Wednesday, November 25, 2020

कॉंग्रसमधील लेटरा-लेटरी आणि खेटरा-खेटरी


उरूस, 14 नोव्हेंबर 2020 

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माजी मंत्री ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी राजदीप सरदेसाई यांना एक सविस्तर मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी बर्‍याच गोष्टींचा खुलासा केला आहे. 23 ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी पक्ष पातळीवर आत्मपरिक्षण करण्याबाबत पत्र लिहीलं होतं. त्यावर टिका करणार्‍यांनी पक्षात बोलायच्या गोष्टी बाहेर का बोलल्या म्हणून ओरड केली होती. तेंव्हा त्याचा खुलासा करताना या पूर्वीच पक्ष कार्यकारिणीच्या उच्चाधिकार समितीत हे विषय कसे उपस्थित केले होते आणि त्यांची दखल कशी घेतली गेली नाही हे सिब्बल यंानी मांडले आहे. आता या नेत्यांवर टिका करणारे सिब्बल यंाच्या खुलाश्यावर काही बोलायला तयार नाहीत.

हेमंत बिस्व शर्मा हे असममधील नेते वारंवार राहूल गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागत होते. पण त्यांना वेळ मिळाली नाही. आणि जेंव्हा भेटीची संधी मिळाली तेंव्हा राहूल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्कीटं खावू घालण्यात मग्न होते. त्यांनी हेमंत बिस्व शर्मा यांच्याकडे लक्षच दिले नाही. त्यानंतर हेमंत शर्मा यांनी पक्षाचा त्याग करून भाजपत प्रवेश घेतला. पुढे काय घडले ते सर्वांना माहित आहे. संपूर्ण ईशान्य भारतातून राजकीय दृष्ट्या कॉंग्रेस नामशेष होत आली आहे. 

पत्र लिहीणार्‍या प्रश्‍न विचारणार्‍या नेत्यांना पिंजर्‍यातील पोपट म्हणणारे ‘हे पोपट पाळले कुणी?’ याचे उत्तर देतील काय? पोपट कधीच आपणहून पिंजर्‍यात प्रवेश करत नाही. मालकालाच पोपटपंची ऐकायची हौस असते. म्हणून तर तो सोनेरी पिंजरा, पिकलेली फळे अशी अमिषे दाखवून पोपट पिंजर्‍यात अडकवतो. म्हणजे दोष पोपटांचा नसून आधी मालकाचा आहे हे पहिले ध्यानात घेतले पाहिजे.

कॉंग्रेसमधील सध्याचा असंतोष केवळ नेतृत्वाविरोधात वैयक्तिक आहे असे नाही. पक्षाचा सतत पराभव होतो आहे. सत्ता मिळवून देण्यास नेतृत्व असमर्थ ठरत आहे म्हणून हा विरोध आहे. याच सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली 2004 ते 2014 अशी सलग दहा वर्षे सत्ता उपभोगता आली. त्यामुळे त्या काळात कधी असंतोष उफाळून आला नाही. तेंव्हाही राहूल गांधी निर्णय केंद्रात सक्रिय होतेच. कॉंग्रेस पक्षाला डाव्यांच्या पाठिंब्याने सत्ता मिळवता आली. दुसर्‍या कालखंडात (2009 ते 2014) इतरांच्या पाठिंब्याने सत्ता अबाधित राहिली. या काळात पक्षाची निकोप वाढ होत होती असे नाही. आण्णांचे लोकपाल आंदोलन आणि निर्भया प्रकरणानंतर जो प्रचंड जनआक्रोश उसळला त्याला तोंड द्यायला कॉंग्रेस नेतृत्व कधीच जनतेला सामोरे गेले नाही. याच काळात भाजपचे आक्रमक नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने समोर आले. याचा एकत्रित परिणाम म्हणून सत्ता परिवर्तन घडले. 

कॉं्रग्रेसला स्वत:चे बहुमत नव्हते. इतरांच्या पाठिंब्यावरच सत्ता टिकलेली होती. पण त्यानंतर आलेल्या भाजपला मात्र स्वत:च्या बळावर सत्ता एकदा नव्हे तर दोनदा मिळालेली आहे. हा फरक लक्षात घ्यायला हवा. कॉंग्रेस नेतृत्वाच्या मर्यादा आधीही होत्या. पण सत्तेमुळे त्या झाकुन राहिल्या. राहूल गांधी गेली 16 वर्षे खासदार आहेत. पण त्यांनी संसदेत किंवा प्रचार सभांमध्ये केलेले एकही प्रभावी भाषण आढळून येत नाही. एकही प्रभावी मुद्दा त्यांनी ऐरणीवर आणला नाही. अर्णब गोस्वामीला दिलेली 2013 मधील राहूल गांधींची मुलाखत आजही यु ट्यूबवर उपलब्ध आहे ती जरूर पहा. राहूल गांधींच्या नेतृत्वाचा  अपरिपक्व पैलूच त्यातून झळकतो.  संघटनात्मक पातळीवरील कॉंग्रेस पक्षाची बांधणी अतिशय उत्तम होती असे प्रत्यक्ष सत्ता काळातही कधी दिसून आली नाही. 

जोवर सक्षम पर्याय समोर येत नव्हता तोपर्यंत लोकांनी कॉंग्रेसला सहन केले. कॉंग्रेस हाच जर खरा पर्याय वाटत होता तर 1984 नंतर एकदाही त्या पक्षाला जनतेने स्पष्ट बहुमत का दिले नाही? 84 नंतर एक दोन नव्हे तर तब्बल 9 सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. यातील एकाही निवडणुकांत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत नाही. 1991, 2004 आणि 2009 या तीन निवडणुकांत इतर पक्षांच्या पाठिंब्याने सरकार टिकले. कॉंग्रेसने जेंव्हा जेंव्हा इतरांना पाठिंबा दिला ती सरकारे कधीही आपला कार्यकाळ पूर्ण करू शकली नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा जनता पक्षाच्या फुटीनंतर चरणसिंह सांचे सरकार आले होते. विश्वनाथ प्रतापसिंह यांचे सरकार गडगडल्यावर चंद्रशेखर यांचे सरकार आले होते. 1996 ला सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजपचे अटलबिहारी वाजपेयीं सरकार 13 दिवसांतच कोसळले तेंव्हा कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल अशी दोन सरकारे आली. पण या चारही पंतप्रधानांना कॉंग्रेसने जास्त काळ राज्य करू दिले नाही. वर्षेभरातच सरकारले कोसळली. 

कॉंग्रेसने आपल्या पक्ष वाढीसाठी कधीच नियोजनबद्ध काम केलेले दिसून येत नाही. संघटना बळकट नसण्याचे परिणाम आता सतत होणार्‍या पराभावातून दिसून येत आहेत. विचारसरणी म्हणून काही कॉंग्रसपाशी शिल्लकच नाही. नरसिंह रावांच्या काळात मुक्त आर्थिक धोरणे राबविणारे अर्थमंत्री मनमोहनसिंग नंतरच्या काळात पंतप्रधानपदी आल्यावर डाव्यांच्या दबावात डावी धोरणं राबवायला लागले. कृषी विधेयकांचा समावेश कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यात होता. कृषी उत्पन्न बाजार समितींसाठीचा मॉडेल ऍक्ट मनमोहनसिंगांच्या काळातच मंजूर झालेला होता. पण तरीही भाजपने कृषी विधेयके आणली की विरोध सुरू झाला. आधार कार्ड बाबत योजना निलकेणींनी राबवली तेंव्हा कॉंग्रेसचेच सरकार होते. नंतर याच आधार कार्डांवरून गोंधळ घातला गेला. ई.व्हि.एम. चा निर्यण राहूल गांधींच्या काळातला आहे. कॉंग्रेंसच्या काळातच याचा वापर सुरू झाला. पण नंतर याच कॉंग्रेसने ई.व्हि.एम.ला अर्थहीन विरोध केला.  तेंव्हा कॉंग्रेसला कसलीही विचारसरणी शिल्लक राहिली नाही. 

संघटनात्मक रचना बळकट नाही. विचारसरणी काही शिल्लक नाही. नेतृत्व कमकुवत प्रभावहीन आहे. असा कॉंग्रेसचा तिहेरी पेच आहे. त्यामुळे आधीची लेटरा लेटरी संपून आता खेटरा खेटरी सुरू झालेली दिसत आहे. 

संपूर्ण भारताचा विचार केल्यास उत्तर प्रदेश (80), महाराष्ट्र (48), पश्चिम बंगाल (42), पूर्वीचा आंध्र प्रदेश (42), आधीचा बिहार (54) आणि तामिळनाडू (39) अशा जवळपास 305 जागी कॉंग्रेस पहिल्याच काय पण दुसर्‍या क्रमांकाचाही पक्ष शिल्लक राहिला नाही. देशातील इतर काही छोट्या राज्यांचा विचार केल्यास एकूण 350 जागी कॉंग्रेस पक्षाची ताकदच शिल्लक राहिलेली नाही. 543 पैकी केवळ 200 जागी हा पक्ष आपली काही ताकद बाळगून आहे. म्हणजे लढायच्या मन:स्थितीत आहे. यश किती मिळेल तो नंतरचा मुद्दा आहे. 

बिहार सोबत भारतभरच्या ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या बहुतांश जागा कॉंग्रेसच्याच होत्या. 58 पैकी केवळ 11 जागा कॉंग्रेसला राखता आल्या. म्हणजे असलेल्या जागाही कॉंग्रेसने गमावल्या आहेत. ही खरी शोकांतिका आहे. 

