दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 22 जुलै 2014
मंचावर फारसे काहीच नेपथ्य नाही. एक जूना खांब, त्याला कंदिल लटकवलेला, दोन पातळ्या (नाटकाच्या भाषेत लेव्हल्स) एक छोटी पायरी. बस केवळ इतक्या सामग्रीवर महेश एलकुंचवार यांच्या लेखावर आधारीत सुंदर नाट्यानुभव सचिन खेडेकर सारखा कसलेला अभिनेता रसिकांसमोर सादर करतो. एलकुंचवार यांच्या शब्दांमधील आग आपल्या संयत अभिनयाने फुलवतो आणि एक अतिशय समृद्ध असा वेगळा अनुभव प्रेक्षकांना येतो.
प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाटकाव्यतिरिक्त फारसे लेखन केले नाही. त्यांच्या मोजक्या ललित लेखनाचे ‘‘मौनराग’’ हे पुस्तक मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्यातील दोन लेखांवर आधारीत ‘‘मौनराग’’ याच नावाने एक नाट्याविष्कार दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व अभिनेते सचिन खेडेकर हे सादर करतात.
मृत्यूवरचे एलकुंचवारांचे चिंतन चंद्रकांत कुलकर्णी अभिवाचनाच्या माध्यमातून समोर ठेवतात. साध्या शब्दांमध्ये किमान चढ उतरांतून या लेखनाचा आशय प्रेक्षकांसमोर पोचविला जातो. पाच मिनीटांचे मध्यंतर आणि नंतर सुरू होतो सचिन खेडेकर यांचा अभिनय, एलकुंचवारांचे शब्द आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन ही जुगलबंदी. (तिघांची ती तिगलबंदी म्हणावे का?)
पारवा या गावातील लहानपणी वास्तव्य केलेल्या घराची ओढ लागलेल्या माणसाची ही छोटी गोष्ट आहे. अडतीस वर्षांनी तो या गावात परत येतो आहे. ते केवळ त्या घराचा निरोप घ्यायला. कुठलंही काम नाही. कुणालाही भेटायचं नाही. त्या घरात आता एका सहकारी संस्थेचे कार्यालय आहे. लेखक परवानगी मागून या घरातून जून्या आठवणी जागवत फिरतो आहे. बघता बघता काळाचा पट बाजूला होतो आणि आपल्या लहानपणी लेखक जावून पोचतो. त्याला परसातल्या गुलाबाच्या फुलांच्या कुंड्या दिसायला लागतात. त्यांचा सुवास दरवळायला लागतो. माजघरातील स्वयंपाकघरात तो पोचतो. चुलीच्या बाजूला असलेले दुध दुभत्याचे कपाट त्याला दिसते. त्या कपाटाला येणारा दुधाचा तुपाचा वास, दरवाजाचा तुपकट ओशट स्पर्श, चुलीवरच्या अन्नाचा शिजताना येणारा रट रट आवाज, त्याचा वास, जवळच्या देवघरातील उदबत्तीचा कापराचा वास हे सगळंच त्याला जाणवायला लागतं.
जिना चढून तो माडीवर येतो. अतिशय कमी नेपथ्यातून आणि आपल्या अभिनयांतून सचिन खेडेकर यांनी हे सगळं साकार केलं आहे. माडीवरून त्याला पलिकडची आंबराई दिसते. सुट्टी संपवून गावाचा निरोप घेताना याच खिडकीतून त्याला जाणवणारा काळोख आजही त्याला अस्वस्थ करून जातो. माडीच्या छतावर तेंव्हा बागेतला मोर येवून बसायचा. गाण्यातील मिंड असावी तशी त्या मोराची छतावरून अंगणात घेतलेली झेप लेखकाला आठवते.
ओसरीतल्या झोपाळ्यावर बसून गाणी म्हणणारी बहिण. तिचा गोड आवाज रस्त्यावरच्या तिर्हाईतालाही खेचून घ्यायचा. याच ओसरीत वडिलांची कागदं ठेवायची शिवसी पेटी. ती उघडताच येणारा कस्तूरीचा वास. याच पेटीत लेखकाला गीतापठणात बक्षिस मिळालेले 21 कलदार रूपये मखमली पिशवीत ठेवलेले असतात. ते रूपये हातावर घेवून त्यांचा खणखणाट वडिलांनी लेखकांला ऐकवलेला असतो.
लेखकाचे वडिल रत्नपारखी असतात. डोळ्याला भिंग लावून दोन बोटांत हिरा धरून पारखणे आजही लेखकाला जशाला तसे आठवते. सचिन खेडेकर यांनी हा प्रसंग जेंव्हा रंगवला तेंव्हा त्यांच्या डोळ्यांच्या अप्रतिम हालचाली आणि दोन बोटांच्या चिमटीत बघणारी नजर खरोखरचा हिराच समोर असल्याचा भास प्रेक्षकांना होतो. ही या नटाची ताकदच म्हणावी लागेल. खुर्चीवर बसून शांतपणे बोलत असताना केवळ दोन हातांच्या हालचालीतून झोपाळ्याचा भास देणे, जिना चढून आल्यावर वर पहात केवळ डोळ्यांच्या हालचालीतून माडीचे अस्तित्व जाणवू देणे, मोराची आठवण सांगताना केलेल्या डौलदार हालचाली, पारवेकर देशमुखांच्या वाड्याचा आकार केवळ बोटांच्या हालचालीतून व्यक्त करणे असे कितीतरी प्रसंग आहेत ज्यातून सचिन खेडेकर यांची अभिनय क्षमता सिद्ध होते.
