होते. पण मोदींना आधीपेक्षा जास्तीचे बहुमत मिळाले. मोदींनी काय करावे हे सांगत असताना ते तसं झालं नाही तर केतकर आणि बाकी सर्व पुरोगामी काय करणार हे नाही त्यांनी जनतेसमोर मांडले. विश्वंभर चौधरी यांनी टिका जरूर करावी. त्यांचा तो लोकशाही हक्क आहे. पण ती करत असताना वस्तुनिष्ठपणे करावी. अनाठायी करू नये इतकीच विनंती. 

               

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Wednesday, January 20, 2021

‘बरळणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे’-राहूल गांधी


उरूस, 20 जानेवारी 2021
 

19 जानेवारीला राहूल गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून नविन वर्षांतील मनोरंजन काय आणि कसे असेल याची झलकच दाखवली. भाजपचे सगळ्या मोठे बलस्थान आपणच आहोत याची सतत जाणीव भारतीय मतदारांना राहूल गांधी करून देत असतात. त्यांचे जे कुणी राजकीय सल्लागार आहेत (असतील तर किंवा राहूल कुणाचे ऐकत असतील तर) त्यांना भाजपनेच पगारी ठेवले आहे की काय अशी शंका येते.

शेतकरी आंदोलनाचा विषय ज्वलंत असताना त्यावरून चर्चा दुसरीकडे आणि तिही परत आपल्याला आणि आपल्याच पक्षाला अडचणीत कशी आणेल इकडे त्यांनी नेली. गलवान खोर्‍यात चिनी लष्करावराला भारतीय जवानांनी दिलेले सडेतोड उत्तर हा विषय बाजूला पडलेला होता. परत तोच विषय काढून काय फायदा? त्यापेक्षा कृषी कायद्याचा जो विषय राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत घेतला हेाता त्यावर अजून विस्तृत विवेचन करायचे होते.

लदाख सारखेच अरूणाचल प्रदेशचा काही भाग अगदी 50 वर्षांपूर्वी म्हणजे चीनशी युद्ध झाले तेंव्हापासून चीनने बळकावला आहे. आता या भागात चीनने काही बांधकाम केले आहे. आणि त्या बाबत एक आक्षेप भाजपच्याच खासदाराने नोंदवला आहे. आता हाि विषय संवेदनक्षम आहे. संरक्षणासारख्या बाबीत फार चर्चा करता येत नाही. हे विषय आपणहून काढायचे नसतात. बरं याच प्रश्‍नावर आत्ताच काही दिवसांपूर्वी राहूल गांधी आणि इतर सर्वच आक्षेप घेणारे तोंडावर आपटले होते. असं असतनाही अरूणाचलचा विषय उकरून काढण्यात आला. 

आता इतका उसळून चेंडू आल्यावर भाजपसारखा सत्ताधारी बळकट पक्ष तो सोडेल कशाला. त्यांनी यावरून राहूल गांधी आणि कॉंग्रेसचे चीनविषयक धोरण यावर भरपूर धूलाई करून घेतली. आता उत्तर द्यायला राहूल गांधी आणि त्यांचे प्रवक्ते कुणीच समोर यायला तयार नाही. 

पहिली गोष्ट चीनबाबत जवाहरलाल नेहरूंपासून ते अगदी अलीकडच्या काळातील मनमोहन सिंग यांनी नरमाईचे धोरण का पत्करले होते? नेहरूंचे विधान तर अतिशय गाजलेले होते. जिथे गवताचे पातेही उगवत नाही असा प्रदेश चीनने घेतला तर काय बिघडले? असे नेहरू भर संसदेत बोलले होते. अगदी आत्ता 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए.के.एन्टोनी यांनी सीमावर्ती भागात रस्ते पुल धावपट्ट्या बोगदे अशी कामं करायची नाहीत असं सरकारी धोरणच असल्याचे स्पष्ट केले होते. 

या पार्श्वभूमीवर जेंव्हा राहूल गांधी अरूणाचलच्या सीमेवरील चीनी बांधकामाबाबत प्रश्‍न उपस्थित करतात त्याचे औचित्य कळत नाही. उलट मोदी सरकारने या संबंधात अतिशय कडक पावलं उचलत आलं आहे. सीमावर्ती भागात रस्ते आणि इतर संरचनांची कामे जोरात सुरू आहेत. मग राहूल गांधी असे आक्षेप नेमके अशा वेळी उचलून काय साधत आहेत? 