कॉंग्रेसचे कार्यकर्ते ज्यांना मंत्रीपदे मिळाली, संस्था लाभल्या ते सर्व सुखासीन होवून बसले आहेत. मतदानासाठी मतदारांना बाहेर काढणे, पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने कार्यक्रम राबवणे, रस्त्यावर उतरणे, आपत्तीच्या काळात लोकांना मदत करणे हे करताना तो कुठेही दिसत नाही. फाईव्ह स्टार कल्चर असा शब्दप्रयोग स्वत: ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीच केला आहे.

राहूल गांधी यांनी स्वत: होवून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून आमच्या कुटूंबातील कुणी अध्यक्ष नको असे स्पष्ट केले असताना परत परत विषय गांधी घराण्यापाशीच का येवून थांबतो? इतका मोठा देश आहे, इतका मोठा पक्ष आहे, इतकी मोठी दीर्घ परंपरा पक्षाला लाभली आहे आणि परत परत एका कुटूंबाच्या पायाशी लोळण घेत लाचारी दाखवणे ही नेमकी काय मानसिकता आहे? देशापुरता म्हणाल तर देशाने सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही मुद्दे आपल्या परीने निकालात काढले आहेत. देशाच्या पातळीवर नसले तरी राज्याच्या पातळीवर केजरीवाल, ममता बॅनर्जी, नविन पटनायक, चंद्रशेखर राव, जगन मोहन रेड्डी, पी. विजयन, पलानीस्वामी, हेमंत सोरेन, उद्धव ठाकरे, नितीशकुमार असे भाजपा-कॉंग्रेस शिवायचे मुख्यमंत्री जनते समोर आहेत. यातील काहींना भाजप आणि काहींना कॉंग्रेसनेच पाठिंबा दिला आहे. हे लक्षात घेतले तर सत्ताधारी भाजप आणि त्याच्या समोर कॉंग्रेस यांच्या शिवायचा काही एक पर्याय लोकांनी स्विकारलेला आहे.

आता कॉंग्रेसने स्वत:साठीच स्वत:त बदल करण्याची गरज आहे. देशातील उज्ज्वल परंपरा आणि भवितव्य असलेल्या लोकशाहीचा विचार केल्यास जनतेसमोर सर्व सक्षम पर्याय उपलब्ध आहेत. लोकशाही वाचवायला कॉंग्रेसची गरज नाही. सुरवातीच्या 5 निवडणुका (1952, 57, 62, 67, 71) कॉंग्रस हाच मुख्य पक्ष होता. अगदी विरोधी पक्षनेतेपद मिळावे इतकाही विरोधी पक्ष शिल्लक नव्हता. देशाला पहिला विरोधी पक्ष नेता लाभला तोच मुळी जनता पक्षाच्या काळात कॉंग्रेसच्या यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने (विरोधी पक्ष नेत्याला केंद्रिय मंत्र्याचा दर्जा, सोयी सवलती, काही एक अधिकार या अर्थाने विरोधी पक्षनेते पद). तरीही आपल्या लोकशाहीला धोका पोचला नाही. मग आताच कॉंग्रेसची घसरण सुरू झाल्यावर विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला धोका आहे अशी ओरड पुरोगामी का करत आहेत? त्यांच्या या छाती पिटण्याला अर्थ नाही.   

कॉंग्रस सत्तेच्या लोभाने टिकून राहणारा पक्ष आहे. सत्ताच मिळणार नसेल तर कॉंग्रस संपायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणूनच आता कॉंग्रेसमध्ये लेटरा-लेटरी नंतर खेटरा-खेटरी सुरू झाली आहे.        


         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  

    

 

Tuesday, November 24, 2020

मूर्ती मालिका -१०

पारशिवनीची महालक्ष्मी

महालक्ष्मी म्हणजे कोल्लापुर इतकेच आपल्याला माहित असते पण कोल्हापुरच्या मूर्ती सारखीच अप्रतिम मूर्ती नागपुरपासून उत्तरेला रामटेकच्या दिशेने पारशिवनी गावात स्थित आहे. एक मिटर उंचीची ही मूर्ती खोदकामात सापडली. मूर्तीच्या उजव्या हातात बीजपुरक आहे, वरच्या हातात गदा आहे. डाव्या वरच्या हातात खेटक म्हणजेच ढाल आहे तर डाव्या खालच्या हातात पानपात्र आहे. कोल्हापुरची महालक्ष्मी पण अगदी अशाच आयुधांनी युक्त आहे. हीला अंबाबाई असे पण संबोधतात. महालक्ष्मी असा शब्द आला की तीला विष्णुपत्नी असं मानण्याची प्रथा आहे. पण महालक्ष्मी ही केवळ विष्णुपत्नी नव्हे. मुक्तेश्वरांनी (एकनाथांच्या मुलीचा मुलगा) महालक्ष्मीची जी आरती लिहीली आहे त्यातील एका कडव्यात
तारा सुगतागमी शिवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीज निगमागम सारी
प्रकटे पद्ममावती जीन धर्माचारी
असे वर्णन आले आहे. म्हणजे बौद्धांची तू तारा आहेस, शैवांची गौरी आहेस, सांख्यांसाठी तू प्रकृती आहेस, आगम पंथियांसाठी गायत्री आहे आणि जैनांसाठी पद्मावती आहेस. आरती म्हणताना आम्ही "तारा शक्ती अगम्य" अशी अगम्य भाषा करून बौद्धांचा संदर्भ उडवला. तर "नीज धर्माचारी" असा शब्द वापरून जीन धर्मियांचा म्हणजेच जैनांचा संदर्भ उडवला.
पारशिवनीची ही महालक्ष्मी अतिशय देखणी आहे. तिच्या मुकुटांत सयोनीलिंग आहे. पाठशिळेवर खाली सिंह, मग घोडा मग व्याल कोरलेले आहेत. पायाशी खाली चामरधारिणी आहेत. गळ्यात हार, कर्णभुषणे, मेखला असे अतिशय नजाकतीनै कोरलेले आहेत. पंचमहाभुतांचे प्रतिक म्हणून पाठशिळा पंचकोनात कोरलेली असते. तशी ती इथेही आहे.
(फोटो व माहिती सौजन्य प्रविण योगी, पोलीस अधिकारी हिंगोली)


चामूंडा : भयानक व बिभत्स रसाचे दर्शन
आपल्या परंपरेत मानवी भावभावनेतील सर्व रसांचा विचार केला गेला आहे. काही गोष्टी नकोशा वाटतात पण त्यांचे अस्तित्व मात्र असते. असे दोन रस भयानक आणि बिभत्स यांचे दर्शन चामुंडा मूर्तीत दाखलेले आहे. ही मूर्ती नीलकंठेश्वर मंदिर निलंगा (जि. लातुर) मंदिराच्या बाह्य भागावर देवकोष्टकांतील आहे.
उजव्या हातात सुरा, वरच्या हातात त्रिशुळ, डाव्या वरच्या हातात खट्वांग (मानवी कवटीपासून केलेले हत्यार), डावा मधला हात तोंडात असून त्याची नखं ती दाताने कुरतडत आहे, खालच्या हातात कपाल व नरमुंड आहे. एक हात खंडित आहे. ही सहा हाताची चामूंडा आहे.
पोटावर विंचू आहे. सर्प बंध आभुषण म्हणून स्तनाभोवती कमरेला दाखवलेले आहेत. जांघेत घंटा दिसून येते आहे. नरमुंडमाला पायावर लोंबत आहे.
तिचे वाहन प्रेत पायाशी आहे. उजवीकडे पिशाच्च नाच करत आहे. डाव्या बाजूला कुत्रे आहे. वर मान करून नरमुंडातील रक्त ते चाटत आहे. देवीची हाडे स्पष्ट दिसतात. हाडं आणि कातडी असे मांसरहित रूप चामुंडेचे ग्रंथात वर्णीलेले आहे. स्तन शुष्क असून खाली लोंबत आहेत. (उन्नत उभारलेले स्तन समृद्धतेचे मातृत्वाचे प्रतिक समजले जाते)
भयानक व बिभत्स रसाचे दर्शन या मूर्तीत शिल्पकाराने घडवले आहे. नउ रसांची नावे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटी कविता आहे
'अद्भुत' वाटे 'भयानका'चे
'बिभत्स' दर्शन होता जगाचे
मनात 'करूणा' दाटून येते
'रौद्रा'तूनी जन्म 'वीरा'स देते
'हास्या'त 'शृंगार' शोभे विहंगम
सगळ्या रसाचा 'शांतीत' संगम
सप्तमातृकां पैकी चामुंडा एक मानली जाते. या मातृकांची संख्या आठ, नऊ पण सांगितली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सप्तमातृका आढळून येतात.
(फोटो सौजन्य दत्ता दगडगावे, लातूर. चामुंडा रूप विवरण डाॅ. माया पाटील (शहापुरकर) यांच्या ग्रंथाच्या आधाराने)



