उरूस, सा.विवेक, ऑगस्ट 2018
प्रकाश आंबेडकरांनी मागच्या महिन्यात औरंगाबादेत एक घोषणा केली. पण नंतरची हिंसक मराठा आंदोलने, तरुणांच्या आत्महत्या, सांगली-जळगांवच्या निवडणुकांत ही घोषणा मागे पडली. आंबेडकरांनी आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी तयार केली आहे. या आघाडीत एम.आय.एम. (संपूर्ण नाव- ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन) ला सामील करून घेण्याची घोषणा त्यांनी औरंगाबादला पत्रकार परिषदेत केली. शिवाय हा पक्ष लोकशाहीवादी असल्याचे शिफारस पत्रही पत्रकारांनी विचारल्यावर देवून टाकले.
आधी हा ‘एम.आय.एम.’ हा पक्ष म्हणजे काय ते समजून घेवू.
1927 ‘मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन’ या नावाने निजामाची तळी उचलून धरणार्या पक्षाची स्थापना करण्यात आली. नवाब मेहबुब नवाज खान किल्लेदार हे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष. 1938 मध्ये बहादूर यार जंग हे अध्यक्षपदी निवडून आले.
हैदराबाद संस्थानात हिंदूंना (मुस्लिमेत्तर सर्वच) धर्मांतरीत करून मुसलमान करून घेण्यासाठी ‘तबलिग’ नावाचे एक खातेच सातव्या निजामाने तयार केले होते. एमआयएम चे अध्यक्ष बहादूर यार जंग हेच या तबलिग खात्याचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. 1944 मध्ये त्यांचा अचानक संशयास्पद रित्या मृत्यू झाला. त्यांच्यानंतर या खात्याचे प्रमुख म्हणून कासिम रिझवी यांची नेमणुक करण्यात आली.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या शेवटच्या पर्वात याच कासिम रिझवीच्या नेतृत्वाखाली कट्टर धर्मांध मुसलमानांची एक फौजच ‘रझाकार’ नावाने तयार करण्यात आली होती. या फौजेने हिंदू जनतेवर भयानक अत्याचार त्या काळात केले. 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थान भारतात सामिल झाले आणि उचापतखोर कासिम रिझवीवर खटला दाखल करण्यात आला.
1949 मध्ये नविन राजकीय परिस्थिती अनुकूल नाही हे पाहून मजलीस बरखास्त करण्यात आली.
कासिम रिझवी याला बेड्या ठोकून येरवडा तुरूंगात रवाना करण्यात आले. शिक्षा भोगून तो 11 सप्टेंबर 1957 ला मुक्त झाला. पाकिस्तानात पलायन करण्याच्या अटीवरच त्याची सुटका करण्यात आली होती.
कासिम रिझवीच्या सुटकेनंतर त्याने एम.आय.एम. परत उभी करण्याचा प्रयत्न केला. मौलवी अब्दूल वहीद ओवेसी यांना अध्यक्षपदी नेमून रिझवी पाकिस्तानात निघून गेला (पुढे 1970 मध्ये त्याचे पाकिस्तानात निधन झाले).
अब्दूल वहीद ओवेसी यांच्या लक्षात आले की आपल्या पक्षाचे स्वरूप स्वतंत्र भारतात बदलले पाहिजे. शिवाय आता केवळ हैदराबाद संस्थानापुरते मर्यादित न राहता आपण अखिल भारतीय पातळीवर गेले पाहिजे. त्यांनी आपल्या पक्षाच्या नावामागे ऑल इंडिया लावायला सुरवात केली.
अब्दूल वहीद ओवेसी यांच्या नंतर 1975 मध्ये त्यांचे पुत्र सुलतान सल्लाउद्दीन ओवेसी हे या पक्षाचे अध्यक्ष बनले. मुसलमानांच्या बहुमताच्या जोरावर हैदराबाद शहरांतून सुलतान ओवेसी हे निवडणूका जिंकत राहिले. त्यांच्या नंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सध्याचे अध्यक्ष खासदार असद्दुदीन ओवेसी हे अध्यक्ष बनले. सध्या ते व त्यांचे लहान भाऊ आमदार अकबरोद्दीन ओवेसी हे दोघे पक्ष चालवतात.
असा या पक्षाचा इतिहास आहे.
प्रकाश आंबेडकरांनी या धर्मांध पक्षाला लोकशाही प्रमाणपत्र देवून आपल्या आघाडीत सामील करण्याचे निमंत्रण देण्यामागे त्यांची एक मजबुरी आहे. ती कुणी फारशी लक्षात घेतलेली दिसत नाही. नुकत्याच पार पडलेल्या जळगांव महानगर पालिका निवडणुकांत कॉंग्रेस राष्ट्रवादीचा पार सफाया झाला. शिवसेना केवळ 14 जागांवर मर्यादीत राहिली. त्या ठिकाणी पहिल्यांदाच एम.आय.एम.ने 3 जागा मिळवत आपली राजकीय स्थान बळकट करायला सुरवात केली आहे. औरंगाबाद मनपाच्या निवडणुकांत प्रकाश आंबेडकरांचा भारीप बहुजन महासंघ, रामदास आठवलेंचा भारीप, मायावतींचा बसपा यांना दोन चार जागा एकेकाळी मिळायच्या. त्या जोरावर त्यांचे दबावाचे राजकारण चालायचे. स्थायी समितीचे सभापती पद, उपमहापौरपद अशी राजकीय सौदेबाजी झालेली दिसून यायची.
