उरूस, 28 नोव्हेंबर 2020
हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुका कधी नव्हेत तो या वेळी राष्ट्रीय पातळीवर पोचल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. ओवैसी यांच्या एआयएमआयएम ने बिहार विधानसभा निवडणुकांत 5 जागा मिळाल्या. त्यामुळे ओवैसी जोरात आहेत. वर वर पाहताना ओवैसी मोदींच्या विरोधी (ओवैसी हा उच्चार ‘मोडी’ असा करतात) बोलतात पण त्यांच्या निशाण्यावर आहेत चंद्रशेखर राव यांचा टी.आर.एस.
ही निवडणुक ओवैसी यांनी भाजपसाठी अतिशय सहज सोपी करून टाकली आहे. जितकी कट्टरता ते भाषणांत दाखवतात तितका भाजपला प्रचार करायला सोपे पडते. उदा. चारमिनार परिसर ओवैसी यांचा बालेकिल्ला आहे. याच चार मिनारला लागून असलेल्या भाग्यलक्ष्मी मंदिरांतून भाजप नेहमी प्रचाराची सुरवात करतो. याच देवीच्या नावावरून हैदराबादचे मुळ नाव भाग्यनगर ठेवावे ही मागणी जोर पकडते.
हैदराबादची प्रसिद्ध बीफ बिर्यानी (बीफमध्ये म्हशीचे रेड्याचे बैलाचे मांसही येते. बीफ या शब्दांतून केवळ गोमांस हा संदर्भ देवून गैरसमज पसरविला जातो) खाण्यासाठी भाजपच्या नेत्यांना आमंत्रण देताना ओवैसी विसरून गेले की हा मुद्दा आपल्यावरच उलटू शकतो. हिंदू वाल्मिक समाजाचा एक मोठा हिस्सा याच शहरात राहतो. डुक्कर पकडणे हा त्यांचा व्यवसाय आहे. डुकराच्या मांसाची बिर्यानी हे लोक खातात. इस्लामला डुक्कर वर्ज्य आहे. मग जेंव्हा भाजप आमदाराने या वाल्मिकी समाजाच्या काही नेत्यांना हाताशी धरून ओवैसी यांना पोर्क बिर्यानी खाण्यासाठी आमंत्रण दिलं त्यावरून मोठा गदारोळ उसळला. याला नेमके काय उत्तर द्यायचे हे एआयएमआयएम च्या कार्यकर्त्यांना कळलेले नाही.
ही निवडणुक महत्वाची का आहे हे समजून घेण्यासाठी याचा आवाका लक्षात घ्यावा लागेल. हैदराबाद शहर आणि आजूबाजूचा ग्रामीण परिसर असा एकूण 5 लोकसभा मतदारसंघाचा हा प्रदेश आहे. 25 विधानसभा मतदारसंघ या क्षेत्रात येतात. (मुंबईचा मनपाची व्याप्ती 6 लोकसभा मतदारसंघ आणि दिल्लीची 7 मतदारसंघ. यावरून हैदराबादचे महत्त्व लक्षात येईल.)
चंद्रशेखर राव यांचा टिआरएस पक्ष नेहमीच ओवैसी सोबत युती करत आला आहे. कधी ही युती छुपी पण राहिली आहे. मागच्या निवडणुकीत टिआरएस ने 99 जागा जिंकल्या होत्या. त्यात तेलगु देसमचा एक नगरसेवक नंतर सामिल झाला. आणि हा आकडा 100 झाला. ओवैसीच्या पक्षाने 44 जागा जिंकल्या होत्या. दोघांनी मिळून महानगर पालिकेवर राज्य केले. भाजप 4 आणि कॉंग्रेस 2 इतक्याच किरकोळ जागांवर विजय मिळाला होता.
या वेळी सगळा प्रचार भाजपने आपण विरूद्ध इतर असा ओढून घेतला आहे. ओवैसी सुद्धा आपल्या भाषणांत भाजप मोदी अमित शहा यांनाच टार्गेट करत आहेत. याचा एक फायदा आपोआपच भाजपला मिळत आहे.
सिकंदराबाद मतदारसंघातून निवडुन आलेले भाजप खासदार जी. किशन रेड्डी केंद्रात गृहराज्य मंत्री आहेत. भाजपने पूर्वीही बंडारू दत्तात्रय यांचे नेतृत्व पुढे केले होते. सातत्याने हैदराबाद मध्ये राजकीय जागा शोधण्याचा भाजपचा प्रयत्न राहिला आहे. ओवैसी यांची टीआरएस सोबतची छूपी युती हाच भाजपने मुख्य मुद्दा बनवला आहे. आम्ही ओवैसी विरूद्ध लढत आहोत असे ओरडून ओरडून टीआरएसला हिंदू मते मिळावीत म्हणून सांगावे लागत आहे.