आळतं सुंदरी
प्राचीन मंदिरांच्या मंडोवरावर (बाह्यभागावर) सुरसुंदरींची शिल्पे हे एक वैशिष्ट्य आढळून येतं. १२ व्या शतकातील प्राचीन अशा गुप्तेश्वर मंदिर (ता. गंगाखेड जि. परभणी) येथे "आळतं सुंदरी"चे हे शिल्प कोरलेलं आहे. मंदिराच्या उत्तर भागात विष्णुचे पद्मनाभ रूपातील शिल्प देवकोष्टकात आहे. त्याच्या बाजूला हे शिल्प आहे. मंगल कार्य घरात असेल तेंव्हा उखळा जात्याचा मुहूर्त केला जातो. उखळ जात्याची पूजा करून पाच स्त्रीया त्यावर ठेवलेले विडे उचलून उखाणे घेतात. यावेळी वधु, करवली, तिची आई किंवा वरमाय यांना न्हाउ घातलं जातं. व नंतर त्यांच्या पायावर ओल्या कुंकवाचे पट्टे रेखतात. स्वस्तीक काढलं जातं. याला "आळतं" म्हणतात.
या शिल्पात ही नववधु वेलीला टेकुन उभी आहे. तिच्या तळपायावर दूसरी स्री आळतं भरत आहे. हे खोड वेलीचं आहे कारण याच परिसरांत जात्यावरच्या ओव्यांत एक गोड असा संदर्भ आलेला आहे
दारी मांडव ग घाला ।
फुला सगट जाईचा ।
छंद मुलाच्या आईचा ।।
दारात वेल आहे आणि त्या फुलांचा सुगंध सर्व परिसरात भरून राहिला आहे. शिल्पाच्या वरच्या भागात वेलीचा पर्णविस्तार नक्षीच्या माध्यमातून दाखवला आहे. या शिल्पातील स्त्रीचा जो केसांचा मोठा अंबाडा दाखवला आहे त्यावर गजरा माळलेला आहे.
काही शिल्पं "सुरसुंदरी" या शब्दांत बसत नाहीत. पत्र सुंदरी, शत्रु मर्दिनी, पुत्र वल्लभा अशी शिल्पं ज्यांच्यावर याच सदरात लिहिलं आहे ती स्त्री स्वभावाचे विविध पैलू दाखवतात. ती केवळ शृंगारापुरती मर्यादीत नाही हे स्पष्ट करतात. ही आळतं सुंदरी पण अशीच वेगळी आहे. या परिसरांतील रिती रिवाज परंपरा यांचे प्रतिबिंब यात उमटले आहे. अभ्यासक डाॅ. ए.डि. शिंदे सर यांनी आळतं सुंदरी हे नाव या शिल्पाला दिलं. मला हे मोठं वैशिष्ट्यपूर्ण असं शिल्प वाटलं. या मंदिराला जरूर भेट द्या.
(फोटो सौजन्य अरविंद शहाणे, परभणी. swaraj infotain या u tube वाहिनीवर या मंदिवर बनवलेले दोन माहितीपट उपलब्ध आहेत त्याची link इथे देतोय https://youtu.be/CaPlMqklJmI )
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

Sunday, November 22, 2020

मूर्ती मालिका -९


नर्तकाची देखणी मूर्ती

अजिंठ्याच्या जवळ अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथे उत्तर चालूक्य कालीन मंदिर आहे. या मंदिवरील विष्णु शक्तीच्या मूर्तींमुळे अभ्यासकांचे लक्ष इकडे वेधले गेले. याच मंदिरावर प्रदक्षिणा पथावर उजव्या बाजूला ही नर्तकाची मूर्ती मला आढळून आली. या पूर्वी तीन चार वेळा मंदिर बघितले पण ही मूर्ती लक्षात आली नव्हती. नर्तकी, अप्सरा, सुरसुंदरी या नावाने ओळखल्या जाणार्या स्त्री शिल्पांची माहिती होती. अशी भरपुरं शिल्प मंदिराच्या बाह्य भागावर आढळून येतात. पण या तूलनेत मोठ्या आकारातील (शिल्पाची उंची दीड फुट) नृत्य पुरूष (नर्तक) शिल्पांची संख्या फारच कमी आहे.
या नर्तकाचे कानातले, गळ्यातले, दंडावरचे ठळक ढोबळ वाटणारे दागिने वेगळेपण सांगतात. स्त्रीयांचे दागिने नाजूक कोरलेले असतात. कमरेला असलेली मेखला जाड माळेसारखी दाखवलेली आहे. स्त्रीयांच्या मेखलेचा नाजूकपणा इथे नाही. नर्तकी-नर्तकांचे डोळे काजळाने अधोरेखीत केले असल्याने ठसठशीत दिसून येतात. या नर्तकाचे डोळे तसेच आहेत. ओडीसी नृत्यात यासारखी मुद्रा असलेले गुरू केलूचरण महापात्रा यांचे छायाचित्र प्रसिद्ध आहे. कथ्थक मध्येही याला साधर्म्य साधणारी मुद्रा आढळते. लेणी आणि मंदिरांवर आढळून येणार्या नृत्यमुद्रांवरूनच नंतरच्या काळातील नृत्य प्रकार समृद्ध होत गेले असं अभ्यासक सांगतात.
या मंदिर सभामंडपात भव्य अशी वर्तुळाकार रंगशीळा आहे. भोवती आसन कक्ष आहेत. म्हणजे देवतेच्या समोर नृत्य सादर केले जायचे व ते पाहण्यासाठी लोक आसनांवर बसून असायचे. मंदिरांचा मुख्य मंडप हा कलाविष्काराचे केंद्र होता.
Mahagami Gurukul
तूमच्याकडे अशा शिल्पांवर अभ्यास झालेला असेल तर जरूर माहिती सांगा.
(छायाचित्र सौजन्य संदिप देशमुख कौठेककर)



ज्ञानेश्वरीतील षड्भुज गणेश
ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सहा भुजांच्या गणेशाचे वर्णन आलेले आहे. षड् दर्शनांचे रूपक म्हणून या ओव्या आहेत असे मानल्या जायचे. पण गंगाधर मोरजे यांनी संशोधन पत्रिकेत एक लेख लिहून हे केवळ रूपक नसून अशी गणेश मूर्ती प्रत्यक्ष पाहूनच ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहील्या असणार असे प्रतिपादन केले. यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर असलेली अशी गणेश मूर्ती कामाची नसून प्रत्यक्ष महाराष्ट्रातच शोध घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने एक गणेश मूर्ती मोरजे यांनी सर्वांच्या नजरेस आणून दिली (संशोधन पत्रिका, इ.स. १९७२). परांडा किल्ल्यात ही मूर्ती सध्या स्थित आहे. ती नेमकी कुठली आहे सांगता येत नाही.
ज्ञानेश्वरीतील ओव्या अशा आहेत
देखा षड्दर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृति ।
म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हाती ।।१०।।
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ।।११।।
एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ।।१२।।
आता या वर्णनाप्रमाणे परांडा किल्ल्यातील गणेश मूर्तीकडे आपण बघितल्यास हे वर्णन तिथे चपखल बसते. उजवा वरचा हात खंडित आहे. उजव्या खालच्या हातात भग्न दंत आहे. डाव्या वरच्या हातात कमळ आहे. डाव्या खालच्या हातात मोदकपात्र आहे.
ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे कमळ सांख्य दर्शनाचे प्रतिक, खंडित दात बौद्ध मताचे प्रतिक, न्याय दर्शनासाठी हातात परशु आहे (हा हात खंडित आहे), सिद्धांत भेदासाठी अंकुश आहे, उत्तर मीमांसेसाठी रसाळ मोदक आहेत, पूर्व मिमांसेसाठी वरद मुद्रा आहे (हा हातही खंडित आहे). मूर्ती १ मीटर २४ सेमी इतकी मोठी आहे.
नृत्य गणेश म्हणून स्थानिकांना परिचित असलेली परांडा किल्ल्यातील ही गणेश मूर्ती इतकी महत्वाची आणि मोलाची आहे. महाराष्ट्रात सहा हातांची गणेश मूर्ती अजून कुठे असल्यास जरूर कळवा. संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल. होट्टलच्या नृत्य गणेशाला हे वर्णन जास्त लागु पडते कारण त्याचा अभय मुद्रेतील हात स्पष्ट दिसतो. पण दूसरी अडचण हातातील पद्माची येते. हा गणेशही सहा हातांचा आहे. पण बाकी वर्णन जूळत नाही.
(परांडा किल्ल्यात या मूर्ती ठेवल्या त्या दालनात फारसे कुणी जात नाही. या किल्ल्याला आम्ही भेट दिली तेंव्हा या दालनात आवर्जून गेलो. या षड्भुज नृत्य गणेशाचे छायाचित्र घेतले. या लेखासाठी वापरलेले छायाचित्र मात्र किल्ल्याचा अभ्यास ज्यांनी सविस्तर केलेला आहे त्या अजय माळी या मित्राने पाठवले आहे. संदर्भ सौजन्य: संदीप पेडगांवकर, गणेश वाचनालय, परभणी.)
(ज्ञानेश्वरी भावदर्शन या शंकर महाराज खंदारकर यांच्या ग्रंथातून ओव्यांचे अर्थ घेतले आहेत.)