महेश एलकुंचवार यांचे लेखन ताकदवान आहेच. निरोप घेताना आईचे डोळेच पाठीला चिकटले, झाडाची साल गळून पडावी तसा इतरांचा गावाशी संबंध संपला असे लिहीणारे एलकुंचवार मोठे आहेतच. शेवटच्या प्रसंगात तर त्यांच्यातील प्रतिभेचा कसच लागला आहे. गौतम बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि सगळ्यांतून सुटल्याचा आनंद त्याला झाला. या प्रसंगाशी साधर्म्य सांगत घराचा निरोप घेताना मात्र मला आनंद झाला नाही. आई वडिल गेले आता घराचाही निरोप घेतला. पण मला बुद्धासारखी सगळ्यांतून सुटल्याची भावना मात्र झाली नाही हे लिहून एलकुंचवारांनी वेगळीच उंची गाठली आहे. सचिन खेडेकर यांनीही हा प्रसंग अप्रतिम रंगविला आहे. कमी शब्दांत आणि डोळ्यांतून अश्रू येत असतानाही आवाजावर पूर्ण नियंत्रण ठेवून हा भावनिक प्रसंग त्यांनी तोलून धरला आहे.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी वयाची पन्नाशी नुकतीच पूर्ण केली आहे. मराठवाड्यातील या गुणी कलावंताने नाटक चित्रपट या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. व्यावसायिक कामे करणार्या माणसांनी या क्षेत्रात कलेसाठीही काहीतरी केले पाहिजे. असं नुसते म्हणत न बसता प्रत्यक्ष काम करणं फार गरजेचे आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या कृतीतून आपण नाट्यकलेबाबत किती गंभीर आहोत हेच दाखवून दिले आहे.
मोठ्या लिखाणात एक दृश्य ताकद असते. ती ओळखून त्याचे नाट्यरूपांतर करणे, अभिवाचनाने असे लिखाण समोर आणणे, संगीताचा किमान वापर करून शब्दांना आकर्षक स्वरूपांत मांडणे ही सगळी कामे करायला पाहिजेत. पण ती कोण करणार? लोक पहायला येतील का? या सगळ्यासाठी पैसे उभे राहतील का? अशी केवळ चर्चा आपण करत राहतो. गावोगाव शेकडो साहित्य संमेलने, साहित्यीक उत्सव, साहित्यीक पुरस्कार, मेळावे, व्याख्यानमाला आजकाल होत आहेत. यावर लाखोंनी खर्च होतो आहे. पण इतकं करूनही प्रत्यक्ष साहित्यकृतींची ना ओळख होते, ना साहित्याचा प्रचार होतो ना चांगला लेखक रसिकांसमोर आणला जातो. यासाठी ‘मौनराग’ सारखे प्रयोग होण्याची गरज आहे.
ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेच्या बाबत ‘‘तेणे कारणे मी बोलेन । बोली अरूपाचे रूप दावीन । अतिंद्रिय परि भोगविन । इंद्रीयांकरवी॥ (अध्याय 3, ओवी 36) अशी प्रतिज्ञा केली होती. आपण ती पार विसरून गेलो आहोत. चांगल्या साहित्यकृतींवर आधारीत सादरीकरणं झाली पाहिजेत. त्यातून प्रेक्षकांना त्या कलाकृतीकडे वळावे वाटू शकते.
दि.बा.मोकाशी यांच्या ‘आनंद ओवरी’ या कादंबरीवर आधारीत अप्रतिम एकपात्री प्रयोग किशोर कदम या कसदार अभिनेत्याने यापूर्वी केलेला आहे. हिंदीत असे प्रयोग झाले आहेत. ‘तूम्हारी अमृता’ हा पत्र वाचनाचा प्रयोग फारूख शेख, शबाना आजमी हे करायचे.
भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरीत अशा सादरीकरणाच्या भरपूर शक्यता आहेत. गो.नि.दांडेकर यांच्या कादंबर्यांचे अभिवाचन अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या कन्या वीणा देव व जावाई विजय देव हे करतात. या सगळ्यांतून नाट्य/साहित्यविषयक जाण प्रगल्भ होत जाते.
‘‘मौनराग’’ च्या निमित्ताने एक सुंदर अनुभूती मराठी रसिकांना सध्या भेटत आहे. चंद्रकांत कुलकर्णी व सचिन खेडेकर यांना यासाठी धन्यवाद !
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575