गेल्या मनपा निवडणुकांत औरंगाबादेत प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, मायावती यांच्या वाट्याला भोपळा आला. आणि एम.आय.एम.च्या तिकीटावर (निवडणुक निशाणी पतंग) पाच दलित नगरसेवक निवडुन आले (बाकी 20 नगरसेवक मुसलमान आहेत). शिवाय एक आमदार निवडून आला (इम्तियाज जलील). एक उमेदवार आमदारकीला थोडक्यात पराभूत झाला. दलित-मुस्लिम अशी युती एम.आय.एम.ने घडवून आणली. याच युतीने परभणी, नांदेड येथेही बर्यापैकी यश मिळवले. संपूर्ण मराठवाड्यात ही युती काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर चांगले यश मिळवू शकते. हे सगळे बघून दलित राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत. जी मते दलित पक्षांना मिळायची त्या मतांच्या जोरावर हे पक्ष कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत सौदेबाजी करायचे. पण आता रामदास आठवले भाजप सोबत गेले आहेत. शिवाय बाकी दलित मते एम.आय.एम. खेचून घेत आहे.
अशा परिस्थितीत अपरिहार्यतेतून प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीत एम.आय.एम. ला घेवू पहात आहेत. एम.आय.एम. कडून यावर अजून काहीच स्पष्ट खुलासा आला नाही.
मराठवाड्यात एम.आय.एम. वर हिंदूंचा अजूनही राग आहे. अगदी समाजवादी चळवळीतील लोकही एम.आय.एम.वर कडक टीका करतात. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, बाबासाहेब परांजपे हे सगळे समाजवादी चळवळीतील नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निजामाशी लढले होते. त्यांनी रझाकारांचे भयंकर अत्याचार अनुभवले होते. या रझाकारांचा आधुनिक अवतार असलेल्या एम.आय.एम.ला पुरोगामी चळवळ कशी स्विकारणार? भले एम.आय.एम. आपल्या अधिकृत वेब साईटवरून कासिम रिझवीचे नाव काढून टाकत असला तरी खरा इतिहास कसा पुसता येईल?
शिवाय रझाकारांनी मराठवाड्यातील शेकडो दलितांना मुसलमान बनवले. त्यातील काहींना आर्य समाजींनी परत हिंदू धर्मात घेतले. पण काही दलितांनी रझाकारांना साथ दिल्याने मराठवाड्यातील दलित-सवर्ण हिंदूं अशी दरी तयार झाली.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला हा पण एक उघड बोलता न येणारा पैलू होता. मराठवाड्याबाहेरील सगळ्या पुरोगाम्यांना मुसलमानांबद्दल जे काही वाटते त्यापेक्षा धर्मांध रझाकारांच्या संदर्भातील मराठवाड्यातील पुरोगाम्यांसकट सगळ्या हिंदूंच्या अगदी भावना अजूनही तीव्र आहेत.
अशा पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एम.आय.एम.शी जवळीक करण्याची भूमिका समाज दुभंगविणारी वाटते. औरंगाबाद शहरात विधान सभा निवडणुकांत एम.आय.एम.चे आव्हान इतके तगडे होते की कॉंग्रेसच्या उमेदवाराला (माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांना) तिसर्या क्रमांकावर जात अमानत रक्कम जप्त करून घ्यावी लागली. आणि तरी भाजपचा उमेदवार निवडून आला.
दहा महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या वेळी प्रकाश आंबेडकरांनी एम.आय.एम.ला सोबत घेतले तर मतांचे धृवीकरण जलद गतीने होत त्याचा फायदा भाजपला (जळगांवने सिद्ध केले की शिवसेनेला बाजूला ठेवत हिंदू मत भाजपपाशी एकवटते आहे.) होतो. उत्तर प्रदेशच्या निवडणुका एम.आय.एम. ने लढवल्या होत्या. त्यांनी मुसलमान मते खात भाजपला साथ दिली असा आरोप इतरांनी तेंव्हा केला होताच.
वंचित बहुजन आघाडी उभी करताना आंबेडकरांसमोर मोठी कठीण परिस्थिती आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तर एम.आय.एम.सारखे मोठ्या प्रमाणात दलित मुसलमान मते खावून टाकतात.एम.आय.एम. सोबत जावे तर निदान मराठवाड्यात अगदी पुरोगामी मतेही जवळून निघून जातात. निर्णय कुठलाही घ्या फायदा भाजपलाच होतो. मग करावे तरी काय?
खरे तर कॉंग्रेस भाजपेतर तिसरी आघाडी उभारण्यासाठी आत्तापासून कष्ट करण्याचा पर्याय समोर आहे. त्यात एम.आय.एम. सारखे पक्ष कदापिही घेवू नयेत कारण ते अप्रत्यक्षरित्या सत्ताधार्यांना पोषक भूमिकाच घेत असतात. पण भीमा कोरेगांव पासून प्रकाश आंबेडकरांचे काय चालले आहे कळतच नाही. ‘जयभीम जयमीम’ हा नारा राजकीय दृष्ट्या देवांच्या आळंदीला न नेता चोरांच्या आळंदीला नेईल असे दिसते.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575