राहूल गांधी यांना हे तरी माहित आहे का की गेल्या 6 वर्षांत याच ईशान्य भारतात अगदी गावोगावी वीज पोचवली गेली आहे. जे काम गेल्या 70 वर्षांत आपण करू शकलेलो नव्हतो. शिवाय रेल्वेची कामं रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. 

सर्व मंत्र्यांना नियमितपणे ईशान्य भारतात दौरे करणं बैठका घेणं बंधनकारक केलं आहे. सचिव पातळीवरही अशीच बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या 6 वर्षांत प्रशासकीय पातळीवर काही एक गती ईशान्य भारतातील कामांना मिळालेली दिसून येते आहे. एक राजकीय पक्ष म्हणून भाजप याचा लाभ उठवत असेल तर तो त्यांचा विषय आहे. पण सामान्य नागरिक म्हणून तेथील जनता आधीपेक्षा सुसह्य आयुष्य जगते आहे. याची तरी नोंद राहूल गांधींना आहे का?

सामाजिक पातळीवर असम मध्ये मोठं रूग्णालय (औरंगाबाद आणि नाशिकमधील रूग्णालयांप्रमाणे) संघ परिवाराने उभारण्यास सुरवात केली असून. त्याचा पहिला मोठा टप्पा येत्या जून मध्ये समाप्त होतो आहे. प्रत्यक्षात हे रूग्णालय कार्यान्वीत लवकरत होणार आहे. 

आणि इकडे राहूल गांधी केवळ पत्रकार परिषदेत बडबड करून मोकळे होत आहेत. म्हणूनच असं म्हणावे वाटते की राहूल गांधी भाजपचेच काम करत आहेत. त्यांच्या असल्या निरर्थक आरोपामुळे बडबडीमुळे भाजपचा जास्त फायदा होताना दिसतो आहे. राहूल गांधींनी अरूणाचल प्रदेशचा हा विषय काढला नसता तर त्यावर बोलण्याची संधीही भाजपला मिळाली नसती. आता ज्या प्रमाणे गलवान खोरे, लदाख मधील कामांची माहिती सरकारने चीनी लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर दिली. त्यावरून देशभर त्याची चर्चा झाली. आता तीच परिस्थिती अरूणाचल प्रदेश बाबत होवू शकते.

चीनने अरूणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावला असून तेथे गाव वसवले आहे हा आरोप राहूल गांधी आणि कॉंग्रेस यांच्यावर तर उलटलेच पण या भागात केलेल्या कामाचा ढिंढोरा पिटण्याची संधी भाजपला आयतीच राहूल गांधींनी हातात आणून दिली आहे. 

शिवाय यामुळे कृषी आंदोलनावरचे माध्यमांचे लक्षही दुसरीकडे जावू शकते. कुठल्याही कारणाने हा ईशान्य भारतातील सीमांबाबत प्रश्‍न ऐरणीवर आला तर इतरही बाबी समोर येतील. माध्यमांनाही एक दुसरा विषय मिळेल. या भागातील कॉंग्रेसचे वर्चस्व संपून भाजप राजकीय जागा व्यापत चालला आहे हे इतरांच्या ठळकपणे समोर येईल. त्रिपुराच्या निमित्ताने सुनील देवधर आणि विजया रहाटकर ही दोन मराठी नावे समोर आलीच होती. आता असमधील रूग्णालयाच्या नावाने इतरही नावे समोर येतील. 

ईशान्य भारत सांस्कृतिक दृष्ट्या भारताच्या इतर भागापासून तुटलेला आहे. यांना जोडण्यासाठी विविध संस्था प्रयत्नरत आहेत. राहूल गांधी यांचा पक्ष दीर्घकाळ या भागात सत्तेत होता किंवा त्याचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर अगदी तळागाळापर्यंत आहे. मग त्यांनी याचा विचार का नाही केला? ईशान्य भारतातील सर्वात मोठे आणि प्रभावशाली राज्य म्हणजे असम. इथूनच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राज्यसभेवर निवडुन यायचे. याच राज्यात कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्याने आता आमदारांची संख्या इतकी कमी झाली आहे की मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर पाठवणे कॉंग्रेसला शक्य झाले नाही. आता पुढे जेंव्हा राज्यसभेची निवडणुक असेल तेंव्हा त्याचा फायदा भाजप घेणारच. ते याच भागातील प्रभावशाली व्यक्तीमत्व निवडुन त्यांना राज्यसभेवर घेतील. माजी सरन्यायधीश रंजन गोगोई हे याच प्रदेशातील. त्यांना भाजपने राज्यसभेवर नेमून आपल्या भविष्यातील धोरणाची चुणूक दाखवली आहे.