सारीपाट खेळणारे शिव पार्वती
वेरूळला कैलास लेण्या शिवाय इतर लेण्यातही खुप शिल्पवैभव आहे. ते फारसं बघितलं जात नाही. आता २१ क्रमांकाच्या "रामेश्वर" नावाने ओळखल्या जाणार्या लेणीत हा सुंदर शिल्पपट आहे. याचा कालखंड कैलास लेण्याच्या आधीचा आहे. हेच शिल्प छोट्या आकारात बाजूचे सेवक वगळून परत केलास लेण्यातही आहे.
शिव पार्वती सारीपाट खेळत आहेत. शिवाची हार झाली असून तो पार्वतीला विनवणी करत आहे की अजून एक संधी दे, अजून एक डाव खेळू. शिवाचा उजवा वरचा हात तर्जनी उंचावलेला दिसतो आहे. या "एक" चा दूसरा अर्थ "तू जिंकलीस काय आणि मी जिंकलो काय आपण एकच तर आहोत" अशी मखलाशी पण आहे.
शिवाच्या उजव्या खालच्या हातात फासे आहेत. डावा एक हात मांडीवर रोवला असून डाव्या वरच्या हाताने पार्वतीचा पदर पकडला आहे. शिव झुकलेला आहे जरासा पार्वतीच्या दिशेने.
याच्या उलट जिंकलेली पार्वती निवांत डावा हात बाजूच्या गिरदीवर रोवून जरा मागे रेलली आहे. उजवा हात चेहर्याच्या दिशेने "आँ असं कसं? मी जिंकले आता माझी अट पूर्ण करा" अशा मुद्रेत आहे. तिची दासी लडिवाळपणे तिच्या वेणीशी खेळत आहे. दूसरी दासी पंख्याने वारा घालत आहे. एका बाजूला एक सेवक त्रिशुळ सांभाळत उभा निवांत आहे. दूसर्या बाजूचा सेवक हातावर हात ठेवून गदा जमिनीवर टेकवून उभा आहे. मध्यभागी बसलेला डावाकडे पहात "असं कसं घडलं? देवाधिदेव महादेव कसे हारले" या आचंब्यात आहे.
या शिल्पाचा सगळ्यात सुंदर लोभसपणा म्हणजे संपूर्ण मानवी भावभावना दर्शवणारे दैवतांचे शिल्प आहे. अन्यथा देवी दैवता त्यांची शस्त्रे आणि वाहने आणि दागिने आभुषणे यांनीच जखडलेले असतात.
याच शिल्पाच्या खाली शिवाचे वाहन नंदी मध्यभागी दाखवला असून सगळे गण त्याची थट्टा मस्करी करत आहेत आणि तोही मस्त आनंद घेत डूलत आहे असे दाखवले आहे. (तो फोटो नाही घेता आला)
दैवताचे लोभस मानवीपण दाखवणार्या या कलाकाराला साक्षात दंडवत. ( छायाचित्र सौजन्य
Travel Baba
)
- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका - ८


सूर्य नारायण मूर्ती (होट्टल, ता. देगलूर, जि. नादेड)

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा. या नविन वर्षात तूमच्या परिसरातील प्राचीन मंदिरं आणि मूर्तींचे संवर्धन होवो.
ही मूर्ती आहे सूर्य नारायणाची. होट्टल येथील प्राचीन मातीत गाडल्या गेलेल्या भग्न सोमेश्वर मंदिराच्या बाह्य भागातील ही मूर्ती. मूद्दामच आजूबाजूचा परिसर ध्यानात यावा म्हणून हा फोटो असा घेतला. अकराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर (तसा जूना शिलालेखच इथे सापडला आहे).
या मूर्तीला नूसती सूर्य मूर्ती न म्हणता सूर्य नारायण म्हणतात कारण विष्णुच्या रूपातील हा सूर्य आहे. पाठीमागे नागाचा फणा आहे. त्याच्या वर किर्तीमुख कोरलेले आहे. मुकूट, गळ्यातील अलंकार, मेखला, यज्ञोपवीत असा अलंकारांनी नटलेला हा सूर्य. दोन्ही हातात पद्म असून ही कमळं खांद्याच्या वरती दाखवलेली आहेत. सूर्य मूर्तीचे हे एक वैशिष्ट्य सांगितले जाते. पायाशी लहान आकारात सात अश्व कोरलेले आहेत. सूर्याच्या रथाला एक चाक असते, सात अश्व असतात आणि अरूण नावाचा सारथी तो रथ हाकत असतो असे वर्णन प्राचीन ग्रंथात केलेले आहे.
मूर्तीच्या उजव्या बाजूस उषा आणि डाव्या बाजूस प्रत्युषा (संध्याकाळ) यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत आठवड्याचे सातही दिवस सूर्याचा रथ धावत असतो असे यातून सुचवायचे आहेत.
विष्णुशी साधर्म्य दाखवल्याने हीला संयुक्त मूर्ती मानली जाते.
सूर्यमूर्ती महाराष्ट्रात तूलनेने फारच कमी आहेत. केवळ सूर्याचे म्हणता येईल असे एकच मंदिर वाघळी (ता. चाळीसगांव, जिं जळगांव) येथे अभ्यासकांना आढळून आले आहे.
होट्टलच्या या मंदिराची अवस्था वाईट आहे. परिसरात घाण, दारूच्या बाटल्या, कचरा साठलेला आहे. अतिशय मौल्यवान शिल्प खजाना धुळखात पडलेला आहे. होट्टल येथील अन्य दोन मंदिरांचा जिर्णोध्दार झाला असून हे मंदिर जिर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत मातीत गाडून घेवून तप:श्चर्या करत बसले आहे.


कला सरस्वती
प्राचीन काळातील मूर्ती अविष्कार समोर ठेवत असताना आधुनिक काळातला शिल्पाविष्कार नोंद केला पाहिजे असे जाणवले. सरस्वतीची ही आधुनिक काळातील मूर्ती औरंगाबादच्या महागामी गुरूकुलात वटवृक्षाच्या छायेत विराजमान आहे. सरस्वती मूर्तीत वीणा दूय्यम स्वरूपाची किंवा लहान दाखवलेली असते. ही सरस्वती ठळकपणे लक्षात रहाते ती जवळपास सरस्वतीच्याच आकारातील उभ्या वीणे मुळे. सरस्वती विद्येची देवता तर आहेच. पण वीणावादनामुळे तीचं नातं संगीताशी अतिशय उत्कट असं आहे. या सरस्वतीच्या डाव्या खालच्या हातात पुस्तक आहे. उजवा वरचा हात वरदमूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. उजव्या खालच्या हातात पद्म आहे. डावा वरचा हात वीणेवर आहे. या वीणेच्या भोपळ्यावरही अप्रतिम अशी कलाकुसर आहे. महागामी नृत्यगुरूकुल असल्याने असेल कदाचित पण ही वीणाही कुशल नर्तकीसारखी डौलदार जाणवते. वीणेचा वरचा भाग मयुरमुखाच्या आकारात कोरलेला आहे. सरस्वतीच्या पायाशी मोर असून त्याची डौलदार मानही नृत्यमुद्रा सुचवते. ही सरस्वती कमळासनावर उभी आहे.
ही मूर्ती तब्बल साडेपाच फुट उंच आहे. शिल्पकला आधुनिक काळात जपणे, तिला प्रोत्साहन देणे यासाठी महागामी ला विशेष धन्यवाद.
Mahagami Gurukul
. या सरस्वतीला मी "कला सरस्वती" असे ठेवले आहे.


भग्न मंदिरावरील उग्र नरसिंह
दोनच दिवसांपूर्वी सूर्य नारायणाचे शिल्प आणि त्याची माहिती दिली होती. त्याच होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील जिर्णावस्थेतील सोमेश्वर महादेव मंदिरावरील हे दूसरे अप्रतिम शिल्प. हा आहे उग्र नरसिंह. मांडीवरील हिरण्यकश्यपुचे पोट फाडणारे दोन हात आणि शंख चक्र धारण करणारे दोन हात असे चार हात ओळखता येतात. बाकी शिल्पावर दशावतार कोरलेले दिसत नाही. डोक्यामागे नागफणा आहे. नरसिंहाचा मुकुट स्पष्टपणे दिसतो.
मंदिराच्या बाह्य भागावर मुख्य देवकोष्टकांतील ही मूर्ती असावी. जशी सूर्य नारायणाची आहे.
मंदिराची अवस्था पाहून याची दूरूस्ती करण्यास असमर्थ ठरलेली सरकारी यंत्रणा आणि सरकारवर दबाव टाकू शकणारे आपण या सगळ्यांच्याच नालायक वृत्तीचे पोट या नरसिंहाने फाडावे असे फार तीव्रतेने वाटते.
दिवाळीच्या नंतर एक महिन्याने देवदिवाळी असते. आशा करू की या देवदिवाळीला सर्वांना सुबुद्धी सुचून प्राचीन मंदिरांची दूरूस्ती जिर्णाद्धाराची कामे मार्गी लागतील.
या मंरदिरासाठी चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने ११०१ मध्ये देणगी दिल्याचा शिलालेख याच मंदिरापाशी सापडलेला आहे. मंदिराचा कालखंड अकराव्या शतकाच्या शेवटचा असल्याचे यातून निष्पन्न होते.
मंदिराचा जिर्णोद्धार आपल्याला करता येत नसेल तर देवदिवाळीच्या दिवशी या प्राचीन शीलालेखाच्या बाजूलाच अजून एक शिलालेख लिहून ठेवण्याची गरज आहे. "आम्ही या मंदिराची दूरूस्ती करू शकत नाही. करीता हे मंदिर जमिनीत गाडून टाकण्यात येत आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४२ देवदिवाळी १५ डिसेंबर, २०२०, स्वतंत्र भारतातील लोकसभेत/विधानसभेत निवडून आलेले सर्व जनतेचे राजे, सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि १३५ करोड गौरवशाली इतिहास संस्कृती प्रेमी जनता."
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575

मूर्ती मालिका - ७


नृत्य गणेश (होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड)

