Thursday, October 8, 2020

शाहीनबाग : सर्वोच्च न्यायालयाची थप्पड कुणाच्या गालावर?


उरूस, 8 ऑक्टोबर 2020 

 7 ऑक्टोबर 2020 ला सर्वौच्च न्यायालयाने शाहिनबाग प्रकरणांत स्पष्ट निकाल देत अशा प्रकारे आंदोलन करणे संपूर्णत: चुक असल्याचे सांगितले. या निकालाने बर्‍याच जणांच्या गालावर थप्पड बसली आहे. 

15 डिसेंबर 2019 रोजी सीएए च्या विरोधात दिल्लीच्या शाहिनबाग परिसरांत मुस्लीम महिलांना समोर करून रस्ता रोको आंदोलन सुरू झाले. खरे तर या महिलांना वारंवार विचारले गेले होते की तुमच्यावर नेमका कोणता अन्याय झाला? तूम्ही हे आंदोलन कशाकरता करत आहात? याचे कुठलेही संयुक्तीक उत्तर या दादी नानी देवू शकल्या नाहीत.

वारंवार सगळे कायदेतज्ज्ञ सांगत होते की सीएए चा कुठल्याही भारतीयाच्या नागरिकत्वाशी काहीही संबंध नाही. त्यात भारतीय मुसलमानही आलेच. मुळात हे विधेयकच धार्मिक अत्याचाराला बळी पडलेल्या पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानच्या असहाय्य नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यासाठीचे आहे. कुणाचे नागरिकत्व हरण करण्यासाठी नव्हे. पण मुसलमानांचा जाणीवपूर्वक गैरसमज करून दिल्या गेला. या गैरसमजाचा अग्नी सगळ्यांनी मिळून प्रज्ज्वलीत केला. आणि दिल्लीचा एक महत्त्वाचा रस्ता 100 दिवस अडवल्या गेला. शाहिनबाग परिसरांतील दोन तीन लाख नागरिकांना त्रास झाला, या भागातील दुकाने बंद राहिली. पुढे करोना आला आणि त्यांना परत बंदीचा त्रास भोगावा लागला. अशा प्रकारे आपल्या हक्कासाठी निदर्शने करत आहोत असा आव आणत इतर नागरिकांच्या मुलभूत अशा संचार स्वातंत्र्यावर गदा आणल्या गेली.

शाहिनबागचा विषय इतकाच मर्यादीत नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा भारतात दौरा होता तेंव्हा या शाहिनबागेच्या निमित्ताने देशभर दंगे उसळविण्याचा एक कट होता हे पण आता समोर आले आहे. दिल्लीत तर प्रत्यक्ष दंगे उसळलेही. त्यात 53 निरपराध नागरिकांचा बळीही गेला. आता यावर कारवाई होउन उमर खालीद, सफुरा झरगर, नताशा नरवाल, देवांगना कालीता सारख्या विद्यार्थी म्हणवून घेणार्‍यांना तुरूंगवासही झाला आहे. ताहिर हुसेन आणि खालिद सैफी हे दंग्याचे मुख्य सुत्रधारही म्हणून समोर आले आहेत.

सर्वौच्च न्यायालयाने आपल्या निकालाने या आंदोलनाचे समर्थन करणारे पुरोगामी होते त्यांच्यावरही थप्पड लगावली आहे. हे लोक आंदोलनाचे समर्थन करताना रस्ता रोको हा कसा मुलभूत आधिकार आहे असेही सांगत होते. पण याने सामान्य नागरिकांचे संचार स्वातंत्र्य धोक्यात आले हे ते लपवून ठेवत होते. इतकेच नाही तर देशभरात विविध ठिकाणी शाहिन बाग आंदोलन चालवताना मुख्य रस्ते कसे अडचणीत सापडतील अशीच योजना होती. पण प्रशासनाने ती हाणून पाडली. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथेच आंदोलन करण्यासाठी हे सर्व आग्रही होते. यांना आंदोलनासाठी पर्यायी जागा आझाद मैदानावर दिली तर लगेच एक दिवसांत आंदोलन गुंडाळून सर्व घरी बसले. 

सर्वौच्च न्यायालयाने अशा प्रकारे दुसर्‍यांच्या अधिकारावर आक्रमण करून आंदोलन करता येणार नाही हे स्पष्ट करून  पुरोगाम्यांना निरूत्तर केले आहे. पोलिस यंत्रणांना असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत की अशा प्रकारे कुठलेही आंदोलन रस्ते अडवून कुणी चालवत असेल तर त्याचा तातडीने निपटारा करा. त्यासाठी न्यायालयाच्या निर्देशाची वाट पाहू नका. पोलिसांचे हे कामच आहे. त्यासाठी कुणाच्या हुकुमाची आदेशाची वाट पहाण्याची गरज नाही. 

म्हणजे शाहिनबागचे समर्थक जे स्वत:ला संविधानवादी म्हणवून घेत होते, बाबासाहेबांच्या शपथा घेत होते, संविधान हातात घेवून या दादी नानींसमोर भाषणे करत होते त्या सगळ्यांना तुम्ही संविधानाचा अपमान करत अहात असे खडे बोल  न्यायालयाने सुनावले आहेत. 

आंदोलनाचा राजकीय पैलू जरा बाजूला ठेवू. यातील धार्मिक पैलूही जरा बाजूला ठेवू. आंदोलनाला पैसा कुणी पुरवला, या महिलांना खावू पिउ कोण घालत होते हा पण विषय खुप चर्चिला गेला आहे. पण स्वत:ला बुद्धिवान म्हणविणारे पत्रकार लेखक विचारवंत यांना कोणता विंचू चावला होता? यांच्या विचारात हे संविधान विरोधी विष कोणी पेरले? यांनी काय म्हणून या आंदोलनातील रस्ता आडविण्याचेही समर्थन केले? 

हे आंदोलन पोलिसांनी दिलेल्या जागेवर शांतपणे चालू राहिले असते तर त्याला एक नैतिक आधार तरी राहिला असता.  या निमित्ताने उपोषण केले गेले, निदर्शने झाली, काळ्या फिती लावल्या, मेणबत्या पेटवल्या तर समजून घेता आले असते. पण तसे झाले नाही. आंदोलन चालविणार्‍यांचे उद्देश काहीही असोत पण त्याला समर्थन देणार्‍यांनी आपली नैतिकता कुठे गहाण टाकली होती? 

24 मार्चला पहाटे आंदोलन स्थळ पोलिसांनी बुलडोझर फिरवून रिकामे केले. रस्ता मोकळा झाला. त्याचे फोटो जेंव्हा समाजमाध्यमांवर आले तेंव्हा तातडीने ते शेअर करत मी लिहीले होते, ‘शाहिनबाग तमाशा उठला, धन्यवाद कोरोना’. यावर मला वैयक्तिक पातळीवर प्रचंड प्रमाणात ट्रोल केल्या गेले. शिवीगाळ झाली. अगदी सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कानावर याची तक्रार घालावी लागली. त्यातील अनोळखी अपरिचित लोकांबद्दल माझी तशी काहीच तक्रार नाही. त्यांना मी ब्लॉकही केले. पण माझ्या अगदी परिचित असलेले लेखक विचारवंत पत्रकार मित्र मैत्रिणींचे आश्चर्य वाटते. शाहिनबाग आंदोलनाने रस्ता आडवून तमाशाच केला होता यावर आता सर्वौच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. ही मंडळी आपली बुद्धी गहाण ठेवून का बसली होती? रस्ता अडवणे हे चुक आहे. शिवाय हे आंदोलन कशासाठी? याचे कसलेच उत्तर ही बुद्धीवादी पुरोगामी मंडळी देत नव्हती. आजही देवू शकत नाहीत. सामान्य माणसांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवुन उत्तर दिले होतेच. आता न्यायालयाने अधिकृतरित्या आंदोलन चुक ठरवून याची बाजू घेणार्‍यांच्या नैतिकतेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. आता मात्र हे कोणीच पुढे येवून आमचे चुकले असे म्हणणार नाहीत. कारण तेवढा वैचारिक निर्लज्जपणा यांनी अंगी बाणला आहे. 

