उद्याचा मराठवाडा, रविवार 7 ऑक्टोबर 2018
पंचेवीस वर्षांपूर्वी ‘माया मेमसाब’ नावाचा केतन मेहतांचा एक चित्रपट आला होता. त्यात हृदयनाथ मंगेशकर यांनी कुमार सानूच्या आवाजात एक गाणं दिलं होतं, ‘इक हसीन निगाह का सबपे साया है, जादू है जूनून है ये कैसी माया है’. हे तेंव्हाचे बर्यापैकी लोकप्रिय झालेलं गाणं. गांधी जयंतीच्या दुसर्या दिवशी मायावतींनी जी पत्रकार परिषद घेत महागठबंधनवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला त्यावेळी हेच गाणं डोक्यात आलं ‘ये कैसी माया है?’
मायावतींच्या या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्यांनी अतिशय स्वच्छपणे कुठलीही नि:सदिग्धता न ठेवता कॉंग्रेसवर तिखट आरोप करत महागंठबंधन संकल्पना मोडीत काढली आहे.
मायावतींच्या या खेळीचा कुणाला फायदा होईल, कुणाला तोटा होईल ही वेगळी गोष्ट. पण या निमित्ताने कॉंग्रेस विरोधाच्या राजकीय मुद्द्याचा भाजपा शिवाय विचार करण्यास सगळ्यांनाच भाग पाडले आहे.
1967 ला पहिल्यांदा कॉंग्रेसच्या विरोधात राम मनोहर लोहिया यांनी विरोधकांच्या युतीची संकल्पना मांडली आणि ती 9 राज्यांच्या विधान सभा जिंकत यशस्वी करून दाखवली. पण या सोबतच हे पण सिद्ध झाले की अशा आघाड्या या कचकड्याच्या असतात. त्या टिकत नाहीत. मग पुढे आणीबाणी नंतरची जनता पक्षाची आघाडी, नंतर 1989 ची व्हि.पी.सिंह यांना पंतप्रधान बनविणारी जनता दल नावाची आघाडी आणि पुढेही हाच खेळ चालू राहिला.
आघाड्या अगदी शुल्लक कारणांने फुटत राहिल्या. 2004 मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने केवळ 144 जागा मिळवल्या होत्या. पण त्यांना डाव्यांनी पाठिंबा दिला व मनमोहन सरकार सत्तेवर आले. हा पाठिंबाही मुदत पूर्ण होण्याच्या आतच अणु कराराचे निमित्त करून काढून घेण्यात आला. पण बहुमताची कसरत कशीबशी सांभाळत मनमोहन सरकारने तो कालावधी पूर्ण केला. पण ही आघाडी निवडणुकी नंतरची सत्तेसाठीची होती. भाजपा विरोधाची होती.
निवडणुकपूर्व आघाड्या तर टिकलेल्याच नाहीत. केवळ डाव्या पक्षांनी केरळ व पश्चिम बंगालात हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. तसेच भाजपाने अकाली दल व शिवसेने सोबत दीर्घ काळ निवडणुकपूर्व आघाडी यशस्वी करून दाखवली. पण या शिवाय काही किरकोळ उदाहरणे वगळता निवडणुक पूर्व आघाडी दीर्घकाळ टिकली असे घडले नाही.
कॉंग्रेसच्याबाबत तर निवडणुकपूर्व आघाडी असे कुठलेच ठळक उदाहरण नाही (अपवाद केरळ). या पक्षाला आपल्या एकुणच शक्तिबद्दल जास्तीचा गर्व राहिला आहे. परिणामी अशी आघाडी त्यांनी केली नाही.
2019 साठी असे काही ‘महागठबंधन’ होणार अशा वावड्या भाजप संघ विरोधी पत्रकार विचारवंतांनी बसल्या जागीच उठवल्या होत्या. त्याला कारणीभूत ठरले ते कर्नाटकातील निकाल. खरे तर तेंव्हाही कॉंग्रेसने कुठल्याही महत्त्वाच्या पक्षासोबत निवडणुक पूर्व आघाडी केली नव्हती. पश्चिम बंगाल मध्ये किंवा उत्तर प्रदेशात अशी आघाडी विधानसभेसाठी केली होती पण त्याला यश मिळू शकले नाही. आणि परत ती आघाडी टिकलीही नाही.
