उद्याचा मराठवाडा, रविवार 5 ऑगस्ट 2018
सांगली जळगांव मनपा निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहिर होत होते आणि नेमके त्याच वेळी औरंगाबाद आणि अमरावतीत पुरोगामी म्हणविल्या जाणार्या पक्षांचे कार्यक्रम चालू होते. कुणी त्यांची फारशी दखल घेतलेली दिसत नाही.
औरंगाबादला शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन एक आणि दोन ऑगस्ट रोजी संपन्न झाले. आधी नाशिक आणि नंतर अमरावती येथे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहिर सभा पार पडल्या.
शेतकरी कामगार पक्षाला मराठवाड्यात एकेकाळी विरोधी पक्ष म्हणून मोठे स्थान होते. परभणी, नांदेड, उस्मानाबाद येथून अगदी खासदार निवडून आणण्यापर्यंत या पक्षाची ताकद होती. हे आता कुणाला सांगितले तरी खोटे वाटेल.
भारीप बहुजन महासंघाचा प्रयोग प्रकाश आंबेडकरांनी केला. अकोला जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद उभी केली.याच मराठवाड्यात किनवटमधून आमदार निवडून आणला. पण हा प्रयोग पुढे सरकला नाही. आता त्यांनी वंचित बहुजन आघाडी तयार केली आहे. त्याच्या वतीने आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांना भाजप-सेने इतकाच विरोध करण्याचे जाहिर केले होते. पण आता मात्र कॉंग्रेस सोबत अटी घालत युती करण्याची शक्यता जाहिर केली आहे.
हा सगळा खेळ चालू असताना जळगांव आणि सांगली येथील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. जळगांवमध्ये एम.आय.एम. सारख्या धर्मांध पक्षाने तीन जागा मिळवून आपले खाते उघडले आहे. सांगलीतही अपक्षांनी तीन जागा मिळवल्या आहेत. जळगांवात तर नोटालाही मोठ्या प्रमाणात मतं मिळाली आहेत.
मग एक साधा प्रश्न समोर येतो की पुरोगामी म्हणवून घेणारे हे पक्ष तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा सांगली-जळगांवमध्ये प्रत्यक्ष निवडणुकांना का नाही सामोरे गेले?
भीमा कोरेगांव प्रकरण पेटवण्याचा जो आरोप एल्गार परिषदेवर झाला त्या एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणी यांचे भडकावू भाषण झाले होते. लगेच जानेवारी महिन्यातच जिग्नेश आणि कन्हैय्याकुमार यांची एक सभा जळगांवात आयोजीत करण्यात आली होती. पूढे ही सभा पोलिसांनी परवानगी नाकारल्याने रद्द झाली. पुरोगामी आयोजकांना अशा सभा आयोजीत करून केवळ गोंधळ निर्माण करायचा होता का? जर त्यांचे हेतू स्वच्छ असते तर त्यांनी जळगांव महानगर पालिकेची निवडणुक डावी आघाडी तयार करून का नाही लढली?
महाराष्ट्रात 1989 पासून कॉंग्रेसला विरोध करत भाजप-सेना ही एक राजकीय ताकद म्हणून जोरकसपणे समोर येत गेली कशामुळे? विरोधी पक्षांनी आपली कॉंग्रेस विरोधाची भुमिका सैल केली. धरसोड धोरणे राबविली. शरद पवारांसारखे प्रमुख विरोधक सरळ कॉंग्रेसमध्येच गेले. याचा फायदा उठवत भाजप-सेनेने 1989-1991-1996 या तीन लोकसभा आणि 1990-95 ही विधानसभा निवडणुक मोठ्या जोरकसपणे लढवून राज्यातील आणि पुढे चालून केंद्रातील सत्ताच हस्तगत केली.
या काळात जनता दल, शेकाप, भाकप, माकप, समाजवादी पक्ष, भारीप हे सगळे कुठे होते?
राजकीय पक्ष म्हटलं की त्याला निवडणुका लढवणे लोकांसमोर राजकीय पर्याय ठेवणं भागच आहे. पण ते न करता केवळ भाषणं केल्याने पुरोगामी राजकारण पुढे कसं जाणार आहे?
वर्तमानपत्रे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे मोठ्या प्रमाणात डाव्यांच्या हातात आहेत. या सगळ्यांनी असं चित्र रंगवलं होतं की भाजप विरोधात लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जर असंतोष इतक्या मोठ्या प्रमाणात असता तर या पद्धतीनं जळगांव-सांगलीत निवडणुका भाजपला जिंकता आल्या असत्या का?
यातही पुरोगाम्यांचा मुद्दा यासाठी पुढे येतो की आधीचे सत्ताधारी आणि नविन सत्ताधारी दोघांच्याही विरोधात सामान्यांच्या प्रश्नावर आम्ही लढे उभारतो असा यांचा दावा राहिला आहे. मग हा सामान्य माणूस मतदार म्हणून यांच्या पाठीशी का उभा राहत नाही?