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Wednesday, October 7, 2020

माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार


उरूस, 7 ऑक्टोबर 2020 

 महाराष्ट्रातील अगदी प्राचीन उत्तम शिल्पाविष्कारांनी नटलेली मंदिरे मोजायची झाल्यास एका हताची पाच बोटेही पुरेशी आहेत. अंबरनाथ बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, अन्व्याचे मंदिर आणि पाचवे नाव घ्यावे लागते ते माणकेश्वर (ता. परंडा  जि. उस्मानाबाद) च्या मंदिराचेच.हीच नावं का घ्यायची तर या मंदिरांच्या बाह्य भिंतींवरील (जंघा) अप्रतिम असा शिल्पाविष्कार. आणि दुसरं म्हणजे यांचे प्राचीनत्व. 

माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकांतील आहे. औरंगाबाद उस्मानाबाद रस्त्यावर कुंथलगिरीपासून उजव्या हाताच्या रस्त्याला वळलो की डोंगररांगांतून एक छानसा रस्ता जातो. टेकड्या हिरवळ तळे असा निसर्गसुंदर परिसर. या रस्त्याने भूम पर्यंत गेल्यावर तेथून 11 किमी दक्षिणेला माणकेश्वर गाव आहे. विश्वकर्मा नदीच्या चंद्राकृती वळणावरची नयनरम्य जागा शोधून या मंदिराची उभारणी केल्या गेली आहे.


एका उंचपीठावर तारकाकृती अशी मंदिराची रचना आहे. पायर्‍या चढून मुखमंडपाकडे गेल्यावर तेथून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराच्या मुखमंडपातून आत शिरल्यावर मुख्यमंडप लागतो. त्याच्या मध्याशी चौकोनी अशी रंगशीळा आहे. या मंडपाला 20 सुंदर स्तंभांनी तोलले आहे. यातील चार प्रमुख स्तंभांवर अप्रतिम असे कोरीवकाम आढळते. होयसळेश्वर मंदिरावर आढळून येणारे अतिशय बारीक असे कोरीवकाम या स्तंभांवर आहे. सोन्याच्या बांगड्यांवर ज्या पद्धतीने नक्षीकाम केलेले आजकाल दिसून येते त्याचे नमुने माणकेश्वर मंदिरावरच्या खांबांवर आढळून येतात. यातील  नक्षीकामात कोरलेले मणी तर इतके बारीक आणि सुंदर आहेत ते दगडाचे आहेत म्हणून नसता मोत्याचेच वाटावेत असे सुबक आणि सुंदर आहेत. 


माणकेश्वर मंदिराचे सगळ्यात मोठे आणि वेगळेपण त्याच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेत आहे. डॉ. गो.ब.देगलुरकरांसारख्या अभ्यासकांने हे वेगळेपण नोंदवून ठेवले आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर कोरीवकाम केलेली पट्टी असते. ही सहसा तीन किंवा चार या प्रमाणात असते. म्हणजे एक पट्टी फुलांची नक्षीची, त्यामागे दुसरी पट्टी पानांची, तिसरी पट्टी नृत्य करणार्‍या स्त्री पुरूषांची. पण हे एकमेव असे मंदिर महाराष्ट्रात आढळले आहे जिथे एक दोन नव्हे तर सात द्वारशाखा आहेत. 

मंदिराचा बाह्यभाग अप्रतिम अशा सुरसुंदरींच्या शिल्पांनी व इतर देवतांच्या शिल्पांनी नटलेला आहे. सगळ्यात खालचा नक्षीचा थर हा गजथर आहे. याच्यावरती नरथर म्हणजेच स्त्री पुरूषांचा गायन वादन करणार्‍यांचा आहे. 


मंदिरावर बाह्य भागात एकूण 109 सुंदर मुर्ती आहेत. आतील मुर्तींची संख्या गृहीत धरल्यास एकूण 347 मुर्ती अभ्यासकांनी नोंदवल्या आहेत. वीणा वादन करणारी सरस्वती, बासरी वाजविणारा कृष्ण, मृदंग वाजविणारी सुंदरी, चतुर्भज दोन हातात घंटा असलेली नृत्य मुर्ती, तंतुवाद्य वाजविणारी सुंदरी, डमरुधारी शिव असे संगीतविषयक संदर्भ असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जातात. केवल शिव, ऐरावतधारी इंद्र, ब्रह्मदेव, लक्ष्मी या मुर्तीही मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हरिहर म्हणजेच विष्णु आणि शिव यांची संयुक्त मुर्ती. अशी मुर्ती माणकेश्वर मंदिरावर आढळून आली आहे.


मंदिराच्या समोर एका मंडपाचा चौथरा दिसून येतो. त्यावरचा अप्रतिम असा गजथर अजूनही शाबुत आहे. पण बाकी मंडप कोसळलेला आहे. इथे सध्या एक नंदी ठेवलेला आढळतो. मंदिराला मकरप्रणाल (गाभार्‍यातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्याची जागा) आहे. त्यावर दोन निष्कर्ष निघतात. एक तर या मंदिराचा कालाखंड मध्ययुगाच्या मागे जातो. दुसरं म्हणजे हे शिव मंदिर नसून विष्णु मंदिर असण्याची जास्त शक्यता आहे. कारण शिवमंदिराला गोमुख असते. (अर्थात या सगळ्यांना अपवाद आहेत. यावर विविध तज्ज्ञांनी आपली मते नोंदवून ठेवली आहेत.) 


अणदुरच्या शिलालेखात या मंदिराला अनुदान दिल्याचा संदर्भ सापडलेला आहे. त्यावरून याचा कालखंड 12 व्या शतकातला असल्याचे सिद्ध होते. 

मंदिर त्रिदल पद्धतीचे (तीन गर्भगृह असलेले) आहे. ही पद्धत मराठवाड्यात मंदिर शैलीतील विकसित अशा कालखंडातील मानली जाते. 

या सुंदर प्राचीन अद्वितीय शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या बाजूलाच नविन झालेले सटवाईचे मंदिर आहे. इथे लहान मुलाचे जावळं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. मंदिराच्या परिसरांतच बोकड कापल्या जातो. सगळा परिसर त्याने अस्वच्छ होतो. माणकेश्वर मंदिराच्या परिसरांत प्राचीन मुर्तींचे अवशेष आढळून येतात. मंदिरासमोरचा सभामंडप आहे तेथे मोठा शिल्पाविष्कार एकेकाळी असावा. त्याचे अवशेष अजूनही आजूबाजूला सापडतात. तेंव्हा हा सगळा परिसर संरक्षीत करण्याची नितांत गरज आहे.

बाजूच्या सटवाई मंदिराला वेगळी संरक्षक भिंत करून त्याचा परिसर वेगळा केला पाहिजे. नदीच्या काठावर सुंदरसा घाट बांधून या परिसराला रम्य बनवता येईल. आम्ही जेंव्हा सुदाम पाटील, सरपंच विशाल अंधारे,  भाजप जिल्हाध्यक्ष माझे मित्र नितीन काळे  या प्रतिष्ठीत लोकांशी बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी अनुकुलता दाखवली. अशी पुरातन मंदिरे हा फार मोठा ऐतिहासिक मोलाचा ठेवा आहे. तो आपण जतन करायला पाहिजे. अशी मंदिरे आज बांधता येत नाहीत. तर निदान त्यांचे जतन तरी काळजीपूर्वक केले पाहिजे.

(या लिखाणासाठी माया पाटील शहापुरकर, डाॅ. गो.ब. देगलुरकर, डाॅ. प्रभाकर देव यांच्या पुस्तकांतून संदर्भ घेतले आहेत. त्यांचे आभार)

(छायाचित्रे सौजन्य Akvin Tourism) 

    

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, October 5, 2020

सिमेंटने गिळले अंभईचे प्राचीन मंदिर


उरूस, 5 ऑक्टोबर 2020 

जून्या मंदिरांबाबत दोन मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एक तर उद्ध्वस्त प्राचीन मंदिरांचे अवशेष इततस्त: विखुरलेले असतात. यातील काही दगड लोकांनी सरळ उचलून नेले आणि त्यांचा वापर घरगुती कामांसाठी (धुणे धुण्यासाठी) केला किंवा बिनधास्तपणे बांधकामांसाठी त्यांचा वापर केलेला दिसून येतो. तर काही ठिकाणचे दगड दुसर्‍याच मंदिराच्या बांधकामासाठी वापरले (बीडच्या कंकालेश्वराचे मोठे ठळक उदाहरण आहे).