कर्नाटकाशिवाय उत्तर प्रदेशातील पोट निवडणुकांत अशी आघाडी यश मिळवू शकते असे समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आला तेंव्हा सगळ्यांनी मानायला सुरवात केली होती. पण या निवडणुकांत कॉंग्रेसने आपला उमेदवार फुलपुर (जो की जवाहरलाल नेहरूंचा मतदार संघ होता) उभा केला होता. भाजपचा पराभव होताच पत्रकार विचारवंत इतके आंधळे बनले की ते कॉंग्रेसने स्वतंत्र निवडणुक लढवली हे विसरूनच गेले.
मायावतींनी कॉंग्रेसवर आघात करताना कॉंग्रेस सोबतच्या पक्षांनाच संपवायला बसला असा गंभीर आरोप केला आहे. खरे तर निवडणुका या आपल्या पक्षाची ताकद सिद्ध करण्यासाठीच असतात. लोकांचा पाठिंबा आहे हे दाखवले तरच तो राजकीय पक्ष शिल्लक राहू शकतो. निवडणुका न लढवता केवळ वैचारिक पातळीवर पक्ष म्हणून राहू असे जर कोणी म्हणत असेल तर त्याची फारशी दखल वास्तवात कुणी घेत नाही. त्यासाठी लोकांसमोर आपला पक्ष आणि पक्षाचे चिन्ह राहील हे पहावेच लागते. याला पर्याय नाही. डावे पक्ष जेंव्हा असे लंगडे समर्थन करतात की आम्ही विचार म्हणून लोकांसमोर आहोत. सर्व जागा आम्ही लढवूच असे नाही. तेंव्हा ते राजकीय दृष्ट्या आत्महत्याच करत असतात. पण आपल्याकडे डावीकडे झुकलेले पत्रकार असा काही आव आणतात की सामान्य वाचकांना केवळ 9 खासदार असलेले डावे पक्ष म्हणजे काही एक मोठी राजकीय ताकद आहे असा भास होत राहतो.
मायावती तशा वास्तववादी आहेत. आज त्यांच्या पक्षाचा एकही खासदार लोकसभेत नाही. अगामी निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार उभे करणे आणि त्यातील काहींना निवडुन आणणे या शिवाय पर्याय नाही हे त्या ओळखतात. या लोकसभेची रंगीत तालीम विधान सभेतून होणार आहे. तेंव्हा त्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मधील निवडणुका गांभिर्याने घेण्यास सुरवात केली.
कॉंग्रेसची मुख्य अडचण ही आहे की त्यांचे अध्यक्ष राहूल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांना राजकीय विषयांचे वेळेचे गांभिर्य कळत नाही. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांत समाजवादी पक्षाशी युती करण्यास त्यांनी इतका वेळ लावला की तो पर्यंत गंगेतून कितीतरी पाणी वाहून गेले होते. आताही ज्या तीन राज्यांत निवडणुका होणार आहेत तर त्यासाठी पक्षाचे धोरण तातडीने ठरवणे आणि त्या प्रमाणे कामाला लागणे आवश्यक होते. पण ते पडले अर्धवेळ राजकारणी. त्यांना परदेश दौर्यातून वेळ मिळणार तेंव्हा ते निर्णय घेणार. इकडे मोदींच्या परदेश दौर्यावर टीका करणारे हे विसरतात की भाजपकडे अमित शहा सारखा पूर्णवेळ पक्षाध्यक्ष जो की प्रत्येक निवडणुकीचा कस्सुन अभ्यास करतो आणि त्या प्रमाणे कार्यकर्ते कामाला लावतो. त्याच्याशी जर सामना असेल तर आपणही त्या प्रमाणे मेहनत घेवून काम करावे लागेल.
मायावती यांना कुणाच्या नादाला न लागता आपल्या पक्ष वाढीसाठी काय करावे हे जास्त चांगले माहित आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर ओवैसीच्या सोबत युती करतात पण कॉंग्रेसला जागा वाटपासाठी इशारे करणे थांबवत नाहीत. असली संदिग्धता मायावती ठेवत नाहीत. विरोधी पक्षाची म्हणून एक मतांची जागा नेहमीच भारतीय राजकारणात राहिलेली आहे. ही जागा मुख्यत: कॉंग्रेसविरोधी मतांची आहे. ही मते 1967 पासून 1990 ची बाबरी मस्जिद पडेपर्यंत विरोधी पक्ष म्हणून जे काही प्रयोग चालू होते त्यांनी मिळवली. त्यातून बाजूला होवून ही मते अधिक स्वत:ची मते असा एक मोठा वाटा भाजपने बळकावला. सगळे टक्के टोणपे खात भाजपने आपले संघटन मजबूत केले. सतत निवडणुका लढवल्या. स्वत:च्या जीवावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचा पराक्रमही 2014 मध्ये करून दाखवला.