या कशाचेच भान राहूल गांधींना नसते. कॉंग्रेसचे महान नेते लोकमान्य टिळक ( गांधी नसलले हे कॉंग्रेसचे नेते होते हे तरी राहूल गांधींना माहित असेल की नाही शंका आहे) म्हणाले होते ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ त्या धर्तीवर राहूल गांधी यांनी ‘बरळणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी काहीतरी घोषणा केली आहे की काय कळत नाही. 

         

 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Monday, January 18, 2021

औरंगाबाद जिल्ह्यातील बारवांची भयाण स्थिती


उरूस, 18 जानेवारी 2021 

औरंगाबाद हे अगदी सव्वादोन हजार वर्षांपासून महाराष्ट्र आणि जवळपासच्या प्रदेशाच्या मध्य भारताच्या राजधानीचे ठिकाण राहिलेले आहे. सुरवातीला पैठणला सातवाहन, वेरूळला राष्ट्रकुट, देवगिरीला यादव आणि नंतर इस्लामी राजवटी, औरंगाबाद शहर हे निजामशाही (नगर), मोगल आणि निजामी (हैदराबाद) राजवटीच्या सुभ्याचे ठिकाण राहिलेले आहे. त्यामुळे या परिसरांत प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात लेण्या, मंदिरे आणि किल्ले यांबाबत काही एक जागृती तरी आहे. पण याच परिसरांत अतिशय प्राचीन अशा बारवा आहेत त्यांच्याबद्दल मात्र अतिशय उदासिनता आढळून येते. 

मुळात बारव म्हणजे काय हेच नविन पिढीला माहित नाही. पायर्‍या असलेली दगडी बांधणीतील विहिर म्हणजे बारव. विहिरीचे पाणी पोहर्‍याने उपसता येते. बारवेला पायर्‍या असल्याने खालपर्यंत जावून पाणी घेता येते. त्यासाठी पोहर्‍याची गरज नाही. 

औरंगाबाद परिसरांत बारवांची स्थिती भयानक बनली आहे. गेली दोन वर्षे पावसाळा चांगला असल्याने आपल्याला पाण्याची किंमत नाही. सर्वच ठिकाणी सध्या पाणी उपलब्ध आहे. पण तीनच वर्षांपूर्वी पावसाने ओढ दिली तेंव्हा सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मी हा लेख लिहीतो आहे त्या समर्थ नगरात प्लॉट क्र. 244 च्या बाजूलाच पेशवेकालीन पुरातन बारव आहे. तिचा गाळ काढणे साफसफाई करणे याचा आग्रह आम्ही धरला तेंव्हा ते काम झाले. गरज होती म्हणून तातडीने त्यावर मोटर बसवून पाणी वापरण्यात येवू लागले. पण नंतर पाण्याची गरज संपली. मोटर बंद पडली. परत कचरा साठला. झाडं वाढली. आता बारव दिसत पण नाही इतकी झाडे वाढली आहेत. अगदी या लेखासाठी फोटोही घेता येवू नये इतकी दाट झाडी वाढली आहे. 

औरंगाबाद तालूक्यात कुठे कुठे बारवा आहेत याचा शोध घेत 17 जानेवारी रविवार रोजी कचनेर ते कायगांव या टापूत फिरलो. पुरातन वारश्याबाबत जागरूक असणारा आमचा फ्रेंच मित्र, बोकुड जळगांवचा तरूण मित्र हरी नागे, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता दत्ता भानुसे आणि मी आम्ही चौघे दोन मोटारसायकलवरून फिरलो. एकूण 9 बारवा आम्हाला आढळून आल्या. 

औरंगाबाद पैठण रोडवर गेवराई तांड्यापासून बोकुड जळगांवच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जांभळी गावात एक प्राचीन बारव आहे. गावातील मस्जीदच्या भिंतीला खेटूनच ही बारव आहे. चारही बाजूने उतरत गेलेल्या पायर्‍या. अतिशय खोल अशी ही बारव संपूर्णत: सुस्थितीत आहे. वरचे काही दगड ढासळले आहेत. बारवेला चार देवकोष्टकं आहेत. एका ठिकाणी महादेवाची पिंड आहे. बारवेत कचरा गोळा झालेला आहे.

दुसरी बारव आढळली बीडकीन शहरात भर बाजारात. किल्लीच्या आकाराची ही सुंदर बारव संपूर्ण सुस्थितीत आहे. आजही या बारवेतून पाण्याचा उपसा जवळचे लोक मोटार लावून करतात. पण याची कुणीच साफसफाई करत नाही. बारवेचा अगदी एकही चिरा ढासळलेला नाही. 