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्यअंगावर उत्तरेला ही अप्रतिम अशी नृत्य गणेशाची तीन फुट उंच सुबक मूर्ती आहे. हा सहा हातांचा गणेश आहे. उजव्या बाजूला वरच्या हातात परशु आहे. उजव्या मधल्या हातात भग्नदंत आहे. डाव्या बाजूला वरच्या हातात नाग आहे. डाव्या मधल्या हातात मोदक आहेत.
खालचे दोन्ही हात सुंदर अशा नृत्यमुद्रेत आहेत. डाव्या हाताच्या या मुद्रेला "गजहस्त" असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर समर्थपणे रोवलेला आहे याच्या नेमकं उलट उजव्याचा केवळ अंगठाच कलात्मकरित्या वळवून जमिनीवर टेकवला आहे. अगदी असं वाटतं प्रत्यक्ष गणराज नाचत असताना त्याचे छायाचित्र घेतले आणि त्या छायाचित्रावरून हे शिल्प कोरले. मेखलेची मी माळ मध्यभागी खाली सुटली आहे ती बरोबर डावीकडे झुकली आहे. केवळ स्थीर उभा गणेश असता तर ही माळ ओळंबा रेषेत जमिनीच्या दिशेने सरळ दाखवली असती. माथ्यावरच्या मुकुटाच्या झिरमाळातील मध्यभागीचे पदकही जरा डावीकडे झुकलेले दाखवले आहे.
डावा पाय सरळ असल्याने ती मेखला खाली दिसते आहे तर उजवा पाय वर उचलला असल्याने मेखलेची माळ वर सरकली आहे. शिल्पकाराची खरेच कमाल आहे.
गणेशाचे वाहन मुषक खाली उजव्या बाजूला आहे.
या भागातील अशा काही कलात्मक मूर्तीतून संगीत या प्रदेशात समृद्ध असल्याचे पुरावे मिळतात.
(फोटो सौजन्य
Travel Baba
)



प्राचीन भव्य गणेश मूर्ती
दिपावली शुभचिंतन !
ही गणेशमूर्ती अजिंठा डोंगरांतील वेताळ वाडी किल्ल्या जवळील रूद्रेश्वर लेण्यांतील आहे. अजिंठा गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला एक रस्ता ‘अजिंठा व्ह्यु पॉईंट’ कडे जातो. या रस्त्यावरून पिंपळदरी गावापासून डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हळदा म्हणून गाव आहे. याच हळद्याच्या पुढे वेताळवाडीचा किल्ला आहे. या ठिकाणाला अजिंठा रोडवरून गोळेगांवपासून उंडणगाव मार्गाने पण जाता येते.
वेताळवाडी किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्यावर जाताना वाडी गावांतून एक छोटी वाट रूद्रेश्वर लेणीच्या डोंगराकडे जाते.
डोंगरमाथ्यावरून कोसळणार्या सुंदर धबधब्याने दगड कापत कापत एक सुबक अशी खोबण तयार केली आहे. याच खोबणीत रूद्रेश्वर लेणी कोरली गेली आहे. ही लेणी अजिंठा लेणीच्याही आधी पितळखोरा लेणी काळातील आहे. (इ.स. पूर्व १०० वर्ष).
लेणीसाठी डोंगरावरून उतरणारी एक अवघड अशी पायवाट आहे. लेणीत महादेवाची सुंदर अशी पिंड, समोर सुबक नंदी आहे. या लेणीतील खरे आकर्षण म्हणजे वरच्या छायाचित्रात असलेली गणेशमूर्ती. सहा फुटाची भव्य अशी ही गणेशमूर्ती दगडांत कोरलेली आहे. त्या काळातील इतकी भव्य प्राचीन दुसरी गणेशमूर्ती महाराष्ट्रात नाही ( माहित असल्यास कृपया खाली काॅमेंट करावी). उजवा पाय उंचावलेला व डावा पाय दुमडलेला अशी ही देखणी गणेशमूर्ती आहे. कमरेला नागाने वेढा घातलेला आहे. शेंदूर फासल्याने मुळचे सौंदर्य लक्षात येत नाही. मूर्तीची भव्यता डोळ्यांत सहज भरते. समोरच्या दरवाज्यांतून वरून पडणार्या पाण्याचा अखंड नाद कानात घुमत राहतो. मूर्तीसमोरच्या छोट्या ओटयावर डोळे मिटून हात जोडून बसल्यास हा पाण्याचा नाद अथर्वशिर्ष उच्चारत असल्याचा भास होत राहतो.
या मूर्ती शेजारी उग्र नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे.
वरतून कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते. (फोटो सौजन्य
Travel Baba
)


भोग नरसिंह आणि योग नरसिंह
डावीकडची साधी सुबक मूर्ती आहे भोग नरसिंहाची. यालाच लक्ष्मी नरसिंह असेही म्हणतात. डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मागे ९ फण्यांचा नाग आहे. मूर्तीला फार विशेष अलंकरण असं काही केलेलं नाही. ही मूर्ती बोरकीनी नावाच्या सेलू तालूक्यातील देवगाव फाट्या जवळील छोट्या गावातील आहे. प्राचीन जूनं मंदिर आता आधुनिक करण्यात आलं आहे. मंदिरा जवळ पडझड झालेली प्राचीन बारव आहे. या बारवेची दूरूस्ती डागडूजी होण्याची अत्यंत गरज आहे.
उजवीकडची मूर्ती योग नरसिंहाची आहे. ही मूर्ती आधीच्या मूर्तीपेक्षा प्राचीन आहे हे सहजच लक्षात येते. ही मूर्ती नांदेड जवळच असलेल्या शंखतीर्थ येथील मंदिरातील आहे. नरसिंहाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. योग मूद्रेतील दोन हात आहेत त्यातील उजव्या हातात अक्षमाला आहे. पायात योगपट्टा आहे. मागे प्रभावळ असून त्यावर दशावतार कोरलेले आहेत. या मंदिराचा अतिशय चांगल्या पद्धतीनं जिर्णोद्धार झाला आहे.
शंखतीर्थ गोदावरी नदीच्या काठावर आहे. या जागेला गोदावरीचे नाभीस्थान समजले जाते. तसा गौरवपूर्ण उल्लेख दासगणु महाराजांनी आपल्या गोदा महात्म्यात केला आहे. नरसिंह मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंदिरे नेहमीच पाण्याच्या जवळ बांधली जातात. नदी नसेल तर किमान सुंदर बारव तरी मंदिरा जवळ असतेच.
ही दोन्ही मंदिरं जिर्णोद्धाराचे दोन नमुने आहेत. बोरकिनी येथे आधुनिक सिमेंटीकरणाच्या नादाला लागुन प्राचीनत्व नष्ट केल्या गेलं तर शंखतीर्थ येथे काळजीपूर्वक जिर्णोद्धार झाला जेणेकरून मंदिराचे प्राचीनत्व बर्याच प्रमाणात राखले गेले.
(फोटो सौजन्य भोग नरसिंह- मल्हारीकांत देशमुख परभणी, योग नरसिंह- डाॅ. नंदकुमार मुलमुले नांदेड)

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासाठी !


 (साप्ताहिक विवेकने प्रसिद्ध केलेल्या ‘राम मंदिर ते राष्ट्र मंदिर’ (संपा. रवींद्र गोळे) या ग्रंथात ‘आत्मनिर्भर’ विभागात हा लेख समाविष्ट आहे. या विभागात देवेंद्र फडणवीस, डॉ. क.कृ.क्षीरसागर, नितीन गडकरी, संजय ढवळीकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे या मान्यवरांचे लेख आहेत.)

‘आत्मनिर्भर भारत’ अशी एक मोठी आकर्षक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. त्यावर सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विचारमंथन होताना दिसत आहे. शेतीच्या बाबत मोठी विचित्र धोरणं स्वातंत्र्यानंतर आखली गेली. त्यामुळे असेल कदाचित पण या क्षेत्राचा मात्र स्वतंत्र असा विचार झाला नाही. जी काही धोरणं आखली गेली ती बहुतांश शेतीविरोधीच होती हे आता सिद्ध झालेलं आहे. कोरोना जागतिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर अतिशय वेगळे मुद्दे समोर येत आहेत. आत्तापर्यंत केलेला सावत्रपणाचा दूजाभाव सोडून काहीतरी वेगळी मांडणी करणे अत्यावश्यक झाले आहे.  

मूळात आत्मनिर्भर अशी घोषणा देण्याची वेळ का आली? कारण बहुतांश औद्योगीत उत्पादनांबाबत आपण परदेशी वस्तूंवर/तंत्रज्ञानावर/संशोधनावर अवलंबून राहिलो. त्यामुळे त्यांच्या खरेदीसाठी मोठे परकिय चलन खर्च होत राहिले. त्यावर उपाय म्हणून प्रामुख्याने ही घोषणा समोर आली. 

दुसरी एक बाब म्हणजे भारतीय मानस, आवडी निवडी, परंपरा, सवयी या सर्वांचा विचार करून काही उत्पादनं समोर येणं आवश्यक होतं. पण तसे झाले नाही. या उलट परकिय संकल्पनांवर आधारीत खानपानाच्या जीवनशैलीच्या सवयी आणि इतर बाबींप्रमाणे उत्पादने जागतिक बाजारात येत गेली म्हणूनही आपल्याकडची उत्पादने पिछाडीवर गेली. हाही एक विचार या घोषणेमागे असलेला दिसतो.

शेतीचा विचार केला तर मुळातच आपण आत्मनिर्भर आहोत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ‘आत्मनिर्भर भारत’ ही घोषणा भारतात शेतीक्षेत्रात अतिशय वेगळ्या पातळीवर वापरावी लागणार आहे हे जाणल्याशिवाय शेतीक्षेत्रासाठी भाविष्यातील धोरण ठरविता येणार नाही.

