उरूस, सा.विवेक, मे 2018
दादासाहेब फाळके यांचे नाव एकदा उच्चारले की परत त्यांच्यासंबंधी काहीही माहिती करून घ्यायची फारशी उत्सुकता मराठी माणसांना नसते. दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने केंद्र सरकार भारतीय चित्रपट सृष्टीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या एका व्यक्तिमत्वाला पुरस्कार देते. त्या दिवशीच्या बातमीपुरता आपला दादासाहेब फाळक्यांशी संबंध येतो. परत आपण फाळक्यांना विसरून जातो. परेश मोकाशी या नविन पिढीच्या कल्पक दिग्दर्शकाने ‘हरिश्चंद्राची फॅक्ट्ररी’ हा अफलातून चित्रपट फाळक्यांवर काढला आणि फाळक्यांबाबतच्या अनास्थेचा कलंक काही अंशी पुसल्या गेला. गंगाधर महांबरे, बापू वाटवे, इसाक मुजावर यांनी फाळक्यांचे चरित्र ग्रंथबद्ध केले. तेही बर्यापैकी वाचल्या गेले आहेत.
फाळके यांची जयंती 30 एप्रिल ही आहे. आणि पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला ती तारीख 3 मे ही आहे. लवकरच फाळक्यांची शतकोत्तर सुवर्णजयंती येते आहे. (फाळके जन्म 30 एप्रिल 1870- मृत्यू 16 फेब्रु 1944)
‘दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व’ या नावाचा मोठ्या आकाराचा 500 पानी ग्रंथ जया दडकरांनी लिहीला. (प्रकाशक मौज, आवृत्ती पहिली 22 डिसेंबर 2010). फाळकेंच्या जयंतीनिमित्त या महत्त्वाच्या ग्रंथाचे स्मरण होते आहे. सिनेप्रेमी, अभ्यासक, चित्ररसिक या सर्वांनी हा ग्रंथ आवर्जून वाचला पाहिजे किमान नजरेखालून घातला पाहिजे.
जया दडकरांनी चरित्रांच्या मांडणीची एक वेगळी पद्धत मराठीत रूजवली. कवी कादंबरीकार चि.त्र्यं.खानोलकर (आरती प्रभु), प्रकाशक रा.ज.देशमुख, कादंबरीकार वि.स.खांडेकर, कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या चरित्रातील महत्वाच्या घटनांचा शोध घेत मेहनतीने त्या त्या प्रसंगांच्या तारखा धुंडाळत संबंधीत नातेवाईक मित्र यांच्याशी चर्चा करून ही चरित्रे त्यांनी लिहीली आहेत. हे फार मोलाचे काम दडकरांनी केले आहे. पण त्याची स्वतंत्र अशी दखल घेतल्या गेली नाही. सर्व चरित्रांत खांडेकरांचे चरित्र भरपूर मोठे आहे. त्यानंतर दादासाहेब फाळके यांचे जे चरित्र त्यांनी सिद्ध केले आहे त्याचा आकार आणि आवाका मोठा आहे.
दडकरांनी या चरित्राची रचना मोठ्या विलक्षण पद्धतीनं केली आहे. चरित्र लिखाणाबाबत सुरवातीला त्यांनीच लिहून ठेवले आहे, ‘.. दादासाहेब फाळक्यांच्या आत्मपर लिखाणाचा वापर करावयाचा, त्याला त्यांच्या कुटुंबीयांच्या, स्नेह्यांच्या आठवणींची जोड द्यायची; आणि दादासाहेबांचं यथार्थ दर्शन घडविण्यासाठी त्या काळाचं भान वाचकांना असायला हवं म्हणून देश-विदेशांतील तत्कालीन ठळक घडामोडींची नोंद करायची, समकालीन चित्रपटांचा परिचय करून द्यायचा.’
दडकरांच्या या वाक्यांमधुनच त्यांच्या लिखाणाचा आवाका आपल्या लक्षात येईल. त्यांनी या चरित्रग्रंथाचे सहा विभाग पाडले आहेत. उपोद्घात (1870-1910), पर्व पहिले (1911-1919), पर्व दुसरे (1920-1930), पर्व तिसरे (1931-1940), उपसंहार (1941-1944). शिवाय 7 परिशिष्टे या ग्रंथाला जोडली आहेत. त्या त्या काळातील देश विदेशांतील घडामोडी नंतर याच काळांतील चित्रपट क्षेत्रांतील घडामोडी आणि दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यातील घडामोडी असे तीन तीन उपविभाग या प्रत्येक कालखंडाचे पाडले आहेत.