बीडकीन शहरातच पैठणच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्याला लागून साई मंदिरा जवळ असलेल्या मुस्लीम कबरस्तानात एक सुंदर बारव आहे. याच बारवेच्या काठावर प्राचीन महादेव मंदिराचे अवशेष आजही विखुरलेले आहेत. महादेवाची खंडित पिंड आहे. एक पालथा दगड आम्हाला मुर्ती असल्याचे लक्षात आले. तो उपडा केल्यावर झिजून गेलेली भंगलेली ती गणेश मुर्ती असल्याचे लक्षात आले. त्याला पाण्याने धुतले. दोन जणांनी मिळून तो उचलला आणि अलीकडे जिथे आसरा म्हणून शेंदूर लावलेले दगड होते तिथे ती गणेश मुर्ती स्थापित केली. तिला हात जोडले. आणि तिथे राहणार्‍या लोकांना सांगितले की याला शेंदूर फासू देवू नका. ही मुर्ती इथून हालवू नका. कबरस्तानात बारव आहे  बीडकीन शहरातीलच किती लोकांना हे माहित आहे कुणास ठावूक. 

चौथी बारव आढळली ती शेकटा या गावी. ही बारव पाहून अक्षरश: तोंडात बोटं गेली. अशा भव्य बारवा मराठवाड्यात अगदी दोन चारच असतील (चारठाणा आणि मादळमोही). बारव संपूर्ण चांगल्या स्थितीत आहे. केवळ आणि केवळ गावकर्‍यांची अनास्था दिसून येते. बारवेभोवती निव्वळ कचराकुंडी आहे. कुठेच न आढळणारा उपसलेले पाणी वाहून नेणारा पन्नास फुटाचा ओहोळ घडीव दगडांत बांधलेला सुस्थितीत आहे. तेथील तरूण मुलांना आम्ही बारवेची साफसफाई करा स्वच्छता राखा अशी विनंती केली. गावातील प्रतिष्ठीतांशी बोललो. बारवेजवळ राहणार्‍या बाया बापड्यांना हात जोडून विनंती केली की कचरा पडू देवू नका.

पाचवी बारव आढळली भगत वाडी गावाच्या शिवारात. ही बारव संपूर्णत: बूजवून टाकली आहे. काटेकुटे इतके आहेत की बारव दिसतच नाही. झाडांत एक दगडी मोठी शिळा पालथी दिसली. तिच्यावर काही कोरीवकाम असावे असे दिसत होते. कसे बसे काटे बाजूला सारत सरपटत मी आत गेलो. आत जी मुर्ती आढळली ती पाहून चकित व्हायला झालं. शेषशायी विष्णुची ती मुर्ती होती. आत गेलेल्या मला बाहेर येता येईना इतके काटे आणि झुडपे होती. माझ्या सोबतच्यांनी गाववाल्यांना बोलावले. कुर्‍हाड मागवली. बाभळीच्या काटेरी फांद्या तोडल्या. माझी सुटका केली.


मुर्ती बाहेर काढली. तिला पाण्याने स्वच्छ धुतले. ही मुर्ती उभी होती तीला स्थानिक शनीदेव म्हणून संबोधायचे. मुर्ती होती हे माहित होते लोकांना. एका म्हातार्‍याच्या स्वप्नात देव आला होता. त्याने मला बाहेर काढ म्हणून सांगितले. तेंव्हा बारवेतून ही मुर्ती बाहेर काढून काठावर ठेवली होती. आता बारव बुजली तशी काठावरची मुर्तीही झाडोर्‍यात मातीत लपून गेली. मुर्ती स्वच्छ करून ती जशी असायला हवी तशी आडवी ठेवली. शेषशय्येवर पहूडलेला विष्णु त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी, त्याच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान ब्रह्मदेव अशी ती खंडित झिजलेली मुर्ती. शेषशायी विष्णुची मुर्ती सहसा बारवेजवळच आढळते. 

सहावी बारव आढळली ती दहेगांव बंगला या गावात. ही बारव अतिशय चंागल्या पद्धतीने जपलेली आहे. बारवेत सध्या वरपर्यंत पाणी आहे. बारवेला गावकर्‍यांनी तारेचे फेन्सिंग करून संरक्षीत केले आहे. बाजूच्या मंदिराचाही जिर्णोद्धार केलेला आहे. 