1. पहिला मुद्दा आहे सर्व भारतीय जनतेला पुरेसं अन्न आपण उत्पादीत करतो आहोत का? अन्नधान्याच्या बाबत आपण 1965 नंतर स्वयंपूर्ण झालेलो आहोत. आपल्या देशातल जनतेला खावू घालण्यासाठी आपल्याला परकियांकडे तोंड वेंगाडण्याची गरज नाही. तेंव्हा अन्नधान्यांच्या बाबत आपण स्वयंपूर्ण आहोत. अन्नधान्य यात प्रामुख्याने गहु, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका यांचा समावेश होतो. 

यातही परत आत्मनिर्भरतेचा टप्पा संपवून पुढे जावून आपण निर्यातही करू शकतो. त्यासाठी या धान्यांच्या बाबत आधुनिक वाणांचा वापर, यांच्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य आणि नेमका वापर अशा काही गोष्टी करण्याची गरज आहे. गहु आणि तांदूळ यांचे उत्पादन भारतात प्रचंड प्रमाणात होते आहे. त्यांना साठविण्यासाठी गोदामं अपुरी पडत आहेत. फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया सारखी यंत्रणा यासाठी कुचकामी ठरताना दिसत आहे. स्वस्त धान्य दुकान ही यंत्रणा पण पूर्णत: किडलेली आहे. गरिबांसाठी धान्य पुरवण्याच्या नावाखाली या यंत्रणेत माजलेला प्रचंड भ्रष्टाचार, धान्याची नासडी आणि यामुळे या धान्याच्या बाजारपेठेचा कुंठलेला विकास आपण आत्तापर्यंत अनुभवलेला आहे.

आत्मनिर्भर भारत म्हणत असताना धान्याच्या क्षेत्रातून सरकारी हस्तक्षेप, आवश्यक वस्तु कायद्या सारख्या जाचक अटी निघून जाणे आवश्यक होते. सरकारने आता ही पावलं उचलली आहेत. धान्याची जी सरकारी खरेदी आहे ती बफर स्टॉक वगळता संपूर्णत: बंद झाली तर या धान्याचा बाजार खुला होईल आणि याच्या स्पर्धात्मक किंमती व दर्जा यांचा अनुभव ग्राहकाला येवू शकेल. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही याबाबत काही एक ठोस करता येणे शक्य होईल.

2. दुसरा अन्नधान्यातील गंभीर मुद्दा आहे डाळी आणि तेलबियांच्याबाबतचा. यासाठी आपण अजूनही संपूर्णत: आत्मनिर्भर झालेलो नाही. कितीही प्रयत्न केले तरी हे होताना दिसत नाही. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे डाळींचे जरा भाव वाढले की ओरड सुरू होते. सरकारी दडपशाहीला सुरवात होते. व्यापार्‍यांवर कार्रवाई होते. परिणामी डाळींची सगळी बाजारपेठ आक्रसून जाते. मग यातून सगळेच हात काढून घेतात. डाळींच्या बाबत आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर आधी सरकारी हस्तक्षेप दूर झाला पाहिजे. डाळींमधील आधुनिक जनुकिय बियाणांना परवानगी दिली गेली पाहिजे.  

कोरोनाच्या संकटमय काळातही डाळीचा पेरा अतिशय चांगला झालेला आहे. कारण मान्सुन अतियश चांगला झालेला आहे. खरीपाच्या लागवडीचे क्षेत्र वाढलेले दिसून येते आहे. भारतात बहुतांश ठिकाणी कोरडवाहू शेतीत डाळी पिकतात. (उदा. महाराष्ट्रातील तूर. हरभरा मात्र बागायती असून रब्बीत होतो) तेंव्हा यांना जरा जरी आकर्षक भाव मिळाला तरी डाळींचे क्षेत्र पुढच्या वर्षी अजून वाढलेले दिसून येते. डाळींच्या बाबत स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर समाधानकारक पाऊस आणि आकर्षक दर इतके पुरेसे आहे. त्यासाठी वेगळे काहीच करायची गरज नाही (आधुनिक बियाणे आणि तंत्रज्ञानाचा मुद्दा तर सर्वच पीकांसारखा इथेही आहेच). 

तेलबियांबाबत आपण नेहमीच धरसोड धोरण अवलंबतो. एकीकडे आत्मनिर्भर होण्याचे बोलतो आणि दुसरी कडे तेलबियांचे आयातीचे मोठमोठे करार करतो. परिणामी भाव पडतात. पारंपरिक तेलबियांवरून आपण आता सोयाबीनसारखे पीकांकडे वळलो आहोत. पण त्यातही भाव कोसळल्याने हात पोळल्या गेल्याचा अनुभव येतो आहे. तेंव्हा तेलबियांसाठीही डाळींप्रमाणेच जरासे भाव वाढले की लगेच आयातीचे शस्त्र उपसून या देशी बाजारपेठेची कत्तल करण्याची गरज नाही. जरासा संयम बाळगून वाढलेले भाव काही काळ राहू दिले तरी पुढच्या काळात ते स्थिरावतात. आणि ही बाजारपेठेही स्थिरावते असा अनुभव आहे. 

3. ‘आत्मनिर्भर भारता’त सर्वात कळीचा मुद्दा शेतीसाठी कापसाचा आहे. आपण जगात कापुस उत्पादनाच्या बाबतीत अगदी पहिल्या क्रमांकावर राहिलेलो आहोत. पण नेमकं त्याच्या पुढे जावून कापसापासून धागा, धाग्यापासून कापड आणि त्यापासून तयार कपडे ही सर्वच साखळी विस्कळीत झाली आहे. मुळात आधी कापूस उत्पादक शेतकर्‍याचे हीत जपल्या गेले पाहिजे. आपण कधी वस्त्र उद्योगाचे लाड करण्यासाठी आपल्याच शेतकर्‍याला मारतो, कधी तयार कपड्यांच्या उद्योगांसाठी वस्त्र उद्योगावर अन्याय करतो अशी एक विचित्र अवस्था गेली काही वर्षे सातत्याने दिसून आली आहे. 

आत्मनिर्भर भारत म्हणत असताना कापूस-जिनिंग-धागा-कापड-तयार कपडे ही साखळी सबळ होण्याची गरज आहे. यासाठी जे जे घटक सक्षमपणे काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. जे दुबळे आहेत, ज्यांचे तंत्रज्ञान जूने आहे, ज्यांच्यात जागतिक स्पर्धेत टिकण्याची ताकद नाही त्यांना जास्तीचे अनुदान देवून टिकविण्याची तातडीची गरज नाही. उलट जे चंागले काम करत आहेत त्यांच्या मार्गातील अडथळे दूर झाले पाहिजेत. आपोआप त्यावर मिळणार्‍या नफ्याच्या जीवावर पुढील उद्योग उभा राहतो. सगळ्यात पहिल्यांदा कापूस उत्पादकाचे हित साधले गेले पाहिजे. कारण त्यांची संख्या प्रचंड आहे शिवाय त्यांनी अपार मेहनत करून अगदी आभाळातून पडणार्‍या पावसावर अतिशय कमी उत्पादन खर्चात  कापसाचे प्रचंड उत्पादन घेवून दाखवले आहे. याच कापसाच्या प्रदेशात पुढचा प्रक्रिया उद्योग उभा राहिल याची काळजी घेतली पाहिजे. जिथून कच्चा माल खरेदी केला जातो त्याच्या पाचपट उलाढाल पुढच्या प्रक्रिया उद्योगात होते. पण त्याचा फायदा त्या उत्पादन करणार्‍या प्रदेशाला आणि तेथील शेतकर्‍याला मिळत नाही. परिणामी त्याची उमेद खचत जाते.

4. शेतीशी संबंधीत पुढचा घटक येतो तो फळे भाजीपाला आणि दुधाचा. याही बाबत आपण कित्येक वर्षांपासून स्वयंपूर्ण झालेलो आहोतच. ‘आत्मनिर्भर भारत’ ही घोषणा इथेही परत वेगळ्या अर्थाने घ्यावी लागेल. फळे भाजीपाला फार मोठ्या प्रमाणात शहरी भागात विकला जातो. शहरी निमशहरी भागात फळे आणि भाजीपाला यांची जी विस्तारलेली बाजरपेठ आहे ती कृषी उत्पन्न बाजारपेठ कायद्याने जखडून ठेवली होती. ही अट आता निघून गेल्याने या क्षेत्राने मोकळा श्‍वास घेताना दिसून येते आहे. कोरोनाच्या काळात घरोघरी किफायतशीर किंमतीत ताजी भाजी पोचवून या शेतकर्‍यांनी कमाल केली आहे.  

आता दूसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते बारामहिने चांगले असण्याची नितांत गरज आहे. छोट्या वाहनांतून शेतकरी ही वाहतूक शहरात करतो आहे. पण अतिशय खराब रस्त्यांमुळे ही वाहने नादूरूस्त होतात. काही काळात त्यांची अवस्था दूरूस्तीच्या पलीकडे जाते. आणि शेतकर्‍याला ही वाहतूक परवडत नाही. त्यासाठी तातडीने बारमाही पक्के ग्रामीण रस्ते अशी एक धडक योजना देशभर राबविण्याची गरज आहे. ते केल्यास हा भाजीपाला चांगल्या पद्धतीने शहरी बाजारपेठेत अल्पकाळात पोचू शकतो.

फळांच्या बाबत या सोबतच अजून एक वेगळा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. फळांवर प्रक्रिया, त्यांची शीतगृहात साठवणूक या बाबी फार आवश्यक आहे. आता फळांचा वापर शहरी ग्राहकाच्या खाण्यात मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो आहे. प्रकिया केलेले फळांचे रस, गर, अर्क यांचा वर्षभर वापर होतो. शीतपेयांतही फळांच्या रसाला पहिले प्राधान्य मिळत आहे. तेंव्हा प्रक्रिया करणारे कारखाने, वाहतूकीची साधने (शीतकरणाची व्यवस्था असलेली), साठवणुकीसाठी शीतगृहे या सर्व बाबी आत्मनिर्भरतेच्या रस्त्यावरचे महत्त्वाचे पाउल ठरणार आहेत. तेंव्हा याचा स्वतंत्र विचार झाला पाहिजे.