भाजपला विरोध करतच कॉंग्रेसला विरोध केला नाही तर हा विरोधी मताचा एक गठ्ठा अलगदच भाजप सारख्या किंवा इतर कुठल्याही कॉंग्रेस विरोधी पक्षाकडे निघून जातो हे वास्तव आहे. भाऊ तोरसेकर सारख्या ज्येष्ठ पत्रकाराचा अपवाद वगळता कोणीच ही बाब ठळकपणे अधोरेखीत केली नाही. मायावतींनी आपल्या पत्रकार परिषदेत असे एक वाक्य वापरले आहे की कॉंग्रेसचा भ्रष्टाचार सामान्य मतदार अजून विसरायला तयार नाही. याचा अर्थ असा होतो की कॉंग्रेस सोबत गेल्याने आपला तोटा होतो. जास्त काळ भाजपची भिती दाखवून कॉंग्रेस इतर पक्षांना ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून सोबत येण्यास मजबूर करत राहिला तर त्याचा तोटा या पक्षांना होतो (उदा. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा आणि पश्चिम बंगालात डाव्या पक्षांचा कॉंग्रेस सोबत जाण्याने झालेला दारूण पराभव). या पेक्षा आपण भाजप सोबतच कॉंग्रेसलाही कडाडून विरोध करू. जी काही आपली हक्काची मते असतील ती आणि कॉंग्रेस विरोधी असलेली मते अशा आधाराने आपली एक मतपेढी घट्ट बनवू.
भाजप संघाची भिती दाखवून कॉंग्रेस ज्या कुणाला आपल्याकडे खेचत आहे त्यांचा राजकीय दृष्ट्या तोटाच होण्याचा संभव आहे. ममता, शरद पवार, चंद्रशेखर राव, जगमोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू हे एकेकाळचे कॉंग्रेसचेच नेते होते. यांचे कॉंग्रेस सोबत जाणे स्वत:ची राजकीय ताकद संपवणे किंवा तीला मर्यादा घालून घेणे आहे. मायावतींनी हे ओळखून कॉंग्रेससोबत जाण्यास नकार दिला आहे. या खेळीमुळे भलेही भाजपचा फायदा होवो. पण जर कॉंग्रेस अजून क्षीण होणार असेल तर त्यात आपला दूरगामी फायदाच होईल हे ओळखण्याचा चतूरपणा मायावतींना आहे. त्यासाठी तात्पुरता कुठलाही फायदा (जो शरद पवारांसारख्यांनी नेहमी करून घेतला आणि आपली राजकीय ताकद मर्यादीत करून ठेवली) नाकारण्याची त्यांची खेळी आहे. भाजप सोबतच कॉंग्रेसलाही कडाडून विरोध करत आपण भविष्यातील मोठी राजकीय ताकद बनू शकतो हे त्या दाखवून देवू पहात आहेत. शरद पवारांसारख्यांना अजून ही हिंमत होत नाही. नविन पटनायक, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, जगमोहन रेड्डी यांच्यासारखी स्पष्ट कॉंग्रेस विरोधी भूमिका घेणे ते टाळत आले आहेत. खरं तर आज मायावती जी भूमिका घेत आहेत ती जर शरद पवारांनी घेतली असती तर तिसरी आघाडीची मोठी शक्ती महाराष्ट्रातही उभी राहिली असती. देशभर अशी काही ताकद उभी करत मोरारजी देसर्इा, व्हि.पी.सिंग, देवेगौडा, गुजराल या चौघांनी पंतप्रधानपद मिळवलं. ही संधी शरद पवारांना होती. पण त्यांनी तत्कालीन छोट्या फायद्यासाठी दूरगामी लाभ सोडून दिला.
भाजप कॉंग्रेस विरोधी तिसर्या आघाडीचा चेहरा सध्यातरी मायावती बनल्या आहेत हे वास्तव आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575