नविन कायगांव गावांत जूळ्या गणपती मंदिराला लागून प्राचीन बारव आहे. ही आता बांधकामाच्या साहित्याने दबून गेली आहे. तिच्यावर अरेबिक लिपीत शिलालेखही आहे.  याच गावांतील अगदी दूर जूने कायगांव ते गंगापूर रस्त्यावर असलेल्या बारवेची शांकांतिका तर विलक्षण आहे. ही सर्वात मोठी प्रचंड अशी प्राचीन बारव 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले. ही बारव उकलल्या गेली. निवडणुक संपली. झांबड यांचा पराभव झाला. आणि बारवेचाही पराभव झाला. दोन वर्षांपासून बारव आता तशीच उद्ध्वस्त अवस्थेत पडून आहे. तळाचे दगड तेवढे शाबूत आहेत. बारवेच्या भोवतालचा खड्डा पाहूनच आता पोटात खड्डा पडतो. 

बारवेतील गणपती म्हणून एक बारव आणि लहान गणेश मंदिर जामगाव शिवारात आहे. ही बारव चांगल्या स्थितीत आहे. पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने सध्या खाली उतरता येत नाही. 

औरंगाबादला लागूनच असलेल्या या 9 बारवा आणि माझ्या अगदी सतत पाठीशी असलेली समर्थ नगर मधील एक बारव अशा 10 बारवांची स्थिती पाहून सुचत नाही काय करावे काय बोलावे कुणाला बोलावे ते. वारंवार विविध लोकांना भेटतो आहे बोलतो आहे लिहीतो आहे. प्राचीन वारश्याबाबतची आपली अनास्था कशी आणि केंव्हा जाणार हाच विचार मनाला भेडसावतो. हातनुरच्या लोकांनी (ता. सेलू जि. परभणी) आपल्या बारवेचा जिर्णाद्धार लोकवर्गणीतून केला तो एक आशेचा किरण मला दिसतो आहे. सर्वांना कळकळीची विनंती आपल्या भोवतीच्या प्राचीन वारशाबाबत जागरूकता बाळगा. 

(याच परिसरांत चार प्राचीन मंदिरांचा धांडोळा घेतला आकाश धुमणे आणि माझा पुतण्या नंदन याच्या सोबत त्यावर पुढच्या लेखात लिहितोय)        

 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


Saturday, January 16, 2021

नाही ‘मनोहर’ तरी..


उरूस, 16 जानेवारी 2021 

ज्येष्ठ मराठी कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती सन्मान स्वीकारण्यास नकार दिला. त्यासाठी जे कारण दिले ते असे, या सन्मान प्रदान करण्याच्या समारंभात सरस्वतीची प्रतिमा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने मंचावर ठेवण्यात येणार आहे. ही सरस्वतीची प्रतिमा स्त्री शूद्रांवर अन्याय करणार्‍या व्यवस्थेचे प्रतिक आहे.  

पहिली गोष्ट म्हणजे मनोहर ज्या बुद्धाचे अनुयायी आहे त्याने आपल्या बुद्धीचा वापर करण्याचा आग्रह धरलेला आहे. मनोहरांनी आपल्या बुद्धीचा वापर करून नेमके कोणते प्रतिक कशाचे आहे याचा तरी विचार करायचा होता. नटराज ही कलेची देवता आहे. तिचे पुजन अगदी दलित असलेला कलावंतही करतो. मग तो तेंव्हा अशी भूमिका घेेतो का की हे सनानत धर्मातील ब्राह्मणी धर्माचे प्रतिक आहे. मी नटराज पुजन करणार नाही? 

विष्णुच्या अवतारांमध्ये 9 वा अवतार भगवान गौतम बुद्ध दर्शविला जातो. ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येतील अप्रतिम अशा केशव विष्णु मुर्तीवर हा अवतार कोरलेला आहे. आता मनोहर हे नाकारणार आहेत का? किंवा याच्या उलट जे कुणी सनातन धर्माचे कट्टर समर्थक भक्त असतील त्यांनी यावर बुद्ध मुर्ती आहे म्हणून ही विष्णु देवता नाकारायची का?

मुळात सरस्वती ज्या ज्या ठिकाणी प्रतिक म्हणून अर्वाचीन काळात समोर येते ते कशाचे प्रतिक म्हणून? विद्येची अधिदेवता म्हणूनच ना. मग मनोहरांनी आयुष्यभर जी काय साहित्य सेवा केली, जे काय समाज जीवन अनुभवलं, ज्या  काही चळवळीत काम केलं त्यात त्यांना काय शिकवलं गेलं? त्यांचा अनुभव काय होता? 