दुधाच्या बाबतीत भाजीपाला व फळांसाठी आपण जे काही करतो आहोत ते तर हवेच आहे. पण त्या शिवाय अजून एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे जो आपण कायम दूर्लक्षीत करतो आहोत. दुभत्या जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न फार गंभीर आहे. गावोगाच्या गायरानाच्या जमिनी आता नष्ट झाल्या आहेत. या जमिनीवर जनावरे मुक्तपणे चरू शकत होती. त्यामुळे ती पाळणे शेतकर्‍याला सहज शक्य होते. आता ही सोय उरली नाही. वर्षभर विकत चारा घेवून दुभते जनावर पोसणे परवडत नाही हे जळजळीत वास्तव आहे. 

डोंगराळ भागात जनावरांच्या चराईसाठी आता विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. तरच दुभती जनावरं टिकतील. आजही आपण या क्षेत्रात स्वयंपूर्ण आहोतच. पण दूध उत्पादन करणारा शेतकरी तोट्यात जातो आहे. ते टाळण्यासाठी जनावरांच्या चराईचा प्रश्‍न सोडविला पाहिजे. 

त्यासाठी दोन बाबी अतिशय तातडीने आणीबाणीची परिस्थिती समजून केल्या गेल्या पाहिजेत. गावोगावच्या मोकळ्या जागा जनावरांना चराईसाठी उपलब्ध करून देणे, तेथे चारा देणार्‍या वनस्पतींची लागवड करणे आणि दुसरी बाब म्हणजे वनखात्याच्या ज्या जमिनी आहेत डोंगर आहेत तेथे दुभत्या जनावरांच्या चराईला प्रोत्साहन देणे. त्यासाठी विशेष प्रयत्न करणे. आदिवासींना जंगल क्षेत्रात चराईचे हक्क आहेत पण शेतकर्‍यांना नाहीत. असला दुजाभाव चालणार नाही. (औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा डोंगर परिसरांत प्रचंड असे क्षेत्र जनावरांच्या चराईसाठी उपलब्ध आहे. यासाठी आदिवासी आणि गोपालन करणारे शेतकरी चराईची झाडे लावण्यासही तयार आहेत. पण सरकारी अडथळ्यांचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेत आहोत.)

5. शेवटचा मुद्दा आहे तो अपारंपरिक शेती उत्पादनांबाबत आहे. आपल्याकडे जी फळे भाजीपाला होत नाही जे धान्य घेतले जात नाही त्याची लागवड करण्याचा अट्टाहास काहीजण करताना दिसतात. याबाबत अतिशय सरळ साधा बाळबोध प्रश्‍न उपस्थित होतो. मुळात जर कुठल्याही उत्पादनासाठी बाजारेपठ उपलब्ध असेल तर ते उत्पादन बाजारत जास्त उपलब्ध होते यासाठी कुठलेही वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. फुलांची बाजारपेठ विस्तारली की शहराजवळ शेतकर्‍यांनी फुलं लावलेली दिसून येतात. अपारंपरिक फळांची मागणी वाढली की त्यांची लागवड जवळपासच्या जमिनींवर झालेली दिसून येते. त्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. 

नेट शेड आणि इतर खर्चिक बाबींवर फार मोठी चर्चा होताना दिसते. याचे साधे गणित बाजारपेठेवर अवलंबून आहे. जर नफा मिळणार असेल तर अगदी वातानुकूल तंबुमध्येही पीक घेतले जाईल. पण त्याचे आर्थिक गणित तर बसले पाहिजे. आत्मनिर्भर भारत म्हणत असताना आपली जी गरज आहे आणि आपण जी पीकं पारंपरिकरित्या घेतो आहोत त्यांचे काय करायचे हा पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. जी आपली गरज नाही आणि आपण घेतही नाहीत त्या पीकांचा फार विचार करून काय हशील? आणि त्यातही परत नफ्याची खात्री नाही. तंेंव्हा आत्मनिर्भर भारत या घोषणेचा विचार करताना अशा बाबींचा विचार दुय्यम ठरतो. 

उपहसंहार :

कोरोना काळात आख्ख्या भारतातील शेती हे एकच क्षेत्र असे राहिले की त्याने कुठलीही तक्रार केली नाही. कसलीही मदत मागितली नाही. जितके लोंढे आले तेवढी माणसे सामावून घेतली. सर्वांना पोटभर खावू घातले. सर्व देशालाच  अन्नधान्याचा  तुटवडा  पडू दिला नाही. केवळ अन्नधान्यच नाही तर फळे भाजीपाला दुधही या काळात पुरेसे उपलब्ध होते. हे शिवधनुष्य शेतकर्‍यांनी पेलून दाखवले. आताही खरिपाच्या क्षेत्रात सव्वापट वाढ करून कमाल करून दाखवली आहे. पाउस चांगला झाल्याने चांगल्या रब्बीची पण खात्री आहे. तेंव्हा देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात पहिल्यांदाच शेती क्षेत्र सर्वात आघाडीवर राहिलेले दिसून येते आहे.  तशी आकडेवारी मार्च 2021 नंतर प्रत्यक्ष हाती येईलच. पण तज्ज्ञ आत्ताच तशी शक्यता वर्तवत आहेत. 

एक शेती क्षेत्र विस्तारले तर त्याचे फायदे जास्त लोकसंख्येपर्यंत पोचतात हे वास्तव शहरी विद्वानांनी आता मान्य करावे. नसता शहरांनी फायदे फक्त मोजक्या लोकांपर्यंतच पोचण्याची व्यवस्था गेल्या 72 वर्षांत निर्माण केली होती. सरकारी यंत्रणेनेही याच ‘इंडियाला’ जवळ केले. त्यालाच सख्खा मुलगा मानून त्याचे लाड केले. सावत्र मानला गेलेला कर्तृत्ववान ‘भारत’ आजही सर्वांना उदार अंत:करणाने खावू घालताना पोसताना दिसतो आहे. 

आत्मनिर्भर भारत म्हणत असताना आपण शेती सक्षम होवू दिली (ती सक्षम आहेच आपण होवू देत नाहीत ही तक्रार आहे) तर ती स्वत: सह संपूर्ण देश पुढे नेईल याचा पुरावाच कोरोना काळात शेतकर्‍यांनी दिला आहे. तेंव्हा ‘उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नौकरी’ ही जूनी म्हण खरी होण्याचा मार्ग मोकळा करू या.  


कृषी विधेयके


जून महिन्यात मोदी सरकारने शेतीविषयक तीन अध्यादेश काढले होते. आता त्याच अध्यादेशांना संसदेत विधेयकाच्या स्वरूपात मांडल्या गेले. हे विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात सप्टेंबर महिन्यात मंजूरी मिळाली. या विधेयकांद्वारे शेतकरी संघटनेने किमान 40 वर्षांपासून लावून धरलेली मागणी मुर्त रूपात आली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली  2000 साली कृषी कार्यबलाची (ऍग्री टास्क फोर्सची) योजना केली होती. या कार्यबलाचा अहवाल सरकारला सादर झाला तेंव्हा त्यात या मागण्यांचा समावेश होता.

ही क्रांतीकारी तीन विधेयके शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे, शेतमाल सौद्यांचे स्वातंत्र्य बहाल करतात तसेच शेतकर्‍यांना अडथळा ठरलेल्या आवश्यक वस्तू कायद्याचा गळफास सोडवतात. 

हे तीन विधेयके अशा प्रकारचे आहेत

1. पहिले विधेयक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून शेतकर्‍यांना मुक्त करते. याद्वारे शेतकरी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारा बाहेर कुणाही व्यापार्‍याला विकू शकतो. किंवा तो स्वत: आपल्या शेतमालाची विक्री करू शकतो

2. आवश्यक वस्तु कायदा (इसेंन्सीएल कामोडिटी ऍक्ट) याचे ‘जीवनावश्यक’ अतिशय चुक असे भाषांतर डाव्यांनी करून कित्येक काळ वैचारीक भ्रम पसरवला होता. या आवश्यक वस्तु कायद्यातून शेतमाल वगळ्याचा फार क्रांतीक्रारी निर्णय या कायद्याद्वारे करण्यात आला आहे. वस्तुत: हा कायदाच रद्द करण्याची मागणी शेतकरी चळवळीने केलेली होती.

3. करार शेती बाबत फार वर्षांपासून मागणी शेतकरी चळवळीने लावून धरलेली होती. या तिसर्‍या विधेयकाद्वारे शेतीत  पेरलेल्या पीकांबाबत आधीच सौदा करण्याचा अधिकार शेतकर्‍यांना देण्यात येतो आहे. वस्तूत: करार हा शेतमालाच्या खरेदीचा आहे. शेतजमिनीच्या खरेदीचा किंवा मालकीचा नाही. पण हे समजून न घेता अतिशय चुक पद्धतीनं यावर टीकेची झोड उठविली जात आहे. पेरणी करताना जर कुणी व्यापारी शेतकर्‍याशी येणार्‍या पिकाच्या भावाचा करार करत असेल आणि पेरणीच्या वेळेसच शेतकर्‍याला काही एक रक्कम देत असेल तर तो त्याला फायदाच आहे. करार शेतीचा (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) फायदाच शेतकर्‍यांना होईल. आताही शेती ठोक्याने दिली जाते किंवा बटाईने केली जाते हे पण एक प्रकारे गावपातळीवरची करार शेतीच आहे.  