एमआयएम एकूण 150 जागांपैकी केवळ 60 जागा लढवत आहे. याच जागांमधून जास्तीत जास्त जागा जिंकून टीआरएस सोबत युती करून महापौर पद हस्तगत करण्याचा त्यांचा डाव आहे. हाच मुद्दा म्हणून भाजपने समोर आणला आहे. टीआरएसला मत दिले तरी ते ओवैसीलाच जाणार आहे. तेंव्हा त्यांनाही मत देवू नका. हा मुद्दा सामान्य हिंदू मतदारांच्या मनावर ठसविला जात आहे. यामुळे टीआरएसलाच खरा धोका जाणवत आहे. त्यांच्या जागांवर भाजपने विजय मिळवला तर त्यांना राजकीय दृष्ट्या अवघड जाणार आहे. दुसरीकडून मुस्लिम मत ओवैसीकडे जाईल आणि आपल्याला त्याचाही फायदा होणार नाही. या निवडणुकीत खरा अडचणीत आला आहे तो चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष.
ओवैसी यांना खात्री आहे की मुस्लिम अधिक्य असलेल्या भागांत त्यांनाचा विजय मिळू शकतो. या 60 जागांपैकी 44 त्यांनी पुर्वी जिंकलेल्या आहेत. यावेळी हा आकडा जराही कमी आला तरी तो त्यांचा पराभव ठरेल. दुसरीकडून इतर 90 जागा आहेत त्यांच्यावर भाजपचा डोळा आहे. यातील जास्तीत जास्त जागा जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देण्याची योजना बनवत आहे.
ओवैसी यांना हैदराबाद मध्येच पायबंद केला तर पक्षाची देशभरातील विश्वासार्हता धोक्यात येवू शकते. त्यामुळे भाजपने अगदी विधानसभा निवडणुकांसारखा जोर लावला आहे. केंद्रिय नेतेही प्रचारात उतरवले आहेत.
अगदी मोजक्या अशा जागांवर निवडणुक लढवून राजकारण आपल्या बोटांच्या तालावर नाचविण्यात आत्तापर्यंत ओवैसी यशस्वी झाले. ओवैसी यांची वाढ ही भाजपला सोयीची आहे. कारण प्रतिक्रिया म्हणून आपोआपच हिंदू मत एकत्र होतात. त्यासाठी वेगळा प्रचार करण्याची गरज पडत नाही. हैदराबादची निवडणुक मजलिस वि. भाजप अशी झाली तर दोघांच्याही सोयीची आहे. आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न चालू आहे.
या निवडणुकीचे पडसाद पश्चिम बंगाल मध्ये उमटण्याची शक्यता जास्त आहे. कारण उत्तर प्रदेशच्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे. हैदराबादसारखे मुस्लिम लोकसंख्येचे गढ भारतभराचे मुस्लिम मानस काय आहे याचे दिशादर्शक आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रजाकरांनी केलेल्या अत्याचाराचा मुद्दा प्रकर्षाने प्रचारात आणला आहे. शिवाय 17 सप्टेंबर हा मुक्तिदिन म्हणून हैदराबादला साजरा झाला पाहिजे असाही एक अस्मितेचा मुद्दा समोर आणला आहे. आत्ताचे तेलंगणा राज्य, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि कर्नाटकांतील गुलबर्गा, बिदर, रायचुर हे तीन जिल्हे म्हणजे पूर्वीचे हैदराबाद राज्य. हे संस्थान 17 सप्टेंबर 1948 ला स्वतंत्र झाले. तेंव्हा मराठवड्यातील जनतेने भांडून 17 सप्टेंबरचे सरकारी झेंडावंदन पदरात पाडून घेतले. पण हा दिवस हैदराबाद संस्थानाच्या इतर भागांत साजरा होत नाही. हा मुद्दा हैदराबाद मधील जनतेला स्पर्शून जाणारा आहे. यावरही पहिल्यांदाच चर्चा होते आहे. आत्तापर्यंत या मुद्द्याचे गांभिर्य कुणाला फारसे जाणवले नव्हते. पण भाजपने हा मुद्दा समोर आणून टिआरएस सारख्यांची तोंडे बंद केली आहेत. एमआयएम ची रजाकारी पार्श्वभूमी प्रकर्षाने समोर आणली जात आहे. एमआयएम ला ते सोयीचेच आहे. पण यातून खरी गोची होते आहे ती चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती (टी.आर.एस.) या पक्षाची.
एमआयएम आणि भाजप या निवडणुकीचा देशभर आपआपला प्रचार करण्यासाठी फायदा करून घेत आहे. यातून सेक्युलर म्हणवून घेणार्या इतर सर्व पक्षांची गोची झालेली दिसून येते आहे. हैदराबाद निवडणुकांत कॉंग्रेस, एकेकाळी राज्य करणारा तेलगु देसम पक्ष, डाव्यांचा एकेकाळचा गढ असलेला तेलंगणा यांची कुणी चर्चाही करत नाही. त्यांचे बेदखल होणे हे कशाचे द्योतक आहे? सेक्युलर नावाचे ढोंग लोकांनी नाकारले आहे हेच यातून दिसून येते आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575