एकेकाळी अन्याय करणारा सनातन धर्म त्याजून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला. त्यालाही आता 60 वर्षे उलटून गेली. बाबासाहेबांनी ज्या घटना समितीत काम केले, ज्या मंत्रीमंडळात काम केले त्या सर्व ठिकाणी कितीतरी हिंदू प्रतिके वापरली गेली. 64 योगीनींचे जे मंदिर मध्यप्रदेशातील मुरैना येथे आहे त्याच मंदिराची रचना संसदेसाठी वापरली गेली होती. बाबासाहेब असे म्हणाले का की माझ्यावर अन्याय करणार्‍या सनातन धर्मातील देवतेच्या मंदिराची रचना असलेल्या संसद भवनात मी प्रवेश करणार नाही? 

अशोक स्तंभ त्यावर असलेले सिंह हे प्रतिक भारतीय प्रशासनाने स्वीकारले. मग कट्टर पथियांनी अशी भूमिका घेतली का की बौद्ध धम्मातील हे प्रतिक आम्हाला चालणार नाही? 

कितीतरी धर्म संकल्पनांचा मिलाफ होवून भारतीय संस्कृती घडत गेलेली आहे. त्यात कित्येक प्रतिकांची सरमिसळ होवून गेली आहे. मग आपण जर या प्रतिकांबाबत अशी काही कट्टर भूमिका आग्रहाने मांडत गेलो तर भारतीय समाज जीवनात अडथळेच अडथळे येत राहतील. 

ताजमहालाचा कळस, त्या खाली असलेली पाकळ्यांची रचना हे सर्व हिंदू पद्धतीचे प्रतिक आहे. मुळात कळस हाच हिंदू आहे. पण इस्लामच्या कितीतरी वास्तूंवर हा कळस दिसून येतो. मनोहरांच्या घरातील किंवा आजूबाजूच्या बौद्ध स्त्रिया अजूनही कुंकू कपाळावर लावतात. ते कशाचे प्रतिक आहे? आजही गळ्यात काळी पोत घालतात. अक्षता नाकारल्या तरी फुलांचा वर्षाव करण्याचे प्रतिक नेमके कुठून येते? आजही बुद्ध मुर्तीसमोर उदबत्ती पेटवली जातेच ना? बुद्धच कशाला पण बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही हार घातले जातातच ना. 

मनोहरांनी हे स्पष्ट करावे गल्लो गल्ली गणपती बसतात तेंव्हा त्या समोर दलित मुलं नाचत असतील तर ते त्यांच्या कानफटीत लगावणार का? देवीची गाणी गाणारे दलित लोककलाकार आहेत. त्यांच्या घराण्यात परंपरेने ते चालू आहे. यातील धार्मिकता आपण बाजूला ठेवू. पण कला म्हणून त्याचा विचार करणार की नाही? पोतराज हा दलित समाजाचा लोक कलाकार होता. तो हलगी वाजवायचा. हलगी म्हणजेच चर्म वाद्य वाजवणारा कलाकार म्हणून त्याचा सन्मान करणार का त्याला हे फालतू हिंदू धर्मातील धंदे बंद कर म्हणून खडसावणार? 

प्रल्हाद शिंदे कोणत्या समाजाचे होते? त्यांच्या आवाजातील ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ आणि ‘चल ग सखे चल ग सखे पंढरीला’ ही दोन गाणी आजही तुफान लोकप्रिय आहेत. या प्रल्हाद शिंदेंना मनोहर काय समजत असतील? आजही प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील भक्ती गीतांची तुफान लोकप्रियता कुठल्याही दुसर्‍या गायकाला लाभलेली नाही. 

शाहिर विठ्ठल उमप हे कोणत्या जातीत जन्मले? ते कोणती गीतं गायचे? मग आपण त्यांना काय म्हणायचे? अगदी आजचे आघाडीचे संगीतकार अजय अतूल यांनी रचलेले ‘देवा श्रीगणेशा देवा श्रीगणेशा’ गाणं अतिशय लोकप्रिय आहे. त्याबाबत यशवंत मनोहर काय भूमिका घेणार आहेत? 

साहित्य अकादमी सरकारी संस्था आहे. तिच्या पुस्तकांमध्ये  बुद्ध जातकातील लेखनाचा प्रसंग चित्रित केलेली पानं आसपास साठी वापरलेली असतात. मग कोणा कट्टर सनातन्याने अशी भूमिका घेतली का की मला हे बुद्ध धम्मातील प्रतिकच मंजूर नाही? 