पहिला भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ 3 मे 1913 ला प्रदर्शित झाला. याच वर्षी रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहिर झाले. हिंदुस्थानातील पहिली दूरध्वनी सेवा सुरू झाली. ब्रिटीश राजवट उलथून टाकण्यासाठी सशस्त्र ‘गदर चळवळ’ची सुरवात झाली. असे कितीतरी संदर्भ त्याच काळातील दडकर नोंदवून ठेवतात. तसेच चित्रपट क्षेत्रांतील 1913 च्या नोंदी करताना ‘अमेरिकेत युनिव्हर्सल कंपनीचा ‘रॉबिन्सन क्रुसो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अमेरिकन प्रेक्षकांना सर्वात आवडला तो ‘ला रेनी एलिझाबेथ’ हा चित्रपट. फ्रान्स मध्ये एमिल झोलाच्या ‘जेरमिनाल’ कादंबरीवरील चित्रपट आला.’ हे सांगत राहतात.
फाळक्यांच्या पहिल्या चित्रपटाबाबत ‘केसरी’ च्या 6 मेच्या अंकात ‘मुंबईचे बातमीपत्र’ या सदरात जो मजकूर आला आहे तोही दडकरांची आपल्या पुस्तकांत दिला आहे. ‘..मुुंबईत दाखविले जाणारे बहुतेक चित्रपट (फिल्मस) विलायती असून त्यावरील चित्रेही विलयतीच असतात. परंतु मुंबईत रा. फाळके यांनी हा सर्व प्रकार बदलून येथे चित्रपट तयार केले, इतकेच नव्हे तर चित्रपटांवरील चित्रेही देशी म्हणजे पौराणिक असून सर्वमान्य अशी आहेत. असा एकंदर तीन हजार फूट लांबीचा चित्रपट रा. फाळके यांनी तयार केला असून त्यावर हरिश्चंद्र नाटकांचा सर्व प्रयोग ते करून दाखवितात...’
फाळक्यांच्या शेवटच्या दिवसांबाबत दडकरांनी मोठ्या वस्तुनिष्ठपणे लिहीले आहे पण त्या साध्या शब्दांतूनही त्यांचा गहिवर जाणवतो. दुसर्या महायुद्धानंतर चित्रपट निर्मितीवर कमालीची बंधनं आली होती. निर्मात्याला सरकारकडून परवानगी काढावी लागत होती. युद्धातील ब्रिटिशांच्या सहभागाचे समर्थन करणारा एक तरी चित्रपट काढण्याचा फतवाच निघाला होता. फाळक्यांनी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अर्ज केला. पण त्यांचा अर्ज फेटाळला गेला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. परवानगी नाकारणारे पत्र हाती पडल्यावर दोनच दिवसांत 16 फेब्रुवारी 1944 रोजी फाळक्यांचे निधन झाले.
फाळक्यांच्या निधनाची वार्ता नवाकाळ, मौज साप्ताहिक, द बॉम्बे क्रॉनिकल, द मिरर, फिल्म इंडिया यांनी प्रसिद्ध केली त्याच्या नोंदी दडकरांनी केल्या आहेत.