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575



   

 

 

    

 

Monday, November 16, 2020

जात्यावरच्या ओव्यांतली ‘भाऊबीज’


दै. लोकसत्ता 16 नोव्हेंबर 2020 दिवाळी मराठवाडा पुरवणी

विविध सणांना विविध धार्मिक अर्थ चिकटलेले आहेत. परंपरेचा एक भाग म्हणून आपण हे सण साजरे करतो पण काही सण असेही आहेत की त्यांना नात्यांच्या सुंदरतेचा एक अर्थ चिकटलेला आहे. दिवाळीतली भाऊबीज हा सण असाच बहिण भावाच्या नितळ नाजूक सुंदर प्रेमाचे प्रतिक आहे. या दिवशी कसलेही धार्मिक कर्मकांड फारसे नसते. कसली महत्त्वाची पुजाही या दिवशी नसते. असतो तो केवळ बहिण भावाच्या नात्याचा उत्कट संदर्भ.

जात्यावरच्या ओव्यांमधून या सणाचे फार सुंदर संदर्भ आलेले आहेत. आपल्या नवर्‍याचे, लेकरांचे, आई बापांचे गुण गाणारी ही स्त्री नकळतपणे आपल्या भावा बाबत ओवी गाते तेंव्हा त्यातून तिची भावापोटी असलेली माया प्रकट होते. 

बरोबरीचे असलेले बहिण भाउ त्यातील बहिणीचे लग्न आधी होते. मग साहजिकच बहिणीला मुलबाळ आधी होते. यावरची जात्यावरची ओवी फार सुंदर आहे. शेतीच्या पेरणीची सुरवात मृगाच्या पावसानंतर होते. त्या बाबत जात्यावरची ओवी अशी आहे

मृगा आधी पाउस 

पडतो राहिणीचा ।

भावाआधी पाळणा

हलतो बहिणीचा ॥

ही बहिण लग्न होवून माहेरी गेलेली आहे. तिला दिवाळीला भाबीजेला माहेरी आणायचं आहे. तिच्या मनाची दिवाळी  खरी सुरू होते ती भाउबीजेला. भाऊ किंवा भावाचा पोरगा म्हणजे आपला भाचा आपल्याला नेण्यासाठी यावा अशी तिची  मनात घालमेल सुरू आहे.

नवस बोलते । माझ्या माहेरच्या देवा

दिवाळी सणासाठी । भाचा मुळ यावा ॥

दसर्‍यापरीस । दिवाळी आनंदाची

भाईराजसाची माझ्या । वाट पहाते गोईंदाची ॥

दसर्‍या पासून । दिवाळी महिना 

माझा ग भाईराजा । सखा अजून येईना ॥

भावाची वाट पहाताना ही बहिण व्याकूळ झालेली आहे. तीला सोबतच्या आसपासच्या बायकांना नेण्यासाठी त्यांचे भाउ आलेले दिसत आहेत. 

दिवाळीच्या दिवशी। शेजीचा आला भाउ

सोयर्‍या भाईराजा । किती तुझी वाट पाहू ॥

आपल्या आजूबाजूला लेकी सणासाठी आलेल्या आहेत. त्यांच्या भावांनी त्यांना तातडीने आणून घेतलं आहे. त्यांच्या हसण्यानं घर भरून गेलेलं मी पाहते आहे. त्यांच्या घरातल्या वेलीवर सुंदर फुलं फुलली आहेत. दारात रांगोळ्या सजल्या आहेत. दारावर तोरणं आहेत. पण मी मात्र व्याकूळ झाले आहे. भाऊराया तू अजून मला घ्यायला आला नाहीस. 

दिवाळीच्या सनासाटी । लोकाच्या लेकी येती

भाईराजसा माझ्या । तूझ्या बहिनी वाट पाहती ॥

अशी खुप वाट पाह्याल्यावर तो भाउराजा येतो. त्याचा तो थाट पाहूनच बहिण हरखून जाते. 

सनामध्ये सन । दिवाळी सन मोठा

बहीण भावंडाच्या । चालती चारी वाटा॥

दसर्‍या पासून । दिवाळी तीन वार 

भाईराजस माझा । झाला घोड्यावरी स्वार ॥

असा हा प्रिय भाऊ बहिणीला घेवून आता निघाला आहे. जेंव्हा तो आपल्या घरी म्हणजे बहिणीच्या माहेरी येतो तेंव्हा तिला झालेला आनंद अपरिमित असतो. आई दारातच तुकडा ओवाळून टाकते. पायावर पाणी घालते. 

अंबारीचा हत्ती । रस्त्यावरी उभा 

दिवाळीच्या सणाला । मला लुटायाची मुभा ॥

भाच्यांचे कौतूक मामाला असतेच. या पोरांनाही मामाकडून आपले लाड करून घ्यायचे असतात. आजोळावर त्यांना हक्क वाटतो. प्रत्यक्ष भाउबीजेच्या दिवशीचेही मोठे सुंदर वर्णन जात्यावरच्या ओव्यांत आलेले आहे. 

भाऊबीजेच्या दिवशी । तबकी चंद्रहार 

भाईराजस माझे । वोवाळीले सावकार ॥

दिवाळीच्या दिवशी । ताटामध्ये मोहरा

भाई माझ्या राजसाला । ववाळीले सावकारा ॥

भावाला ओवाळताना बहिण हक्कानं त्याला ओवाळणी मागून घेते. त्यानं दिलेली ओवाळली तिला विशेष महत्त्वाची असते. त्यानं दिलेलं लुगडं त्याची उब तिला आयुष्यभर पुरते. 

बाई लुगडं घेतलं । पदरावर मासा

मोल भाउराया पुसा ॥

इतकंच नाही तर तीला जेंव्हा जेंव्हा दारावर आलेल्या चाट्याकडून (विक्रेत्याकडून) काही स्वत:साठी खरेदी करते तेंव्हाही ती त्याच्याशी नाते भावाचे र्जोडते. कारण तीची आवड निवड जाणून जसा भाउ तिला लुगडं घेतो तसे या चाट्यानं तिची आवड लक्षात ठेवावी.

बाई लुगडं घेतलं । पदरावर राघुमैना

चाट्यासंगं भाउपना ॥

जात्यावरच्या ओव्यांत काही ठिकाणी संदर्भ फार खोल अर्थाचे आलेले आहेत. बहिण भावाकडे मागायला जाते ती हक्कानं. त्यात बापाच्या जायदादीत आपला वाटा आहे अशी व्यवहारीक भावनाच केवळ नाहीये. तिला भावाचे भक्कम बळ आपल्या संसाराला हवे आहे. त्याच्याशी तीचे नाते असे विलक्षण आहे. महाभारतात कृष्णाला द्रौपदीचा ‘सखा’ मानले गेले आहे. पण जात्यावरच्या ओव्यात मात्र हा कृष्ण सरळ सरळ भाउच मानला गेला आहे. कारण आमच्या जात्यावरच्या ओव्यांत भावाला ‘सखा माझा भाउराया’ असाच शब्द येतो. त्यामुळे जून्या कवितेत जी ओळ आलेली आहे ती

भरजरी पितांबर दिला फाडून

द्रौपदीचे बंधू शोभे नारायण

अशीच आहे. 

या भावाला केवळ साडीचोळीच मागून बहिण समाधानी होत नाही. त्याच्याकडे त्यामुळेच हक्कानं ती अजून भक्कम काही मागत आहे. 

दिवाळीची चोळी । जाईल फाटून

भाईराजसा माझ्या । द्यावा दागिना धाडून ॥

दिवाळीची ओवाळनी । काय करावे साडीला 

भाईराजसा माझ्या । नंदी होतेल गाडीला ॥ 

दिवाळीची ववाळनी । काय करावं नथाला ।

भाईराजसा माझ्या । नंदी होतेल रथाला ॥

भावानं आपल्याला बैल द्यावे जेणे करून आपल्या शेतीचे कामे होतील आणि आपल्याही संसारात मोत्याच्या राशी येतील. भावानं आपल्या संसाराचा गाडा रेटण्यासाठी बळ द्यावे. अशी एक भावना या ओव्यांतून व्यक्त होते.

भावा बहिणीच्या नात्यातला एक संदर्भ फारच हृदयद्रावक डोळ्यात पाणी आणणारा आहे. आयुष्यभर नवर्‍याच्या घरात राबलेली ही बहिण, सासराच्या घराचा ती उद्धार करते, घराला भरभराटीला आणते. तिचा शेवट होतो, तेंव्हा तीची शेवटची इच्छा काय असते? तर आपल्या देहाला माहेरच्या लुगड्यात गुंडाळावं. भावानं शेवटचं वस्त्र आपल्या देहावर पांघरावे.

आधी अंगावं घाला । भावाचं लुगडं

मग उचला तिरडी । मसनात लाकडं ॥

भावा बहिणीच्या उत्कट प्रेमाचे प्रतिक असा हा भाऊबीजेचा सण. याला खुप अनोखे संदर्भ आहेत. प्राचीन काळापासून आयाबायांनी जात्यावरच्या ओव्यांतून या नात्याचे पदर कलात्मकतेने उलगडून दाखवले आहेत. 

(या लेखातील जात्यावरच्या ओव्या ‘समग्र डॉ. ना.गो.नांदापुरकर खंड दुसरा’ या ग्रंथातील आहेत. छाया चित्र सौजन्य आंतरजाल)

     श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575