औरंगाबाद लेण्यात (हो औरंगाबादलाही लेण्या आहेत. बहुतेक लोकांना अजिंठा वेरूळच माहित असते) आम्रपालीचे शिल्प आहे. गायन वादन नृत्य करणार्‍या स्त्री कलाकार असे हे शिल्प आहे. गायन वादन नृत्य यांचा एकत्रित असा हा पहिला पुरावा मानला जातो. हा संदर्भ बुद्ध जातकातला आहे. मग कट्टरपंथी हिंदूंनी अशी भूमिका घेतली का की हे आम्हाला मंजूरच नाही? 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिक म्हणजेच एलिफंटा गुफेतील  त्रिमुर्ती शिव आहे. मग मनोहरांनी अशी भूमिका घेतली का की मी एमटीडिसीच्या विश्राम गृहात कधी उतरणारच नाही? कितीतरी महानगर पालिका, नगर पालिका यांच्या सभागृहांत मनोहरांनी आक्षेपार्ह वाटतील अशी सनातन हिंदू धर्माची प्रतिकं कोरलेली आहेत. मग मनोहर त्या मंचावर पण जात नाहीत का? शिवाजी महाराजांची राजमुद्रा हिंदू धर्माप्रमाणेच आहे ना.  मग मनोहरांनी या मुद्रेला विरोध केला का कधी? 

कोल्हापुरची अंबाबाई ही जैन बौद्ध यांची पण देवता आहे असा उल्लेख संत एकनाथांचे नातू मुक्तेश्वरांच्या आरतीमध्ये आला आहे. मनोहर असे म्हणणार आहेत का की आम्हाला हे मंजूरच नाही. करिता आम्ही त्या मंदिरातच जाणार नाही. लक्ष्मी या देवतेची पूजा कितीतरी आर्थिक उलाढाल होणार्‍या ठिकाणी केली जाते. ते प्रतिक लावून ठेवलेले असते. अशा नावाच्या काही वित्तविषयक उलाढाल करणार्‍या संस्थाही आहेत. मग अशा बँकेचा धनादेश मनोहर नाकारतात का? 

प्रतिकांचा स्वतंत्र विचार साने गुरूजी, राम मनोहर लोहिया, श्रीपाद अमृत डांगे यांच्या सारख्या डाव्या समाजवादी विचारंवंतांनी सुंदर पद्धतीने मांडला आहे. देवीप्रसाद चटोपाध्याय सारख्या डाव्या विचारवंताने लोकायत नावाचे भले दांडगे पुस्तक आर्यपूर्व देवता आणि परंपरांवर लिहीले आहे. त्यातील कितीतरी प्रतिके आज सर्वत्र रूजलेली आहेत. त्यांचा वापरही सर्वत्र होतो. मग मनोहरांसारखे या बुद्धपूर्व प्रतिकांचा जे की ते टीका करतात त्या सनातन हिंदू संस्कृतीच्याही आधीच्या संस्कृतीमधील आहेत स्वीकार करणार का? 

मनोहर अतिशय ज्येष्ठ लेखक आहेत. प्रतिभावंत आहेत. अशा मनोहरांनी मंचावर सरस्वती असेल तर त्या मंचावरील सन्मानच मला नको अशी आततायी भूमिका घेणे त्यांच्या सहिष्णु करूणामयी बुद्ध परंपरेला शोभणारे नाही. गालिब याने बनारसवर एक सुंदर कविता रचली आहे. बनारस मधील मुर्तींचे वर्णन करताना गालिब लिहून जातो

पैगंबराला दिसलेल्या 
दिव्य प्रकाशापासून
घडलेल्या येथील मुर्ती 

इतका उदारमतवाद एका इस्लामी संस्कृतीत जन्मलेल्या महाकवीला दोनशे वर्षांपूर्वी सुचला. आणि आज आमच्याच परंपरेचा दर्शनांचा भाग असलेल्या बुद्धाच्या अनुयायाला सरस्वतीची केवळ प्रतिमा आक्षेपार्ह वाटत आहे? हे तर अतिशय संकुचित पुरोगामीत्व झाले.    