शेकाप किंवा भारीप बहुजन महासंघ यांनी जी काही शक्ती त्यांच्या अधिवेशनांसाठी सभांसाठी खर्च केली तीच शक्ती या दोन निवडणुकांत लावली असती तर निदान दोन तीन नगरसेवक प्रत्येक मनपात निवडुन आले असते. त्यांच्या रूपाने त्या त्या सभागृहांत वंचितांचा कष्टकर्यांचा आवाज उठविण्याचे काम यांना करता आले असते.
1967 ला राम मनोहर लोहिया यांनी कॉंग्रेस विरोधाचे राजकारण पुढे रेटले. त्यांच्यापासून गुरूमंत्र घेवूनच जणू तेंव्हाचा जनसंघ व 1980 नंतरचा भाजप वागले आणि त्यांनी हळू हळू सत्ताकारणात आपले स्थान बळकट केले. अगदी स्वत:च्या जीवावर स्पष्ट बहुमत मिळवत केंद्रात सत्ता मिळवून दाखवली. मग प्रत्यक्ष लोहियांचे अनुयायी असलेले समाजवादी किंवा इतर सर्व डावे यांना हे का नाही जमले?
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव का झाला याची कारणे वेगळी आहेत. त्याचे स्वतंत्रपणे विश्लेषण करता येईल. पण पुरोगाम्यांना भाजपला विरोध करताना कॉंग्रसचे काय करायचे ते अजूनही कळलेले नाही. परिणामी त्यांची राजकीय फरफट होताना दिसते आहे. भीमा कोरेगांव नंतर प्रकाश आंबेडकर उलट सुलट विधाने करत आहेत. भूमिका उलट्या सुलट्या घेत आहेत. मराठा मोर्चाचे लोण पसरल्यावर तर त्यांना काय करावे हेच कळत नाहीये.
भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत तर डाव्या पक्षांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंब्याचे पत्र देवून आपली बौद्धिक दिवाळखोरीच जाहिर केली. शेकापचे जयंत पाटील विधानपरिषदेवर निवडून जाताना कुणाचा छुपा पाठिंबा घेतात? पदविधर मतदार संघात किंवा इतर निवडणुकांत कुणाला छुपा पाठिंबा देतात हे आता लपून राहिलेले नाही.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे डाव्या पुरोगामी पक्षांवरचा सामान्य मतदाराचा विश्वास उडत चालला आहे. पूर्वाश्रमीच्या महारेतर दलितांची मते सरळ सरळ भाजप-सेनेच्या खात्यात जाताना दिसत आहेत. मुस्लिम मते एम.आय.एम. किंवा परत कॉंग्रेसकडे (परभणी-नांदेड मनपा) वळलेली दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीला आता फारसा वेळ उरलेला नाही. शक्यता आहे की भाजप प्रणीत जी राज्ये आहेत त्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभेला लागूनच होतील. तसे झाले तर महाराष्ट्राची विधानसभा सहा महिने आधीच होवू शकते.
पुरोगामी पक्षांनी लाचार होत कॉंग्रेसकडे आशाळभूत होवून पहात बसण्यापेक्षा ठामपणे जी आहे ती साधने व जे येतील ते पक्ष संघटना सोबत घेवून तिसरी आघाडी उभी करावी. तिला कितीही मते मिळो कितीही कमी जागा मिळो लोकशाहीत एक स्वतंत्र पर्याय मतदारांसमोर ठेवला याचे श्रेय तरी मिळेल. भविष्यातील वाटचाल कशी होणार याची दिशा नक्की होईल.
सध्या देशभरात भाजप विरोधी आघाडीत मोठी चलबिचल आहे. याचा फायदा घेत तिसर्या आघाडीने जोरकसपणे आपली धोरणे मतदारांसमोर मांडावीत. कदाचित त्यांच्यावर विश्वास बसून मतदार कॉंग्रेसचे खच्चीकरण करतील व यांना ती विरोधी पक्षाची जागा मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. आपल्या मतांचा वाटेकरी कॉंग्रेस असून त्याच्याशी फटकून वागल्या शिवाय आपल्याला जगता येणार नाही. राजकीय पक्ष म्हणून आपले अस्तित्व शिल्लक ठेवायचे असेल तर भाजप इतकाच कॉंग्रेसला कडाडून विरोध करावा लागेल. हे पुरोगाम्यांनी नीट ध्यानात ठेवले पाहिजे.
प्रकाश आंबेडकर स्वत:च कॉंग्रेसशी आघाडी करण्याच्या घोषणा करत आहेत पण आश्चर्य म्हणजे कॉंग्रेसच्या एकाही नेत्याने याबाबत चकार शब्दही काढला नाही. शेकापच्या अधिवेशनात अशीच भाजप विरोधी भाषणे करण्यात आली. पण प्रत्यक्ष कोणती राजकीय भूमिका घ्यायची याबाबत कसलीही स्पष्टता मांडली गेली नाही.
भंडारा पालघर पोटनिवडणुका आणि आता जळगांव-सांगली मनपाच्या निकालांतून काही एक शहाणपण पुरोगामी पक्ष शिकणार नसतील तर त्यांचे राजकीय अस्तित्व शिल्लक राहणार नाही.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575