दुसरी विचित्र अडचण अशी आहे की जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली अशा मंदिरांची नविन पद्धतीने सिमेंट वीटांत बांधणी केली जाते. त्यात पुरातन अवशेष नष्ट होतात. त्यांची हेळसांड होते. सौंदर्यदृष्ट्याही हा जोड विजोडच ठरतो. महत्त्वाचे म्हणजे मंदिरांवरची नक्षी छोटी शिल्पे त्या द्वारे सांगितलेली गोष्ट त्यातील गुढ अर्थ याची अपरिमित हानी होते. काही ठिकाणी जून्या दगडी मंदिराला रंग/वॉर्निश फासून विद्रूपता आणली गेली आहे. 

अंभई (ता. सिल्लोड. जि. औरंगाबाद) येथील प्राचीन वडेश्वर शिव मंदिराबाबत दुसर्‍या प्रकारची अडचण आहे. 

डॉ. देगलुरकर, डॉ. प्रभाकर देव सारख्या विद्वानांनी या प्राचीन मंदिराचे महत्त्व आपल्या ग्रंथांत संशोधन प्रकल्पांत नमुद केले आहे. यावर सविस्तर लिहून ठेवले आहे. हे मंदिर बहुतांश उद्ध्वस्त झाले होते. मुळ पाया मातीत बुजून गेलेला होता. मुखमंडप आणि मुख्य मंडप कधीच नष्ट झाले होते. तिन गर्भगृहे आणि त्यांच्या बाह्य भिंती तेवढ्या शाबुत होत्या. शिखरेही ढासळलेली होती. गावकर्‍यांनी मंदिराचा जिर्णाद्धार करताना सिमेंटचे बंदिस्त सभागृह समोर बांधले. त्यांचा हेतू आणि तळमळ गैर नव्हती. पण त्यामुळे मंदिराचे मुळ रूपच नष्ट झाले. 

मराठवाड्यात एक गर्भगृह असलेली मंदिरे अकराव्या शतकातील अगदी मोजकीच अशी आहेत. त्यानंतर तिन गर्भगृह असलेली त्रिदल मंदिर शैली विकसीत झाली. अशा दुर्मिळ प्राचीन मंदिरापैकी एक म्हणजे वडेश्वरचे हे शिव मंदिर. 


मंदिराच्या तिन्ही गर्भगृहांवर अप्रतिम असे कोरीव काम आहे. मुख्य गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. चार पद्धतीच्या द्वारशाखा आढळून येतात. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर किर्तीमुख आहे. ललाटबिंबावर गणेशाची मुर्ती कोरलेली आहे. चालुक्य शैलीचे या गर्भगृहाचे छत आहे. गर्भगृहाच्या अंतराळात देवकोष्टके आहेत. (अंतराळ म्हणजे मुख्य मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारी जागा.) यात ब्राह्मी, सरस्वती, वैष्णवी यांच्या मुर्ती आहेत. हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. 


डॉ. देगलुरकरांनी यातील एका विष्णु मुर्तीचा विशेष असा उल्लेख केला आहे. विष्णुची जी विविध नावे आहेत त्याप्रमाणे त्या त्या पद्धतीच्या मुर्ती मंदिरावर कोरलेल्या असतात. यातील उपेंद्र नावाने ओळखली जाणारी अतिशय दुर्मिळ अशी मुर्ती या मंदिरावर आढळून आली आहे. मुख्य गर्भगृहाच्या ललाटबिंबाच्या वर मध्यभागी ही उपेंद्र विष्णुची मुर्ती आहे. उपेंद्र मुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे वरच्या उजव्या हातात गदा, खालचा उजवा हात वरदमुद्रेत, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात पद्म असते. 


या मंदिरातील काही मिथून शिल्पे परिसरात मातीत पडली आहेत. मुख्यमंडपाचे काही अवशेषही तसेच इतस्तत: विखुरले आहेत. मुख्य गर्भगृहासमोर नंदी नाही. तो मंदिराबाहेर एका वेगळ्याच चौथर्‍यावर दिसतो आहे. लक्षात असे येते की हे मंदिर मुलत: शिवाचे असण्याची शक्यता नाही. ते देवीचे असावे किंवा विष्णुचे. (असे बहुतांश मंदिरांच्या बाबत झाले आहे. आक्रमणाच्या भितीने मुख्य मुर्ती हलवल्या गेली. कालांतराने तेथे घडविण्यास सोपी असलेली महादेवाची पिंड बसविण्यात आली.)   


मंदिराचा परिसर गावकर्‍यांनी स्वच्छ ठेवला आहे. मंदिरासमोर आणि बाजूला पेव्हर्स ब्लॉक बसवून त्यांनी जमिन समतल केली आहे. पण मागचा भाग व आपण प्रवेश करतो त्याची विरूद्ध बाजू मात्र अजूनही खराबच आहे. त्याच ठिकाणी शिल्पं विखुरलेली आहेत. 


जून्या मंदिरांचे जतन चांगल्या पद्धतीने कसे करता येवू शकते याचे तीन नमुने याच मराठवाड्यात समोर आहेत. अन्वा  (ता. भोकरदन जि. जालना) येथील मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्त्व विभागाने चांगल्या पद्धतीने केला आहे. सर्व परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. आधारासाठी लोखंडी खांब उभे केले आहेत. निखळलेले दगड नीट बसवले आहेत. जिथले दगड सापडत नाहीत तिथे त्याच आकारात नविन दगड तासून बसवलेले आहेत. (पुरातत्त्व खात्यानेच गडचिरोली येथील मार्कंडा मंदिराचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालविले आहे. अंबाजोगाई जवळ धर्मापुरी येथील मंदिराचे कामही याच खात्याने चांगले केले आहे.)

दुसरे अतिशय चांगले काम इंटॅक्ट या देश पातळीवरील नावाजलेल्या संस्थेने होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथे केले आहेत. दोन मंदिरांचा जिर्णोद्धार अतिशय शास्त्रीय पद्धतीने एक एक दगड हुडकून त्याची जागा शोधून तिथे तो बसवून करून दाखवला आहे. 

तिसरे काम जामखेड (ता. अंबड, जि. जालना) येथील खडकेश्वर शिव मंदिराबाबत गावकर्‍यांनी करून दाखवले आहे. साध्या दगडी घोटीव दगडांव बाह्य भिंत उभारून मंदिर सावरून धरले आहे. 

कुठल्याही जून्या मंदिराचे काम करावयाचे असल्यास कृपया त्या विषयातील तज्ज्ञांना विचारून करा. सिमेंट वीटांचा वापर करून रसायनिक रंग दगडांना फासुन विद्रुप करू नका. काहीच जमणार नसेल तर जसे आहे तसेच ठेवून किमान जागेची स्वच्छता आणि जवळपास विखुरलेले दगड शिल्पं एका ठिकाणी आणून ठेवले तरी पुरे. जनावरे येवू नयेत म्हणून जागेला संरक्षक असे तारेचे कुंपण घालण्यात यावे. तातडीने इतके तरी काम करा. शिवाय गावात इतरत्र आढळून येणारी शिल्पे कोरीव दगड मंदिर परिसरांत आणून ठेवा. 

दृश्य स्वरूपात जी मंदिरे किमान अस्तित्वात आहेत ज्यांचा अभ्यास झाला आहे अशा 11 व्या ते 14 व्या शतकांतील महाराष्ट्रातील 93 मंदिरांची यादी डॉ. गो.ब. देगलुरकरांनी आपल्या ग्रंथात दिली आहे. या शिवाय मराठवाड्यातील अगदी किमान अवशेष सापडले अशी ठिकाणे शोधून त्यांची एक यादी डॉ. प्रभाकर देव यांनी दिली आहे. अशी 114 ठिकाणं/ मंदिरे आहेत. आपआपल्या गावांत अशी पुरातन मंदिरे अवशेष कोरीव दगड वीरगळ, सतीचे दगड काही आढळूनआले तर आम्हाला जरूर कळवा. त्यांची छायाचित्रे पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरांचा कोश तयार करण्याची गरज आहे. या कामासाठी सहकार्य करण्याचे विविध संस्था/ व्यक्तींनी मान्य केले आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू या. हे काम संपूर्ण महाराष्ट्रात करावयाचे आहे. माझ्या स्वत:च्या मर्यादांमुळे सध्या मी मराठवाड्यात फिरतो आहे. पण तशी प्रदेशाची मर्यादा या कामाला नाही.    

(छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

    

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Saturday, October 3, 2020

बाबरा प्राण तळमळला -भाग २


 उरूस, 3 ऑक्टोबर 2020 

 30 सप्टेंबरला सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल आला. बाबरी मस्जिद पाडण्याचा कट रचला होता का? हे शोधण्यासाठी हा खटला होता. एकूण 48 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरेंसह इतर 15 आरोपी आता हयात नाहीत. जिवित असलेल्या 32 जणांवर हा खटला चालू होता. या सर्वांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आणि नेमके हेच बहुतांश पुरोगाम्यांना आवडले नाही. त्यांच्या मनासारखा न्याय आला नाही म्हणून लगेच छाती बडवून देशात आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वधर्मसमभाव आता संपून गेला आहे. काळेकुट्ट पर्व देशाच्या इतिहासात चालू झाले आहे. आता एका धर्माचीच हुकुमशाही प्रस्थापित होणार वगैरे वगैरे बडबड नेहमीप्रमाणे सुरू झाली आहे.

5 ऑगस्टला राम मंदिराचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल तेंव्हा खा.असदुद्दीन ओवैसी यांनी सेक्युलर देशाचा पंतप्रधान मंदिराच्या भुमिपुजनाला जातोच कसा म्हणून मुक्ताफळे उधळले होती. त्यावर ‘बाबरा प्राण तळमळला’ असा एक लेख मी लिहीला होता. आता त्याच लेखाचा हा दुसरा भाग म्हणावा लागेल. 

पुरोगामी का तळमळत आहेत? मुळात खटला हा बाबरी मस्जिद कुणी पाडली यासाठी नव्हता. कायदेतज्ज्ञांनी पण असा निर्वाळा दिला आहे की मुख्य खटला निकालात निघाल्यानंतर या खटल्याला तसा काहीच अर्थ शिल्लक राहिला नव्हता. कट सिद्ध करणारे पुरावे समोर आले नाहीत तेंव्हा न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. आता ओरड करणारे पुरोगामी असे म्हणत आहेत जर सगळेच निर्दोष असतील तर बाबरी काय आपोआप पडली का? 

सत्य सगळ्यांनाच माहित आहे. हजारो वर्षांपासून आपली मंदिरे मुर्त्या यांचा नाश हिंदू समाज सहन करत आला आहे. त्याचा एक संताप त्याच्या मनात साठलेला होता. त्याची एक प्रतिक्रिया म्हणून राम जन्मभुमीचे आंदोलन उभे राहिले. तो खटला लवकरात लवकर निकाली निघाला असता तर हा विषय इतका देशव्यापी झालाच नसता. पण तेंव्हाच्या सरकारांनी आणि आपल्या न्यायव्यवस्थेने यात सातत्याने चालढकल केली. याचा परिणाम म्हणजे सहिष्णू असलेल्या हिंदूंचा कडेलोट झाला व 6 डिसेंबर 1992 ला बाबरी पडली. 

इतिहासातील एक उदाहरण या संदर्भात पाहण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांच्या काळात परिस्थिती अतिशय प्रतिकुल होती. राज्य करणारे जुलमी मुसलमान राज्यकर्ते तर सोडाच पण स्वकीय असलेले वतनदारही सामान्य रयतेला लुटत होते.  अतिशय वाईट असा तो काळ होता. शिवाजी महाराजांनी शर्थीने स्वराज्य निर्माण केले. पण महाराजांनाही आपली कोंडी केल्या गेल्याचे पाहून सुरतेवर हल्ला करावा लागला. खरे तर त्या काळातील नियम असा होता की जी जहागीर स्त्रीच्या नावाने असते त्यावर कुणीच हल्ला करायचा नाही. याच कारणाने जिजाउ मांसाहेब या शिवनेरी किल्ल्यावर बाळंतपणासाठी जावून राहिल्या होत्या. कारण ती जहागीर त्यांच्या नावाने होती. त्यामुळे आपण सुरक्षीत असू याची त्यांना खात्री होती. तसेच सुरत ही औरंगजेबाच्या बहिणीच्या नावाने असलेली जहागीर होती. तेंव्हा त्यावर आक्रमण होणार नाही याची सर्वांना खात्री होती. पुढे अशीच स्थिती अहिल्याबाई होळकरांची होती. महेश्वर ही त्यांच्या सासुच्या नावाने असलेली जहागीर. म्हणून त्यांनी आपली राजधानी महेश्वर बनवली.

शिवाजी महाराजांनी नियम मोडून सुरतेवर हल्ला केला. महाराष्ट्राबाहेरच्या कितीतरी इतिहास लेखकांनी शिवाजी महाराजांना लुटारू संबोधले होते. अगदी पंडित नेहरूंच्या पुस्तकांतील संदर्भ पण तपासून पहा. पण महाराजांच्या सुरत लुटीचा अर्थ आपण काय लावतो? ही कृती नियम मोडून त्यांना का करावी लागली?

बाबरी पाडणे ही कृती हिंदूंनी हजारो वर्षांच्या संतापातून उत्स्फुर्तपणे केली होती. तेही पन्नास वर्षे त्या खटल्याचा निकाल लागत नाही म्हणून केली होती. आणि हे जागा रामजन्मभुमी होती म्हणून त्यावरचे बाबराचे अतिक्रमण लोकांनी पाडले. कुठली मस्जिद स्वत:च्या जागेवर उभी असलेली कधीच पाडली नाही. एकही दाखला नाही की मुळ मस्जिद पाडून मंदिर उभे केल्याचा. पण हे समजून न घेता आजही त्यावर आगपाखड करण्यात पुरोगामी धन्यता मानतात.

ज्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले ते केवळ हिंदूंच्या या भावनेला शब्दरूप देत होते इतकेच. पण मुळात ही भावना निर्माणच का झाली? बाबरी मस्जिद पाडल्यानंतर इतर कुठल्या मस्जिदीला धक्का दिला का? 

ज्या गुजरात दंगलीं बाबत वारंवार ओरड आजही पुरोगामी करतात ते आधी साबरमती एक्स्प्रेस जाळली ते का सांगत नाहीत? हे केवळ भारतातच घडले असे नाही. बामियानाच्या अप्रतिम उत्तुंग बुद्धमुर्ती पाडण्यात आल्या. तालिबान्यांच्या या कृत्याबद्दल कुठलाही पुरोगामी का काही बोलत नाही?

अजून एक दुसरा संदर्भ सावरकरांचा देता येईल. गांधी हत्या कटात सावरकरांन गोवण्यात आले. तसा रितसर खटला दाखल झाला. त्यातून सावरकर निर्दोष सुटले. आता ज्यांना सावरकर दोषी आहेतच असा विश्वास होता त्यांनी या खटल्यावर वरच्या न्यायालयात का अपील केले नाही? पण तसे न करता केवळ सावरकरांवर शिंतोडे उडविण्यात आजही पुरोगामी धन्यता मानतात.

गांधी हत्येच्या कटाची माहिती सरकारला होती का? याची चौकशी करण्यासाठी कपुर आयोग नेमण्यात आला. या कपुर आयोगाचे संशोधन करून अशी माहिती सरकारला नव्हती हे सत्य समोर आणले. खरं तर आयोगाची व्याप्ती केवळ कटाची माहिती सरकारला आहे का? याचे संशोधन करण्यापुरतीच होती. पण कपुर आयोगाने कारण नसताना आपल्या अहवालात सावरकरांवर काही परिच्छेद लिहीले. आणि त्याचाच आधार घेवून ए.जी.नुरानी सारखे लेखक सावरकर दोषी आहेतच असा हट्ट आपल्याा लिखाणातून करायला लागले. आजही बहुतांश पुरोगामी नुरानींच्या पुस्तकाचा संदर्भ देत सावरकर दोषीच आहेत असा आग्रही दावा करतात. वस्तूत: सावरकर दोषी आहेत का नाहीत याचा निर्वाळा न्यायालयात झाला होता. पण तो मानायचाच नाही असा एक पुरोगामी खाक्या आहे.

आज कपुर आयोगाच्या ऐवजी सीबीआय न्यायालय आले आहे. (बाबरी मस्जिद प्रकरणी एक लिबरहम आयोग स्थापन झाला होता. त्याने १९ वर्ष लावले अहवाल सादर करायला). कपुर आयोगा सारखे आपल्या कक्षेबाहेरचा विषय घेवून त्यावर टिपणी न्यायालयाने केलेली नाही. उलट सर्व आरोपींना निर्दोष सोडून खटला निकाली काढला आहे. पण त्यावर समाधान न मानता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे फिर्यादींनी सांगितले आहे. म्हणजे याचाच अर्थ हा विषय यांनाच जिवंत ठेवायचा आहे.

