(विनोद रावेरकर- १ सप्टेंबर १९६९ - १,एप्रिल २०१७)
24 वर्षांपूर्वीची 1993 च्या मार्च महिन्यातल्या एका गरम दुपारी माझा शाळेपासूनचा मित्र हेमंत पार्डिकर त्याच्या कॉलनीतल्या एका मित्राला माझ्याकडे घेवून आला. त्याच्याकडून त्याला माझ्या संगणक केंद्रावर बसून त्याचा अभियांत्रिकीचा प्रोजेक्ट टाईप करून घ्यायचा होता. विनोदची माझी हीच पहिली ओळख. मी नुकतेच शिक्षण संपवून परभणीला आलो होतो. आणि नुकतंच संगणक प्रशिक्षणाचा व्यवसाय सुरू केला होता. माझं टायपिंग बर्यापैकी होतं. पण मला सराईतपणे कामं करता येत नव्हती. माझ्या व्यवसायातला तो माझा पहिला सहकारी. विनोद संगणक टायपिंग आधिच शिकला होता. त्याची समज अतिशय चांगली होती. तेंव्हा साध्या 286 संगणकावर, वर्ल्डस्टार 4 मध्ये आम्ही कामं करायचो. साधा 9 पिनचा डॉट मॅट्रीक्स प्रिंटर होता. मला खुप गोष्टी विनोद कडूनच काम करता करताच शिकायला मिळाल्या.
विनोद अतियश सुस्वभावी. पुढे नितीन तांबोळी सारखा संगणक प्रशिक्षणातला गुणी सहकारी मिळाला. जॉबवर्क आणि ट्रेनिंग अशा माझ्या दोन्ही बाजू अतिशय बळकट झाल्या. दासू वैद्य इंद्रजीत भालेराव सारखे साहित्य क्षेत्रातील मित्र मला चिडवायचे, ‘तूला अतिशय चांगले सहकारी मिळाले आहेत. तूझं काय काम आता तिथं? नाहीतरी तू बाहेरच रमतोस साहित्य संगीत क्षेत्रात.’ हे बहुतांश खरेही होते.
विनोद पासून सुरू झालेली व्यवसायीक मित्र गोळा होण्याची परंपरा पुढे चालूच राहिली. नितीन तांबोळी मग स्क्रिन प्रिंटींग करणारा प्रविण योगी, त्याला सहकारी म्हणून आधी विश्वास व मग विशाल कात्नेश्वरकर हे बंधू, झेरॉक्स पेपर च्या विनय व प्रसन्ना हे पराडकर बंधू, संगण दुरूस्तीसाठी महेश पाठक, संगणक प्रशिक्षणासाठी संतोष जोशी, विलास कौठेकर अशी जवळपास 11 जणांची मोठी क्रिकेटची टीमच तयार झाली. मोठं खेळकर वातावरण तिथे असायचे. खरं तर कुणीच कुणाचा नौकर नव्हतं. सगळ्यांचे व्यवसाय स्वतंत्र, एकमेकांना पुरक होते. सगळ्यांमध्ये साधेपणा होता. दुपारी सगळे मिळून एकत्र जेवायचे. माझ्या मामाची जागा होती आणि मी सगळ्यांना एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतला इतकेच फक्त निमित्त.
विनोदला मी हळू हळू डि.टी.पी.चा स्वतंत्र व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन दिले. त्याला माझ्याकडे असलेला संगणक, प्रिंटर, टेबल, खुर्ची दिले. त्याचे स्वतंत्र केबिन उभे राहिले. त्याच्या वडिलांचा माझ्यावर आणि आमच्या सगळ्या रेनबो ग्रुपवर अतिव विश्वास होता. रावेरकर कुटूंब मुळचे जळगांव जिल्ह्यातील रावेरचे. नौकरीच्या निमित्ताने काका परभणीला आले आणि इकडेच स्थायिक झाले. विनोदला मोठा भाऊ आणि दोन बहिणी. सगळ्यांची लग्नं झालेली. सगळे सुस्थितीत असलेले.
जून्या पेडगांव रोडवर त्यानं स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केला. एखाद्या पुस्तकाचे काम विनोदवर सोपवले की मी निर्धास्त असे. त्यात किमान चुका असतील, मांडणी सुरेख असेल, फॉंट योग्य तो वापरला असेल याची खात्री असायची. अगदी आत्ताआत्ता पर्यंत मी त्याच्याकडून पुस्तकाची टायपिंगची कामं करून घेतली. आता तर दुर्दैवाने विनोदही या जगात नाही पण त्याच्यासारखा डि.टी.पी. करणारा परभणीत नाही. पुढे मला औरंगाबादला मुळ परभणीचाच असलेला श्रीकांत झाडेसारखा कुशल हात या क्षेत्रातला मिळाला.
विनोदचे वय जवळपास माझ्याइतकेच. आम्ही सगळे समवयस्क रेनबो ग्रुप मध्ये गोळा झालो होतो. 1993 ते 2002 अशी जवळपास दहा वर्षे मोठी आनंदाची गेली. पुढे प्रत्येकाचे व्यवसाय वाढले. मी औरंगाबादला स्थलांतरित झालो. ज्या जागेत आम्ही व्यवसाय करायचो ती जागा माझ्या मामाने विकली. तरी आजही आम्ही भेटलो की परत जुन्या आठवणी निघतात. भेटी हा एक मोठा दिलासा पण आता विनोद गेला. त्याच्या जाण्याचा एक मोठा धक्का बसला. त्याच्या घरी काय तोंड घेवून जावे तेच कळेना. त्याची मुलगी पुजा तर माझ्या लहान मुलाबरोबर बरावीला आहे. आम्हा मित्रांमध्ये तर अशी स्थिती आहे की कुणी कुणाचे सांत्वन करायचे. रविवारी 2 एप्रिलला मी भर उन्हाचा नरसापुर एक्सप्रेसनी परभणीला उतरलो. तिथून सरळ प्रकाश भेरजे सोबत विनोदच्या घरी गेलो. कसेबसे दहा मिनीटं त्याच्या वडिलांसमोर बसू शकलो. लगेच परतून घरी गेलो. तातडीने नंदिग्राम एक्सप्रेस गाठून औरंगाबादला परतलो. तातडीने परतायचे खरे कारण म्हणजे विनोदच्या जाण्यानं उठणारी जीवघेणी कळ सहन करणं परभणीत शक्य होत नव्हतं. औरंगाबाद सारख्या दुसर्या गावात तरी सहन करण्याचे बळ मिळेल अशी वेडी आशा.