 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


मूर्ती मालिका - २५




भैरव मूर्ती - निलंगा
निळकंठेश्वर मंदिर (ता. निलंगा जि. लातूर) येथील विविध मूर्तींवर याच मालिकेत लिहिलं आहेच. आजची अप्रतिम मूर्ती भैरवाची आहे. मुर्तीच्या उजव्या वरच्या हातात डमरू आहे. खालचा हात भग्न आहे. डाव्या हातात त्रिशुळ असून खालच्या हातात नरमुंड आहे. त्यातून टपकणारे रक्त पिण्यासाठी कुत्रा जिभ चाटत दोन पायांवर उभा आहे. भैरवाच्या पायावर मुंडमाळ लोंबत आहे.
भैरवमूर्ती नग्न दाखवली जाते तशीच ती इथेही आहे.
भैरवाच्या डोक्यामागे ज्वालेसारखे दिसणारे प्रभामंडळ आहे. कपाळावर पट्ट आहे, कानात कुंडले, गळ्यात हार, कटिसूत्र, मांडीवरील साखळ्यांना घंटा आहेत. दंडांवर बाजूबंद आहेत. पायात तोडे आहेत. डाव्या बाजूला कुत्रा असून उजव्या बाजूला भुतनाथ आहे.
भैरवाच्या चेहर्यावरचे भाव उग्र असतात पण हा भैरव शांत चेहर्याचा दर्शवलेला आहे. याला काही वेगळे नाव असेल तर तज्ज्ञ अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा.
छायाचित्र सौजन्य : दत्ता दगडगावे, लातूर



वामन-दामोदर दूर्मिळ विष्णुमूर्ती
पैठण (ता. पैठण जि. औरंगाबाद) येथील धूंडीनाथ महाराज मठात असलेल्या लक्ष्मी नृसिंह मूर्तीबाबत याच मालिकेत लिहिलं होतं. त्याच जागी या दोन विष्णुमूर्ती आहेत. सहसा विष्णुच्या "केशव" मूर्ती जास्त ठिकाणी आढळतात (पद्म, शंख, चक्र, गदा असा आयूधक्रम). पण या दोन मूर्ती वेगळ्या आढळ्याने मी चकित झालो. डावीकडची मूर्ती वामन या नावाने ओळखली झाते. आयुधांचा क्रम प्रदक्षिणा मार्गाने असा आहे- शंख, चक्र, गदा, पद्म. या मूर्तीला ग्रीवीका, उदरबंध अलंकार वेगळे आहेत. बाकी हाता पायातील तोडे मेखला दूसर्या मूर्तीसारखेच आहेत. पाठशीळा पंचकोनी आहे.
उजवीकडची मूर्ती दामोदर नावाने ओळखली जाते. प्रदक्षिणा क्रमाने आयुधं अशी - पद्म, शंख, गदा, चक्र. या मूर्तीच्या गळ्यात ग्रीवीका नसून हार आहे. करंड मुकूटच आहे पण जास्त उंच आहे. मागची प्रभावळ मोठी आहे. खाली चामरधारिणी, सेवक आहेत. याची पाठशीळा अर्धवर्तूळाकार आहे.
या मठाचा जिर्णाद्धार होणे अभ्यासकांच्या, वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही गरजेचे आहे. आपण सगळे मिळून यासाठी प्रयत्न करू या.
Travel Baba Voyage
thanks for taking this pic in very critical position as the doors are closed and u took it from a small hole.
Akash Dhumne
मित्रा तू ही जागा दाखवलीस. परत एकदा धन्यवाद!



चामुण्डा - गुप्तेश्वर मंदिर
गुप्तेश्वर (धारासुर ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील मंदिर वास्तुशास्त्र, शिल्पसौंदर्य यांच्या दृष्टीने अप्रतिम असा नमुना आहे. या मंदिरावरील चामुण्डेचे हे शिल्प. हीचे वर्णन उग्र देवता म्हणून केले जाते.
हीच्या उजव्या हातात त्रिशुळ आहे. खालचा हात भंगलेला आहे. डाव्या हातात खट्वांग आहे. डाव्या खालच्या हाताची नखं ती कुरतडत आहे. पोट खपाटीला गेलेले. पोटावर विंचु कोरलेला पण तो स्पष्ट दिसत नाही. शुष्क स्तन लोंबत आहेत. मांस नसलेले कातडीत गुंडाळलेली अस्थीपंजर असे तिचे वर्णन आहे. तसेच पाय दाखवलेले आहेत. मुंडमाळा पायावर रूळत आहे. स्तनांच्यावर नागबंध आहे. कमरेलाही नागबंध आहे.
बिभत्स रसाचे दर्शन शिल्पकाराने दाखवले आहे. चेहर्यावरचे भावही तसेच आहेत. द्वीभंग अशी ही चामुण्डा नृत्यमुद्रेत आहे.
(चामुण्डा आणि भैरवी यांतील फरक तज्ज्ञांनी स्पष्ट करावा.)
Arvind Shahane
मित्रा तू मेहनतीने या मंदिराचे फोटो घेतलेस शिवाय दोन भागात मोठा माहितीपट तयार केलास. तूला परत एकदा धन्यवाद.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575