विरोधक असेच बिनमहत्त्वाचे मुद्दे उगाळत राहिले तर त्याचा फायदा परत भाजपला  होणार आहे. काहीच न बोलता भाजपला त्यांचा हिंदूत्वाचा मुद्दा पुढे चालवता येणार आहे. भाउ तोरसेकर म्हणतात तसे मोदींच्या जाळ्यात विरोधक आपणहुन फसत आहेत. त्याला कोण काय करणार?

ने मजसी ने परत सत्ता भुमीला 

बाबरा प्राण तळमळला 

हे गीत गात कॉंग्रेस सारखे विरोधक तळमळत राहताना दिसत आहेत.     

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Friday, October 2, 2020

गावकर्‍यांनी जिर्णाद्धार केलेले प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना)


 उरूस, 2 ऑक्टोबर 2020 

 हजार वर्षांचे एक प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना) या गावात आहे. एकेकाळी बाहेरून पूर्णत: ढासळलेले हे मंदिर गाभारा, गर्भगृह, मुखमंडप व 20 कोरीव खांब असे संपूर्ण सुरक्षीत होते. परिसरांत बाभळी व काटेरी झुडूपे वाढली होती. मंदिराला अर्धचंद्राकार वेढा घातलेली घामवती नदी सहसा कोरडीच असायची. गावकर्‍यांनी या परिसराची स्वच्छता व मंदिराची दुरूस्ती करण्याचे मनावर घेतले. आज हे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत उभे आहे. सर्व परिसर समतल करण्यात आला आहे. मंदिरासमोर पिंपळाचे मोठे झाड आहे. त्याची सावली संपूर्ण परिसराला आल्हाददायक बनविते. 

जामखेडचे हे शिवमंदिर खडकेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. जामखेड या गावाबद्दल पौराणिक आख्यायिका आहे. जाबुवंत आणि हनुमानाची लढाई याच गावात झाल्याचे सांगितले जाते. गावजवळच्या टेकडीवर जाबुवंताचे मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे डोंगरातील कपारीत कोरलेली एक गुहाच आहे. इथे लेणी कोरण्याचा प्रयास झाला होता. पण दगड ठिसुळ असल्याने हे काम अर्धवट सोडण्यात आले. याच जागी आता जांबुवंताचे मंदिर आहे. या परिसरांतील 12 गावांमध्ये हनुमानाचे मंदिर आढळत नाही. नसता मारूतीचे मंदिर नाही असे एकही गाव नसते. पण हा परिसर याला अपवाद आहे. जांबुवंत व हनुमानाच्या लढाईत जाबुवंताचा घाम गळाला म्हणून या गावच्या नदीचे नावच ‘घामवती’ असे आहे. 

याच घामवती नदीच्या काठावर खडकेश्वर महादेवाचे हे प्राचीन मंदिर उभे आहे. या गावात नदीला पाणी आले असे म्हणत नाहीत. तर घाम आला असे म्हणतात. 

मराठवाड्यात अकराव्या शतकांतील आठ मंदिरे नोंदवल्या गेली आहेत. खडकेश्वराचे मंदिर हे त्यातीलच एक. (याच ब्लॉगमधील पूर्वीच्या लेखात अशा मंदिरांची यादीच दिली आहे.) मूळचे मंदिर भक्कम उंच चौथर्‍यावर बांधल्या गेले असावे. आज हा चौथरा मातीत बुजला असून जमिन सपाटीवर आता मंदिराचा मुखमंडप आलेला आहे. 

मुखमंडपाला चार देखणे कोरीव अर्धस्तंभ आहेत. हे स्तंभ चार फुट भिंतीवर उभारलेले असून त्यांनी छत तोलून धरले आहे. मंडपालाआठ कोरीव स्तंभ असून अष्टकोनी रंगपीठावर हा मंडप उभा आहे. या स्तंभांवर सुंदर असे कोरीव शिल्पकाम केले आहे. हत्तीवर बसून लढणार्‍या स्त्रीयोद्धा, शेषशायी विष्णू,  नृत्यांगना अगदी हनुमान व जांबुवंत यांच्या लढाईचे पण शिल्प या स्तंभांवर कोरलेले आहे. मंदिराला एकूण 20 नक्षीदार स्तंभ आहेत. 


मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पकाम असावे असा अंदाज आहे. कारण मुखमंडपाच्या बाहेरच्या भागातील काही शिल्पे आजही चांगल्या अवस्थेत दिसून येतात. बाहेरचा भाग संपूर्णच ढासळलेला होता. तेंव्हा तो घडीव दगडांनी लिंपून घेत बाह्य भिंत उभारल्या गेली आहे. तेंव्हा आता इथे एकही शिल्प दिसत नाही. 

मंदिराला मुख्य गर्भगृह आणि दोन उपगृहे वाटाव्यात अशा रचना आढळून येतात. डॉ. प्रभाकर देव यांनी आपल्या पुस्तकांत असे नोंदवले आहे की 11 व्या शतकांतील मंदिर शैली विकसित पावून 12 व्या शतकांत त्रिदल पद्धतीची मंदिरे मराठवाड्यात उभारल्या जावू लागली. हा जो मंदिर शैलीचा सांधा आहे त्याचा पुरावा या जामखेडच्या मंदिरात आढळून येतो. एकल गर्भगृह असलेले अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) आणि त्रिदल पद्धतीतील आता उद्ध्वस्त असलेले केसापुरी (ता. माजलगांव, जि. बीड) या दोन मदिरांच्या अंतराच्या दृष्टीने अगदी मध्ये खडकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि नेमके शैलीच्या दृष्टीनेही हे मंदिर मध्यभागी आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे. 

खडकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाला चार द्वारशाखा आहेत. या द्वारशाखांच्या पायाशी शैव द्वारपाल आहेत. मंदिरातील देवकोष्टकांत एका ठिकाणी गणेशाची मुर्ती आहे. दुसर्‍यात विष्णुची वराह अवतारातील मुर्ती आहे. उमा महेश्वराची पण मुर्ती आढळून येते. 


मंदिराच्या बाहेर परिसरांत दोन भग्न मुर्ती आणि भव्य नंदीचे अवशेष आढळून येतात. हे जर मंदिरातील असतील तर मुळ मंदिर अतिशय भव्य असावे असा अंदाज बांधावा लागतो. सध्या जो नंदी आहे तो लहान आहे. नंदीला स्वतंत्र असा मंडप आहे. या मंडपाचेही छत ढासळले होते. गावकर्‍यांनी मंदिर दुरूस्त करताना नंदी मंडपाचेही छत दुरूस्त केले. चार खांबांवर हा छोटासा देखणा नंदीमंडप मंदिराच्या समोर उभारलेला आहे. खडकेश्वर मंदिर पश्चिममुखी आहे.


या परिसरांत पर्णकुटी बांधून सच्चीदानंद श्रीधर स्वामी कावसानकर (नाना काका महाराज) यांनी वास्तव्य केले. शिवस्वरूप वैकुंठवासी विनोदबाबा दाणे यांनीही या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम मनावर घेतले. या दोन सत्पुरूषांची प्रेरणा मिळाल्यावर गावकर्‍यांनी उत्साहाने कामाला सुरवात केली.  


गावकर्‍यांची या मंदिरावर श्रद्धा असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे वर्गणी गोळा करून मंदिराचा जिर्णाद्धार केला. दगडूअप्पा सांगोळे आणि अशोक जाधव यांच्यासारखी मंडळी आजही तळमळीने मंदिरासाठी झटत आहेत. या मंदिराची नोंद पुरातत्त्व विभागाकडे आहे. पण कुठलाही निधी याला मिळालेला नाही. एकीकडे आपल्याकडे प्राचीन मंदिरांची दूरावस्था आढळून येते आणि दुसरीकडे जामखेडची मंडळी स्वयंस्फुर्तपणे काम करत आहेत तर त्याकडेही आपण लक्ष द्यायला तयार नाहीत. ही एक शोकांतिकाच आहे. 