चित्रपट सृष्टीला 25 वर्षे पुर्ण झाली म्हणून फाळकेंचा गौरव 1938 मध्ये करण्यात आला. त्या प्रसंगी त्यांनी केलेले भाषण अतिशय चटका लावणारे आहे. शकुंतलेचे उदाहरण देवून फाळके म्हणतात, ‘.. माझी चित्रपटरूपी कन्या तशीच वन्य स्थितीत लहानाची मोठी झाली आहे. आता ती धनकनकसंपन्नांच्या राजवैभवाने वावरत आहे. तिच्या तैनातीत आज चाळीस-पन्नास हजार दास-दासी झुलून राहिल्या आहेत. अशा माझ्या वैभवसंपन्न बाळीला पाहून व तिचा पंचविसाचा वाढदिवस म्हणजे तिची ‘सिल्वर ज्युबिली’ एखाद्या राजालाही लाजवील अशा थाटामाटाने होत आहे हे पाहून, कोणत्या पित्याला धन्य वाटणार नाही..’ पुढे फाळकेंनी जे उद्गार काढले त्याने वाचकाच्या डोळ्यात पाणी येते, ‘.. वैभव किंवा द्रव्य ह्यांची मोहिनी इतकी विलक्षण आहे की त्यांनी पछाडलेल्या लोकांचे डोळे जननी-जनकाला देखील न ओळखण्याइतके कधीकधी धुंद होत असतात! तसेच काहीसे माझ्या सिनेमाकन्येच्या संबंधात झालेले आहे...’
ज्या पद्धतीनं फाळक्यांची उपेक्षा झाली तशीच काहीशी उपेक्षा त्यांच्यावरच्या या ग्रंथाचीपण झाली की काय अशी मला शंका येते. कारण 8 वर्षे होवून गेल्यावरही या ग्रंथांचे संदर्भ फारसे कुणी देताना दिसत नाही. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ग्रंथालयांत याची प्रत असेल का याची मला तरी शंका येते. या विषयावर दडकरांनी बोलण्यासाठी (दडकर तसे भाषणे देण्यासाठी फारसे प्रसिद्ध नाहीत. वयोमानाने ते फारसे फिरतही नाहीत.) कुणी बोलावले असेल का?
दडकरांना नसेल फिरता येत पण तरूण सिनेअभ्यासकांना बोलावून यावर बोलते केले गेले का? याचेही उत्तर नकारार्थीच येते. ‘वास्तव रूपवाणी’ या नावाने चित्रपट विषयक एकमेक नियतकालीक प्रभात चित्र मंडळाच्या वतीने काढण्यात येते (संपा. अभिजीत देशपांडे). याची तरी किती जणांना माहिती आहे?
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापुर, नागपुर येथे आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवले जात आहेत. त्यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला जातो. या महोत्सवांची पैशाची गणितं काय आणि कशी आहेत ते जरा बाजूला ठेवू. पण त्या निमित्ताने मराठीत जी काही चित्रपट विषयक पुस्तके निघाली आहेत त्यांच्यावर एखादे चर्चा सत्र, त्यांचे एखादे छोटे प्रदर्शन असे का नाही आयोजीत केल्या जात?
सत्यजीत रे यांनी चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान सगळ्यांना माहित असते. पण त्यांनी फिल्म सोसायट्यांची चळवळ रूजविली वाढीस लावली हे मात्र फारसे कुणाला माहित नसते. श्याम बेनेगल असो किंवा किरण शांताराम असो किंवा आत्ता महाराष्ट्रात यासाठी काम करणारे सतिष जकातदार, सुधीर नांदगांवकर असो यांच्या कामाबाबत किती माहिती चित्रपट रसिकांना असते?
मराठीत चित्रपट विषयक लिखाण करणारे मुकेश माचकर, श्रीकांत बोजेवार, धनंजय कुलकर्णी, विजय पाडळकर, प्रा. अभिजीत देशपंाडे, गणेश मतकरी, अमोल उदगीरकर, जितेंद्र घाटगे, अक्षय शेलार, श्रीकांत ना. कुलकर्णी असे कितीतरी आहेत. त्यांना सर्वांना जोडून घेत चित्रपट विषयक जे काही लिखाण मराठीत झाले आहे त्या बाबत सर्वत्र जागृती चर्चा घडवून आणता येईल. तसेच सध्या फेसबुक-ब्लॉग-ऑनलाईन न्यूज पोर्टल यांच्यावर मोठ्या प्रमाणात चित्रपट विषयक मराठीतून लिहीलं जात आहे. त्याचीही सविस्तर दखल घेता येईल. हे काम फाळकेंच्या 150 व्या जयंती निमित्ताने चित्रपट रसिकांनी पुढाकार घेवून करायला पाहिजे. तीच खरी दादासाहेब फाळके या चित्रपटवेड्या मराठी माणसाला श्रद्धांजली ठरले.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575