जामखेडच्या खडकेश्वर महादेव मंदिराकडे अभ्यासकांचे लक्ष्य जाण्याची गरज आहे. यातील शिल्पांवर अजून बारकाईने अभ्यास व्हायला हवा. डॉ. प्रभाकर देव, डॉ. देगलुरकर, डॉ. अरूणचंद्र पाठक यांनी मंदिराची दखल आपल्या पुस्तकांत घेतली आहे. त्यामुळेच या मंदिराचे महत्त्व समोर आले. मंदिर परिसरांत उत्खनन केल्यास मंदिराचा विस्तारीत पाया सापडू शकतो. मंदिर एका उंच चौथर्‍यावर उभे असण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्खनन झाल्यास मंदिराचा तलविन्यास संपूर्णपणे लक्षात येईल. हे मंदिर अगदी प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याने त्याचे महत्त्व फार मोठे आहे.

औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडे जामखेडकडे जाणारा फाटा फुटतो. मुख्य रस्त्यापासून आत वळल्यावर अगदी चार किमी अंतरावर हे गाव आहे. गावापर्यंत अगदी चांगला रस्ता आता तयार झाला आहे. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासकांनी, इतिहासप्रेमींनी, हौशी पर्यटकांनी या मंदिराला जरूर भेट द्यावी. आतापर्यंत कुणाच्या लक्षात आले नसेल असे काही पैलू समोर आणावेत.

(जामखेड मंदिरा संबंधी काही माहिती हवी असल्यास अशोक जाधव 9763892727 यांच्याशी संपर्क करावा.)

(देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मुर्ती वास्तू समाध्या मकबरे गढी वाडे यांच्या संवर्धन जतन संरक्षणासाठी अभियान राबविले जात आहे. आपल्या गावच्या अशा स्थळांबाबत माहिती आमच्यापर्यंत पोचवा. आमच्या अभियानात आपण सहभागी व्हा आणि आपल्याही गावच्या अशा कामासाठी आम्हाला सांगा.) (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

            श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Wednesday, September 30, 2020

मुस्लीम महानुभाव संत शहामुनींची दुर्लक्षीत समाधी


उरूस, 30 सप्टेंबर 2020 

भारतीय संस्कृती ही एक खरेच अजब असे मिश्रण आहे. आपला जन्म कुठे/ कुठल्या धर्मात पंथांत होतो हे आपल्या हातात नसते. पण आपली श्रद्धा अभ्यास यातून काही माणसं वेगळाच मार्ग निवडतात. शाहगड (ता. अंबड जि. जालना) येथील महानुभावी संत शहामुनी यांची कथा अशीच काहीशी आहे. 

औरंगाबाद-सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर गोदावरी नदीवर प्रचंड मोठा पुल आहे. हा पुल ज्या गावात आहे ते गाव म्हणजे शहागड. नविन झालेल्या पुलाखालून गावात शिरलो की उजव्या बाजूला एक रस्ता सरळ चिंचोळा होत नदीच्या दिशेने जात राहतो. त्याच्या टोकाशी नदीच्या काठावर जूना प्राचीन किल्ला आहे. किल्ल्याचे अगदीच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत. एक भव्य पण काहीशी पडझड झालेली कमान आहे. या कमानीतून आत गेलो की भाजलेल्या वीटांच्या कमानी आणि एक दीपमाळ लागते. हे म्हणजे पुराण्या समाधी मंदिराचे अवशेष आहेत. आता नविन बांधलेले एक सभागृह आहे. यातच आहे शाहमुनींची समाधी. यालाच शाह रूस्तूम दर्गा असे पण संबोधले जाते.

लेखाच्या सुरवातीला वापरलेले छायाचित्र त्याच सुंदर कमानीचे आहे. 


शहामुनींनी त्यांच्या सिद्धांतबोध ग्रंथात आपल्या कुळाची माहिती दिली आहे. आपल्या घराण्यात चार पिढ्यांपासून हिंदू देवी देवतांची पुजा अर्चना होत असल्याची माहिती स्वत: शहामुनींनीच लिहून ठेवली आहे. त्यांचे पंणजोबा प्रयाग येथे होते. पत्नी अमिना हीला घेवून ते तेथून उज्जयिनी येथे आले. शहामुनींचे पणजोबा मराठी आणि फारसी भाषेचे तज्ज्ञ होते.  शहामुनींच्या आजोबांचे नाव जनाजी. जनाजी विष्णुभक्त होते. जनाजी हे सिद्धटेक (ता. कर्जत. जि. नगर) येथे स्थलांतरीत झाले. जनाजीच्या मुलाचे नाव मनसिंग. हे मनसिंग म्हणजेच शहामुनींचे वडिल. मनसिंग सिद्धटेकला असल्याने असेल कदाचित पण त्यांना गणेशभक्तीचा छंद लागला. मनसिंगांच्या पत्नीचे नाव अमाई. याच जोडप्याच्या पोटी शके 1670 (इ.स. 1748) मध्ये पेडगांव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथे शहामुनींचा जन्म झाला. काशी येथे  मुनींद्रस्वामी यांच्याकडून त्यांना गुरूमंत्र प्राप्त झाला. सातारा जिल्ह्यात त्यांनी सिद्धांतबोध ग्रंथाची रचना केली. यांनी शके 1730 (इ.स.1808) मध्ये शहागडला त्यांनी समाधी घेतली. 

शहाबाबा असे त्यांचे जन्मनाव. त्यांना मुनी ही उपाधी लावली जाते ती संत असल्यामुळे नव्हे. त्यांच्या गुरूंचे नाव मुनींद्रस्वामी होते. म्हणून शहाबाबा यांनी आपल्या नावापुढे मुनी जोडून आपले नाव ‘शाहमुनी’ असे केले. जसे की 'एकाजनार्दनी'. शहामुनींची गुरूपरंपरा त्यांच्याच पुस्तकांत दिल्याप्रमाणे दत्तात्रेय-मुनींद्रस्वामी-शहामुनी अशी सिद्ध  होते.

शहामुनींचे मोठेपण हे की त्यांनी आपल्या मुस्लीम धर्मातील विद्धंसकारी शक्तींची कडक निंदा आपल्या ग्रंथात करून ठेवली आहे. त्याकाळी हे मोठेच धाडस म्हणावे लागेल. आजही सुधारणावादी मुसलमान व्यक्तींना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर त्याला मारूनही टाकले जाते. अशा वेळी शाहमुनी लिहीतात

नव्हे यातीचा ब्राह्मण । क्षत्रिय वैश्य नोहे जाण ।

शुद्रापरीस हीन वर्ण । अविंधवंशी जन्मलो ॥

ज्यांचा शास्त्रमार्ग उफराटा । म्हणती महाराष्ट्रधर्म खोटा ।

शिवालये मूर्ति भंगिती हटा । देवद्रोही हिंसाचारी ॥

जयांच्या सणाच्या दिवशी । वधिता गो उल्हास मानसी ।

वेदशास्त्र पुराणांसी । हेळसिती उद्धट ॥

ऐसे खाणींत जन्मलो । श्रीकृष्णभक्तीसी लागलो ।

तुम्हां संतांचे पदरी पडलो । अंगीकारावे उचित ॥

शहामुनींची समाधी आज दुर्लक्षीत आहे. खरं तर समाधीचा परिसर हा नदीकाठी अतिशय रम्य असा आहे. प्राचीन किल्ल्याचे अवशेष इथे आहेत. हा सगळा परिसर विकसित झाला पाहिजे. किमान येथील झाडी झुडपे काढून स्वच्छता झाली पाहिजे. प्राचीन सुंदर कमानीची दुरूस्ती झाली पाहिजे. 


शहामुनींचे वंशज असलेली 5 घराणी आजही या परिसरांत नांदत आहेत. या समाधीची देखभाल हीच मंडळी करतात. मुसलमान असूनही हे शहामुनींच्या उपदेशाप्रमाणे मांसाहार न करणे पाळतात. चैत्री पौर्णिमेला इथे मोठी जत्रा भरते (जयंतीची तिथी चैत्र वद्य अष्टमी आहे). तो उत्सव ही मंडळी साजरा करतात. एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. 

केवळ ही समाधीच नव्हे तर शहागड परिसरात जून्या मुर्ती आजही सापडतात. जून्या वाड्यांमधून अप्रतिम असे नक्षीकाम केलेले सागवानी खांब आहेत. याच परिसरांत सापडलेली विष्णुची प्राचीन मुर्ती एका साध्या खोलीत ठेवलेली आहे. ओंकारेश्वर मंदिर परिसरांत तर बर्‍याच मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. दोन मुर्ती तर परिसरांत मातीत पडलेल्या आमच्या सोबतच्या फ्रेंच मित्राच्या दृष्टीस पडल्या. दोन जणांनी मिळून त्या उचलून मंदिराच्या भिंतीला लावून ठेवल्या. पाण्याने स्वच्छ धुतल्या. त्यावर रंगांचे डाग पडले आहेत. इतकी आपली अनास्था आहे प्राचीन ठेव्यांबाबत. 

स्थानिक लोकांनी आता पुढाकार घेतला आहे. मुर्तींची स्वच्छता करून मंदिरात आणून ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. शिवाय अजून काही अवशेष सापडले तर नोंद करण्याचे मनावर घेतले आहे. 

शहामुनींचे समाधी स्थळ एक धार्मिक सलोख्याचे विशेष ठिकाण म्हणून विकसित केल्या गेल्या पाहिजे. मंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघातील हे गाव आहे. त्यांनी या प्रकरणांत लक्ष घालावे असे सर्वसामान्य इतिहाप्रेमींच्या वतीने विनंती आम्ही करत आहोत.  

(शहामुनींच्या बाबतीत सविस्तर माहिती रा.चिं.ढेरे यांच्या ‘मुसलमान मराठी संतकवी’ या पुस्तकांत दिली आहे. प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन पुणे.)  (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

Monday, September 28, 2020

शाश्‍वत पर्यटन : काळाची गरज


दै. सामना वर्धापन दिन विशेष पुरवणी २७ सप्टेंबर २०२० 

२७ सप्टेंबर  हा जागतिक पर्यटन दिन. कोरोना काळात पूर्वीच्या खुप संकल्पना बदलून गेल्या आहेत. पर्यटनातही आता वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाश्‍वत पर्यटन (सस्टेनेबल टूरिझम) ही संकल्पना जास्त करून समोर आली युरोपातून. आपला देश, आपली संस्कृती, चालिरीती, रितीरिवाज, संगीत, खाद्य पदार्थ यांबाबत त्यांना जास्त आस्था राहिलेली आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जगात व्यापाराला आणि त्या सोबतच पर्यटनाला विशेष गती मिळाली. या पर्यटनाचा एक वेगळा आविष्कार म्हणजे शाश्‍वत पर्यटन. त्यात या स्थानिक मुद्द्यांना विशेष महत्त्व दिले जाते. 

कोरोना आपत्तीनंतर भारतात आणि महाराष्ट्रातील पर्यटनाचाही आपण या दृष्टीने वेगळा विचार करू शकतो. आत्तापर्यंत पर्यटन म्हणजे उंची महागडे हॉटेल्स, खाण्यापिण्याची मौजमजा आणि यासोबतच जरा जमले तर बाहेर फिरणे. गोव्या सारख्या प्रदेशाने मौजमजेलाच पर्यटन म्हणा असा गैरसमज पसरवला. पण आता सगळीकडेच पैशाच्या अडचणी जाणवू लागल्या आहेत. याचा आघात पर्यटनावरही पडत आहे. मग यातून पर्याय काय? तर शाश्‍वत पर्यटन एक चांगला पर्याय समोर येतो आहे.

1. वेगळी ठिकाणे :

जी अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं आहेत त्यांचा विचार आपण बाजूला ठेवू. तसेही त्यांच्याकडे पर्यटक येत असतातच. अतिशय उत्तम पण पर्यटकांना ज्ञात नसलेली स्थळं शोधून पर्यटकांसमोर असे पर्याय ठेवता येतील. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था मुद्दाम वेगळी न करता आधीच अस्तित्वात असलेल्या घरांमधून शक्य आहे.  ज्या गावांमधून जूने वाडे आहेत त्यांची जराशी डागडुजी करून घेतली तर पर्यटक विशेषत: परदेशी पर्यटक अशा जागी मुद्दाम रहायला जातात. पर्यटन स्थळाजवळ स्थानिक लोकांना हाताशी धरून अशा सोयी करता येणे सहज शक्य आहे. त्यांनाही रोजगार मिळेल, पर्यटकांचे पैसेही कमी खर्च होतील आणि यातून एका वेगळ्या व्यवसायाला चालना मिळेल. 

उदा. म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा आपण विचार करू. गौताळा अभयारण्याजवळ अंतुरचा किल्ला आहे. तसेच अजिंठा लेणी जवळ हळदा घाटात वेताळ वाडीचा किल्ला आहे. वाडीच्या किल्ल्या पर्यंत जाण्यासाठी उत्तम रस्ता आहे. अंतुर किल्ल्यासाठी मुख्य सडकेपासून 6 किमी. कच्या खराब रस्त्याने जावे लागते. या ठिकाणी राहण्याची खाण्याची कसलीही व्यवस्था नाही. स्थानिक गावकर्‍यांशी बोलून खाण्यापिण्याची व्यवस्था करता येते. (असा अनुभव आम्ही वाडिच्या किल्ल्या जवळ घेतला आहे. अगदी शेतात बसून जेवण केले आहे.) परदेशी पर्यटक असा अनुभव घेण्यासाठी मुद्दाम तयार असतात. या किल्ल्यांवर साहसी पर्यटकांना चांगली संधी आहे. 

काही अतिशय चांगली मंदिरे दुर्गम ठिकाणी आहेत ज्यांची माहिती लोकांना नाही. काही मंदिरे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यांचीही माहिती होत नाही. पाटणादेवी सारखे ठिकाण गौताळा अभयारण्यात आहे. घाटात आहे. तिथे चांगला धबधबा आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालूक्यात तलवाडा गावात छोट्याशा टेकडीवर त्वरिता देवीचे मंदिर आहे.  हे मंदिर शिवकालीन असून उत्तम दगडी बांधणीचे आहे. टेकडीवर असल्याने येथे निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येतो. तसेच अंबडच्या जवळ जामखेड म्हणून गाव आहे. येथील टेकडीवर असलेले जांबुवंताचे मंदिरही असेच उत्तम पर्यटन स्थळ आहे. अशा कितीतरी जागा महाराष्ट्रभर शोधता येतील. या ठिकाणी पर्यटनाच्या उत्तम संधी आहेत. गड किल्ले लेण्या जून्या वास्तू येथे पर्यटनास चालना देणे सहज शक्य आहे. जी ठिकाणं चांगल्या स्थितीत आहेत तेथे पर्यटन वाढू शकते. 

शाश्‍वत पर्यटनातील पहिला मुद्दा येतो तो अशा फारशा परिचित नसलेल्या स्थळांबाबत. शिवाय काही निसर्गरम्य ठिकाणं शोधून तिथेही पर्यटनाला चालना देता येते.

2. स्थानिक अन्न : 

दुसरा मुद्दा यात पुढे येतो तो अन्नाचा. आपण पर्यटकांचा विचार करताना त्यांना जे पदार्थ खायला देतो ते त्यांच्या आवडीनिवडी प्रमाणे असावेत असा विचार केला जातो. पण स्थानिक जे पदार्थ आहेत, जे अन्नधान्य आहे त्याचा विचार होताना दिसत नाही. आपण जिथे जातो आहोत तेथील धान्य आणि तेथील पदार्थ यांचा अनुभव घेतला पाहिजे. त्यांच्या चवी समजून घेतल्या पाहिजेत. नसता कुठेही जावून आपण तंदूर रोटी आणि दाख मखनी पनीरच खाणार असू तर त्याचा काय उपयोग?  बारीपाडा हे गाव महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर धुळे जिल्ह्यात आहे. या गावात दरवर्षी रानभाज्यांची स्पर्धा भरते. या गावाने स्वत:चे जंगल राखले आहे. निसर्ग पर्यटन आणि या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपण जावू शकतो. पर्यटनांत अशा ठिकाणांचाही विचार झाला पाहिजे.

विविध पदार्थ करण्याची पण एक प्रत्येक प्रदेशातील एक पद्धत असते.  तिचा अनुभव घेतला पाहिजे. अशामुळे स्थानिक आचार्‍यांना एक संधी उपलब्ध होते. त्यासाठी बाहेरून माणसे आणायची गरज उरत नाही. अगदी जेवणासाठी त्या त्या भागात मिळणारी केळीची पानं, पळसाच्या पत्रावळी यांचा उपयोग झाला पाहिजे. तोही एक वेगळा अनुभव असतो. हैदराबादी पदार्थात ‘पत्थर का गोश’ म्हणून जो मांसाहारी पदार्थ खाल्ल्या जातो तो खाताना कसे बसावे कसे खावे याचेही नियम आहेत. अशा रितीने पर्यटनाच्या एका वेगळ्या पैलूचा विचार यात केला जातो.

3. लोककला, जत्रा, उत्सव : 

खाण्यापिण्या सोबतच अजून एक मुद्दा शाश्‍वत पर्यटनात येतो. तो म्हणजे त्या त्या प्रदेशातील संगीत, रितीरिवाज, सण समारंभ, जत्रा, उत्सव, उरुस. आपल्याकडे देवस्थानच्या जत्रा असतात. त्यांचा एक विशिष्ट काळ ठरलेला असतो. त्याच काळात तिथे जाण्यात एक वेगळा आनंद असतो. उदा. अंबडच्या मत्स्योदरी मातेच्या मंदिरात कार्तिक पौर्णिमेला दिपोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या दगडी पायर्‍यांवर हजारो दिवे लावले जातात. (मागील वर्षी सात हजार दिवे लावले होते.) हा दिपोत्सव पाहणे एक नयनरम्य सोहळा असतो. काही ठिकाणी रावण दहन केले जाते दसर्‍याच्या दिवशी. त्याही प्रसंगी पूर्व कल्पना दिली तर पर्यटक येवू शकतात. गणपतीच्या काळात नवरात्रीच्या काळात पर्यटनात वाढ झालेली दिसून येते. हा एक वेगळा पैलू आहे. शिवरात्र आणि श्रावणातील सोमवारी बहुतांश महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्त जमा होतात. शिवरात्रीला रात्रभर भजन चालते. हे दिवस ओळखून त्या प्रमाणे पर्यटकांच्या सहली आयोजीत करता येतात. 

नवरात्रीत बहुतांश देवी मंदिरांत गर्दी होते. निसर्गरम्य असलेली ठिकाणं निवडुन अशा ज़त्रांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते तिथे पर्यटकांना आवर्जून बोलावता येवू शकते. 

काही दर्ग्यांमधून उरूस भरतात. उरूस म्हणजे त्या सुफी संताची पुण्यतिथी. अशा वेळी कव्वाल्यांचा कार्यक्रम आयोजीत केलेला असतो. त्यासाठी पर्यटकांना पूर्वकल्पना असेल तर तेही येवू शकतात. (खुलताबाद येथील दर्ग्यात अशा कव्वालीसाठी आम्ही परदेशी पर्यटकांना घेवून गेलो आहोत. तो अनुभव अतिशय आगळा वेगळा आहे.)

कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. रात्रीची जागरणं अशावेळी केली जातात. त्या जागी काही सांस्कृतिक सांगितीक कार्यक्रम करणे सहज शक्य आहे. अशा निमित्तानेही पर्यटकांना आणता येवू शकते. 

4. पर्यटन वाढीसाठी संगीत महोत्सव/ सांस्कृतिक कला महोत्सव :

ऐतिहासिक वास्तुंच्या परिसरांत संगीत महोत्सव आयोजीत करण्यासाठी शासकिय पातळीवर काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले जायचे. लालफितीच्या कारभारामुळे ते जवळपास सगळे बंद पडले. या शिवाय काही मंदिरे आणि मठ, दर्गे यांच्या संस्था यासाठी सहकार्य करण्यास तयार असतील तर त्यांच्या परिसरांत संगीत महोत्सव छोट्या प्रमाणात घेणे सहज शक्य आहेे. यामुळे पर्यटनाचा एक वेगळा पैलू समोर येवू शकतो. शाश्‍वत पर्यटनात याचाही विचार केला जातो.

लोककला नृत्य लोकसंगीत यांचा अतिशय चांगला वापर पर्यटनाच्या वाढीसाठी करता येवू शकतो. शिवाय या कलांना प्रोत्साहन देण्याचेही काम यातून होवू शकते. तेलंगणात दलित किन्नरी वादक कलाकारांना शासन स्वत: प्रोत्साहन देवून विविध ठिकाणी पाठवते. त्यांचा कलाविष्कार लोकांच्या समोर यावा म्हणून धडपड करते. अशा काही योजनांतून पर्यटनाला चालना मिळू शकते. 

शाश्‍वत पर्यटनात हस्तकलांचाही विचार केला जातो. हातमागावर कापड विणणारे, हॅण्डमेड कागदवाले, धातूवर कोरिवकाम करणारे (बिदरी कला), मातीची/लाकडाची खेळणी तयार करणारे असे कितीतरी कलाकार आपल्या जवळपास असतात. यात परदेशी पर्यटकांना विशेष रस असतो. समोर बसून चित्र काढून देणारे. किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळी तिथेच बसून त्या जागेचे चित्र काढणारे यांचाही विचार शाश्‍वत पर्यटनांत केला जातो. त्या त्या जागची चित्रे काढून त्याचे प्रदर्शन भरवता येवू शकते. त्या त्या भागातील वस्त्र विणण्याची परंपरा हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. अशा वस्त्रांचे प्रदर्शन भरवता येवू शकते. उदा. पैठणी, हिमरू, महेश्वरी, पाटण पटोला, कांचीपुरम, बालुचेरी, बनारसी इ.इ.

 5. घरगुती राहण्याची व्यवस्था (होम स्टे) : 

  प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी जाताना वाटेत घरगुती राहण्याची खाण्याची व्यवस्था होणार असेल तर बर्‍याच जणांना ते हवे असते.  कोकणात तर मुद्दाम समुद्रकिनार्‍या जवळ घरांत जावून राहणे पर्यटक आजकाल पसंद करत आहेत. कर्नाटकांत हंम्पी हे गांव असे आहे की तिथे एक पन्नास शंभर घरांचे खेडेच संपूर्णत: पर्यटन व्यवसायावर चालते. तुंगभद्रा नदीच्या काठी छोट्या घरांतून लोक राहतात. तिथेच जेवायची चहापाण्याची व्यवस्था केली असते. काही परदेशी पर्यटक तर तिथे केवळ शांततेसाठी येवून राहतात. 

काही दिवसांनी जंगलात, दूरवरच्या खेड्यात, एखाद्या तळ्याच्या काठी जावून आठ दिवस राहणे  हा प्रकारही लोकप्रिय होत चाललेला आपल्याला दिसेल. निसर्गरम्य वातावरण, शांतता, पक्ष्यांचे मधुर आवाज, चुलीवरचे जेवण, जवळपासच्या शेतांत डोंगरात फेरफटका, रात्री खुल्यावर बसून चांदण्याचा आनंद घेणे अशा गोष्टी लोक आवर्जून करताना दिसून येतील. 

6. उपसंहार :

शाश्‍वत पर्यटनांत सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा असतो तो आहे ती संसाधने आहे ते मनुष्यबळ याचा सुयोग्य उपयोग करून घेण्यावर भर दिला जातो. तेथील लोककलाकार, कारागिर यांचाही विचार यात केला जातो. तिथील जनजिवनाशी जूळवून घेण्यावर भर दिला जातो. अन्यथा इतर वेळी आपण पर्यटक म्हणून आपल्या आवडीनिवडी त्या प्रदेशावर तेथल्या माणसांवर लादत असतो. तेथील निसर्गाची हानी करत असतो. 

कोरोना आपत्तीमधुन एक आर्थिक पेच समोर आला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काटकसरीने सर्व काही करण्यावर भर द्यावा लागणार आहे. यासाठी स्थानिकांना संधी, स्थानिक संसाधनांचा वापर यामुळे बचतही होवू शकते व रोजगाराच्या वेगळ्या संधीही निर्माण होवू शकतात. 

याची सुरवात म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळच्या अशा एखाद्या कधी न गेलेल्या थोडेफार माहिती असलेल्या ठिकाणी  गेलं पाहिजे. तेथील अनुभव इतरांना सांगितला पाहिजे. सध्या समाज माध्यमे (सोशल मिडिया) अतिशय प्रभावी पद्धतीनं काम करत आहे. त्यावरून हे अनुभव इतरांना समोर आले तर या पर्यटनाला चालना मिळू शकते. सहजपणे अर्थकारणाला गती येवू शकते.       

(लेखात सुरवातीला वापरलेले छायाचित्र अजिंठा डोंगरातील वाडीच्या किल्ल्यावरील हवा महालाच्या कमानीचे आहे. ता. सिल्लोड जि औरंगाबाद सौजन्य : AKVIN Tourism) 

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575